आज २७ फेब्रुवारी. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने या तारखेला 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. कुसुमाग्रजांचे एक चाहते असलेले जी. ए. कुलकर्णी यांच्या मावसबहीण नंदा पैठणकर यांनी 'प्रिय बाबुआण्णा' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे (पॉप्युलर प्रकाशन, पहिली आवृत्ती: २०१२). त्यात पान ९६वर पुढचा मजकूर येतो:
"मुलींना शाळेत घालण्याआधी, मी त्यांना कोणत्या शाळेत घालावं (इंग्लिश मिडियमच्या की मराठी मिडियमच्या) याविषयी त्याचा [म्हणजे बाबुआण्णा म्हणजे जी.ए. कुलकर्णी यांचा] सल्ला विचारला होता. तेव्हा त्याने सांगितलं होतं की, 'मुलींना जगाच्या पाठीवर कोठेही जावं लागलं तरी त्यांना धीटपणे सगळ्या गोष्टींना सामोरं जाता आलं पाहिजे, त्यांचं कोठे अडता कामा नये; म्हणून चांगलं इंग्रजी लिहिता, बोलता आलं पाहिजे. त्यासाठी त्यांना कॉन्व्हेंट शाळेत घालायला हवं. पण याचा अर्थ असा नव्हे की, त्यांनी मातृभाषेकडे संपूर्ण दुर्लक्ष करावं. आपली मातृभाषा, मराठीही येणं तितकंच महत्त्वाचं आहे!' त्याच्या म्हणण्यानुसार मी त्यांना 'सेंट हेलिना' या शाळेत घातलं आणि सुट्टीत त्या मराठीही शिकल्या. पण मामाच्या कथा वाचण्याजोगं आणि त्या कथा समजण्याजोगं त्यांचं मराठी परिपक्व मात्र झालं नाही याची मात्र मला राहून राहून खंत वाटते. पुढे मुग्धा लग्न झाल्यावर अमेरिकेला गेली तेव्हा तिथून लिहिलेल्या पत्रात तिनं पहिलंच वाक्य असं लिहिलं होतं की 'आम्हांला कॉन्व्हेंट शाळेमध्ये घालायचा मामाचा आणि तुमचा निर्णय किती योग्य होता हे संपूर्ण प्रवासात आणि इथं आल्यावर चांगलंच पटलं!' मनीषाचंही इंग्रजी चांगलंच आहे. शिवाय ती कॉम्प्युटरच्या क्षेत्रातली आहे. त्यामुळे मलाच तिचा सल्ला बरेचदा घ्यावा लागतो."
मुखपृष्ठ: सुभाष अवचट |
जी. ए. कुलकर्णींचे एक चाहते आहेत चित्रपट दिग्दर्शक राही अनिल बर्वे. मध्यंतरी 'तुंबाड' नावाचा त्यांचा हिंदी चित्रपट चर्चेत होता. चित्रपटाची कथा नारायण धारपांच्या मूळ कथेवर बेतलेली आहे, आणि शीर्षक काय द्यावं हे सुचत नव्हतं, म्हणून मग समोर मराठी पुस्तक पडलेलं 'तुंबाडचे खोत', त्यावरून 'तुंबाड' असं नाव देऊन टाकलं! 'असे विषय इथे भारतात चालणार नाहीत, हॉलिवूडला जा', असं बऱ्याच लोकांनी आपल्याला सांगितल्याचं बर्व्यांनी अनेक मुलाखतींमधून सांगितलं होतं. तसंही चित्रपट माध्यमाला असल्या प्रादेशिक भाषाबिषांचं बंधन नाही, असंही म्हटलं जात असल्यामुळे पटकन जागतिक झाल्यासारखंही वाटत असावं. त्यानुसार 'तुंबाड' चित्रपट अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट-महोत्सवांमध्ये दाखवला गेला. म्हणजे धारपांना, 'तुंबाडचे खोत' लिहिलेल्या श्री. ना. पेंडसे यांना जे बंधन पडलं, ते बर्व्यांना नसणार. त्यामुळे बहुधा, बर्वे यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं होतं:
"माझ्या लेखी खरं जागतिक तोडीचं मराठी लेखन जी.एं.पासून सुरू झालं आणि जी.एं.सोबत संपलं. पण त्यात कुणालाही वाईट वाटण्यासारखं काहीही नाही. कुठल्याही भाषेत असा एखादा लेखक शतकांतून एकदा केव्हातरी चुकून अपघाताने येऊन जातो. त्यामुळे ठीक आहे."
दुसऱ्या एका मुलाखतीत बर्व्यांना त्यांच्यावरच्या साहित्यिक संस्कारांविषयी विचारल्यावर ते म्हणतात:
"जागतिक साहित्यातली घ्यायची झाली तर असंख्य नावं आहेत. पण दुर्दैवानं मराठीत फक्त जीए. जेव्हाजेव्हा त्यांच्याहून काहीतरी श्रेष्ठ शोधायचा, वाचायचा प्रयत्न केला तेव्हा फक्त निराशा पदरी पडली. संपूर्ण मराठी साहित्य एका बाजूला आणि जीए दुसर्या बाजूला. १९८७ साली जीए गेले. इतकी वर्षं झाली तरी अद्याप त्यांच्या जवळपास पोचणारा एकही लेखक निर्माण होऊ नये हे खरंच आपलं दुर्दैव आहे. आणि गेल्या अनेक दशकांमधे झालेल्या मराठी भाषेविषयीच्या अनास्थेमुळे, पुढील पिढ्या मराठी भाषेत न शिकता इंग्रजी माध्यमांमधे गेल्यामुळे मराठी भाषा जणू अखेरचे श्वास घेत असल्यासारखी भावना झालेली आहे."
आता ते पुढचा चित्रपट जी. ए. कुलकर्णी यांच्या 'विदूषक' या कथेवर करत असून त्याचं नाव 'रक्तब्रह्मांड' असं आहे. 'तुंबाड ही सोपी फिल्म होती रक्तब्रह्मांड महत्त्वाकांक्षी आहे,' असंही त्यांनी तिसऱ्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. म्हणजे आता मराठी 'परिपक्व' नसलेल्या प्रेक्षकांना भाषेचं बंधन एका कथेसाठी सहज ओलांडता येईल. आणि 'शतकांतून एकदाच होणारी जागतिक तोडी'ची अभिव्यक्ती नेत्रसुखद पद्धतीने आणि 'धीटपणे' अनुभवता येईल. मराठीही 'परिपक्व' असलेल्यांना तर दुहेरी आस्वाद घेता येईल. 'तुंबाड' चित्रपटाचं विषयसूत्र 'हाव' हे असल्याचं दिग्दर्शक सांगतात. शेवटी ती हावच माणसाला खाते, इत्यादी. बाकी, पात्रं, कथानक यात काहीच गुंतागुंत नसली, भयाचेही सोपेच साचे वापरलेले असले, तरी तांत्रिक सफाई, व्हीएफएक्स, इतर काही साउंड डिझाइन वगैरे गोष्टी भाषेची बंधनं ओलांडतात. आणि 'जगाच्या पाठीवर कोणत्याही गोष्टीला धीटपणे सामोरं जाण्या'साठी कलाकृती सज्ज होते.
खरं म्हणजे चित्रपटही फक्त बघून किंवा ऐकून संपत नाही, त्याचं काहीएक कमी-अधिक 'वाचन' आपण सर्व जण आपापल्या परीने करू शकतो बहुधा. पण सध्या बघण्याचे नि दिसण्याचे दिवस असल्यामुळे कदाचित जागतिक होणं म्हणजे जग 'बघणं' किंवा जगाने 'बघणं', असा अर्थ जास्त दिसत असावा, (चित्रपट, पुस्तकं, पर्यटनस्थळं, वृत्तवाहिन्या, अगदी समोर प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना- या सगळ्यांना हे लागू होईल). अशा रितीने जगासमोर स्वतःला धीट म्हणून पेश करण्यासाठी लागेल ती खटपट करत राहणं आवश्यक ठरतं. धीट नसलेल्या कितीतरी गोष्टी जगात असतात, त्यांना यात पुरेशी जागा नाही. शिवाय, साध्या पातळीवर आपण व्यक्ती म्हणून जग 'वाचणं' असा अर्थ या जागतिकपणात दिसत नाही. हे वाचन करण्यासाठीची भाषा कोणती असते?
०००
या धाग्याशी संबंधित आधीच्या काही नोंदी:
- एक्स्क्युज मी, प्लीज । वी आर गोइंग टू बी वर्ल्ड फेमस
- इंग्रजीची जादू आणि तलवार, गदा, धनुष्यबाण, ढाल
- भाषा : जीवन आणि जेवण
No comments:
Post a Comment