Wednesday, 21 June 2023

सदानंद रेग्यांबद्दल दिलीप पुरुषोत्तम चित्रे

लेखक, कवी, नाटककार, भाषांतरकार सदानंद रेगे (२१ जून १९२३ ते २१ सप्टेंबर १९८२) यांचं जन्मशताब्दी वर्ष आज, २१ जूनला संपतंय. अलीकडच्या वर्षांमध्ये 'साठोत्तरी' म्हणून बहुतेकदा गौरवल्याच जाणाऱ्या कवितेवर सदानंद रेग्यांच्या कवितेचा प्रभाव आहे का, असेल तर त्याची काही कदर ठेवली जाते का, हा प्रश्न मराठी कविता वाचू पाहणाऱ्या उरल्यासुरल्या वाचकांना स्वतःपुरता तपासता येईल असं वाटतं. कारण, मोकळेपणाने अशा प्रश्नांचा तपास करण्यासारखा अवकाश मराठी फारसा सापडणार नाही. 'मराठी कवितेच्या कोंदट, कोत्या, ‘इनब्रीडिंग’ने कोळपलेल्या वातावरणात सदानंद रेग्यांची कविता हा एक मोकळा वारा होता. हा वारा आता वाहायचा थांबला आहे,' असं विलास सारंगांनी सदानंद रेगे वारल्यानंतर लिहिलेल्या लेखात म्हटलं होतं. हे 'इनब्रीडिंग'ने म्हणजे अंतर्जननाने म्हणजे आपापल्याच कंपूत संभोग साधण्याच्या वृत्तीने कोळपलेलं वातावरण मर्यादित व्याप्तीच्या साहित्यव्यवहारात बहुधा कायमच राहत असावं. समविचारी माणसं एकत्र येणं वेगळं, पण त्याच विचारांचं कोंडाळं होणं धोकादायक, असा हा मुद्दा दिसतो. मोकळेपणाने टीका करण्याऐवजी परस्परांची पाठ थोपटत राहत गोल-गोल फिरणारं कोंडाळं त्याहून धोकादायक. हे कदाचित कायम राहत असेल, पण मोकळे वारेही त्यातच वाट शोधत असतील, असं मानून सदानंद रेग्यांच्या जन्मशताब्दीचा शेवट होताना ही त्यांच्या आठवणीत नोंद. [दहाएक वर्षांपूर्वी रेग्यांसंंबंधी मिळालेला काही मजकूर टाइप करून नोंदवून ठेवायचा कात्रणवहीसारखा प्रयत्न स्वतंत्र ब्लॉगवर केला होता, त्यातसुद्धा ही भर].

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या समीक्षापर लेखनाचं, मुलाखतींचं, काही समकालीनांच्या आठवणी जागवणाऱ्या लेखांचं 'साहित्य आणि अस्तित्वभान- भाग २' हे पुस्तक गेल्या वर्षी 'शब्दालय प्रकाशना'कडून प्रकाशित झालं. या पुस्तकाचा भाग १ काही वर्षांपूर्वी आला होता. या दुसऱ्या खंडात सदानंद रेगे यांच्यावर चित्र्यांनी लिहिलेला मृत्युलेखही समाविष्ट आहे. मूळ लेख 'मुंबई सकाळ'मधे २६ सप्टेंबर १९८२ रोजी प्रकाशित झाला होता. विजया चित्रे यांच्या परवानगीने हा लेख रेघेवर नोंदवतो आहे:

मुखपृष्ठ: संदीप सोनवणे / शब्दालय प्रकाशन

आय ॲम गोईंग टू ड्रिंक टू 'सदू'ज हेल्थ अलोन!

- दिलीप पुरुषोत्तम चित्रे

सदू रेगे वारल्याची बातमी मला पवईच्या आयआयटीत मंगळवारी सकाळी आठ वाजता कळली. त्यापूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका आला होता हे नंतर त्याच्या अंत्ययात्रेच्या वेळी कळलं. यापूर्वी अखेरची भेट झाली ती ९ ऑगस्टला. मुंबई मराठी साहित्य संघाच्या भालेराव नाट्यगृहात माझ्या 'मिठू मिठू पोपट' नाटकाचा पहिला प्रयोग झाला तेव्हा सदू मुद्दाम आला होता. प्रयोगापूर्वी भेटला. त्यानंतर नाहीच. 

सदू माझ्यापेक्षा वयाने सोळा वर्षं मोठा. पण सदूचा पहिला कवितासंग्रह 'अक्षरवेल' १९५७मधला तर माझा 'कविता' १९६०मधला. त्यापूर्वीच अनेक वर्षं सदू लेखन करायचा. सदूची पहिली कथा प्रसिद्ध झाली त्या वेळी मी सात वर्षं वयाचा होतो आणि सदू तेव्हा तेवीस वर्षं वयाचा होता. अर्थात आमची ओळख झाल्यापासूनच्या गेल्या सत्तावीस वर्षांत हा फरक मला जाणवलाच नाही. सदू त्याच्या पिढीच्या लेखकांच्या बरोबरीचा नव्हताच. त्याच्या पिढीने त्याची प्रशंसा केली तीही उपेक्षावजाच. सामाजिक बडेजावाखातर वाङ्मयाचा उपयोग करणाऱ्या खुर्चीदार आणि छत्रीधारी मराठी वाङ्मयीन सूत्रचालकांपेक्षा सदूचा पिंडच वेगळा. एकेकाळी म्हणजे १९५६ ते १९६५ ह्या काळात मी अधून-मधून कवितेची समीक्षासुद्धा करत असे. तेव्हापासून सातत्याने सदूच्या कवितेकडे वाचकांचं लक्ष वेधायचा मी प्रयत्न केला. सदूच्या अनेक कवितांचे इंग्रजी अनुवाद करून प्रसिद्ध केले. आपल्या कवितेला प्रतिसाद देणारा कवी, समीक्षक आणि वाचक म्हणून सदू माझी कदर करायचा. पण आमची व्यक्तिगत मैत्री काही ह्या 'स्वार्थी' हिशेबांवर आधारलेली नव्हती. आजही महाराष्ट्रात अस्सल कविता पोरकी आहे आणि गुणी कवी बेवारशी, ही गोष्ट सदू आणि मी जाणून होतो. वाङ्मयाच्या क्षेत्रातली भोंदूगिरी, गुरुबाजी, चमचेगिरी आणि नैतिक निष्ठेचा अभाव यांचा आम्हाला सारखाच अनुभव आलेला. यामुळे सदू जसा इतर 'प्रतिष्ठित' लेखकांपासून लांब राहिला तसा मीही आपलं अंतर ठेवून राहिलो.

सदूच्या स्वतःच्या जगातले मित्र निरनिराळ्या वयाचे, निरनिराळ्या थरातले होते. शरद मंत्रीसारखे पस्तीस-चाळीस वर्षं सदूवर भक्ती करणारे त्यात मोडतात. नामदेव ढसाळ- ज्याला सदू 'लाडिक सैतान' म्हणायचा त्यात मोडतो. श्रीकुमार, सिन्हा, जयकर, वळसंगकर यांच्यासारखे त्याचे प्राध्यापक समव्यवसायी त्यात मोडतात. डेव्हिड ससून लायब्ररीतल्या सदूच्या मित्रमंडळातले लोक त्यात मोडतात. सदूचं वय यातल्या कोणालाच जाणवायचं नाही कारण खुद्द सदूच्या हिशेबात वय ही गोष्टच नव्हती. माझा मुलगा आशय आणि माझे वडील बाबुराव हेही त्याचे मित्रच. आमच्या कुटुंबातल्या तीन पिढ्यांशी एकाच वेळी समान पातळीवर मैत्रीचे संबंध ठेवणारा असा माणूस विरळाच.

स्पष्टवक्ता

सदूच्या मैत्रीचं एक वैशिष्ट्य होतं. ज्यांच्याशी सदू कडाक्यानं भांडला नाही, प्रसंगी हातघाईवर आला नाही, ज्यांचा सदूने अपमान केला नाही असे कोणीही त्याचे मित्र नाहीतच. आतल्या गाठीचे, गोड बोलणारे, मोजून मापून वागणारे, एकमेकांची खुशामत करणारे, सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी वाटेल तो समेट करणारे लोक सदूला पटकन ओळखू यायचे. सदूची जीभ सडेतोड. तो कुणाचाही मुलाहिजा न ठेवता मनात येईल ते स्पष्ट बोलायचा. मराठी वाङ्मयाच्या अनेक कंत्राटदारांना सदूने दुखावलं आणि काही अंशी त्याच्या उपेक्षेचं हेही कारण आहे. संपादक, प्रकाशक, पत्रकार, विद्यापीठीय ठेकेदार आणि मामुली मतप्रदर्शन समीक्षेच्या नावावर खपणारे बोरूधर हे सदूचे शत्रूच. या लोकांनाही सदूची प्रतिभा पूर्णपणे नाकारणं जमलं नाही. म्हणून त्यांनी सदूची एक आकर्षक पण विपरित प्रतिमा परस्परात पसरवली होती. ती म्हणजे सदू दारूबाज आहे, भांडखोर आणि शिवराळ आहे, विक्षिप्त आणि तऱ्हेवाईक आहे, बेजबाबदार आहे ही.

ही सगळी अर्धसत्यं आहेत. सदू प्यायचा हे खरं. अनेक लोक पितात. काही गुत्त्यात तर काही खाजगी किंवा पंचतारांकित गाभाऱ्यात बसून तर सदू दारू प्यायचा तो मित्रांबरोबर किंवा सर्वसाधारण गुत्त्यात. एवढ्यानं काही माणूस दारूबाज बनत नाही. दारू प्यायल्याावर अंतर्विश्वात दडलेल्या अनेक गोष्टींना वाट मिळायची. कधी विनोदाच्या रुपाने तर कधी शिव्यागाळीच्या स्वरूपात. माणूस आणि कवी म्हणून सदूने जे अन्याय सतत सोसले त्यांच्या संदर्भात हे विसर्जन स्वाभाविक आणि आवश्यकच होतं. त्याच्या जोड्यांपाशी उभं राहायची लायकी नसलेल्या अनेकांच्या सार्वजनिक टिमक्या वाजत होत्या. फालतू लोकांना लेखक म्हणून लोकप्रियता किंवा राजमान्यता मिळत होती. सदूने लग्न केलं नव्हतं. आपल्या कुटुंबासाठी त्याने स्वतःच्या खाजगी जीवनाचा बळी दिलेला होता. कॉलेजच्या वसतिगृहातली जागा निवृत्तीनंतर जाणारच होती. म्हणजे साठाव्या वर्षी हा कवी पुन्हा बेघर होणार होता. उपजीविकेसाठी त्याला जाहिरातीचा मजकूर लिहिणं, पुस्तकाची भाषांतरं करणं असले लेखनकामाठीचेच उद्योग करावे लागणार होते. दुसरीकडे पाहिलं तर समीक्षकांनी त्याची सतत उपेक्षाच केलेली. त्याची कविता वाचकांपर्यंत पोचणं जास्त जास्त दुरापास्त होत चाललेलं. आई आणि भावंडांची जबाबदारी कष्टाने पार पाडणारा सदू नेमका कुटुंबवत्सल नसेल पण बेजबाबदार शराबी नक्कीच नव्हता. जी खंत त्याला कॅन्सरसारखी अखेरपर्यंत कुरतडत राहिली तिच्यातूनच त्याचे तिरसट वैतागाचे उद्रेक यायचे. सदू भोळा आणि हळवा होता पण जन्मभर स्वतःच्या भावना टाळण्याची कोशीस करत तो राहिला. त्याचे विनोत, त्याचं विक्षिप्त वागणं आणि त्यानं श्रमपरिहारासाठी केलेला नशा याचं खरं मूळ हेच आहे; आणि त्याच्या कवितेचंही.

प्रेमातही तिरकसपणा

आपल्या मित्रांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर सदूचं उत्कट प्रेम होतं.

प्रेमसुद्धा त्याच्या कवितेप्रमाणे तिरकसपणे व्यक्त व्हायचं. १९६५-६६पासून आम्ही एकमेकांच्या जवळ आलो तेव्हापासून सदूच्या गुंतागुंतीच्या वागणुकीआडचा त्याचा सरळ माणूसपणा माझ्या ध्यानात येत गेला. "त्या तुमच्या नवऱ्याला सांगा की चांगल्या कविता लिहून कोणाची पोटं भरत नसतात. अडीअडचणीला काही त्याचे संपादक-प्रकाशक धावून यायचे नाहीत," असं सांगून १९६७ साली माझ्या बायकोला स्वतःकडच्या वीस रुपयातले दहा रुपये ठेवून जाणारा सदू आम्हालाच माहीत आहे. १९६६ ते १९६८ ही माझ्या आयुष्यातली ओढाताणीची वर्षं. तेव्हा मी शीवला एका इमारतीच्या गच्चीवर एका खोलीत राहत होतो. रुईया कॉलेजचं वसतिगृह जवळच होतं. त्या काळात पैशाने नव्हे पण नैतिक पाठिंब्याच्या रुपाने मला सदूचा मोठाच आधार होता. त्याचीही परिस्थिती ओढाताणीचीच होती. अधूनमधून एखाद्या गुत्त्यात किंवा कोणा मित्राच्या घरी आम्ही दारू प्यायला एकत्र येत होतो तसेच पूर्ण शुद्धीवर असतानाही भेटत होतो. स्वतः लग्न न केलेला हा 'कलंदर', 'बेजबाबदार' आणि 'विक्षिप्त' गणला जाणारा माणूस तेव्हापासून आजपर्यंत माझ्या अव्यवहारीपणाबद्दल माझी कानउघडणी करत आलाय आणि बायकोची आणि मुलाची मी कशी काळजी घ्यावी यावर त्याने मला प्रवचनं दिलीत!

माझा मुलगा आशय आणि सदूचा वाढदिवस २१ जूनला. यामुळे आमच्या घरात आशयच प्रतिभेनं उजवा, असं सदूचं म्हणणं. यंदाच्या २१ जूनला सदूला साठ वर्षं पुरी झाली. त्याच सुमाराला हा अचानक व्हिस्कीची अर्धी बाटली घेऊन एकटाच माझ्याकडे आला. सुदैवाने माझ्याहीकडे व्हिस्की होती. या खेपेला सदू नेहमीसारखा विनोद करत नव्हता. निवृत्तीनंतर कुठे राहायचं, उपजीविका कशी करायची या काळजीत तो होता. ही काळजी स्वतःसाठी नव्हती. त्याच्या पुतण्याच्या भविष्याची त्याला चिंता होती. कधी नव्हे तो अत्यंत गंभीरपणे सदूने मला स्वतःचा हात दाखवला आणि म्हणाला, "तुला हस्तसामुद्रिक थोडंसं कळतं ना? मला माझं भविष्य सांग!" "मराठी लेखकांना भविष्य थोडंच असतं?" मी विचारलं. "जोक मारू नकोस! येत असलं तर सांग नाहीतर नाही सांगत म्हण," सदू म्हणाला.

चाळीसेक वर्षं मराठी कथेत आणि कवितेत नव्या मूल्यांची भर टाकणाऱ्या प्रतिभावंत आणि गुणी माणसाला साठाव्या वर्षी ह्या महाराष्ट्राच्या राजधानीत राहत्या घराची आणि उपजीविकेची चिंता असावी ही परिस्थिती बोलकी आहे. आमची संस्कृती किती दरिद्री आहे, हे वेगळं सांगायची गरजच काय? हा माणूस स्वतःच्या कमाईतून जितकी नवी-जुनी पुस्तकं विकत घ्यायचा तितकी साहित्य अकादमी आणि साहित्य संस्कृती मंडळाचे सभासद वाचतसुद्धा नसतील. वाङ्मयीन संस्कृतीत पुरेपूर मुरलेला सदू नाना देशांतरी, नाना भाषांमधली कवितेची, नाटकांची, कथांची आणि इतर पुस्तकं वाचायचा. वाङ्मयाच्या बाबतीत त्याची दृष्टी वसुधैवकुटुंबी होती. चित्रकलेत आणि संगीतातही त्याला स्वतःची नजर होती. व्यासपीठापासून दूर राहणारे पण स्वतःच्या कलेच्या रियाझात मग्न झालेले थोडके कलावंत असतात त्यापैकी सदू होता. वाङ्मयाकडे बघण्याची आमची दृष्टी भिन्न होती तरीही कलेच्या व्यापक विश्वाचे आम्ही समानधर्मी नागरीक होतो. माझ्या लेखी जीवनमूल्य आणि कलामूल्य अभिन्न आहेत, तर सदूच्या लेखी कलेला वेगळीच परमार्थिक मूल्यं होती. त्याच्या कवितांमधला ख्रिस्त वस्तुतः कवितेचा क्रूस खांद्यावर घेऊन जाणारा सदू स्वतःच आहे. त्याच्या कवितेतले महारोगी आणि वेडे, कलावंत आणि जगाने वाळीत टाकलेली माणसं ही सगळी कवी सदानंद रेगेचीच आत्मरुपं आहेत. मरणाच्या परिमाणातून सतत जीवन आणि त्याचा काव्यभाषेतला आविष्कार बघणारा सदू आता स्वतःच मरण पावला. शीवच्या स्मशानातल्या विद्युतदाहिनीत जेव्हा सदूचे शरीर राख होताना बघायला मराठी साहित्यिक, सदूचे चाहते आणि सदूचे मित्र खुर्च्यांवर बसले होते तेव्हा माझ्या शेजारी बसलेल्या विजय सिन्हाला मी म्हणालो, "पाठच्या रांगेत सदू तर बसलेला नाही? फटकन एखादा जोक सांगायचा!" आणि ते आटोपल्यावर कोपऱ्यावरच्या दुकानातून मी ब्रँडीची बाटली घेतली आणि इंद्रसेन जयकर आणि सिन्हा यांना म्हणालो, "आयॅम गोइंग टु ड्रिंक टु सदूज हेल्थ. अलोन!"

०००

सदानंद रेगे
['अक्षरगंधर्व' या पुस्तकाच्या मलपृष्ठावरून]

०००

रेग्यांच्या काही कविता- ओझरत्या अंदाजासाठी:


आत्महत्या

या चंद्राचं डोचकं 
असं अचानक कसं फिरलं?
कुणालाच कांही 
न सांगता न सवरतां
समोरच्या बर्चवर 
त्यानं टांगून कां घेतलं?


स्वागत

हुकूमशहा गावात येणाराय
म्हणून ही मुलं खुडून आणल्येत.

कमानी, पताका, बँड, पोलीस;
सूर्यालाही धरून आणलेलं ओलीस.

एक केसाळ हात ढगातून उपटतो
नि मलाही गर्दीत बेमालून ठेवून जातो.

आपोआप एकेका हातात फुगे येतात;
आपोआप बावटे फडफड करू लागतात.

शिट्यांची कोल्हेकुई, पोटात वाफा,
आलालल्ला हुकूमशहाचा लफ्फेदार ताफा.

हुकूमशहाची नजर सहज माझ्याकडे वळते;
पँटीतल्या पँटीत मला चिरकायला होते.


बेमालूम

खरा प्रार्थनेत असणारा
कधी सावध नसतो.
पण त्या दिवशी आमचं तसं नव्हतं.
नाही म्हटलं तरी आम्हाला चाहूल होतीच.
आम्हाला करायची होती पारध.
तुझी उभी काठी कोसळली
अन् आम्ही त्याच्यावर झडप घातली.
बोटं दाखवायला कुणीतरी
हवाच होता आम्हांला
तो अनायासे सापडला.
खरं तर केव्हाचे आम्ही सारे
गोळी होऊन दडून बसलो होतो
त्याच्या पिस्तुलात...
पण कसे दोघेही फसलात!


बोंब

कुठंतरी बॉम्ब पडतच असतात
अन् आपलं च च च आपलं चालूच असतं.

संस्कृतीकाकूंना कॅन्सरची भावना वक्षस्थळाच्या;
आपण त्यांची कंबर चेपीत बॉम्ब लावून.

मग वर्तमानपत्रात बॉम्बची काहीच बातमी नसते;
कुठंतरी पूर... फार तर लठ्ठा पिऊन मेलेल्यांची बातमी, लाथाळ्या.

मग बॉम्बचे फोटो... वा कॅय फोटो घेतलाय!
गाडीत उभ्याउभ्याच हपिसच्या वाटेवर आपण तो पहातो.

आपल्याला खरोखरच फार फार वाईट वाटत असतं.
आपण तरी आणखी काय करणार असतो?

मनात पाल च च च करते हेच फार झालं.
आपल्याला धाप लागते... घशात घुसमटल्यासारखं होतं.

मग संस्कृतीकाकू आपला तो स्तन आपल्या तोंडात देतात.
त्या बॉम्बमधलं कॅन्सरलेलं दूध
आपण घटाघटा पिऊ लागतो. पर्रर्रव्हर्स.

कुठं तरी बॉम्ब पडतच असतात.
त्याच्यासाठीच तर ते घडविलेले असतात.
आपण तरी काय करणार?
कुठंतरी बॉम्ब पडले नाहीत तर आपलं कसं होणार?

बनारस : दुसरी कविता
[बनारस : पंधरा कविता- यातली दुसऱ्या क्रमांकाची कविता]

विरोधाभासांचं
केवढं 

अवाढव्य धूड हे!
याची अगदी
किळसवाणी लाज लाज वाटते.
पण रात्र येते
प्रेतयात्रेसारखी
दबकत दबकत
अन् पाण्यावरच्या नौका
दिशेनाश्या होतात
गहनगूढ नेणिवेत

तेव्हा छातीत
कसं
धुकं भरून येतं

पाण्यावरच्या दिव्यांच्या
आदिम झल्लोळासारखं

2 comments:

  1. Rege hardly mentions Chitre in his biographical book/interview by P S Nerurkar. He mentions many others including Shirwadkar, Pu La etc. To my own surprise, I did not much like these poems above except Bemalum.

    ReplyDelete
    Replies
    1. "Rege hardly mentions Chitre in his biographical book/interview by P S Nerurkar. He mentions many others including Shirwadkar, Pu La etc. "
      या तुमच्या कमेन्टच्या पहिल्या भागावरून कोणाचा गैरसमज होऊ शकतो म्हणून नोंदवतो.

      तुम्ही उल्लेख केलेल्या प्र. श्री. नेरुरकरांसोबतच्या रेग्यांच्या सुमारे ११५ पानांच्या मुलाखतीत (अक्षरगंधर्व, पॉप्युलर प्रकाशन, १९८७)
      पान ८९ पानावर चित्र्यांचा ठळक उल्लेख आहे.
      त्यानंतर पानं ९६-९७ इथे दीड पान अधिक तपशीलवार उल्लेख आहे. त्यातला एक संवाद असा:
      नेरुरकर: त्या काळात दिलीप चित्रेसुद्धा आला ना?
      रेगे: दिलीप चित्रेही आला. कारण त्या काळात 'शब्द' नावाचं अनियतकालिक काढायचे ते. माझ्या घराचा पत्ता शोधत शोधत दिलीप चित्रे आणि अरुण कोलटकर माझ्याकडे आल्याचं आठवतंय. माझ्याविषयी त्यांचं मत बऱ्यापैकी होतं. त्या सगळ्यांचं मग हळूहळू... माझी आणि बाबुरावांची (चित्रे) जवळजवळ.... ते मुंबईत आले... कित्येक वर्षं मला त्यांचं दर्शन नव्हतं. कुणाच्या घरी जाणं मला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे बाबुरावांचा माझा परिचय फार नंतर झाला. ते मुंबईला आल्यानंतर. मी लिहित असे... 'अभिरुची'साठी... ओळख अशी त्यांची फार उशिरा झाली. झाल्यानंतर मग ते सगळं घरगुतीच झालं. दिलीप पुढे सायनला माझ्या त्या हॉस्पिटलजवळच राहायला आला. रोजचं येणंजाणं असायचं. वर्षदोन वर्षं होतं.

      त्यानंतर कवितेबद्दलची मतं, अनियतकालिकवाल्यांचं 'सतत उद्धटपणाने' वागणं, 'आघाडीवर असलेल्यांची टिंगल' करणं, 'ते संपले असं म्हणणं', इत्यादी 'रेग्युलर टेक्निक'बद्दल रेगे मतभिन्नता व्यक्त करतात.

      "येनकेन प्रकारेण वाद घालत राहायचं. आणि वाद घालत राहण्यामुळे प्रकाशात राहता येतं. सोपं आहे. त्याच्या (दिलीप चित्र्यांच्या) गुणवत्तेविषयी मात्र मला काही म्हणायचं नाही. ही इज ए ब्रिलियंट स्मार्ट बॉय... आणि त्याने खूप वाचलेलं आहे... वयाच्या मानाने समज त्याची एकंदर जीवनाविषयी फार चांगली आहे. त्याच्यामुळे तसा मी त्याला उडवणार नाही," असं पान ९७वर शेवटी रेगे म्हणतात.

      पु. ल. देशपांडे यांचा उल्लेख काही वाक्यांपुरता पान ८९ व पान ११३वर येतो. पहिल्या वेळी, 'तुझे आहे तुजपाशी' हे पुलंचं एकच ओरिजिनल नाटक असल्याची टिप्पणी येते, त्यांच्या विनोदाची चाकोरी कशी ठरून गेलेय त्याचा उल्लेख येतो- असं साधारण अर्धा पान. दुसऱ्या वेळी 'बटाट्याच्या चाळी'च्या प्रयोगांसंदर्भात प्रशंसेच्या अंगाने परिच्छेदभर उल्लेख आहे- त्या प्रयोगांमुळे मराठी साहित्यिकांची नावं महाराष्ट्राबाहेर जाऊन पोचली, इत्यादी.

      शिरवाडकरांचा उल्लेख फक्त पान ७०वर, त्यांचं 'राजमुकुट' हे नाटक कोणीतरी बसवलं, या संदर्भात येतो. आत्ता पुस्तक परत धावतं चाळलं, त्यामुळे कदाचित त्यांचा आणखी कुठे ओझरता उल्लेख असेल तर असेलही, पण तरी चित्र्यांइतक्या ठळकपणे निश्चितपणे नाही.

      शिवाय, या तिघांपेक्षाही ठळक व तपशीलवार उल्लेख इतर अनेकांचे आहेत. पण अशी उल्लेखांची स्पर्धा लावण्याचा वरच्या लेखाशी काही संबंध आहे असं वाटत नाही. आपल्या प्रतिक्रियेवरून विनाकारण काहीही गैरसमज होऊ शकतो, त्यामुळे त्यातल्या तीनच नावांपुरता हा तपशील इथे नोंदवतो आहे.

      Delete