|
मुखपृष्ठ : दीपक घारे । चिन्हं व हस्ताक्षर: गणेश चौधरी |
छिन्नमनस्कतेने ग्रासलेल्या आणि मनोविकाराच्या एका झटक्यात स्वतःच्या पत्नीचा व तीन लहान मुलांचा खून केलेल्या व्यक्तीने तुरुंगातून बहुतांशाने नातेवाईकांना, काही इतर परिचितांना लिहिलेली निवडक पत्रं 'काचेचं मन' (मॅजेस्टिक प्रकाशन, १९९०) या पुस्तकात वाचायला मिळतात. मोजकी पत्रं मनोरुग्णालयातून लिहिलेली आहेत. पत्रं लिहिणाऱ्याचं आणि म्हणून या पुस्तकाच्या लेखकाचं नाव गणेश चौधरी असं आहे.
हे पुस्तक दीपक घारे यांनी संपादित केलंय, त्यांचीच प्रस्तावनाही पुस्तकाला आहे आणि गणेश चौधरी यांचे धाकटे भाऊ दिवाकर चौधरी यांचे मोजके 'दोन शब्द'ही पुस्तकाच्या सुरुवातीला आहेत.
गणेश चौधरी यांना जवळपास किशोरवयापासूनच मानसिक अस्थिरता जाणवत असल्याचं या पुस्तकातून कळतं. पण ही अस्थिरता किती गंभीर आहे, हे त्यांना, आजूबाजूच्यांना आणि वेगवेगळ्या डॉक्टरांना वेळीच समजू शकलं नाही. त्यातून शेवटी आपल्याला 'काचेचं मन' / 'नग्न मन' मिळालंय, त्यातले विचार नि भावभावना सगळ्यांना कळतात, सगळंच 'सार्वजनिक' झालंय, आपण खाजगीत काही बोललो तरी सर्वांना ते कळतं. कोणीतरी 'तो' / 'अनोळखी अधिकारी' आपल्यावर लक्ष ठेवून आहे, असे भ्रम त्यांना व्हायला लागले. 'वाटे की, सरकारनं कुठीतरी एक मनकवडा अनोळखी अधिकारी (विद्युत उपकरणांसह जो एसटीत व तुरुंगातही असतो) खास माझ्यासाठी नेमला आहे,' असं ते एका पत्रात लिहितात (पान ६). 'भास, भ्रम, चक्कर, वेड' असं या सगळ्याचं वर्णन चौधरींनी केलंय. हे सर्व किती टोकाला गेलं असावं, याचा अंदाज खुद्द पुस्तकातल्या पत्रांतूनही येतो. १९६८ साली पत्नी व मुलांचा खून केल्यावर त्यांना आधी जळगावच्या तुरुंगात आणि नंतर नागपूरच्या तुरुंगात ठेवण्यात आलं, त्यांना आधी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, पण गांधी जन्मशताब्दीच्या वर्षात, म्हणजे १९६९ साली ती शिक्षा जन्मठेपेपर्यंत खाली आणण्यात आली. याच दरम्यान, नागपूरच्या तुरुंगात असताना चौधरींच्या या विकारावर खऱ्या अर्थाने उपचार झाले, त्यामुळे ते काही प्रमाणात सावरले- किमान या पुस्तकात आलेली पत्रं लिहिण्याइतपत तरी त्यांचं मन आटोक्यात आलं. तरीही आपल्याला जगात अगदी दुर्मिळ असं 'काचेचं मन' जन्मजातच मिळालंय, आणि त्यामुळेच आपण 'वेडे' झालो, असा उल्लेख या पुस्तकांमधल्या जवळपास सर्वच पत्रांमध्ये येतो. ही पत्रं १९६९-१९७९ या कालावधीमधली आहेत.
जळगावातील यावल तालुक्यात डांभूर्णी हे चौधरींचं गाव. त्यांचे वडील यावलचे 'प्रख्यात वकील, देशभक्त', 'पुढारी' असल्याचा उल्लेख पुस्तकात येतो. अशा ''भाऊसाहेबां'चा मुलगा म्हणून वावरल्यामुळे आदर्शाचं फाजील दडपण काय चीज असते ही स्वतः अनुभवली होती', असं चौधरी लिहितात (पान ११३-११४). त्यामुळे 'लहान मुलांना आदर्शाच्या दडपणाखाली मुळीच वाढवू नये' असं त्यांचं मत होतं. स्वतःचा मुलगा तुषार याला 'बागुलबोवांची भीती दाखवू नये' इथपर्यंत ते या गोष्टींवर विचार करत होते. लहानपणी पोकळ आदर्शवादाचं दडपण, नंतर लैंगिकतेचं दडपण, नंतर 'लोक काय म्हणतील' याचं दडपण, अशा अनेक दडपणांचा उल्लेख या पत्रांमध्ये येतो
वास्तविक चौधरींच्या मनात येणाऱ्या आणि या पत्रांमध्ये नोंदवल्या गेलेल्या जवळपास सर्वच भावना आपल्या सर्वांच्या मनात येत असाव्यात, असं वाटतं. शाळा-कॉलेजांमध्ये, पुढाऱ्यांच्या-धुरीणांच्या भाषणांमध्ये किंवा एकंदरच बऱ्याच सार्वजनिक ठिकाणी आदर्शवादी आणि नैतिक भासेल असं बोलण्याचा सोस खूप असतो, पण वास्तव त्याच्या जवळपास फिरकत नाही, वास्तवात साधी समजूतही अनेकदा दिसत नाही. त्यामुळे आदर्शवादाचं- म्हणजे त्यातल्या भोंदूपणाचं- दडपण वातावरणात असतं. पण चौधरींच्या बाबतीत हे दडपण प्रमाणाबाहेर गेल्याचं पत्रांवरून दिसतं. शिवाय, स्त्री-पुरुषांमधलं (विविध लिंगाविष्कारांसह असणारं) शारीर आकर्षण, त्यातून काही स्वप्नरंजन, हाही साधारणतः नैसर्गिक भाग असतो, पण चौधरींना लहान-मोठ्या स्त्रियांचे 'अवयव हवेत भिरभिरत' असलेले दिसायला लागले होते, आणि त्यात त्यांच्याकडून कल्पनेतच काही टोकाची कृत्यं घडत होती, असं ते पत्रांमध्ये नोंदवतात (पान ३५). तसंच, 'लोक काय म्हणतील' हे दडपण तर आपल्या कित्येक सामाजिक आणि वैयक्तिक कृत्यांच्या बुडाशी असल्याचं दिसतं. पण चौधरींच्या बाबतीत या दडपणाची अतिशयोक्ती होत शेवटी कल्पनेतच 'लोक' तयार झाले आणि ते त्यांना वाट्टेल तसं बोलू लागले, मग त्यावर चौधरी त्याहून वाट्टेल तसे प्रतिसाद द्यायला लागले. असा साधारण त्यांच्या या मनोविकाराचा प्रवास या पत्रांमधून वारंवार समोर येतो. 'भास-भ्रम-चक्कर-वेड' असे शब्द ते सतत नोंदवतात.
पुस्तकातल्या उल्लेखानुसार, बी.एससी., बी.एड. झालेला हा माणूस शिक्षक म्हणून काम करत होता, कविता करत होता. तुरुंगात उपचारांनंतर काहीएक स्थिरता आल्यावर त्यांचा 'तृषार्त' हा कवितासंग्रह १९७४ साली प्रकाशित झाला, त्याला राज्य शासनाचा 'केशवसुत पुरस्कार'ही मिळाला. मुळात घरची सुबत्ता, नंतर काहीएक शिक्षण, स्वतः शिक्षक असणं, साहित्यिक रूची असणं, लग्न-मुलंबाळं असं रूढार्थाने स्थिर होणं, ईश्वरावर श्रद्धा असणं- असं त्यांचं एक रूप होतं. पण आपल्याला जन्मजात 'काचेचं मन' मिळाल्यामुळे आपलं खाजगी काही उरलेलं नाही, 'लोक' आपल्याला काहीतरी वाकडंतिकडं बोलतायंत, असा त्यांचा भ्रम वाढत गेला आणि मग त्या भ्रमाला दिलेले तितकेच भ्रामक प्रतिसादही वाढत गेले- असं त्यांचं करुण आयुष्य दिसतं. आणि या भ्रामकतेचं प्रतिबिंब तुलनेने स्थिर मनोवस्थेत लिहिलेल्या त्यांच्या पत्रांमध्येही उमटलेलं आहे. त्यात पुनरावृत्ती आहे, विसंगती आहे, पण तरीसुद्धा पुस्तक म्हणून हा मजकूर महत्त्वाचा ठरतो. का? तर, आधी लोकांना आपल्या मनातलं कळतंय, आपल्याला 'नग्न मन', 'काचेचं मन' मिळालंय, या भीतीने ग्रासलेल्या एका माणसाने शेवटी स्वतःच स्वतःचं मन काही अंशी नग्न केल्यासारखा हा प्रकार आहे. काही अंशी, असं का? तर, 'हे गरगरणारे काही प्रसंग (शरम वाटते तरी) लिहिलेत. सर्व सर्व लिहिणं अशक्य. केवळ अशक्य,' (पान ७३) 'सर्वच लिहिणं अशक्य' (पान ७९)- असं त्यांनी स्वतःच म्हटलंय आणि तो अंदाज आपल्याला येतो, त्यामुळे एका तडकलेल्या मनाचा थोडाफार अदमास देणारं हे पुस्तक आहे.
चौधरी यांना स्वतःविषयीच्या काही गोष्टी लिहिणं अशक्य वाटलं, हे एकंदर परिस्थिती बघता समजून घेण्यासारखं आहे. पण हे पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी काही गोष्टी करणं शक्य होतं, किंबहुना गरजेचं होतं, असं वाटतं. उदाहरणार्थ, डॉ. अडबे नावाच्या मानसोपचारतज्ज्ञांना १९६८-६९दरम्यान नागपूरच्या तुरुंगात चौधरी यांची केस दाखवण्यात आली. डॉ. अडबे यांनी पाहिलं तेव्हा खोलीत चौधरी 'नग्नावस्थेत होते, चेहरा संतापलेला होता, आणि तोंडाने अखंड शिव्या चालू होत्या' (प्रस्तावना, पान सात). तर, इतक्या टोकाला गेलेल्या रुग्णाला पुन्हा काहीएका किमान स्थिर स्थितीपर्यंत आणणाऱ्या या डॉ. अडबे यांचं पूर्ण नावसुद्धा पुस्तकात दिलेलं नाही. त्यांना चौधरींनी लिहिलेलं एक पत्र (पानं १२६-१२७) पुस्तकात येतं, त्यावरून त्यांच्यामुळे चौधरींना काही प्रमाणात मनाचा तोल सावरता आल्याचं अधिक ठळकपणे लक्षात येतं. 'काचेचं मन' हे पुस्तक १९९० साली प्रकाशित झालं, तेव्हा डॉ. अडबे यांचं वय किती होतं, ते हयात होते का, असल्यास त्यांचीही प्रस्तावना किंवा किमान त्यांच्याशी संवाद साधून काही मजकूर या पुस्तकाला जोडता आला असता. डॉ. अडबे यांनी गणेश चौधरींविषयी लिहिलेलं पत्र दिवाकर चौधरी यांनी 'स्क्रिझोफ्रेनिया' या नावाने लिहिलेल्या दुसऱ्या- पण याच त्यांच्या भावाशी निगडीत अनुभवपर पुस्तकात उर्द्धृत केलं आहे, तर तसा तरी किमान काही मजकूर या पुस्तकात देता आला असता. गणेश चौधरींच्या इतक्या छिन्नविछिन्न झालेल्या मनाला सावरणाऱ्या माणसाची बाजू 'काचेचं मन' या पुस्तकात ठळकपणे समोर येणं आवश्यक होतं. (किंवा दुसऱ्या एखाद्या मानसशास्त्रात तज्ज्ञ असणाऱ्या, पण तरी बाकीच्या आसपासच्या घडामोडींची किमान जाण ठेवणाऱ्या कोणाची प्रस्तावना घेता आली असती).
त्याहून आणखी दुःखद आणि गंभीर उणीव या पुस्तकात आहे. चौधरी यांच्या हातून त्यांच्या तीन मुलांचा व पत्नीचा खून झाला. त्यांच्या पत्रांमध्ये 'तुषार' या एकाच मुलाचा उल्लेख अनेकदा येतो. तो या तीन लहानग्यांमधला त्यातल्यात्यात मोठा मुलगा असल्याचं संबंधित उल्लेखांवरून, चौधरी आणि त्याच्यामध्ये झालेल्या छोट्या संवादांमधून कळतं. पण राजेंद्र आणि गीतांजली अशी आणखी दोन मुलं त्यात होती, हे 'काचेचं मन' या पुस्तकात स्पष्टपणे आलेलं नाही. चौधरींच्या पत्नीचाही उल्लेख काही वेळा 'ती' म्हणून पत्रांमध्ये आलाय, पण त्याहून अधिक त्या व्यक्तीविषयी काहीच आलेलं नाही. लग्नानंतर पाच वर्षांच्या काळात या बाईने काय पाहिलं असेल, सहन केलं असेल, याची कल्पना करायची म्हटली तरी अवघड आहे! 'भारतीय स्त्रीचा प्रमुख गुणधर्म म्हणजे सहनशीलता, सोशिकता'- असं गणेश चौधरींनी एका पत्रात लिहिलंय (पान १२५). त्यांची मनस्थिती लक्षात घेता, त्यांच्या अशा साचेबद्ध मतावर आपण वाचक म्हणून आणखी किती भार देणार! पण त्यांच्या पत्नीच्या सहनशीलतेची काहीही दखल या पुस्तकात स्वतंत्रपणे घेतलेली नाही.
'गणेशदा गहिरा ग्रेट माणूस होता. [...] गहिरा मोठा साहित्यिक आहे, गहिरा मोठा विचारवंत आहे. आता हे तं तुम्हले (ही पत्रं) वाचल्यावर कळीलच,' असं दिवाकर यांनी 'दोन शब्द' या प्रस्ताविकपर मजकुरात लिहिलंय. गणेश चौधरी यांची अवस्था समजून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चितपणे महत्त्वाचं आहे, पण त्याच मनोवस्थेमुळे या पत्रांमधून अनेक गोष्टी निसटलेल्या आहेत, अनेक पुनरावृत्ती आहेत, आणि अनेक गोष्टी सरधोपटपणे आल्या आहेत, पत्रलेखकाला विचारवंत म्हणावं असं काही सदर नोंद लिहिणाऱ्याला तरी त्यात सापडलं नाही. पत्रलेखक म्हणून चौधरींचा हा दोष म्हणण्याची गरज नाही, कारण त्यांची मानसिक अवस्थाच बिकट झालेली होती. पण त्यांचा मानसिक तोल ढळला म्हणून त्यांची 'प्रतिभाशक्ती' उत्तुंग होती, असं मानण्याची गरज नाही. अशी 'कलावंताला वेगळं स्थान देणारी वृत्ती योग्य नव्हे', असा इशारा घारे यांनी संपादकाच्या प्रस्तावनेत दिला आहे (पान एकोणीस). पण तरी, 'साहित्याचा आविष्कार म्हणूनही या पत्रांना वेगळं महत्त्व आहे. या पत्रांमधली भाषा, अनुभवांमधली उत्कटता आणि त्यांतले विचार यातून शापित प्रतिभेचा वेगळाच आविष्कार पाहायाला मिळतो', असंही त्यांनी लिहिलंय (पान नऊ). ही मतमतांतरं बाजूला ठेवली, तरी पुस्तकाचा मूळ आशय असलेलं छिन्नविछिन्न झालेलं मन केवळ त्या मनासोबतच्या शरीरावर- म्हणजे गणेश चौधरींवरच परिणाम करत नव्हतं, तर त्यांच्या आजूबाजूच्या भवतालावरही परिणाम करत होतं. त्यांच्या सर्वांत निकटच्या भवतालामधल्या पत्नीला व तीन मुलांना जीव गमवावा लागला. ही पत्नी रात्री त्यांचं डोकं मांडीवर ठेवून चेपून द्यायची, त्यांना होणारे भास हे भासच आहेत असं तिच्या परीने समजावत राहायची, ते बरे होतील असं आश्वस्त करत राहायची. 'माझ्या मनाचा कोळसा होतो हो!' असं म्हणत 'तोंड फिरवून तिने हुंदका गिळला', असा हेलावून टाकणारा उल्लेख चौधरींनी केलाय (पान १५६). पण 'तिच्या मनाचा कोळसा होतोय हे मला कसं समजावं?' असा त्यांनी नोंदवलेला प्रश्न त्यांच्या मनस्थितीच्या संदर्भात आला आहे. त्यांना तिच्या मनाचा कोळसा होतोय हे स्वाभाविकपणे समजणं शक्य उरलं नव्हतं, आणि नंतर या पत्रांमध्येही तसं काही आलेलं नाही, हे त्यांच्या मनस्थितीशी जुळणारं आहे. त्यामुळे पत्रांमध्येच असे उल्लेख असायला हवे होते, असं नाही. पण चौधरींची पत्रं प्रकाशित करताना तरी त्या बाईचं मन समजून घेणं गरजेचं होतं, तिच्याबद्दल कुटुंबियांकडून मिळणारा तपशील तरी नोंदवला जायला हवा होता. त्यातल्यात्यात मोठा असलेला मुलगा त्याच्या वडिलांच्या या अस्थिर अवस्थेबद्दल कुटुंबातल्या इतर कोणाशी चार शब्द बोलला असेल तरी तेवढं दिवाकर चौधरी यांच्या 'दौन शब्दां'मध्ये नोंदवलं असतं तर ते अधिक रास्त झालं असतं. (शिवाय, ही निवडक पत्रं आहेत, इतर पत्रांत काही उल्लेख असतील तर ते आपल्याला वाचक म्हणून माहीत नाही, हेही आहे). या सगळ्यात गहिरं कारुण्य आहे, पण सध्याच्या पुस्तकात ते बरंच एका बाजूने- केवळ गणेश चौधरींच्या बाजूने- ठसतं. अशा बाबतीत रुग्ण व्यक्तीसोबत इतर निकटच्या व्यक्तींवर झालेल्या परिणामांचाही अधिक ठळक उल्लेख अशा संकलनात कुठेतरी असायला हवा.
या पुस्तकाची नवीन आवृत्ती नंतर कधी आली नाही. चुकून कधी अशी नवीन आवृत्ती निघाली, आणि संबंधितांना योग्य वाटलं तर वरच्या मुद्द्यांनुसार भर घालता येईल. पण मुळात या पुस्तकाची आवृत्ती कशाला यायला हवी?
तर-
एकीकडे, 'मोटिव्हेशनल स्पीकिंग', 'सेल्फ-हेल्प' धाटणीची पुस्तकं, मनाची शांतता कशी राखावी यासाठीचे धार्मिक नि आधुनिक मानसशास्त्राशी संबंधित मार्ग- याबद्दल अनेक पुस्तकं, भाषणांचे/मुलाखतींचे व्हिडिओ, छोटी-मोठी अवतरणं वेगवेगळ्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात दिसतात. म्हणजे सध्याच्या माणसांना मानसिक उलथापालथीला सामोरं जाताना मन थोडं स्थिरस्थावर राहावं यासाठी अशा गोष्टी गरजेच्या वाटत असाव्यात. काल जागतिक मानसिक आरोग्य दिन होता, तेव्हा हे अधिक लख्खपणे दिसत होतं. दुसरीकडे, 'लोक काय म्हणतात' याबद्दलचं प्रचंड दडपण चौधरींवर होतं; हे दडपण माणसाच्या जगण्यात पूर्वीपासून राहत आलं असलं तरी, आता आपण जगतोय त्या 'लाइक, सबस्क्राइब, शेअर'च्या काळात कोणाला किती 'फॉलोअर' आहेत यावर प्रतिमांची निर्मिती कशी होते, हे आपण पाहतोच ना? यात खरे लोक किती आणि आपण कल्पना केलेले 'लोक' किती, याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न आपण करतो का? आपल्यावरचं हे दडपण आधीच्या तुलनेत वाढलंय का? चौधरींनी एका ठिकाणी म्हटलंय, 'स्वतःचाच शोध घेत होतो तर मी. स्वतःच्या प्रतिबिंबावर लुब्ध होऊन चेहऱ्याची व्यक्ती बाहेर शोधणाऱ्या नार्सिसससारखा. स्वतःवरच भाळला जाऊन स्वतःलाच शोधत वणवण फिरणाऱ्या वेड्या नार्सिसससारखा. पण तो भाळला; मी पोळलो आहे.' (पान ९६) हे वर्णन खरंतर त्यांनी स्वतःच्या मनोविकाराविषयी केलंय, पण पुढून-मागून कॅमेरे असलेल्या स्मार्टफोनच्या काळात तेच वर्णन कोणाकोणाला लागू पडेल?
'काचेचं मन' या पुस्तकाचा लेखक एका आत्यंतिक टोकाला जाऊन आदळला. आपण त्या टोकाला गेलेलो नसू, आपल्या हातून तितकी हिंसा झाली नसेल, पण आपल्या वागण्याचे असे काही कमी-अधिक तीव्रतेचे परिणाम होतायंत का? आपण स्वतःवर असे काही कमी-अधिक तीव्रतेचे परिणाम करवून घेतोय का? असे प्रश्न या निमित्ताने नोंदवता येतात.
महत्वाच्या विषयावर अर्थपूर्ण टिपण.
ReplyDeleteतू नाटककार स्वदेश दीपक ह्यांचं "मैने मांडू नाही देखा" हे पुस्तक वाचलंयस का? त्यांच्या स्किझोफ्रेनियातल्या अनुभवांची रोजनिशी आहे. हल्लीच जेरी पिंटोने त्याचं इंग्रजी भाषांतर केलंय.
ReplyDeleteया हिंदी पुस्तकाविषयी आणि त्याच्या इंग्रजी भाषांतराविषयी वाचलं आहे, पण खुद्द पुस्तक अजून वाचलेलं नाही.
Delete