Thursday, 30 July 2015

फाशी- जॉर्ज ऑर्वेल

मुंबईमधल्या १९९३ सालच्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेनन याला आज सकाळी साडेसहा वाजता नागपूरमधील तुरुंगात फाशी देण्यात आलं. त्या निमित्तानं ही नोंद आहे. संदर्भ वेगळे वाटतील, गुन्ह्यांचा तपशील वेगळा वाटेल, मुद्दा एकच. आत्ताच हे कशाला, असा प्रश्न ज्यांच्या मनात येईल, त्याचं उत्तर म्हणूनच हा लेख मराठीत नोंदवला आहे. कारण हे कधीही असंच असणारं.

जॉर्ज ऑर्वेल (१९०३-१९५०) हा ‘ब्रिटिश इम्पीरियल पोलिस सेवे’चा भाग म्हणून ब्रह्मदेशात काम करत असताना एका भारतीय कैद्याला दिलेली फाशी त्यानं प्रत्यक्ष पाहिली होती. त्या अनुभवावर त्यानं लिहिलेला लेख १९३१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्याचा हा अनुवाद. (मूळ इंग्रजी लेख इथे वाचता येईल.)
 ***

किंकाळी: एडवर्ड मंक यांचं प्रसिद्ध चित्र [इथून]
ही ब्रह्मदेशातली घटना आहे. पावसाळी सकाळ होती. टिन फॉइलच्या पिवळ्या दिव्याचा फिकट प्रकाश कारागृहाच्या उंच भिंतींवर लटकत होता. प्राण्यांच्या पिंजऱ्यांप्रमाणे मोठे गज लावलेल्या कोठड्यांबाहेर उभे राहून आम्ही वाट पाहत होतो. प्रत्येक कोठडी दहा बाय दहा फुटांची होती. एक साधी कॉट आणि पिण्याच्या पाण्याचं भांडं सोडल्यास ती जवळजवळ रिकामीच होती. काही कोठड्यांमधे काळपटलेली माणसं गुडघे मुडपून बसलेली होती. फाशीची शिक्षा ठोठावलेले हे लोक. येत्या आठवड्यात किंवा दोन आठवड्यांत त्यांची शिक्षा अमलात येणार होती.

एका कैद्याला बराकीतून बाहेर काढण्यात आलं. बारीकसा हिंदू मनुष्य होता. पूर्ण भादरलेले केस, अस्पष्ट पाणीदार डोळे, त्याच्या शरीराच्या आकाराशी न जुळणाऱ्या जाडजूड मिशा असा तो कैदी. त्याच्या मिशा चित्रपटातल्या विनोदी पात्राप्रमाणे वाटत होत्या. पहाऱ्यासाठी असलेले सहा उंच भारतीय वॉर्डर फाशीसाठीच्या खांबापर्यंत घेऊन जायला त्याला तयार करत होते. दोघंजण संगीनधारी बंदुका घेऊन उभे होते, तर बाकीचे त्याला हातकड्या घालून, त्या एका साखळीत अडकवून, साखळी आपल्या कमरेच्या पट्‌ट्यांना बांधण्यात गुंतले होते. त्याचे हात त्याच्या शरीराला घट्ट बांधण्यात आले. वॉर्डर त्याच्या खूप जवळ उभे होते आणि त्यांचे हात त्याच्याभोवती एवढ्या काळजीपूर्वक फिरत होते की तो तिथं खरंच आहे ना याची ते खात्री करतायंत असं वाटावं. कधीही पाण्यात उडी मारून परत जाईल असा जिवंत मासा हातात घेतल्यावर माणूस कसा वागतो तसंच ते चित्र होतं. पण तो जवळपास विरोध न करताच उभा होता, दोऱ्यांभोवती तो हळुवारपणे हात गुंडाळत होता. जणू काय चाललंय याचा त्याला पत्ताच नव्हता.

आठ वाजले. दूरवरच्या बराकींमधे बिगुल वाजलेला दमट हवेतून ऐकू आला. आमच्यापासून दूरवर उभं राहून हातातल्या काठीने जमिनीवरच्या दगडांना उदासपणे उडवत असलेल्या तुरुंग अधीक्षकांनी आवाजाच्या दिशेने तोंड फिरवून पाहिलं. पांढऱ्याया पडत चाललेल्या मिशा असलेले ते एक सैनिकी डॉक्टर होते. ‘‘फ्रान्सिस, जरा पटकन आटप रे बाबा!’’ ते किरकिरत्या आवाजात ओरडले. ‘‘एव्हाना तो मेलेला असायला हवा होता. आणि अजूनही तूच तयारीत नाहीस?’’

फ्रान्सिस हा तुरुंगप्रमुख. पांढरा गणवेश नि सोन्याच्या कडांचा चष्मा घातलेला दक्षिण भारतीय. तो हात हलवत म्हणाला, ‘‘होय, होय सर.. सगळं ठीक झालंय आता. जल्लादही तयार आहे. आपण निघायला हवं.’’

‘‘बरंय, मग उरक आता. हे काम आटपेपर्यंत बाकीच्या कैद्यांना जेवण मिळणार नाही.’’

आम्ही वधस्तंभाच्या दिशेने वळलो. कैद्याच्या दोन्ही बाजूंना दोन वॉर्डर बंदुका घेऊन होतेच. शिवाय त्याच्या आणखी जवळून चालणाऱ्या दोन वॉर्डरांनी त्याला हाताला नि खांद्याला धरलं होतं. एकाच वेळी ते त्याला ढकलतायंत नि आधारसुद्धा देतायंत असं वाटत होतं. आमच्याबरोबर असलेले न्यायदंडाधिकारी आणि इतर अधिकारी त्यामागून चालत होते. दहाएक मीटरचं अंतर चालून झालं असेल तेवढ्यात एकदम कोणत्याही आदेशाशिवाय किंवा सूचनेशिवाय हा जथ्था थांबला. एक विचित्र घटना झाली होती. कधी कोणास ठाऊक, पण एक कुत्रा आवारात आला होता. मोठमोठ्यानं भुंकत तो आमच्यापर्यंत आला. एवढी सगळी माणसं एकत्र बघून भेदरलेला तो शेपटी हलवत भोवताली फिरू लागला. त्याला कोणी थांबवण्यापूर्वीच त्यानं अचानक कैद्याकडे झेप घेतली आणि उडी मारून त्याचा चेहरा चाटण्याचा प्रयत्न केला. उरलेले सगळेचजण स्तब्ध होऊन पाहत राहिले. कुत्र्याला पकडायलाही पटकन कोणी पुढं होईना.

‘‘ह्या साल्या कुत्र्याला कोणी आत येऊ दिलं?’’ अधीक्षक चिडून म्हणाले. ‘‘कोणी तरी पकडा रे त्याला!’’

जथ्थ्यातून बाहेर पडून एक वॉर्डर कुत्र्याच्या मागे लागला, पण तो त्याच्या हाती येईना. एका तरुण युरोपीय अधिकाऱ्यानं दगड मारून कुत्र्याला हटवायचा प्रयत्न केला; पण त्यानं दगडांचा मारा चुकवला आणि तो परत आम्ही उभे होतो तिथं आला. तुरुंगाच्या भिंतींमध्ये त्याच्या भुंकण्याचा आवाज घुमत होता. हा जणू फाशीपूर्वीच्या प्रक्रियेचाच काही तरी भाग असावा अशा पद्धतीने कैदी कोणत्याही कुतूहलाविना हे सगळं पाहत होता. काही मिनिटांनी कुत्र्याला कोणी तरी पकडलं. त्याच्या तोंडाभोवती माझा रुमाल अडकवून आम्ही पुढं निघालो.

वधस्तंभापासून चाळीस मीटरच्या आसपास मी कैद्याची काळपट पाठ पाहिली. तो माझ्या समोरच चालत होता. तो हात बांधलेल्या अवस्थेत, जरा अवघडून बऱ्यापैकी हळू पावलं टाकत होता. प्रत्येक पावलाबरोबर त्याचं मांस आणि हाडांची हालचाल स्पष्ट दिसत होती नि ओल्या मातीवर त्याची पावलं स्पष्ट उठत होती. त्याला दोघादोघांनी धरून ठेवलेलं असतानाही एकदा वाटेत आलेला खड्डा चुकवण्यासाठी तो जरा बाजूला होऊन पुढं गेला.

सुदृढ आणि शुद्धावस्थेत असलेल्या माणसाला संपवणं म्हणजे काय ते त्या क्षणापर्यंत मला कधीही अजिबातच जाणवलेलं नव्हतं. तो कैदी खड्डा चुकवण्यासाठी जरा बाजूला सरला तेव्हा मला ते गूढ उकललं. पूर्ण जोमानिशी सुरू असलेलं जीवन मधेच तोडून टाकण्यातली गफलत माझ्यासमोर स्पष्ट उभी ठाकली. हा माणूस मरत नव्हता. आम्ही जसे जिवंत होतो तसाच तो जिवंत होता. त्याच्या शरीराचे सगळे भाग व्यवस्थित काम करत होते. जठर अन्न पचवत होतं, त्वचा स्वतःची निगा राखत होती, नखं वाढत होती... आपसूकपणे हे सगळं सुरू होतं. तो वधस्तंभावर चढण्यासाठी उभा राहील. एक दशांश सेकंदात तो हवेत उडी घेऊन खाली पडेल त्या क्षणीही त्याची नखं वाढत असतील. खालची खडी नि बाजूच्या राखाडी भिंती हे सगळं तो पाहत होता आणि तरी त्याचा मेंदू तर्काधिष्ठित विचार करू शकत होता. खालच्या खड्‌ड्याची जाणीव त्याला होती. तो आणि आम्ही सगळे एकत्र चालणारी माणसं होतो. पाहत होतो, ऐकत होतो, जाणून घेत होतो. एकच जग समजून घेत होतो. आणि दोन मिनिटांत, एका क्षणात आमच्यातला एकजण गेलेला असणार होता. एक मन कमी होणार होतं, एक जग कमी होणार होतं.

वधस्तंभ तुरुंगाच्या मुख्य इमारतीपासून जरा बाजूच्या लहानशा जागेत अनेक शोक पचवत उभा होता. तीन बाजूंनी विटांच्या भिंती असलेली ती एक शेडवजा जागा होती. वर एक लाकडी फळी होती. त्यावर दोन बाजूंना मोठे बीम होते आणि त्यामधून एक बार गेलेला नि त्याला दोरी लटकत होती. तुरुंगाच्या पांढऱ्या गणवेशात उभा असलेला जल्लाद, केस पांढरे होत आलेला एक कैदीच, खटक्याचा दांडा असलेल्या यंत्राजवळ उभा होता. आम्ही तिथं गेलो तसा तो आमच्यासमोर खाली झुकला. फ्रान्सिसच्या सूचनेनुसार कैद्याला आधीपेक्षाही जवळून पकडून असलेल्या दोघा वॉर्डरांनी त्याला जवळपास ढकलून वधस्तंभापर्यंत नेलं. पायऱ्यांवरून ते त्याला वर घेऊन गेले. त्यानंतर जल्लाद वर चढला आणि त्यानं दोरी कैद्याच्या मानेभोवती घट्ट केली.

आम्ही पाचेक मीटरच्या अंतरावर उभे राहून बघत होतो. वधस्तंभाभोवती वॉर्डरांचं एक वर्तुळच बनलं होतं. आणि फास पक्का केल्यावर लगेच कैदी रडून देवाचं नाव घेऊ लागला. मोठ्या आवाजात सलग तो ‘राम, राम, राम, राम’ उच्चारू लागला. गडबडीत आणि भीतीनं केलेल्या प्रार्थनेसारखं ते उच्चारण नव्हतं. स्थिर, ताल असलेलं, घंटा वाजते तशा पद्धतीनं तो देवाचं नाव एकसंधपणे घेत होता. तिकडे कुत्र्यानं दबलेल्या आवाजात रडणं सुरू केलेलं ऐकू येत होतं. जल्लाद अजून वधस्तंभावरच उभा होता. पिठाच्या पोत्याप्रमाणे वाटणारी एक लहानशी कॉटनची पिशवी त्यानं आणली आणि ती कैद्याच्या चेहऱ्यावर घातली. त्या कापडामुळे अडलेला पण तरीही सतत येणारा ‘राम, राम, राम, राम’ उच्चारणाचा आवाज सुरूच होता.

जल्लाद पायऱ्यांवरून खाली उतरला आणि खटक्याच्या दांड्याजवळ येऊन दांडा हातात धरून उभा राहिला. मिनिटं जाताना कळत होती. कैद्याचं रडणं आणि ‘राम, राम, राम, राम’ उच्चारणं सलग सुरूच होतं. मान खाली वळवून उभे असलेले अधीक्षक हातातल्या काठीनं जमिनीवर रेघा ओढत होते. बहुतेक ते हुंदक्यांची मोजदाद करत असावेत नि कैद्याला काही ठराविक आकड्यांपर्यंत रडण्याची मुभा त्यांनी दिली असावी. पन्नास किंवा शंभर हुंदके असं काही तरी. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता. काही बंदुकांवरच्या संगिनी हलत होत्या. टोप चढवून फळीवर उभ्या असलेल्या त्या माणसाचे हुंदके आम्ही ऐकत होतो. प्रत्येक हुंदका म्हणजे आयुष्याचा आणखी एक क्षण. आमच्या सर्वांच्या मनांमधे हाच विचार होता : मारा आता त्याला लवकर, संपवा हे! तो घाणेरडा आवाज संपवा!

अचानक अधीक्षकांनी निर्णय पक्का केला आणि मान वर करून हातातल्या काठीनं सूचना करत ते जोरानं ओरडले, ’’चलो!’’

त्यानंतर एकदा जोरदार आवाज झाला आणि नंतर मृतप्राय शांतता पसरली. कैदी संपला होता, दोरी तिची तिची फिरत होती. कुत्र्याला आम्ही सोडून दिलं आणि तो एकदम धावत वधस्तंभाच्या पाठीमागे गेला. तिथं पोचल्यावर मात्र तो मागेच थांबला, भुंकला आणि मग बाजूच्या कोपऱ्यात जाऊन बसला. तिथून तो आमच्याकडे भीत भीत पाहत होता. वधस्तंभाभोवती फेरी मारून आम्ही कैद्याच्या देहाकडे पाहिलं. पायांची टोकं सरळ खाली वळलेल्या अवस्थेत तो हळूहळू फिरत लटकत होता, दगडाप्रमाणे स्तब्ध.

अधीक्षकही आपल्या काठीसह तिथं आले. त्यांनी शरीराला काठीनं टोचलं. शरीर थोडं फिरलं. ‘‘तो ठीक आहे.’’ अधीक्षक म्हणाले. वधस्तंभापासून दूर जाऊन त्यांनी मोकळा निःश्वास सोडला. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण अचानक निघून गेला होता. मनगटातल्या घड्याळाकडे बघून ते म्हणाले, ‘‘आठ वाजून आठ मिनिटं. आजच्या सकाळपुरतं इतकं बास. चला, देवाचे आभार मानू.’’

बंदुकांवरच्या संगिनी काढून वॉर्डर निघून गेले. कुत्रा शांत होता. आपण चुकीचं वागल्याची समज असल्यासारखा तो त्यांच्या मागून निघाला. आम्हीही निघालो. फाशी यार्डातून, दोषी कैद्यांना पकडून असलेल्या कोठड्यांना ओलांडून तुरुंगाच्या केंद्रभागात आलो. लाठ्या घेऊन असलेल्या वॉर्डरांच्या देखरेखीखाली इतर कैदी नाश्ता करत होते. लांबच लांब रांगांमधे ते खाली बसले होते. प्रत्येकाच्या हातात अॅल्युमिनियमची थाळी होती. दोन वॉर्डर भात भरलेल्या बादल्या सरकवत कैद्यांना वाढत होते. फाशीनंतर आता हे घरगुती हलकफुलकं वातावरण दिसत होतं. काम संपल्यामुळं आम्हालाही सुटल्यासारखं वाटत होतं. गाणं म्हणावं किंवा सरळ पळत सुटावं किंवा दाबजोर हसावं अशा चित्रविचित्र भावना मनात यायला लागल्या. एकदम सगळेचजण आपापसात कुजबुजू लागले.

माझ्या शेजारून चालत असलेला युरेशियन मुलगा आम्ही आलो तिकडे पाहत सूचक हास्य करून म्हणाला, ‘‘तुम्हाला माहितेय सर, माझ्या मित्रानं (म्हणजे मघाशी मृत झालेला माणूस) जेव्हा त्याची याचिका फेटाळण्यात आल्याचं ऐकलं तेव्हा तो कोठडीतल्या जमिनीवर मुतला होता- भीतीनं.’’ हे बोलून लगेच तो मुलगा म्हणाला, ‘‘सर, ही घ्या एक सिगरेट माझ्याकडून. ही चांदीची पेटी तुम्हाला आवडली नाही का सर? बॉक्सवाल्याकडून घेतली, दोन रुपये आठ आण्याला. क्लासी युरोपियन स्टायलीची आहे.’’

अनेक लोक हसले... कशाला? कोणालाच ते माहीत नव्हतं बहुतेक.

अधीक्षकांबरोबर चालणारा फ्रान्सिस कलकल करत बोलत होता. ‘‘तर मग सर, सगळं समाधानकारकपणे पार पडलं. एका झटक्यात आटोपलं. प्रत्येक वेळी असं नाही होत ना! मी ऐकलंय, काही वेळा डॉक्टरला वधस्तंभाखाली जावं लागतं नि कैदी मेलाय की नाही याची खात्री करायला त्याचे पाय ओढून बघावे लागतात. फारच चुकीचं होतं ते मग.’’

‘‘हां, ते हलवत बसणं ना? फारच वाईट असतं ते’’, अधीक्षक म्हणाले.

‘‘अहो सर, कैद्यानं रोखून धरलं तर याहून वाईट गत होते. एक माणूस एकदा मधल्या खांबाला पकडून राहिला. तुम्हाला पटणार नाही, पण त्याला बाजूला करायला सहा वॉर्डर लागले. त्याचा प्रत्येक पाय धरून तीन-तीन वॉर्डर ओढत होते. आम्ही त्याची समजूतही घातली, ‘मित्रा, तू आम्हाला जो काही त्रास देतोयंस त्याचा विचार कर की!’ पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता! फारच त्रासदायक ठरला तो!’’

अचानक मला लक्षात आलं की मी खूपच मोठ्यानं हसत होतो. प्रत्येकजणच हसत होता. अधीक्षकही दबून हसत होते. ‘‘तुम्ही सगळे बाहेर येऊन एकेक ड्रिंक घेतलंत तर चांगलं होईल. गाडीमध्ये मी व्हिस्कीची एक बाटली राखून ठेवलीय. त्यावर आपलं भागेल.’’ अधीक्षक म्हणाले.

तुरुंगाच्या गेटच्या मोठ्या कमानीखालून आम्ही रस्त्यावर आलो. ‘‘त्याचे पाय ओढावे लागले.’’ अचानक एक ब्रह्मदेशी अधिकारी ओरडला नि जोरजोरात हसायला लागला. मग आम्ही सगळेच पुन्हा हसायला लागलो. त्या वेळी फ्रान्सिसने सांगितलेला प्रसंग खूपच मजेशीर वाटला. आम्ही एकत्र दारू प्यालो. स्थानिक आणि युरोपीय सगळेच खेळीमेळीनं प्यालो. मेलेला माणूस शंभर मीटर दूर पडला होता.

9 comments:

 1. nthing to comment about it just emptiness

  ReplyDelete
 2. माझ्या माहितीनुसार या लेखाचं मराठी भाषांतर सर्वात पहिल्यांदा व्यंकटेश माडगुळकर यांनी केलं होतं. रविवार सामनासाठी त्यांनी 'सरवा' नावाचं सदर लिहिलं होतं. त्यात या लेखाचा अनुवाद होता... सरवा नावाचं पुस्तकदेखील १९९४ साली नवचैतन्य प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं... तुम्ही केलेल्या या भाषांतरामध्ये आणि मुळ लेखामध्ये कमालीचं साम्य आहे.... प्रत्येक शब्दाला समानार्थी शब्द लिहुन तोच लेख पुन्हा लिहिला आहेअसं वाटतं...

  ही एक प्रकारची वाड.मयचौरी समजावी का? तसं असेल तर ते दुर्दैवी आहे. एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, ही अपेक्षा तुमच्याकडुन नव्हती.. समजा नसेल तरी माडगुळकरांचा उल्लेख करणे गरजेचे होते...

  ReplyDelete
  Replies
  1. मृणाल,

   माडगुळकरांनी केलेलं भाषांतर माझ्या माहितीत नाही. तुमच्या माहितीवरून पुस्तकाच्या नावानं इंटरनेटवर शोधलं, पुस्तक तर दिसलं, पण त्यातल्या मजकुराचा तपशील (ही प्रतिक्रिया लिहीपर्यंत) दिसलेला नाही, त्यामुळं त्याबद्दल काही बोलता येणार नाही.

   तुम्हाला शब्दांमध्ये काय साम्य आढळलं आणि त्यातून काही वाङ्मयचौर्यासारखा प्रकार वाटत असेल, तर त्याचा तपशील दिलात तर ते जास्त योग्य होईल असं वाटतं. माडगूळकरांचं भाषांतर माहीत असतं, तर आपण त्यांच्या लेखनाचे प्रताधिकार असणाऱ्या व्यक्ती/संस्थेकडून त्यासंबंधी परवानगी घेऊन त्यांचा मजकूर त्यांच्या नावानं प्रसिद्ध केला असताही. पण ते माहीतच नसल्यामुळं तो पर्याय रेघेपुढं नव्हता. आणि मुळात एका मजकुराची दोन भाषांतरं करायलाही हरकत नाही, असंही वाटतं. रेघेवरच यापूर्वी थोरोच्या एका मजकुराचं भाषांतर प्रसिद्ध झालं, तो मजकूर ज्या पुस्तकातला आहे त्या पुस्तकाचं भाषांतर दुर्गा भागवत यांनी केलेलं आहे, हे अंधुक माहीत होतं आणि नंतर एक-दोन वाचकांनीही कळवलं, पण ते पुस्तक पाहण्यात नव्हतं. अजूनही पाहिलेलं नाही. मुळात, एकाच संहितेची अनेक भाषांतरं असली, तरी त्यानं हरकत नाही, उलट तशी अनेक भाषांतरं असणं हे भाषेच्या श्रीमंतीचं लक्षण आहे, असं वाटतं. त्यात वाङ्मयचौर्यासारखं काही होऊ नये, हे बरोबरच. पण तसं वाटत असेल, तर ते सिद्ध करणं एवढाच मार्ग आहे. तुम्ही खूपच सहज शेरा मारलाय. आपण रेघेवर शक्यतो शेरेबाजीला काही उत्तर देत नाही. पण तुमच्या प्रतिक्रियेतल्या तपशिलाला उत्तर आवश्यक वाटलं, म्हणून ही लांब प्रतिक्रिया द्यावी लागते आहे.

   मुळात ऑर्वेलच्या लेखाचं हे भाषांतर 'महा-अनुभव' मासिकाच्या जानेवारी २०१३च्या अंकात प्रसिद्ध झालं होतं. आपल्याला इथं शेऱ्यांना उत्तर द्यायचं नसतं तसं रेघेच्या व्यक्तिगत कामाचाही संदर्भ आणायचा नसतो. पण तरी यावेळी ते आता करावं लागतंय. तर, तो लेख भाषांतरीत करतानाचे किमान चार-पाच प्रत्यक्षदर्शी पुरावे आहेत. शिवाय हे भाषांतर छापून आलं त्यात एका शब्दाचा वापर चुकला होता, तो एका ज्येष्ठ व्यक्तीनं दाखवला, मग त्यात बदल करून ते वेबसाइटवर प्रसिद्ध झालं आणि त्यातही काही मामुली व्याकरणाची सलगता आणून आपण इथं ते प्रसिद्ध केलंय.

   शिवाय, वाङ्मयचौर्यच करायचं असेल, तर ''प्रत्येक शब्दाला समानार्थी शब्द लिहून तोच लेख पुन्हा लिहिण्या''चं कारण काय! म्हणजे एवढे कष्ट कशाला घ्यायचे. कारण काम जवळपास तेवढंच पडणार असेल, आणि प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द पाहावाच लागणार असेल, तर तो प्रत्येक इंग्रजी शब्दाचा मराठी समानार्थी शब्द शोधून लिहिणं जास्त बरं नाही काय?

   बाकी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. माडगूळकरांच्या पुस्तकाबद्दल कळलं. शक्य होईल तेव्हा ते प्रत्यक्ष पुस्तक वाचायचा प्रयत्न करतो.

   Delete
  2. मृणाल04 August, 2015 12:15

   वेळात वेळ काढुन प्रतिक्रियेला उत्तर दिलंत त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद.

   "एका मजकुराची दोन भाषांतरं करायलाही हरकत नाही" शंभर टक्के मान्य!! पण मी आधी म्हटल्याप्रमाणे तुमच्या लेखात आणि माडगुळकरांच्या लेखात साम्य आहेच. तो लेख शक्य असल्यास तुमच्यापर्यंत कसा पोहोचवता येईल हे सांगावं.

   माझं काही फार मोठं शिस्तीचं वाचन नाही पण हा ब्लॉग मी गेले अनेक महिने वाचत आहे. त्यात "ओरिजिनल" असं बरंच असताना जिथे शक्य असेल तिथे मुळ लेखांचे संदर्भदेखील असतात. अचानक हा लेख प्रकाशित झाला आणि आश्चर्य वाटलं. मी माझं मत स्पष्टपणे व्यक्त केलं. हा "खूपच सहजपणे शेरा मारलेला नाही". वेळ जात नाही म्हणुन निरर्थक शेरेबाजी करणार्‍यांपैकी मी नाही. जे मला समजत नाही त्याबद्दल मी कधीच प्रतिक्रिया देत नाही. म्हणुन इतके महिने ब्लॉग वाचत असुन माझी ही पहिली प्रतिक्रिया आहे.

   Delete
  3. बरं. 'वाङ्मयचौर्य' आणि 'समानार्थी शब्द' या बाबतीत थेट निष्कर्ष काढल्यासारखं दिसलं तेवढ्यापुरतंच 'शेरेबाजी' म्हटलं. तुम्ही स्पष्टपणे मत व्यक्त केलंत, तेही चांगलंच. त्या निमित्तानं माडगूळकरांचा उल्लेख झाला, त्यांच्या पुस्तकाची या संदर्भात नोंद केली आपण, ही चांगलीच गोष्ट झालेय. माझंही वाचन शिस्तीचं नाही, हे माडगूळकरांनी केलेलं भाषांतर मला माहीत नव्हतं यावरून लक्षात येतंच. त्यामुळं प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद. मूळ लेख ekregh@gmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठवता येईल. तुम्ही शब्दांमध्ये साम्य असल्याचं म्हटल्यावर वरचं भाषांतर परत वाचून पाहिलं. मुळात भाषांतर सुमारे पंधराशे शब्दांचं आहे, त्यात काही खूप वेगळे शब्द नाहीत, त्यामुळं असं साम्य असण्याची शक्यता वाढली असेल, असंही असेल.

   Delete
 3. मृणाल यांनी माडगूळकरांनी केलेलं ऑरवेलच्या लेखाचं भाषांतर रेघेच्या ई-मेल पत्त्यावर पाठवलं. त्यात त्यांना रेघेवरच्या मजकुराशी साम्य वाटलेला मजकूर त्यांनी अधोरेखित करून पाठवला आहे. या प्रतिक्रियेत माडगूळकरांच्या लेखातला मृणाल यांनी अधोरेखित केलेला मजकूर आणि त्याला समांतर रेघेवरचा मजकूर नोंदवला आहे. मृणाल यांनी अधोरेखित केलेला मजकूर एकूण लेखाच्या सुमारे सोळा-सतरा टक्के एवढा आहे.

  माडगूळकर- उंच भिंताडांवर
  रेघ- उंच भिंतींवर

  माडगूळकर- प्रत्येक कोठी दहा बाय् दहाची. समोर गज लावलेले.
  रेघ- प्रत्येक कोठडी दहा बाय दहा फुटांची होती.

  माडगूळकर- किरमिजी कातड्याची माणसं गप्प बसलेली. या सगळ्यांना फाशीची सजा झालेली. येत्या एक-दोन आठवड्यांत ही माणसं फासावर जाणारच.
  रेघ- काही कोठड्यांमध्ये काळपटलेली माणसं गुडघे मुडपून बसलेली होती. फाशीची शिक्षा ठोठावलेले हे लोक. येत्या आठवड्यात किंवा दोन आठवड्यांत त्यांची शिक्षा अमलात येणार होती.

  माडगूळकर- कैदी शांत होता.
  रेघ- पण तो जवळपास विरोध न करताच उभा होता, दोऱ्यांभोवती तो हळुवारपणे हात गुंडाळत होता.

  माडगूळकर- काय चाललं आहे, हे जणू त्याच्या गावी नव्हतंच.
  रेघ- जणू काय चाललंय याचा त्याला पत्ताच नव्हता.

  माडगूळकर- आठ वाजले आणि बिगूल झाला. ओल्या हवेतून उठलेला पातळ आवाज
  रेघ- आठ वाजले. दूरवरच्या बराकींमधे बिगुल वाजलेला दमट हवेतून ऐकू आला.

  माडगूळकर- कैदी मरून मोकळा व्हाला पाहिजे होता या वेळेपर्यंत! तुम्ही अजून तयार नाही?
  रेघ- एव्हाना तो मेलेला असायला हवा होता. आणि अजूनही तूच तयारीत नाहीस?

  माडगूळकर- सोनेरी फ्रेमचा चष्मा घालायचा.
  रेघ- सोन्याच्या कडांचा चष्मा घातलेला

  माडगूळकर- हे सगळं आटोपल्याशिवाय बाकीच्या कैद्यांना न्याहरी देता येणार नाही.
  रेघ- हे काम आटपेपर्यंत बाकीच्या कैद्यांना जेवण मिळणार नाही.

  माडगूळकर- दहाएक यार्ड अशी मिरवणूक गेली आणि एकाएकी थांबली. एक विलक्षण प्रकार झाला. कुठून, कसा, कोण जाणे, पण जेलच्या आवारात एक कुत्रा भो भो भुंकत घुसला
  रेघ- दहाएक मीटरचं अंतर चालून झालं असेल तेवढ्यात एकदम कोणत्याही आदेशाशिवाय किंवा सूचनेशिवाय हा जथ्था थांबला. एक विचित्र घटना झाली होती. कधी कोणास ठाऊक, पण एक कुत्रा आवारात आला होता. मोठमोठ्यानं भुंकत तो आमच्यापर्यंत आला.

  माडगूळकर- कैद्याकडं धावलं. उड्या घेऊन त्याचं तोंड चाटायला बघू लागला. सगळे थक्क होऊन जागच्या जागी उभे राहिले. कुत्र्याला धरून ओढावं याचं भानच कुणाला राहिलं नाही.
  रेघ- त्याला कोणी थांबवण्यापूर्वीच त्यानं अचानक कैद्याकडे झेप घेतली आणि उडी मारून त्याचा चेहरा चाटण्याचा प्रयत्न केला. उरलेले सगळेचजण स्तब्ध होऊन पाहत राहिले. कुत्र्याला पकडायलाही पटकन कोणी पुढं होईना.

  माडगूळकर- 'या कुत्र्याला कुणी आत येऊ दिलं? धरा, धरा त्याला.' एक वॉर्डर धावला. पण त्याला बघून कुत्रं हुतूतू घालायला लागलं.
  रेघ- ‘‘ह्या साल्या कुत्र्याला कोणी आत येऊ दिलं?’’ अधीक्षक चिडून म्हणाले. ‘‘कोणी तरी पकडा रे त्याला!’’ जथ्थ्यातून बाहेर पडून एक वॉर्डर कुत्र्याच्या मागे लागला, पण तो त्याच्या हाती येईना.

  माडगूळकर- हाही एक फाशी देण्यातलाच उपचार असावा.
  रेघ- हा जणू फाशीपूर्वीच्या प्रक्रियेचाच काही तरी भाग असावा--

  माडगूळकर- हे विलक्षणच! पण त्या क्षणापर्यंत मला कधीही जाणवलेलं नव्हतं, की एखाद्या निरोगी, शुद्धीवर असलेल्या माणसाला नाहीसा करणं म्हणजे काय असतं. वाटेतलं डबकं चुकवण्यासाठी हा कैदी जेव्हा बाजूनं गेला, त्या क्षणी, जीवनाचा धोधाट प्रवाह थांबवणं म्हणजे काय, याची जाणीव मला झाली. हा कैदी आता मरत नव्हता. आमच्यासारखाच तो जिवंत होता. त्याच्या शरीरातील सगळी इंद्रियं नीट काम देत होती. पचनशक्ती खालेल्लं पचवत होती, त्वचा पुन्हा जन्मत होती, नखं वाढत होती, पेशी जन्मत होत्या.
  रेघ- सुदृढ आणि शुद्धावस्थेत असलेल्या माणसाला संपवणं म्हणजे काय ते त्या क्षणापर्यंत मला कधीही अजिबातच जाणवलेलं नव्हतं. तो कैदी खड्डा चुकवण्यासाठी जरा बाजूला सरला तेव्हा मला ते गूढ उकललं. पूर्ण जोमानिशी सुरू असलेलं जीवन मधेच तोडून टाकण्यातली गफलत माझ्यासमोर स्पष्ट उभी ठाकली. हा माणूस मरत नव्हता. आम्ही जसे जिवंत होतो तसाच तो जिवंत होता. त्याच्या शरीराचे सगळे भाग व्यवस्थित काम करत होते. जठर अन्न पचवत होतं, त्वचा स्वतःची निगा राखत होती, नखं वाढत होती... आपसूकपणे हे सगळं सुरू होतं.

  माडगूळकर- आम्ही पाचएक यार्ड अंतरावर उभे होते.
  रेघ- आम्ही पाचेक मीटरच्या अंतरावर उभे राहून बघत होतो

  माडगूळकर- घाईनं, भीतीनं केलेला हा धावा नव्हता, धीराचं, तालबद्ध, जणू घंटानाद असं हे नामस्मरण होतं.
  रेघ- गडबडीत आणि भीतीनं केलेल्या प्रार्थनेसारखं ते उच्चारण नव्हतं. स्थिर, ताल असलेलं, घंटा वाजते तशा पद्धतीनं तो देवाचं नाव एकसंधपणे घेत होता.

  ReplyDelete
 4. मृणाल यांनी मेलवर कळवलं की- ''मी माझं म्हणणं नाकारणार नाही. तुम्हांला तो वेगळा वाटला... मतस्वातंत्र्य !!! असो... हा वाद वाढविण्यात अर्थ नाही. ह्यापुढे तुमच्याच नव्हे तर कोणत्याही ब्लॉगवर मत नोंदविण्याआधी दहादा विचार केला जाईल. सर्वच पत्रोत्तरांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद...''

  यावर आता रेघेला काहीही बोलायचं नाही!

  ReplyDelete
 5. चौर्य वाटत नाही. साम्य फारसे वाटत नाही. अर्थ तर बदलताच येणार नाही. मग दुसरा ठरलेल्या भाषांतरकाराने काय करावे बुवा ?? (डोके खाजवीत वृद्ध होत जातो.)

  ReplyDelete
  Replies
  1. काय बोलतील ते सहन करावं. :)

   Delete

डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ट अथवा नेट बँकिंगद्वारे रेघेची 'ऐच्छिक वर्गणी' भरायची असल्यास इथे क्लिक करावं.