Friday, 17 July 2020

मेड इन इंडिया : 'काया वाच्या मनाचा अस्सल टाहो'

पुरुषोत्तम बोरकर यांचं १७ जुलै २०१९ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात सुटाळा इथे निधन झालं. आज १७ जुलै २०२०. थोडी त्यांच्याबद्दल आणि बरीचशी त्यांच्या 'मेड इन इंडिया' या कादंबरीबद्दल बोलू पाहणारी ही नोंद.

१. मृत्यूनंतर छापून आलेल्या मजकुरांबद्दल
    "वऱ्हाडी भाषेला लोकप्रिय करण्यात योगदान देणाऱ्या वैदर्भियांमध्ये पुरुषोत्तम बोरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आपल्या विनोदी लेखनासाठी साक्षात पुलंच्या कौतुकाची थाप मिळवून ‘पुलकित’ झालेला हा लेखक आपल्या मातीत राहात होता, हे अनेकांना त्यांच्या जाण्यानंतर कळावे हे दुर्दैवी आहे." 
बोरकर गेल्यानंतर 'महाराष्ट्र टाइम्स' या वर्तमानपत्रात (२० जुलै २०१९) रोजी प्रसिद्ध झालेल्या 'माणसं' सदरातल्या स्फुटामधली पहिली दोन वाक्यं वरती नोंदवली आहेत. या दुर्दैवी वाक्यांमधे अनेक खटकण्यासारख्या गोष्टी आहेत.
  • 'वऱ्हाडी भाषेला लोकप्रिय': वऱ्हाडी भाषा, निरनिराळ्या तऱ्हेच्या वऱ्हाडी भाषा किंवा बोली विदर्भात विविध ठिकाणी बोलल्या जातात, प्रत्यक्ष माणसं/लोक ती भाषा बोलतात. विदर्भाची एकूण लोकसंख्या, २०११च्या जनगणनेनुसार, दोन कोटींहून अधिक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे अठरा ते वीस टक्के लोकसंख्या विदर्भात राहते. त्यातले सगळेच काही वऱ्हाडी बोलणारे नसणार. शिवाय, त्या सगळ्यांची बोलण्याची भाषा काटेकोरपणे एकसारखी नसली, तरी ती 'वऱ्हाडी' मानली, तर एवढ्या लोकांच्या रोजच्या बोलण्यातल्या भाषेला 'लोकप्रिय करणं' म्हणजे काय? की, विदर्भाबाहेर लोकप्रिय केली, असा त्याचा अर्थ घ्यायचा? तसा असेल, तरी त्याचा आधार काय ते कळत नाही. मुळातच, मोठ्या समूहात रोजच्या वापरात असलेली, जिवंत, प्रवाही भाषा अलोकप्रिय असेल, या अप्रत्यक्ष पूर्वग्रहाशिवाय असं वाक्य लिहिता येईल का? 
  • 'आपल्या विनोदी लेखनासाठी साक्षात पुलंच्या कौतुकाची थाप मिळवून पुलकित': पुलकित या शब्दाचा अर्थ, रोमांच उठणं, असा शब्दकोशात दिलेला आहे. बोरकरांचं पुलंनी कौतुक केलं ही चांगली गोष्ट आहे, पण साक्षात पु. ल. देशपांडे यांनी मारलेली कौतुकाची थाप हा एक मोठा मानदंड मानणं, त्याने बोरकरांना 'पुलकित' व्हायला भाग पाडणं, हे कंटाळवाणं आहे. शिवाय, 'वऱ्हाडी लोकप्रिय केली', 'साक्षात पुलंनी थाप मारली', तरीही 'हा लेखक आपल्या मातीत राहात होता, हे अनेकांना त्यांच्या जाण्यानंतर कळलं', यातला विरोधाभासही यात दुर्लक्षित राहतो. पण यावर आता वेगळं बोलण्याची गरज नाही. आणि वर उल्लेख केलेल्या 'म.टा.'तल्या स्फुटामध्ये त्या दोन वाक्यांनंतर- म्हणजे '...हे दुर्दैवी आहे' यानंतर, म्हटलंय की, 'पण, ते वास्तव आहे.' तर हे असं वास्तव आहे. खुद्द बोरकरांचं महत्त्व त्यांच्या साहित्यावर जोखण्यापेक्षा कुठल्यातरी मानदंडाला त्यांच्याशी जोडूनच त्यांचा थोडाफार गौरव करण्याकडे कल दिसतो. 

वरती पु. ल. देशपांडे झाले. आता भालचंद्र नेमाडे.

२८ जुलै २०१९ रोजी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्येच आलेल्या 'गरसोळीकर' होऊन गेलेला लेखक या लेखामधला पुढील मजकूर पाहा:
सुजाण मराठी वाचक सातत्याने एका नायक/नायिकेच्या शोधात राहत आला आहे. मराठी भाषेत महत्त्वाच्या ठरलेल्या प्रत्येक कादंबरीकारानं या वाचकाला किमान एक नायक/नायिका दिलेली आहे. या नायक-नायिकेशी समकालीन पिढीने आपले एक प्रकारचे जैविक नाते त्या त्या काळात प्रस्थापित केल्याचे दिसते. हे नाते अतिशय टोकदार आणि संवेदनशील अशा प्रकारचे आहे. पण लक्षात कोण घेतो, रणांगण, गारंबीचा बापू, कोंडूरा, बनगरवाडी, धग, आनंदओवरी, पाचोळा, माणूस अशा अनेक कादंबऱ्यांतील नायक-नायिकेशी वाचकांचे हे नाते त्या त्या टप्प्यावर दिसते. हे नाते शुष्क, कोरडे, दगडी असे नसून त्यात एक प्रकारचे रसरशीतपण आहे. वाचक आणि कादंबरीचा नायक यांच्या संवादी नात्यांचा साठोत्तरी काळातील सर्वोच्च आविष्कार म्हणजे नेमाडेंच्या कोसलातला पांडुरंग सांगवीकर. 'पांडुरंगा'च्या पूर्वी एवढा गडद प्रभाव मराठी तरुण मनावर दुसऱ्या कोणत्या नायकाने पाडला नव्हता. त्याची टोकाची परात्मता ही या पिढीला आपली वाटत होती.
नेमाडेंचे साहित्य आणि त्याचा मराठी कादंबरीवरील प्रभाव हा सातत्याने चर्चेत राहत आलेला विषय आहे. साधारणपणे ऐंशी-नव्वदोत्तरी कालखंडात खेड्यापाड्यातून आलेले जे लेखक मोठ्या प्रमाणात लिहू-वाचू लागले, त्यांना इतर कोणत्याही लेखकांपेक्षा माडगूळकर, यादव, नेमाडे, उद्धव शेळके असे लेखक जवळचे वाटत होते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या कादंबरीतील पर्यावरण, पात्रे आणि लिहू लागलेल्या नव्या लेखकांचे जैविक पर्यावरण यात असणारे साधर्म्य. कोसलातल्या पांडुरंग सांगवीकरबद्दल जे घडले तेच किमान काही प्रमाणात कोणाबद्दल घडले याचा शोध जेव्हा आपण घेऊ जातो तेव्हा 'पंज्याबराव गरसोळीकर-पाटील' ह्या 'मेड इन इंडिया'तल्या नायकाशिवाय दुसरा नायक दिसत नाही. 'कोसलाचा पुढचा टप्पा म्हणून मेड इन इंडियाचा नायक पंज्याबराव हा आपल्या वाङ्मयीन संस्कृतीचा एक वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणून दीर्घकाळ गाजत राहील', ही शंकर सारडा यांची त्यावेळेची प्रतिक्रिया आजही तितकीच महत्त्वाची वाटावी, यातच या कादंबरीचे कालातीत असणे आहे. याचा संबंध बोरकरांनी किती कादंबऱ्या लिहिल्या याच्याशी नाही! 
यातही बरीच गुंतागुंत टाळल्यासारखं वाटतं. सुजाण मराठी वाचक खरोखरच सातत्याने एका नायक/नायिकेच्या शोधात राहत आले असतील, तर तेही दुर्दैवीच म्हणावं लागेल. साहित्यकृतीतून कोणत्या जाणिवा व्यक्त झाल्या, यापेक्षा त्यात ठळक नायक-नायिका असणं अपरिहार्यच असतं का? या प्रश्नाला सामोरं न जाणारं हे विधान आहे. तेही नेमाड्यांच्याच प्रभावातून आहे. नायककेंद्री कादंबरी, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे, ते त्यांचं असणं ठीक आहे, पण तो मूल्यमापनाचा निकष मानणं अवाजवी वाटतं. खुद्द नेमाड्यांच्या समीक्षेतही अशा नायककेंद्री असण्याला उठाव दिलेला असतो, हेही ठीक. पण ते त्यांना योग्य वाटतं, एवढाच त्यातला मुद्दा आहे. तो कालातीत निकष कसा होईल? शिवाय, 'मेड इन इंडिया'ला 'कोसला'च्या प्रभावाखाली असल्याचं मानणंही असंच अवाजवी वाटतं, त्याबद्दल आपण नोंदीच्या पुढच्या भागात बोलू. मराठीव्यतिरिक्त विविध भाषांमध्ये कोणी ना कोणी नायक असलेल्या कथा-कादंबऱ्या पूर्वीपासून लिहिल्या गेलेल्या आहेत, परात्मता आलेले नायक-नायिकाही विविध कथा-कादंबऱ्यांमधे सापडतील, पण असा दुसरा कोणी नायक (नायिका नव्हे) दिसला, की ती साहित्यकृती लगेच 'कोसला'शीच जोडणं हा आपल्या मर्यादेचा भाग आहे, त्यात कालातीत असं काहीच नाही. शिवाय, मध्यवर्ती पात्र / प्रोटॅगनिस्ट / नायक-नायिका असणं- तसं एकच पात्र असणं किंवा तशी साधारण समसमान ठळकपणाने अनेक पात्रं असणं, यात बऱ्याच छटा असू शकतात. काही पात्रं/नायक-नायिका प्रसिद्ध होतात, हे खरंच. पण सुजाण वाचक त्यांच्याच शोधात असेल का? असेल तर ते बरं आहे का? असे प्रश्न यात विचारात घेण्यासारखे वाटतात. आपण त्याबद्दलही नोंदीच्या पुढच्या भागात थोडं बोलू.

पु. ल. देशपांडे किंवा भालचंद्र नेमाडे यांच्यावरची ही नोंद नाही. त्यांना मराठी समाजात वेगवेगळे लोक मापदंड आणि मानदंड म्हणून वापरतात, त्यावरही इथे टिप्पणी करायला नको. हे असं कदाचित अपरिहार्यच असेल. 'मेड इन इंडिया' कादंबरीबाबतही कोणाला पु.ल. किंवा नेमाडे या अधिक लोकप्रिय असलेल्या लोकांचा उल्लेख गरजेचा वाटला, तर तो करावाही (आपणही नोंदीत आता तो करणार आहोत), पण तो सुसंगत हवा, असं वाटतं.  तुलना होणंही अपरिहार्य, पण त्याचे निकष काय ते खोलात पाहायला हवं. नाहीतर, नायक-नायिकेचं असणं, परात्मता येणं, अशा ढोबळ पातळ्यांवर ते उरेल. निव्वळ कोणीतरी अधिक मोठे किंवा लोकप्रिय झाले म्हणून त्यावर सगळं जोखत राहणं बरं नाही, असं वाटतं. किमान एखादा लेखक गेल्यावर तरी त्याच्या साहित्यकृतीचं मूल्यमापन एवढ्याच मर्यादित मापदंडांनी करणं बरं वाटत नाही. किंवा त्यात पुन्हा त्या मापदंडांच्या अवाजवी गौरवाला वाव देणं- म्हणजे साक्षात पुलंच्या कौतुकाची थाप मिळवून पुलकित झाले, असं म्हणणं किंवा 'कोसला'च्या नायकाबाबत जे घडलं तेच किमान काही प्रमाणात ज्याच्याबद्दल घडलं तो नायक म्हणून 'मेड इन इंडिया'तल्या गरसोळीकर पाटलाकडे बोट दाखवणं, आणि त्यातच 'मेड इन इंडिया'चं कालातीत असणं शोधणं, हेही दुर्दैवी वाटतं.

कोणतीही साहित्यकृती दिसली की ती मुळात कोणत्या मापाची आहे हे न बघता याच मर्यादित निकषांनुसार मोजत राहणं म्हणजे त्या संबंधित लेखक-व्यक्तीच्या संवेदनाला काहीच मान न देण्यासारखं वाटतं. शिवाय, मराठी साहित्यात मधले काही टप्पेच नाहीत, अशीही स्थिती त्यातून दिसते. कोणी म्हणेल, तसंच आहे- आम्ही म्हणतो तेच महान! तर तेही ठीकच. 

भालचंद्र नेमाड्यांच्याच एका भाषणातला (वेगळ्या संदर्भातला) लोककथेचा किस्सा सांगायचा तर: एका म्हातारीची बुगडी हरवली, तर ती झोपडीबाहेर प्रकाश होता तिथे शोधायला लागली. मग कोणीतरी तिला विचारलं, अगं म्हातारे, बुगडी हरवली कुठे नक्की. तर म्हातारी म्हणाली, झोपडीत हरवली. तर, दुसरी व्यक्ती म्हणते, मग झोपडीत शोध की. तर, म्हातारी म्हणते, झोपडीत अंधार आहे, इथे उजेडात दिसली तर बघते. [हे आठवणीतून नोंदवलं आहे, पण लोककथेच्या बाबतीत हे चालेल, असं वाटतं. लोकालोकांमधे बदलली तर बदलली कथा]

तर, हे असं होतं. उजेड आहे तिथेच सगळा शोध घेण्याकडे कल असतो. उजेड- किंवा भगभगाट कोणाचाही असू दे. आणि मग तिकडे अंधारात काय पडलंय तिकडे दिवा घेऊन जायला नको वाटतं. याचंच बोरकरांच्या संदर्भातलं आणखी एक दुर्दैवी उदाहरण नोंदवू:

देशोन्नती, बुलडाणा लाइव्ह- आरडीएक्स, २२ जुलै २०१९

वर दिलेला लेख 'देशोन्नती' या वर्तमानपत्राच्या बुलडाण्यातील स्थानिक पुरवणीत तिसऱ्या पानावर प्रकाशित झालेला आहे. त्यात सर्वांत वरती जांभळ्या अक्षरांत दिसतेय ती पुरुषोत्तम बोरकरांची कविता आहे, ती त्यांच्या निधनानंतर समाजमाध्यमांवरून काही चाहत्यांमध्ये पसरल्याचं दिसतं, इतरत्रही काही ठिकाणी ती दिसली. 'मेड इन इंडिया'मधे शेवटी पंजाब गरसोळीकर पाटील हे पात्र स्वतःच्या कल्पनेतल्या मरणाचं वर्णन करतो, त्यातला थोडा भाग वरच्या लेखात जसाच्या तसा नोंदवलाय, आणि हे वर्णन आता बोरकरांनाच लागू झाल्याचं दुसऱ्या रकानाच्या सुरुवातीला म्हटलंय. त्यानंतर दुसऱ्या रकान्यात खाली, 'महाराष्ट्र टाइम्स'मधलं वर उल्लेख झालेलं स्फुट जसंच्या तसं छापलेलं आहे. फक्त शेवटची दोन वाक्यं काढून बाकी प्रत्येक शब्द जसाच्या तसा. 'वऱ्हाडी भाषेला लोकप्रिय करणारे लेखक', 'पुलंच्या कौतुकाची थाप मिळवून पुलकित झालेले लेखक' हेही जसंच्या तसं. बोरकर मूळचे अकोल्याचे होते, नंतर गेला काही काळ ते बुलडाण्यातल्या खामगाव इथे राहत होते, तिथेच ते मरण पावले, आणि तिथल्याच स्थानिक पुरवणीत त्यांचं हे असं वर्णन होणं, यात बऱ्याच गोष्टी स्पष्ट होत असाव्यात असं वाटतं. बुलडाण्यातल्या बातमीदाराला तिथल्याच लेखकाबद्दल दोन रकान्यांचा मजकूर उभा करायलाही 'महाराष्ट्र टाइम्स'मधल्या दुर्दैवी मजकुराचा आधार घ्यावासा वाटला, त्यातली आपल्या परिसराबद्दलची/भाषेबद्दलची अजाणता अपमान करणारी वाक्यंही जशीच्या तशी छापावी वाटली (तेही स्वतःचं नाव आणि मोबाइल नंबर देऊन), हेही सगळं झालं. हेही कमी होतं म्हणून बहुधा, या वरच्या लेखाच्या खाली अगदी लागूनच चारेक कॉलमांची पुढील बातमी वाचायला मिळते:

देशोन्नती, बुलडाणा लाइव्ह-आरडीएक्स

पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त... खामगांव येथे स्टँड अप कॉमेडी स्पर्धेचे आयोजन
 - अशी ही बातमी आहे. त्यातही बातमी एवढी मोठी असली, तरी ती झालेल्या कार्यक्रमाची नाही, दोन दिवसांनी कार्यक्रम होणार असल्याची बातमी आहे. 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पू. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून राज्य शासनामार्फत पु.लं. जन्मशताब्दी निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमांतर्गत स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन राज्यात केले जाणार आहे. [...] मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. [...] सध्या तरुणाईत [स्टँड अप कॉमेडी] हा प्रकार अत्यंत लोकप्रिय होत आहे, याच धर्तीवर पु.लं.चे साहित्य अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित केली आहे'- असं बरंच काही या बातमीत लिहिलेलं आहे. वरच्या फोटोवर क्लिक केल्यावर बातमी मोठी करून वाचता येईल (अख्ख्या पानासाठी इथे पाहावं). यातून आता आपल्याला पुरेसा उलगडा होईल, असं वाटतं. सरकारला काय लोकप्रिय करायचंय, खामगावतच वारलेल्या लेखकाबद्दल कोणाला काय करायचंय (बोरकरांच्या निधनाबद्दल शोकसभा झाल्याची लहानशी बातमीही नंतर आली होती, पण त्याने वरच्या तपशिलाला काही बाधा पोचणार नाही), आपल्या परिसरातला लेखक वारल्यावरही आपण त्याबद्दल काय लिहितो, याचा अंदाज यावरून यावा.

२. पुरेशा उजेडात नसलेली 'मेड इन इंडिया'

पु. ल. देशपांडे 'मेड इन इंडिया' या कादंबरीबद्दल असं म्हणाले होते:
गेल्या कित्येक वर्षांत अशी हसविणारी आणि तितकीच अस्वस्थ, अंतर्मुख करणारी कादंबरी मी वाचली नव्हती. 'मेड इन इंडिया'तील विनोद हा अंतिम सत्याकडे नेणारा परिपक्व 'शॉर्टकट' आहे. आजच्या सुशिक्षित तरुणाची नेमकी शोकांतिका आणि विदारक कोंडी या कादंबरीतून अतिशय प्रगल्भपणे मांडली गेली आहे.
वऱ्हाडी बोलीबरोबरच काव्यात्म, वृत्तपत्रीय, राजकीय आणि चिंतनशील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेचा वापर या लेखनात अतिशय खुबीने केला गेला आहे. बोलीभाषा, ग्रांथिक मराठी, हिंदी, इंग्रजी यांच्या मिश्रणातून लेखकाने एक वेगळीच भाषा निर्मिली आहे. या रसायनाचा भाषातज्ज्ञांनी गांभीर्याने अभ्यास केला पाहिजे. कारण ही नव्या पिढीची भाषा आहे.
आधुनिक ग्रामीण-शहरी जीवनाचे एवढ्या समर्थपणे केलेले चित्रण मराठीत दुसरे नाही. मराठीत 'मैलाचा दगड' ठरावी अशी ताकद या कादंबरीत आहे. या कादंबरीने मला खूप हसविले आणि तितकेच डोळ्यांत पाणी यावे असे अस्वस्थही केले. मी मनात जपलेल्या मोजक्या पुस्तकांपैकी एक म्हणजे 'मेड इन इंडिया'!
यातला दुसरा परिच्छेद खरोखरच महत्त्वाचा आहे, आणि मराठीत भाषेचा इतका वैविध्यपूर्ण पट मांडणारं दुसरं पुस्तक नसावं. किमान ही नोंद लिहिणाऱ्या वाचनात तरी तसं पुस्तक आलेलं नाही. याचे दाखले नोंदवायचे तर सगळी कादंबरीच इथे नोंदवावी लागेल. भाषेचा वैविध्यपूर्ण पट असणं, एवढंच वैशिष्ट्य काही कादंबरीला सखोल करायला पुरेसं नाही, हे खरं. पण या कादंबरीत भाषेचा असा वापर असल्यामुळेच बहुधा ती फक्त एका नायकाची, एका पंजाबराव गरसोळीकर-पाटलाची कथा राहत नाही.

१९८१ साली 'अनुष्टुभ' द्वैमासिकाच्या लघुकादंबरी स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालेल्या रचनेला दीर्घरूप देऊन ही कादंबरी लिहिली गेल्याचा उल्लेख या पुस्तकात आहे. 'मेड इन इंडिया' कादंबरीची पहिली आवृत्ती १५ डिसेंबर १९८७ साली आली. १९८८-८९चा महाराष्ट शासनाचा राज्यपुरस्कार या कादंबरीला मिळाल्याचं दिसतं. इतरही दोनेक पुरस्कार आहेत. कादंबरीचं मुखपृष्ठ असं:

श्रीविद्या प्रकाशन, २००८ । मुखपृष्ठ: सुभाष अवचट

'मेड इन इंडिया' कादंबरीत तत्कालीन अनेक तपशील सहजपणे आलेले आहेत, हे खरं. पण केवळ त्या काळातले राजकीय नेते, क्रिकेटपटू, अभिनेते-अभिनेत्र्या, काही वस्तूंचे ब्रँड आणि टीव्ही-व्हिडिओ इत्यादींचा वाढलेला वावर- अशा चिन्हांपुरती ही कादंबरी मर्यादित नाही. त्यात अख्खं भारतीय गाव आहे, शहराशी घसट होऊन आलेलं पात्र आहे, विविध जाती-जमातींच्या परस्परसंबंधांचा पट आहे, अलीकडच्या काळात आत्महत्यांमुळे बातम्यांचा विषय होत राहणारी शेतकऱ्यांची समस्याही आहे- हा सगळा पट काही मर्यादित दृश्य तपशिलांच्या चौकटीत बसवणारं हे कव्हर कादंबरीवर अन्याय करतं, असं वाटतं. आपल्याकडे २००८ सालची, तिसरी आवृत्ती आहे. पहिल्या व दुसऱ्या आवृत्तीचं कव्हर वेगळं असण्याची शक्यता कमी आहे. आणि आता इथून पुढे मुद्दाम नवीन मुखपृष्ठ करून ही कादंबरी चांगल्या डीटीपीसह बाजारात येण्याची शक्यताही कमी वाटते. अलीकडे आलेली आवृत्ती जुन्याच डीटीपीसह, जुन्याच बांधणीसह, त्याच मुखपृष्ठासह, फक्त किंमत वाढवून आलेली आहे. कागदाचे वाढलेले दर, वाढलेले कर यांमुळे किंमत वाढली असेल. पण २००८ साली शंभर रुपयांना मिळणारं पुस्तक आता तीनशे रुपयांना विकायचं असेल, तर जाता-जाता त्यातलं डीटीपी कम्प्यूटरच्या मदतीने नव्याने सुबकपणे करून घेणं, इत्यादी गोष्टी काही अतोनात खर्चिक नाहीत. किंबहुना, किंमतीत हा बदल करताना, इतक्या कालांतराने नवीन आवृत्ती येत असताना, दरम्यानच्या काळात तंत्रज्ञानाने काही गोष्टी सहजपणे उपलब्ध करून दिलेल्या असताना, इतपत बदल करणं आवश्यक आणि व्यावसायिकदृष्ट्या बरं वाटतं. (पण मुळात श्रीविद्या प्रकाशनाने अशी साचेबद्ध नसलेली कादंबरी प्रकाशित केली, ही चांगलीच गोष्ट आहे). तर ही नोंद लिहिणाऱ्याला मुखपृष्ठ आवडलं नाही, म्हणून ते बदलावंच, असा आग्रह नाही. पण त्या काळी कादंबरी काढताना हे मुखपृष्ठ योग्य वाटलं असेलही समजा (खरं तर त्या काळाचा विचार केला तरीही अशा तपशिलांपुरता चेहरा कादंबरीला देणं अपुरं), तरी आता वाढीव किंमतीत थोडा खर्च नवीन मुखपृष्ठावरही करणं अव्यावहारिक नि अवाजवी, ठरलं नसतं. या कादंबरीवर आधीच उजेड कमी, तो अधिकाधिक कमी करत नेण्याची तजवीज अशा घटकांमुळे होते, असं वाटतं.

३. जाणिवा

"पुढे बसलो त धुरजळ, मांगे बसलो त उलाय अन मंधात बसलो त बैलबुजाळ; असा हा माहोल. अख्खी जिंदगी अधूनतथून मीजमाशी पळल्यावानी! माही अन ह्या गावाचीही" (पान १)- ही कादंबरीतली पहिली तीन वाक्यं आहेत. वऱ्हाडी भाषेशी, त्यातही ग्रामीण बोलीशी परिचय नसलेल्या व्यक्तीला हे समजून घेणं अवघड जाईल, त्यामुळे पुस्तकाशेवटी अशा काही शब्दांचे अर्थ दिले आहेत. त्यानुसार, 'धुरजळ' म्हणजे 'जूजड, बैलगाडीचा पुढील भाग जड होऊन जूवर दाब येणं'. 'उलाय' म्हणजे 'बैलगाडीच्या मागील भागी ओझं जास्त झाल्यामुळे समोरचा भाग वर जाणं'. आणि 'बैलबुजाळ' म्हणजे 'बैलांना बुजवणारा, घाबरविणारा'. समोर दाब नको, मागे ओझं नको, मधल्यामधेही बसलं तर बैल बुजतील- अशा सगळ्या विवंचनेला सामोरी जाणारी व्यक्ती आणि गाव यात आहे. अनेक बदलत्या जागतिक नि देशी संदर्भांनी निर्माण झालेले हे पेच आहेत. ते सगळे या वैशिष्ट्यपूर्ण शब्दांमधून आपल्यासमोर येतात. या भाषेशी परिचय नसलेल्या वाचकांना, शेवटी निवडक शब्दार्थांची यादी दिलेली असली तरी, कादंबरी वाचताना सुरुवातीला अडखळायला होऊ शकतं, हे खरं. पण थोडी पानं गेल्यानंतर त्यात वाचक रुळेल, असं वाटतं. काही शब्दांचे काटेकोर अर्थ कळले नाहीत, तरीही जाणीव समजण्याची शक्यता राहते. तर, बैलगाडीशी संबंधित हे तीन शब्द म्हणजे शेवटी काही जाणिवांना वाहून नेणाऱ्या खुणा असतात. तर इतक्या स्थानिक खुणांनाही ही कादंबरी बिनदिक्कतपणे, आत्मविश्वासाने जागा देते. आपण एवढ्या स्थानिक जाणिवा धरल्या, तर आपण जास्त लांबवर पोचणार नाही, अशी भीती लेखकाला वाटत नाही.

शिवाय, त्याला आपल्यासाठी स्थानिक नसलेल्या दुसऱ्या प्रदेशांमधल्या जाणिवांनाही सामोरं जायला काही भीती वाटत नाही. "कधी ना कधी आपण आठबारी रिव्हॉल्वर खरेदी करूच करू. अन सिन कॉनरीसारखं कमरीले लटकावून चले पटेल गावमे घुमने..." (पान १२४) असा तो 'वेस्टर्नपटां'नाही हात लावतो. आणखी एक उदाहरण: "मानसाले जे आवळते, ते कराले तो जवा प्रारंभ करते; तव्हाच त्याच्या अत्यंत बिकट अळीअळचनीलेही प्रारंभ होत असते- टी. यच. हक्सले" (पान १३०). बरेचदा सतत उजेडात नसलेल्या, सांस्कृतिक-आर्थिक राजधान्यांजवळ नसलेल्या तपशिलांचा वापर ढोबळ विनोदासाठी केला जातो, त्यात तसा विनोद नसतोच, फक्त आपले काही पूर्वग्रह तयार करून दिलेले असतात आणि त्यामुळे काही गोष्टी परस्परांशी कधीच संबंध न येणाऱ्या आहेत, असं आपोआपच आपल्याला वाटू लागलेलं असतं. उदाहरणार्थ, 'पीके'सारख्या एखाद्या हिंदी चित्रपटात परग्रहावरून पृथ्वीवर आलेला माणसासारखा प्राणी दाखवला असेल आणि तो पृथ्वीवरची एक भाषा आत्मसात करून त्यात बोलू लागतो, असं दाखवलं- तर त्यात तपशील म्हणून काही विनोद नाही. हिंदी चित्रपटातल्या या परग्रहवासी इसमाने आपल्या पृथ्वीवरची इंग्रजी किंवा मुख्यप्रवाही वापरातली हिंदी आत्मसात केली, तर त्यात काहीच विनोद नसेल. पण तो इसम भोजपुरीत बोलतोय, असं दाखवलं, की आपोआप मुख्यप्रवाही हिंदी चित्रपटांचे प्रेक्षक हसायला लागतात. प्रत्यक्ष संवादात विनोदी असं काहीच नसतं, फक्त परग्रहावरचा, प्रचंड प्रगत तंत्रज्ञानाचं प्रतीक असलेल्या यानातून आलेला माणसासारखा प्राणी- बहुधा त्या ग्रहावरचा खगोलशास्त्रज्ञही असेल असा इसम, एकदम भोजपुरीसारखी ग्रामीण बोली बोलतो, याला विनोद मानलं जातं. कारण, भोजपुरी बोलणारे या प्रगत ज्ञानाशी जोडलेले नाहीत, ते चारा घोटाळाच फक्त करत असतील, किंवा गुंडगिरी करत असतील, अशा प्रतिमा असतात, त्यांना त्या प्रदेशातल्या समस्यांचा आधार नसतोच असं नाही, पण प्रतिमा बटबटीतपणे आपल्या मनावर थोपवल्या जातात, मग विनोद होतो. तसं कदाचित 'मेड इन इंडिया' कादंबरीबाबत काहींचं होऊ शकेल. पण त्यातला विनोद असा नाही. त्यातल्या निवेदकाची स्वाभाविक-नैसर्गिक अभिव्यक्ती वऱ्हाडी, हिंदी, दख्खनी, इत्यादी विविध भाषांनी होणारी आहे. त्यात स्वाभाविकपणे टी. एच. हक्सले या इंग्रजी माणसाचं अवतरण नेहमीच्या बोलीतून येतं. दुर्दैवाने, आपल्याकडे विविध माध्यमांमधे, मंचांवर, आणि आता समाजमाध्यमांवर खुद्द त्या-त्या बोलीतले लोकही थोडसा ग्रामीण ढंग दिला की विनोद निर्माण होतो, या पूर्वग्रहाचा वापर करून मजकूर लिहिताना दिसतात. ढोबळ अर्थाने, ग्रामीण ढंगात लिहिणं, हाच विनोद असल्यासारखं ते होतं. काय लिहिलं, यावर ते ठरत नाही. पण 'मेड इन इंडिया'त तसं नाही. त्यातली वैविध्यपूर्ण भाषा आणि बोली विनोदही करताता आणि गंभीर जाणिवाही पेलून धरतात. आणखी एक उदाहरण: "डॉन क्विक्झोटची लक्तरं लपवून सॅन्को पांझासारखी खुशालीची गाजरं खाता खाता खत होने हा याईचा मोक्ष होय भाऊ पंज्याब!" (पान १३२-१३३). बैलगाडीसंदर्भात वर उदाहरण दिलं तितकं स्थानिकही याच भाषेत बोललं जातं आणि या वरच्या सिन कॉनरी किंवा टी. एच. हक्सले किंवा डॉन किहोते यासारखे खूप दूरच्या अंतरावरचे तपशीलही याच भाषेत जगण्याशी जोडून घेतले जातात. हे या कादंबरीचं बहुधा विलक्षण भाषिक काम आहे.

या कादंबरीतल्या भाषेचा अभ्यास तज्ज्ञांनी करायला हवा, हे खरंच आहे. आपण तज्ज्ञ नसल्यामुळे नुसती नोंद करतो आहोत. वरती स्थानिक जाणीव आणि दूर अंतरावरची जाणीव याचं उदाहरण दिलं. आता आणखी एक उदाहरण थोडंसं देऊ. कादंबरीचं मध्यवर्ती पात्र असलेला पंजाब रेडिओ ऐकतोय. यात त्याची आधीची नेहमीच्या बोलीतली अभिव्यक्ती आणि अचानक रेडिओवरून त्याला ऐकू आलेल्या तथाकथित प्रमाण मराठीतली अभिव्यक्ती- या दोन्ही अगदी सहजपणे मिसळतात:
...लावल्यावर स्टेशन लागलं. ट्रांजिस्टर मुंगाच्या पोत्यावर ठेवून पाय लंबे केले. अन् आयकू लागलो... सायाचं मंधातूनच लागलं वाटते!... कथा आहे की कविता लेक?... जे असनं ते असनं... आपल्याले आईकाले त मनाई नाही ना?...
...काळ जोवर डोळेझाक करतोय् तोवर जडवून घेऊ एकदुसऱ्याला भरभरून निखळपणे. आपण गृहीत धरलाय् तेव्हढा तो निष्ठुर नाहीय्. कारण त्याला ठाऊक आहे माझ्या आयुष्याची वाटणी- तुझ्याही. त्याला माहीत आहे माझे सढळ नाकर्तेपण अन तुझा अढळ विश्वास माझ्यावरचा... 
आपण एकमेकास न दिसू एवढं अपार अंतर अथवा दिसूनही न दिसायला लावणारी माणसांची अदृश्य भिंत. यालाच वाटणी म्हणायची का? आणि हे खरं आहे असं गृहीत धरलं तर हे किती खोटं? आतही तू कित्येक कोसांवरून अलगत येऊन माझ्यात विसावतेस नि तळहातावर जमू लागतात दवबिंदू, पापण्यांत ओल... त्याचं काय? (पान ६२)
असा हा, रेडिओवर वाचला गेलेला दीर्घकवितेसारखा मजकूर तीन पानं येतो. दैनंदिन नाद असलेली बोली, त्यातून मधेच काव्यात्म नाद असलेला मजकूर, अशी अफरातफर या कादंबरीत अगदी सहजपणे आहे. थोडी पुस्तकात येईल अशी काव्यात्म जाणीवही या कादंबरीसाठी अस्पृश्य नाही. पण थोडी पुस्तकात येईल अशी काव्यात्म जाणीव असतानाही सर्वसामान्य जगण्यातली बोलीही दुरावलेली नाही.

४. 'नायक'

भालचंद्र नेमाडे यांची चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली मुलाखत 'टीकास्वयंवर' (साकेत प्रकाशन, दुसरी आवृत्ती- २००१) या पुस्तकात आहे, त्यात ३४९-३५० पानावर पुढचं प्रश्नोत्तर येतं:
प्र: बिढारच्या पहिल्या भागात तुम्ही केलेला मराठी लघुनियतकालिकांच्या चळवळीचा ऊहापोह सहानुभूतिशून्य वाटतो. मला व्यक्तिशः हे अन्यायकारक वाटतं. तुम्हाला?
नेमाडे: मी लिहिताना माझा प्रोटॅगनिस्ट सोडल्यास कशाचाही सहानुभूतिपूर्वक विचार करत नाही. एकदा तुम्ही तुमच्या प्रोटॅगनिस्टला कादंबरीतील अवकाशाचा संदर्भ किंवा चौकट मानली की सगळे व्यवहार अतिशय तटस्थपणे पाहणं फारच आवश्यक असतं. लघुनियतकालिकांचं कार्य असामान्य आहे ह्या मताचा मी आहे, पण ह्या चळवळीच्या सगळ्या बाजू मांडतांना असं अन्यायकारक चित्र उभं राहिलं तर नाइलाज आहे. एवढंच की मी सांगितलेलं खोटं नाही.
'मेड इन इंडिया'च्या नायकाची तुलना काहींनी 'कोसला'शी केल्याचं आपण नोंदीत सुरुवातीला नमूद केलंय. पण हा पंजाब गरसोळीकर पाटील पांडुरंग सांगवीकरासारखा नाही, किंवा त्याहून महत्त्वाचं म्हणजे 'मेड इन इंडिया'मधे नायक / प्रोटॅगनिस्ट / मध्यवर्ती पात्र म्हणून पंजाब आला असला, तरी फक्त त्याच्या चौकटीचाच सहानुभूतिपूर्वक विचार या कादंबरीत नाही. म्हणूनच तीन-तीन पानं रेडियोवरची दीर्घकविताही त्यात येते- ही दीर्घकविता त्या नायकाची नसते, तिसऱ्याच कोणातरी अज्ञात व्यक्तीची रेडिओवर लागलेली- त्या तिसऱ्याच व्यक्तीच्या भाषेतली कविता, पण तिलाही इथे बराच मोठा वाव दिला जातो. असं नेमाड्यांच्या कादंबरीत होत नाही. ही मूलतः त्रुटीच आहे, असा दावा नाही. तर, नेमाड्यांची मतं ही त्यांच्या कादंबऱ्यांपुरती ठीक आहेत. पण इतरांनी मध्यवर्ती पात्राचा वापर तसा केला नसतानाही केवळ अविवाहित तरुण दिसला की त्याला 'कोसल्या'तच ढकलणं गैर वाटतं (पंजाबचं नंतर लग्न होतं, आणि तशाही काही गोष्टींचा ताण कादंबरीत आलेला आहे). शिवाय, नेमाड्यांचे सरधोपट शेरेही समीक्षेचे निकष मानले जाण्याइतकी परिस्थिती दिसते. तेही कंटाळवाणं आहे, त्यात आता नको जाऊया. मुद्दा एवढाच की, पंजाबची जाणीव, अभिव्यक्ती, समज, हे सगळंच वेगळं आहे. नेमाड्यांचा विद्यापीठीय अर्थाने बुद्धिमान, आक्रमक, नैतिक नायक इथे तसा सापडत नाही. नेमाड्यांचाही भाषेचा वापर सुंदर असतो, पण तो मुख्यत्वे विद्यापीठीय अर्थाने बुद्धिमान नायकाने किंवा निवेदकाने केलेला असतो. फक्त त्याचाच विचार सहानुभूतिपूर्वक केल्यामुळे तसं होतं का, हे वेगळं तपासावं लागेल. आणि ती त्यांची शैली म्हणून ठीकही आहे. त्यावर अनेक जण बोलत आलेले आहेत, बोलतील. पण 'मेड इन इंडिया'चा मुळातला पटच वेगळा आहे. त्यात अशा विद्यापीठीय बुद्धिमान व्यक्तीचा दृष्टिकोन स्वीकारलेला नाही. विविध कारणांनी गाव स्वीकारलेल्या एका व्यक्तीचा तो दृष्टिकोन आहे (या व्यक्तीने भौतिक अर्थाने गाव स्वीकारलेलं आहे, जाणिवेच्या स्तरावर तेवढीच भौतिक मर्यादा तिने ठेवलेली नाही). पंजाब गरसोळीकर-पाटलावरचा व्यावहारिक ताणही अधिक मोठा आहे, त्याला आसपासच्या पोकळपणाबद्दल भडकपणे, बहिर्मुखतेने फारसं बोलण्यात रस दिसत नाही किंवा त्याला तसं येत नाही, किंवा तो त्यापलीकडेच उभा आहे, त्याचं असं बोलणं मनातल्या मनात होतं. इतर पात्रांचं त्याच्याशी होणारं बोलणंही अनेकदा त्याच्या बोलण्यापेक्षा ठळकपणे येतं. या पंजाबला सोपा बुद्धिजीवीपणाही जवळचा वाटणार नाही, हे स्वाभाविक आहे.

कथा-कादंबरी-कविता लिहिण्याच्या कितीतरी तऱ्हा असू शकतात, त्यातली एक तऱ्हाच ठळक किंवा प्रभुत्वशाली मानणं घातक वाटतं. नेमाडे या लेखक-व्यक्तीचं मूल्यमापन वेगळं करावं, पण त्यांच्या मतांच्या मर्यादाही पाहायच्या नाहीत, हे बरं वाटत नाही. तरीही कोणाला 'कोसला' किंवा नेमाड्यांच्या कादंबरीत आणि 'मेड इन इंडिया'त साधर्म्य वाटत असेल, तर त्यांनी नोंदवणं रास्त राहील. पण आपल्याला तशी तुलना इथे वाजवी वाटत नाही, त्यामुळे ती करण्यात मतलब नाही. आपण फक्त पंजाबबद्दल थोडं बोलू.

अकोल्यातल्या गरसोळी गावात एका सरंजामी कुटुंबात जन्मलेला हा पंजाब आहे. त्याला आता वडिलांच्या दबावामुळे सरपंच व्हावं लागणार आहे, तसा तो होतोही. जग-भारत-महाराष्ट्र राज्य-आपलं गाव- या सगळ्या व्यवहारातले अंतर्विरोध त्याला कळतात, तरीही त्याला त्या सगळ्याला सामोरं जाणं भाग पडतं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी साताठ वर्षं तो शहरात होता, पण जाणीवपूर्वक तो गाव स्वीकारतो, त्याची अशी कारणंही तो नोंदवतो. ती ढोबळ कारणं नाहीत.  त्यातली गुंतागुंत तो जाणतो. म्हणून एका ठिकाणी तो असंही म्हणतो:
मी कॉलेजात असतानाही हप्त्यातून दोनतीन चकरा गावाले होतंच. म्हणजे मी ना धळ अर्बन ना धळ रूरल असा घळलो. मले काही गोष्टी गावातल्या आवळत त काही शहरातल्या प्यार होत्या. संपुर्न शहर किंवा संपुर्न गांव मले कधीच आवळलं नाही. (पान ६७)
पण तरी शहरापेक्षा गावाची निवड केल्याबद्दल, थोडंफार तसं करायला भाग पडलं याबद्दल त्याचं काहीतरी म्हणणंही आहे:
[...] याले काही अर्थ नाही. हे शहर काही लाठी नाही आपल्याले. भेटलीही नोकरी त आपन या बगिच्यात फारहीफार काढू चारदोन सालं. पन मरू काही नाही अथी. रात्री येकाच ताटात जेवून दुसऱ्यादिवशी अजनबी होनारा हा माहोल काही आपल्याला कलम होनार नाही. हे असं भारतीय समाच्यार चित्रासारखं जगनं आपल्याले ना जमे. [...] (पान ४७)
विठ्ठल वाघ यांनी 'मेड इन इंडिया'बद्दल दिलेली प्रतिक्रिया इथे नोंदवावीशी वाटते (या प्रतिक्रिया पुस्तकातच शेवटी दिलेल्या आहेत):
भाषेला एक परंपरा असते. त्या परंपरेतच लोकव्यवहार, संभाषण, लेखन होत असते. या प्रवाहाला वळण देणे कठीण असते. ज्ञानेश्वर-तुकारामाची ताकद त्यासाठी लागते. तेव्हा कुठे जुनीपुराणी कात टाकून भाषा नव्याने उजळते. ती मनाला झपाटून टाकते. असं वेड लीळाचरित्र अन एकूणच महानुभावीय लेखनानं लावल्याचं मी अनुभवतो. त्यानंतर अशी किमया फक्त पुरुषोत्तम बोरकरांच्या लेखणीनं केलेली दिसली. 
वऱ्हाडीला एक नवा बाज, नवा साज त्यांनी दिला. भाषेत लेखक अडकतात. भाषेभोवती घुमतात. बोरकरांनी वऱ्हाडी भाषा घुमवली, वाकवली, झुकवली, वळवली. हिंदी, उर्दू, इंग्रजी शब्दांची वऱ्हाडीशी सांगड घालून नवाच चेहरामोहरा तिला बहाल केला.
लेखनात शैलीएवढंच महत्त्व आशयाला असते. काय अन कसे हे दोन्ही भाग लेखनाच्या दृष्टीने मोलाचे! इतर ग्रामीण लेखकांप्रमाणे बोरकर 'पूर्व दिव्या'त गटांगळ्या खात नाहीत. ते आजच्या कालप्रवाहात स्वतःला कोलंबसाच्या निधडेपणाने झोकून देतात. स्वातंत्र्योत्तर काळात लागलेली, समाजजीवन पोखरून काढणारी कीड- तिचा सर्वदूर होणारा प्रादुर्भाव- हे विनोदानं, उपहास-उपरोधानं खमंगपणे हाताळण्याचं अफाट कौशल्य 'मेड इन इंडिया'त आहे. इंडियातल्या ग्रामीण भागातील घराघरात पोचली पाहिजे अशी ही आधुनिक 'ग्रामगाथा'च आहे!
यातला अतिशयोक्तीचा भाग सोडून देऊ, कोलंबसाचं उदाहरणही सोडून देऊ, पण मूळ मुद्दा खराच आहे. बोरकरांनी रूढ वऱ्हाडी भाषेत विलक्षण आशय उभा केला आणि त्यांचं लेखन 'पूर्वदिव्यात गटांगळ्या न खाता आजच्या कालप्रवाहाला सामोरं जाणारं आहे'.

५. आज-काल-उद्याचा प्रवाह

भारताची आर्थिक धोरणं बदलत होती त्या सांध्यावर ही कादंबरी प्रकाशित झाली. पक्षीय राजकारणांमधले बदलही अधिक वेगाने होत होते. जातीय समीकरणं बदलत होती. टीव्ही-व्हिडिओ इत्यादींचा वावर वाढू लागला होता. बाहेरच्या जगात, चारेक वर्षांनी बर्लिनची भिंत पडली, शीतयुद्ध संपलं, इत्यादी बऱ्याच गोष्टी. याचे संकेतही कादंबरीत आहेत. काही गोष्टी कादंबरी लिहितानाच्या आणि काही प्रकाशित झाल्यानंतर लगोलग घडलेल्या पण आधीपासून जाणवत होत्या अशा. तर या गोष्टी कादंबरी लिहिली गेली/ पहिल्यांदा प्रकाशित झाली त्या काळात 'आज'च्या होत्या, पण आज 'काल'च्या झाल्या आहेत, (तरी त्यांचे प्रभाव राहतात). त्यामुळे अशा कादंबरीच्या नंतरच्या आवृत्तीमध्ये काही तपशिलांचे संदर्भ देण्यासाठी तळटिपाही टाकाव्या लागतील. इथे नोंदवले तेवढेच तपशील नव्हेत, पण इतरही अनेक वाक्यांमधे आलेले संदर्भ हळूहळू अंधुक झालेले आहेत, ते आणखी अंधुक होतील. पण ही कादंबरी म्हणजे फक्त त्या काळातले तपशील नव्हे. त्यात कालप्रवाह आहे. या प्रवाहीपणामुळे ती फक्त कालच्या काळाची राहणार नाही, असं वाटतं.

उदाहरणार्थ, शेतकऱ्यांची आजची परिस्थिती या १९८७ सालच्या कादंबरीत सूचित झालेली आहे (शिवाय, त्यात फक्त शेतकरी पुरुष नाही, बाईचीही दखल आहे). खालच्या ओळी पाहा:
शेती म्हन्जे चोवीसतास पॅड बांधून रेडीच पाह्यजे मानूस. पान्याचा ठोक आला अर्ध्याराती त उठा, आंगनातले ढोरं गोठ्यात बांधा... मुंगावर ताळपत्री टाका. वारंवायदन आलं भरदुपारी अच्यानक त वाऊ घालेल मिर्च्या काढा टिनावरून... हे झाका ते झाका.
धन्याच्या नावानं कुकू लावून आल्या येकडावच्या घरात की ह्या म्हन्जे त्याईच्या मरेपर्यंत कुक! (पान १३३)
म्हटलं तर पाटीलकी आहे, पण घराण्याची जुनी गढी खलास झालेली, स्वतःला या सरंजामी डोलाऱ्याचा फोलपणा कळलेला, पण कुणबी असणं तर सुटलेलं नाही- अशा पेचात पंजाब अडकलेला आहे. त्याचे वडीलही विविध कारणांमुळे आत्महत्या करतात. पंजाबलाही शेतीत रुजता येत नाही.

गेला काही काळ महाराष्ट्रात मराठा मोर्चे निघाले, आत्ताही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बरंच बोलणं सुरू असतं. आरक्षणाने समस्या सुटेल का, हा भाग वेगळा. पण त्यातला एक युक्तिवाद असा आहे की, काही मोजक्या मराठा घराण्यांचं भलं झालं, पण सर्वसामान्य मराठा शेतकरी इत्यादी समुदाय खचत गेला. [काही कारणामुळे या खटल्याशी संबंधित सुरुवातीची कागदपत्रं ही नोंद लिहिणाऱ्याला पाहायला मिळाली, त्यावरून हा एका त्या युक्तिवादाचा आधार नोंदवला आहे. इतरही मुद्दे अर्थातच त्यात होते]. पण मोर्चे निघाले, तेव्हा त्याचंही एकंदर दृश्यरूप या कुणबीपणाच्या समस्येला अधोरेखित करण्यापेक्षा दुर्दैवाने सरंजामी चिन्हांना अधोरेखित करणारं होतं, काही समर्थकांची भाषाही त्या दिशेने जाणारी होती. खरी भयानक समस्या निव्वळ आरक्षणाने सुटेल का, याची कल्पना नाही. याचं भविष्यही माहीत नाही. पण 'मेड इन इंडिया'मधे या घडामोडींची पार्श्वभूमी खूप आधीच उलगडलेली आहे. तरीही, पंजाबची अभिव्यक्ती सरंजामी नाही, उलट अशा डोलाऱ्याचा त्याला उबग येतो, त्यावेळी त्याचा उपरोधही दिसतो, पण त्या सरंजामी रचनेला दूर ठेवलं तरी कुणबीपणाच्या समस्येचं काय करायचं? हा प्रश्न त्याच्यापुढे उरतोच.

'मेड इन इंडिया'तलं कुणबीपण आणखीही एका अर्थी विशेष आहे. 'बरे झाले देवा कुणबी केलो, नाहीतर दंभेची असतो मेलो', ही तुकारामाची ओळ आहे (बहुधा मूळ ओळीत किंचितसा फरक असेल), ती इथे जुळते. 'मेड इन इंडिया'त कुणबीपणाची आर्थिक वाताहात कशी होत गेली याचे संकेत आहेत, पण सांस्कृतिक-भाषिक इत्यादी पातळ्यांवर आपलं असणं बरंच आहे, असा मोकळेपणा त्यात आहे. म्हणजे अभिजनांचं अभिजनपण त्यांच्यातल्या दंभामुळे अपुरंच असतं, आपण तसे अपुरे नाहीत, त्यामुळे आपली जाणीव बरीच मग- असा तो भाव दिसतो. कादंबरीतला एक प्रसंग नोंदवण्यासारखा आहे:
येकेकाळी कॉलेज्यात माह्यासंग शिकत असनारा अन आता यम्यशीबीत नोकरीले लागेल वसंत उमाळे नावाचा दोस्त भेटीसाठी आला. मटनाचा पाहुन्चार केला. त मसालेदार सुगंधी ज्येवताखेपी तो म्हने, हैट लेकहो. आपण यानंच त सुधरलो नाही. त्याईच्या बुद्धिमत्तेचं रहस्य केवळ येकाच वस्तूत येकवटलेलं आहे. अन ते वस्तू म्हन्जे कढी ऊर्फ आमटी! कढीत ज्येवढे व्हिटॅमिन असतात, तेवढा नसतात इंडियातल्या कोन्त्याच खाद्यपदार्थात! (पान १३२)
हे त्या मित्राला वाटतं, इतकंच. पण पंजाबची दृष्टी तशी नाही. कढी खाणारे (ब्राह्मण) बुद्धिमान, असा काही गंड त्याला नाही. म्हणूनच आधी म्हटल्याप्रमाणे तो बऱ्याच गोष्टी रिचवू शकतो. किंबहुना, कादंबरीही पंजाबला जागा देते, त्याच्यासारखं मत नसलेल्याही अनेकांना जागा देते, वऱ्हाडी बोलीला जागा देते, हिंदीला, इंग्रजीला, इतकंच नव्हे तर (विशिष्ट प्रदेशातल्या ब्राह्मणांच्या बोलीचं वर्चस्व असलेल्या) प्रमाण मराठीलाही जागा देते, पण आपल्या नेहमीच्या अभिव्यक्तीला कमी लेखत नाही, त्यातले तपशिलांचे बारकावे 'जागतिक' नसतील (म्हणजे सध्याच्या अर्थानुसार एकसाची, सगळीकडच्या ग्राहकांना पटापट स्वीकारता येतील असे नसतील), तरीही फिकीर करत नाही. जाणिवेच्या पातळीवर मात्र प्रादेशिक आणि जागतिक (जगातलं इतर विविध ठिकाणचं, अशा अर्थी) असं सगळं ठीकठाक मानते.

तर, असे या कादंबरीतले प्रवाह फक्त कालपुरते किंवा आजपुरते नाहीत, ते उद्याही असतील, असं वाटतं. त्यात पंजाबची व्यक्ती म्हणून होणारी तगमग आहे, गाव-शहर यांच्यातल्या गुंत्यामधलं त्याचं गुंतणं आहे, तरीही परिसराशी जोडून घेण्याची ओढ आहे, आपल्या वातावरणातल्या तपशिलांबद्दल तुच्छता नाही, इत्यादी. इतरही अनेक गोष्टी कादंबरीत आहेत. 'आपुले मरण पाहिले म्यां डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य' ही तुकारामाची ओळही कादंबरीच्या शेवटच्या चारेक पानांशी जवळीक सांगणारी आहे. पण आपण इथे तुकाराम हाच एक मापदंड घेऊन हे नोंदवलेलं नाही, संवेदनेमधली जवळीक नोंदवली. पण तुकारामाचं पद्य होतं, इथे कादंबरीतलं गद्य आहे, तरी ते पद्यही होत जातं. 'मेड इन इंडिया' कादंबरी म्हणून तिच्या काळाला प्रतिसाद देत व्यापक संवेदनांबद्दलही बोलते. कादंबरीच्या शेवटी पंजाब स्वतःच्या भविष्यातल्या मरणाची कल्पना नोंदवतो:
समजा येखांद्यानं न्युट्रानबॉम्ब इस्तेमाल करून अन सोताचा पेशल बच्याव करून या अख्ख्या दुनियेतली अख्खी संपदा काबीज केली. अन त्ये खर्च करून सुवर्नाक्षरात येकच पाटी लिहिली की परवानगीशिवाय आत येऊ नये. त यम काय येनार नाही म्हन्ता? तो यिनच. पाटी या दारावर असन् त तो त्या दारातून यिन. पन यिनच. त्याले कोनीच चकोन्या दाखू शकत नाही. कितीही आकोमाको मले सकाय दाखो म्हटलं तरी तो यिनच. आखीन लेट येनार नाही, राईट टाईम यिन. तथी कोनाचा मुलाहिजा नसे. माह्याही नाहीच. आखीन खुदाच्या लाठीचा आवाजही होत नाही, हेबी विशेष.
या लाठीचा तळाखा मलेही बसन. फटालकन. अन मी चुपच्याप मरून पळीन कुठीतरी. (पान १४८)
इथून पुढे स्वतःच्या मरणाचं अडीच-तीन पानं विस्तृत वर्णन आहे. ते मेल्यानंतरच्या कार्यक्रमांपासून शेवटी सृष्टीत मिसळण्यापर्यंत बरंच काही नोंदवणारं आहे. म्हटलं तर ते शोकात्म आहे, म्हटलं तर त्याचा शेवटी सोहळा होतो. त्यात पंजाबचं कुणबी असणं आहे, पण त्यापलीकडचं व्यक्ती असणंही आहे, त्याचसोबत व्यक्तीचं आजूबाजूच्या वास्तवाशी जोडलेलं असणंही आहे, परिसराशी जोडलेलं असणंही आहे. त्यात तत्कालीन तपशील स्वाभाविकपणे आलेले असले, तरी तेवढ्यापुरतीच ती कादंबरी उरत नाही. विविध रचनांना सामोरं जाताना व्यक्तीचं/व्यक्तींचं काय होतं, त्याचा लेखाजोखा किंवा कादंबरीतच आलेले शब्द वापरायचे तर 'काया वाच्या मनाचा अस्सल टाहो' इथे सापडतो. तो आजही सापडावा आणि उद्याही सापडावा असा आहे. म्हणून पुस्तकाच्या कव्हरवरचं चित्र बदललं तर बरं, कदाचित हळूहळू काही वाक्यांना तळटिपाही टाकाव्या लागल्या तरी ठीक, पण ही कादंबरी आणखी उजेडात यावी / राहावी, एवढ्यापुरती नोंद करायचा प्रयत्न.

पुरुषोत्तम बोरकर
(फोटो: परवानगीने इथून. मूळ सौजन्य: बोरकर कुटुंबीय)
०००

कदाचित खालच्याही नोंदी या जोडीने पाहता येतील: