- भूषण राजगुरू
(भाषेबद्दल बरीच चर्चा, भाषणं, लेख असं काय काय झडत, पडत असतं. भाषेच्या प्रवासाचे जे अनेक भाग असतील त्यातील एक भाग असलेल्या एकाला थोडंसं लिहायला सांगितलं. त्याने लिहून दिलं, ते इथे प्रसिद्ध होतंय. खालचे सगळे शब्द काळजीपूर्वक वाचले तर त्या प्रवासाचे काही स्वाभाविक कंगोरे कळू शकतील, असं वाटतं. आपल्या विनंतीवरून मजकूर लिहून दिल्याबद्दल भूषणचे आभार. ही मूळ नोंद ऑक्टोबर २००९मध्ये केली होती. तेव्हा रेघेचा पत्ता दुसरा होता, हा पत्ता वर्षभराने सुरू झाला, त्यामुळे आत ही नोंद इथे पुन्हा आणून ठेवतो आहे - रेघ)
मी मूळचा सोलापूरचा. ग्रामीण भागातून आल्यानं भाषेचा न्यूनगंड होताच. काही जर कुठं बोलायचं असेल तर सुरुवातीपासून पुणेरी स्टाईलने बोलायचं असं ठरलं होतं. पण चुकून थोडीतरी का होईना सोलापुरी भाषा बोलण्यात येतंच होती. 'सोलापुरी भाषा' पुण्यातील लोकांसाठी गावंढळ समजली जाते, त्यामुळे मी जरा जपून आणि थोडक्यात बोलत असे. मी कितीही सुधारणा करून बोललं तर पुढच्यांना ते लगेच लक्षात येत असे, आणि ते लगेच म्हणायचे, ''तुम्ही सोलापूरचे का?'' त्यामुळे या पुणेरी भाषेमुळे मला अधिकच न्यूनगंड निर्माण झाला. त्यामुळे सगळ्यांशी बोलताना विचार करून बोलायला सुरुवात केली. खरं सांगायचं तर, या नाटकी बोलण्याचा मला तरी कंटाळा येतो. त्यामुळे मी माझ्या जवळच्या मित्रांशी बोलताना मात्र माझ्याच भाषेत बोलायचो/बोलतो. ते मला जास्त आवडतं. त्यामुळे मनमोकळ्या गप्पा होत असत. मात्र, तो परिस्थितीचा एक भाग झाला. पण जी सत्य परिस्थिती आहे, ती स्विकारणं जास्त योग्य ठरेल. त्यापासून पळवाटा काढण्यात काही तथ्य नाही. म्हणून मी परिस्थिती स्वीकारून चांगल्याप्रकारे इतर मुले-मुली कशी बोलतात ते पाहून बोलण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यांत मला मित्रांकडून चांगल्या प्रतिक्रियासुद्धा मिळू लागल्या. त्यामुळे सकारात्मक विचार करण्यास सुरुवात केली.
मी जेव्हा २००७मध्ये पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात प्रवेश घेतला, त्यावेळी सगळ्यांशी जपून वागत असे, कारण 'बोलण्यात काहीतरी चूक होईल का?' ही भीती मनात होती. पण हळूहळू ती भीती निघून गेली, कारण आपल्यासारखेच सगळेजण आहेत, त्याच भाषेत बोलतात, फक्त कमी-जास्त प्रमाणात त्यांची भाषा चांगली किंवा वाईट असते, हे लक्षात आलं. एखादी गोष्ट येत असूनही वर्गात न बोलण्याची सवय मात्र अद्यापही गेलेली नाही. कारण बोलण्यात काही चुकेल का? असा प्रश्न पडतो. यामुळे माझंच नुकसान आहे, हेसुद्धा लक्षात येतं, त्यामुळे पुण्यात आल्यानंतर प्रथम मराठी भाषा सुधारण्याचा प्रयत्न केला आणि तो थोड्याफार प्रमाणात यशस्वीही झाला. म्हणून आता पुढचं पाऊल असेल ते, इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.
- भूषण राजगुरू (ई- मेलसाठी पत्ता: rajguru.bhushan20@gmail.com)
No comments:
Post a Comment