अरविंद कृष्ण मेहरोत्रा हे दीर्घ काळ इंग्रजीतून कविता, निबंध, इत्यादी लेखन करत आलेले आहेत. त्यांच्या पुढाकाराने १९६०-७०च्या दशकांत 'एझरा' आणि 'डॅम यू' अशी इंग्रजी लिट्ल मॅगझिनंही निघाली होती. शिवाय, ते हिंदीतून अनेक कवितांची इंग्रजी भाषांतरं करत आले आहेत. त्यात कबिराच्या काही रचनांचाही समावेश आहे. 'साँग्स ऑफ कबीर' हे त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे. या कबिराच्या भाषांतराबद्दल काही निरीक्षणं आणि प्रश्न नोंदवण्याचा हा प्रयत्न आहे. यातला पहिला भाग त्यांच्या भाषांतरातल्या काही निवडींबद्दल निरीक्षणं नोंदवणारा आहे आणि दुसरा भाग या निवडींमागच्या भूमिकेविषयी त्यांनी केलेल्या विधानांबद्दलचा आहे.
एक
![]() |
Hachette India, 2011 |
साधारण पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या भक्ती परंपरेतल्या एका संताच्या कविता विसाव्या-एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर भाषांतरित करताना 'मुळाबरहुकूम' राहावं किंवा कसं, हा एक स्वाभाविकच प्रश्न असतो. खासकरून कबिराच्या काव्याची परंपरा प्रवाही, लवचिक, आणि अनेकदा संबंधित कवितेची रचनाकार व्यक्ती कोण असेल याविषयी संदिग्धता बाळगणारी असल्यावर 'मूळ' काय, याबद्दलच फारशी शाश्वती उरत नाही. मौखिक परंपरेमुळे या रचना म्हणणाऱ्यांनी आपापल्या परीने केलेले बदल, कधी संकलकांनी केलेले बदल, इत्यादी लक्षात घेता 'मुळाबरहुकूम' भाषांतराचा दावा तसाही डळमळीत होतो. मेहरोत्रा यांनी या डळमळीतपणाचा आढावा त्यांच्या प्रस्तावनेत घेतला आहे. तरीही, संदर्भाच्या सोयीकरता त्यांनी कोणत्या हिंदी स्त्रोतसंहितेचा वापर केला, त्याचा तपशीलही त्या-त्या ठिकाणी दिला आहे.
मेहरोत्रांनी काही ठिकाणी कबिराच्या ओळी पुढे-मागे करणं, काही रचनांमधली शब्दयोजनांची पुनरावृत्ती टाळणं, आणि काही वेळा वेळा पूर्णच वेगळ्या शब्दयोजनांची भर घालणं, अशा रीतीने निवडी केल्याचं दिसतं. एका अर्थी, हिंदी रचनांचा गाभा टिकवून त्यांनी इंग्रजीत समांतर पद्यरचना केल्या आहेत, असं जाणवतं. त्यांच्या या निवडीबद्दल इथे आक्षेप घेतलेला नाही. मौखिक परंपरेतला कवी लिखित परंपरेत आणतानाही स्वाभाविकपणे काही सर्जनशील निवडी कराव्या लागतात, त्यात इथे भाषांची नि धर्मपरंपरांची सरमिसळही बरीच आहे. त्यामुळे काही मोकळीक सजगपणे वापरावी वाटणं, यात काही गैर नाही. पण मोकळीक घेताना भाषांतरकार कोणत्या विचाराने निवडी करत असेल आणि त्यातून भाषांतरातल्या अर्थावर कोणता परिणाम होतो, याबद्दल काही नोंदवणं गरजेचं वाटतं. उदाहरणासह पाहू.
मेहरोत्रांनी भाषांतरासाठी वापरलेली कबिराची (मानली जाणारी) एक हिंदी रचना अशी :
मन रे संसार अंध कुहेरा । सिरि प्रगटा जम का पेरा।।
बुत पूजि पूजि हिंदू मूए तुरुक मुए हज जाई।। जटा धारि धारि जोगी मूए तेरी गति किनहुं न पाई।।कबित पढे़ पढि़ कबिता मूए कापड़ी कैदारे जाई। केस लूंचि लूंचि सुए बरतिया इनमैं किनहुं न पाई।।धन संचते राजा मूए गड़िले कंचन भारी। बेद पढे पढि पंडित मूए रूप देखि देखि नारी।।राम नाम बिनु सभै बिगूते देखहू निरखि सरीरा। हरि के नाम बिन किनि गति पाई कहै जुलाह कबीरा।।
मेहरोत्रांचं इंग्रजी भाषांतर असं:
To tonsured monks and dreadlocked Rastas,
To idol worshippers and idol smashers,
To fasting Jains and feasting Shaivites,
To Vedic pundits and Faber poets,
The weaver Kabir sends one message:
The noose of death hangs over all.
Only Rama's name can save you.
Say it NOW.
मूळ रचनेचा साधारण धावता मराठी अर्थ असा (यातही अर्थातच मोकळीक घेतली आहे) :
मनाचा कारभार म्हणजे तळापर्यंत अंधारच अंधार. भोवताली वेढा घालून राहिलाय मृत्यूचा संसार. मूर्तींची पूजा करणारे हिंदूही मरणार, हजची यात्रा करणारे मुस्लीमही मरणार, जटाधारी साधूही मरणार, तीर्थस्थळांची यात्रा करणारेही मरणार, कविता म्हणणारे कवीही मरणार, वेदपठण करणारे पंडितही मरणार, संपत्ती साठवणारा राजाही मरणार, स्वतःच्या रूपावर खूश असणारी स्त्रीही मरणार. यात आता मुक्ती हवी तर उपाय एकच : मुखी असू दे रामाचं नाव!
जिहि नर राम भगति नहिं साधी । सो जनमत कस न सुध्रो अपराधी।।
जिहि कुल पूत न ग्यांन बिचारी । वाकी बिधवा कस न भई महतारी।।
मुचि मुचि गरभ भई किन बांझ। बुडभुज रूप फिरै कलि मांझ।।
कहै कबीर नर सुंदर सरूप। राम भगति बिनु कुचिल कुरूप।।
मेहरोत्रांचं इंग्रजी भाषांतर असं :
Those who are not
Devotees of Rama
Should be in Sing Sing
Or have been stillborn.Better their mothers
Had been widows
Or barren
Than to have given birth
To these smartly dressed
Pigs who, lacking Rama,
Are like cripplesIn rags.
साधारण मराठी अर्थ असा:
रामाची भक्ती न करणारा माणूस म्हणजे कायमचा अपराधी. अशा अविचारी माणसाला जन्माला घालण्यापेक्षा त्याची आई विधवाच झाली असती किंवा वांझच असती, तर बरं खरं. तसा तर माणूस सुंदर असतो, पण तो रामाचा भक्त नसेल तर तो कुरूपच ठरतो.
इथे रामभक्त नसल्यामुळे कबिराच्या लेखी अपराधी ठरलेल्या माणसाला मेहरोत्रांनी 'सिंग सिंग' इथे पाठवलंय. 'सिंग सिंग करेक्शनल फॅसिलिटी' हा अमेरिकेतला जुना तुरुंग आहे, हे इंटरनेटवर शोधल्यानंतर कळतं. मुद्दा अशी शोधाशोध करावी लागते हा नाही. ती इतरही संदर्भांसाठी करावी लागते, आणि वाचकाने तेवढं करायला हरकत नाही. पण ही संदर्भांची भर भाषांतरात घालताना त्यामागचा विचार नक्की काय? इथेही कबिराने रामभक्तीचा अभाव असणारा मनुष्य 'अपराधी' ठरवत सर्वसाधारण अर्थाने हा शब्द वापरला. अशा वेळी 'सिंग सिंग' हा अमेरिकी तुरुंग या कवितेत आणून अर्थसंकोच होतो, किंबहुना अर्थाचा विपर्यासच होतो, असं वाटतं. एखादं विशेषनाम सर्वसाधारण अर्थाने वापरण्याइतकं रूढ झालेलं असतं, तसं 'सिंग सिंग' या तुरुंगाबाबतीत इंग्रजी भाषेत झालंय, असा दावा करता येईल? किंवा 'फेबर पोएट्स'बाबत तसं म्हणता येईल? जटाधारी जोगी जसे रास्टफेरी पंथीयांशी काहीएक समविचारी नातं राखणारे वाटतात आणि प्रत्यक्ष रूपांमध्येही काही समान खुणा दिसतात, तसं काही 'सिंग सिंग' आणि 'फेबर पोएट्स' या संज्ञांबाबतीत म्हणता येत नाही.
कवयित्री युनिस डी'सूझा यांनी मेहरोत्रांच्या या भाषांतराबाबत लिहिताना मात्र असं म्हटलं होतं की, 'फेबर पोएट्स' ही 'कविता वाचणाऱ्या कवीं'साठीची आधुनिक समतुल्य संज्ञा आहे. ("Throw me the key", Mumbai Mirror, 25 August 2011) पण सरसकटपणे सर्व आधुनिक कवींसाठी 'फेबर पोएट्स' असं कुठे म्हटलं जाईल? म्हटलं गेलं तरी ते वाजवी किंवा न्याय्य आहे का, इत्यादी प्रश्न विचारात घेण्यासारखे वाटतात.
कबिराचं हिंदी पुरेसं सहजपणे न कळल्यामुळे इंग्रजीचा आधार घेत त्याच्या कवितांपर्यंत जाणाऱ्या वाचकांना किंवा इतरही कारणाने या कवितांचं इंग्रजी भाषांतर वाचणाऱ्यांना मेहरोत्रांचं पुस्तक उपयुक्त ठरणारं आहे. त्यांनी आधी खुलासा करून भाषांतरावेळी घेतलेली सर्जनशील मोकळीकही समजून घेण्याजोगी असल्याचं आधी नोंदवलंच. पण त्यातल्या त्यांच्या काही निवडींबाबत जाणवणाऱ्या शंकाही वरती नोंदवल्या. आता या शंकांची कारणं शोधण्यासाठी मेहरोत्रांच्या कवितांबाहेरच्या विधानांकडे जाऊ.
दोन
'साँग्स ऑफ कबीर'च्या प्रस्तावनेत मेहरोत्रा म्हणतात, "ऐतिहासिक काळातील कबीर दुष्प्राप्य आहे, तर कबिराच्या रचनांची अधिकृत संहिता त्याहून दुष्प्राप्य आहे. कबिराच्या जीवनकाळापर्यंत मागे नेता येईल असं त्याच्या कवितांचं एकही हस्तलिखित आजतागायत सापडलेलं नाही. त्यामुळे कबिराचं कवित्व म्हणजे मुळातच एखादीच विशिष्ट संहिता नसून संहितांचं कुटुंब आहे." मग त्याच्या संहितांच्या तीन प्रमुख परंपरा आणि इतर आवृत्त्या यांचा आढावा त्यांनी घेतला आहे. ("Translating Kabir", Partial Recall: Essays on Literature and Literary History, Permanent Black, 2012, pages: 276-287)
त्यानंतर एका मुलाखतीत मेहरोत्रा म्हणाले, कबिराच्या कवितांचं भाषांतर करताना "त्या परंपरेमध्ये भाषांतरकार म्हणून प्रवेश करावा, अशी कल्पना होती. अन्यथा, आपण एखादी परंपरा घ्यायची आणि तिच्या बाहेर राहून काम करायचं, असं होतं. त्याऐवजी आपण संबंधित परंपरेच्या आत जाऊन कवितेची आतून पुनर्रचना करावी, आणि अशी आतून पुनर्रचना करत असताना एखादा समकालीन वापरातला शब्द मनात आला तर तो वापरावा, असं डोक्यात होतं," असं मेहरोत्रा एका मुलाखतीत म्हणाले (गुफ्तगू जर्नल, १३ सप्टेंबर २०१८, यू-ट्यूब).
मेहरोत्रांची ही दोन विधानं आणि आपण पहिल्या भागात नोंदवलेले मुद्दे यांचा एकत्रित विचार करून असं म्हणता येईल : 'जटाधारी जोगी'चं 'टोन्श्यूअर्ड रास्टाज्' करणं, हे एका अर्थी इंग्रजीच्या माध्यमातून कबिराच्या संहिताकुटुंबात नि त्याच्या परंपरेत सर्जनशील भर टाकणारं आहे, त्यात विसंगत स्वैरपणा नाही.
पण 'कबित पढे पढि कबिता'चं 'फेबर पोएट्स' करणं, किंवा रामभक्त नसल्यामुळे अपराधी ठरलेल्या मनुष्याला अमेरिकेतल्या 'सिंग सिंग' तुरुंगात टाकणं, या निवडी मात्र कबिराच्या संहिताकुटुंबाचा नि परंपरेचा विपर्यास करणाऱ्या वाटतात, कारण त्यात मूळ अर्थाचा संकोच करणारा विसंगत स्वैरपणा जाणवतो.
०
![]() |
Penguin, 2014 |
मेहरोत्रांच्या 'साँग्स ऑफ कबीर'मधली काही निवडक भाषांतरं या पुस्तकातही आली आहेत; प्रस्तुत नोंदीत ती तिथूनच उद्धृत केली आहेत : Arvind Krishna Mehrotra, Collected Poems : 1949-2014, Penguin Books, 2014, pages 207-225.
गांधीनगर इथे ६-१० ऑक्टोबर दरम्यान 'सेकंड यंग रिसर्चर्स नॅशनल वर्कशॉप ऑन कन्टेम्पररी ट्रेन्ड्स इन इंडियन लिटरेचर्स : मॅपिंग इंडियन लिटरेचर्स इन ट्रान्स्लेशन : कन्टेम्पररी अँड बीयाँड' अशी परिषद झाली. पंडित दीनदयाळ एनर्जी युनिव्हर्सिटी, गांधीनगर इथे झालेल्या या परिषदेचे सहआयोजक बनारस हिंदू युनिव्हर्सिटी हे विद्यापीठ होतं, आणि 'सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तामिळ' व 'नॅशनल ट्रान्स्लेशन मिशन' या संस्थांनीही त्यासाठी सहाय्य केलं. आयोजकांनी तिथे ७ ऑक्टोबर रोजी खुल्या सत्रात बोलावं, असं सुचवलं. तिथे वाचलेल्या निबंधातल्या एका भागावर आधारित ही नोंद आहे. मूळ निबंधाचं शीर्षक 'एथिकल क्वान्डरीज् ऑफ अ ट्रान्स्लेटर' ('भाषांतरकारासमोरचे नैतिक पेच') असं होतं.