मूळ लेख- The Man Who Went Behind Enemy Lines (Tehelka, Vol 7, Issue 43, Dated October 30, 2010.)
आपण माओवाद्यांच्या हद्दीत जाऊ शकत नाही, असा दावा भारत सरकार करतं. पण गडचिरोलीचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र कानफडेंनी ते करून दाखवलं. त्यांच्या या प्रयत्नाविषयी-
राजेंद्र कानफडे |
२३ ऑगस्ट रोजी, महाराष्ट्राच्या गडचिरोलीसारख्या एका नक्षलग्रस्त भागातील उपजिल्हाधिकारी एका बंदी करण्यात आलेल्या प्रवासाची तयारी करत होते. त्यांनी त्यांचे लांब पांढरेशुभ्र केस बोमध्ये बांधले. त्यांच्याकडे असलेल्या एकमेव स्पोर्टस शूजची जोडी त्यांनी पायात अडकवली. सत्तावन वर्षीय राजेंद्र कानफडे गडचिरोली शहरातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरमधून निघाले आणि त्यांनी अडीचशे किलोमीटर दूर असलेल्या अबुझमाडच्या जंगलाची वाट पकडली. महाराष्ट्र नि छत्तीसगढच्या सीमेवर पसरलेल्या हा घनदाट जंगलाचा परिसर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया (माओवादी) चा इलाका समजला जातो. कित्येक दशकांत सरकारी वावरही न झालेला हा प्रदेश.
पण कानफडे अबुझमाडला जात नव्हते. ते जात होते 'नो मॅन्स लँड' बनलेल्या जंगलातील गावांमध्ये, जिथे भारत सरकारचं अस्तित्व नाही तर, नक्षलवाद्यांचा गूढ वावर आहे.
कानफडेंच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याबरोबर यायचं नाकारलं. 'तिथे कुठे बॉम्ब असेल याचा तुम्हाला अंदाजही बांधता येणार नाही', असं या सहकाऱ्यांचं म्हणणं. ह्या प्रवासाचे गंभीर परिणाम होतील, अशी सूचना पोलिसांनी दिली. गडचिरोलीचे पोलीस महासंचालक विरेश प्रभू म्हणाले की, आम्ही काही संरक्षण पुरवू शकत नाही नि सुरक्षेची हमीही देऊ शकत नाही. पण कानफडे म्हणाले की, 'देशात कुठेही प्रवास करणं हा माझा मूलभूत अधिकार आहे. पोलीस त्यांचं काम करत नाहीत याचा अर्थ मी माझं काम करायचं नाही असा नाही.'
कानफडे आणि सात स्वयंसेवक महाराष्ट्राच्या हद्दीवरील शेवटच्या पोलीस ठाण्याहून १०० किलोमीटरांवर असलेल्या बीनागोंडा या गावाच्या दिशेने निघाले. नक्षलवाद्यांचा धोका असल्याने तिथे जाण्यावर बंदी होती.
कानफडे यांनी आपल्या प्रवासातून ह्या प्रचलित समजालाच आव्हान दिले. शेवटी, शत्रूपक्षापेक्षाही सरकारी व्यवस्था अधिक टीकेस पात्र आहे असं त्यांच्या लक्षात आलं. 'नक्षलवाद्यांचा धोका आणि त्यांचा दहशतवाद यांबद्दल पोलीस अतिशयोक्तीने बोलतात. नक्षलवाद्यांच्या मुद्द्याचा वापर करून अधिकाधिक निधी नि अधिकाधिक पगार लाटण्यावरच भर असल्याचं दिसतं', असं ते म्हणतात.
एक वर्षाच्या शांततेनंतर गेल्या आठवड्यात गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी दोन हल्ले केले. पेरीमेल्लीमध्ये चार पोलीस कर्मचारी मरण पावले तर सवारगावाजवळ एक पोलीस जीप उडवण्यात आली. २००९च्या ऑक्टोबरमध्ये शेवटचा मोठा नक्षलवादी हल्ला झाला होता, त्यामध्ये चौदा पोलीस अधिकाऱ्यांनी प्राण गमावला- जिल्ह्यातील भामरागड विभागातल्या लाहेरी गावात ही घटना घडली. पण जरा अधिक मोठ्या पटाकडे बघितलं तर यातील अतिशयोक्ती स्पष्ट होते.
गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी विभागातील सूत्रांनी सांगितलं की, जिल्ह्यात अंदाजे तीनशे गणवेशधारी नक्षलवादी आहेत. प्रशासन आणि निमलष्करी सैनिकांची एकूण संख्या नऊ हजार आहे. त्यामध्ये सीआरपीएफच्या तुकड्या आहेत, एसआरपीएफच्या तुकड्या आहेत, शिवाय राज्य पोलीस आणि सी-६० हे कमांडो दलसुद्धा.
डाव्या विचारसरणीच्या दहशतवादासंबंधी गडचिरोली जिल्हा नियोजन समितीने तयार केलेला एक अहवाल 'तेहेलका'ला मिळाला. त्यात १९८० ते २०१० या काळामध्ये जिल्ह्यात 'नक्षलवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या प्राणघातक सशस्त्र हल्ल्यांची संख्या' सत्तावन्न इतकी नोंदवली आहे. म्हणजे गेल्या तीन दशकांत सरासरी वर्षाकाठी दोनहून कमी अशा घटना घडल्या.
गेल्या वर्षी नक्षलवाद्यांविरोधातील संघटित कारवाई सुरू झाल्यानंतर सरकारी कारवायांविरोधातही मोठ्या प्रमाणात निषेधाचे सूर उमटू लागले. अशा विरोधी सूरांवर बहुतेक वेळा 'कार्यकर्ते', 'नक्षलवाद्यांना सहानुभूती दाखवणारे' किंवा 'स्वार्थी राजकारणी' असे शिक्के मारले जातात नि देशासाठी लढणाऱ्या सैनिकांबद्दल त्यांना काहीच प्रेम नसल्याचा आरोप केला जातो. पण या वेळी खुद्द एक प्रशासकीय अधिकारीच या सगळ्या प्रक्रियेला पोकळ ठरवतोय. विकासाची नांदी म्हणून नक्षलवाद असणं योग्य नाही, असं तो म्हणतोय. निमलष्करी दलांना माघारी बोलवण्यात यावं, असं म्हणतोय. आणि म्हणूनच कानफडे यांचं म्हणणं महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच बहुतेक, त्यांच्या धाडसी प्रवासानंतर दोन महिन्यांनी त्यांची विभागीय चौकशी होण्याचे संकेत मिळायला लागलेत.
एका मुख्याध्यापकाचा मुलगा म्हणून जन्मलेले कानफडे मध्यप्रदेशातील झाबुआ इथे लहानाचे मोठे झाले. सरकारी शाळांमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. नागपूर विद्यापीठात गणित आणि भौतिकशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. आणि नागपूरमध्ये एका माध्यमिक शाळेत शिकवायला सुरुवात केली. सरकारी व्यवस्थेशी झालेली त्यांची पहिली तोंडओळख त्यांना अजूनही आठवते- १९८४मध्ये शिक्षकाचे प्रमाणपत्र घेण्याची वेळ. 'त्यांनी माझ्याकडे दोन रुपयांची लाच मागितली. मी चिडलो आणि पैसे द्यायला नकार दिला', असं ते सांगतात.
व्यवस्थेला 'वाकवण्यासाठी' १९८५मध्ये त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. पण लगेचच त्यांच्या लक्षात आलं की प्रामाणिकपणा हा दुर्गुण ठरलाय. १९८८मध्ये ते उप-तहसीलदार होते तेव्हा २२ हेक्टरांच्या जंगलात बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. दोषींना शासन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यावर उप-विभागीय अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं, 'तुम्हाला असंच वागायचं असेल तर तुम्ही परत शाळेत शिक्षकाची नोकरी का नाही धरत.'
चालू वर्षीच्या मार्चमध्ये त्यांनी उप-जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, तोपर्यंत त्यांची स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा स्वच्छ अधिकारी अशी प्रतिमा तयार झाली होती. कदाचित म्हणूनच, जेव्हा जिल्हाधिकारी अतुल पाटनेंनी जिल्ह्यातील आश्रमशाळांची तपासणी तीस अधिकाऱ्यांवर सोपवली तेव्हा बीनागोंडा हे अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त खेडं कानफडे यांच्याकडे देण्यात आलं. 'कुत्सित हेतूनेच ते खेडं माझ्याकडे देण्यात आलं होतं कारण तिथे जायला रस्तेसुद्धा नव्हते. पण त्यामुळे आपण काम थांबायचं नाही, असं मी ठरवलं'- कानफडे सांगतात.
२५ ऑगस्टला वीस किलोमीटर चालून, ट्रेकींग करून, ओढ्यांमधून वाट काढत कानफडे आणि त्यांचे सहकारी बीनागोंडाला पोचले. त्यांचा एक सहकारी तर ओढ्यामधून जवळजवळ वाहूनच गेला होता, पण बाकीच्यांनी त्याला वाचवलं. ते बीनागोंडाला पोचले तेव्हा पाऊस कोसळत होता. पस्तीस उंबऱ्यांच्या या गावात २१९ रहिवासी आहेत. दोन विहिरींपैकी एक कायमची सुकलेली आहे तर दुसरी पावसाच्या पाण्याने तुंबलेली होती. ह्या पावसात गावकऱ्यांना कालव्यांचं चिखलाने माखलेलं पाणी प्यावं लागत होतं. तिथे वीज नाही आणि बाजाराचं ठिकाण ५७ किलोमीटर लांब आहे. दोन मोडक्या जुनाट इमारती हेच सरकारच्या तिथलं अस्तित्व- तिथली आश्रमशाळा- आदिवासी विकास विभाग आणि डॉक्टर नि औषधं नसलेल्या ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या निधीतून सुरू असलेली.
कानफडे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक रात्र गावात घालवली. नागपूरस्थित राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्रातर्फे चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळेच्या तपासणीत कानफडे यांना जे वास्तव दिसलं ते वरच्या आकडेवारीत आहे. पटावर १८८ विद्यार्थ्यांची नोंद होती, पण प्रत्यक्षात तिथे ३९ विद्यार्थी राहत होते. चौदा कर्मचाऱ्यांची नोंद होती, त्यातले तीनच हजर होते. प्रवेशाच्या किंवा हजेरीच्या कोणत्याही नोंदी सापडल्या नाहीत. शाळेच्या आवाराला कुंपण नव्हते, स्वच्छतागृह गलिच्छ होते, त्यावर छप्पर नव्हते. वर्गांमध्ये पाणी गळत होते. ३३ सौरदिव्यांपैकी फक्त १४ दिवे सुरू होते. पौष्टिक आहार - शिजवलेला भात नि तूर डाळ- पौष्टिकतेपासून कोसो दूर होता. सरकारी विकास योजनांचा फायदा आतापर्यंत एकाही गावकऱ्यापर्यंत पोचला नव्हता. 'त्यासाठी आवश्यक कागदपत्रं त्यांच्याकडे नव्हती', असं सांगून कानफडे म्हणतात की, 'प्रत्येक नागरिकाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन मी दिलं.'
कानफडेंना सगळ्यात जास्त धक्का बसला तो गावकऱ्यांच्या छोट्या छोट्या गरजांविषयी कळल्यावर. ''त्यांना प्रत्येक कुटुंबासाठी सायकली नि दिवे पाहिजे होते. त्यांच्या ह्या साध्या गरजा भागवण्यासाठी सरकारचा जो खर्च होईल तो दोन हवालदारांच्या एकत्र पगारापेक्षाही कमी असेल. आणि निमलष्करी कारवायांवर आपण करोडो रुपये खर्च करतोय. हे थांबवणं आवश्यक आहे.''
या भागाला भेट देणारे कानफडे हे तिसरे सरकारी अधिकारी आहेत. बीनागोंडामध्ये कोणत्याही सोईसुविधा नाहीत, त्यासंबंधी २००५ साली एका स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर निर्णय देताना नागपूर उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना या भागाला भेट देण्याचे आदेश दिले होते. त्याचा परिणाम म्हणून बीनागोंडात दोन विहिरी झाल्या. नंतर २००७च्या फेब्रुवारीत निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी निरंजनकुमार सुधांशू सुरक्षा दलांसहित इथे येऊन गेले. आपल्या भेटीबद्दल बोलताना सुधांशू म्हणतात, ''तेव्हा आश्रमशाळेचं बांधकाम तेव्हा सुरू होतं. आरोग्य केंद्रात तीन कर्मचारी होते पण औषधांचा काहीच पुरवठा नव्हता. परत आल्यावर आम्ही डॉक्टरांना औषधं पाठवायला सांगितलं.''
गेल्या तीन वर्षांत मागास भागासाठीच्या निधीमधून गडचिरोलीला वर्षाकाठी ४० कोटी रुपये मिळालेत. गेल्या ऑगस्टमध्ये नियोजन आयोगाने विकासासाठी ५६५ कोटी रुपये मंजूर केलेत. पण बीनागोंडामध्ये औषधं काही आलेली नाहीत, उलट आधी असलेल्या परिचारिका आता नाहीयेत.
'सरकारला विकास करायचाय, पण भ्रष्टाचारी प्रशासकीय अधिकारी निधी गायब करतात', हे कानफडे मान्यच करून टाकतात. बऱ्याच अर्थांनी बीनागोंडा नि गडचिरोली देशभरातील स्थितीचे निदर्शक आहेत, फक्त भ्रष्टाचार आणि अवाजवी काहूर माजवणं एवढंच नव्हे तर विकासाच्या संकल्पनेकडे ज्या विचित्र पद्धतीने पाह्यलं जातं त्याही अर्थाने. कदाचित म्हणूनच १० लाख लोकसंख्येच्या ह्या जिल्ह्यात मिळून केवळ १८ किलोमीटरांचा रेल्वे मार्ग आहे आणि फक्त एक रेल्वे स्थानक आहे. आता सुजनगडमध्ये खाण सुरू झाल्यामुळे नवीन रेल्वे मार्ग तयार होण्याची शक्यता आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हा विकास आराखड्यात मात्र स्मार्ट कार्ड, ई-फ्लड अलर्टस, 'ऑडीयो-व्हिज्युअल' वर्ग यांचा उल्लेख आहे. या सगळ्यातला विरोधाभास अगदी स्पष्ट आहे. (चित्रातील तक्ता पहा.)
२६ ऑगस्टपर्यंत, ४८ तासांसाठी कानफडे नि सहकारी यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला होता. त्यांना नक्षलवाद्यांनी पळवून नेल्याच्या अफवा पसरल्या. अफवांचं काम पोलिसांनी केल्याचा आरोप कानफडे करतात. ते म्हणाले की, 'मला शोधायला १५ अधिकारी आणि १०० कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आल्याचं सांगून पोलिसांनी आरडाओरडीला खाद्य पुरवलं.' त्यात प्रशासनाने राज्याच्या गृहमंत्र्यांना ही माहिती दिली. आणि भामरागडच्या तहसीलदाराला कानफडे नि सहकाऱ्यांची वाट बघत लाहेरीमध्ये थांबायला सांगण्यात आलं.
२६ ऑगस्टला कानफडे सुरक्षितरित्या जंगलातून बाहेर आले. लाहेरीमधून तहसीलदाराच्या गाडीतून ते निघाले तेव्हा अंधार पडला होता. त्यानंतर जे काही घडलं त्याने कानफडे आश्चर्यचकित झाले. पोलिसांच्या तळाजवळ त्यांची गाडी थांबवण्यात आली. ''ए तहसीलदार, खाली उतर'' अशा शब्दांत शस्त्रधारी पोलिसाने आज्ञा सोडली. कानफडे म्हणतात की, 'तथाकथित नक्षलग्रस्त भागात कोणत्याही नक्षलवाद्याने माझ्यावर बंदूक घेऊन हल्ला केला नाही, पण मी माझ्या स्वतःच्या भागात आलो तेव्हा पोलिसांनी मला बंदूक दाखवली.' - 'पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून आमचं वाहन ताब्यात घेण्यात आलं. ते तहसीलदाराची गाडी अशी ताब्यात घेत असतील तर स्थानिक लोकांशी ते कसे वागत असतील, याचा विचार मला भीतिदायक वाटतो.'
ते परत आल्यानंतर, सूत्रांनी 'तेहेलका'ला सांगितलं की, महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटीलांनी कानफडेंना बोलावून घेतलं, एक गुप्त अहवाल द्यायला सांगितलं आणि त्यासंबंधी सार्वजनिक ठिकाणी काही बोलू नये, अशी सूचना केली. दरम्यान, जिल्हाधिकारी पाटने यांनी कानफडेंना पत्रकार परिषद घेऊन अफवांचे निराकरण करण्याची सूचना केली. 'सरकारविरोधी काहीही बोलू नका', असं जिल्हाधिकारी कुजबुजल्याचं सूत्रं सांगतात. पण कानफडे गप्प बसणार नव्हते.
'मी हिंसेच्या विरोधात आहे, ती नक्षलवाद्यांकडून होणारी असो किंवा सरकारची कायदेशीर हिंसा असो', असं कानफडे सांगतात- 'नक्षलवादी हे एका मर्यादित वर्तुळात हिंसक आहेत. ते लक्ष्य ठरवून मारतात. पण पोलिसांची हिंसा ही अस्ताव्यस्त आहे. असं दिसतं की, गावकरी नक्षलवाद्यांपेक्षासुद्धा पोलिसांना जास्त घाबरतात. नक्षलवादी चांगले आहेत असं मी म्हणत नाहीये,पण संरक्षक दल जास्त वाईट आहेत.'
कानफडे परत आल्यानंतर दहा दिवसांनी जिल्हाधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षकांकडून विश्वसनीय पत्र मिळालं. त्यात लिहिलं होतं- 'कानफडेंनी सरकार व पोलीस प्रशासनाविरुद्ध विधान केलंय. प्रशासनाबद्दल त्यांनी लोकांच्या मनात किंतु निर्माण केलाय. पोलीस त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर दुर्गम भागात राहतात. कानफडेंनी दलांचं खच्चीकरण केलंय... एका जबाबदार अधिकाऱ्याने नक्षलवाद्यांबद्दल सहानुभूती दाखवल्येय. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सनदी सेवांचे नियम (१९८१)चा भंग केलाय. आम्हाला असं वाटतं की, कानफडेंची विभागीय चौकशी व्हायला हवी.'
ह्या पत्राच्या जोरावर जिल्हाधिकाऱ्यांनी दुसरं एक पत्र निवासी उप-जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं. त्यात म्हटलं होतं की, कानफडेंनी खूपच संवेदनशील विषयावर विधान केलंय. त्यासंबंधी तपशीलवार चौकशी करावी. निवासी उप-जिल्हाधिका-यांनी कानफडेंकडे खुलासा मागितला आणि विभाग पातळीवरील चौकशीचा धाकही दाखवला. 'त्यांच्या खुलाशावरून कोणती कारवाई करायची ते आम्ही ठरवू', असं जिल्हाधिकारी पाटने यांनी 'तेहेलका'शी बोलताना सांगितलं- 'एवढ्या जणांच्या हौतात्म्यानंतर पोलिसांचं खच्चीकरण करून नक्षलवाद्यांची भलामण करणं योग्य नव्हतं.'
कानफडेंवरची कारवाई ही सरकारच्या खास दृष्टिभ्रमाचं उदाहरण आहे. 'शत्रू'शी चर्चा करण्याची इच्छा असणारा प्रत्येक जण हा शत्रू ठरवला जातो. पोलिसांनी कानफडेंची अधिक चौकशी सुरू ठेवली तर नक्षलवाद्यांना थोपविण्यासाठी त्यांच्या हाती फार काही उरणार नाही. 'आदिवासांची तरुण पिढी गोंधळलेली आणि निराश आहे. त्यांना त्यांची स्वतःची परंपरा, मूल्यं, नि संस्कृती आहे. पण तथाकथित सुधारलेला समाज त्यांना सांगतो की, त्यांनी मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यांना अशा सोईसुविधा दाखवल्या जातात ज्या कशा मिळवायच्या हे त्यांना माहीत नाही. नक्षलवादी त्याचा फायदा उठवतात. काही आदिवासींना आपल्यात सामील होण्यासाठी नक्षलवाद्यांकडून प्रत्येकी दीड हजार रुपये देण्यात आले.'
सहानुभूती असेल किंवा नसेल, तरी कानफडेंना नक्षलवाद्यांना भेटायची इच्छा आहे. 'अगदी अहेरीतील एसडीएम म्हणूनही मी माझी ओळख लपवीन नि नक्षलवाद्यांना भेटण्याच्या आशेने स्कूटरवरून गावांमध्ये जाईन. मला त्यांना विचारायचंय की, ते खरंच अन्यायाच्या विरुद्ध असतील तर ते बंदूक का उचलतायत?
हाच प्रश्न त्यांनी बीनागोंडातल्या गावकऱ्यांना विचारला. 'ते म्हणाले, आपण आपल्या बाजूने अन्याय करणं सोडू तेव्हा नक्षलवादीही अन्याय करणं थांबवतील.'
avadhootji i am very thankful to you for publishing such nice realistic article.
ReplyDeletethat is truth of indian as well as maharashtrian administration!!
thank u very much!
Dnyaneshwar Raut
ज्ञानेश्वर,
ReplyDeleteपहिलं, ब्लॉग वाचल्याबद्दल थँक्स. आणि प्रतिक्रियेबद्दल अजून थँक्स.
Thanks for giving another angle on this issue. All that needs is our government's genuine interest to solve this problem.
ReplyDeleteYou should send this translated article to Mr. Rajendra Kanphade.
कानफडेंच्या तळमळीविषयी दुमत नाही मात्र सगळा दोष पोलिसांना देऊन कसं चालेल? पोलीस तरी शेवटी कुणासाठी काम करतात ? पोलीसांनाही हिंसा नकोय. सुकून तो सभी चाहते है. योजना आखल्या जातात पण त्या योग्य माणसांपर्यंत पोहचत नाहीत, हे सत्य आहे. योजनांची अंमलबजावणी करायला कानफडेंसारखे संवेदनशील व प्रामाणिक अधिका-यांची फळी पाहिजे, राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून ते साध्य होऊ शकेल.
ReplyDeleteAvadhoot, great article. I'm eager to read other articles asap. I can't find info about you. Please inbox the link or info.
ReplyDelete