१६ ऑक्टोबरला 'रेघे'वर नोंद केल्यानंतर दोन महिने कुठलीही नोंद केली नव्हती. ज्या नोंदीवर आपण थांबलेलो ती नोंद माध्यमांसंबंधी आर्थिक संदर्भात एखादा बिंदू नोंदवण्याच्या इच्छेने झालेली. त्यानंतर करण्यासारख्या काही नोंदी होत्या, पण काही कारणांमुळे त्या जमल्या नाहीत, मग पुन्हा २५ डिसेंबरला एक नोंद केली. आणि आता ही नोंद आज होतेय.
दरम्यानच्या दोन महिन्यांमधे आपल्याला वाचकांच्या काही प्रतिक्रिया प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मिळाल्या. कधी कौतुक आणि क्वचित व्यक्तिगत पातळीवरची निंदा, अशा स्वरूपातल्या प्रतिक्रिया. यातल्या पहिल्या प्रकारातल्या प्रतिक्रियांबद्दल आपल्याला काही प्रमाणात आश्चर्य वाटतं आणि दुसऱ्या प्रकारातल्या प्रतिक्रियांबद्दल काहीच आश्चर्य वाटण्यासारखं नाही. आश्चर्य वाटण्यासारख्या ज्या कौतुक प्रकारातल्या प्रतिक्रिया आहेत त्या ज्यांच्याकडून आल्या त्यामुळे आश्चर्य! म्हणजे इतिहासात संशोधन करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला 'रेघे'वर काय सापडत असेल किंवा साहित्याबद्दल काही संशोधन करणाऱ्या कुणाला इथे काय सापडत असेल, अशा शंका आपल्या मनात आहेत. अर्थात, काहीच न सापडता नुसता वाचून आनंद होत असेल अशीही शक्यता आहे. पण जे आहे ते ठीक आहे.
आणखी एका प्रकारातल्या वाचक-प्रतिक्रियांचीसुद्धा मुद्दाम दखल घ्यायला हवी ती पत्रकारांमधून आलेल्या. यातही काही वरिष्ठ पदावरच्या व्यक्ती आणि काही उप-संपादकीय काम करणाऱ्या व्यक्ती अशा ठिकाणांहून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिक्रिया 'रेघे'पर्यंत आल्या. हेही बरं. आणखी खोलातलं सांगायचं तर यातल्या उप-संपादकीय मंडळींच्या असण्यातून रेघेची सुरुवात झालेली आहे. ही सुरुवात तशी पाचेक वर्षांपूर्वी आणि आत्ता ह्या पत्त्यावर तीन वर्षांपूर्वी झाली. ह्या उप-संपादकीय पातळीवर काम करणाऱ्या उदास मंडळींसाठी रेघेचा काही उपयोग झाला असेल तर बरंय. उदास म्हणजे तशी चोवीस तास उदासी असेल असं नाही, पण एक ती सांगता न येण्यासारखी गोष्ट ही मंडळी आजच्या मराठी वर्तमानपत्रांमधे अनुभवतायंत. ते त्यांना तसं का होत असावं, याचे काही संदर्भ रेघेवरच्या नोंदींमधे सापडू शकतील. अर्थात, तरीही ती खूश असतात नि त्या उदासीन खुशीतच रेघेचं मूळ आहे. ह्यातल्या काही मंडळींना तरी रेघेमुळे काही बरं वाटलं असेल असं त्यांच्या प्रतिक्रियांवरून वाटतं आणि ते चांगलं झालं.
हे मुद्दाम आज बोलण्याचं कारण काय? तर आपण वास्तविक ऑक्टोबरच्या नोंदीसोबत रेघेला थोडं थांबवणार होतो, पण नंतर एक नोंद करण्याची वेळ आली. आणि आता ही नोंदसुद्धा करण्याची वेळ आली म्हणून. वाचकांच्या प्रतिक्रियांची दखल घेण्याच्या इच्छेमुळे वेळ आली. आणि त्यासोबत गो. पु. देशपांड्यांची आठवण ठेवण्याचीही एक इच्छा जाता जाता लक्षात आली. नाटककार म्हणून मराठीत जास्त ओळख असलेल्या गो. पु. देशपांडे यांचं १६ ऑक्टोबरला निधन झालं. म्हणजे आपण ज्या दिवशी एक नोंद प्रसिद्ध केली त्याच दिवशी. त्यानंतर थोडा काही काळ नोंदींविना गेला नि आता पुन्हा थोडा काही काळ नोंदींविना जाणार आहे, त्यापूर्वी गो.पुं.ची आठवण ठेवू नि वाचकांनाही रेघेच्या थोड्या थांबण्याविषयी कळवू, या हेतूनं ही नोंद.
गो. पु. देशपांडे यांचं रेघेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं काम सांगायचं तर त्यांनी 'रहिमतपुरकरांची निबंधमाला' या मालिका शीर्षकाखाली 'नाटकी निबंध' आणि 'चर्चक निबंध' अशी दोन पुस्तकं उभी केली. गो.पु. हे एक मिश्कील विद्वान होते, अशी त्यांची प्रतिमा या निबंधांमधून वाचकाच्या मनात आपसूक तयार होऊ शकते. हा मिश्किलपणा 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'मधे प्रसिद्ध झालेल्या लिखाणात एवढा असा नव्हता, असं आपलं सर्वसामान्य वाचक म्हणून मत आहे. पण त्यांच्या मराठी निबंधांमधे मात्र तो मुबलक सापडतो आणि प्रत्यक्ष त्यांच्यासोबत काळ घालवलेले लोक त्यांच्याबद्दल नंतर जे बोलले त्यावरून प्रत्यक्ष त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही तो मुबलक सापडत असावा.
'चर्चक निबंधां'मधे एका ठिकाणी गो.पु. मराठी साहित्याबद्दल एक ढोबळ निरीक्षण मांडतात ते असंय पाहा :
गो. पु. देशपांडे (२ ऑगस्ट १९३८ - १६ ऑक्टोबर २०१३) [फोटो : 'नाटकी निबंध'च्या मलपृष्ठावरून] |
गो. पु. देशपांडे यांचं रेघेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं काम सांगायचं तर त्यांनी 'रहिमतपुरकरांची निबंधमाला' या मालिका शीर्षकाखाली 'नाटकी निबंध' आणि 'चर्चक निबंध' अशी दोन पुस्तकं उभी केली. गो.पु. हे एक मिश्कील विद्वान होते, अशी त्यांची प्रतिमा या निबंधांमधून वाचकाच्या मनात आपसूक तयार होऊ शकते. हा मिश्किलपणा 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'मधे प्रसिद्ध झालेल्या लिखाणात एवढा असा नव्हता, असं आपलं सर्वसामान्य वाचक म्हणून मत आहे. पण त्यांच्या मराठी निबंधांमधे मात्र तो मुबलक सापडतो आणि प्रत्यक्ष त्यांच्यासोबत काळ घालवलेले लोक त्यांच्याबद्दल नंतर जे बोलले त्यावरून प्रत्यक्ष त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही तो मुबलक सापडत असावा.
'चर्चक निबंधां'मधे एका ठिकाणी गो.पु. मराठी साहित्याबद्दल एक ढोबळ निरीक्षण मांडतात ते असंय पाहा :
आजचे लोकप्रिय मराठी साहित्य 'लोकप्रिय' चित्रपटापेक्षा फारसे निराळे नाही. लोकांना वाचून वाचून (पाहून पाहून) काही संकेतांची, मांडणीची काही तऱ्हांची सवय झालेली असते. त्यात अगदी सामान्य आशय व्यवस्थितपणे बसविता येण्याचे तंत्र माहिती असले तर 'लोकप्रिय' होणे फारसे अवघड नाही. मर्ढेकरांनी लय तोंडवळणी पडली आणि शब्दावर थोडी हुकमत असली की कविता लिहिणे फार अवघड नसते असे म्हणून या प्रक्रियेचे साररूप वर्णन केलेच आहे.
त्याच्या जोडीला उच्चर्गीय-उच्चवर्णीय भावभावना दुखावतील असे काही लिहू नये, शक्यतो त्यांच्या भावभावना, त्यांचे पूर्वग्रह जोपासतील असेच लिहावे हा मराठी साहित्याचा एक नियम होऊन बसला आहे. काही वैचारिक लिहायचे असेल तर गांधी थोर, मार्क्स थोर, सावरकर थोर, गोळवलकर थोर, राष्ट्र सेवादलही थोर, अशी सबगोलंकार उदारमतवादी-मानवतावादी या सर्वसाधारण शीर्षकाखाली येऊ शकेल अशी भूमिका घेतली की काम झाले. हे करणारा थोर चिंतक, विचारवंत अशी आजकाल चलती आहे.
त्याचा परिणाम नाही म्हटले तरी सार्वजनिक अभिरूचीवर होतोच. हिंदी चित्रपटाला इतके जण नावे ठेवतात म्हणून हिंदी चित्रपट बघणे कोणी सोडून देते का? ते शक्य नसते. विशुद्ध कलावादी विचारवंताला पटणार नाही इतकी कलेची आणि (दुर्दैवाने) अपकलेची ताकद असते. त्यामुळे माल विकला जातो. त्यात कमी अधिक कस असतो यात शंका नाहीय. पण 'लोकप्रिय' लेखनाचा सध्या माल (कमॉडिटी) झालेला आहे. त्याला इलाज नाही. मी त्याच्याविरुद्ध तक्रार करीत नाही. परंतु बाजारावर आधारलेल्या या समाजात ते अटळ आहे एवढेच मी म्हणतो आहे.
त्यामुळेही कदाचित् ही मरगळ जात नसावी. या सांस्कृतिकदृष्ट्या मंद, बाजारी पण उच्चभ्रू समाजाला एखादी कॅसेट लावून ऐकण्याव्यतिरिक्त साहित्यादी गोष्टीत रस राहिलेला नाही.
यावरून गो.पुं.च्या म्हणण्याचा आणि एकूणच आपण ही नोंद का करतोय याचा काहीसा अंदाज यावा. प्रसारमाध्यमांबद्दल आपण मर्यादित क्षमतेच्या का होईना पण ज्या नोंदी रेघेवर करू पाहत आलोय, त्याचा संबंध वरच्या परिच्छेदाशी आहेच आहे. गो.पुं.चे या पुस्तकांमधले निबंध काहीसे खेळकर पद्धतीचेही वाटू शकतील कोणाला, आणि त्यामुळे मतभेदालाही जागा राहते. पण ती कुठे नसते? आणि ती असते हे बरंच एका अर्थी, नायतर मतभेदालाही जागा नसणं म्हणजे डेंजर अवस्था!
संध्याकाळी 'वॉश' घेऊन 'फ्रेश' झाल्यानंतर 'कॉर्नर'वरच्या एका 'जॉईन्ट'वर 'तंदूरी' खायची त्याच्याआधी जरा 'ड्रिंक्स' घेऊ. नंतर एखादं हिंदी 'पिक्चर' आणि रात्री झोपण्यापूर्वी भीमसेन जोशींच्या 'अभंगवाणी'ची 'कॅसेट' ऐकू! सध्या लोकांच्या कलेविषयी वेगळ्या अपेक्षा नसतात. वेळ जात नाही मग कळले तर थोडे साहित्य. पु.ल. वाचू किंवा सोप्पं म्हणजे ऐकू! म्हणजे हे 'सपर' नंतर 'बेड टाईम'पर्यंतचे 'लाँगएज' जरा सुसह्य होईल.
असं गो.पुं.नी लिहिलं त्याला झाली आता बरीच वर्षं. शिवाय हे एक ठराविक आर्थिक वर्गापुरतंच निरीक्षण म्हणता येईल, पण उर्वरित जनतेच्या बाबतीत कदाचित यातले काहीच तपशील बदलतील. आणि वरचं निरीक्षण लिहिलं गेलं तेव्हा आजच्यासारख्या विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरती इतक्या अशा मराठी मालिकांच्या मालिकांवर मालिकाही सुरू नव्हत्या. तरीही आपण हे इथे रेघेवर कायतरी बडबडत बसलो. काय म्हणायचं ह्याला!