Friday, 17 March 2017

शकु नी. कनयाळकर यांचा 'थोडाबहुत काफ्का'

'शकु नी. कनयाळकर' या पूर्ण नावातलं पहिलं नाव 'शकु' आहे, त्यामुळं हे सगळं नाव एखाद्या स्त्रीचं आहे, असं आपल्याला मानायला लागेल. आणि मग या नावाच्या व्यक्तीनं एखादं पुस्तक लिहिलं असेल, तर तिला 'लेखिका' असं संबोधून नोंद करावी लागेल. तर या लेखिकेनं 'थोडाबहुत काफ्का' असं एक पुस्तक लिहिलेलं आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात हे पुस्तक अचानक एका दुकानात समोर आलं. चुकून दुकानाच्या आवराआवरीत दुकानवाल्यांकडून ते बाहेर दिसणाऱ्या गठ्ठात राहून गेलेलं. नायतर तसं हे पुस्तक आता सारखं कुठं दिसण्यातलं राहिलं नाहीये. या पुस्तकाच्या लेखिकेच्या नावापुरताच विचित्रपणा संपत नाही, पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पुस्तकाचं किंवा लेखिकेचं नाव दिलेलं नाही, हा विचित्रपणाचा आणखी एक भाग. अख्ख्या आवरणाचं छायाचित्र असं आहे:

नवी क्षितिजे प्रकाशन, १९९३

पुस्तकाच्या कण्यावर बहुतेकदा दिलं जातं त्याप्रमाणे पुस्तकाचं नाव, लेखिकेचं नाव आणि प्रकाशकाचं नाव मात्र लिहिलंय. बाकी मुखपृष्ठावर फक्त काफ्काचा चेहरा आणि मागच्या बाजूला हे जर्मन भाषेत लिहिलेले शब्द असल्याचं आपल्याला ताडता येतं. ते जर्मन शब्द म्हणजे 'अ हंगर आर्टिस्ट' या काफ्काच्या गोष्टीचं जर्मन नाव असेल, हेही प्राथमिक दिसण्यातून कळू शकतं.

'शकु. नी कनयाळकर' हे नाव मात्र मराठी वाटूनही खरंखुरं वाटत नाही. म्हणून त्यासंबंधी शोधाशोध केली. तर, 'ग्रंथालय-डॉट-ऑर्ग' या संकेतस्थळावरच्या यादीत हे पुस्तक होतं. वाईच्या लोकमान्य टिळक ग्रंथालयात याची प्रत असल्याचं या संकेतस्थळावरच्या नोंदीत लिहिलंय. शिवाय, 'ऐसी अक्षरे' या संकेतस्थळावरच्या एका चर्चेमधे 'धनुष' या आयडीनं या लेखिकेचा नि पुस्तकाचाही उल्लेख केल्याचं दिसलं. काफ्काच्या 'द ट्रायल' कादंबरीचं मराठी भाषांतर म्हणून 'थोडाबहुत काफ्का' या पुस्तकाचा सदर चर्चेत उल्लेख झालेला दिसतो.

काफ्काच्या 'द ट्रायल' या कादंबरीचं मराठी भाषांतर 'थोडाबहुत काफ्का' या पुस्तकाचा एक भाग म्हणून येतं. आणि आहे ते भाषांतरही पूर्णच्यापूर्ण नाहीये. काही ठिकाणी काही वाक्यं गाळलेली आहेत. रेघेकडं उपलब्ध असलेल्या 'ट्रायल'च्या इंग्रजी आवृत्तीसोबत (पेंग्वीन बुक्स, मॉडर्न क्लासिक्स मालिका, २०००) आपण हे मराठी भाषांतर ताडून पाहिलं. मराठी भाषांतरासोबत त्यात काही भाग गाळण्यात आल्याचा उल्लेख नसला, तरी अधेमधे बराच भाग या भाषांतरात गाळलेला आहे. थोड्या अंदाजासाठी उदाहरणादाखल खाली रोमन लिपीत इंग्रजी परिच्छेद आणि त्यासोबत मराठी भाषांतरातला मजकूर असं तुलनेसाठी दिलं आहे. इंग्रजीतली गाळली गेलेली वाक्यं अधोरेखित केली आहेत.

'के.' या पात्राला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नाश्ता खायच्याऐवजी निराळ्याच लोकांना सामोरं जावं लागतं. त्याच्या खोलीत आलेले हे वॉर्डर त्याला अटक झाल्याचं सांगतात, अशी सुरुवात. दारावर ठकठक झाल्यावर एक माणूस आत येतो. तो 'के.'च्या ओळखीचा नसतो. यासंबंधी इंग्रजी आवृत्तीतला मजकूर असा:
"Instantly there was a knock at the door and a man he had never before seen in the house came in. He was slim but solidly built, he wore a close-fitting black suit which was provided, in the manner of travelling outfits, with various pleats, pockets, buckles, buttons and a belt, and which consequently seemed eminently practical, though one could not be quite sure what its purpose was. 'Who are you? asked K'". 
या मजकुराचं मराठीत येताना असं झालं आहे:
"तत्क्षणी दरवाजावर ठकठक झालं आणि एक माणूस आत आला. त्याला के.नं यापूर्वी कधी पाहिलेलं नव्हतं. त्यानं काळा सूट घातला होता. झटकन बिछान्यावरून उठून बसत के.नं विचारलं, "कोण तू?"" (पान ११३)

नंतर, के.चा नाइटगाउन वगैरे हे वॉर्डर लोक तपासतात. आता त्याला दुसरे कपडे वापरावे लागतील, त्याचे मूळचे कपडे आपण ताब्यात घेऊ, मग खटला वगैरे जिंकला गेला तर हे सामान के.ला परत मिळेल, असं ही मंडळी के.ला सांगतात. या संदर्भातला मजकूर येताना इंग्रजीत एका वॉर्डराच्या पोटाचाही उल्लेख येतो:
"[...] the belly of the second warder- they could of course only be warders- bumped into him again and again in quite a friendly fashion, but when he looked up he saw that this fat body was out of keeping with the dry bony face, its prominent nose bent to one side, which was exchanging glances with the other warder over his head."  
हे वर्णन मराठी मजकुरात आलेलं नाही.

सकाळपासून आपल्यासोबत घडत असलेल्या घडामोडींचा अंदाज के.ला येत नसतो. मग त्याला वाटतं की, आज त्याचा तिसावा वाढदिवस म्हणून बँकेतल्या मित्रमंडळींनी आपली चेष्टा चालवली असावी. यासंबंधीचा इंग्रजीतला मजकूर असा:
"K. saw a very slight danger that people might say later he could not take a joke but, even though it had not been usual foe him to learn from experience, he now recalled certain incidents, not important in themselves, when, unlike his friends, he had deliberately set out to behave rashly without the slightest regard for possible consequences and had suffered as a result. This was not to happen again, not this time anyway; if this is just a bit of make-believe, he would go along with it." 
याला समांतर असलेला मराठी भाषांतरातला मजकूर असा:
"यात एक धोका के.ला जाणवला: त्याचे मित्र कदाचित म्हणतील की त्याला थट्टामस्करी कळतच नाही. अनुभवानं शिकण्याची सवय त्याला नव्हती. पण इतःपर ते घडू देता कामा नये. निदान या वेळी तरी." (पान ११४).

अशी अर्थातच आणखीही अनेक उदाहरणं पाहता येतील. यातल्या पहिल्या नि दुसऱ्या उदाहरणांमधे वर्णनं गाळली गेली आहेत. त्यासंबंधी आत्ता आपण काही नोंदवूया नको. पण यातला खासकरून पहिल्या उदाहरणातला तपशील कादंबरीच्या एका धाग्यासाठी महत्त्वाचा आहे, तो असा: "which consequently seemed eminently practical, though one could not be quite sure what its purpose was." प्रॅक्टिकल असेलही पण त्याचं पर्पज काय ते कळेना, हे काफ्काच्या गोष्टीसाठी आधाराचं सूत्र आहे. त्यानंतर तिसऱ्या उदाहरणात आलेला 'if this is just a bit of make-believe, he would go along with it' हा उल्लेखही असाच कादंबरीचा महत्त्वाचा धागा आहे असं वाटलं. हे सोंग असेल तरी त्यात सहभागी व्हायचं के.नं ठरवलं, हे खास काफ्काच्या जगातलं म्हणणं आहे. असे काही महत्त्वाचे धागेच काढल्यानं मराठीत ही कादंबरी उसवलेली गेलेय, असं वाटलं.

'थोडाबहुत काफ्का' हे पुस्तक एकूण २५९ पानांचं (छायाचित्रांची वगैरे सोळाएक पानं वेगळी जास्तीची) आहे. 'नवी क्षितिजे प्रकाशना'नं १९९३ साली काढलेलं पुस्तक २०० रुपयांना आहे. साधारण तेवीस वर्षांपूर्वीच्या हिशेबानं पाहिलं तर पानांच्या तुलनेत किंमत जास्त वाटू शकेल. पुस्तकाचा साधारण नकाशा असा: दोन पानांवर पसरलेला एकोणिसाव्या शतकातल्या प्रागचा नकाशा, त्यानंतर दोन पानांवर पसरलेला काफ्काच्या वंशावळीचा तक्ता, त्यानंतर फ्रान्झ काफ्काची, त्याच्या घरच्यांची, त्याच्या इतर काही जवळच्या व्यक्तींची, आणि त्याच्या जवळच्या रस्त्यांची व ठिकाणांची छायाचित्रं- असा भाग पुस्तकाच्या सुरुवातीला आहे. त्यानंतर 'जडणघडणीची वर्षं' (पान १ ते ४२), 'निमित्तमात्र फेलिस' (पान ४३-१११) आणि 'द ट्रायल' (पान ११२-२३५) हे पुस्तकाचे तीन मुख्य भाग येतात.

हा मजकूर वाचनीय पद्धतीनं लिहिलेला आहे. काफ्काचं चरित्र, त्याचं फेलिससोबतचं नातं, आणि साहजिकपणे त्या नात्यातून नि काफ्काच्या मनस्थितीतून 'ट्रायल'चं लेखन झालं, इत्यादी तपशील एकमेकांना जोडून या पुस्तकात दिला आहे. कादंबरीचा मजकूर असलेला भाग झाल्यावर परिशिष्टं आहेत, ती अशी: एक- 'बिफोर द लॉ' : काही टिपणं, दोन- चरित्रपट, तीन- कथा-कादंबऱ्यांची मूळ जर्मन शीर्षकं, चार- प्रकाशित साहित्य.

यातलं 'बिफोर द लॉ: काही टिपणं' हे पहिलं परिशिष्ट विश्वास पाटील यांनी लिहिलेलं आहे. हे विश्वास पाटील म्हणजे 'नवी क्षितिजे' नावाचं त्रैमासिक चालवलेले, नित्शे, मार्क्स, फ्रॉइड इत्यादींवर पुस्तकं लिहिलेले. साधारण इतरांच्या लेखनातील उल्लेखांवरून कळतं त्यानुसार बरंच वाचलेले आणि बरीच पुस्तकं राखून असलेले हे गृहस्थ होते. त्यांची नित्शे व मार्क्स यांच्यावरची पुस्तकं रेघेला तितकीशी भावली नाहीत. त्यामधेही क्वचित काही निरीक्षणं व मतं रोचक होती, पण संदर्भांचा अभाव वाटला. त्यामुळं एखाद्या निरीक्षणाबद्दल, आशयाबद्दल शंका पडली, तर शोधायला काहीच मार्ग दिसत नाही. पण हा आपला विषय नाही, आणि आपण काही यात खोदकामही केलेलं नाही, त्यामुळं हे आपल्या मर्यादेवर सोडून पुढं जाऊ.

'थोडाबहुत काफ्का' हे लक्ष वेधून घेणारं पुस्तक वाटलं. चरित्राच्या भागात लिहिलेला मजकूर वाचनीय वाटला. काफ्काशी प्राथमिक ओळख करून देणारं हे पुस्तक आहे. 'द ट्रायल'च्या भाषांतराबद्दल काय वाटलं ते आधी लिहिलं आहेच. पुस्तकाच्या नावातंच 'थोडंबहुत' असणं नोंदवलेलं असल्यानं हे संक्षिप्त भाषांतर केलेलं असावं. पण तशी नोंद पुस्तकात स्पष्टपणे केलेली नाही. शिवाय, हे संक्षिप्त असलं तरी खूप जास्त संक्षिप्तही नाहीये, त्यामुळं पूर्णच भाषांतर असावं, असं वाटण्याची शक्यता वाढते. मधेमधे काही भाग कमी करण्यात आलेले आहे, त्यासंबंधीची तीन उदाहरणं आपण नोंदवली आहेत. बाकी, चरित्रातील लेखनासंबंधीचे संदर्भ दिलेले नाहीत, पण त्याचीही सूचना करणाऱ्या (तुकारामांच्या अभंगातल्या) ओळी पुस्तकाच्या सुरुवातीला नोंदवलेल्या आहेत:
फोडिलें भांडार धन्याचा हा माल।
मी तंव हमाल भारवाही।।

प्रत्येक मालाचा मूळ भांडारातील तपशील देणं शक्य नसलं, तरी साधारण कुठकुठली भांडारं धुंडाळली ते नोंदवलं तर बाकीच्या हमालांना काही आधार मिळतो, शिवाय आपल्या भारवाहीपणात काही कमी-जास्त राहिलं असेल तर ते पुढच्या हमालांना तपासता येतं, असं वाटलं.

याबाबतीत एक मुद्दा नोंदवायला हवा. केवळ व्यावसायिक हिशेबानं निघणारी काही पुस्तकं भाषांतराच्या वेळीच संक्षिप्त करण्यासंबंधीची सूचना प्रकाशकच भाषांतरकाराला करण्याची शक्यता असते, असं एक रेघेला लक्षात आलेलं आहे. काही वेळा ही मंडळी संक्षिप्तपणाचा उल्लेख करतात, काही वेळा करत नाहीत. काही वेळा संपादक व्यक्ती स्वतःच्या मनानुसार काही बदल करते, तेव्हा अशा काही उल्लेखांची जबाबदारी आपल्यावर असते हे संपादकीय भान ती व्यक्ती ठेवतही नाही. काही वेळा उल्लेख करणार असल्याचं आधी म्हणतात, नंतर तसा उल्लेख केलेला नसतो. इत्यादी अनेक मुद्दे बाजाराचे म्हणून असतात. हेही काही बरोबर नाहीच, पण 'थोडाबहुत काफ्का' हे तसं व्यावसायिक हेतूला प्राधान्य देणारं पुस्तक दिसत नाही. त्यामुळं खरंतर त्यातले उल्लेख अधिक मोकळेपणानं करणं जास्त शक्य असायला हवं, असं वाटतं.

दरम्यान, या शकु. नी कनयाळकर या बाईंचा म्हणजे हे टोपणनाव कोणी घेतलं याचा शोध घ्यावा, असंही वाटलं. आपण नोंदवलेल्या शंका त्यांना विचारता आल्या असत्या. म्हणून काही शोधाशोध नेटवर करू पाहिली. 'नवी क्षितिजे' व 'विश्वास पाटील' ही नावं शोध घेण्यासाठी सोईची होती. विश्वास पाटील वारल्यावर त्यांच्याबद्दल 'लोकसत्ता' या वर्तमानपत्रात आलेला एक लेख या शोधात सापडला. 'विश्वास पाटील: ज्येष्ठ अभ्यासक, अभिजात वाचक' अशा शीर्षकाचा हा लेख होता. हा लेख लिहिलेले हरिश्चंद्र थोरात यांच्याकडं यासंबंधी माहिती असेल, असं वाटलं. म्हणून मग त्यांचा ई-मेल पत्ता मिळवून त्यांना या 'थोडाबहुत काफ्का'बद्दल विचारणा केली. तर, यासंबंधीची माहिती प्रदीप कर्णिक यांना असू शकेल, असं त्यांनी सुचवलं आणि कर्णिक यांचा संपर्क दिला. कर्णिक यांना ई-मेलद्वारे विचारणा केली, तर जया दडकर यांनी हे पुस्तक लिहिल्याचं कर्णिक म्हणाले. दडकरांची काही पुस्तकं मौज प्रकाशनानं काढलेली आहेत, त्यामुळं त्यांच्या ऑफिसात फोन केला, एक वाचक असल्याचं सांगितलं, आणि दडकरांचा नंबर मागितला. नंबर मिळाला. दडकर यांच्या एका कामाचा उपयोग आपण 'श्री. दा. पानवलकर' यांच्यासंबंधीच्या कात्रणवहीसाठी मोठ्या प्रमाणात केला होता. पण तेव्हा परवानगीसाठी त्या भांडाराच्या प्रकाशकांची फोनवरून परवानगी घेतली होती. तेव्हा दडकरांचा संपर्क मिळाला नव्हता. तो वेगळा विषय झाला. आता  रेघेनं दडकर यांना फोन करून 'थोडाबहुत काफ्का'संबंधी विचारलं. तर हे पुस्तक आपणच 'शकु. नी कनयाळकर' या टोपणनावानं लिहिल्याचं दडकरांनीही सांगितलं. पुस्तकात 'द ट्रायल' कादंबरीचं संक्षिप्त भाषांतर देण्याबद्दल त्यांना विचारलं तर ते म्हणाले, 'ते प्रचंड मोठं होत होतं. आधीच मराठीत वाचक कमी.. त्यात असलेले कमी वाचतात'. विविध कारणांमुळं फोनवर याहून जास्त बोलणं होऊ शकलं नाही. 'शकु नी. कनयाळकर' या नावाचे संदर्भ काय, हेही आपण विचारलं. पण सहजच हे टोपणनाव घेतलं, एवढंच दडकर म्हणाले. या शोधामधे संबंधित व्यक्तींनी रेघेशी परिचय नसतानाही मदत केल्याबद्दल आभार. हे गेल्या वर्षी जूनमधे घडलं होतं, पण विविध कारणांमुळं नोंद थोडी उशिरा होते आहे.

शेवटी दोनच मुद्दे: एक, या पुस्तकाची नवीन आवृत्ती कोणाला काढावी वाटली, तर चांगलं होईल. फक्त त्यात सुरुवातीला 'द ट्रायल'चं भाषांतर संक्षिप्त स्वरूपात असल्याचं नोंदवता येईल. योग्य वाटलं तर. दोन, 'निवडक काफ्का' असं एक लहानसं पुस्तक (संपादन-अनुवाद- नीती बडवे) साहित्य अकादमीनं काढलेलं आहे. त्यात काफ्काचे काही वेचे, गोष्टी, 'वडिलांना पत्र' इत्यादी मजकूर आणि त्याची काही चरित्रात्मक माहिती आहे. शिवाय, त्र्यं.वि. सरदेशमुखांनी 'काफ्काशी संवाद' (पद्मगंधा प्रकाशन) असं गुस्ताव यानुशच्या बारक्याशा पुस्तकाचं भाषांतर केलं आहे. शिवाय, काफ्काच्या कादंबऱ्यांची किंवा त्यावर आधारीत नाट्यरूपांतरंही असल्याचं दिसतं. पण 'थोडाबहुत काफ्का'इतकं तपशिलातलं काफ्काविषयीचं पुस्तक मराठीत बहुधा नाहीये. असेल तर रेघेच्या मर्यादित माहितीमधे ते दिसलेलं नाही.

Monday, 6 March 2017

लालसू नोगोटी यांची मुलाखत

अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गडचिरोली जिल्हापरिषदेत सदस्य म्हणून निवडून गेलेल्यांमध्ये सैनू गोटा व लालसू नोगोटी या खास उमेदवारांचाही समावेश आहे. यांचं वैशिष्ट्य काय, तर हे थेट ग्रामसभांनीच उभे केलेले उमेदवार होते. म्हणजे त्यांना कोणत्याही पक्षानं उमेदवारी दिलेली नव्हती, किंवा तसे ते सुटे अपक्ष उमेदवार म्हणूनही उभे नव्हते. ते ग्रामसभांचे प्रतिनिधी म्हणून (अपक्ष) निवडणूक लढत होते. यातील नोगोटी यांचा आरेवाडा-नेलगुंडा मतदारसंघातून विजय झाला, तर गोटा यांनी गट्टा-पुरसलगोंदी या मतदारसंघातून विजय मिळवला. राष्ट्र-राज्य अशा विविध पातळ्यांवर चाललेल्या घडामोडी व चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही घटना लक्षणीय आहे. खासकरून गडचिरोलीतल्या प्रस्तावित खाणप्रकल्पांना होणाऱ्या विरोधातून ग्रामसभांनी उमेदवार उभे करण्यासाठी पुढाकार घेतलेला असला, तरी या सर्व घटनांमागं आणखीही काही अर्थ असतातच. या पार्श्वभूमीवर लालसू नोगोटी यांच्याशी रेघेनं फोनवरून संवाद साधला. (प्रभू राजगडकर यांनी संपर्कासाठी मदत केली). चार मार्च २०१७ रोजी नोगोटी यांची रेघेनं फोनवरून घेतलेली मुलाखत पुढं दिली आहे. यात अर्थातच आणखी विविध प्रश्न व उत्तरं यायला हवीत, अनेक मुद्द्यांवर आणखी चर्चा व्हायला हवी. स्थानिकांचं आणखी म्हणणं मोठ्या प्रमाणात नोंदवलं जायला हवं. सध्या, प्राथमिक पार्श्वभूमीसाठी ‘गडचिरोली वार्ता’ या संकेतस्थळावरचा ‘मूठभर तांदूळ आणि २० रुपये मागून ‘ते’ जिंकले जिल्हापरिषदेची निवडणूक!’ हा वार्तालेख वाचता येईल. आपण यापूर्वी आपल्या मर्यादेमधे प्रत्यक्ष दिसलेल्या गोष्टींच्या काही नोंदी रेघेवर केलेल्या आहेत, त्यातली 'भारतीय प्रजासत्ताकाची बस व ‘पेसा’' (२६ जानेवारी २०१६) ही नोंद या संदर्भात सवडीनुसार वाचता येईल. आणि ९ ऑगस्ट २०१५ रोजी केलेली 'आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस । एक प्रसिद्धी-पत्रक' ही नोंदही चाळता येईल. याशिवायही काही आसपासच्या नोंदी आहेत, त्या सगळ्या नोंदींच्या पार्श्वभूमीवर आता नोगोटी यांची मुलाखत नोंदवूया. 
 *
लालसू नोगोटी
लालसू नोगोटी यांनी दहावीपर्यंत हेमलकशामधील लोकबिरादरी प्रकल्पाच्या शाळेत शिक्षण घेतलं, त्यानंतर बारावीपर्यंत वरोऱ्यातील आनंदवन इथं ते शिकले. नंतर, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी मराठी विषयामधे बी.ए. केलं. पुढं आय.एल.एस. लॉ कॉलेजात कायद्याची पदवी घेतली. दरम्यान, टिळक महाराष्ट्र विद्यापिठातून पत्रकारितेचं पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षणही घेतलं. शिवाय, त्यांनी समाजशास्त्रातही एम.ए. केलेलं आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठानं फिलिपाइन्स इथं २०११ साली घेतलेला मानवाधिकारासंबंधीचा एक आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम त्यांनी केलेला आहे. आणि अलीकडेच संयुक्त राष्ट्रांतर्फे आदिवासी तरुणांकरिता दिल्या जाणाऱ्या अभ्यासवृत्तीसाठी त्यांची निवड झाली असून जून-जुलै २०१७मध्ये ते यासाठी जीनिव्हालाही जाणार आहेत. छत्तीस वर्षांचे नोगोटी भामरागडमधील जुव्वी या त्यांच्या मूळ गावी राहतात.
 *
प्रश्न: ‘लोकशाही’ या शब्दाबद्दल तुम्हाला काय वाटतं?
नोगोटी: लोकांनी, लोकांसाठी, लोकांच्या वतीनं वगैरे व्याख्या लोकशाहीसाठी दिल्या जातात. सर्व मोठमोठे पक्ष, त्यांचे उमेदवार हे सतत लोकांसोबत नसतात. लोकांच्या समस्या त्यांच्यासोबत समजून घेण्याचं काम हे नेते करत नाहीत. हे नेते काय निर्णय घेतात, काय काम करतात, हे लोकांना माहिती नसतं, प्रत्यक्ष त्याचं काम लोकांना माहीत नसतं. पण आपला प्रतिनिधी- ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतचा प्रतिनिधी- काय काम करतोय, हे माहीत असलं पाहिजे. नाहीतर नेते तिकडे काहीतरी निर्णय घेतात, आमच्याविरोधातले कायदेही करतात, पण ते इथल्या लोकांना माहिती देऊन केलेलं नसतं. मोठ्या पक्षांचे उमेदवार हे लोकांचे प्रतिनिधी असण्यापेक्षा पक्षांचेच प्रतिनिधी उरतात. निवडून आल्यावरही नेत्यांवर लोकांचं नियंत्रण असायला हवं. आमच्यावर आता ग्रामसभांचं असं नियंत्रण असेल. ग्रामसभांसोबतच्या संवादातूनच आम्ही निर्णय घेऊ.

प्रश्न: ‘विकास’ या शब्दाविषयी तुम्हाला काय वाटतं?
नोगोटी: विकास म्हणजे रस्ते आले पाहिजेत, घरात टीव्ही आला पाहिजे, असं नाही. मी माडिया आहे, माडियात मला व्यवस्थित बोलता येतं, मी तुमच्याशी बोलतोय ही माझ्यासाठी फॉरेन लँग्वेज आहे. माझे विचार मी माडिया भाषेत व्यवस्थित सांगून शकेन, तरीही मी भामरागडच्या चौकात मराठीत बोललो, तर मी विकसित झालो असं लोक म्हणतील. इंग्रजीत बोललो तर विकसित झालं असं बोलतील. म्हणजे माडिया विसरलो की विकास झाला, असं लोक म्हणतील. पण विकास म्हणजे काय? विकास म्हणजे आपल्या आजूबाजूच्या नैसर्गिक संसाधनांमधून समृद्धता आली पाहिजे. संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टींमधून ही समृद्धता आली पाहिजे. प्रॉपर्टी म्हणजे पैसा, अशी आमची संकल्पना नाही. घरासमोर दोन ताडीचे झाड पाहिजे, बैल-बकरी पाहिजे, अशी इथल्या लोकांची प्रॉपर्टीची संकल्पना आहे. रस्ता आली की माणूस विकसित होतो असं नाहीये. विकासाची संकल्पना त्याही पुढं जाऊन पाहिली पाहिजे. विचाराचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. स्वतःचं मत काय, आत्ताची आपली गरज काय, हे सगळं व्यक्त करता आलं पाहिजे. आमच्या इथं ‘गोटूल’ (विविध सामूहिक चर्चा-कार्यक्रमांसाठी नेमलेली एक खुली जागा) असतं, तर सरकार काय करतं, विकासाच्या नावाखाली या गोटुलला चार भिंती न् स्लॅब टाकून बंदीस्त करून टाकतं, खुर्चीत बसून बोला, वगैरे सांगतात. पण गोटूल हे एक ‘डेमोक्रॅटिक कम्युनिकेशन सेंटर’ आहे असं मी म्हणतो. तिथं अनौपचारिकपणे लोक बोलतात. ही अनौपचारिकता घालवण्याला विकास म्हणता येणार नाही.

प्रश्न: ‘संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टींमधून समृद्धता आली पाहिजे’, असं तुम्ही म्हणालात. बाहेरची संस्कृती व आपली संस्कृती यांच्यातला संघर्ष आणि उतरंड, हा मुद्दा आपण बोललो. अशा वेळी आपल्याच संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टींसोबत येणाऱ्या वाईट वाटणाऱ्या गोष्टींशी कशा प्रकारे वाटाघाटी कराव्यात, असं तुम्हाला वाटतं?
नोगोटी: काही उदाहरणं सांगतो. आमच्याकडं हुंडापद्धती नाही. मुलगी जन्मली की तिच्यामुळं आपले संबंध वाढतात, अशा विचारानं लोक आनंदी होतात. पण त्याच वेळी मासिक पाळीच्या वेळी बायकांनी घराबाहेर निराळ्या जागेत राहायची पद्धत आमच्याकडे आहे. यातून काही समस्या निर्माण होतात. दोनच दिवसांपूर्वी झालेली एक घटना सांगतो. नेलगुंडा गावातल्या शाळेमधे एक शिक्षिका मासिक पाळीच्या वेळीही शाळेत येते, यावर काही गावकऱ्यांनी आक्षेप घेतला. ही बाई मासिक पाळीच्या वेळीही शाळेत येत असल्यानं गावात रोगराई पसरते, असं काही लोक बोलत होते. दरम्यान, निवडणुकीतला आमचा विजय लोक स्वतःहून साजरा करत होते, पक्षांचे उमेदवार निवडून आल्यावर पैसे खर्च करून, फटाके फोडून उत्सव केला जातो. इथं आमच्या विजयावर लोक स्वतःहून गावागावांमधून आनंद व्यक्त करत होते, ढोल वाजवत होते, गोटूलमधे नाचत होते. अशा वातावरणात मी नेलगुंडामधे गेलो तेव्हा तिथल्या लोकांशी शाळेतल्या शिक्षिकेच्या मुद्द्यावर बोललो. त्यावर गावातल्या पुजारी व्यक्तीनं यासंबंधी तक्रार केल्याचं या लोकांनी सांगितलं. पण आता यासंबंधी आपल्याला आडमुठं राहून चालणार नाही, मासिकपाळीसाठी सुट्टीची तरतूद नसते, त्यामुळं त्या शिक्षिकेला शाळेत यावंच लागेल, तिला येऊ द्यायला हवं, असं मी त्यांना समजावलं. त्यांनाही ते पटलं. अशा पद्धतीनं हा मुद्दा सुटला. असे इतरही अनेक लहान-मोठे मुद्दे आदिवासी समाजांतर्गत सोडवले जायला हवेत. यावरही आम्ही विचार करतो आहोतच. बदलत्या युगामधे काही गोष्टी बदलायला हव्यातच. फक्त सगळं कोलॅप्स न करता काय करता येईल, असा विचार मी करत असतो.

प्रश्न: सीजी-नेट-स्वरा या मोबाइल रेडियोचा प्रयोग करणाऱ्या संकेतस्थळाशी तुम्ही जोडलेले होतात, त्या संदर्भाला धरून एकूण प्रसारमाध्यमांच्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं?
नोगोटी: लॉ करत असताना मी पत्रकारितेचा डिप्लोमा, नंतर बीजे (बॅचलर ऑफ जर्नलिझम), एमजे (मास्टर ऑफ जर्नलिझम) हेही अभ्यासक्रम केले. त्यामागं माझे हेतू हेच होते. आदिवासी किंवा एकूणच ग्रामीण समाज हा शहरी समाजापेक्षा संख्येनं मोठा आहे. पण गावातल्या लोकांबद्दल खूप कमी लिहिलं जातं. अजिबात नाही असं नाही. पण खूपच कमी माहिती दिली जाते. त्यातही आदिवासी भाषा, संस्कृती याबद्दल शहरी अँगलनी लिहिलेलं असतं. ज्या व्यक्तीची समस्या आहे, प्रश्न आहेत, ती व्यक्ती स्वतः कधीच बोलताना दिसत नाही, ती व्यक्ती लिहीत नाही, ती बोलतच नाही. टीव्ही वगैरेमुळं पीडीत व्यक्तीचं म्हणणं थोडंथोडं येतं. पण भामरागडबद्दल किंवा जुव्वीमध्ये घडलेल्या घटनेबद्दल लिहिणारा गडचिरोलीत किंवा दुसऱ्या शहरात बसलेला असतो. त्याला स्थानिक माहिती नसते. नक्षलवादींनी इतक्यांना मारलं आणि पोलिसांनी इतक्यांना मारलं, एवढेच आकडे तो पत्रकार लिहितो. पण या पाठीमागं खूप अर्थ असतात. ते कधीच बोलले जात नाहीत.

प्रश्न: हे हिंसेच्या आकडेवारीमागचे अर्थ काय असतात, असं तुम्हाला वाटतं?
नोगोटी: पोलीस लोक काय करतात, नक्षलवाद्यांना जेवण देता म्हणून बेकायदेशीर अटक करतात, मारतात, अत्याचार करतात. खाणप्रकल्पांना विरोध केला तरी नक्षलसमर्थक म्हणून शिक्का मारतात. इथली परिस्थिती वेगळी असते. बाहेरून येणारे तरुण पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) किंवा दुसरे अधिकारी यांना आदिवासी संस्कृतीची, इथल्या गरजांची माहिती नसते. आम्ही पंडुमसाठी (एक प्रकारचा उत्सव) जंगलात जेवण बनवत असलो, तरी नक्षलवाद्यांसाठी जेवण बनवत असल्याचा आरोप करून ते ताब्यात घेतात. शिवाय, इथं परिस्थिती वेगळी असते. इथं राहणाऱ्या व्यक्तीसमोर काही पर्याय नसतो. इकडंही बंदूक आहे आणि तिकडंही बंदूक असते.

प्रश्न: आता जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणार आहात?
नोगोटी: पेसा कायदा, वनाधिकार कायदा यातून ग्रामसभांना त्यांच्या नैसर्गिक संसाधनांवरचा मालकीहक्क दिलेला आहे. हा संपूर्ण एरिया- भामरागड, एटापल्ली, कोरची, धानोरा, हा बराचसा अनटच्ड आहे. इथं खनिजं आहेत, जंगल आहे. लोकांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. जंगलाशिवाय हा समाज जिवंत राहू शकणार नाही. यांची संपूर्ण संस्कृती निसर्गपूजक आहे. दगड, नदी, नाले, अशा अनेक गोष्टी, जिथं पाणी आहे, अशा गोष्टींना हे लोक पूजतात. या स्त्रोतांमधून आपण जिवंत आहोत. यामुळंच आपण जिवंत आहोत. त्यामुळं हे त्यांना पूजतात. अशा परिस्थितीत सरकार विकासाच्या नावाखाली जंगल, पहाडी इथं खाणप्रकल्प मंजूर करतं. पंचवीसहून जास्त प्रकल्प या ठिकाणी प्रस्तावित आहेत. ग्रामसभांच्या माध्यमातून लोक याला विरोध करत आहेत. आता न्यायालयात याचिका टाकण्याचाही आमचा विचार आहे. या शिवाय, इथल्या शाळांमधले शिक्षक चाळीस हजार रुपये पगार घेतात पण शाळेत येत नाहीत. आरोग्यसेवेचाही प्रश्न आहे. याचसोबत धानाची विक्री ग्रामसभांच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. या प्रश्नांबद्दल आम्ही जिल्हापरिषदेच्या सभागृहात आवाज उठवू.
 *

लालसू नोगोटी
(दोन्ही फोटो पुरवल्याबद्दल नोगोटी यांचे आभार. पहिला फोटो रेघेवर सोईसाठी थोडा कापला आहे).