Sunday, 20 February 2011

गुरुदेव रवींद्रनाथ, ‘ऋग्वेदी’ आणि पंडितजी

- प्रसन्नकुमार अकलूजकर

पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर दैनिक 'सकाळ'मध्ये मी एक लेख लिहिला. या लेखाचा मथळा थोडा वेगळा होता. तो गुरुदेवांच्या ‘गीतांजली’तून घेतला असल्यामुळे काहींना तो अपरिचित वाटला असण्याची शक्यता आहे. लेख वाचून होताच अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यात एक प्रतिक्रिया डॉ. अनिल अवचटांची होती. त्यांना लेख आवडला पण ऋग्वेदी आणि त्यांचे अभंग गीतांजली हे पुस्तक याबद्दल त्यांनी आवर्जून विचारणा केली. लेख वाचणाऱ्या बहुतेकांनी या संदर्भात विचारणा केल्यामुळे हे छोटेसे टिपण आपणापर्यंत पोहोचवतो आहे. त्यात माझे भाष्य किंवा कोणतीही टीका-टिप्पणी नाही.

रवींद्रनाथ टागोर
गुरुदेवांचे मूळ बंगाली काव्य (देवनागरीत), त्याचा ऋग्वेदी यांनी केलेला भावानुवाद व अतिशय समर्पक असे मराठीतील विवेचन पुढे देत आहे. शिवाय मूळ बंगाली गीताशी साधर्म्य सांगणारा तुकाराम महाराजांचा अभंग व त्याचेही ऋग्वेदी यांनी केलेले रसाळ निरुपण सोबत दिले आहे. जाणकार वाचकांना ते आवडेल असे वाटते. असो.

गुरुदेवांचे गीतांजली हे काव्य जगविख्यात आहे. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाल्यामुळे देशा-परदेशांतील विद्वानांच्या ते परिचयाचे झाले. मात्र ‘नेटिव्हां’च्या भाषेत त्याचा भावानुवाद होणे अगत्याचे होते. ते काम ऋग्वेदी यांनी केले. हा मूळ अभंग व त्याचे मराठीतील विवरण सोबत दिले आहे.
माझ्या लेखाला मी जे शीर्षक दिले होते ते असेः ‘गान दिये हे तोमाय खुंजि बाहिर मने’.
रानडे इन्स्टिट्यूटमधील माझे विद्यार्थी श्री. निरुपम बॅनर्जी यांनी मला गुरुदेवांची या शीर्षकाची मूळ बंगाली कविता उपलब्ध करून दिली. ती अशीः

१) गान दिये जो तोमाय खुंजि
बाहीर मोने
चिरो दिवश मोर जीबोते।
निये गेछे गान आमारे
घॉरे घॉरे दारे दारे
गान दिये हाथ बुलिये बेडाई
एइ भुबोने।

२) कॉतो शेखा शेई शोखालो
कॉतो गोपोन पाथ दॅखालो
चिनिये दिलो कॉतो तारा
हृद गॉगने।

३) बिचित्रो शुख-दुखेर देशे
रहश्यो लोक घुरिथे शेशे
शोन्धा बिले बेलाई निये एलो
कोन भवाने।

(९ श्रावण १३१७ बंगाली नियतकालिकानुसार)

आता ऋग्वेदींनी केलेला तेवढाच अप्रतिम, सहजसुंदर प्रासादिक भावानुवाद पाहा-

गानाच्या योगानें आलो मी चालत।
तुजला शोधीत जन्मोजन्मीं।।

हिंडलो मी गान गात घरोघरीं।
द्वाराहुनी द्वारीं बहुकाल।।

गानरुपी हाते स्पर्शिलें भुवन।
केलें संशोधन गानद्वारें।।

ज्ञान आजवरी मज जें लाभलें।
पथ जे देखिले गूढ ऐसे।।

हृदय-गगनी तारे जे उदेले।
प्रगट झाले गाने सर्व।।

सुखदुःख याचें रहस्य जाणिलें।
गानें आकळीले गूढ त्यांचें।।

झाली संध्यावेळ प्रवास संपला।
कवण्या दाराला आलों गात।।

तुझिया कंझीची रम्य पुष्पमाला।
माझ्या हृदयाला स्पर्शेना का।।

गुरुदेव रवींद्रनाथांनी ‘गीतांजली’मध्ये प्रमुख्याने मृत्युविषयक 
भीमसेन जोशी
चिंतन करणारे आणि ईश्वराचा शोध घेणारे काव्य रचिले आहे. पंडित भीमसेन जोशी गेल्यानंतर दैनिक 'सकाळ'ने माझ्याकडे लेखाबाबत विचारणा केली. त्यातही निरंजन आगाशे व चंद्रशेखर पटवर्धन (दोघेही मित्र) यांनी आग्रह केला. पंडितजींची प्रकृती गंभीर होती, केव्हातरी त्यांच्या निधनाचे दुःखद वृत्त येणार याचीही कल्पना होती.
पंडितजींबद्दल लिहिताना, तेही ललित शैलीने लिहिताना सहजपणे ऋग्वेदींचे पुस्तक हाती आले. हे पुस्तक 1928-29 साली प्रकाशित झाले आहे. ऋग्वेदी यांच्या ठायी विद्वत्त्व आणि कवित्व दोन्हीही वसले होते. त्यामुळे गुरुदेव रवींद्रनाथांच्या या तत्त्वचिंतनात्मक काव्याचा भावानुवाद त्यांनी वरीलप्रमाणे केल्याचे दिसते. पंडितजींविषयी लिहिताना त्याचाच आधार घ्यावा असे वाटले आणि ‘भाष्यकाराते वाट पुसत’ मी या काव्यापाशी येऊन ठेपलो.

ऋग्वेदी यांनी या काव्याचा भावार्थ आणि त्याचबरोबर रहस्यही सांगितले आहे. भावार्थ सांगताना ऋग्वेदी म्हणतात-
‘‘माझे अनेक जन्म झाले. या जन्मामध्ये केवळ तुझें गीत गात आणि तुला शोधीत मी हिंडत आहे. अनेक गृहांमध्ये आणि द्वारांत मी प्रवेश करीत आलो, त्यावेळी मी गात-गातच हिंडलो आहे. गानाच्या योगाने विश्वाशी माझा स्पर्श घडला. माझे अंतर्बाह्य शोधन त्यायोगे झाले. मला ज्ञानप्राप्ती होऊन, जगाचे गूढ कळून यायला हे गानच कारण झाले आहे. हृदयाकाशात तेजःपुंज ताऱ्यांचा प्रकाश पडण्याला किंवा सुखदःखाचे रहस्य समजण्याला या गानाचा उपयोग झाला. याप्रमाणे गीत गात गात माझा प्रवास चालू असून तो बंद पडण्याचा समय आला आहे. संध्याकाल झाला. अहा! मी फिरत फिरत आणि गीत गात कोणत्या (राजमंदिराच्या) द्वाराशी येऊन पोहोचलो बरे! प्रभो! तू प्रेमलिंगन देऊन माझा स्वीकार करशील काय?

रहस्य! सर्व धर्मांचे अनुयायी ईशस्तवन गीताच्या द्वारे करतात. परमेश्वराच्या विश्वरचनेत गीत, ताल व सुस्वर यांची नियमबद्धता सर्वत्र दृष्टीस पडते. ही जाणण्यास या विश्वाचे रहस्य जाणले पाहिजे. अत्यंत प्राचीन काळी मनुष्यप्राण्याने प्रथमतः ईशस्तवन केले ते वेदांतील गीतांनी. त्यानंतर अनेक धर्मसंस्थापक व साधुसंत ईश्वराचा शोध करीत हिंडले. त्यांनीदेखील गीताच्या मदतीने ईश्वरीप्रेमाचे आकलन करण्याचा प्रयत्न केला. याचे कारण संतांनीच निवेदले आहे ते असे-

गायनाचे रंगी। शक्ति अद्भुत हे अंगी।
हे तो देणे तुमचे देवा। घ्यावी अखंडित सेवा।
अंगी प्रेमाचे भरते। नाही उतार चढते।
तुका म्हणे वाणी। परम अमृताची खाणी।।’’

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आधार घेऊन ऋग्वेदी यांनी अप्रतिम विवेचन केले आहे. त्यातील काही महत्त्वाचा भाग पुढे देत आहे. संगीत वा गीत (किंवा गीतगायन) म्हणजे ईश्वरप्राप्तीचेच साधन आहे. गायनाशी एकरुप होणे म्हणजे साध्य आणि साधन यांचे एकजीवित्व होय. ऋग्वेदी म्हणतात-
‘‘दुसऱ्या दृष्टीने पाहिले तरी आमचे जीवित म्हणजेच एक गीत आहे. ते सुसंगीत झाल्यास हे जीवन सुखावह होऊन अंतकाली कलेवर टाकताना ईशस्मरण होईल आणि जीवाचा उद्धार होईल. या गानातील स्वर बेताल व बेसून झाल्यास सुखाच्याऐवजी दुःख भोगणे प्राप्त होईल. ही स्थिती सर्वस्वी सुधारणे, सुख तेवढे प्राप्त करवून घेणे आणि दुःखाचा प्रसंग पूर्ण टाळणे जरी सर्वस्वी आपल्या हाती नाही तथापि या गीताचे (म्हणजे जीविताचे) महत्त्व जाणून शक्य तितक्या तालसुरात ते गाइल्यास आनंदाचा अंश विशेषे करून प्राप्त होईल.’’

गुरुदेव रवींद्रनाथ, ऋग्वेदी आणि पंडितजी या मथळ्याचा अन्वयार्थ आता आमच्या वाचकांच्या ध्यानी आला असेल. हे वाचून ऋग्वेदी यांनी भावानुवाद केलेले अभंग गीतांजली हे पुस्तक शोधून वाचण्याची उर्मी एखाद्याला जरी झाली तरी या टिपणाचे सार्थक झाले!

ता.. १) ऋग्वेदी’ म्हणजे वामन मंगेश दुभाषी होय. आपल्या लाडक्या पुलंचे ते आजोबा होत. त्यांचे सुरेख व्यक्तिचित्र पुलप्रेमींना ’गणगोत’मध्ये वाचावयास मिळेल. काहींनी ते यापूर्वीच वाचलेही असेल.
२) ‘अभंग गीतांजली’ या ऋग्वेदींच्या पुस्तकाला काका कालेलकर यांची अत्यंत मर्मग्राही प्रस्तावना आहे. जाणकारांनी तीही वाचावी असे सुचवावेसे वाटते.
३) ऋग्वेदी यांचे संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती आणि बंगाली या भाषांवर उत्तम प्रभुत्व होते. संतवाङ्मयाचे त्यांचे वाचन व पाठांतर दांडगे होते.
४) गोपाळ गणेश आगरकर आणि महादेव गोविंद रानडे हे त्यांचे आदर्श होते.
५) त्यांचे वक्तृत्व उत्तम होते व त्यांना छान विनोदबुद्धीही होती. (संदर्भः ’गणगोत’मधील भाईकाकांचा म्हणजे आपल्या पुलंचा ’ऋग्वेदी’ हा लेख.)
***
(फोटो-- इंटरनेटवरून इकडूनतिकडून घेतले आहेत.)

No comments:

Post a Comment