Tuesday, 12 November 2024

'माझी आई ही नाचणारी बाई होती'

एक

मुखपृष्ठावरील छायाचित्र : लेखकाच्या संग्रहातून
मुखपृष्ठ रचना : अमित मल्होत्रा /हार्पर कॉलिन्स
मनिष गायकवाड यांनी लिहिलेलं 'द लास्ट कोर्टिझन' (हार्पर कॉलिन्स, २०२३) हे पुस्तक म्हणजे त्यांची आई रेखा देवी यांच्या आयुष्याची कहाणी आहे. ही कहाणी रेखा आपल्या मुलाला सांगतायंत अशा पद्धतीने लिहिलेय. पण स्वतः रेखा यांना कधीच बोलता-लिहिता-वाचता न आलेल्या इंग्रजी भाषेत हे पुस्तक आहे. थोडक्यात, मुलाच्या शब्दांमध्ये आईची ही कहाणी आपल्याला वाचायला मिळते. 

बंजारा समुदायातली आई आणि कंजारभाट समुदायातला बाप यांच्या पोटी रेखा यांचा जन्म झाला. घरात रेखा यांच्यासह नऊ मुलीच झालेल्या- ‘अपयशी प्रयत्नांचं प्रदर्शन मांडल्यासारख्या’ (पान ३). कुटुंबात मुलगा जन्माला येईल याची सगळेच वाट बघत होते. ‘आम्ही नकोशा झालोयत किंवा आमच्यावर कोणाचं प्रेम नाहीये, असं आम्हाला वाटलं असेलही, पण आम्हाला याहून चांगली काही स्थिती ठाऊकच नव्हती, कारण तसा काही विचार करायला, आमच्या आईबापाचं प्रेम आणि माया मिळवायला काही वेळच आमच्याकडे नव्हता,’ असं रेखा सांगतात (पान ३). आयुष्यात पुढेही रेखा यांना यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. हाताशी असलेला सगळा वेळ जीव जगवण्यासाठीची प्राथमिक सोय लावण्यात गेला. पण त्यांनी स्वतःच्या मुलाला मात्र प्रेम आणि माया दिली; स्वतःचा जन्म ‘अपयशी प्रयत्न’ म्हणून झाल्याची भावना त्यांच्या मनात आली असली तरी, स्वतःच्या मुलाला मात्र ‘आपल्याहून चांगलं भविष्य’ (पान १५०) लाभावं यासाठी त्यांनी यशस्वी खटपट केली. ही खटपट साधारण साठच्या दशकापासून सुरू होते; पुणे, आग्रा, कलकत्ता, मुंबई, मग पुन्हा कलकत्ता अशा शहरांमध्ये उलगडत राहते; आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी रेखा यांचं निधन होतं तेव्हा ही खटपट थांबते. आईने जगाचा निरोप घेण्यासाठी ‘प्रेमाचा दिवस’ निवडल्याचं लेखक पुस्तकात शेवटी म्हणतो (पान १७०). प्रेम आणि प्रयत्न, हे आता वापरून गुळगुळीत झालेले शब्द आहेत. पण या पुस्तकात त्या शब्दांचे अधिक उत्कट, अधिक रोजमर्राचे, अधिक अटीतटीचे, अधिक जीवनमरणाचे आणि जीवघेणेही अर्थ समोर येतात. 
 
रेखा यांच्या आईचं नाव गुलशन देवी. तिला तिच्या मुली ‘गुल्लो’ म्हणायच्या. गुल्लो यांचा नवरा ताडिया हा पुण्यात पिंपरीमध्ये एका मोटर कंपनीत वॉचमनची नोकरी करायचा. रात्रीची ड्युटी आणि दिवसभर घरात झोपणं. कायम दारूमुळे शुद्ध हरपलेली. गुल्लो नवऱ्याला सांभाळून घ्यायची- एखादं पाळलेलं असहाय जनावर असतं, गाय असते, तिला आपण सांभाळतो, तसंच गुल्लो नवऱ्यालाही सांभाळायची, असं रेखा सांगतात (पानं ३-४). गुल्लो सतत कामात असायची- कधी कोणाच्या शेतात जाऊन काम कर, कधी कोणाच्या लग्नात जाऊन धुणीभांडी कर, गायी-बकऱ्या पाळून पूरक उत्पन्न कमाव, अशातच तिचा वेळ जात होता.
 
रेखा नऊ-दहा वर्षांची असताना तिचं रामलाल नावाच्या एका माणसाशी लग्न लावून देण्यात आलं. खरंतर तिच्या आधीच्या काही बहिणी लग्नाच्या उरल्या होत्या, पण तरी तिचा नंबर आधी लागला. तो का लागला, हे तिला माहीत नाही. रेखाच्या मरण पावलेल्या आजीने पूर्वी कधी रामलालच्या कुटुंबाकडून काही कर्ज घेतलेलं, ते पुढेही कोणाला फेडता आलं नाही, म्हणून शेवटी हा लग्नाचा व्यवहार झाला असावा, असं बहिणींच्या कुजबुजीतून रेखाच्या कानावर येतं. म्हणजे आपल्याला घरच्यांनी टाकलं का, की विकलं, असे प्रश्न रेखाला पडतात. मग नवऱ्यासोबत ती दिल्लीजवळ आग्र्याला राहायला जाते. तिथे ती सतत घरकामात गुंतून सासूची बोलणी खात तीन-चार वर्षं राहते. या दरम्यान, एकदा सासरच्यांसोबत एका बागेत फिरायला गेल्याची आठवण रेखा यांनी नोंदवलेय. त्या बागेच्या शेजारी संगमरवराची एक इमारत होती, तशी सुंदर वाटत होती, पण ती इमारत म्हणजे काय आहे हे कोणी रेखाला सांगत नाही, तीही कोणाला विचारत नाही, आणि कोणी इमारतीच्या आतही जात नाही. मोकळ्या हिरवळीवर बसून सगळे सोबत नेलेले पदार्थ खातात, रामलालची बहीणभावंडं तिथे खेळतात, पण त्याच वयाची रेखा काही त्यांच्यात जाऊन खेळू शकत नाही. 'त्या वेळी मला ताज महाल हे काय आहे ते माहीत नव्हतं, आणि आम्ही त्याच्या जवळ राहत होतो हेही माहीत नव्हतं. प्रेमाचा काही स्पर्श मला झाला नव्हता. आग्र्याच्या वातावरणात प्रेम असेल समजा, तरी ते माझ्या आसपास तरी कधी फिरकलं नाही,' असं रेखा म्हणतात (पानं १६-१७).

साधारण बारा-तेरा वर्षांचं वय होईपर्यंत रेखा आग्र्याला नवऱ्याच्या घरी राहतात. त्यानंतर एकदा सासू-सासऱ्यांसोबत रेखा यांना कलकत्त्याकडे पाठवलं जातं. जाताना वाटेत ट्रेनमध्ये रेखाला मांड्यांपाशी ओलसरपणा आल्याचं जाणवतं. ती बाथरूममध्ये जाते, तर तिला रक्त दिसतं. पुण्यात असताना तिला बहिणींकडून पाळीबद्दल कळलेलं असतं, त्यामुळे स्वतःची पाळी सुरू झाल्यावर तिला काही गडबडायला होत नाही. मग ती तिथेच ट्रेनमध्ये कोपऱ्यात बसून तिच्या आवडीचं लिंबाचं लोणचं खात राहते. कलकत्त्याला रामलालची एक बहीण कोठ्यात असते, तिच्याकडे रेखाला सोपवण्यात येतं. आपलं लग्न म्हणजे फसवणूक होती, हे इथे तिच्या लक्षात येतं; आणि तोवर आपल्या आयुष्यात काय चाललंय याचा काहीच पत्ता न लागणाऱ्या रेखाला इथून पुढे मात्र स्वतःचे निर्णय स्वतःच्या हातात घेणं गरजेचं असल्याचं लख्खपणे जाणवतं, त्यासाठी ती लागेल ती किंमत मोजायला तयार होते. तवायफ म्हणून कोठ्यात नाचताना शारीरिक संबंधांचा व्यवसाय सर्वसाधारणपणे केला जात नाही. तर, अशा नाचाच्या वातावारणात रेखा यांना जगण्याचं भान येत जातं. एकदा नाचाच्या पार्टीसोबत बाहेरगावी कार्यक्रमासाठी गेलेली असताना तिथला बांगड्या तयार करणारा इसम रेखाच्या प्रेमात पडतो. ती तंबूत झोपलेली असताना तो रात्रभर बाहेर वाट बघत राहतो. मग ती उठल्यावर तिला नाव विचारतो. ती भिडस्तपणे स्वतःचं नाव सांगते. आत्तापर्यंत आपल्याला कधीच कोणी इतक्या प्रेमाने स्वतःचं नाव विचारलं नसल्याचंही तिला जाणवतं. तो तिच्या प्रेमात असल्याचंही तिला कळतं, पण त्या टप्प्यावर रेखाकडे प्रेमासाठी वेळ नसतो. बांगड्यावालाही इतर कोणतीच अपेक्षा न ठेवता, रेखा त्या भागात असते तोवर नाच बघायला येतो, आणि ती कलकत्त्याकडे जायला निघते तेव्हा ट्रेनपाशी येऊन तिला बांगड्यांनी भरलेला बॉक्स तिला भेट देतो. इतकंच. त्या इसमाचं नाव रेखा यांना आठवत नाही, पण प्रेमभावनेची किंचितशी जाणीव तेव्हा पहिल्यांदा झाल्याचं त्या सांगतात (पान २७-२८). 

कलकत्त्यातील बंदूक गल्लीमध्ये असणाऱ्या कोठ्यात नाचून मिळालेलं उत्पन्न रेखाला स्वतःकडे ठेवता येत नाही, ते तिला तिच्या नणंदेकडे द्यावं लागतं. या गुलामगिरीतून सुटकेचा मार्ग तिला सापडत नसतो. पण दरम्यान बांग्लादेशमुक्तीची चळवळ जोर धरू लागलेली असते, त्यात पूर्व सीमेवर भारत-पाकिस्तान युद्धाला तोंड फुटतं. त्या ब्लॅकआउटच्या काळात अनेकांची धांदल उडते. 'कुठल्या तरी सीमेवर युद्ध होत असल्याचं लोक बोलत होते... पण माझ्या डोक्यात आधीच युद्ध सुरू होतं,' असं रेखा सांगतात (पान २९). या धांदलीत कोठेही रिकामे होऊ लागतात. हा अंधारच आपल्यासाठी सुटकेची संधी घेऊन आल्याचं रेखा यांच्या लक्षात येतं. मग रेखा कोठ्यात अंधारामध्ये मेणबत्त्या लावून नाचते. 'गाईड'मध्ये वहिदा रेहमान 'आज फिर जीने की तमन्ना है' म्हणत नाचते तसं (पान २९). अशा काळातच वेगवेगळ्या प्रकारचे पुरुष जास्त संख्येने कोठ्यात आल्याचं त्या नोंदवतात. एकदा तर बांग्लादेशी स्वातंत्र्यासाठी लढणारे काही लोकही येऊन गेले, असं त्या म्हणतात. या वेळी मिळालेल्या पैशातून रेखामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. मग युद्धकाळ संपल्यावर नणंद परत येते तेव्हा तिला आपण जुमानत नसल्याचं रेखा तोंडावर सांगतात, आणि स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू ठेवतात. 

असाच काळ जातो. कोणीतरी मधेच कुचकेपणाने रेखा 'वांझ' असल्याची अफवा पसरवू पाहतं, ते रेखाला बोचतं. शिवाय, आता आपण स्वतंत्र झालोय तर स्वतःचं कुटुंब असायला हवं, असंही तिला वाटतं. मग तिच्या प्रेमात असणाऱ्या रेहमत खान या विवाहित पुरुषाकडे ती आपल्याला मूल हवं असल्याची इच्छा बोलून दाखवते. आपल्यापासून मूल झाल्यावर तरी रेखा आपल्याशी लग्न करेल, असा रेहमतचा होरा असतो. पण रेहमतशी लग्न करून पडद्याआड जगण्याची आणि धर्म बदलण्याची रेखा यांची तयारी नसते. त्यामुळे त्या लग्नाशिवाय फक्त अपत्यप्राप्तीपुरतं त्याला जवळ करतात. त्याआधीही त्यांचे शरीरसंबंध आलेले असतात. पण रेहमत बाकी काही जबाबदारी घेण्याइतका सक्षम नसतो. तो रेखा यांच्या गरोदरपणात किंवा पुढेही त्यांना मदत करत नाही. उलट काही काळ त्याचा बराच त्रास रेखा यांना सहन करावा लागल्याचे प्रसंग पुस्तकात येतात. या संबंधांमधून जन्मलेल्या मुलाला- मनिषला- रेखा स्वतःच्या बळावर वाढवू लागतात. याच काळात त्या पिंपरीतल्या कुटुंबियांशीही पुन्हा संपर्क साधतात, आपल्या काही बहिणींना शिकवायचा प्रयत्न करतात. पण ते प्रयत्न यशस्वी होत नाही. रेखा यांची लच्छा नावाची एक बहीण कलकत्त्याला आलेली असते. अबोल स्वभावाच्या लच्छाला थोडा दृष्टिदोष असतो. अशातच नातलगासोबत कलकत्त्याहून पुण्याला परत जात असताना ती एका रेल्वेस्टेशनवर उतरते आणि ट्रेन निघून जाईपर्यंत वेळेत डब्यात परतू शकत नाही. नातलगाचंही तेवढ्या वेळेत लक्ष जात नाही, आणि ही बहीण कायमची हरवते. बहीण हरवल्याचं दुःख रेखा यांच्या मनात घर करतं.

मनिषच्या बाबतीत मात्र रेखा यांचे प्रयत्न वाया जात नाहीत. कोठ्यावर येणाऱ्या एका शिक्षकाच्या मदतीने त्या मनिषला दार्जिलिंगमध्ये इंग्रजी बोर्डिंग स्कूलमध्ये टाकतात. तिथे त्याचं नाव नोंदवताना बापाचं मुस्लीम नाव आणि आईचं हिंदू नाव अडचणीचं ठरेल म्हणून त्या स्वतःच्या एका बहिणीच्या नवऱ्याचं आडनाव मुलाला लावायचा प्रयत्न करतात. हे आडनाव असतं गागडे. पण शाळेच्या मुख्याध्यापकांना ते पुरेसं स्पष्टपणे कळत नाही. मग ते 'गायकवाड का?' असं विचारतात. तर, रेखा गडबडीने होय-होय म्हणतात. मग मुलाचं कागदोपत्री अधिकृत नाव लागतं- मनिष गायकवाड. आई अथवा वडील यांपैकी कोणाचंच नसलेलं आडनाव मनिषला लागतं, आणि तो बहुतांश काळ या अवकाशांपासून दूर इंग्रजी शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहात लहानाचा मोठा होतो. 

कोठ्यांमधील वर्चस्वाच्या स्पर्धेतून होणाऱ्या वादावादीमुळे काही काळाने रेखा कलकत्ता सोडून मुंबईला जातात. तिथे लॅमिंग्टन रोडजवळच्या कोठ्यावर नाचायला लागतात. इथे त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीहीशी थोडा संपर्क येतो- मुख्य अभिनेत्रीच्या मागे नाचणाऱ्या अनेकींमधली एक म्हणून रेखा काही वेळा जातात. यात त्यांना तथाकथित मोठे तारेतारका दिसतात, त्यांच्या वागण्यामधला लहरीपणा दिसतो, कोणत्याही थराला जाऊन फसवणारे आणि फसवून घेणारे लोक दिसतात. कालांतराने मुंबईत विविध गुंडांच्या टोळ्यांच्या कारवाया वाढू लागतात. त्यातील मुख्य म्होरक्यांपैकी हाजी मस्तान आणि दाऊद इब्राहिम यांचाही वावर रेखा यांना पाहायला मिळतो. यातच अंडरवर्ल्डच्या घडामोडींमुळे असुरक्षितता वाढू लागल्यावर त्या पुन्हा कलकत्त्याला जातात. तिथे नव्याने बस्तान बसवतात. बोर्डिंग स्कूलमधून सुट्ट्यांसाठी येणाऱ्या, इंग्रजी बोलणाऱ्या, काट्या-चमच्याने जेवणाऱ्या आपल्या मुलाला कोठ्यावर राहायला लावणं बरोबर नाही, असं वाटून रेखा कलकत्त्यात एक छोटा फ्लॅट घेतात. मग काहीएक स्थिर जगणं त्यांना लाभतं. 

फ्लॅट घेतल्यानंतर रेखा व्यवसाय बदलू पाहतात तो भाग जेमतेम अडीच पानांमध्ये उरकतो, ही एक छोटी उणीव  पुस्तक वाचताना जाणवते (पानं १७२-१७४). रेखा यांचा नाच पाहायला येणारा कोठारीजी नावाचा एक राजस्थानी माणूस या काळात त्यांच्या फ्लॅटवर 'लिव्ह-इन' जोडीदार म्हणून राहू लागतो. म्हणजे रेखा त्याला तशी परवानगी देतात. त्या माणसासोबत आणि इमारतीतल्या एका मुस्लीम महिलेसोबत मिळून रेखा रंग तयार करण्याचा व्यवसाय करतात. कालांतराने कोठारीजी राजस्थानला कुटुंबियांना भेटायला जातो, ते परत येतच नाही. रेखा यांच्या आयुष्यात इतक्या निकट आलेल्या या व्यक्तीबाबत मात्र पुस्तकात फारसं काही म्हटलेलं नाही. इतर ठिकाणी रेखा संबंधित व्यक्तींबाबत, त्यांच्यासोबतच्या आपल्या नात्यांबाबत काहीतरी म्हणतात, पण या कोठारीजीविषयी तसं काहीच पुस्तकात नोंदवलेलं नाही. दरम्यान, मनिष ग्रॅज्युएट होतो, कोलकात्यात काही नोकरी शोधतो (पुढे तो मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये लेखक म्हणून काहीएक स्थान कमावतो). दरम्यानच्या काळात मालमत्तेवरील मालकीच्या वादांमधून आणि इतरही अनेक छोट्या-मोठ्या कारणांवरून कलकत्त्यातील बंदूक गल्ली भागातला कोठा बंद पडतो. इथे पुस्तक संपतं. 

सगळ्या पुस्तकात छोटी-साधी वाक्यं वापरून मनिष यांनी रेखा यांची कहाणी सांगितलेय. त्यात बरेचदा हिंदी वाक्यांचाही वापर बेमालूमपणे केलाय. त्यामुळे कंजारभाट समुदायातल्या रेखा यांच्या मूळच्या राजस्थानी-हिंदी-मराठी-मिश्रित बोलीपासून खूप दूर असलेल्या इंग्रजी भाषेत हे पुस्तक असलं तरी त्यातून रेखा यांच्या जाणिवा नि भावभावना आपल्यापर्यंत पोचतात.  

रेखा यांचं बालपण जिथे गेलं त्या पिंपरीतून कंजारभाट समुदायातल्या कौमार्यचाचणीच्या प्रथेसंदर्भातील एक बातमी २०१८ साली आली होती. या प्रथेला विरोध केल्यामुळे कंजारभाट समुदायातल्याच काही तरुणांना मारहाण झाल्याची ही बातमी होती ('जातपंचायतीविरोधात उभे राहिले आहेत कंजारभाट समाजातील तरुण', बीबीसी मराठी, २२ जानेवारी २०१८). लग्न झाल्यावर नवरा-बायकोचे शरीरसंबंध आले की, चादर तपासून जातपंचायतीमधले पंच ही चाचणी घेतात, आणि 'माल खरा आहे' किंवा 'माल खोटा आहे' अशा शब्दांत निवाडा देतात. 'माल खोटा निघाला' तर संबंधित नवरा-बायकोचा काडीमोडही घडवला जातो.(अधिक तपशिलासाठी पाहा: रामनाथ चव्हाण, 'भटक्या विमुक्तांची जातपंचायत- भाग १', देशमुख आणि कंपनी, २००२/२०१६: पानं ३४-४१). रेखा यांनी व्यक्ती म्हणून घेतलेले बहुतेकसे निर्णय उघडच त्यांच्या जातपंचायतीच्या विरोधात जाणारे दिसतात. एका अर्थी, आपला 'माल' खरा आहे की खोटा, हे त्यांनी इतर कुणाला ठरवू दिलं नाही. आपल्या आयुष्यातल्या नैतिकतेच्या कसोट्या ठरवण्यासाठी रेखा यांनी बहुतांशाने स्वतःच्या मनातली पंचायत तेवढी प्रमाण मानलेली दिसते- आणि त्यातून भागत नसेल तिथे प्रार्थनेपुरता कोणत्या ना कोणत्या धर्मातला ईश्वर प्रमाण मानलेला दिसतो.

दोन

ग्रंथाली, १९९४/२००९ [मुखपृष्ठ: जुई शेठ]
'माझी आई शांताबाई ही नाचणारी बाई होती', हे किशोर शांताबाई काळे यांच्या 'कोल्हाट्याचं पोर' (ग्रंथाली, १९९४/२००९) या आत्मकथनातलं पहिलं वाक्य आहे. त्यावरच या नोंदीचं शीर्षक बेतलेलं आहे. नाचणारी बाई असणारी आई मराठीत किशोर काळे यांच्यामुळे आधीच आलेली होती. 'कोल्हाट्याचं पोर' हे पुस्तक १९९४ साली प्रकाशित झाल्या-झाल्या खूप गाजलं. त्याची २००९ सालापर्यंत वीस पुनर्मुद्रणं झालेली होती. पुढेही आवृत्त्या आलेल्या दिसतात.

कोल्हाटी समाजातील पारंपरिक पेशाचा भाग म्हणून शांताबाईंना नाचावं लागतं. पण त्या त्यातून स्वतःची सोडवणूक करून दुसऱ्या समुदायातील पुरुषासोबत संसार चालवून स्थिर आयुष्य जगू पाहतात. या स्थैर्याच्या शोधात त्या धाकटा मुलाला सोबत नेतात, पण थोरला किशोर मात्र आईच्या माहेरी कष्टाचं नि अवहेलनेचं जगणं जगत राहतो. त्या कष्टातच शिकतो आणि शेवटी एमबीबीएस होतो. पण या सर्वांचे प्रयत्न पुरेसं प्रेम प्राप्त करू शकत नाहीत, अशी बोच हे पुस्तक वाचल्यावर वाचकांना जाणवू शकते. 

'द लास्ट कोर्टिझन' हे पूर्णपणे नाचणाऱ्या आईवर केंद्रित पुस्तक आहे, तर 'कोल्हाट्याचं पोर'मध्ये आत्मकथन करणारं पोर केंद्रस्थानी आहे. तरीही, पुस्तकांचं समांतर वाचन काही अधिकचे धागेदोरे समोर आणतं.

रेखा देवी यांना इंग्रजी बोलता वा लिहिता येत नव्हती, तरीही त्यांची कहाणी आपण इंग्रजीतून सांगतोय, यातल्या अंतर्विरोधाची कल्पना लेखकाला असावी. त्यामुळे प्रस्तावनेतच तो स्पष्टीकरण देतो की, ‘आईला इंग्रजी वाचता येत नाही तोवर मला काही भीतीचं कारण नाही.’ लेखकाची एक इंग्रजी कादंबरी या पूर्वी प्रकाशित झाली आहे, ती हिंदीत ‘डब’ का केली नाही, असं आईने विचारल्याची आठवण लेखकाने नोंदवलेय. पण हा मुद्दा फक्त त्या आईपुरताच मर्यादित नाही. मनिष यांचं इंग्रजी पुस्तक कंजारभाट समुदायाच्या जातपंचायतीला बहुधा दखलपात्र वाटणार नाही. आणि तसंही या जातपंचायतीच्या कोणत्याही दंडकाचा काही भार त्या विशिष्ट सामुदायिक रचनेपासून पूर्णपणे निराळं आयुष्य जगणाऱ्या मनिष यांच्यावर येणार नाही. म्हणजे हे पुस्तक इंग्रजीतच राहील तोवर त्यातील मध्यवर्ती व्यक्तीच्या समुदायाशी मात्र त्याचा वाद-संवाद होणार नाही.

दुसरीकडे, किशोर काळे यांचं पुस्तक कोल्हाटी समुदायाची निंदा करणारं असल्याचं सांगून त्यांच्यावर बहिष्कारही टाकण्यात आला (Rakshit Sonawane, 'A life lived for the community', Indian Express, 6 March 2007) अगदी २०१३ साली, म्हणजे पुस्तक प्रकाशित झाल्यावर एकोणीस वर्षांनी, या पुस्तकावर बंदीची मागणी करण्यात आली होती ('मृत्यूनंतर तरी लेखकाला मारू नका', लोकसत्ता- लोकरंग, ११ ऑगस्ट २०१३). कोल्हाटी समुदायाच्या बोलीमधलं हे पुस्तक नसलं तरी त्याच वातावरणातल्या मराठी भाषेत लिहिलेलं आहे. त्यामुळे या पुस्तकाने संबंधित समुदायाशी आणि व्यापक मराठी समाजमनाशी काहीएक वाद-संवाद केला, असं आवृत्तीच्या आकडेवारीनुसार, काळे यांच्यावरील बहिष्कारावरून आणि एकंदर त्यावर होत आलेल्या कमी-अधिक चर्चेनुसार म्हणता येतं.

तसंच, मनिष यांच्या पुस्तकाची अर्पणपत्रिका अशी आहे (इंग्रजीतून इथे नोंदीपुरतं मराठी भाषांतर केलंय): 'माझी आई रेखा देवी हिच्यासाठी. मा मुझे अपने आंचल में छुपा ले । गले से लगा ले । के और मेला कोई नही असं अंगाईगीत ती माझ्यासाठी म्हणायची. माझ्या भविष्यात तिच्या भूतकाळाची पुनरावृत्ती होत असल्याचं तिला दिसायचं, आणि ती अंतःकरणातील प्रेमाने सुरेलपणे गाणं गुणगुणायची.' तर, किशोर यांच्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेचा आईसंबंधीचा भाग असा आहे: 'आदर्श आई म्हणून न जगता आलेल्या पण आदर्श पत्नी म्हणून जगणाऱ्या सौ. आईस.'

मनिष यांच्या अर्पणपत्रिकेत आई-मुलाचं नातं प्रेमाचं म्हणून समोर येतं, त्यातलं सुरेल गुणगुणणं लेखकाच्या मनात टिकून राहिल्याचं दिसतं. दुसरीकडे, किशोर यांच्या अर्पणपत्रिकेत आईसोबतचे मुलाचे गुंतागुंतीचे नातेसंबंध पुढेही गुंतागुंतीचेच राहिल्याचे दिसतं- आईची ओळख 'आदर्श पत्नी', 'सौभाग्यवती' या संबोधनांनी येते. एकीकडे दुःखाचा अवकाश असतानाही प्रेमाचं नातं नि काहीएक संवाद आहे, तर दुसरीकडे दुःखाच्या अवकाशात प्रेमाच्या अभावाची आणि विसंवादाची बिकट भर पडलेली आहे.