Saturday, 23 October 2010

रेघेची सुरुवात

अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे- 

नेहमीप्रमाणेच काही विशेष काम नसलेले गोष्टीतले बादशाह अकबर आणि त्याचा प्रधानमंत्री बिरबल यमुना नदीच्या काठावर वाळूमध्ये फेरफटका मारत होते. मधेच वाळूत पडलेली एक काठी बादशाहाने उचलून घेतली आणि ती फिरवत फिरवत तो बिरबलाशी गप्पा छाटायाला लागला. 

असेच ते चालत होते तर बादशाहाच्या डोक्यात काहीतरी झालं आणि त्याने हातातल्या काठीने वाळूत एक रेघ काढली नि बिरबलाला म्हणाला, ''बिरबला, ही रेघ न खोडता छोटी करून दाखवू शकशील का? बोल आहे काही तुझ्या युक्तीवाल्या डोक्यात?" 

नेहमीप्रमाणे बादशहाच्या बालिशपणाला मनातल्यामनात शिव्या घालत बिरबल विचार करायला लागला. अर्ध्या मिनिटातच त्याला आयडीया सुचली पण बादशाहाला स्वत:च्या प्रश्नाच्या काठिण्यपातळीबद्दल लगेच निराश करण्यापेक्षा तो उगीच विचार केल्यासारखं दाखवायला लागला. विचारात पडलेल्या बिरबलाकडे बादशाह विजयी मुद्रेने पाहत होता. चार-पाच मिनिटांनी बिरबलाने बादशाहाच्या हातातली काठी घेतली आणि त्या काठीने बादशाहाच्या रेघेच्या बाजूला समांतर, जास्त लांबीची दुसरी रेघ काढली. आता बिरबलाच्या रेघेपुढे बादशाहाची रेघ छोटी दिसू लागली होती. मग नेहमीप्रमाणे बादशाहाने बिरबलाच्या बुद्धीचातुर्याचं कौतुक केलं नि पुढील गोष्टींना मजकूर मिळावा यासाठी दोघंही पुढील गप्पा छाटायला लागले.

आता बादशाह कोण आहे ते ज्याने त्याने ठरवावे. त्यांच्याबद्दल अधिक लिहून वेळ आणि शब्द खर्च करण्यात अर्थ नाही. पण असे बादशाह सगळीकडे पसरलेले आहेत. जरा आजूबाजूला बघितलं तर दिसतात.

हा मजकूर लिहिणारा बिरबल नाही, एवढं मात्र नक्की. त्यामुळे कोणाची रेघ छोटी करण्यासाठी ही रेघ काढलेली नाही. पण बहुतेक बादशाह प्रचंड खोटारडे आहेत. त्याला तर काही करू शकत नाही, पण आपली एक रेघ मारू शकतो. म्हणून ही रेघ.

(फेब्रुवारी २०१०)

No comments:

Post a Comment