महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांसाठीचं मतदान २० नोव्हेंबरला झालं, आणि निकाल २३ नोव्हेंबरला लागले. दरम्यान, २२ नोव्हेंबरला 'रानटी' नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होऊन गेला. या चित्रपटाच्या निमित्ताने 'एनडीटीव्ही मराठी' या वृत्तवाहिनीवर आलेली पुढील जाहिरात पाहा:
जाहिरात पाहायला अडचण येत असेल तर, त्याचा तपशील असा: पस्तीस सेकंदांच्या या जाहिरातीत 'रानटी' या चित्रपटातला नायक वाटावा असा धिप्पाड माणूस पडद्यावर येतो. तो म्हणतो, "माझ्या नजरेत राडा आणि हातात फाइट, विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण झालंय टाइट, निवडणुकीच्या फुल कव्हरेजसाठी पाहा एनडीटीव्ही मराठी. आणि फुल-ऑन अॅक्शनसाठी पाहा माझा नवा चित्रपट 'रानटी'. माझं रक्त तेव्हाही सांडलं नव्हतं आणि आताही सांडणार नाही २२ नोव्हेंबरपासून सिनेमागृहात." सुरुवातीला चित्रपटातलीच वेगवेगळी हाणामारीची दृश्यं दिसतात- एक मोठा सुरा समोरच्याच्या छातीपासून पोट चिरत जातो, एक दोनेक फूट लांबीचा हातोडा समोरच्याच्या थोबाडावर बसतो, एक ट्युबलाइट कोणाच्यातरी डोक्यात फुटते, मग बंदुकांनी चार-दोन माणसांना उडवलं जातं. दहा सेकंदं हे पाहिल्यावर विधानसभा निवडणुकांचा उल्लेख येतो, मग महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्यांची आणि एनडीटीव्ही मराठीच्या विविध पत्रकारांची 'अॅक्शन-मोड'मध्ये असतानाची दृश्यं दिसतात. मग पुन्हा चोवीसाव्या सेकंदापासून 'रानटी' चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल माहिती देऊन जाहिरात संपते. चित्रपटातली हाणामारी आणि पत्रकारांचं काम यांचं बेमालूम मिश्रण जाहिरात करते. शिवाय, राजकीय नेतेही अर्थातच त्यात सहभागी झालेले आहेत. चित्रपटातल्या हातोड्यांऐवजी पत्रकारांच्या हातात माइक असतो. बाकी, आवेग, आक्रमकता, इत्यादी एकसारखंच, असं जाहिरात सूचित करते.
प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेस, २०१५ |
डायना सी. म्यूट्स या अमेरिकेतल्या पेनसिल्वानिया विद्यापीठात राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. राजकीय संदेशन, राजकीय मानसशास्त्र, सामूहिक राजकीय वर्तन, असे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. त्यांचं 'इन-यूअर-फेस पॉलिटिक्स : द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अनसिव्हिल मिडिया' हे पुस्तक साधारण दहा वर्षांपूर्वी प्रकाशित झालं (पिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेस, २०१५). दूरचित्रवाणी / टेलिव्हिजन, म्हणजे टीव्ही जरी दूरचं काहीतरी आपल्याला दाखवत असला तरी ते आपल्या प्रत्यक्ष चेहऱ्याच्या नि दृष्टीच्या इतक्या जवळ असतं की त्याचा आपल्यावर खोलवर परिणाम होतो. अशा वेळी असभ्य (अनसिव्हिल) माध्यमं, असभ्य राजकीय चर्चाविश्वं आपल्या इतकी निकट येतात की आपल्या प्रतिसादांवर, भावभावनांवर, उच्चारणावर आणि वागण्याबोलण्यावर त्याचा मूलगामी परिणाम होत जातो, अशा आशयसूत्रावरचं हे पुस्तक आहे. म्हणजे राजकीय अवकाशातली आक्रमक नि बटबटीत अशा अर्थी 'इन-यूअर-फेस' अभिव्यक्ती वाढत जाणं; आणि दृश्य माध्यमांमुळे ती खरोखरच अगदी निकट, म्हणजे अगदी थोबाडावर येऊन आदळते म्हणूनही ती 'इन-यूअर-फेस' असते, याला धरून पुस्तकाचं शीर्षक दिलेलं आहे.
हा परिणाम कसकसा होतो, हे दाखवण्यासाठी म्यूट्स यांनी काही लोकांचे नमुने घेऊन मग प्रत्यक्ष प्रयोग करून, लोकांना प्रश्नावल्या देऊन मग त्यातील उत्तरांची पडताळणी करून, मानसशास्त्रीय प्रयोगांच्या स्वरूपाचे उपक्रम राबवून निष्कर्ष काढलेले आहेत. पुस्तकात अमेरिकीच नमुने आहेत, पण तेच नमुने जगातली माध्यमं जवळपास काहीच विचार न करता स्वीकारत असल्यामुळे आपल्याकडेही लागू होतात. खरं म्हणजे हे फक्त राजकारणापुरतंही मर्यादित नाही, आणि आता स्मार्ट-फोन, इंटरनेट, सोशल-मीडिया यांनी व्यापलेल्या जगात हे परिणाम अधिक तीव्रतेने आणि अधिक वेगानेही होताना दिसतात. तरीसुद्धा म्यूट्स यांच्या पुस्तकातली काही निरीक्षणं आणि निष्कर्ष टीव्हीसोबतच पुढच्या बदललेल्या माध्यमव्यवहारालाही लागू होणारी आहेत, त्याचं आत्ताच्या संदर्भातलं सार असं:
- नेहमीच्या जगण्यात आपण अनोळखी किंवा फक्त औपचारिक ओळख असलेल्या माणसांपासून काहीएक ठराविक अंतर राखून बोलतो. प्रत्यक्ष शरीरांमधलं अंतरही (सार्वजनिक ठिकाणी तरी) एका मर्यादेपलीकडे कमी होत नाही , आणि वागण्या-बोलण्यातही काहीएक अंतर राखलं जातं. टीव्ही (आणि आता त्याहून मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन) हे अंतर जवळपास मिटवूनच टाकतो, आणि पडद्यावरून अनेक आक्रमक-अनोळखी व्यक्ती आपल्या चेहऱ्याच्या निकट येतात. याचे गंभीर परिणाम वास्तव जीवनात होत असतात (पानं १-२).
- लोक त्यांच्या भवतालामधल्या संघर्षांनी भडकतात, सतर्क होतात आणि प्रत्युत्तर द्यायला सज्ज असतात, कारण आपल्या भवतालासोबत टिकून राहण्यासाठी (सर्व्हायव्हलसाठी) अशी प्रत्युत्तरं त्यांना महत्त्वाची वाटतात, असं उत्क्रांतिनिष्ठ मानवशास्त्राच्या आधारे म्हणता येतं (पान ८).
- सर्वसाधारणतः वास्तव जीवनात मतभिन्नता झाली की विरोधी मताच्या व्यक्तीपासूनचं आपलं शारीरिक अंतर वाढेल अशा हालचाली होतात, पण टीव्हीच्या बाबतीत मात्र कॅमेरा असं अंतर वाढवण्याऐवजी कमी करण्याची शक्यता असते. त्यामुळे समोरची अभिव्यक्ती आपल्यासाठी नकारात्मक असेल, असभ्य असेल, तरीही ती व्यक्ती आणि तिची अभिव्यक्ती प्रत्यक्षात आपल्या शरीराच्या आणखी जवळ येते, स्वाभाविकपणे आपल्या प्रतिक्रियाही तितक्याच तीव्र होत जातात (पान ५४).
- संभाषणाचे नियम मोडणं दूरचित्रवाणीवरच्या राजकीय चर्चांच्या कार्यक्रमांमधे नेहमीचं झालेलं आहे. निर्मितीमूल्य आणि तीव्र बाजारपेठीय स्पर्धा यातून संघर्ष व नाट्य यांच्यावर भर दिला जातो. परिणामी विविध राजकीय मतांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दूरचित्रवाणीवर दिसणारे चेहरे एकमेकांवर ओरडणारं-किंचाळणारं ओंगळ व उद्धट स्वरूप धारण करू शकतात (पान २९).
- दूरचित्रवाणीतून अंगावर येणाऱ्या हिंसाचाराचे प्रत्यक्ष वर्तनावर कोणते परिणाम संभवतात, हे बाजूला ठेवलं तरी असं हिंसक चित्रण पाहिल्यावर प्रेक्षक अधिक उत्तेजित होतात, यावर मात्र बहुतांशाने सहमती आहे. फक्त तीव्रतेच्या प्रमाणापुरतं बोलायचं तर, शारीरिक हिंसाचाराच्या तुलनेत राजकीय चर्चाविश्वातला असभ्यपणा अर्थातच फिका पडेल. पण त्याचे परिणाम मात्र सारखेच असतात, फक्त व्याप्ती थोडी कमी राहते. टीव्हीवर घडून येत असणाऱ्या बहुतांश चर्चाविश्वाचा सूर अतिशय असभ्य असतो. जेम्स विल्सन म्हणालेत त्याप्रमाणे, "पूर्वी माध्यमं आपल्याशी बोलायची; आता ती आपल्यावर खेकसतात" (पान २८).
- तंत्रज्ञानातील बदल आणि टीव्हीच्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठीची वाढलेली स्पर्धा, यांमुळेही टीव्हीवरील राजकीय कार्यक्रम अधिकाधिक बटबटीत झालेले आहेत (पान १७८). दोन प्रकारची वाढलेली स्पर्धा महत्त्वाची ठरते. एक- पूर्वी संध्याकाळी सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांवर एकाच वेळी बातम्यांचं प्रसारण व्हायचं, पण आता दिवसातल्या अशा ठराविक वेळेवर राजकीय बातम्यांची मक्तेदारी राहिलेली नाही. आता चित्रपट, नाटकं, विनोदी कार्यक्रम यांच्याशी राजकीय दूरचित्रवाणी वाहिन्यांना स्पर्धा करावी लागते. शिवाय राजकारणात पराकोटीचा रस असलेली व्यक्तीही पाहू शकणार नाही इतके राजकीय कार्यक्रम आता प्रसारीत होत असतात (पान १८०). प्रेक्षकांसाठीच्या या वाढत्या स्पर्धेत राजकीय कार्यक्रमांना विविध प्रकारचे लक्षवेधक डावपेच लढवावे लागतात (पान १८१).
वरच्या निरीक्षणांशी जुळणारी उदाहरणं रोज टीव्हीवर पाहायला मिळतील. प्रातिनिधिक उदाहरण असं: 'आयबीएन लोकमत' या मराठी वृत्तवाहिनीवर 'बडे मुद्दे' असा चर्चेचा कार्यक्रम रात्री साडेआठच्या दरम्यान होतो. कार्यक्रमाच्या नावात असणारा 'बडे' हा शब्द म्हणजे संबंधित पत्रकार-निवेदकाचं आडनाव आहे, आणि दिवसभरातले काही 'मोठे'/'बडे' मुद्दे आपण मांडत असल्याचंही ते सांगतात. मग त्यातल्या एखाद्या मुद्द्यावर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बोलावून चर्चा होते. ती वरच्या निरीक्षणांशी जुळणाऱ्या रीतीने पार पडते. कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या प्रतिमाही पाहण्यासारख्या आहेत- धाडधाड संगीताच्या पार्श्वभूमीवर कमी-अधिक ज्वाळा दिसतात, न्यायाधीशांसमोर ठेवलेला असतो तसला हातोडा आपटल्याची प्रतिमा दिसते, मग लाल पार्श्वभूमीवर 'ब डे मु द्दे' असे शब्द ठिणग्या उडवल्याप्रमाणे आदळून घट्ट रुततात. मग ज्वाळा. मग संबंधित निवेदक-पत्रकाराच्या प्रत्यक्ष फुल-साइज प्रतिमेसह कार्यक्रमाचं शीर्षक दिसतं. मग निवेदक-पत्रकार चालत येतो किंवा तिथेच थोडी अधिक उद्दिपित देहबोली आणि उच्चार यांसह कार्यक्रमाला सुरुवात करतो.
वृत्तवाहिनीवरील राजकीय कार्यक्रमांची इतर मनोरंजनपर कार्यक्रमांशी स्पर्धा असल्यामुळे स्वाभाविकपणे प्रत्यक्ष पत्रकारितेचं सादरीकरणही बदलत जातं. त्यात खुद्द बातमी महत्त्वाची उरत नाही, चित्रपटातील नायकाप्रमाणे निवेदक-पत्रकार व्यक्तीचं हळूहळू नायकसदृश दाखवलं जाणं महत्त्वाचं ठरतं (किंवा नायिकासदृश दाखवलं जाणं महत्त्वाचं ठरतं. मग एक कार्यक्रम निवेदिका-पत्रकाराच्या पहिल्या नावानुसार 'काय सांगते ज्ञानदा' असाही केला जातो. एखाद्या विशेष बातमीसोबत वा लेखासोबत पत्रकाराचं नाव / बायलाइन द्यायची पद्धत वृत्तपत्रांमध्ये असते. पण टीव्हीवर बातमी विशेष असावी लागत नाही, त्या पत्रकार-व्यक्तीचं असणं हाच विशेष आहे, ती व्यक्ती दिवसभरात चघळून झालेलंच काहीतरी सांगत असली तरी फक्त 'ती' म्हणजे ते व्यक्तिमत्व काहीतरी सांगतंय एवढंच त्याचं मूल्य). या सगळ्याच्या पार्श्वभूमीला नाट्यमय संगीत लागतं, तशाच प्रतिमा लागतात. [मराठी उदाहरणं बरीच सौम्य आहेत. हिंदी नि इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी हे सगळं आणखीच आक्रमक थरावर नेऊन टाकलेलं आहे].
या सगळ्यात यू-ट्यूबवरच्या वाहिन्यांनी प्रचंड भऱ घातलेली आहे. अनेक टीव्ही-वाहिन्यांनी स्वतंत्रपणे यू-ट्यूबवर वाहिन्या काढल्या आहेत, त्यात मुख्यत्वे राजकीयच घडामोडींवरचे व्हिडिओ धडाधडा पडत असतात. उदाहरणार्थ, 'इंडिया टुडे' समूहाची 'मुंबई तक' ही यू-ट्यूबवरील वाहिनी पाहता येईल. त्यावर १८ डिसेंबरला एक व्हिडिओ 'मोठी बातमी' म्हणून प्रदर्शित झाला. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही डाळींब उत्पादक शेतकऱ्यांसह भेट घेतली, त्याबद्दलचा सुमारे अर्धा तासाचा हा व्हिडिओ. व्हिडिओच्या संक्षिप्त प्रतिमेत असा तपशील दिसतो: 'पवार खरंच फक्त डाळिंबासाठी मोदींना भेटले का?' खाली आयताकृती चौकटीत पवार-मोदी यांचा डाळींब हातात घेतलेला फोटो, आणि त्या चौकटीहून मोठ्या आकारात पुढे महिला निवेदिका-पत्रकाराचा फोटो आणि शेजारी पुरुष निवेदक-संपादक यांचा फोटो. या प्रतिमेखालची ओळ: 'शरद पवार आणि नरेंद्र मोदी ह्यांच्या भेटीचा अर्थ का?' मूळ घटनेचा कोणताही नवीन तपशील अर्थातच अशा व्हिडिओंमध्ये आवश्यक नसतो. फक्त वेगाने आणि थोड्या वरच्या पट्टीत बोलत काही अनुमानं सांगितली जातात. 'ते शेतकऱ्यांना घेऊन का गेले, मग डाळिंब्याच्याच शेतकऱ्यांना घेऊन का गेले, मग सातारा आणि फलटणमधलेच शेतकरी का होते?' असंही मग निवेदिका त्या वेगात-ओघात बोलून जाते. प्रेक्षकही मग व्यक्तिमत्वाशी संबंधित बऱ्या-वाईट प्रतिक्रिया देताना दिसतात.
ही मुख्यप्रवाही माध्यमांमधली उदाहरणं दिली. या तुलनेत स्वतःला पर्यायी (किंवा पुरोगामी किंवा उदारमतवादी) मानणाऱ्या काही मंडळींची सादरीकरणाची शैली वेगळी असते, पण व्हिडिओत खरोखर काही नवीन मुद्दा असतो की, फक्त वरवरच्या अनुमानावर अर्धा तास तोंडी वाक्यं असतात, आणि त्या बोलण्याची शैलीच आपल्याला भावते, याचा विचार प्रेक्षकांनी आपापल्या इच्छेनुसार करावा.
नोंदीच्या सुरुवातीला दिलेला 'रानटी' जाहिरातीचा व्हिडिओ 'एनडीटीव्ही मराठी' वाहिनीवरचा आहे. सध्याच्या पंतप्रधानांच्या जवळचे आणि एकंदरच वेळोवेळी चर्चेत येणारे उद्योगपती अडानी यांनी 'एनडीटीव्ही' या वृत्तसमूहामध्ये जास्त समभाग विकत घेऊन डिसेंबर २०२२मध्ये स्वतःची मालकी प्रस्थापित केली. 'एनडीटीव्ही मराठी' ही वाहिनी मे २०२४मध्ये सुरू झाली. एका बड्या भांडवलदाराने 'एनडीटीव्ही' विकत घेतल्यावर झालेला हा स्वाभाविक विस्तार दिसतो. पण आधी 'एनडीटीव्ही' समूहाची मालकी प्रणय रॉय आणि राधिका रॉय या दिल्लीतील डाव्या मानल्या जाणाऱ्या वर्तुळांमधल्या दाम्पत्याकडे होती, तेव्हाचा एक दाखलाही बातम्यांच्या दृश्य सादरीकरणामधील भावी बदलांचे संकेत देणारा होता. हा नुसता सोयीस्कर निवडलेला दाखला नाही, तर भारतीय प्रसारमाध्यमांमधला अशा प्रकारचा पहिलाच दाखला होता. मे २००५मध्ये 'बंटी और बबली' या चित्रपटाच्या प्रसिद्धीमोहिमेचा भाग म्हणून त्या चित्रपटातील अभिषेक बच्चन नि राणी मुखर्जी या मुख्य नट-नटी जोडीने 'एनडीटीव्ही'वर रात्री आठ वाजता 'प्राइम टाइम'च्या बातम्या वाचल्या होत्या. त्या वेळी 'एनडीटीव्ही मीडिया'च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं या संदर्भात 'बिझनेस स्टँडर्ड'शी (TV Screens just got bigger for Bollywood, 27 May 2005) बोलताना सांगितलं होतं की,
तारेतारकांच्या लोकप्रियतेचा लाभ घेऊन आमच्या प्रेक्षकांसमोर बातम्या सादर करायचा आमचा प्रयत्न आहे. बातम्या न पाहणारे प्रेक्षकही या तारांकित मूल्यामुळं आमची वाहिनी पाहतील, अशी आम्हाला आशा आहे.
आता यात आणखी प्रगती इतकीच झालेय की, तारेतारकांच्या लोकप्रियतेशी खुद्द पत्रकार-निवेदकांच्या व्यक्तिमत्वांची लोकप्रियता स्पर्धा करू शकते. आणि हे काही बातम्यांच्या आशयामुळे घडत नाही, तर 'बातम्या सादर करण्या'च्या शैलीमुळे, 'तारांकित मूल्या'मुळे घडतं. त्यात आशयाचं मूल्य महत्त्वाचं उरत नाही. याउलट, मेक-अप, लायटिंग, संवादफेक, देहबोली, आणखी एखाद्या गाण्यातही दिसू शकेल असं बरंच काही अपेक्षित असणार. शिवाय, आणखी एक बदल असा दिसतो की, मनोरंजन क्षेत्र आणि पत्रकारिता यांची लगट आधीपासून सुरू झाली असली तरी, आताचं राजकीय धृवीकरण आणि कोणताही विरोध हा विरोध आहे एवढ्याच कारणाने अवैध ठरवण्याची आक्रमक वृत्ती, इत्यादी वैशिष्ट्यांची भर पत्रकारितेतही पडलेली दिसते. त्यामुळे एखाद्या नट-नटीने येऊन बातम्या वाचणं, तुलनेने संथपणे मनोरंजन क्षेत्राची पत्रकारितेशी लगट होणं यात बदल होऊन आता अधिक आक्रमकतेने पत्रकारांचंच नट वा नटी होण्याला जोर मिळाला असावा.
बरं, तुम्ही समजा नोंदीच्या सुरुवातीच्या जाहिरातीवर क्लिक केलं असेल, आणि नोंद वाचून कंटाळा आला असेल तर आता हे 'बंटी और बबली'मधलंच गाणं बघा नि ऐका- चुप चुप के चुप चुप के, चोरी से चोरी. गीतकार आहेत गुलझार; संगीत दिलंय शंकर-एहसान-लॉय यांनी; गायक आहेत सोनू निगम. गाणंसुद्धा स्मार्टफोनमुळे किंवा लॅपटॉपमुळे वेगळ्या अर्थी 'इन-युअर-फेस' अनुभव देईलच. बटबटीत रक्तरंजित राजकीय चर्चाविश्वापेक्षा अशा मोहक स्वप्नरंजक गाण्याची जवळीक कधीही अधिक सुखद ठरेल, असं वाटतं.
बंटी और बबली, चुप चुप के चुप चुप के चोरी से चोरी / स्क्रिन-शॉट |
No comments:
Post a Comment