Tuesday, 30 October 2012

मध्यमवर्गियांचा पुढारी

- भाऊ पाध्ये

आपण कोसळल्याचं गेल्याच आठवड्यात बाळ ठाकरेंनी मान्य केलंय  आणि आता वर्षअखेरीपर्यंत तोंड उघडणार सल्याचं राज ठाकरे बोलून गेलेत. त्यामुळं दरम्यानच्या काळात आपण बोलू शकतो. आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज भाऊ पाध्यांची पुण्यतिथी आहे. अशी सगळी निमित्तं साधत भाऊंचा हा बाळ ठाकरेंवरचा लेख 'रेघे'वर प्रसिद्ध होतो आहे. हा लेख मूळ १९९४-९५च्या आसपास 'महानगर'मध्ये आला असावा. पण त्याचा नक्की अंदाज नाही. जी फोटोकॉपी केलेली प्रत हातात आलेय ती फक्त या लेखाची चार पानं आहे, त्यात प्रकाशनाचा उल्लेख नाही, पण साधारण अंदाज. कोणाला या लेखाच्या मूळ प्रसिद्धीचा तपशील माहीत असल्यास सांगितला तर तसा बदल इथं करून घेता येईल.
भाऊंबद्दलचा ब्लॉगही 'रेघे'वरचा एक प्रकल्प आहे, तोही वाटल्यास पाहाता येईल.




मध्यवर्गियांचा पुढारी
- भाऊ पाध्ये

प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात मला बाळ ठाकरेंचा एक निकटवर्तीय भेटला. गप्पा मारता मारता ठाकरे बंधू आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींबद्दल आदर कसा दाखवतात, हे तो साभिनय सांगू लागला. ठाकरे बंधूंची ती रीत इतकी हास्यास्पद आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या कुचेष्टा करणारी की मला कपाळावर हात मारून घ्यावासा वाटला. ठाकरे बंधूंना आता सत्ता मिळवण्याची खाज सुटली होती. सत्तेमध्ये पैसा आणि लौकिक असतो एवढंच त्यांना ठाऊक होतं.

तीस-चाळीस वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्र बनवण्याचं श्रेय घेण्यात प्रसोपा (प्रजा समाजवादी पार्टी) आणि कम्युनिस्ट पक्षात स्पर्धा सुरू झाली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यापासून बाळ ठाकरे नावाचा एक नवा नेता क्षितिजावर चमकू लागला. दैनिक 'नवशक्ति'मध्ये छापण्यात येणारी त्यांची व्यंग्यचित्रं फारच लोकप्रिय झाली. मराठी माणसाचं कल्याण करण्यासाठी त्यावेळी जो तो धडपडत होता. एक एक मराठी माणूस आपल्या कळपात ओढण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यामुळे एक ओंगळवाणी परंपराच सुरू झाली होती. ज्येष्ठ व्यक्तींबद्दल अनादर व्यक्त करण्याची. कोणीही कितीही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती असली तरी तिच्याबद्दल अनादर व्यक्त होईल असं सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरून बोललं जाऊ लागलं. याने काम केलं, त्याने काम केलं? असे प्रश्न विचारून प्रत्येकाच्या समाजसेवेची शंका घेतली जाऊ लागली. यातल्या अहमहिकेमुळे आपण किती खालच्या पातळीवर जातो याचं ज्याला त्याचा भूषण वाटू लागलं आणि कम्युनिस्ट-प्रसोपा या मराठी माणसाचं कल्याण करणाऱ्या मंडळींत 'शंकर्स विकली'च्या धर्तीवर मराठीतील 'मार्मिक'सारखं व्यंग्यचित्रं साप्ताहिक काढणाऱ्या बाळ ठाकरे यांची शिवसेनाही आली. प्रथम हे नवीन लोक कोण आहेत असं प्रत्येकाला कुतूहल होतं. पण एका दसऱ्याला त्यांनी प्रचंड सभा घेऊन आपली शक्ती सर्वांना दाखवली.

बाळ ठाकरे (Photo courtesy: BCCL)
बाळ ठाकरेंनीही सार्वजनिक सभेत बोलताना कोणत्याही आदरणीय व्यक्तीबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन बोलायला सुरुवात केली. म्हणूनच, शिवसेनेला काही शहाणे लोक संयुक्त महाराष्ट्राचं कार्टून म्हणत. याने देशासाठी काय केलं, त्याने देशासाठी काय केलं? ही ठाकरेंची भाषा. काहीही न करणाऱ्या मध्यमवर्गाला प्रिय. ही मध्यमवर्गीय प्रवृत्तीच बाळ ठाकरेंनी जोपासली. मध्यमवर्गाला नेहमी काळजी, देशावर प्रेम करण्याचा अधिकार कुणाला आहे? शिवसेनेने ठरवलं की तो इझमच्या मागे लागणाऱ्या मंडळींना नाही. आपल्याकडे ओंगळ बोलणाऱ्यांना मौलिक विचार मांडण्याचं श्रेय मिळतंच.

डाळिंब्या, दात कोरून पोट भरण्याची कला, किडकिडीत देहयष्टी या सी.के.पी. जमातीतील बाळ ठाकरे. त्यांच्या अंगावर प्रतिष्ठितपणाचा आव आणणारी शाल, त्यांच्या मनगटावर धार्मिक खूण असणारी रुद्राक्षाची माळ अशी हल्ली बाळ ठाकरेंची मूर्ती. मी 'नवशक्ति'मध्ये आलो तेव्हा त्या ऑफिसमध्ये त्यांचा संदर्भ आमच्या बोलण्यात निघत असे, बिनमहत्त्वाचा असा. खरं म्हणजे तो चांगला व्यंग्यचित्रकार होता. आमचा बाबा दळवी एक किस्सा सांगायचा. एका संपादकाला एक रेखाचित्र हवं होतं स्टॅलिनचं. तेव्हा बाळ ठाकरेने ते काढून दिलं. तो संपादक म्हणाला, 'धिस इज द पिक्चर आय वॉन्ट'. असा हा रेषांचा जादूगार मी येण्यापूर्वीच 'नवशक्ति- फ्री-प्रेस'मधून नाहीसा झाला. त्याची एक फूटपट्टी मात्र राहिली. तिच्यावर त्याची बाळ ठाकरे अशी सही (इंग्रजीतली) होती. ती तेवढी माझ्याजवळ राहिली. त्याच्याविषयी बोलणारा एक मित्र मला भेटला तो म्हणजे हरिन मेहता. तो अनेक गोष्टी सांगायचा माझ्याकडे. गुरुदत्तविषयी, व्ही. शांतारामविषयी आणि ठाकरेंच्या शिवेसेनेच्या हस्तकांविषयी. इंग्लिश भाषेतील शंकर्स विकलीच्या धर्तीवर त्याने त्याच वेळी मार्मिक नावाचं व्यंग्यचित्र साप्ताहिक काढलं होतं. पण शंकर आणि बाळ ठाकरे यांच्यात फरक होता की, शंकरने लहान मुलांसाठी लायब्ररी काढली, त्यांच्यासाठी चित्रकलेची स्पर्धा ठेवली, तर बाळ ठाकरेंनी मार्मिकमधून दाक्षिणात्य अधिकाऱ्यांची यादी द्यायला सुरुवात केली. व्यंग्यचित्रकारात असलेल्या माणुसकीचा हा ऱ्हास होता. बाळ ठाकरेंमध्ये शोधूनही माणुसकी सापडणार नाही. सत्ताबाजांचं असंच असतं. ते आपले जुने मित्र विसरतात. मित्रांची किंमत लावून त्यांना जवळ किंवा दूर ठेवतात.

१९६२ साली भारताने चीनकडून मार खाल्ला. पासष्ट साली लालबहादूर शास्त्रींमुळे भारताची अब्रू जेमतेम वाचली. त्यावेळेस भारताची इमेज उजळ करणारी आशा दिसायला हवी होती. त्याकाळामध्ये प्रत्येक भारतीयाला आपण देशासाठी बलिदान करायला हवं असं वाटत असे. पण त्यापूर्वी युद्ध संपून जात असे. फक्त त्याला एक नेत्याचा आदर्श मिळत असे.

१९६५ साली आपल्याला लालबहादूर शास्त्री मिळाले. १९७१ साली आपल्याला इंदिरा गांधी मिळाल्या. पण आपली कर्तृत्वाच्या अतृप्ततेची भावना अतृप्तच राहिली. आपले निखारे कधी बुजत नसत. बाळ ठाकरेंसारखा त्यावर फुंकर घालायला होता एवढंच.

बाळ ठाकरे हे उजवे नेते की डावे? ज्यावेळी इंदिरा गांधींनी काँग्रेसमध्ये फूट पाडली, त्यावेळी डावे आणि उजवे गट स्पष्ट झाले. मोरारजी देसाई, स. का. पाटील, संजीव रेड्डी ही उजव्या गटाची माणसं एका बाजूला आणि इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, जगजीवनराम ही डावी मंडळी दुसऱ्या बाजूला एकत्र आली. यात अशाही काही व्यक्ती होत्या की ज्यांची आयडेन्टीटी स्पष्ट झाली नाही. त्यात बाळ ठाकरे. देशभक्त म्हणून उजवे, महाराष्ट्राचे कनवाळू म्हणून डावे. त्यांना स. का. पाटलांचे चमचेही म्हणत. पण निवडणुकांमध्ये डाव्या जॉर्ज फर्नांडिसांनी स. का. पाटलांचा पराभव केल्यानंतर स. का. पाटील राहिले नाहीत. मग महाराष्ट्राला वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री लाभले. त्यावेळी शिवसेनेला वसंतसेना म्हणण्यात येऊ लागलं. बाळ ठाकरेंनी उजव्या मोरारजींना मुंबईमध्ये प्रवेशास बंदी करून डावखोरेपणा दाखवला. पाकिस्तानाकडून होणारी फरफट आणि चीनकडून मार मिळाल्याची नामुष्की यामुळे भारतीयांमध्ये श्रेष्ठ कर्तृत्वाची व्यक्ती राहिली नाही आणि काही मंडळींना प्रमोशन मिळालं, त्यापैकीच एक बाळ ठाकरे होते.

चीनकडून दणदणीत पराभव आणि पाकिस्तानकडून होणारी फरफट यामुळे भारतीय कर्तृत्व नष्ट झाल्यासारखंच होतं. चीनच्या हल्ल्यानंतर जवाहरलाल नेहरू 'ए मेरे वतन के लोगो'च्या तालावर रडले तेव्हा आपलं रडकं कॅरेक्टर स्पष्ट झालं आणि आपल्याला कर्तृत्ववान नेतृत्वाची गरज तातडीने वाटू लागली. माझी एकदा एका अमेरिकन तज्ज्ञाशी गाठ पडली. ते दिवसत अमेरिकेच्या निवडणुकांचे होते. तो अमेरिकन तज्ज्ञ म्हणाला, ''तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाही होणार. ही निवडणूक निक्सनच जिंकणार. पण तुम्ही का त्यामुळे नाराज होता? जगातल्या चार बलाढ्या राष्ट्रांपैकी तुम्ही आहात.'' पाकिस्तानचा पासष्ट साली आणि एकाहत्तर साली पराभव करूनही आपण त्यांना पुढेही मार देऊ असं म्हणण्यास आम्ही धजत नाही. तसं म्हणण्याची आमची हिंमत नाही. म्हणूनच रडकेपणाला मिसाल नाही असं म्हणावं लागतं. या आपल्या स्वभावाचा फायदा बाळ ठाकरेंनी पुरेपूर घेतला. 

'अधिकार कसा जमवतो' याकडेच त्यांचं लक्ष लागलं असावं. म्हणूनच 'कभी ये कभी वो' करत सत्ता संपादन करण्याचा जुगार बाळ ठाकरे खेळत राहिले. एकदा ते मधु दंडवतेंच्या प्रजा समाजवादी पक्षाबरोबर बसले, तर एकदा आठवले-ढसाळ यांच्याबरोबर बसले. पण त्यांना ठाऊक होतं, प्रसोपा, आठवले-ढसाळ यांच्याबरोबर युती करण्यात अर्थ नाही. कारण त्यांना इँटलेक्च्युअल म्हणून ओळखतात. त्यांनी इँटलेक्च्युअल्स कधीच जमवले नाहीत. कारण त्यांना ठाऊक होतं की, इंटलेक्च्युअल्सच्या हातून काहीच व्हायचं नाही. त्यापेक्षा हे भाजपवाले (भारतीय जनता पक्ष) आपलं डोकं वापरत नाहीत हे बाळ ठाकरेंना बरं वाटायचं. त्यांच्याशी युती करायला काहीच हरकत नाही. त्यांच्या लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढून व्ही. पी. सिंग सरकारमध्ये फूट पाडली. त्यावेळी त्यांनी बेकेट मित्र राजा हेन्सीसारखं या भाजपवाल्यांना विचारलं असेल की, 'डू यू युज यूअर हेड?' बाळ ठाकरेंनी भाजपसारखे बिनडोक आणि टची सहकारी मिळवले आणि युतीचं सरकार बनवलं. जोपर्यंत इंदिराजी होत्या तोपर्यंत त्यांच्या मुसलमानधर्जिण्या स्वभावाचे दृष्टांत घेऊन भाजपवाले शरद पवारांच्या पाठीमागे उभे राहिले. पण इंदिराजींच्या पश्चात त्यांनी शिवसेनेबरोबर युती केली आणि शरद पवारांच्या विरोधी झाले.

अखेर बाळ ठाकरेंना सत्तेच दर्शन घडलं. काँग्रेसच्या उद्दाम सत्तेला त्यांनी आव्हान देऊन काबूत आणलं. या कामी त्यांना भाजपची मदत झाली. त्यांचा मुस्लिमविरोध आणि टचीनेस हा अयोध्येपासून महाराष्ट्रापर्यंत प्रसिद्ध होता. त्याचा बाळ ठाकरेंनी चांगलाच फायदा घेतला. भाजपवाले उच्चवर्णीय. काँग्रेसला प्रथम शत्रू मानणारे. शिवसेनावाले काही वेगळे नव्हते. हे एकत्र आल्यानंतर काय मन्वंतर घडतं ते सर्वांना बघायचं होतं. मन्वंतर घडणार नव्हतंच. दोघांचं राजकारण काँग्रेसच्याच मागील पानावरून पुढे जाणार होतं. देशभक्तीचा दावा करणाऱ्या या दोघांनाही रान मोकळं झालं. आता त्यांनाही देशभक्त म्हटलं जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

अत्रे ते बाळ ठाकरे यांच्यामध्ये शिवीगाळ नेहमी चाले. पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्र्यांचे सहकारी असणारे बाळ ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे मुलाच्या बाजूने उतरले याचं मला आश्चर्य वाटलं. असो. आचार्य अत्रे कालांतराने वारले आणि या प्रकरणावर पडदा पडला.

बाळ ठाकरेंनी मग कम्युनिस्ट विरोधी टाकला आणि दाक्षिणात्य विरोध सुरू केला. दाक्षिणात्य परप्रांतीय असून ते मुंबईकर महाराष्ट्रीयांची गळचेपी करत आहेत असा प्रचार सुरू केला. फ्री-प्रेसमध्ये असं पिकलं की, बाळ ठाकरेंना एका दाक्षिणात्याने असा दम दिला होता की, त्याला नेहमी घरी जाताना संरक्षण लागत असे. दाक्षिणात्यांशी बाळचं वाकडं झालं त्याचं पुढे काय झालं ते मला ठाऊक नाही.

आपल्याविषयी जितके गैरसमज होतील तितके बाळला हवेच होते. गैरसमज हे एका सामान्य कर्तृत्वाच्या व्यंग्यचित्रकाराला राजकीय नेता होण्यासाठी आवश्यक असावेत. माझी खात्री आहे, प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला सत्तेचं आकर्षण असावं आणि आपण चार लोकांमध्ये गाजावं असं त्याला वाटत असतं. बाळला हे माहीत आहे की आपल्याला जे मिळतं ते याचमुळे. आपलं लोक ऐकतात ते त्यांना आपल्याविषयी वाटणाऱ्या आकर्षणामुळे. भाजपवाल्यांना आपला मुस्लिमविरोध का, हे समजलं नाही. मुस्लिमांना ते देशाशी देणं-घेणं लागतात हे मानतच नव्हते. म्हणूनच देशभक्ती हा हिंदूंचाच मक्ता आहे असं ते समजत. त्यामुळेच मुसलमानांना ते देशभक्तीपासून वगळतात. त्यांना ज्याप्रमाणे जनता पक्षाला दूर फेकता आलं त्याचप्रमाणे आपल्यालाही दूर करता येईल, असंही बाळ ठाकरेंना वाटतं. बाळ ठाकरे याचसाठी मुस्लिमविरोधी भूमिका घेऊन भाजपचा काटा काढायचं नाटक खेळत आहेत.
***

भाऊ पाध्ये

Friday, 5 October 2012

खऱ्या सोशल मीडियाच्या शोधात : शुभ्रांशू चौधरी

नक्षलवाद हा भारताच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वांत मोठा धोका आहे, असं विधान पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केल्याला आता सहा वर्षं उलटून गेली. बस्तर, दांतेवाडा हा छत्तीसगढमधला परिसर म्हणजे नक्षलवादी कारवायांचं देशातील एक मुख्य केंद्र. या परिसरासंबंधी मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये बातम्या येत असतातच, पण या बातम्या म्हणजे बाहेरच्यांनी आतल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यासारखं असतं.    
या पार्श्वभूमीवर आदिवासींना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी स्वतःचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी बीबीसीसोबत काम केलेले पत्रकार शुभ्रांशू चौधरी यांनी 'सीजी नेट स्वरा'चा प्रयोग चालवला आहे. चौधरी स्वतः मूळचे छत्तीसगढचेच. त्यांचं शालेय शिक्षणही आदिवासीबहुल शाळेत झालं. अर्थात, त्याही वेळी आपण पहिल्या बाकावर बसायचो आणि आदिवासी मंडळी मागच्या बाकांवर, हे अजून त्यांच्या आठवणीत आहे. पुढं पत्रकारितेत आल्यानंतर त्यांनी बहुतांश काळ 'बीबीसी'साठी आणि दोन वर्षं 'द गार्डियन'साठी वार्तांकनाचं काम केलं. नक्षलवादी भागातून वार्तांकनाचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे.


शुभ्रांशू चौधरी
'बीबीसी'सोबत दहा वर्षं काम केल्यानंतर वयाच्या पस्तिसाव्या वर्षी चौधरी यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, त्यामागं आदिवासींना स्वतःचं माध्यम मिळवून देण्यासंबंधी काय करता येईल याचा शोध घेणं हे मुख्य कारण होतं. पण असं आदिवासींसाठी माध्यम उभारण्याचं काम अवघड होतं. मुळात वर्तमानपत्र किंवा टीव्हीसाठी लागणारा पैसा परवडण्याजोगा नव्हता. मर्यादित अंतरात प्रसारण करणाऱ्या कम्युनिटी रेडियोच्या स्तरावर काही प्रयत्न करता आला असता, पण त्यासंबंधीच्या सरकारी नियमांमुळं बातम्यांशी संबंधित कृती या माध्यमातून करता येत नाही, त्यामुळं हा पर्याय रद्द झाला. या भागात इंटरनेटचा प्रसारही झालेला नसल्यानं तोही मार्ग बंद होता. एक माध्यम मात्र आदिवासी भागातही चांगल्यापैकी रुळलं असल्याचं चौधरींच्या लक्षात आलं. हे माध्यम म्हणजे मोबाइल फोन. या माध्यमाचा वापर करून, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊन चौधरींनी 'सीजी नेट स्वरा'ची कल्पना २०१०मध्ये प्रत्यक्षात आणली. ('सीजी' ही 'सेंट्रल गोंडवन' या नावाचं प्रतिनिधित्त्व करणारी अक्षरं. इंटरनेटची या मॉडेलमधली महत्त्वाची भूमिका म्हणून 'नेट'. आणि मौखिकतेला यात प्राधान्य म्हणून 'स्वरा'.)

लोकशाही देशात सगळ्या लोकांना बोलण्याचा हक्क असणं आणि सगळ्यांनी एकमेकांचं बोलणं ऐकून घेणं हा समस्या सोडवण्याचा एक मुख्य मार्ग असावा, एवढाच 'सीजी नेट स्वरा'मागचा आशावाद.
०००

'सीजी नेट स्वरा'चं काम अशा प्रकारे चालतं -
छत्तीसगढमधील आदिवासी भागातील व्यक्तीला एखाद्या घटनेसंबंधी काही संदेश द्यायचा असेल तर तिनं आपल्या मोबाइलवरून 'सीजी नेट स्वरा'च्या फोन नंबरवर मिस्ड कॉल द्यावा. 'सीजी नेट स्वरा'चं कार्यालय व या यंत्रणेचा सर्व्हर बंगळूरमध्ये आहे; तिथे एखाद्या व्यक्तीचा मिस्ड कॉल आल्यानंतर त्या व्यक्तीला फोन केला जातो. मग ती व्यक्ती कुरुख, गोंडी किंवा हिंदी भाषेमध्ये आपला संदेश सांगते.

हा संदेश सीजी नेट स्वराच्या बंगळूरमधील मुख्य कार्यालयातले पत्रकार रेकॉर्ड करतात. रेकॉर्ड केलेला संदेश साधारण तीन मिनिटांचाच असतो. त्यानंतर या संदेशाची शहानिशा केली जाते. मुळात संबंधित व्यक्तीला आपल्या खऱ्या नावानंच असा संदेश देता येतो. या संदेशाचा सारांश इंग्रजीमध्ये सीजी नेट स्वराच्या वेबसाइटवर मूळ रेकॉर्डिंगसह प्रसिद्ध केला जातो. यामुळं जगभरातील माध्यमांना, पत्रकारांना व इतर सर्वांना तो संदेश ऐकता येतो. शिवाय एखाद्याला आपल्या फोनवरून संदेश ऐकायचा असेल तर तो बंगळूरमधील कार्यालयातील नंबरवर फोन करून संदेश ऐकू शकतो. साधारण दिवसाला तीन ते चार संदेश 'सीजी नेट स्वरा'वर रेकॉर्ड केले जातात.

image courtesy : CGNet Swara



संदेशाची शहानिशा करणं हा भाग काही प्रमाणात 'सीजी नेट स्वरा'च्या पत्रकारांच्या जबाबदारीवर होतो. पण त्यापलीकडे त्या संदेशाची बातमी करावी असं एखाद्या वर्तमानपत्राला वाटलं तर ते त्यांच्या स्त्रोतांमार्फत या संदेशातून दिलेल्या माहितीची तपासणी करतातच. आतापर्यंत द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांनी 'सीजी नेट स्वरा'च्या संकेतस्थळावरील संदेशांचा आधार घेऊन बातम्या दिल्या आहेत. (५ एप्रिल २०१० रोजी तादमेटला येथे सुरक्षादलांच्या  जवानांना मारल्याच्या घटनेनंतर वर्षभराने मार्च मध्ये याच गावाच्या पंचक्रोशीतील काही घरं जाळली जात असल्याची मूळ माहिती सीजी नेट स्वरावरच्याच माध्यमातून मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रांपर्यंत पोचली होती. अर्थात अशा वेळी बातमीची शहानिशा करणं 'सीजी नेट स्वरा'च्या यंत्रणेमधून शक्य होत नाही.)
०००

---मुलाखत---

- 'सीजी नेट स्वरा'च्या निर्मितीमागची भूमिका कोणती होती?
 आपल्या माध्यमांच्या व्यवस्थेत कुठल्याही विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वरून खाली पाहिल्यासारखा असतो. उदाहरणार्थ, नक्षलवादाची समस्या असेल, तर दिल्लीतील एखादी वृत्तसंस्था माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला छत्तीसगढमधल्या जंगलात पाठवेल आणि मग ती व्यक्ती तिथून दिल्लीला माहिती पाठवेल. यात त्या भागात राहणाऱ्या मंडळींचं खरं म्हणणं मांडलंच जात नाही. दिल्लीहून येणाऱ्या पत्रकाराला आदिवासींची भाषा पुरेशी येत नसते. त्यामुळे जे हिंदीत संभाषण साधू शकतात त्यांच्याशीच तो बोलू शकतो.  छत्तीसगढपुरता विचार केला तर मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रं व दूरचित्रवाणी वाहिन्यांत काम करणाऱ्या पत्रकारांमध्ये आदिवासी समाजातून आलेल्यांचं प्रमाण नगण्य आहे. या भागांमधील आदिवासींमध्ये गोंड व कुरुख या भाषा मुख्यत्त्वे बोलल्या जातात. या भाषा जाणणारे पत्रकार माध्यमांमध्ये कमी संख्येने असल्यामुळे आदिवासींच्या भावनांचं प्रतिबिंब माध्यमांमध्ये पडणं कठीणच आहे. कुरुख भाषेचं उदाहरण द्यायचं, तर ही भाषा बोलणारे २० लाखांहून अधिक लोक आहेत, पण या भाषेत ना एखादं वर्तमानपत्र आहे, ना टीव्ही चॅनल, ना एखादं रेडियो केंद्र.
'बीबीसी'मधली नोकरी सोडल्यानंतर आदिवासींशी संवाद साधताना मला लक्षात आलं की, नक्षलवादाच्या समस्येला भाषेचा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. तुम्ही आमच्याशी संवाद साधत नसाल तर आम्हाला तिसऱ्या कोणाशी तरी संवाद साधावाच लागणार आणि हे तिसरे म्हणजे जर नक्षलवादी असतील तर त्याला दोषी कोण, असा सवाल आदिवासींकडून ऐकायला मिळाला. नक्षलवादाची समस्या ही मुळात नक्षलवादाशी संबंधित समस्या नसून संवादाच्या तुटीची समस्या आहे. ही संवादाची तूट भरून काढण्यासाठी मीडियाचं पर्यायी मॉडेल उभारण्यावर लक्ष केंद्रीत केलं आणि त्यातून 'सीजी नेट स्वरा'चा जन्म झाला. आदिवासी परंपरा ही मुख्यत्त्वे मौखिक आहे याचं महत्त्व लक्षात घेऊन आणि या भागातील मोबाईलचा बऱ्यापैकी प्रसार पाहून मोबाईलचंच माध्यम वापरून आम्ही या मॉडेलचा पाया घातलाय.


- गेल्या दोन वर्षांतल्या 'सीजी नेट स्वरा'वरच्या नोंदी पाहिल्या तर त्यातल्या ८५ टक्के हिंदीमध्ये आहेत तर १० टक्केच कुरुख भाषेत आहेत आणि उरलेल्या ५ टक्के गोंडी आदी आदिवासी भाषांमध्ये. मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये आदिवासी भाषांना प्रतिनिधित्त्व नाही, हा दोष दूर करण्याच्या हेतूनं सुरू झालेल्या 'सीजी नेट स्वरा'च्या उपक्रमातही आदिवासी भाषांमधून बोलल्या जाणाऱ्या नोंदीचं प्रमाण कमी आहे, असं का? यावर काय उपाय करता येईल?
तुमचं निरीक्षण रास्तच आहे. ही आमच्या क्षमतेची कमतरता आहे असं म्हणता येईल. ज्या लोकांना फक्त आदिवासी भाषाच बोलता येते त्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो नाही. या भागातली परिस्थिती अशी आहे की, जिथपर्यंत डांबरी रस्ते आहे किंवा ज्या भागात जाणं सुरक्षित आहे तिथपर्यंतच 'सीजी नेट स्वरा'चं काम पोचलं आहे, रस्त्यांना लागून असलेल्या परिसरात राहणाऱ्या आदिवासींपैकी बहुतेकांचा हिंदीशी परिचय असतो, त्यामुळं ते आपलं म्हणणं मांडण्यासाठी पुढं येतात. पण त्या पलीकडे जंगलाच्या अधिक आतल्या भागात पोहोचणं विविध कारणांसाठी अतिशय अवघड आहे. त्यासाठी जेवढी सक्षम यंत्रणा हवी तेवढी आमच्याकडे आत्ता नाही. गेल्या तीन वर्षांत आम्ही प्रायोगिक तत्त्वावर 'सीजी नेट स्वरा'चा उपक्रम राबवतोय आणि किमान 'थिअरी'च्या पातळीवर आम्ही काही गोष्टी सिद्ध करायचा प्रयत्न केल्या आहेत. ज्याला 'मीडिया डार्क झोन' असं म्हणतात, म्हणजे जिथं माध्यमांचा अजिबात वावर नाही, अशा ठिकाणी माध्यमांचा रितसर नियमित वावर असू शकतो असं एखादं मॉडेल तयार करायचा आमचा प्रयत्न आहे. सध्या हे मॉडेल थिअरीच्या पातळीवर दिसत असलं तरी भविष्यात आपल्या मातृभाषेमध्येच बोलणाऱ्या आदिवासींचा या उपक्रमातील सहभाग वाढवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. (अर्थात, 'सीजी नेट स्वरा'च्या माध्यमातून जेवढ्या कुरुख भाषेतील बातमी स्वरूपातील नोंदी झाल्यात तेवढ्याही पूर्वी कधीच कुठल्याही माध्यमात प्रसिद्ध झालेल्या नाहीत.)


- आदिवासी भागातील गैरप्रकाराबद्दल एखाद्या व्यक्तीनं 'सीजी नेट स्वरा'वर माहिती दिली, तर पहिली शक्यता ही आहे की त्या व्यक्तीला संबंधित प्रशासकीय किंवा अन्य यंत्रणेकडून धोका निर्माण होईल. अशा प्रकारचे काही अनुभव तुमच्या पाहण्यात आलेत का? अशा घटनांमुळे 'सीजी नेट स्वरा'च्या कामाची व्याप्ती मर्यादित राहील का?
समाजातील रूढ पद्धतीमध्ये कोणताही बदल होऊ घातला की त्या बदलानं ज्यांचे हितसंबंध दुखावले जातात ते त्या बदलांना हाणून पाडायचा प्रयत्न करतातच. 'सीजी नेट स्वरा'च्या बाबतीतही अशी अनेक उदाहरणं आहेत.
लिंगाराम हा छत्तीसगढमधला पहिला प्रशिक्षित आदिवासी पत्रकार आहे. मुळात आदिवासी पत्रकारांची छत्तीसगढमधील संख्या दोन आकडीही नाही. या पार्श्वभूमीवर लिंगाराम दिल्लीला पत्रकारितेचा अभ्यासक्रम करण्यासाठी गेला. पण नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नक्षलवादी असल्याच्या आरोपावरून त्याला तुरुंगात डांबण्यात आलंय. त्याची आत्या, शिक्षिका असलेल्या सोनी सोरी याही वास्तविक लिंगाराममुळंच अजूनही रायपूरच्या तुरुंगात खितपत पडून आहेत! लिंगारामला परत बोलावण्यासाठी त्यांना धमकावण्यात आलं आणि अखेरीस त्यांनी साहाय्य न केल्यामुळं पोलिसांनी त्यांनाही तुरुंगात डांबलं. त्यांच्यावरचे अत्याचार सुरूच आहेत. सोनी सोरी प्रकरणामुळे याबद्दल मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्येही चर्चा होतेय. लिंगाराम हा आदिवासींमधून पहिल्यांदा प्रशिक्षित पत्रकार म्हणून पुढं येत असलेला तरुण होता, आता त्याला पत्रकार म्हणून काम करायची संधी मिळण्याऐवजी तुरुंगाची हवा खावी लागत आहे.
असंच दुसरं उदाहरण भान साहू यांचं. त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचाराबद्दल 'सीजी नेट स्वरा'वर बातमी दिली होती. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरमालकानं घर सोडण्यास सांगितलं. काहीच कारण दिलं नाही. साहू आदिवासी भागात राहात नव्हत्या, मात्र तिथल्या घटनांचं वार्तांकन त्या करत, पण त्यांच्या या कामामुळेच त्यांच्यावर दबाव येऊन घर सोडण्याची वेळ आली.
तिसरं उदाहरण अफझल खान यांचं. भोपाळ पट्टनम इथे मेकॅनिक असलेले खान 'सीजी नेट स्वरा'साठी बातम्या पाठवतात म्हणून पोलिसांनी अनेकदा त्यांच्या घराची झडती घेतली, धमकावणी केली.
अशी अनेक उदाहरणं आहेत. आदिवासी भागांमधून 'सीजी नेट स्वरा'साठी काम करणाऱ्यांना एकतर धमकावून काम थांबवण्यास सांगितलं जातं किंवा दुसरा मार्ग म्हणजे त्यांना काम थांबवण्यासाठी पैसे दिले जातात. 'लिंगारामची जी अवस्था झाली तीच तुमचीही होईल' अशा धमक्या दिल्या जातात. एखाद्या सरकारी कंत्राटादरम्यान पैसे दिले जातात. या अडथळ्यांमुळे अनेकांनी आमच्यासाठी बातमीदारी करणं थांबवलं, संपर्क तोडला.
पण याला पर्याय नाही. या गोष्टींना तोंड देणं हाच एक मार्ग असू शकतो. त्यासाठी आमची यंत्रणा सक्षम करणंही आवश्यक आहे.
याच मुद्‌द्यावर अजून एक सांगण्यासारखं म्हणजे आमचा सर्व्हर बंगळूरला आहे. तोही बंद पाडण्याचे प्रयत्न झाले आहेत. हे कोणी केलं याचे पुरावे मी देऊ शकत नाही कारण अशा गोष्टी कायदेशीररित्या केलेल्या नसतात. बंगळूरमध्ये एका घरामध्येच आमचं कार्यालय होतं आणि तिथे सर्व्हर होता, तो तीनदा बंद पाडण्यात आला. आम्हाला आमची जागाही बदलण्यास भाग पाडण्यात आलं. यामुळं अनेक कटकटी होतात, एकतर आम्ही जो लँडलाईन फोन 'सीजी नेट स्वरा'च्या कामासाठी वापरायचो त्याचा नंबर सारखा बदलावा लागला. लँडलाईन फोनमुळं एकाचवेळी ३० जणांना 'सीजी नेट स्वरा'वरचे संदेश ऐकवण्याची सोय होती, पण आता जागा बदलण्याच्या त्रासामुळं आम्हाला या कामात मोबाइलचा वापर करावा लागतो, ज्याच्या माध्यमातून एका वेळी केवळ एकच व्यक्ती संदेश ऐकू शकते. यावर काही तांत्रिक उपाय करण्याच्याही प्रयत्नात आम्ही आहोत.


- 'सीजी नेट स्वरा'संबंधी मुख्य प्रवाहातल्या माध्यमांचा आतापर्यंतचा प्रतिसाद कसा आहे?
अनेक पत्रकार व वर्तमानपत्रं 'सीजी नेट स्वरा'वरच्या नोंदींकडे लक्ष ठेवून असतात असं आमचं निरीक्षण आहे. मुळात आम्ही मुख्य प्रवाहाशी स्पर्धा करत नाही, तर मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये ज्या काही रिकाम्या जागा राहून जातात त्या भरण्याचं काम आम्ही करतो. उदाहरणार्थ, काही काळापूर्वी एका सचिव पातळीवरच्या अधिकाऱ्याची माओवाद्यांनी हत्या केल्याची बातमी आली. ही बातमी आम्ही 'सीजी नेट स्वरा'वर प्रसिद्ध करत नाही. कारण ही एवढी मोठी बातमी असते की त्यासंबंधी प्रत्येक माध्यमातून काही ना काही माहिती बाहेर येतेच, त्यामुळे 'सीजी नेट स्वरा'च्या व्यासपीठावर त्यासंबंधी नोंद प्रसिद्ध करण्यात आधीच मर्यादित असलेले स्त्रोत खर्च करण्यात अर्थ उरत नाही. या उलट काही घटनांची किंवा समस्यांची थेट आदिवासी भागांमधून आलेली माहिती मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना मदतशीर ठरू शकते. आमच्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार, मुख्य धारेतली माध्यमं 'सीजी नेट स्वरा'वरच्या नोंदीची दखल घेतात असं दिसतं. अनेक वर्तमानपत्रं ती माहिती स्वतःच्या स्त्रोतांकडून तपासून घेऊन प्रसिद्ध करतात.


- गेल्या महिन्यापर्यंत 'नाइट इंटरनॅशनल फेलोशिप'च्या माध्यमातून 'सीजी नेट स्वरा'ला आर्थिक सहकार्य मिळत होतं. येत्या काळात आपलं अस्तित्त्व टिकवण्यासाठी इतर कोणते आर्थिक स्त्रोत मिळण्याची शक्यता आहे?
सुरुवातीला आमच्या प्रयोगासाठी आम्ही इतर काही संस्थांकडून निधी मिळण्याच्या संधी तपासल्या. गेली तीन वर्षं 'नाइट इंटरनॅशनल फेलोशिप'ने पैशाची चिंता काही प्रमाणात मिटवली. यापुढे स्वतःच्या बळावर 'सीजी नेट स्वरा'चं काम चालावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोणते आर्थिक स्त्रोत असू शकतील याचा शोध सुरू आहे. सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्टच्या बंगळूर शाखेतील विद्यार्थ्यांनी 'सीजी नेट स्वरा'वरती प्रकल्प बनविण्याचे काम सुरू केलंय यातून आर्थिक स्त्रोत सापडू शकतील. मुळात अधिकाधिक कमी पैशात स्थानिक पातळीवर माध्यम उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आमच्या डोक्यात जी कल्पना आहे त्यानुसार, एकूण तीस गावांचा समूह निश्चित केला जाईल (म्हणजे अंदाजे ३० हजार गावकरी), ही गावं स्वतःच स्वतःचा मीडिया सांभाळतील. हा मीडिया कम्प्युटर, इंटरनेट, मोबाइल, रेडियो यांच्या एकत्रित यंत्रणेतून बनलेला असेल. हे मॉडेल शक्य तेवढं स्वस्त करण्यासाठी आणखी प्रयोग करावे लागतील. साधारण पुढच्या तीन-चार वर्षांमध्ये आम्हाला 'सीजी नेट स्वरा'च्या पुढं जाण्याचा मार्ग सापडेल अशी आशा आहे. कोणालाही आपल्या परिसरात स्थानिक पातळीवर हे मॉडेल अंमलात आणता येईल अशी त्याची रचना असायला हवी. आम्ही आधी ज्या लॅपटॉपचा सर्व्हर म्हणून वापर करायचो, त्या जागी आता अवघ्या पाच हजार रुपयांमध्ये मिळणारा लहान लॅपटॉप तिथं वापरायला लागलोय, 'सीजी नेट स्वरा'साठी आवश्यक असलेले चांगल्यातले मोबाइलही आता पाच हजार रुपयांपर्यंत मिळू शकतात. हा खर्च आणखी कमी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.
एक उदाहरण द्यायचं तर गावातील देवळाचं देता येईल. असं देऊळ गावातील सर्वांच्या मदतीनं अस्तित्त्वात असतं. ते त्यांच्या कुठल्या गरजा कशा भागवतं हा वादाचा मुद्दा असू शकतो, त्यात आपण नको जाऊयात. पण हे देऊळ त्यांची भावनिक गरज असतं आणि ती भागवण्यासाठी ते स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतात आणि सामोपचारानं त्या देवळाचा खर्च भागतो आणि ते टिकून राहातं. असंच मीडिया मॉडेल तयार करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न आहेत. यात कदाचित काही वर्तमानपत्रांना जोडून घेणं, स्थानिक दुकानदार, विक्रेत्यांच्या जाहिरातींचा वापर करणं असे आर्थिक स्त्रोत सापडू शकतील. पण हे सर्व स्पष्ट आराखड्याच्या रूपात सिद्ध करायला आणखी तीनेक वर्षांचा अवधी लागेल.


- सध्या आदिवासी भागात होत असलेला मोबाइलचा प्रसार पाहाता या माध्यमात इंटरनेट आणि नंतर सोशल मीडियाचीही भर पडण्याची शक्यता आहेच. आपला आवाज जगापर्यंत पोचविण्यासाठी आदिवासी मंडळी सोशल मीडिया वापरतील, असं काही भविष्यातलं चित्र असू शकतं का? आणि समजा असा वापर केला गेला तरी त्याचा प्रत्यक्षात काही बदल घडवण्यासाठी उपयोग होताना दिसेल का? सोशल मीडियाचं सध्या अस्तित्त्वात असलेलं स्वरूप प्रवाहाबाहेरच्या मंडळींच्या आवाज समजून घेईल की हा आवाज फेसबुक आदींच्या गोंधळात विरून जाईल?
यासंबंधी मी तुम्हाला एक उदाहरण देतो, १९४७ सालचं. भारतानं आपण लोकशाही राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात येणार असल्याचं जाहीर केलं तेव्हा जगभरात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. राष्ट्र म्हणून असलेलं अस्तित्त्वच एवढं विखंडीत असताना, लोकशाहीचा भारताचा प्रयत्न फसेल, गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल अशा शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. पण तरीही भारत टिकून आहे आणि कमी-जास्त प्रमाणात का होईना लोकशाही अस्तित्त्वात आहे. आणि सर्व दोषांचा विचार केला तरी लोकशाही हाच उपलब्ध पर्यायांमधला सर्वोत्तम पर्याय आहे हेही सिद्ध झालेलं आहे.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना बोलण्याची सोय करून देणं हे आपलं काम आहे. मोजक्या लोकांच्या हातात (माध्यमांची) सत्ता केंद्रीत असणं ही सोपी गोष्ट आहे, त्या तुलनेत माध्यमांचं लोकशाहीकरण प्रथमदर्शनी गोंधळाची परिस्थिती निर्माण करू शकतं. पण त्यातूनच काही सकारात्मक गोष्टी होतील...


- फेसबुकसारख्या मूलतः खाजगी कंपनी असलेल्या माध्यमाकडून या प्रक्रियेला कितपत हातभार लागेल? मुळात ज्या कंपनीचा हेतू नफा कमावणं हा आहे ती आदिवासींसारख्या आर्थिक नफ्याच्या दृष्टीने निरुपयोगी समुहाला सोईचं मॉडेल उपलब्ध करून देईल असं होऊ शकतं का?
आम्ही म्हणतोय तो 'सोशल मीडिया' म्हणजे कुठल्याही एका कंपनीवर, संस्थेच्या देणगीवर किंवा सरकारी मदतीवर अवलंबून असलेला नाही. हा खऱ्या अर्थानं सोशल मीडिया असायला हवा, म्हणजे लोकांनी त्यांच्या खिशातून पैसे खर्च करून चालवलेला आणि त्यामुळेच त्यांना वापराचं स्वातंत्र्य असलेला.
माध्यमं सध्या श्रीमंतांच्या, मोजक्या उद्योगपतींच्या हातात आहेत त्याचं कारण माध्यम बनण्यासाठी जी यंत्रणा लागते ती महाग आहे; ती सुरू ठेवायला, तिचा सांभाळ करायला भरपूर पैसा खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करणं आणि मोजक्या मंडळींकडून अधिकाधिक लोकांच्या हातात माध्यमं पोहोचवणं हा लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेचा आवश्यक भाग आहे.
आम्ही ज्या सोशल मीडियाची संकल्पना मांडतोय त्यात, समजा एका ठराविक दिवशी ७० टक्के मंडळी पाणीप्रश्नाबद्दल बोलत असतील तर ती त्या दिवशीची हेडलाईन असेल. सध्या जे मोजक्या मंडळींच्या निर्णयांवर हेडलाईनची निवड ठरते त्या ऐवजी ती लोकशाही पद्धतीनं ठरेल. यासाठी कम्प्युटर, इंटरनेट, मोबाइल, रेडियो यांची स्वस्तात उपलब्ध होणारी एकत्रित यंत्रणा असणं हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. 'सीजी नेट स्वरा'च्या माध्यमातून मोबाइल, इंटरनेट, कम्प्युटर यांचा वापर केला जातोय, यात रेडियोही समाविष्ट कसा करता येईल ते आम्ही पाहातो आहोत. मुळात बातमीचा प्रवास वरपासून खालपर्यंत होण्याऐवजी खालपासून वरपर्यंत होईल असा हा खराखुरा सोशल मीडिया असावा अशी आमची कल्पना आहे.
०००


०००
शुभ्रांशू चौधरी यांचं 'टेड'मधलं लहानसं व्याख्यान - माध्यमांचं लोकशाहीकरण ह्या विषयावर

०००

' सीजी नेट स्वरा'संबंधी 'रेघे'वर पूर्वी आलेली नोंद- तुमच्या देशाच्या स्वातंत्र्याचं वय काय?

***

ही मुलाखत संपादित स्परूपात 'अनुभव' मासिकाच्या ऑक्टोबर २०१२च्या अंकात आली आहे.

Tuesday, 2 October 2012

‘गांधी मला भेटला’, पण कोर्टात

मूळ पोस्टरची घडी घातल्यावर
आज २ ऑक्टोबर, गांधी जयंती. त्या निमित्तानंच आपण वसंत दत्तात्रेय गुर्जर ह्या कवीबद्दल 'रेघे'वर ही नोंद करतोय. गांधी जयंतीच्या निमित्तानं गुर्जरांबद्दल नोंद का? तर, गुर्जरांनी लिहिलेली 'गांधी मला भेटला' ही कविता. ह्या कवितेबद्दल आपण एका मर्यादेपलीकडं बोलू शकत नाही, कारण ही कविता बीभत्स असल्याचा आरोपावरून गुर्जरांना न्यायालयातल्या खटल्याला गेली काही वर्षं तोंड द्यावं लागतंय. ह्या कवितेबद्दल काही माहिती इथं पाहाता येईल - 'गांधी मला भेटला' कवितेसंबंधी.

आज गांधी जयंतीच्या निमित्तानं 'रेघे'वर गुर्जरांची 'मुलाखत' प्रसिद्ध होतेय. ही मुलाखत म्हणजे सहज मारलेल्या गप्पांमधून लिहून काढलेला मजकूर आहे. २०१० सालच्या ह्या गप्पा आहे, एका कामासाठी त्या तयार केल्या होत्या, पण त्या प्रसिद्ध मात्र आत्ताच होतायंत. ज्यांनी गुर्जरांच्या कविता वाचल्यात त्यांना कदाचित हे वाचायला बरं वाटेल आणि -

गुर्जर कोण ते माहीत नसल्यास ही त्यांची लहानशी ओळख-
वसंत दत्तात्रेय गुर्जर (जन्म- २१ जानेवारी १९४४, मुंबई) गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये शिक्षण. साठ साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन रूपारेल व सिद्धार्थ महाविद्यालयात इंटर आर्ट्सपर्यंत शिक्षण. पुढे मुंबई बंदर विश्वस्त (बॉम्बे पोर्ट ट्रस्ट) कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी. १९५७पासून कविता लिहायला सुरुवात. साठ-सत्तरच्या दशकातल्या अनितकालिकांच्या चळवळीतून कवी म्हणून पुढे आलेल्यांपैकी एक. गोदी (१९६७), निव्वळ (१९७०), अरण्य (१९७३), समुद्र (१९७९) हे तीन कवितासंग्रह व गांधी मला भेटला (पोस्टर कविता, १९८३) प्रसिद्ध.

शिवाय, 'रेघे'शी संबंधितच एक प्रकल्प म्हणून गुर्जरांसंबंधी एक लहानसा ब्लॉगही आहे, तोही वाटल्यास अधिक माहितीसाठी पाहता येईल - वसंत दत्तात्रेय गुर्जर
०००

कवी कविता लिहितो म्हणजे मरतच असतो
- वसंत दत्तात्रेय गुर्जर

वसंत दत्तात्रेय गुर्जर
[फोटो: रेघ]
(कुठलीही ठरवून प्रश्न-उत्तरांची मुलाखत घ्यायची म्हणून नव्हे पण सहज बोलताना एकदा गुर्जरांकडून काही सूत्रानं बोलणं होतंय असं वाटलं. नेमकं तेव्हा रेकॉर्ड करायला जवळ यंत्र होतं त्यामुळं ते सुरू केलं. त्यात जे रेकॉर्ड झालं त्याचं हे शब्दांकन. बोललेलं लिहिल्यानंतर त्यांना दाखवलं आणि नंतर फायनल केलं. सुरुवात, शेवट आणि मुद्दे एकदम वेगवेगळे असू शकतील, पण साधारण गुर्जरांच्या कवितेसंदर्भात काही सूत्रं हातात येतील असं वाटतं. गुर्जर ज्या उत्साही स्टाईलमध्ये बोलत होते ती तशीच ठेवून शब्दांकन करण्याचा प्रयत्न केला आहे. एका संशोधनाभ्यासाच्या निमित्तानं गुर्जरांशी भेट झालेली, त्यामुळे साहित्याच्या अंगानं काही मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न या गप्पांमध्ये नाही. काही प्रश्न अगदीच सामान्य कुतुहलामुळं विचारलेले आहेत. तरीसुद्धा कोणाला या गप्पांमधून काही सापडलं तर चांगलंच.)


- ‘समुद्र’ या संग्रहातल्या एकतिसाव्या ‘चित्रा नाईक’ ह्या कवितेविषयी..
शालेय वयातील स्वप्नं आणि पुढे प्रत्यक्ष जीवनात उतरतो तेव्हा दिसतं ते वास्तव हे भीषणच आहे पुढे. त्यातली ती खिन्नता नि उदासीनता पकडता आली त्या कवितेत. शाळा-कॉलेजातली स्वप्नं आणि वास्तव. सगळे असे काहीतरी अनुभव घेत असतात आणि पुढे म्हणजे सगळ्या अनुभवातला फोलपणा कळतो, पण त्यातून तुम्ही उभे कसे करता ते महत्त्वाचं आहे. त्यात शेवटी लिहिलंय ना -

पण असं वेडी म्हणून घ्यायला
चित्रा नाईक कधी आलीच नाही
दिवास्वप्नाशिवाय
मी अशी स्वप्नंच पहात राह्यलो तिच्या येण्याची
ती कधीच नाही आली
मी फक्त एकटा इथे

शाळेतून देशाचे आधारस्तंभ बाहेर पडले
चित्रा नाईकही घरी गेली...
मी फक्त एकटा इथे

आता यात जो लोनलीनेस आहे तो लोकांना आवडला. की, मी फक्त एकटा इथे. दर वर्षी शाळेत स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला पाव्हणे येतात आणि ते सांगतात तुम्हाला, तुम्हीच देशाचे आधारस्तंभ आहात आणि प्रत्यक्षात आपण येतो तेव्हा त्यातला फोलपणा कळतो, म्हणजे बरेचसे कारकून म्हणूनच बाहेर पडतात, आधारस्तंभ बाजूला, जगण्याच्या याच्यातच असतात बरेचसे. ती कविता बघा- संपूर्ण गद्यप्राय संग्रह आहे तो आणि त्याच्या बरोब्बर मध्यावर ती कविता टाकलेय. म्हणजे कविता ही अशी पण लिहिलेली आहे, ते नीट वाचेल त्याला कळेल.

शाळेतला जो अनुभव आहे तो, माझा एक मित्र होता, तो दुसऱ्या एका मुलीच्या वहीखाली स्वतःची वही ठेवायचा, ते मी माझ्या अंगाने घेतलं म्हणजे मीच जणू काही ते करतोय. सगळं आपलं ते स्वप्नच असतं ना. एक जण मला भेटला तो बोलला, 'माझं पण असंच घडलं, मी पण असंच करायचो.'
  
- कवितेचं कसं असतं,
आता ती सोपी आहे कविता म्हणून कळते, पण कठीण कविता पण कळू शकते, कारण का तुमचं अनुभवविश्व जसं समृद्ध होत जातं आणखीन, तसं तुमच्या अनुभवाशी तुम्ही ताडून बघता ती कविता, आपल्या जवळपास काही येतं का. मग जसं अधिक डेव्हलप होत जातं ते, तशी कठीण कविता पण कळते. मग ती कोलटकरांची ‘ज्ञानेश्वरसमाधीवर्णन’ असेल किंवा बालकवींची ‘औदुंबर’ किंवा मर्ढेकरांची ‘शिशिरर्तुच्या पुनरागमे’. त्या दोघांच्यातली उदासी बघा. त्या दोन्हीत उदासी आहे. म. म. देशपांड्यांची ‘अंतरिक्ष फिरलो पण’ घ्या. त्यात पण उदासी आहे. या तिघांत उदासी आहे, पण ह्या उदासीनतेच्या वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत.

आता बघा ती ‘अंतरिक्ष फिरलो पण’. ती ५६ सालची कविता आहे. आज २०१० साल आहे.

अंतरिक्ष फिरलो पण
गेली न उदासी
गेली न उदासी

लागले न हाताला
काही अविनाशी
काही अविनाशी
क्षितीज तुझ्या चरणांचे
दिसते रे दूर
दिसते रे दूर

घेऊन मी चालु कसा
भरलेला ऊर
भरलेला ऊर

जरी वाटे जड कळले
तळ कळला नाही
जड म्हणते ‘माझा तू’
क्षितीज म्हणे ‘नाही’

अंतरिक्ष फिरलो पण
गेली न उदासी
लागले न हाताला
काही अविनाशी

म्हणजे अंतिम सत्याकडेच ती कविता जाते. की, काय एवढा हा सगळा भौतिक पसारा आहे, त्यातून तुम्ही जाताना काय होतं. कवी जेव्हा अशा तऱ्हेची कविता लिहितो. . . अशा तऱ्हेची कविता केव्हा होते, तो रिता होतो तेव्हा ती होते. तो आपलं सर्वस्व तिच्यात ओतत असतो. वेगळ्या अर्थाने तो मरतच असतो म्हणजे.

- कधीपासून लिहिताय कविता -
साठपासून जास्ती. आधी शाळेत एकदा बाईंनी निबंध दिला होता. तेव्हा त्यांनी शांताबाई शेळक्यांची एक ओळ दिली होती ‘आहा ते सुंदर दिन हरपले’ आणि त्यांनी असं केलं की ज्यांनी निबंध लिहायचाय त्यांनी निबंध लिहा नि ज्यांना कविता लिहायचेय त्यांनी कविता लिहा. पस्तीस मिनिटांत. तेव्हा एक प्रयत्न केला होता आणि ती कविता लिहिली. नंतर मग साठनंतर कॉलेजला आलो तेव्हा सुरुवात झाली. आधी रुपारेलला होतो, नंतर सिद्धार्थला होतो. तिथे मग साहित्यिक सगळे मिळाले. सिद्धार्थला आरती प्रभू होते, राजा ढाले, केशव मेश्राम, चंद्रकांत खोत, वसंत सावंत.
  

- कवितेच्या पसाऱ्यात कोणाचा प्रभाव जाणवतो स्वतःवर. (किंवा साध्या शब्दात, आवडते कवी कोण) इत्यादी.
माझं म्हणजे एकदम दोन तऱ्हेचं आहे. एकीकडे मर्ढेकर आवडतात, तर दुसरीकडे पु. शि. रेगे पण आवडतात. पण माझ्यावर तुम्हाला पुशिंचा प्रभाव दिसणार नाही. पण पुशिंच्या कविता मला आवडतात. कमी शब्दांत ते अधिक बोलतात. त्यांची कादंबरी ‘सावित्री’ म्हणजे तर मास्टरपीसच आहे, ती कविताच आहे खरी. मर्ढेकर, पु. शि. रेगे, सदानंद रेगे, अरुण कोलटकर हे जास्ती आवडतात. पूर्वीच्या काळातले, तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगितलं तर, भा. रा. तांबे मला आवडतात. पण माझ्यावर त्यांचा परिणाम दिसणार नाही. म्हणजे प्रभाव पडतो का, असं सांगता येणार नाही. सुरुवातीच्या काळात तशा मी लयबद्ध कविता लिहिलेल्यात, अष्टाक्षरी वगैरे स्वरूपात. पण त्या अशा संग्रहात नाहीत.

- ‘लिट्ल मॅगझिन्स’मधून बऱ्याच परदेशी कवींच्या अनुवादित कविता प्रसिद्ध झालेल्या, त्या कवितांबद्दल काय वाटलं?
तेवढं मला म्हणजे. . . लिट्ल मॅगझिन्समधून वाचलं तेवढंच, पण त्याचा प्रभाव काही . .  नाही म्हणजे तसं.

- कवी कविता लिहितो म्हणजे तो मरतच असतो, असं तुम्ही मगाशी म्हणालात त्याच्यावर अजून थोडं बोला, काहीही, सूत्रबद्ध असं काही सांगता येणार नाही पण काही वाटेल ते बोला.
आता मी फिरत असतो आणि शेकडो माणसं बघत असतो. काही रस्त्यांवर. . . संवादसुद्धा ऐकू येतात म्हणजे. एकदा मी इराण्याच्या हॉटेलात चहा पिताना, एक गांधीवादी माणूस दुसऱ्याशी बोलताना ऐकलं. तो स्वातंत्र्यसैनिक वगैरे होता. तो सांगत होता की, 'बघा स. का. पाटील, केशवराव बोरकर, आम्ही सगळे वगैरे एकत्र काम केलंय. आता स. का. पाटील कुठेयत, बोरकर कुठेयत आणि माझी अवस्था काय आहे'. ते एक उदाहरण झालं. आणि लहानपणापासून रेडियोवर मी 'गांधीवंदना' हा कार्यक्रम ऐकतोय. काय होतं, अप्रत्यक्ष असा परिणाम होत असतो. कित्येक वर्षं ती 'गांधीवंदना' ऐकून ‘गांधी मला भेटला’, ती तयार झाली कविता. म्हणजे कित्येक वर्षं मी ते ऐकतोय. समाजात कायकाय बघत असतो वगैरे, म्हणजे माणसं, त्याच्यातून ती कविता स्फुरत जाते.

म्हणूनच सांगितलं की, कवी हा मरतच असतो. आता ‘गांधी मला भेटला’मध्ये माझं मानसिक मरणच झालंय. राम पटवर्धन म्हणाले की, ‘या कवितेने माझा गिल्टी कॉन्शन्स जागा झाला’. म्हणजे काय अपराधीपणाची जाणीव होणं, म्हणजे त्या कवितेनं करून देणं, ते त्रासदायक असतं.

आणि माझी कविता लिहिण्याची पद्धत पण त्रासदायक आहे. कित्येक दिवस माझ्या मनात ती कविता चालू असते. मी एकदम कागदावर उतरत नाही. एकदा मनात तयार झाली की कागदावर झरझर उतरते. कुठलीतरी एखादी ठिणगी पडली की ते लिहून होतं. कारण रॉ मटेरियल चिकार जमा होत असतं विविध ठिकाणांहून. एखाद्या बातमीनेसुद्धा आपल्या मनात घर केलेलं असतं, पण कधी स्पार्क मिळेल नि ते निर्माण होईल ते सांगता येत नाही.

आता ही ‘चित्रा नाईक’ होती ती काय गंमत झाली बघा, एक शाळेतले शिक्षक होते, त्यांना शिक्षकी पेशाविषयी तिटकारा होता, तर ते आम्हाला अकरावीला गेल्यावर सांगायचे नेहमी, ‘शाळा अडीचशे कारकून दर वर्षी बाहेर काढते, बाकी काही होत नाही’. ते वाक्य मनात ठसलं कुठेतरी. नंतर ते पंधरा ऑगस्टला होतं, ‘तुम्ही देशाचे आधारस्तंभ आहेत’. नंतर ते मित्राचं होतं, त्याची वही त्या मुलीच्या वहीखाली ठेवायचा तो. या तीन गोष्टी. त्याने ठिणगी पडली.

एका मित्राच्या बायकोने ती कविता वाचली. ती म्हणाली की, ‘‘डोळ्यात पाणी की पाण्यात डोळे’ हे मला अतिशय आवडलं, बरोबर वर्णन केलंय तुम्ही’ वगैरे. तशी मुलगी आमच्या शाळेत होती पाणीदार डोळ्यांची. पण एकच व्यक्ती सांगता येणार नाही, अनेक व्यक्तींचं मिश्रण आहे ते- ‘चित्रा नाईक’.

कविता सुचणं म्हणजे. .  प्रक्रिया म्हणजे चिकार त्याच्यावर काम होत असतं. मनात आणि डोक्यात.

मध्येच चाळीतली दोन मुलं गुर्जरांच्या खोलीजवळ येऊन ‘साखर द्या’ म्हणत होती, गुर्जर उठले ‘शुगरफ्री’च्या डबीतल्या दोन गोळ्या काढून त्यातल्या एकाच्या हातात दिल्या. डिजिटल कॅमेऱ्याची बॅटरीसुद्धा त्याच दरम्यान संपली. आणि रेकॉर्ड झालेल्या गप्पा संपल्या.