Friday 1 March 2013

एका आझाद इसमाची गोष्ट

अमन सेठी
अमन सेठी सध्या 'द हिंदू'चा आफ्रिकेतला प्रतिनिधी म्हणून काम करतोय. आदिस अबाबाला असतो. आधी त्याने याच वर्तमानपत्रासाठी छत्तीसगढमधेही काम केलेलं आहे. मूळचा दिल्लीतला आहे. २००५पासून 'हिंदू'सोबत आहे. 'अ फ्री मॅन' हे अमनचं पहिलंच पुस्तक. 

'रेघे'वर आपण केवळ पुस्तक परीक्षण असं काही काम ठेवलेलं नाही, आणि खरंतर ही नोंद तशी नाहीही. हे पुस्तक म्हणजे पत्रकारितेशी मजबूत संबंधित आणि पुन्हा स्वतंत्र पुस्तक म्हणूनही सुंदर अशी गोष्ट असल्यामुळे आपण तिची नोंद करतोय, माध्यमं आणि साहित्य अशा दोन्ही विभागात बसणारी. आणि सामाजिक समस्येवर लिहिण्याचा आव आणत स्वतःच्या पोकळ संवेदनशीलतेचं प्रदर्शन करणाऱ्या पत्रकारी लिखाणासारखं हे नाही, तर आपण कुठे आहोत आणि एकूण आपला आसपास कुठे आहे याची पुरेशी जाणीव ठेवून लिहिलेलं हे पुस्तक आहे, असं वाटलं म्हणून त्याची नोंद 'रेघे'वर. मुख्य प्रवाह बाजूला ठेवला तरी स्वतंत्रपणे पत्रकारांना काय करता येण्यासारखं आहे, याची नोंद करणं हाही एक हेतू.
***

भारताला स्वातंत्र्य मिळालं १९४७ साली. त्यानंतर आत्तापर्यंत आपण स्वतंत्रच आहोत. आपण म्हणजे भारतातले नागरिक.
पण एकूणच स्वातंत्र्य म्हणजे काय?
***


मोहम्मद अश्रफ मूळचा बिहारमधल्या पाटण्याचा. पण गेली काही वर्षं तो दिल्लीतल्या सदर बाझार परिसरातल्या बारा टूटी चौकात रोजंदारीवर काम करतोय. त्याला हवं तेव्हा तो काम करतो, अन्यथा बिडी फुंकत, कधी दिवसेंदिवस दारू पीत वेळ काढत राहातो. हेच त्याचं स्वातंत्र्य!
म्हणून पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणाचं नाव 'आझादी'.

अश्रफचं हे स्वातंत्र्य समजून घ्यायला त्या चौकात अमन चार-पाच वर्षं फिरत होता. तिथल्या कामगारांसोबत वेळ घालवत होता. त्यांच्याशी त्याची दोस्तीही जमलेली. पण ही दोस्ती म्हणजेही फारच तकलादू चीज असावी, याचीही जाणीव अश्रफसकट सगळ्यांनाच आहे की काय? कारण सगळे हे कामगार पुन्हा सुटेसुटे एकेकटेच आहेत. मूळचं घर कुठाय, घरी कोण कोण राहातात, लग्न झालंय की नाही, मूळचं ठिकाण सोडून इथे येऊन राहाण्याचं कारण काय, घरी कधी जाता, या प्रश्नांची काही ना काही उत्तरं पुस्तकातून अमन आपल्यापर्यंत पोचवत राहातो. या प्रश्नांमधून हाताशी लागतो तो भयाण एकटेपणा. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे 'अकेलापन'.

ह्या पुस्तकाची चांगली बाजू काय, तर आपण सामाजिक प्रश्न मांडतोय आणि आपल्याला त्याबद्दल किती कळवळा आहे याविषयी लेखकाने कोणताही आव आणलेला नाही. जी आपसूक कळ कोणत्याही जाग्या असलेल्या डोक्यातून उठेल ती पुस्तकात आहे, पण त्यापलीकडे जाऊन अनावश्यक उरबडवेपणा नाही किंवा आपणच तितके संवेदनशील असला बडेजावही नाही. त्यामुळे अमनभाई बारा टूटीचा एक सुटा का होईना भाग बनू शकतो. तो तिथे पुस्तक लिहायला आलाय आणि आपण त्याच्याशी बोलतोय त्याची नोंद पुस्तकात होणार आहे, आपल्याशी त्याचा वास्ता फक्त पुस्तकातल्या नोंदीपुरताच आहे, याची जाणीव अश्रफभाईला आणि चहाची टपरी चालवणाऱ्या काकाला, लल्लू, रेहान, मुन्ना या इतर मंडळींनाही आहे. त्यांनी अमनला तरीही जितक्यास तितकं तरी स्वीकारलंय.

म्हणजे कधीकधी अश्रफ अमनला मूर्खात काढायलाही कमी करत नाही आणि तेही पुस्तकात नोंदवलेलं असतं. कधी ह्या ग्रुपमधल्या एका कामगाराला टीबी होतो, तेव्हा खरं एकटेपणातलं भयाणपण समोर येतं नि मग हॉस्पिटलसाठी आणि उपचारांसाठी अमनला खटपट करायला लागते. ती तो जमेल तेवढी करतोही. पण तरीही तिसरं प्रकरण नावातच सांगतं ती गोष्ट उरतेच : 'लावारिस'.

मग कोणी वेडा होत चाललेला कामगार मनुष्य अखेरीस ठार वेडा होऊन ट्रकमागे नागडा धावताना दिसतो. पण कोणी काही करू शकत नाही.

आपलं शरीर जोपर्यंत ठिकाठाक आहे तोपर्यंत असलेलं हे स्वातंत्र्य आहे. आपल्याला हवं तेव्हा काम करण्याचं. आपल्याला हवं त्याला फाट्यावर मारण्याचं. अमन ज्या ग्रुपमधे रुळलाय तो ग्रुप रोजंदारी करून पैसे कमावतोय, कुणाकडे कायमस्वरूपी नोकरी करण्यात त्यांना रस नाही. कधी रंगाऱ्याचं काम कर, कधी हमाली, असं त्यांनी कामाचं स्वरूप ठेवलंय. हेच त्यांच्या लेखी स्वातंत्र्य आहे.

पण मग बारा टूटीमधे सरकारी कारवाई होऊन अनधिकृत बांधकाम पाडण्याची सुरुवात झाल्यावर ही मंडळी कुठे जातात? राष्ट्रकुल स्पर्धांसाठी चकाचक होऊ घातलेल्या दिल्लीत अशी कोण कोण मंडळी आणखी कुठे स्थलांतरित झाली?

अश्रफ कोलकात्याला आपल्या जुन्या मित्राकडे गेला. दिल्लीला येण्यापूर्वी तो कोलकात्याला होता तेव्हा त्या दोघांनी एकत्र व्यवसाय केला होता, पण नंतर काही कारणाने अश्रफ दिल्लीला गेला. आता तिथून निघून जावं लागल्यामुळे तो कोलकात्याला परत येतो, पण मित्र तर आधीचा फुटकळ व्यवसाय बंद करून व्यवस्थित दुकान सुरू करून आहे, लग्न झालेलं आहे, व्यवस्थित कुटुंब आहे. अश्रफसाठी तो अजनबी ठरतो. चौथ्या आणि शेवटच्या प्रकरणाचं नाव : 'अजनबी'.
***

गुंतागुंतीचं गणित समजावून सांगितल्यासारखं अश्रफने एकदा सांगितलेलं, ''आदर्श काम तेच ज्यात कमाई आणि आझादी यांचा परफेक्ट बॅलन्स असतो.
''काम हे काम असतं कारण त्यात कमाई असते. कमाई नसेल तर ते काम नाही, तो छंद होईल. काही लोक त्याला सेवा म्हणतात. काही लोक त्याला उपक्रम म्हणतील. पण ते काम नक्कीच नाही. काम म्हणजे जे केलं की माणसाला पैसे मिळतात. ते पैसे म्हणजे त्याची कमाई.
''आमच्यापैकी बरेच जण कमाईकडे पाहून काम निवडतात. महिन्याला सहा हजार रुपये! अशा पैशांनी माणूस श्रीमंत होईल. पण एक महत्त्वाची गोष्ट ते गमावतात. कोणती महत्त्वाची गोष्ट?
आझादी, अमन भाई, आझादी.
''आझादी म्हणजे मालकाला बाझवत गेलास असं सांगण्याचं स्वातंत्र्य. मालक फक्त आपल्या कामावर मालकी सांगू शकतो, तो आपल्यावर मालकी सांगू शकत नाही.''

पान १९


अमन : घर बांधत असताना तुम्ही वेळ कसा घालवता?
कामगार : आम्ही काम करतो.
अमन : पण काम करताना तुम्ही कशाचातरी विचार करत असता का?
कामगार : प्रत्येकच जण करतो.
अमन : तुम्ही कशाचा विचार करता?
कामगार : काम करताना मी कामाचाच विचार करतो
.
पान ३७

रात्रीचे दोन वाजलेत आणि माझा फोन वाजतोय. हल्ली अधूनमधून असं होत असतं. बहुतेकदा तो अश्रफच असतो आणि बहुतेकदा तो प्यालेला असतो. जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ रात्रीही चालू असणारा टेलिफोन बूथ आहे.
''अमन सरजी, फोन करायला खूप उशीर झाला नसेल असं मला वाटतं, पण अश्रफला तुम्हाला 'हॅलो' म्हणावं वाटतंय.''
''हॅलो, अश्रफ.''
''हॅलो, अमनभाई. तुम्ही झोपलेलात काय?''
''होय.''
''हां. मी एवढंच सांगायला फोन केला की, काल चौकात एक मुलगी आलेली आणि तिने किती कामगार आहेत ते विचारलं. मी सांगितलं, 'पन्नास', मग तिने सगळ्या कामगारांना रांगेत उभं राहायला सांगितलं. मग तिने प्रत्येकाच्या हातात दहा रुपयांची नोट दिली आणि ती निघून गेली. हॅलो? ऐकताय ना?''
''हो्.''
''खूप उशीर झालाय ना?''
''होय, अश्रफभाई.''
''मला वाटलं तुमच्या अभ्यासासाठी हे तुम्हाला ऐकायला आवडेल म्हणून मी फोन केला. बाकी, आम्ही सगळे आता पीत बसलोय आणि तुमच्याबद्दलच बोलतोय. म्हणून म्हटलं, तुम्हाला फोनच लावावा.''
''होय. बरंच केलंत.''
''गुड नाईट, अमनभाई.''
''गुड नाईट, अश्रफ.''
पान ४६

''तुम्ही हे काय करताय, अमनभाई?''
''काय करतोय, अश्रफभाई?''
''हेच आमच्यासारख्या लोफर लोकांसोबत वेळ आणि पैसा घालवून दारू पिताय. आम्ही तुम्हाला काय शिकवणारोत?''
''मी पुस्तक लिहायचा प्रयत्न करतोय.''
''पण ते कोण वाचेल?''
''माहीत नाही. कदाचित माझे मित्र ते विकत घेतील किंवा दिल्लीतली आणखी काही माणसं घेतील.''
''पण तुम्हाला पैसा मिळेल का?''
''पैसे मी आत्ताही बऱ्यापैकी मिळवलेत.''
''किती पैसे?''
''एक लॅपटॉप घेता येईल इतके.''
''मग ठिकाय.''
सदर बाझारातल्या इतर लोकांप्रमाणे मलाही पैसे कमावता येतायंत याने सुटल्यासारखं वाटून अश्रफ रस्त्याशेजारी झाडाखाली असलेल्या लहानशा मंदिराजवळ थांबला. ''आईशप्पथ, अमनभाई, तुम्ही खूप पैसे कमवाल.''
''तुम्हीसुद्धा कमवाल, अश्रफभाई.''
''आणि लल्लू - तो माझा मिडियम-टाईप मित्र असला तरी तो माझा एकमेव मित्र आहे, अमनभाई. माझा एकमेव मित्र. आणि रेहानसुद्धा.''
''आणि काकासुद्धा.''
''आपण सगळे श्रीमंत होऊ, अमनभाई.''
''होय, अश्रफ, एके दिवशी आपण सगळे श्रीमंत होऊ.''

पान ८०

व्हिन्टेज / रॅन्डम हाउस इंडिया आवृत्ती - २०१२

3 comments:

 1. Dear Avadhoot,

  I read out the blog post on '' A free man''. It is simple and smoothly written which was broken my paths. What I really thinks such life of persons who lives in independent India. At Pune I have been seen such real life of persons. Avadhoot, you just remind our Ranade's '' Vrittavedh '' where I published two stories on Migrant peoples children.That news space, content definately little than ''...man''. But I tried as my level. I keen interest to read this book soon, tell me about where is it available. And thanks what you searched and written on it.

  ReplyDelete
 2. Sometimes I wonder whether we are as much free as we can afford!

  ReplyDelete
 3. कशाकशाला सुंदर म्हणू रे? '' आझादी म्हणजे मालकाला बाझवत(म्हणजे काय ते नेमकं ठाऊक नाही) गेलास असं सांगण्याचं स्वातंत्र्य''...ते आपल्यापेक्षा, निदान माझ्यापेक्षा तरी खूपच स्वतंत्र आहेत..''काम करताना मी कामाचाच विचार करतो'' What an integrity! ''आपण सगळे श्रीमंत होऊ, अमनभाई, होय अश्रफ , एके दिवशी आपण सगळे श्रीमंत होऊ...'' ...''खूप उशीर झाला नसेल असं वाटतंय...पण तरी अश्रफला तुम्हांला हॅलो म्हणावसं वाटतंय.. '' काय बोलू? though it is a cliche _/\_

  ReplyDelete