Monday, 24 September 2012

वासेपूरचं अ-वास्तव


- जावेद इक्बाल

जावेद हा मुंबईत राहणारा पत्रकार आणि छायाचित्रकार. त्याच्या मूळ इंग्रजी लेखाचं हे मराठी भाषांतर 'रेघे'वर प्रसिद्ध होतंय, त्याच्याच परवानगीनं. लेखाचा मजकूर 'काफिला'वर सापडला. हा लेख संपादित स्वरूपात 'इंडिया टुडे'मध्येही आला होता. आपण मूळ लेखकाचीच परवानगी घेतलेली आहे. सर्व छायाचित्रंही जावेदनंच काढलेली आणि त्या सगळ्याचेच हक्क त्याच्याकडे आहेत. जावेदचा ब्लॉगही पाहण्यासारखा.

वासेपूरमधल्या टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर तिथं उभी राहिलेली खाण कामगारांची चळवळ तुम्हाला माहितेय का? किंवा तिथली कामगारांची संघटना उभी करणारे ए. के. राय, जे आता शेवटच्या घटका मोजतायंत? बंदुकांच्या गोळ्यांच्या आवाजात न ऐकू आलेली ही वासेपूरची कथा-
***

धनबादमध्ये 'गँग्स ऑफ वासेपूर'ची पोस्टरं. सगळी छायाचित्रं : जावेद इक्बाल

'चित्रपटाचा शेवट बरोबर पद्धतीनं दाखवलाय' - हे एकसुरात ऐकू येतं - वासेपूर, धनबादमधली प्रसिद्ध दंतकथा - 'गुंड शफीक खानला खरोखरच तोपचाची पेट्रोल पंपावर चित्रपटाच्या पहिल्या भागात दाखवलं तसंच गोळ्या घालून मारलं गेलं.'
'धनबादमध्ये असंच होतं.'

धनबादमध्ये खुनांची अशी मोठी यादीच आहे. 'मार्क्सिस्ट को-ऑर्डिनेशन कमिटी'चे आमदार गुरदास चॅटर्जी यांना महामार्गावर गोळ्या घातल्या गेल्या. पोलीस अधीक्षक रणधीर वर्मा यांचा बँक लुटायला आलेल्या डाकूंनी खून केला. राष्ट्रीय जनता दलाचे मुकुल देव यांची हत्या झाली. कामगार नेते एस. के. राय यांचीही हत्या झाली. गुंड समीन खानला जामीन मिळाला नि न्यायालय सोडताना त्याच्यावर गोळ्या झाडून ठार करण्यात आलं; पोलिसांच्या ताब्यात असतानाच हे घडलं. कोळसा माफियांपैकी सकेल देव सिंग यालाही बायपासजवळ संपवण्यात आलं नि त्याच्याबरोबर काम करणाऱ्या त्याच्या भावाला शक्ती चौकात एके- ४७नं मारण्यात आलं. मतकुरीया गावचा मनोज सिंग ऊर्फ डबलू जो कथितरित्या वासेपूरमधल्या मुस्लिमांना दहशतवादी बनवण्याच्या कारवायांमध्ये होता, त्याला गोळ्या घालण्यात आल्या. शफीक खानचा १८ वर्षांचा मुलगा चोत्ना खान याला गोळ्या घालण्यात आल्या. रेल्वे कंत्राटदार असलेल्या मोहम्मद इरफानला एका टोळीनं उडवलं. विभाग आयुक्त नजीर अहमदचा खून झाला. एकेकाळी पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमात पडलेल्या आणि त्यांच्या संबंधात कटुता आल्यानंतर त्याच अधिकाऱ्याच्या रोषाला तोंड देणाऱ्या घरकामगार महिलेला तिच्या भाच्याचा कापलेला मृतदेह धनबाद पॉलिटेक्निकमधल्या विहिरीत सापडला.
'हाय प्रोफाईल' खुनांची ही फक्त प्रकरणं आहेत, असं स्थानिक लोक सांगतात. एका बाजूला त्यांच्या शहराच्या हिंसक प्रतिमेबद्दल त्यांना लाज वाटताना दिसते तर दुसरीकडं कोणी कोणाला कधी मारलं याची माहिती ठेवण्यात त्यांना अभिमानही असतो.
आता झारखंडमधल्या धनबाद जिल्ह्याचा भाग असलेलं वासेपूर गेल्या काही दशकांमध्ये हिंसाचार आणि टोळीयुद्धाच्या संस्कृतीपासून खूप सुधारलंय. या आधीच्या संस्कृतीचाच काही भाग 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये दाखवण्यात आलाय.



धनबादमधल्या एका कुटुंबातील तीन पिढ्यांची गोष्ट या चित्रपटात सांगितलेय. या गोष्टीला पार्श्वभूमी आहे कोळसाखाणींची, कोल माफिया रामधीर सिंगनं केलेल्या शहीद खानच्या खुनाची आणि त्यानंतर शहीदचा मुलगा सरदार खान (वास्तवातला शफीक खान) आणि त्याचा मुलगा फैझल खान (वास्तवातला फहीम खान) यांनी शपथेवर काढलेल्या सुडाची.
'मुळात सुडाची अशी कुठली कथा कधीच नव्हती', असं २४ वर्षांचा इक्बाल सांगतो. इक्बाल - फहीम खानचा (वय ५०) मुलगा आणि शफीकचा नातू. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यात दाखवल्याप्रमाणे शत्रू टोळीनं ज्या खोलीवर मध्यरात्री हल्ला केला आणि पोलीस चौकीवरही गोळीबार केला, त्याच खोलीत बसून इक्बाल बोलत होता- 'माझ्या आजोबांचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला. त्यांचा खून वगैरे कोणत्याही सिंगानं कधी केलेला नाही. आणि त्यात अजून एक गोम आहे. माझे आजेकाका होते, हनीफ, त्यांना माझे वडील फहीम यांना जीवे मारायचं होतं, त्यासाठी त्यांनी सगीर नावाचा माणूस नेमला होता.'
'आणि या सगीरच्या खुनासाठीच माझे वडील सध्या हजारीबाग तुरुंगात आहेत.'
'यातलं काहीच त्या चित्रपटात नाही', इक्बाल पुढं सांगू लागला- चित्रपटात दाखवलंय त्यातलं पळवून आणलेल्या बाईच्या सुटकेसाठी सरदार खाननं प्रयत्न करणं, सरदार खानच्या बायकोचं प्रकरण, 'रोमियो - ज्युलिएट'सारखी टोळ्यांतर्गत लग्न आणि 'पर्पेन्डिक्युलर' व 'डेफिनीट' अशी माणसांची नावं - हे सगळंच काल्पनिक आहे. उलट, प्रिन्स खान आणि गुडविन खान अशी नावं होती.
'धनबादमध्ये दोन प्रकारचे कायदे आहेत. फहीम खानच्या कुटुंबातल्यांना अटक करण्यासाठी कायदा आहे आणि सिंग महालाची तपासणी करण्यासाठीचा कायदा आहे', इक्बाल सांगतो. त्याचीही नुकतीच खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटका झालेय. हे सांगतानाही तो सिंग कुटुंब अजून बरंच मोठं असल्याचा संदर्भ देतो.


धनबादचा हिंसक परिसर


धनबाद हे एक अवास्तव ठिकाण आहे. अत्यंत गरीबी नि कामगारांच्या इतिहासाची श्रीमंती असलेलं हे लहानसं खाणीचं शहर. या शहराच्या मुख्य रस्त्यावर मध्यम वर्गाची गर्दी दिसते. वासेपूरला जाताना तुम्हाला धनबादमध्ये वाहतूककोंडीत तासभर अडकून पडावंही लागू शकतं. इथं तुम्हाला शॉपिंग कॉम्प्लेक्स दिसती किंवा गेल्या वर्षी २७ एप्रिलला पोलिसांच्या गोळीबारात चार लोक ठार झाल्यानंतर जाळल्या गेलेल्या ट्रकचे अवशेष दिसतील किंवा बस-स्टॉपजवळच्या काळोख्या हॉटेलात एखाद्या बेनाम तरुणाचं प्रेत आढळेल. मिथक, अर्धसत्य नि बेधडक झूठ यांचं हे शहर आहे. या शहराद सूरज देव सिंग नावाचा माणूस सूर्यदेव सिंगही असतो किंवा ए. के. राय हा ए. के. रॉयही असतो. पूर्वी ८५ खाणींची मालकी असलेल्या एका खाजगी खाणमालकाचा एक जुना वाडा आता खंगून पडलाय, तर जी गरीब मंडळी कोळशाची लहानमोठे तुकडे विकण्यासाठी जमवतात त्यांच्याकडून पैसे लुबाडण्यात पोलीस मंडळी गर्क आहेत. काही प्रमाणात नक्षलग्रस्त असलेल्या या जिल्ह्यातील टोपचाची आणि तुंडी या दोन भागांमध्ये अधूनमधून अटक - चकमकी झडत असतात. प्रचंड प्रमाणात होणारं स्थलांतर, कोळशाच्या खाणीमुळं होणारं प्रचंड प्रदूषण आणि जिल्ह्याच्या हद्दीवर माफियांकडून होणारी कामगारांची विक्री या सर्वांची साक्ष देणारं हे शहर.
धनबाद म्हणजे तेच जिथं डिसेंबर १९७५ला चासनला खाण अपघात झाला होता. यात ३८० जीव गेले. खाणींमध्ये एक तलाव गायब झाला. कोणीच वाचलं नाही. 'काला पत्थर' बनवला गेला आणि त्याची आठवण मात्र अजून आहे. सप्टेंबर १९९५मध्ये झालेल्या गझलितंग खाण अपघातात ९६ जणांना प्राण गमवावे लागले.
खाणींबरोबर आले माफिया लोक.

'इथं खूप टोळ्या आहेत', एक वकील गृहस्थ सांगतात, 'तुम्हाल जर धनबादची कथा सांगायची असेल, तर तुम्हाला इथं तीन महिने तरी काढावे लागतील.'
शहरीकरणाच्या फुटकळ बाजूंसंबंधी अनेक टोळ्या एकमेकांशी झगडत असतात. खाजगी बससेवेकडून खंडणी मागण्यावरून म्हणजे स्थानिक परिभाषेनुसार 'एजन्टी'वरून सरदार/शफीक खानचा मुलगा आणि दुसरा एक गुंड बाबला यांच्यात झगडा झाल्याचं सांगितलं जातं. (अर्थात सरदार/शफीक/फहीम खान यांच्या जवळच्यांनी हे नाकारलं). अखेर, सरदार/शफीक खानचा मुलगा फहीम खाननं खंडणी देण्यास नकार देणारा उद्योजक शबीरशी वाकडं घेतलं आणि शबीर आणि बाबला 'शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र' ह्या तत्त्वावर एकत्र आले. यात शबीरचा भाऊ वहीद आलमनं फहीमच्या घरावर हल्ला चढवला, त्यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झालं. याच्या बदल्यात फहीमनं वहीदचा काटा काढला.  त्यानंतरच्या घडामोडींनंतर शबीरला फहीम खानची आई (म्हणजे शफीक खानची विधवा पत्नी) आणि एकेकारी वासेपूरमधे नेतागिरी केलेल्या नझमा खातून यांच्या हत्येवरून शिक्षा झाली आणि सध्या जामिनावर सुटकाही झालेय.
'शफीक खान आणि फहीम खान यांचं 'सिंग महाला'बरोबरचं शत्रुत्त्व तितकंसं नाहीये', असं पोलीस अधीक्षक आर. के. धान म्हणतात, 'खरं तर ही त्यांची एकमेकांमधलीच लढाई आहे.'


'सिंग महाल' हा खरोखरच विविध सिंगांचा एक संग्रह आहे. अनेक सिंग सरकारी पदांवर आहेत, विशेषकरून सध्याच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उभे राहणाऱ्यांपैकी ते आहेत. यात सूर्यदेव सिंग (साधारण रामधीर सिंगच्या व्यक्तिरेखेच्या जवळचे), बच्चा सिंग, रामधीन सिंग, शशी सिंग आणि खुंती सिंग यांचा समावेश आहे. काही दशकांपूर्वी सर्वांत मोठा खाणमालक असलेल्या व्ही. पी. सिंग याच्या हत्येसाठी कथितरित्या सूर्यदेवस सिंग जबाबदार होता. त्याचा १९९१मध्ये नैसर्गिक कारणांनी मृत्यू झाला. आपलं नकारात्मक चित्रण केल्यामुळं सिंग महालानं चित्रपटावर बंदीची मागणी केली होती. पण इथंही सर्वांना माहीत असल्यानुसार, सिंग महालातही अंतर्गत वाद आहे. यातच गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरेश सिंगचा खून झाला. सिंगांमधील वाद हे कोळशाच्या खाणींवर झाले तर धनबादमध्ये सांगितलं जातं त्यानुसार शफीक खान आणि त्याचे मुलगे कधीच खाणींच्या व्यवहारात गुंतलेले नव्हते.
'काही प्रत्यक्षदर्शींच्या जबानीनुसार, शशी सिंगनं सुरेश सिंगचा खून केला', पोलीस अधीक्षकांनी माहितीची भर टाकली.
तरीसुद्धा फहीम खानचं वासेपूरमधलं घर सिंग महालाविरोधात उभं आहे, कारण त्यांनी फहीम खान कुटुंबीयांच्या शत्रूंना सहकार्य केल्याचं उघड झालं. नया बाझारजवळ राहणारा सुलताना उघडपणं शफीकशी पंगा घेऊन होता आणि त्याला सिंग महालाचा पाठिंबा होता. फहीम खानच्या घरापासून दहा सेकंदांच्या अंतरावर राहणाऱ्या शबीरलाही सिंग महालाचा पाठिंबा होता. आणि दबल्या आवाजात बोललं जातं त्यानुसार, खान मंडळींच्या आंकाक्षेनं त्यांना सिंग महालाच्या थेट विरोधात उभं केलं.
  

हिंसाचारामधला एक विरोधी सूर
एका खबऱ्यानं माहिती दिल्यानंतर १९ जुलै २०१२ला फहीम टोळीकडून एक शॉटगन नि एक रायफल जप्त करण्यात आली.
मी जेव्हा तरूण होतो, तेव्हा आमच्या डोळ्यासमोर एका माणसाला कापलं गेलं', धनबादमधल्या एका टोळी कुटुंबापैकी एक असलेला क्ष सांगतो.
'डोळ्यासमोर?'
'अगदीच समोर नाही, पण आम्ही वेगवेगळ्या बॅगमध्ये शरीराचे अवयव ठेवलेले पाहिले.'
'अजून?'
'त्यानंतर आम्हाला सगळ्यांना काकांशी बोलायला बोलावण्यात आलं. आणि काका आमच्याशी कायतरी वेगळंच बोलत होते, आम्ही त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवत नव्हतो, आम्ही जणू काही झालंच नसल्यासारखं दाखवलं. असंय की, आम्हाला त्यांच्यापासून स्वतःला वेगळं ठेवयाचंय, ते आम्हाला कसं वापरून घेतील याची आम्हाला कल्पना आहे.' 


टायरच्या रबरपासून बनलेल्या चपला वापरणारा माणूस
चासनलामध्ये ३८० मृतांसाठी बांधलेल्या स्मारकावरची मृत खाणकामगारांची नावं आता पुसट झाल्येत.


चष्मा असलेला एक अतिशय बारीक वृद्ध माणूस धनबाद केंद्रीय रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात स्वतःचे हात धरून शांतपणं बसलेला असतो - आता तो क्वचितच बोलतो, पण एके काळी धनबाद या नावाला त्याचं नाव समानार्थी मानलं जायचं. ए. के. राय, केमिकल इंजिनियर होते, नंतर ते कामगार संघटनेचे कार्यकर्ते झाले आणि धनबादमधल्या खाजगी खाणींमधल्या कामगारांना त्यांनी संघटीत केलं. ते तीन वेळा निवडून गेले आणि प्रत्येक वेळी सरकारी यंत्रणा, कोळसा माफिया आणि खाजगी खाण मालकांशी त्यांचा उघड वाद होता. कामगार संघटीत होतायंत अशी चाहूल लागली तरी लगेच मालक त्यांना काढून टाकत किंवा संघटक आणि संपांसारख्या घडामोडी दडपण्यासाठी गुंडांची नेमणूक करायचे.
'सत्तरच्या दशकात आम्ही २५ ते ३० कॉम्रेड गमावले असतील', कॉम्रेड रामलाला सांगतो. एकेकाळी खाणकामगार असलेले रामला नंतर संघटक बनले. उदारीकरणापूर्वी, राष्ट्रीयीकरणापूर्वी, नक्षलबारीच्या आणि हजारो हिंसक दिवसांच्याही पूर्वी सुरू झालेली कथा आठवताना ते मागे रेलून बसतात.
'१९६२ पूर्वी, केंद्र सरकारच्या दोन खाणी होत्या आणि त्यांचा काही वेतनाचा आराखडा ठरलेला होता. पण ६०-६५ खाजगी कोळसा कंपन्या होत्या, तिथं किमान वेतनाची काहीही व्यवस्था नव्हती.'
'तेव्हा, काही खाणींमध्ये मालक पैसे देतच नसत, त्यांची एकतर दारूची दुकानं असत किंवा किराणा मालाची दुकानं असत. कामगारांना आदेश काय तर, फक्त काम करणं आणि ज्या मिळतील त्या वस्तू घेणं. कामगारांना छावणीत ठेवलं जायचं, जेणेकरून ते पळून जाऊ नयेत. काही सुरक्षा नव्हती नि काही नाही. तेव्हाही अनेक चळवळी होत्या, पण कामगारांना बहुतेकदा दाबलं जायचं, कित्येक खूनही व्हायचे.'
'याच काळात एका कंपनीत केमिकल इंजिनीयर म्हणून ए. के. राय आले. दिवसभर ते काम करायचे आणि रात्री जवळच्या गावांमधल्या शाळेत शिकवायला जायचे.'
धनबादमधल्या धनसार इथली खाण.

संपामागून संप, मारहाणीमागून मारहाण... काही वेळा कामगारांचा कोळसा माफियांशी मजबूत संघर्ष व्हायचा; खासकरून कामगारांना जीवे मारणाऱ्या सूर्यदेव सिंग याच्याशी तर फारच व्हायचा; आणि कामगारही स्वतःचं संरक्षण करू शकतात हे त्याला लक्षात येऊ लागलं. एका क्षणी तर ए. के. रायनी निवडणुकीला उभं राहण्यासंबंधीही खाण कामगारांचं मन वळवलं होतं. १९६७मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले, नंतर १९६९मध्ये विधानसभेवर गेले आणि १९७२मध्ये नि १९७७मध्ये आणीबाणीदरम्यान अटक झाल्यानंतर लोकसभेत निवडून गेले. १९९१नंतर मात्र ते हरतच गेले. विजेचं बिल भरायला धनबादमध्ये रांगेत उभा राहणारा, ट्रेननं प्रवास करणारा, जनरलच्या डब्यात उभा राहणारा तीन वेळा खासदार नि आमदार राहिलेला हा मंत्री लोकांच्या मनातली आपली जागा मात्र कायम ठेवून होता. अजूनही खाण कामगार सत्तरच्या दशकातल्या गोष्टी सांगतात, तेव्हा संघटनांची ताकद प्रचंड होती, कामाचा एक वारसा होता. याच वर्षी, एका दिवसाच्या संपाच्या मदतीनं खाणकामगारांचं  वेतन १७ हजार रुपयांवरून २१ हजार रुपयांपर्यंत वाढवून मिळालं - संघटनेपूर्वी गुलामीत जगणाऱ्या कामगारांच्या परिस्थितीतून हे चित्र आज घडलंय. अर्थात, अजूनही आरोग्य आणि निवृत्तीवेतनाच्या बाजूनं कोणतीही सुचिन्हं नाहीत.
'ए. के. राय हे बहुतेक एकमेव मंत्री होते जे म्हणाले की मंत्र्यांनी निवृत्तीवेतन घेऊ नये', राय यांचे सहकारी दिवान सांगतात. कामगारांच्या निवृत्तीवेतनासाठीचा लढा कधीच यशस्वी झाला नाही. कार्यकर्त्यांची जुनी पिढी अपयशांबद्दल आणि उदारीकरणानंतर आलेल्या सांस्कृतिक वर्चस्वाशी लढण्यासंबंधीच्या अक्षमतेबद्दल बोलते. त्यांची मुलं व्यवस्थापक म्हणून किंवा खाजगी क्षेत्रात काम करतात. वाढत्या मध्यम वर्गानं निवडणुकांवर वरचष्मा राखलाय. जुन्या पिढीनं भारत कोकिंग कोल लिमिटेडचा अस्त आणि वाढत्या यांत्रिकीकरणामुळे संपत चाललेली संघटनांची ताकद पाहिली. ए. के. राय यांचे मतदार त्या पिढीतले होते. राय १९९१ साली निवडणूक हरले ते हत्या झालेल्या एका पोलीस अधीक्षकाच्या पत्नीच्या विरोधात.
दशकभरापूर्वी ए. के. राय यांच्यावर मारेकरी धाडल्याची कथाही धनबादमध्ये प्रसिद्ध आहे. मारेकऱ्यांना दिसला तो एक बारीक वृद्ध माणूस. तीन वेळा निवडून गेलेला हा माणूस रोज सकाळी पक्ष कार्यालय झाडत असेल. मारेकऱ्यांना त्याचे बूट दिसले, टायरच्या रबरचा पुनर्वापर करून बनवलेले बूट. त्याची साधी राहणी त्यांना दिसली. जवळच्या दुकानात जाऊन त्यांनी ए. के. राय कोण याची चौकशी केली. नंतर त्यांना खात्री झाली की हाच तो माणूस. मग ते कार्यालयात गेले, पाणी प्याले आणि परत फिरले.


शत्रू असलेल्या शबीर टोळीकडून हल्ला झालेलं फहीम खानचं घर.


'त्या माणसाबद्दलच्या कुठल्यातरी गोष्टीनं त्यांच्यावर (मारेकऱ्यांवर) परिणाम केला', दिवान सांगतात- बिहार कोळसा खाण कामगार संघटनेचं त्यांचं कार्यालय ही एकच ए. के. राय आणि कामगार चळवळीसंबंधीची गोष्ट 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये दिसली. 'मला वाटतं या चित्रपट दिग्दर्शकाचं मनही जागतिक बनलं असावं', असं म्हणून ते हसतात.
खाजगी मालकीच्या कोळशाच्या खाणींमधून कोळसा जमिनीतून उपसला जाऊ लागला त्या क्षणाला कोळसा माफियांचा जन्म झाला. खाजगी मालकीच्या कंपन्यांच्या खाजगी 'फौजा'ही होत्या. खाण कामगार जसजसे संघटीत होऊ लागले तसतसा त्यांच्यात आणि खाजगी 'फौजां'मध्ये संघर्ष होऊ लागला. त्यामुळंच धनबादमध्ये आयुष्य काढलेल्या चाळीशीपुढच्या प्रत्येक माणसाला ए. के. राय यांचं नाव माहीत असतं, आणि तरुणांनाही त्यांची माहिती आहेच.
'धनबादमधल्या गरीबांसाठी एवढं केलेला कदाचित दुसरा कोणताच माणूस नाही', २४ वर्षांचा इक्बाल खान म्हणतो. इक्बाल खान - गुंड किंवा विद्यार्थी, तो तर स्वतःला 'क्रातिकारी'ही म्हणतो.
तरीही टोळीयुद्ध काही थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत, कारण तुरुंगातून जामिनावर सुटलेला शबीर अजूनही फहीम खानच्या कुटुंबावर सूड उगवायची प्रतिज्ञा करतो. आणि स्थानिक वर्तमानपत्रं बातम्या देतात की, बारावीत असताना ज्याच्या नावाची 'सुपारी' देण्यात आली होती तो इक्बाल आता फक्त २४ वर्षांचा आहे आणि लढाई सुरूच ठेवण्याची त्यानं शपथ घेतलेय.

दरम्यान, जमिनीला हादरवणारा शांत म्हातारा माणूस धनबाद केंद्रीय रुग्णालयात आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजतोय नि चसनला इथल्या स्मारकावरची मृत खाण कामगारांची नावं फिकट होतायंत.

२७ डिसेंबर १९७५ रोजी चसनला इथं ३८० कामगार ज्यात बुडून मरण पावले तो तलाव. सुरक्षेसाठी कामगारांनी दिलेल्या हाका दुर्लक्षून व्यवस्थापकानं त्यांना खाणकाम सुरूच ठेवायला सांगितलं नि जमिनीखाली काम करणारे सगळे कामगार त्या दिवशी मृत्युमुखी पडले.

Friday, 21 September 2012

सदानंद रेगे : ३० वर्षं


सदानंद रेगे गेले त्याला आज तीस वर्षं पूर्ण होतायंत, त्या निमित्तानं 'रेघे'वर ही नोंद.

ह्या मजकुराचं मूळ शीर्षक 'दिवाळी २०११ : काळोखाचा उत्सव' असं होतं. एका दिवाळीच्या निमित्तानं हा मजकूर लिहिला गेला होता. पेपरांमध्ये दर वर्षी त्याच त्याच उत्सवांवेळी तीच तीच पानं, पुरवण्या प्रसिद्ध होतात, त्यासाठी हा मजकूर पाडला गेला होता. पण हा प्रसिद्ध झालेला मजकूर नाही.

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे, पण रेग्यांच्या कवितेच्या मदतीनं काळोखाचाही उत्सव करता येईल का? पाहा वाचून पटतं का ते. तसंही सध्या गणपतीचे दिवस आहेत, म्हणजे कुठलातरी उत्सव सुरू आहेच आणि दिवाळी येईलच आता, त्यामुळं ह्या नोंदीला 'रेघे'वर प्रसिद्धी मिळतेय. त्यातले वर्षांचे आकडे फक्त बदललेत. दिवाळीपर्यंत थांबण्यात अर्थ नाही, कारण रेग्यांच्या पुण्यतिथीचं निमित्त जास्त बरं ठरेल, ही नोंद प्रसिद्ध करायला-

शिवाय, 'रेघे'च्या प्रवासातलाच एक प्रकल्प - sadanandrege.blogspot.in

आता वाचा नोंद :

सदानंद रेगे : काळोखाचा उत्सव

सदानंद रेगे
दिवाळी म्हणजे एकदम राम-रावण अशा फारच जुन्या पात्रांच्या वेळची गोष्ट. त्यामुळे आता एवढ्या हजारो वर्षांनंतर तिच्याबद्दल नवीन असं काय राहिलं असणार. म्हणजे कित्येकदा ती साजरी करून झाली असणार. इतके लोक तिच्याबद्दल काही ना काही बोलले असणार. कित्येक लोकांनी काही ना काही लिहिलं असणार. मग आता तसं नवीन काय उरलं असणार.
सदानंद रेगे मागे लिहून गेले होते की,

इथं आलो
नि जगाच्या आरंभापास्नं
किती रेगे
इथं येऊन गेले
हे इत्थंभूत कळलं.

रेगेभाऊ एकदा बनारसला गेले होते तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं होतं. त्यांचं म्हणणं वेगळ्या गोष्टीबद्दल असलं तरी मुळात मुद्दा काय की एवढं सगळं होऊनच गेलंय, मग आता नवीन राहिलंच काय. एवढ्या दिवाळ्या आत्तापर्यंत होऊन गेल्यात तर आता नवीन अजून काय असणार. आणि हा मजकूर लिहिणाऱ्याला तर काहीच इत्थंभूत कळलेलं नाही, त्यामुळे त्यातल्यात्यात नवीन काय शोधायला बघितलं तर सापडलं की प्रत्येक दिवाळीची तारीख नवीनच असणार. वर्ष तरी प्रत्येक दिवाळीला नवीन असणारच. म्हणजे गेलं वर्ष २०११, पुढचं २०१३ आणि आत्ताचं २०१२ . म्हणजे बुडाला बाजार ह्या मजकुराचं नाव तरी नवीन असू शकतं. म्हणून मग सरळ दिवाळी : २०१२.
***

आणि कसंय की कोणी कितीही काही म्हटलं अमुक इतकं झालंय सांगून, एवढं एवढं झालंय लिहून तरी काही ना काही शेवटी उरतंच. त्यात परत वरती जे रेगे होऊन गेले त्यांनीच असं पण म्हटलंय की-

सर्व वस्तुमात्र
पुसून टाकलं
तरी शेवटी
हात उरलेच
नि हातातलं
हे फडकं!

तर लिहायला काहीच नाही असं म्हणताना शेवटी एवढं लिहिलंच. कारण कितीही काहीही संपलं तरी कायतरी उरणारच. तेवढीच रेग्यांची आठवण, दिवाळीच्या निमित्तानं चांगलं बोलावं म्हणून. आणि काहीच नसलं तरी काळोखात काहीतरी हाताला लागतंच.
***

दिवाळीच्या निमित्तानं काळोख बिचारा उगीचच बदनाम झालाय. त्याला मिटवायलाच पणत्या, फटाके असं सगळं लावतो आपण असं प्रत्येक दिवाळीचं तुणतुणं असतंच. पण हे काय बरोबर नाही. आपल्याला आवडतं तर पणत्या लावाव्यात, फटाके फोडावेत. त्यात उगीच त्या काळोखाला संपवल्याचे दावे कशाला करायचे. आणि त्याला संपवायचं कशाला.

काळोखाचं झाड
काळोखात पहावं
- देदिप्यमान!

-असंही एक रेग्यांचंच म्हणणं होतं. तर उगीच त्या काळोखाला नावं कशाला ठेवायची. काळोख म्हणजे झाडच, असं रेगेभाऊंना वाटत असू शकेल. झाडं नसतील तर चालेल काय, मग काळोख पण असू दे की. काळोखाची मजा रेग्यांना कळली, त्यांनी लिहिली. आता दिवाळी प्रकाशाचा सण, असं आपले सगळे म्हणतात, तर त्या प्रकाशाच्या गदारोळात काळोखाची पण मजा सांगावी म्हणून आपण रेग्यांची मदत घेतली. आणि शेवटी सण म्हणजे काय, जरा आनंद त्यातल्यात्यात. तर आपण तात्पुरत्या आनंदापेक्षा सदानंदाबद्दलच बोललो दिवाळीच्या निमित्तानं. आणि प्रकाशाच्या उत्सवात काळोखाच्या उत्सवाबद्दल बोलायचं तर रेग्यांची आठवण महत्त्वाची होती. तसा फारसा प्रकाशात न आलेला माणूस होता. त्याचं तसं त्यांना दुःख नसावं, पण तरी एक कविता अशी आहे त्यांची-

या उजाड उनाड माळावर
माझ्या एकाकीपणाचा
एकच साक्षी...

डोळ्यांचा खाचा झालेल्या
बुरुजाआड कण्हणारा
एक जखमी जहरी पक्षी...

त्यांचं दुःख कोणतं ते काय आपल्याला माहीत नाही. पण त्यांची आठवण आली जरा काळोखाच्या निमित्तानं. आणि आपल्याला मूळ मुद्दा सांगायचा होता तो हा की, दिवाळी जसा प्रकाशाचा उत्सव आहे तसा तो काळोखाचा पण उत्सव आहे. त्यात मग सध्याचं एकूण मराठी वातावरण बघता रेगे काळोखात गेलेल्या लेखकांपैकीच असल्यामुळे त्यांची साक्ष काढली. बाकी जरा हा वरचा मजकूर सेन्टिमेन्टल झालाय. तेवढं थोडं समजून घ्या. सदानंद रेग्यांच्या आठवणीमुळं जरा ते तसं झालंय. ­­­तेवढे त्यांचे आभार मानू आणि थांबू.

Monday, 17 September 2012

संपत चाललेल्या आवाजांच्या व्यथा

'एन्ड्युअरिंग व्हॉइसेस' हा 'नॅशनल जिऑग्राफिक'चा प्रकल्प. पृथ्वीवरच्या नष्ट होऊ घातलेल्या भाषांचं दस्तऐवजीकरण करणं हा या प्रकल्पाचा हेतू.

'लिव्हिंग टंग्स इन्स्टिट्यूट फॉर एन्डेजर्ड लँग्वेजीस'च्या मदतीनं हा प्रकल्प चाललेला आहे.

दर १४ दिवसांना जगातली एक भाषा मरत असते. या गतीनं हे सुरू राहिलं तर जगातल्या सध्याच्या सात हजारांहून अधिक भाषांपैकी अर्ध्याहून अधिक भाषा चालू शतकाच्या अखेरीपर्यंत मेलेल्या असतील. (भाषा मुळात मरत नाही, तर ती बोलणारी, तिची समज असलेली शेवटची व्यक्ती मरते. शब्दशः भाषा मरणार नाहीच, कारण तिच्यात अक्षरं आहेत नि ती तर अ-क्षर आहेत. सिंधू लिपी उलगडायचे प्रयत्न आता चाललेत हे त्याचं एक उदाहरण. अर्थात लिपी नसलेल्या भाषांचे प्रश्न वेगळे आहेत आणि तिथंच 'एन्ड्युअरिंग व्हॉइसेस'चं मुख्य काम चालतं. )

कुठं एखादी भाषा बोलणारी शेवटची व्यक्ती उरली असेल तर तिचं बोलणं रेकॉर्ड करणं, त्या भाषेचा भाषाशास्त्रीय आराखडा तयार करणं, तिचं व्याकरण आखणं अशा विविध गोष्टी ही मंडळी करतात.

एकूण प्रकल्पात ज्यांना रस असेल ते वरच्या लिंकांवरून तिथं चाचपणी करू शकतील. त्यात रस नसेल तरी 'संपणाऱ्या आवाजां'संदर्भात 'नॅशनल जिऑग्राफिक'नं जुलैच्या अंकात 'व्हॅनिशिंग व्हॉइसेस' असं एक फिचर केलंय ते पाहण्यासारखं आहे. तुआन, अका आणि सेरी या भाषांसंबंधीच्या या फिचरमधला मजकुराचा भाग, म्हणजे लेख रुस रायमर यांनी लिहिलाय नि फोटोंची जोड दिलेय लीन जॉनसन यांनी. जॉनसन यांचे २९ फोटो ह्या फिचरमध्ये आहेत. खाली नमुन्यादाखल दिलेले चार फोटो हे मूळ फोटोंकडं लक्ष वेधण्यापुरतेच आहेत. जॉनसन यांचं स्वतःचं संकेतस्थळही आहेच.

'रेघे'वर ही नोंद प्रसिद्ध करण्याचा मूळ हेतू 'एन्ड्युरिंग व्हॉइसेस'कडं लक्ष वेधणं हा आहे. त्यात प्रत्येकाला कदाचित खूप रस नसेल तरी संपत चाललेल्या आवाजांचे अखेरचे वारसदार काय बोलतायंत एवढं तरी आपण सहज ऐकू शकतोच. (या नोंदीत उच्चारांच्या चुका असू शकतील, त्या लक्षात येतील तशा बदलूया.)


photo courtesy : Lynn Johnson / Nat Geo
भाषा - चेमेहुएवी
'मी माझ्या हृदयामध्ये माझी भाषा बोलतो' - जॉनी हिल, ज्युनिअर (अॅरिझोना)
अमेरिकेच्या प्रदेशातील मूळ भाषांपैकी एक चेमेहुएवी. मरण्याच्या मार्गावर असलेल्या या भाषेमध्ये बोलू शकणाऱ्या शेवटच्या व्यक्तींपैकी एक जॉनी हिल, ज्युनिअर. 'हे म्हणजे पक्ष्यानं पिसं गमावल्यागत आहे. तुम्हाला ते हरवत जाताना दिसतं. आणि ते निघून जातं - हा बघा, आणखी एक शब्द गेला.'









photo courtesy : Lynn Johnson / Nat Geo
भाषा - इउची
'मला ही भाषा मेलेली पाहायची नाहीये' - कसा हेन्री वॉशबर्न (ओक्लाहोमा). ८६ वर्षांचे कसा हेन्री वॉशबर्न हे इउची भाषा सराईतपणं बोलू शकणाऱ्या केवळ चार व्यक्तींपैकी एक आहेत. दर दिवशी ते त्यांच्या वेस्ट तुल्सा इथल्या घरातून दहा मैलांचा प्रवास करून इउची लँग्वेज हाउसमधे येतात. का, तर इथं नवीन पिढीतल्या मुलांना त्यांची भाषा शिकवली जाते.




photo courtesy : Lynn Johnson / Nat Geo
भाषा - इउची
'आम्ही अजून आहोत' - मॅक्सिन वाइल्डकॅट बार्नेट आणि जोसेफाईन वाइल्डकॅट बायग्लेर या दोघी वृद्ध बहिणी सांगतात की, त्यांची आजी नेहमी त्यांना त्यांच्या मातृभाषेत बोलायला सांगायची. 'जोपर्यंत तुम्ही माझ्या घरात राहाताय, तोपर्यंत तुम्ही इउची बोलाल!'







 


photo courtesy : Lynn Johnson / Nat Geo
भाषा - हुपा
'माझ्या आईची आई इथं होऊन गेली' - मेलडी जॉर्ज-मूरे (कॅलिफोर्निया). मेलडी यांना लहानपणापासून त्यांची आदिवासी भाषा बोलण्यापासून परावृत्त करण्याचेच प्रयत्न होत आले. 'हुपा कशाला शिकायची? ती बोलणारी प्रत्येक व्यक्ती आता मृत आहे', असं सांगितलं जायचं. पण आपण हुपा भाषेशी जोडलेलो आहोत असं मेलडी यांना जाणवलं आणि त्यांनी ही भाषा आत्मसात केली. आपल्या जमातीच्या समस्यांची उत्तर कदाचित आपल्या पूर्वजांच्या कथांमधे सापडू शकतील असा विश्वास मेलडींना वाटतो.

Thursday, 13 September 2012

रघू दंडवते : तीन वर्षं

रघू दंडवते
रघू दंडवते गेले त्याला आजच्या १३ सप्टेंबरला तीन वर्षं पूर्ण होतायंत.

दंडवत्यांच्या आठवणीत 'रेघे'वरची ही नोंद. ही नोंद जरा मोठी आहे आणि तिचा मुख्य उद्देश आहे तो रघू दंडवत्यांबद्दल काही प्राथमिक माहिती एकत्र करून ठेवण्याचा.

'वसेचि ना' ही कादंबरी नि 'वाढवेळ' आणि 'डुबुक' हे दोन कवितासंग्रह एवढी तीनच दंडवत्यांची प्रकाशित पुस्तकं. (तिन्ही 'प्रास प्रकाशना'नं प्रकाशित केलेली). कदाचित काही जुन्या लोकांना त्यांची 'मावशी' कथा आठवत असेल किंवा 'अभिरुची' मासिकात त्यांनी 'जंगोरा' नावानं लिहिलेलं हिंदी चित्रपटांविषयीचं सदर किंवा असंच काही जुनं लिखाण, पण ते पुस्तकात आलं नाही कधीच. 

***


एक


वसेचि ना. मुखपृष्ठ- वसंत सरवटे
रघू दंडवत्यांचं पहिलं पुस्तक होतं ते त्यांची 'वसेचि ना' ही कादंबरी.

वसेचि ना- रघू दंडवते
पहिली खेप- कार्तिकी १९०५
किंमत- ४२ रुपये.
- अशी कादंबरीवरची नोंद आहे. (अंदाजे जानेवारी १९८४ ला पहिली आवृत्ती निघाली असणार.)


ह्या कादंबरीसाठी लिहिलेला ब्लर्ब इंटरेस्टिंग आहे, म्हणून तो जसाच्यातसा देत आहे.

काट्याच्या अणीवर वसलीं तीन गांवं।
दोन ओसाड। एक
वसेचि ना ।।
असं ज्ञानेश्वराच्या नांवावर एक कूट आहे.
मुंबईत येऊन शिकत शिकत, नापास होत होत, नोकरी शोधत
शोधत, त्यांतच ह्या मुंबईच्या अंगावर गळवासारख्या उपटलेल्या
दुस-याच एका मुंबईची भयाण ओळख करून घेत घेत सरतेशेवटी
दरवर्षी आपोआपच वाढत जाणाऱ्या नि गरजांना पुरून उरणाऱ्या
पगाराची नोकरी मिळाल्यावरसुद्धां विश्वनाथ पढेगांवकर कांहीकेल्या
स्थिरावेचना. त्याचं गांव वसेच ना. बाकीची ओसाड गांवं तर
त्याच्या अंवतीभंवती रग्गड होतींच.
भालचंद्र नेमाड्यांच्या पांडुरंग सांगवीकरला नि
चांगदेव पाटीलला, भाऊ पाध्यांच्या अनिरुद्ध धोपेश्वरकरला
नि मधू साबण्यांच्या बापू भालेरावला
रघू दंडवते
यांनी विश्वनाथ पढेगांवकर हा सख्खा भाऊच
मिळवून दिलाय आठव्या दशकांत
नि तुमच्या आमच्यासमोर धरलाय एक भगभगीत आरसा.
***


दोन
छायाचित्र- रमेश नायर, इंडियन एक्सप्रेस. मुखपृष्ठ- अरुण कोलटकर
रघू दंडवत्यांचं दुसरं पुस्तक म्हणजे 'वाढवेळ' हा कवितासंग्रह, २००४मध्ये प्रकाशित झालेला
या कवितासंग्रहाचं हे मुखपृष्ठ, अरुण कोलटकरांनी केलेलं.

या मुखपृष्ठाच्या तयारीसंबंधी एक उल्लेख अशोक शहाणे यांच्या एका लेखात आहे. हा लेख शहाण्यांनी 'अनाघ्रात' ह्या अर्धवार्षिकाच्या पहिल्या अंकात (२००५) लिहिला होता. मूळ लेख ''चिरीमिरी'ची हकीगत'. त्यात दंडवत्यांच्या 'वाढवेळ'संबंधी उल्लेख आलाय, तो असा-

          नावावरनं एक गंमत झाली होती. 'चिरीमिरी'ची नाही, रघूच्या 'वाढवेळ'ची. हे नाव रघूनं पक्कं करून ठेवलं होतं. अन् रघूच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ करायचं अरुणवर होतं. अरुणनं मुद्दाम मागून घेऊन सगळ्याच कविता एकत्र वाचून घेतल्या होत्या. तश्या सुट्यासुट्या कविता आधीपास्नं ठाऊक होत्याच. पण हे वाचणं म्हंजे पुस्तक म्हणून. त्या वाचून झाल्या अन् अरुणचं डोकं चालायला लागलं. मुंबईतल्या लोकलमध्ये रघू खिडकीशी बसलेला असा बाहेरनं फोटो काढायचा. किंवा आजूबाजूला तोबा गर्दी अन् रघू बसून आहे असा आतनं. किंवा चर्चगेट फलाटावर गाडी पकडायला माणसं जातायंत असा. अनायासे रघू तेव्हा नगरहून मुंबईत आलेला होता. त्याला स्वतःची छबी कव्हरवर अजिबात नको होती. मग चर्चगेटचा इंडिकेटर अन् घड्याळ एकाच फोटोत येईल अशा बेतानं अन् इंडिकेटरवर दाखवलेली गाडीची वेळ होऊन गेलीय - ते बाजूच्या घड्याळावरनं कळणार - अन् तरी गाडी अजून सुटलेली नाहीच. म्हंजे लेट झालीय. हे 'वाढवेळ' नावाशी सुसंगत होईल, असं अरुणनं सुचवलं. ह्यावर रघूचं बोलणं मोठं मासलेवाईक होतं. तो म्हणाला, पुस्तकाच्या नावाचा न् आतल्या कवितांचा काहीच संबंध नाही, तेव्हा कव्हरचा न् नावाचा तरी कशाला असायला हवा? नकोच. जसं आईवडिलांनी काय वाटलं म्हणून माझं नाव रघू ठेवलं अन् मी असा निघालो. तेव्हा संबंध नकोच.
          अरुण जरा भांबावून गेल्यागत झाला. पण लगेच सावरला पण. त्यानं आपल्या बाडातनं वर्तमानपत्रातनं कापून ठेवलेला एक फोटो काढला. चारसहा महिन्यांपूर्वीचा होता. इंडियन एक्सप्रेसमधला. फोटो एक काँपोझिशन म्हणून विलक्षणच होता. रात्रीच्या बोरीबंदर स्टेशनाचा. माणसं अस्ताव्यस्त झोपलीयंत अन् एक कुत्रं फोटोत मधोमध असल्यासारखं. अनं ते चालत असणार, कारण त्याच्या एक पाय आउट-ऑफ-फोकस झाल्यामुळं ते तीन पायांचं कुत्रंच वाटत होतं. हा फोटो एकदम रघूसकट सगळ्यांनी पास करून टाकला. अरुणला तो पसंत होताच. म्हणूनच तर त्यानं इतके महिने तो वर्तमानपत्राचा कपटा जपून ठेवला होता.
          मग एक्सप्रेसकडनं मूळ फोटो मिळवणं, तो कव्हर म्हणून छापण्याची परवानगी मिळवणं वगैरे सोपस्कार सुरू झाले.
***


तीन
मुखपृष्ठ- वृंदावन दंडवते
रघू दंडवत्यांचं तिसरं पुस्तक म्हणजे 'डुबुक' हा कवितासंग्रह, २०१०च्या डिसेंबरमध्ये प्रकाशित झालेला-
'डुबुक'चाही ब्लर्ब अर्थात इंटरेस्टिंग आहेच, तो असा-

भेगाळल्या टाचा
डोक्यावर ओझे
कोणीतरी पायी
चालते आहे

आधाराला धोंडा पांडुरंग

एकूणाएक कष्टांची बेरीज किती?

रघू मागनं ठेवून गेलेल्या कागदांत ह्या अश्या काही सुट्या ओळी सापडल्या.
मागंपुढं काय त्याच्या डोक्यात होतं काय माहित.
अन् ह्या चाळीसेक कविता.
नाहीतरी
'मला मारून टाकायचं आता नक्की झालंय'-नंच
त्याची कविता लिहायची सुरवात झाली होती
'वाढवेळ'नंतर हे 'डुबुक'.
खेळ खलास.

'मला मारून टाकायचं आता नक्की झालंय' ही दंडवत्यांची एक कविता. ती 'वाढवेळ'मधे आहे.
***


चार

'लोकसत्ते'तली बातमी
***


पाच

रघू दंडवते गेल्यानंतर त्यांची बहीण रेवा कुलकर्णी यांनी लिहिलेली कविता 'लोकसत्ते'च्या 'नगर वृत्तान्त' पुरवणीत दुसऱ्या पानावर उजव्या कोपऱ्यात प्रकाशित झाली होती. पूर्वी दुसऱ्या एका ब्लॉगवर ही कविता प्रसिद्ध करण्यासाठी रेवा कुलकर्णी यांची परवानगी घेतली होती, तो ब्लॉग आता बंद आहे, त्यामुळे त्या परवानगीच्या जोरावरच ती कविता इथे देतो आहे -

येणारा कधीतरी जाणारच असतो
हे गुळगुळीत वाक्य बोचकारतच रहातं
अहो, बागेतला बुलबुल क्षणात या फांदीवर
तर क्षणात दुसऱ्या फांदीवर पाहिला आहे
पण, बाबा रे तुझे क्षणात निसटून जाणे
कसे पचवायचे रे सर्वानी!

सारे म्हणाले - तो निर्मोही होता, भाबडा होता
निष्कपट होता, कुणाला दुखावणे त्याला जमलेच नाही
धार्मिक कर्मकांड न करणारा खरा संत होता तो वगैरे
पटते रे, पण तुझे जाणे वळत नाही अजूनही!
पायाला हात लावून नमस्कार केलेला आवडायचा नाही तुला
दुसरीकडेच पहाणार तू त्या वेळेला
अन् आता बघ, जो येतो तो तुला लवून नमस्कार करतोय
म्हणून शेवटी डोळेच देऊन टाकलेस का!
इतका कसा रे तू भिडस्त - इतका संकोची
बसल्या जागेवर कधी पाण्याचा पेला मागितला नाहीस
‘असू दे - राहू दे - मी घेतो ना’
इतकी दूर ठेवलीस बहीण
पण तसंही म्हणता येणार नाही
जेव्हा जेव्हा कधी गडबडायला व्हायचं
तेव्हा हाक देण्याआधी मूकपणे धावून आलास तू
कुठकुठली माहिती द्यायचास आम्हाला
तुझ्या डोक्यात सतत चाललेली ती लेखनाची चक्रे
निमूट बसलेला असताना गतिमान असायची ती
पाटकोऱ्या कागदांवर लिहिलेल्या त्या कच्च्या कविता
तुझा तो मोठ्ठय़ा आवाजातला खोकला
धाडकन येणारी शिंक अजून कानात घुमतेय
सगळ्या नातवंडांना तुझा लळा
ती बघ आता कशी हिरमुसून
तुझ्या वस्तू हाताळताहेत!

तुझं लिखाण साधं सरळ तुझ्यासारखंच
म्हणायचास तू - अर्थ ज्याने त्याने मनाप्रमाणे लावावा
कुडी थकायला लागली तशी राहून गेलेली इच्छा
नगरचा ‘बागरोजा’ पहाण्याची -
धापा टाकत उठत बसत तीपण तू पूर्ण केलीस
म्हणून तुला बरं वाटलेलं पाहून चिंतातुर आम्ही पण सुखावलो
गाडा हळूहळू थकायला लागला, कुरकुरू लागला
श्वासासाठी धडपड सुरू झाली, पण निमूटपणे स्वीकारलीस तू
आम्हाला बरं वाटावं म्हणून शेवटपर्यंत
ना उपचार सोडलेस की निरवानिरवीची भाषा बोलला नाहीस
पण शेवटचे काही तास तुझी तगमग पहावत नव्हती रे!
याचेच तुला भान झाले म्हणून लवकर गाशा गुंडाळलास का
एका परीने तुझ्या वेदनेतून तुला मुक्त होता आले
- पण आता तुझ्या अनुपस्थितीने
मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे रे
तरीही त्यातून सावरण्याची तूच शक्ती देणार आहेस
जा - शांतपणे जा -
आम्ही तुला नुसते आठवत राहू -
अलविदा!
***


सहा

- दंडवते गेल्यानंतर चंद्रकान्त पाटील यांचा 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेला लेख नंतर त्यांच्या परवानगीने 'रेघे'वर प्रसिद्ध केला होता- रघू दंडवते : निखळ मराठी गद्यशैलीचा लेखक
***


सात

दंडवते गेल्यानंतर 'सत्याग्रही विचारधारा'च्या २००९च्याच दिवाळी अंकात त्यांची 'मकबरा' ही कविता प्रसिद्ध झाली होती; ती अशी -


***



आठ

दंडवत्यांची आणखी  एक कविता. ही कविताही पूर्वी एका ब्लॉगवर (अशोक शहाण्यांची परवानगी घेऊन) प्रसिद्ध केली होती, पण आता तो ब्लॉग नाही, त्यामुळं त्याच परवानगीच्या जोरावर ती कविता इथं-

झूटी कबर

ही चारी बाजूंची जाळी
अन् मधली सुंदर कबर
ही आहे नुस्ती झूटी कबर
अहो खरा मुडदा तर खालीच आहे

खाली जायला आहेत अंधाऱ्या पायऱ्या
ही खालची कबर खरीखुरी जुनीपानी अंधारी
तिथपर्यंत फारसं कुणी जात नाही
तिच्याबद्दल काहीच कुणाला माहीत पण नाही
कुणाची केव्हाची ऐतिहासिक मोठ्या माणसाची
फकिराची का आणखी कुणाची
खरं म्हणजे काहीच माहीत नाही
एखादी खरीखोटी आख्यायिका पण नाही

पण खरंतर हे जाणून घ्यायला पण कुणाला नको आहे
इतिहासाचे अभ्यासक संशोधक धंदेवाईक लोक वगैरे
गावातली माणसं - त्यांना पण तशी काही जरूर नाही
विचारलंच कुणाला तर म्हणतात ते काही इतकं महत्त्वाचं नाही

खरी गोष्ट अशी आहे की हे सगळे घाबरतायत
दूर रहातायत नकोच समजून घ्यायला म्हणतायत
त्याचं खरं कारण वेगळंच आहे. मी सांगतो तुम्हाला
हे घाबरतायत - मला माहीत आहे

कबर उघडून बघायला कुणाची हरकत नाही
पण उघडून बघायला कोणाला नकोय
घाबरतात सगळे - उघडून बघितलीच जर कबर
अन् समजा आतमध्ये स्वत:चाच मुडदा निघाला तर

म्हणून घाबरतात सगळे
त्यापेक्षा वरची झूटी कबर चांगली
शोभीवंत आहे सुंदर जाळी बाजूला आहे
बघायला चांगली दाखवायला चांगली
झूटी कबर

(वाढवेळ, पान क्रमांक ४८-४९)
***


नऊ

'वसेचि ना' आता बाजारात विकत मिळत नाही, पण 'वाढवेळ' (७२ रुपये) आणि 'डुबुक' (१८० रुपये) दोन्ही मिळतात.

ही एक निमंत्रणपत्रिका पाहण्यासारखी-


प्रकाशक- अशोक शहाणे
प्रास प्रकाशन
वृंदावन- २ बी/५, रहेजा टाउनशिप,
मालाड पूर्व, मुंबई- ४०००९७.
दूरध्वनी- (०२२) २८७७७५९०.

('वसेचि ना'  आणि 'डुबुक' या पुस्तकांचे ब्लर्ब वर दिलेत, ते शहाण्यांचेच.)
***


दहा

याशिवाय रघू दंडवत्यांबद्दल इतर ठिकाणी सापडलेलं-

मोकळीक ह्या ब्लॉगवर सुनील तांबे यांनी लिहिलेलं स्फुट - रघू दंडवते

'लोकसत्ते'चे नगरचे प्रतिनिधी भूषण देशमुख यांनी 'नगर वृत्तान्त' ह्या पुरवणीत लिहिलेलं लहानसं टीपण - आठवणीतले रघू दंडवते
***

Saturday, 8 September 2012

तुमच्या देशाच्या स्वातंत्र्याचं वय काय?

माझं नाव राजू कुमार. झारखंडमधल्या चत्रा जिल्ह्यातल्या नवादा गावातून मी बोलतोय. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याला ६५ वर्षं झाल्येत आणि माझ्या गावात रस्ता नाही, वीज नाही, जलसिंचनाची सोय नाही. सध्या इथं रस्त्याचं बांधकाम सुरू आहे, पण बांधकामाचा दर्जा खूप वाईट आहे आणि आमची तक्रार कोणी ऐकून घेत नाही. या परिसरात १२ शाळा आहेत पण शिक्षणाची स्थिती दयनीय आहे. शाळांमध्ये शिक्षण जवळपास नाहीच आणि अंगणवाड्या बंद आहेत. अधिकारी लोक आमच्या इथे कधीही तपासणीला येत नाहीत.


हा संदेश 'सीजी नेट स्वरा' ह्या संकेतस्थळावर ऐकायला मिळेल. तिथेच त्याचा सारांश इंग्रजीत दिलाय, तो 'रेघे'वर मराठीत करून ठेवलाय. ह्या संदेशात नवीन काही आहे काय? (!)



टीप : 'तुमच्या देशाच्या स्वातंत्र्याचं वय काय?' हे वाकड्या वाटेनं जाणारं शीर्षक राजू कुमारनं दिलेलं नाही, ते 'रेघे'पुरतं दिलंय.
***


'सीजी नेट स्वरा' हे आदिवासींच्या आवाजाला व्यासपीठ देणारं संकेतस्थळ आहे. 'छत्तीसगढ'चं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी 'सीजी' ही अक्षरं.

आदिवासींचा 'आवाज' म्हटलं त्याचं कारण 'सीजी नेट स्वरा'मागची कल्पनाच आवाजाचं महत्त्व लक्षात ठेवून उभी राहिलेय. आदिवासींची मौखिक परंपरा लक्षात घेऊन हे व्यासपीठ मोबाईलचा वापर करून आदिवासी भागातून काही संदेश बाहेरच्या जगाला ऐकवायचा प्रयत्न करतंय.

आदिवासी भागातील गोष्टी बाहेर कळाव्यात आणि त्या बाहेरच्यांनी आतली परिस्थिती जाणून नंतर बाहेर येऊन सांगण्याच्या स्वरूपात नाही तर स्वतः आदिवासी लोकांनीच त्या सांगितलेल्या असाव्यात या हेतूनं हा प्रयोग दोन वर्षांपूर्वी सुरू झाला आहे. मोबाइल आणि इंटरनेटचा वापर या प्रयोगात सध्या सुरू आहे. या प्रयोगाचं यश आणि त्याच्या पुढच्या पायऱ्या हे येत्या तीन-चार वर्षांत स्पष्ट होत जाईल. माध्यमांचं खऱ्या अर्थानं लोकशाहीकरण होण्याच्या दिशेनं ही पावलं आहेत. त्याबद्दल आपण नंतर कधीतरी 'रेघे'वर तपशिलात बोलू. तूर्तास 'सीजी नेट स्वरा'विषयी अधिक माहिती इथं वाचा.

'सीजी नेट स्वराची' ही कल्पना प्रत्यक्ष आणल्येय शुभ्रांशू चौधरी यांनी. 'बीबीसी'सोबत काम केलेले हे पत्रकार, त्यांच्याबद्दल अधिकची माहितीही वरती दिलेल्या संकेतस्थळावर आहेच.

'सीजी नेट स्वरा'चं काम कसं चालतं त्याचा हा एक थोडक्यात व्हिडियोही पाहू शकता, म्हणजे वेगळा काही तपशील देण्याची गरजच पडणार नाही.


Tuesday, 4 September 2012

हिंदी आणि उर्दू - सआदत हसन मंटो

सआदत हसन मंटो
स्वतंत्र भारतात प्रादेशिक भाषांना त्या त्या राज्यांमध्ये प्राधान्य देण्याबरोबरच हिंदीला राष्ट्रीय व्यवहारात प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. भारत-पाकिस्तान फाळणीपूर्व काळात दिल्ली व उत्तर भारतात 'हिंदुस्तानी' भाषेचं प्राबल्य होतं. हिंदी नि उर्दू यांच्या सरमिसळीतून बनलेली 'हिंदुस्तानी' भाषिक सहिष्णुतेचं प्रतीक होती (आणि खरंतर आहेही). स्वतंत्र भारत सरकारनं हिंदीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्यानं उर्दूचं अस्तित्त्व धोक्यात येईल अशी ओरड सुरू झाली. फाळणीनंतर पाकिस्तानला आपलं घर मानलेले थोर उर्दू लेखक सआदत हसन मंटो (११ मे १९१२ – १८ जानेवारी १९५५) यांनी हिंदी-उर्दू वादावर त्यांच्या खास शैलीत टीप्पणी केली होती. भाषेसंबंधी सार्वकालिक विधान ठरू शकणाऱ्या मंटो यांच्या लेखाचं मराठी भाषांतर त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'रेघे'वर -
***

 हिंदी आणि उर्दू 
- सआदत हसन मंटो

गेला काही काळ हिंदी नि उर्दूचा वाद मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मौलवी अब्दुल हक साहेब, डॉ. तारा सिंग आणि महात्मा गांधी यांना या वादाबद्दल जेवढं काही माहिती असू शकतं तेवढं माहिती आहे. माझ्यासाठी मात्र हा वाद आकलनापलीकडचा आहे. मी खूप प्रयत्न केला, पण काहीच समजू शकलेलो नाही. हिंदू लोक हिंदीच्या समर्थनार्थ आणि मुस्लीम उर्दूच्या संरक्षणासाठी वेळ का वाया घालवतायंत? भाषा निर्माण केली जात नाही, ती स्वतःच स्वतःला निर्माण करते. कोणत्याही मानवी प्रयत्नांनी भाषेला मारता येत नाही. मी जेव्हा या सध्याच्या गोंधळावर काही लिहायचा प्रयत्न केला तेव्हा मला खालील संभाषण हाती लागलं -

मुन्शी नरेन प्रसाद : इक्बाल साहेब, तुम्ही हा सोडा पिणार आहात काय?

मिर्झा मुहम्मद इक्बाल : होय, पिणाराय.

मुन्शी : पण तुम्ही लिंबू सरबत का पीत नाही?

इक्बाल : तसं काही विशेष कारण नाही. पण मला सोडा आवडतो. आमच्या घरी सगळ्यांनाच सोडा प्यायला आवडतो.

मुन्शी : म्हणजे वेगळ्या भाषेत सांगायचं तर, तुम्हाला लिंबू सरबताचा तिटकारा आहे.

इक्बाल : नाही नाही तसं अजिबातच नाही. मी कशाला त्याचा तिटकारा करू मुन्शी नरेन प्रसाद? कसंय की, घरी सगळे सोडा पितात, त्यामुळे पूर्वीपासून मला त्याची सवय झालेय इतकंच. खरंतर तुम्ही मला विचाराल तर साध्या सोड्यापेक्षा लिंबू सरबताची चव कधीही चांगलीच.

मुन्शी : म्हणूनच तर.. तुम्ही एखाद्या गोड पेयापेक्षा खारट पेयाला प्राधान्य कसं काय देताय याचं मला आश्चर्य वाटतं. आणि लिंबू सरबत फक्त गोड असतं असंच नाही, त्याला खास स्वाद आहे ओ. तुम्हाला काय वाटतं?

इक्बाल : एकदम बरोब्बर बोललात तुम्ही. पण...

मुन्शी : पण काय?

इक्बाल : तसं नव्हे. मी आपलं म्हणणार होतो की मी सोडाच पिईन.

मुन्शी : परत तोच बाष्कळपणा. मी तुम्हाला विष पिण्याची जबरदस्ती करत नाहीये. करतोय का? मित्रा, दोन्हींत काय फरक आहे? दोन्ही बाटल्या एकाच कारखान्यात तर बनल्यात. एकाच यंत्रानं दोन्हींमध्ये पाणी भरलं गेलंय. लिंबू सरबतातून जर गोडवा आणि स्वाद काढून घेतला, तर राहिलं काय?

इक्बाल : फक्त सोडा... मीठ घातलेलं पाणीच एक प्रकारचं...

मुन्शी : मग, लिंबू सरबत पिण्यात तोटा काय आहे?

इक्बाल : तोटा तर काहीच नाही.

मुन्शी : मग प्या!

इक्बाल : मग तुम्ही काय पिणार?

मुन्शी : मी दुसरी बाटली मागवतो.

इक्बाल : दुसरी बाटली कशाला मागवताय? साधा सोडा पिण्यात काय तोटा आहे?

मुन्शी : ह्म्मम्म. . तोटा काहीच नाही.

इक्बाल : मग, हा घ्या की सोडा. प्या.

मुन्शी : मग तुम्ही काय पिणार?

इक्बाल : मी दुसरी बाटली मागवतो.

मुन्शी : तुम्ही कशाला दुसरी बाटली मागवताय? लिंबू सरबत पिण्यात काय तोटा आहे?

इक्बाल : हम्म्म्. . तोटा तर काहीच नाही. पण सोडा पिण्यात काय तोटा आहे?

मुन्शी : काहीच नाही.

इक्बाल : खरंतर सोडा जरा चांगलाच असतो.

मुन्शी : पण मला वाटतं की लिंबू सरबत जरा जास्त चांगलं असतं.

इक्बाल : असेल, तुम्ही म्हणताय तर. पण मी आमच्या कुटुंबातल्या ज्येष्ठांकडून ऐकलंय की, सोडाच चांगला आहे.

मुन्शी : आता यातून काय करावं बरं माणसानं- आमच्याकडचे ज्येष्ठ म्हणतात की, लिंबू सरबत जास्त चांगलं आहे.

इक्बाल : पण तुमचं स्वतःचं मत काय?

मुन्शी : तुमचं काय?

इक्बाल : माझं मत... अं... माझं मत... माझं मत एवढंच आहे की... पण तुम्ही तुमचं का नाही सांगत?

मुन्शी : माझं मत... अं... माझं मत एवढंच आहे की... पण तुम्ही तुमचं पहिल्यांदा का नाही सांगत?

इक्बाल : अशा पद्धतीनं आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू असं मला वाटत नाही. हे बघा, तुमच्या ग्लासावर जरा झाकण ठेवा. मी पण तसंच करतो. आणि नंतर आपण निवांतपणे चर्चा करू.

मुन्शी : नाही, आपण असं करू शकत नाही. आपण आधीच बाटल्यांची बुचं काढलेली आहेत. आता आपल्याला प्यायलाच लागेल. चला. एकदाचं ठरवून टाका, हा फेस जायच्या आत. फेस गेला की ही पेयं अगदीच पुळचट होतात.

इक्बाल : होय बरोबर. आणि तुम्हाला एवढं तरी मान्य आहे की, लिंबू सरबत आणि सोड्यामध्ये तसा काही फरक नाही.

मुन्शी : मी तसं कधी म्हटलेलं? दोन्हींत खूप फरक आहे, रात्र आणि दिवस यात जेवढा फरक आहे तेवढा. लिंबू सरबत गोड असतं, त्याला स्वाद असतो, काहीसा आंबटपणाही आहे- सोड्यापेक्षा तीन जास्तीच्या गोष्टी. सोड्याला फक्त फेस आहे. आणि तोसुद्धा एवढा की आपल्या नाकात जाईल. तुलना केली तर लिंबू सरबत जास्त चवदार असतं. एका बाटलीत तुम्हाला काही तास ताजतवानं ठेवण्याची ताकद असते. सोडा शक्यतो आजारी माणसांसाठी असतो. शिवाय, तुम्हीच आत्ता मान्य केलंत की लिंबू सरबत सोड्यापेक्षा चवदार असतं.

इक्बाल : हो ते मी म्हणालो हे आहेच. पण लिंबू सरबत सोड्यापेक्षा चांगलं असतं असं काही मी म्हटलेलं नाही. चवदार गोष्ट फायदेशीर असलीच पाहिजे असं काही नाही. लोणच्याचं उदाहरण घ्या, ते खूपच चवदार असतं, पण तुम्हाला त्याचे दुष्परिणाम माहीत असतीलच. गोडवा आणि चवदारपणा असणं याचा अर्थ ती वस्तू चांगली आहे असा नाही. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतलात तर ते तुम्हाला सांगतील, पोटाला लिंबामुळे किती त्रास होतो ते. पण सोडा, त्याची गोष्टच वेगळी. त्याच्यामुळे पचनाला मदत होते.

मुन्शी : असं करू, आपण दोन्हींना मिसळून हा मुद्दाच मिटवून टाकू.

इक्बाल : हां, तसं चालेल.

मुन्शी : ठिकाय तर, हा ग्लास सोड्यानं अर्धा भरा.

इक्बाल : तुम्ही का तुमच्या लिंबू सरबतानं आधी अर्धा ग्लास भरत नाही? त्यावर मी सोडा ओततो.

मुन्शी : त्यानं काय फरक पडतो? तुम्ही तुमचा सोडा पहिल्यांदा का ओतत नाही?

इक्बाल : कारण मला सोडा-लिंबू सरबत असं मिश्रण प्यायचंय.

मुन्शी : आणि मला लिंबू सरबत-सोडा असं प्यायचंय.

***

मंटो यांच्या मूळ उर्दू लेखाचं डॉ. मुहम्मद उमर मेमन यांनी केलेलं इंग्रजी भाषांतर त्यांच्याच संपादनाखाली प्रसिद्ध होणाऱ्या ‘दी अॅन्युअल ऑफ उर्दू स्टडीज्’मध्ये प्रसिद्ध झालं होतं, ते 'काफिला'वर प्रसिद्ध झालं होतं. तिथून मेमन साहेबांच्या इंग्रजी भाषांतरापर्यंत पोचता आलं, त्यावरून हे मराठी भाषांतर केलं आहे. सगळे आभार ह्या परिच्छेदातल्या संस्थांना, व्यक्तींना आणि अर्थातच मंटोंना.