Monday, 1 November 2010

'आम्ही भारताचा भाग नाही, त्यामुळे आम्हाला फुटीरतावादी म्हणता येणार नाही'

ज्या सभेत अरुंधती रॉय बोलल्या त्यावरून गदारोळ झाला त्या सभेत हा एक नागालँडचा मनुष्यसुद्धा काहीतरी म्हणाला. नागा पीपल्स मूव्हमेंट फॉर ह्यूमन राईट्स (एनपीएमएचआर)चे महासचिव डॉ. एन. वेणूह (Dr. N Venuh) (उच्चार चुकला असू शकेल.) हे स्वतंत्र नागालँडचे पुरस्कर्ते आहेत. नवी दिल्लीत झालेल्या त्या सभेत स्वतंत्र काश्मीरलाही त्यांनी पाठिंबा असल्याचं सांगितलं. शिवाय दोन मागण्यांमध्ये साम्य असल्याचंही सांगितलं. त्यांची 'तेहेलका'त छापून आलेली ही मुलाखत-

मूळ मुलाखत - ‘We’re not part of India, so we can’t be called secessionists’   (Tehelka Magazine, Vol 7, Issue 44, Dated November 06, 2010)

सय्यद अली शाह गिलानींना फुटीरतावादी म्हटलं जातं. नागालँडच्या मागणीलासुद्धा तसंच म्हणता येईल का?
- आम्ही भारताचा भाग नाही आहोत, त्यामुळे आम्हाला फुटीरतावादी म्हणता येणार नाही. सरकारने आम्हाला आमचे हक्क द्यायला हवेत. आम्ही भारत सरकारचे मित्र असू शकतो पण भारतीय राष्ट्राचा भाग नाही होऊ शकत.

१९७५मध्ये नागा नॅशनल कौन्सिल आणि भारत सरकारमध्ये झालेल्या शिलाँग करारानुसार, कौन्सिलने 'कोणत्याही अटीशिवाय भारतीय घटना' स्वीकारली होती. मग भारताचा भाग होण्याचं तुम्ही कधीच मान्य केलं नव्हतं, असं तुम्ही कसं म्हणता?
- १९४७पासून आतापर्यंत, नागालँडमधल्या कोणीही भारतीय घटना स्वीकारलेली नाही. केवळ एक संघटना काहीतरी मान्य करते म्हणजे सगळ्यांनाच ते मान्य आहे असं नाही. म्हणूनच तर चळवळ अजून सुरू आहे.

नागा लोक नि काश्मिरी लोक यांच्या मागण्यांमध्ये काही साम्य आहे का?
- हो. इतिहास असं सांगतो की, काश्मीर ही वादग्रस्त जागा आहे. म्हणूनच अजूनही श्रीनगरमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेचं कार्यालय आहे. काश्मिरी लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार असायला पाहिजे. त्यांना भारताबरोबर राहायचंय किंवा नाही हे ठरवायची मोकळीक त्यांना द्यायला हवी. नागा लोकांनाही हे लागू होतं. आम्हाला कधीच भारताचा भाग व्हायचं नव्हतं.

नागालँडमध्ये वेगवेगळ्या वंशाच्या जमाती आहेत, ज्यांना स्वतःची ओळख व्यक्त करण्यासाठी स्वतःची जागा हवेय. मुख्य प्रश्नाची उकल होण्यामध्ये ही एक अडचण आहे का?
- काही मतभेद आहेत, पण उद्दीष्ट एकच आहे. प्रत्येक चळवळीत वेगवेगळे राजकीय गट असतात, पण ते एका ठराविक राजकीय उद्दीष्ट गाठण्यासाठी एकत्र येतात. त्यावर काही मतभेद नसतात.

काश्मिरी पंडितांचं असं म्हणणं आहे की, त्यांचे हितसंबंध दडपले जातील. तसंच नागालँडमध्येसुद्धा, एखाद्या राजकीय गटाने सत्ता मिळवली, तर दुस-या काहींना आपोआप गौणपणा आल्यासारखं होईल?
- नागालँडमध्ये प्रत्येक जण सारखा आहे. तिथे काश्मीरसारखी परिस्थिती नाही. एकदा का नागालँडला स्वातंत्र्य मिळालं की, प्रत्येक जण ते मान्य करेल. त्यावर काही वाद होणार नाही.

पण लोकांच्या मताबद्दल तुम्ही एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकता?
- कसंय की, १९५१मध्ये आमच्याकडे सार्वत्रिक मतदान घेण्यात आलं. त्यावेळी प्रत्येकाला भारतापासून वेगळं व्हायचं होतं नि वेगळं राष्ट्र तयार व्हावं असं वाटत होतं.

पण त्यानंतर खूपच काळ निघून गेलाय. नवीन पिढीला काही वेगळं म्हणायचं नसेल का?
- मला नाही वाटतं कोणाला काही वेगळं म्हणायचं असेल. १९५१च्या मतदानात नागालँडच्या लोकांची इच्छा दिसून आली. प्रश्न बदलला नाहीये, उलट दडपशाही आता वाढलेय. ते आपलं मत का बदलतील? परत सार्वत्रिक मतदान घेण्याची आवश्यकता आहे, असं मला नाही वाटत.

जर सार्वत्रिक मतदानाच्या आधारे भारत सरकार नागा लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार द्यायला तयार झालं तर?
- परत सार्वत्रिक मतदान घेण्याची आवश्यकता नाहीये. समस्येवर उपाय शोधण्याला टाळाटाळ करण्यासाठी भारत सरकार त्याचा वापर करेल.

महा नागालँड चळवळ सगळ्या नागा लोकांना समाविष्ट करून घेऊ इच्छिते, अगदी शेजारच्या राज्यांमध्ये राहणा-यांनाही. हा साम्राज्यवादी दृष्टिकोन नाही का?
- जेव्हा आम्ही आमच्या स्वतंत्र अधिकारांबद्दल बोलतो तेव्हा आम्ही लोकांच्या एका भूभागाबद्दल बोलत असतो. मणिपूर, अरुणाचल आणि आसाममध्येही नागा लोक आहेत. त्यांनाही आम्ही सामावून घेऊ इच्छितो कारण त्यांचं कृत्रिमरित्या विभाजन केलं गेलंय. आम्ही दुस-या कोणाची जमीन बळकावणार नाही आहोत. आम्हाला फक्त लोकांना एका प्रशासनाखाली आणायचंय. जेव्हा भारत ब्रिटिशांच्या अंमलाखाली होता, तेव्हा लोकांच्या इच्छेविरुद्ध त्याचे वेगवेगळे भाग पाडले गेले. त्यांना ते पटत नाही. तसंच, आम्हाला आमच्या शेजा-यांशी चांगले संबंध ठेवायचेत पण सगळे नागा लोक एकत्र येतील असंही आम्हाला पाहायचंय.

महा नागालँडच्या नावाखाली चालू असलेल्या हिंसेला कंटाळलेले नि शांतता हवे असलेले अनेक लोक आहेत. त्यांना कायम ताणाच्या परिस्थितीखाली राहायची जबरदस्ती का?
- आम्ही हिंसक गट नाही आहोत. आम्ही लोकांशी बोलतोय, मणिपुरी, आसामी, अरुणाचली यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. पण जर ते आमच्या विरुद्ध गेले नि हिंसा केली, तर त्यांना प्रत्युत्तर देण्याशिवाय आमच्यापुढे दुसरा मार्ग राहत नाही.

जे अनेक वेगवेगळे नागा बंडखोर गट स्वतःचे स्वतः लढतायत त्यांचं काय? एकदा नागालँड स्वतंत्र झालं की, ते स्वस्थ बसतील असं तुम्हाला वाटतं का?
- वर्षानुवर्षं भारत सरकारने केलेली दडपशाही नि सैन्याचा राज्यात असलेला वावर यामुळे हे बंडखोर गट कार्यरत आहेत. एकदा का जुलूम आणि सैन्य नसलं की हे गट आपोआप शांत होतील.

पण हे ठामपणे कसं सांगता येईल? काश्मिरी तरुणांनी शस्त्रं फेकली आणि दगड हातात घेतले, नागा लोक तर बंदुकींनीच लढतायत.
- कदाचित हिंसा होईल, पण एकदा दडपशाही थांबली की ते शांत होतील. सैन्य दलांनी किती लोकांना मारलं तुम्हाला माहित्येय का? किती स्त्रियांवर त्यांनी बलात्कार केले माहित्येय का? जोपर्यंत असे जुलूम होतायत, तोपर्यंत लोकांना हिंसा करण्याशिवाय पर्याय राहत नाही. तरीसुद्धा कोणत्याही गटाने कधी एखाद्या नागरिकाला हात लावलेला नाही.

अनेक जण म्हणतात की, एनपीएमएचआर ही फक्त नॅशनलिस्ट सोशालिस्ट कौन्सिलचा दिसणार चेहरा आहे. आणि राजकीय पक्ष ज्या प्रश्नासाठी लढतो त्याचा ती प्रश्नाचा कैवार घेते. हे खरं आहे का?
- हे पूर्णपणे खोटं आहे. आम्ही नागा लोकांसाठी काम करणारी एक मानवी हक्क संघटना आहोत. सरकारबरोबर कौन्सिल शांततेच्या ज्या वाटाघाटी करते, त्याला मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.

तुम्ही स्वतंत्र काश्मीरच्या मागणीला साहाय्य देण्याविषयी बोलला आहात. या मदतीचा परिणाम म्हणून काही ठोस प्रयत्न दिसून येणार आहेत का?
- आमच्या काश्मिरी बांधवांच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. खरंतर स्वतःची ओळख आणि स्वातंत्र्य यासाठी लढणा-या प्रत्येकाला आमचा पाठिंबा आहे. पण ठोस प्रयत्नांच्या दृष्टीने आम्ही काही योजना करत नाही आहोत. पण आम्ही त्यांचा लढा समजू शकतो म्हणून आमचा नैतिक पाठिंबा कायमच त्यांच्या बाजूने असेल.

No comments:

Post a Comment