०४ मे २०१५

निळ्या डोळ्यांची मुलगी

गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये प्रकाशित झालेल्या एका कादंबरीबद्दलची ही नोंद. आज बौद्ध पौर्णिमा आहे, हे निमित्त ठरवलेलं नव्हतं, पण थोडंसं ते जुळून आलंय आपसूक.

गोदा प्रकाशन, औरंगाबाद । मुखपृष्ठ: सरदार जाधव

एक

उल्का चाळके कोण आहे? तिची स्टोरी काय आहे? – या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, तर शिल्पा कांबळे यांनी लिहिलेली नि गोदा प्रकाशनानं प्रकाशित केलेली ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी वाचावी लागेल. ही कादंबरी म्हणजे उल्का चाळके या बौद्ध मुलीची गोष्ट आहे.

इथं सुरुवातीला थोडं वेगळं बोलू. गौतम बुद्ध नावाच्या माणसानं आपलं म्हणणं वेगवेगळ्या गोष्टी सांगूनच मांडलं. म्हणजे मुद्दाम असं काही सिद्धांत मांडलाय, असं केलं नाही, तर गोष्टी सांगत गेला. त्यातून समोरच्यानं बोध करून घ्यावा. म्हणजे गोष्ट सांगण्याचं महत्त्व इतकं आहे! सिद्धांतांना महत्त्व नाही असं नाही, पण गोष्ट कशी किती खोलवर समोरच्यापर्यंत पोचते याचा एक दाखला बुद्धानं दाखवून दिला. असा दाखला आपापल्या परीनं लेखक घडवत असतात. साहित्य ही अशी गोष्ट आहे. ती आपल्याला आपल्या परिसराबद्दल, समाजाबद्दल असं कायतरी सांगते, जे एखादा काटेकोर अभ्यास-अहवाल सांगू शकत नाही. हे म्हणणं मान्य केलं तर मग ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी आपल्याला काय सांगते?

उल्का चाळके या मुलीची शाळकरी वयापासून ते लग्नाच्या वयाची तरुणी होईपर्यंतची गोष्ट ही कादंबरी सांगते. या मुलीचा बाप दारूबाजीत कामातून गेलेला. या नवऱ्याची दारू त्याच्या बायकोच्या, म्हणजे उल्काच्या आईच्या जीवावर उठली तेव्हा आईनं पोरीला घेऊन मुंबई गाठली. इथून उल्काची गोष्ट सुरू होते..

सहावीत असलेल्या उल्काला तिच्या शाळेतल्या ढगेबाई ‘डायरी ऑफ अॅन फ्रँक’ हे पुस्तक वाचायला देतात. त्या पुस्तकानं प्रभावित होऊन उल्कासुद्धा रोजनिशी लिहायचं ठरवते नि आपल्या रोजनिशीला ‘सुबी’ असं नाव देते. आपल्या आईच्या वडिलांच्या घरात राहत असलेली उल्का आपली सगळी दुःखं, सुखं सुबीला सांगत राहते. शाळेतल्या, घरच्या, इतर बाहेरच्या घडामोडी असं सगळं त्यात येतं. उदाहरण म्हणून ६ डिसेंबर १९८७ रोजीची तिच्या रोजनिशीतली ही नोंद पाहा :
प्रिय सुबी,
काल आमच्या कॉलनीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाणदिनाचा कार्यक्रम होता. सकाळपासूनच घरातील माणसे किचनमध्ये खुडबूड करीत बसली होती. एका मोठ्या पातेल्यात बेसन बनवले होते. एका गोणीत भाकरी बांधून ठेवल्या होत्या. रात्री हे जेवण टेम्पोमध्ये भरून दादरला पाठवले. बिल्डिंगमधल्या सगळ्या लोकांनी जेवण पाठवले होते. मैथलीने तिचा बिस्कीटचा डबा आम्हाला दिला. तिच्या घरातून कुणी जेवण पाठवले नाही. आज आजी, भाऊ, मये आम्ही सगळे जण ट्रेनने दादरला गेलो. तिकडच्या गर्दीला बघून मी खूप घाबरले. मला मयेने ट्रेनमधून खाली ओढले. त्यात माझ्या ड्रेसची ओढणी ट्रेनमध्ये राहिली. आम्ही दर्शन घ्यायला चौपाटीवर गेलो. तिकडे तर ट्रेनपेक्षा जास्त माणसे होती. इतक्या माणसांना शाळेत अगणित म्हटले असते. समुद्र इतका मोठा असतो. मला पहिल्यांदाच कळाले. सर्व किनाऱ्यावर खूप लोकांनी शी केली होती. समुद्राचे पाणी अंगावर येईल आणि आपल्या पोटात घाण जाईल असे मला वाटते. मी मम्मीला विचारले, ‘‘आपण इथे कशाला आलो?’’ मम्मी डोळे पुसीत म्हणाली, ‘‘आजच्या दिवशी बाबा गेले. त्यांची पूजा करायला आलो.’’ मयेला रडताना बघून मला पण खूप रडायला आले. म्हणून आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मी या डायरीच्या पानावर लावला आहे.
तुझी उल्का
६ डिसेंबर १९८७
उल्काच्या आईच्या डोळ्यांत आलेलं पाणी कशामुळं होतं? या प्रश्नाच्या उत्तराचा तपास करायचा असेल तर कादंबरी मुळातून वाचावी लागेल. उल्काची आई कुठकुठल्या परिस्थितीत मुलीला लहानाचं मोठं करते, शिकवते, घडवते हा भाग कादंबरीत आहेच. त्या दुःखानं आईच्या डोळ्यांत पाणी येत असेलच. पण त्याशिवायही डोळ्यात पाणी उभं राहतं. आपल्या दुःखात कोणीतरी आधाराला सतत आहे, या जाणिवेतूनही ते येत असेल. बाबासाहेबांनी दिलेल्या या जाणिवेनं गहिवरूनही ते होत असेल. हा आधार काटेकोर स्पष्टीकरण करून सांगता येत नाही. आईच्या डोळ्यांत पाणी येण्याएवढा तो मोलाचा आहे, याचं आणखी काय स्पष्टीकरण द्यायला हवं?

आईचं दुःख हा एक भाग झाला, शिवाय उल्का हीसुद्धा एक बाई आहे. एका बाईला मुंबईसारख्या शहरात जगताना कशाकशाला सामोरं जावं लागतं, ती आपल्या आसपासच्या जगाला कसं समजून घेते, हेही या कादंबरीत आहे. यात प्रेमप्रकरणांमधेच गुंतत राहून भिरभिरत गेलेली नि पोट पाडणारी जवळची मैत्रीण आहे, सासू-नवऱ्यानं गर्भ पाडायला लावल्यामुळं उस्कटून गेलेली शेजारची बाई आहे, बाई नसूनही पुरुषांना प्रेमात पाडून पैसे कमावणारी तृतीयपंथीय सुमन आहे. या कादंबरीतल्या बायका एका साच्यातल्या नाहीत. प्रत्येकीचं आपापलं जग आहे. कोणी आत्मविश्वासानं जगतंय, तर कोणाचा जगण्यावरचाच विश्वास उडालाय. कोणी मीरा नावाची मुलगी आपल्या वाया जाण्याचं खापर आपल्या पळून गेलेल्या आईवर फोडते नि म्हणते, ‘आईनं मरून जावं, पण पळून जाऊ नये’. कोणी एक भय्याणीन दुःखाला कोळून प्यालेली- प्रियकरानं दगा दिल्यामुळं त्याला विसरायचा प्रयत्न करणाऱ्या उल्काला एकदा ही भैय्यीण म्हणते, ‘अगर भूलना इतना आसान होता तो याद नामका कोई शब्दही न होता’. कोणी एक राणी आहे- ‘मॅडयॅम, मी पण बोलते बघा. यॅ- यॅ, बी, शी, डी, ई मलाबी शिकवा इंग्लीश. मीबी पैसे देईन तुम्हाला’, असं म्हणत उल्काकडे इंग्रजी शिकायला येणारी. शिवाय ज्या वातावरणात उल्का वाढतेय त्या वातावरणाचं वर्णन करणारे शब्द पण कसे आहेत पाहा – ‘संध्याकाळची लोकल पकडणाऱ्या विचारहीन प्रकाशासारखा’ घड्याळाचा काटा, ‘गिलावा दिलेल्या सिमेंटच्या ओट्यासारखी’ घट्ट मैत्री, कुठूनच मदत मिळाली नाही तर ‘बिनशिटीच्या कुकरसारखं’ झालेलं आयुष्य, ‘कॉलसेंटर’ झालेली झोप, ‘शेअरमार्केटसारखा पडलेला’ धरमशेठचा चेहरा. असं सगळं जिवाची मुंबई करणारं वातावरण उल्काच्या आजूबाजूला आहे. आणि या वातावरणात उल्काला सांभाळणारी, दहा बाय दहाच्या खोलीत मुलीला इंजीनियरींगपर्यंत शिक्षण घ्यायला पाठिंबा देत राहणारी, टी.बी. होऊनही तगणारी आई आहे- वैजयंता. या वैजयंतेची आई, म्हणजे उल्काची आजी, आता दूर गावीच आहे. तिथून बिचारी सारखी आपल्या पोरीला पत्रं पाठवत राहते. तीही या कादंबरीत मधे मधे येत राहतात. उदाहरणार्थ, हे शेवटचं पत्र पाहा :
वजयंता,
खूप दिवस पत्र टाकलं नाही म्हणून काळजी करू नकोस. माज्या दोन्ही डोल्यात फूल पडलंय. तरी मला अंधूक अंधूक दिसतंय. झालय असं ज्या पारध्याच्या पोराकडून मी पत्र लिवून घ्यायचे तो देवाघरी गेला. त्याच नाव शिवाजी. पाटलाच्या वावरात चोरी झाली, तशी पारध्यांची आणि मराठ्यांची गावात जुंपली. पोरांनी शिवाजीला ढकलला. तो दगडाला डोकं लागून मेला. गावात पोलीस जीप आली होती. पण पारध्यांना काय न्याव मिळाला नाय. आता हा कुंभारणीचा भाचा सुट्टीत आलाय त्याच्याकडून पत्र लिवून घेते. तुझ्या तब्येतीला आराम पडावा म्हणून सोमाच्या पुतणीकडून झाडपाला पाठवते. तो रोज अनशापोटी खा. उल्काला सांग पायरीनं राहत जा. शेजारीपाजाऱ्यांशी गोड बोलत जा. जमाना खूप उलटा आलाय माणसाच्या जीवाचा कुणाला अप्रूप रायल नाही.
-    तुझी आई
तर अशा आजीची नात उल्का उलट्या जमान्यातही जगतेय. जातीमुळं आणि बाई असण्यामुळं समाजात जगताना पडलेली बंधनं ढिली करू पाहतेय. तिची गोष्ट या कादंबरीत आहे.  पण जात किंवा बाईपण याबद्दल  गोष्टीत जे काही असेल, ते आत्मविश्वासानं आल्यासारखं वाटलं. म्हणजे वरच्या-खालच्या जाती, स्त्री-पुरुष, याबद्दलचा सूर स्पष्टीकरणाचा किंवा गोंधळलेला नाहीये. कुठल्याही जातीतल्या नि लिंगातल्या माणसानं लिहिलं, तरी असा सूर कुठंतरी येऊ शकतो, म्हणजे फक्त उल्काची जात आणि बाई असणं याच्याशी हे संबंधित नाहीये. फक्त त्या निमित्तानं हे नोंदवलं. (हे खरं म्हणजे नोंद लिहिणाऱ्यानं स्पष्टीकरण दिल्यासारखं झालं! पण त्यातून मुद्दा स्पष्ट व्हायला मदत होईल- का). तर, त्यामुळं गोष्टीत एकसुरीपणा नाही वाटत. 

दोन

उल्का चाळके ज्या बंधनांमधून बाहेर यायचा प्रयत्न करतेय, त्या बंधनांचं आकलन करून घ्यायला तिला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चष्मा- त्यांनी दिलेली दृष्टी- महत्त्वाची वाटतेय. या दृष्टीतूनच तिचा एका सामाजिक संघटनेशीही संबंध येतो. आंबेडकराइट पीपल फॉर जस्टिस अशा संस्थेची शाखा असलेली ‘आक्रोश’ ही ती संघटना. या संघटनेच्या निमित्तानं उल्काला आणखी एका अनुभवविश्वाची ओळख होते. इथंही पुरुषी वर्चस्व आहे, छोटीमोठी राजकारणं आहेत, तरीही उल्का आता बाहेरच्या जगात शिकून मजबूत झालेली आहे. ती सगळं पाहते, टाळायचं ते टाळते, टीका करायची त्यावर टीका करते, स्वतः स्वतःला तपासत राहते. यात एकदा तिला ‘दलित ब्राह्मण’ म्हणून हिणवणारा एक मार्क्सवादी युवक भेटतो. याआधी तिनं फी-माफीचा फॉर्म भरताना ‘सरकारी ब्राह्मण’ ही निंदा ऐकलेली असते, पण हे आणखी एक नवीन काय, म्हणून ती त्या तरुणाचं ऐकून घेते. तो आपलं ज्ञान पाझळत तिला स्वतःच्या ज्ञानाबद्दल कमीपणा वाटायला लावतो. आणि मग घरी गेल्यावर उल्काला एक कविता सुचते, त्याची सुरुवात अशी-
प्रिय मार्क्स,
    तू मला ओळखत नाहीस
    पण मी तुला ओळखते
    तुझा जन्म जर्मनीचा
    वंशाने ज्यू   
    जेनी बायको
    एंजल्स मित्र
    आणि हेगेल गुरू
    ही तुझी जुजबी माहिती

    आता माझ्याबद्दल ऐक
मी कु. उल्का बा. चाळके.
वय वर्षं बावीस.
धर्माने बौद्ध, पूर्वीची महार, ढोर, चांभार, ढक्कलवार
किंवा कोळी, न्हावी, कोष्टी, गावित, कातकरी, वडार
किंवा वाणी, गोसावी, जोशी
शेवटी धनगर, बामन, सोनार
ही माझी जुजबी माहिती.
मार्क्सला आपल्या दुःखाची खोलवर कल्पना नसल्याची भावना उल्का या कवितेत नंतर मांडते. पण त्यात तक्रारीचा सूर नाही. मार्क्स भारतापासून एवढा दूर राहत होता, त्यामुळं त्याला इथलं आकलन पूर्णपणे झालं नाही, असं तिला वाटतं. धर्माबद्दलचं मार्क्सचं मतही पटत नाही, तेही ती कवितेत सांगून टाकते. बाबासाहेबांना ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ असं म्हणायचं होतं की ‘बुद्ध व कार्ल मार्क्स’ असं म्हणायचं होतं- यावर विचारवंत, पत्रकार-संपादक, नेते किंवा तशी कोणी मंडळी वाद घालत राहतीलही कदाचित. पण उल्का पडली सामान्य मुलगी. ती तिच्या स्तरावर हा प्रश्न सोडवून टाकते, नि कवितेच्या शेवटी म्हणते :
प्रिय मार्क्स,
तू बाबांना भेटायला हवं होतंस
नको रे,
काठमांडूच्या भाषणाला इतकं
मनाला लावून घेऊ नकोस.
त्यांनाही थेट तुझ्यासारखं वाटायचं
स्वातंत्र्य, लोकशाही, मानवमुक्ती, समता.
त्यांनीही टाकली होती,
पोरेबाळे तुझ्यासारखी उपाशी-तापाशी तत्त्वासाठी
पण मार्क्स,
तुझी-त्यांची भेट झाली असती
म्हणजे सुटाबुटातले बाबासाहेब
हातात पुस्तक घेतलेले
धारदार आवाजाचे
अस्सल इंग्लिश बोलणारे
सडेतोड मुद्दे मांडणारे बाबा,
खरं सांगते तुलाही इंप्रेस करून गेले असते.
डोळ्यावरचा चष्मा काढत
तुझ्या खांद्यावर हात ठेवत
हसत हसत बोलले असते,
‘मि. मार्क्स, तू इथे जन्मला असतास
तर थेट माझ्यासारखा वागला असतास.
मी जर्मनीत जन्मलो असतो
तर थेट तुझ्यासारखा वागलो असतो.’
उल्का चाळके तिच्यापुरता हा जो निष्कर्ष काढते तो तसा सामान्य माणसं काढतील असा. म्हणजे इंग्लिश बोलणारे बाबासाहेब मार्क्सला इंप्रेस करतील असंही त्यात येऊ शकतं मग! उल्काकडं इंग्रजी शिकायला येणाऱ्या राणीचाही निष्कर्ष हाच असू शकतो. सिद्धांतांपेक्षा आपल्या जगण्यातून, व्यवहारातून उल्काला जे काही वाटलं त्यातून काढलेला हा निष्कर्ष. त्यात काही कमी-जास्त असेल, तर ती तिच्या अनुभवातून सुधारेल ना मग. तो तिचा निर्णय. ही कादंबरी आपल्याला अशा सर्वसामान्यांच्या जगण्यातून निघालेले निष्कर्ष सांगते. असे सर्वसामान्यांचे निष्कर्ष सांगणं हे काम साहित्य/गोष्टीतून असं सहजपणे होत असेल, तर मग ते किमान समजून घ्यायला तरी ही कादंबरी वाचायला हरकत नाही.

निळ्या डोळ्यांची मुलगी- शिल्पा कांबळे, गोदा प्रकाशन, पानं- १८८, किंमत- २५० रुपये.

४ टिप्पण्या:

  1. वाचून मूळ कादंबरी वाचायची इच्छा झाली. उल्काने बाबासाहेब आणि मार्क्स यांच्याबद्दल व्यक्‍त केलेलं मत perceptive आहे. आणि धीट आहे. आणि हे कादंबरीतच येऊ शकतं. hemukarnik@blogspot.in या माझ्या ब्लॉगवर मी गांधींविषयी पोस्टमध्ये आणि आंबेडकर जयंतीच्या पोस्टमध्ये या विषयाच्या जवळ गेलो; पण उल्काची डायरीनोंद एकदम नेमकी आहे.

    असो. पुस्तक कसं मिळवायचं?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हेमंत कर्णिक यांना,

      गोदा प्रकाशनाचे संपर्क क्रमांक-
      लँडलाइन- (०२४०) २३३८५१२,
      मोबाइल- ९४२२२०६८२०, ९४२३६८८२१७
      --
      शिवाय, बुकगंगावरही पुस्तक उपलब्ध आहे, असं दिसलं-
      http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5423969617217673379?BookName=Nilya-Dolyanchi-Mulgi
      --
      धन्यवाद.

      हटवा