फोटो : रेघ (८ ऑक्टोबर २०२४). [माणसांची व ठिकाणांची नावं पुसली आहेत.] |
फेब्रुवारी २०२४मध्ये रेघेवर 'बहुकल्ली राम, एककल्ली पंतप्रधान' अशी नोंद केली होती. अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापनेवेळी पंतप्रधानांनी केलेली एककल्ली विधानं आणि भारतात लोकपातळीवर रुजलेली रामायणाची बहुकल्ली कथनं- त्याबद्दल ए. के. रामानुजन यांनी लिहिलेला 'थ्री हंड्रेड रामायणाज्' हा निबंध, अशा संदर्भातली ती नोंद होती. त्या नोंदीत शेवटी एक फोटो चिकटवला होता. तो फोटो एका शहरातील 'पीर बाबा नवरात्र मंडळा'ने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसंदर्भात शुभेच्छा दिल्याचा होता.
फोटो : रेघ (२२ जानेवारी २०२४) |
"पीर बाबांना मानणाऱ्या व्यक्तींना फक्त मुस्लीम श्रद्धांपुरतं मर्यादित राहता येत नाही म्हणून त्यांच्या नावाचं नवरात्र मंडळ निघतं, किंवा नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्यांना फक्त हिंदू श्रद्धांपुरतं मर्यादित राहता येत नाही म्हणून पीर बाबांचं नाव नवरात्र मंडळाला द्यावं वाटतं. मग अयोध्येत राम मंदिर उभारलं जाताना त्याचा फलकही उभारावा वाटतो." अशा वरकरणी विसंगत दिसणाऱ्या गोष्टींची अंगभूत संगती आपल्याला नुसती अभ्यासकीय काटेकोरपणे किंवा राजकीय दुराग्रहाने लागत नाही. ए. के. रामानुजन यांना त्यांच्या वडिलांमध्येही अशी विसंगती दिसली होती-.आपले वडील खगोलविज्ञान आणि ज्योतिष दोन्हींमध्ये सारख्याच उत्कटतेने रमतात, याने रामानुजन अस्वस्थ झाले. पण मग त्यांना या सर्व विसंगतीमधलं बहुकल्लीपण जाणवलं आणि ते भारतीय समाजमनामध्येही पसरल्याचं वाटलं. ते काही कायम असंच असेल किंवा आदर्श कायतरी असेल, असं नाही; पण आपल्या भवतालाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन म्हणून आपण हा एक विचार समजून घेऊ शकतो.
तर, अशा सगळ्या अवकाशात पीर बाबांचं नाव नवरात्र मंडळाला लागतं, कारण हे मंडळ ज्या शहरात आहे तिथून जवळच बाबर शेख या मुस्लीम संताचा उरूस दर वर्षी होतो, आणि त्याचं आयोजन करण्याची मुख्य जबाबदारी हिंदू लोकांवर असते. हे वर्षानुवर्षं सुरू आहे. त्या परंपरेमागच्या कथाही प्रचलित आहेत. तिथे जाणारे भाविक हिंदू-मुस्लीम दोन्ही असतात. तसंच, त्या उरुसादरम्यान संबंधित शहरात एक मुस्लीम माणूस त्याच्या घरच्या परंपरेनुसार एकीकडे पीर बाबांची खूण म्हणून हिरव्या कापडात गुंडाळलेला तांदळाचा एक छोटा ढीग ठेवतो आणि शेजारी अंबाबाईची मूर्तीही ठेवतो, मग नऊ दिवस दोन्हींची पूजा होते- मागे मक्केचा फोटोही असतो! त्या माणसाकडच्या घरगुती परंपरेला जवळच्या गावातील बाबर शेख उरुसाइतकी प्रसिद्धी नाही, तरी त्याच्या आसपासचे हिंदू-मुस्लीम लोक त्याच्या घरी दर्शनाला येऊन जात असतात. तुम्ही ही पूजा कधीपासून करताय, असा प्रश्न संबंधित माणसाला विचारला तर त्याला त्याचं उत्तर माहीत नाही. पण त्याला ही सरमिसळ सुरू ठेवावी असं मात्र वाटतं. ही सरमिसळ काहींना समजत नाही, पटत नाही, रुचत नाही. मग त्यांना 'पीर बाबा नवरात्र मंडळ' हे नावही बदलावं वाटतं, आणि एकोणीस वर्षं ज्या नावासह नवरात्र साजरी केली ते नाव बदलून विसाव्या वर्षी या मंडळाचं नाव 'आई माऊली नवरात्र मंडळ' असं केलं जातं. त्या 'नामांतरा'चा स्वतंत्र फलक लावावा वाटतो. त्या फलकाचा फोटो या नोंदीच्या सुरुवातीला चिकटवला आहे.
दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनाचीही एक खूण मानली जाताना दिसते. पण नामांतराच्या फोटोत दिसतेय ती खूण सीमा ओलांडण्याऐवजी स्वतःची सीमा आणखी संकुचित करणारी आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ही छोटी नोंद करावी वाटली.
०
भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आसपास लिहू लागलेले, आणि सहज-साध्या भाषेत काही वेगळ्या वाटेचं लेखन करून गेलेले दि. बा. मोकाशी यांनी त्यांच्या लेखनप्रवासाची सुरुवात कशी झाली, याबद्दल एक लेख लिहिला होता. तो त्यांच्या 'लामणदिवा' या कथासंग्रहात (मौज प्रकाशन) सुरुवातीला छापलेला आहे. त्यात ते एक आठवण नोंदवतात, ती अशी:
त्या वेळी माझ्या बरोबरच्या लेखकांशी माझ्या फारशा ओळखीच नव्हत्या. पु. भा. भावे यांची गाठ 'मौजे'च्या कचेरीत पडली ती वादातच संपल्याचं आठवतं. ते ज्या 'हिंदुत्व'वादी मतांचे अभिमानी होते ती मतसरणी मला पटणारी नव्हती. मीही तावातावानं वाद घातलेला आठवतो. भाव्यांची विचारसरणी मला प्रतिगामी व अट्टाहासी वाटते हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं.
पु. भा. भावे हे विद्यमान पंतप्रधानांच्या एककल्ली विचारांचे कट्टर पूर्वसुरी होते. त्यांच्याशी मोकाशींचं वाजलं. चार पानांनंतर दुसऱ्या एका संदर्भात मोकाशी लिहितात:
मी निष्ठावंत लेखक नव्हतो. विज्ञानाकडे माझा ओढा होता आणि धर्म व तत्त्वज्ञान यात मी रमत होतो.
'निष्ठावंत लेखक नव्हतो' म्हणजे मोकाशी फक्त लेखनावर निष्ठा असलेले नव्हते, असा या विधानाचा अर्थ आहे. रेडिओ-दुरुस्ती करताकरता ओघवत्या मराठीत कथा लिहिणाऱ्या मोकाशींचा विज्ञानाकडे ओढा होता, पण ते धर्म नि तत्त्वज्ञान यातही रमत होते. हे वाचून रामानुजन यांच्या निबंधाची आठवण होऊ शकते. तर, मोकाशींच्या या धारणेतून 'पालखी' हे प्रत्यक्ष आषाढीच्या वारीसोबत प्रवास करून लिहिलेलं पुस्तक, 'आनंदओवरी' ही संत तुकारामांचा भाऊ कान्हा याच्या दृष्टीभूमीवरून लिहिलेली सखोल-सुंदर कादंबरी, असे काही मजकूर आपल्याला मिळाले. केवळ आपली वैज्ञानिक दृष्टी समोरच्या प्रत्येक घटनेवर लादून अहंकाराने निष्कर्ष काढण्याऐवजी, तसंच राजकीय दुराग्रहाने श्रद्धेचा वापर करण्याऐवजी किंवा निव्वळ श्रद्धेने ओथंबून बेभान होण्याऐवजी, अधिक सहानुभूतीने काही गोष्टी समजून घेण्याचं कसब मोकाशींकडे होतं, असं वाटतं. लेखनाच्या पातळीवर काहीएक कमी-अधिक सीमोल्लंघन करण्यासाठी त्यांना ते कसब उपयोगी पडलं असावं. त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने आणि आधीच्या फलकाच्या निमित्ताने त्यांची आठवण ठेवावी वाटली.
दि. बा. मोकाशी (१९१५-१९८१) फोटो : इथून. [सौजन्य: जया दडकर / मोकाशी कुटुंबीय] |