Monday, 24 September 2012

वासेपूरचं अ-वास्तव


- जावेद इक्बाल

जावेद हा मुंबईत राहणारा पत्रकार आणि छायाचित्रकार. त्याच्या मूळ इंग्रजी लेखाचं हे मराठी भाषांतर 'रेघे'वर प्रसिद्ध होतंय, त्याच्याच परवानगीनं. लेखाचा मजकूर 'काफिला'वर सापडला. हा लेख संपादित स्वरूपात 'इंडिया टुडे'मध्येही आला होता. आपण मूळ लेखकाचीच परवानगी घेतलेली आहे. सर्व छायाचित्रंही जावेदनंच काढलेली आणि त्या सगळ्याचेच हक्क त्याच्याकडे आहेत. जावेदचा ब्लॉगही पाहण्यासारखा.

वासेपूरमधल्या टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर तिथं उभी राहिलेली खाण कामगारांची चळवळ तुम्हाला माहितेय का? किंवा तिथली कामगारांची संघटना उभी करणारे ए. के. राय, जे आता शेवटच्या घटका मोजतायंत? बंदुकांच्या गोळ्यांच्या आवाजात न ऐकू आलेली ही वासेपूरची कथा-
***

धनबादमध्ये 'गँग्स ऑफ वासेपूर'ची पोस्टरं. सगळी छायाचित्रं : जावेद इक्बाल

'चित्रपटाचा शेवट बरोबर पद्धतीनं दाखवलाय' - हे एकसुरात ऐकू येतं - वासेपूर, धनबादमधली प्रसिद्ध दंतकथा - 'गुंड शफीक खानला खरोखरच तोपचाची पेट्रोल पंपावर चित्रपटाच्या पहिल्या भागात दाखवलं तसंच गोळ्या घालून मारलं गेलं.'
'धनबादमध्ये असंच होतं.'

धनबादमध्ये खुनांची अशी मोठी यादीच आहे. 'मार्क्सिस्ट को-ऑर्डिनेशन कमिटी'चे आमदार गुरदास चॅटर्जी यांना महामार्गावर गोळ्या घातल्या गेल्या. पोलीस अधीक्षक रणधीर वर्मा यांचा बँक लुटायला आलेल्या डाकूंनी खून केला. राष्ट्रीय जनता दलाचे मुकुल देव यांची हत्या झाली. कामगार नेते एस. के. राय यांचीही हत्या झाली. गुंड समीन खानला जामीन मिळाला नि न्यायालय सोडताना त्याच्यावर गोळ्या झाडून ठार करण्यात आलं; पोलिसांच्या ताब्यात असतानाच हे घडलं. कोळसा माफियांपैकी सकेल देव सिंग यालाही बायपासजवळ संपवण्यात आलं नि त्याच्याबरोबर काम करणाऱ्या त्याच्या भावाला शक्ती चौकात एके- ४७नं मारण्यात आलं. मतकुरीया गावचा मनोज सिंग ऊर्फ डबलू जो कथितरित्या वासेपूरमधल्या मुस्लिमांना दहशतवादी बनवण्याच्या कारवायांमध्ये होता, त्याला गोळ्या घालण्यात आल्या. शफीक खानचा १८ वर्षांचा मुलगा चोत्ना खान याला गोळ्या घालण्यात आल्या. रेल्वे कंत्राटदार असलेल्या मोहम्मद इरफानला एका टोळीनं उडवलं. विभाग आयुक्त नजीर अहमदचा खून झाला. एकेकाळी पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमात पडलेल्या आणि त्यांच्या संबंधात कटुता आल्यानंतर त्याच अधिकाऱ्याच्या रोषाला तोंड देणाऱ्या घरकामगार महिलेला तिच्या भाच्याचा कापलेला मृतदेह धनबाद पॉलिटेक्निकमधल्या विहिरीत सापडला.
'हाय प्रोफाईल' खुनांची ही फक्त प्रकरणं आहेत, असं स्थानिक लोक सांगतात. एका बाजूला त्यांच्या शहराच्या हिंसक प्रतिमेबद्दल त्यांना लाज वाटताना दिसते तर दुसरीकडं कोणी कोणाला कधी मारलं याची माहिती ठेवण्यात त्यांना अभिमानही असतो.
आता झारखंडमधल्या धनबाद जिल्ह्याचा भाग असलेलं वासेपूर गेल्या काही दशकांमध्ये हिंसाचार आणि टोळीयुद्धाच्या संस्कृतीपासून खूप सुधारलंय. या आधीच्या संस्कृतीचाच काही भाग 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये दाखवण्यात आलाय.धनबादमधल्या एका कुटुंबातील तीन पिढ्यांची गोष्ट या चित्रपटात सांगितलेय. या गोष्टीला पार्श्वभूमी आहे कोळसाखाणींची, कोल माफिया रामधीर सिंगनं केलेल्या शहीद खानच्या खुनाची आणि त्यानंतर शहीदचा मुलगा सरदार खान (वास्तवातला शफीक खान) आणि त्याचा मुलगा फैझल खान (वास्तवातला फहीम खान) यांनी शपथेवर काढलेल्या सुडाची.
'मुळात सुडाची अशी कुठली कथा कधीच नव्हती', असं २४ वर्षांचा इक्बाल सांगतो. इक्बाल - फहीम खानचा (वय ५०) मुलगा आणि शफीकचा नातू. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यात दाखवल्याप्रमाणे शत्रू टोळीनं ज्या खोलीवर मध्यरात्री हल्ला केला आणि पोलीस चौकीवरही गोळीबार केला, त्याच खोलीत बसून इक्बाल बोलत होता- 'माझ्या आजोबांचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला. त्यांचा खून वगैरे कोणत्याही सिंगानं कधी केलेला नाही. आणि त्यात अजून एक गोम आहे. माझे आजेकाका होते, हनीफ, त्यांना माझे वडील फहीम यांना जीवे मारायचं होतं, त्यासाठी त्यांनी सगीर नावाचा माणूस नेमला होता.'
'आणि या सगीरच्या खुनासाठीच माझे वडील सध्या हजारीबाग तुरुंगात आहेत.'
'यातलं काहीच त्या चित्रपटात नाही', इक्बाल पुढं सांगू लागला- चित्रपटात दाखवलंय त्यातलं पळवून आणलेल्या बाईच्या सुटकेसाठी सरदार खाननं प्रयत्न करणं, सरदार खानच्या बायकोचं प्रकरण, 'रोमियो - ज्युलिएट'सारखी टोळ्यांतर्गत लग्न आणि 'पर्पेन्डिक्युलर' व 'डेफिनीट' अशी माणसांची नावं - हे सगळंच काल्पनिक आहे. उलट, प्रिन्स खान आणि गुडविन खान अशी नावं होती.
'धनबादमध्ये दोन प्रकारचे कायदे आहेत. फहीम खानच्या कुटुंबातल्यांना अटक करण्यासाठी कायदा आहे आणि सिंग महालाची तपासणी करण्यासाठीचा कायदा आहे', इक्बाल सांगतो. त्याचीही नुकतीच खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटका झालेय. हे सांगतानाही तो सिंग कुटुंब अजून बरंच मोठं असल्याचा संदर्भ देतो.


धनबादचा हिंसक परिसर


धनबाद हे एक अवास्तव ठिकाण आहे. अत्यंत गरीबी नि कामगारांच्या इतिहासाची श्रीमंती असलेलं हे लहानसं खाणीचं शहर. या शहराच्या मुख्य रस्त्यावर मध्यम वर्गाची गर्दी दिसते. वासेपूरला जाताना तुम्हाला धनबादमध्ये वाहतूककोंडीत तासभर अडकून पडावंही लागू शकतं. इथं तुम्हाला शॉपिंग कॉम्प्लेक्स दिसती किंवा गेल्या वर्षी २७ एप्रिलला पोलिसांच्या गोळीबारात चार लोक ठार झाल्यानंतर जाळल्या गेलेल्या ट्रकचे अवशेष दिसतील किंवा बस-स्टॉपजवळच्या काळोख्या हॉटेलात एखाद्या बेनाम तरुणाचं प्रेत आढळेल. मिथक, अर्धसत्य नि बेधडक झूठ यांचं हे शहर आहे. या शहराद सूरज देव सिंग नावाचा माणूस सूर्यदेव सिंगही असतो किंवा ए. के. राय हा ए. के. रॉयही असतो. पूर्वी ८५ खाणींची मालकी असलेल्या एका खाजगी खाणमालकाचा एक जुना वाडा आता खंगून पडलाय, तर जी गरीब मंडळी कोळशाची लहानमोठे तुकडे विकण्यासाठी जमवतात त्यांच्याकडून पैसे लुबाडण्यात पोलीस मंडळी गर्क आहेत. काही प्रमाणात नक्षलग्रस्त असलेल्या या जिल्ह्यातील टोपचाची आणि तुंडी या दोन भागांमध्ये अधूनमधून अटक - चकमकी झडत असतात. प्रचंड प्रमाणात होणारं स्थलांतर, कोळशाच्या खाणीमुळं होणारं प्रचंड प्रदूषण आणि जिल्ह्याच्या हद्दीवर माफियांकडून होणारी कामगारांची विक्री या सर्वांची साक्ष देणारं हे शहर.
धनबाद म्हणजे तेच जिथं डिसेंबर १९७५ला चासनला खाण अपघात झाला होता. यात ३८० जीव गेले. खाणींमध्ये एक तलाव गायब झाला. कोणीच वाचलं नाही. 'काला पत्थर' बनवला गेला आणि त्याची आठवण मात्र अजून आहे. सप्टेंबर १९९५मध्ये झालेल्या गझलितंग खाण अपघातात ९६ जणांना प्राण गमवावे लागले.
खाणींबरोबर आले माफिया लोक.

'इथं खूप टोळ्या आहेत', एक वकील गृहस्थ सांगतात, 'तुम्हाल जर धनबादची कथा सांगायची असेल, तर तुम्हाला इथं तीन महिने तरी काढावे लागतील.'
शहरीकरणाच्या फुटकळ बाजूंसंबंधी अनेक टोळ्या एकमेकांशी झगडत असतात. खाजगी बससेवेकडून खंडणी मागण्यावरून म्हणजे स्थानिक परिभाषेनुसार 'एजन्टी'वरून सरदार/शफीक खानचा मुलगा आणि दुसरा एक गुंड बाबला यांच्यात झगडा झाल्याचं सांगितलं जातं. (अर्थात सरदार/शफीक/फहीम खान यांच्या जवळच्यांनी हे नाकारलं). अखेर, सरदार/शफीक खानचा मुलगा फहीम खाननं खंडणी देण्यास नकार देणारा उद्योजक शबीरशी वाकडं घेतलं आणि शबीर आणि बाबला 'शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र' ह्या तत्त्वावर एकत्र आले. यात शबीरचा भाऊ वहीद आलमनं फहीमच्या घरावर हल्ला चढवला, त्यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झालं. याच्या बदल्यात फहीमनं वहीदचा काटा काढला.  त्यानंतरच्या घडामोडींनंतर शबीरला फहीम खानची आई (म्हणजे शफीक खानची विधवा पत्नी) आणि एकेकारी वासेपूरमधे नेतागिरी केलेल्या नझमा खातून यांच्या हत्येवरून शिक्षा झाली आणि सध्या जामिनावर सुटकाही झालेय.
'शफीक खान आणि फहीम खान यांचं 'सिंग महाला'बरोबरचं शत्रुत्त्व तितकंसं नाहीये', असं पोलीस अधीक्षक आर. के. धान म्हणतात, 'खरं तर ही त्यांची एकमेकांमधलीच लढाई आहे.'


'सिंग महाल' हा खरोखरच विविध सिंगांचा एक संग्रह आहे. अनेक सिंग सरकारी पदांवर आहेत, विशेषकरून सध्याच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उभे राहणाऱ्यांपैकी ते आहेत. यात सूर्यदेव सिंग (साधारण रामधीर सिंगच्या व्यक्तिरेखेच्या जवळचे), बच्चा सिंग, रामधीन सिंग, शशी सिंग आणि खुंती सिंग यांचा समावेश आहे. काही दशकांपूर्वी सर्वांत मोठा खाणमालक असलेल्या व्ही. पी. सिंग याच्या हत्येसाठी कथितरित्या सूर्यदेवस सिंग जबाबदार होता. त्याचा १९९१मध्ये नैसर्गिक कारणांनी मृत्यू झाला. आपलं नकारात्मक चित्रण केल्यामुळं सिंग महालानं चित्रपटावर बंदीची मागणी केली होती. पण इथंही सर्वांना माहीत असल्यानुसार, सिंग महालातही अंतर्गत वाद आहे. यातच गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरेश सिंगचा खून झाला. सिंगांमधील वाद हे कोळशाच्या खाणींवर झाले तर धनबादमध्ये सांगितलं जातं त्यानुसार शफीक खान आणि त्याचे मुलगे कधीच खाणींच्या व्यवहारात गुंतलेले नव्हते.
'काही प्रत्यक्षदर्शींच्या जबानीनुसार, शशी सिंगनं सुरेश सिंगचा खून केला', पोलीस अधीक्षकांनी माहितीची भर टाकली.
तरीसुद्धा फहीम खानचं वासेपूरमधलं घर सिंग महालाविरोधात उभं आहे, कारण त्यांनी फहीम खान कुटुंबीयांच्या शत्रूंना सहकार्य केल्याचं उघड झालं. नया बाझारजवळ राहणारा सुलताना उघडपणं शफीकशी पंगा घेऊन होता आणि त्याला सिंग महालाचा पाठिंबा होता. फहीम खानच्या घरापासून दहा सेकंदांच्या अंतरावर राहणाऱ्या शबीरलाही सिंग महालाचा पाठिंबा होता. आणि दबल्या आवाजात बोललं जातं त्यानुसार, खान मंडळींच्या आंकाक्षेनं त्यांना सिंग महालाच्या थेट विरोधात उभं केलं.
  

हिंसाचारामधला एक विरोधी सूर
एका खबऱ्यानं माहिती दिल्यानंतर १९ जुलै २०१२ला फहीम टोळीकडून एक शॉटगन नि एक रायफल जप्त करण्यात आली.
मी जेव्हा तरूण होतो, तेव्हा आमच्या डोळ्यासमोर एका माणसाला कापलं गेलं', धनबादमधल्या एका टोळी कुटुंबापैकी एक असलेला क्ष सांगतो.
'डोळ्यासमोर?'
'अगदीच समोर नाही, पण आम्ही वेगवेगळ्या बॅगमध्ये शरीराचे अवयव ठेवलेले पाहिले.'
'अजून?'
'त्यानंतर आम्हाला सगळ्यांना काकांशी बोलायला बोलावण्यात आलं. आणि काका आमच्याशी कायतरी वेगळंच बोलत होते, आम्ही त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवत नव्हतो, आम्ही जणू काही झालंच नसल्यासारखं दाखवलं. असंय की, आम्हाला त्यांच्यापासून स्वतःला वेगळं ठेवयाचंय, ते आम्हाला कसं वापरून घेतील याची आम्हाला कल्पना आहे.' 


टायरच्या रबरपासून बनलेल्या चपला वापरणारा माणूस
चासनलामध्ये ३८० मृतांसाठी बांधलेल्या स्मारकावरची मृत खाणकामगारांची नावं आता पुसट झाल्येत.


चष्मा असलेला एक अतिशय बारीक वृद्ध माणूस धनबाद केंद्रीय रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात स्वतःचे हात धरून शांतपणं बसलेला असतो - आता तो क्वचितच बोलतो, पण एके काळी धनबाद या नावाला त्याचं नाव समानार्थी मानलं जायचं. ए. के. राय, केमिकल इंजिनियर होते, नंतर ते कामगार संघटनेचे कार्यकर्ते झाले आणि धनबादमधल्या खाजगी खाणींमधल्या कामगारांना त्यांनी संघटीत केलं. ते तीन वेळा निवडून गेले आणि प्रत्येक वेळी सरकारी यंत्रणा, कोळसा माफिया आणि खाजगी खाण मालकांशी त्यांचा उघड वाद होता. कामगार संघटीत होतायंत अशी चाहूल लागली तरी लगेच मालक त्यांना काढून टाकत किंवा संघटक आणि संपांसारख्या घडामोडी दडपण्यासाठी गुंडांची नेमणूक करायचे.
'सत्तरच्या दशकात आम्ही २५ ते ३० कॉम्रेड गमावले असतील', कॉम्रेड रामलाला सांगतो. एकेकाळी खाणकामगार असलेले रामला नंतर संघटक बनले. उदारीकरणापूर्वी, राष्ट्रीयीकरणापूर्वी, नक्षलबारीच्या आणि हजारो हिंसक दिवसांच्याही पूर्वी सुरू झालेली कथा आठवताना ते मागे रेलून बसतात.
'१९६२ पूर्वी, केंद्र सरकारच्या दोन खाणी होत्या आणि त्यांचा काही वेतनाचा आराखडा ठरलेला होता. पण ६०-६५ खाजगी कोळसा कंपन्या होत्या, तिथं किमान वेतनाची काहीही व्यवस्था नव्हती.'
'तेव्हा, काही खाणींमध्ये मालक पैसे देतच नसत, त्यांची एकतर दारूची दुकानं असत किंवा किराणा मालाची दुकानं असत. कामगारांना आदेश काय तर, फक्त काम करणं आणि ज्या मिळतील त्या वस्तू घेणं. कामगारांना छावणीत ठेवलं जायचं, जेणेकरून ते पळून जाऊ नयेत. काही सुरक्षा नव्हती नि काही नाही. तेव्हाही अनेक चळवळी होत्या, पण कामगारांना बहुतेकदा दाबलं जायचं, कित्येक खूनही व्हायचे.'
'याच काळात एका कंपनीत केमिकल इंजिनीयर म्हणून ए. के. राय आले. दिवसभर ते काम करायचे आणि रात्री जवळच्या गावांमधल्या शाळेत शिकवायला जायचे.'
धनबादमधल्या धनसार इथली खाण.

संपामागून संप, मारहाणीमागून मारहाण... काही वेळा कामगारांचा कोळसा माफियांशी मजबूत संघर्ष व्हायचा; खासकरून कामगारांना जीवे मारणाऱ्या सूर्यदेव सिंग याच्याशी तर फारच व्हायचा; आणि कामगारही स्वतःचं संरक्षण करू शकतात हे त्याला लक्षात येऊ लागलं. एका क्षणी तर ए. के. रायनी निवडणुकीला उभं राहण्यासंबंधीही खाण कामगारांचं मन वळवलं होतं. १९६७मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले, नंतर १९६९मध्ये विधानसभेवर गेले आणि १९७२मध्ये नि १९७७मध्ये आणीबाणीदरम्यान अटक झाल्यानंतर लोकसभेत निवडून गेले. १९९१नंतर मात्र ते हरतच गेले. विजेचं बिल भरायला धनबादमध्ये रांगेत उभा राहणारा, ट्रेननं प्रवास करणारा, जनरलच्या डब्यात उभा राहणारा तीन वेळा खासदार नि आमदार राहिलेला हा मंत्री लोकांच्या मनातली आपली जागा मात्र कायम ठेवून होता. अजूनही खाण कामगार सत्तरच्या दशकातल्या गोष्टी सांगतात, तेव्हा संघटनांची ताकद प्रचंड होती, कामाचा एक वारसा होता. याच वर्षी, एका दिवसाच्या संपाच्या मदतीनं खाणकामगारांचं  वेतन १७ हजार रुपयांवरून २१ हजार रुपयांपर्यंत वाढवून मिळालं - संघटनेपूर्वी गुलामीत जगणाऱ्या कामगारांच्या परिस्थितीतून हे चित्र आज घडलंय. अर्थात, अजूनही आरोग्य आणि निवृत्तीवेतनाच्या बाजूनं कोणतीही सुचिन्हं नाहीत.
'ए. के. राय हे बहुतेक एकमेव मंत्री होते जे म्हणाले की मंत्र्यांनी निवृत्तीवेतन घेऊ नये', राय यांचे सहकारी दिवान सांगतात. कामगारांच्या निवृत्तीवेतनासाठीचा लढा कधीच यशस्वी झाला नाही. कार्यकर्त्यांची जुनी पिढी अपयशांबद्दल आणि उदारीकरणानंतर आलेल्या सांस्कृतिक वर्चस्वाशी लढण्यासंबंधीच्या अक्षमतेबद्दल बोलते. त्यांची मुलं व्यवस्थापक म्हणून किंवा खाजगी क्षेत्रात काम करतात. वाढत्या मध्यम वर्गानं निवडणुकांवर वरचष्मा राखलाय. जुन्या पिढीनं भारत कोकिंग कोल लिमिटेडचा अस्त आणि वाढत्या यांत्रिकीकरणामुळे संपत चाललेली संघटनांची ताकद पाहिली. ए. के. राय यांचे मतदार त्या पिढीतले होते. राय १९९१ साली निवडणूक हरले ते हत्या झालेल्या एका पोलीस अधीक्षकाच्या पत्नीच्या विरोधात.
दशकभरापूर्वी ए. के. राय यांच्यावर मारेकरी धाडल्याची कथाही धनबादमध्ये प्रसिद्ध आहे. मारेकऱ्यांना दिसला तो एक बारीक वृद्ध माणूस. तीन वेळा निवडून गेलेला हा माणूस रोज सकाळी पक्ष कार्यालय झाडत असेल. मारेकऱ्यांना त्याचे बूट दिसले, टायरच्या रबरचा पुनर्वापर करून बनवलेले बूट. त्याची साधी राहणी त्यांना दिसली. जवळच्या दुकानात जाऊन त्यांनी ए. के. राय कोण याची चौकशी केली. नंतर त्यांना खात्री झाली की हाच तो माणूस. मग ते कार्यालयात गेले, पाणी प्याले आणि परत फिरले.


शत्रू असलेल्या शबीर टोळीकडून हल्ला झालेलं फहीम खानचं घर.


'त्या माणसाबद्दलच्या कुठल्यातरी गोष्टीनं त्यांच्यावर (मारेकऱ्यांवर) परिणाम केला', दिवान सांगतात- बिहार कोळसा खाण कामगार संघटनेचं त्यांचं कार्यालय ही एकच ए. के. राय आणि कामगार चळवळीसंबंधीची गोष्ट 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये दिसली. 'मला वाटतं या चित्रपट दिग्दर्शकाचं मनही जागतिक बनलं असावं', असं म्हणून ते हसतात.
खाजगी मालकीच्या कोळशाच्या खाणींमधून कोळसा जमिनीतून उपसला जाऊ लागला त्या क्षणाला कोळसा माफियांचा जन्म झाला. खाजगी मालकीच्या कंपन्यांच्या खाजगी 'फौजा'ही होत्या. खाण कामगार जसजसे संघटीत होऊ लागले तसतसा त्यांच्यात आणि खाजगी 'फौजां'मध्ये संघर्ष होऊ लागला. त्यामुळंच धनबादमध्ये आयुष्य काढलेल्या चाळीशीपुढच्या प्रत्येक माणसाला ए. के. राय यांचं नाव माहीत असतं, आणि तरुणांनाही त्यांची माहिती आहेच.
'धनबादमधल्या गरीबांसाठी एवढं केलेला कदाचित दुसरा कोणताच माणूस नाही', २४ वर्षांचा इक्बाल खान म्हणतो. इक्बाल खान - गुंड किंवा विद्यार्थी, तो तर स्वतःला 'क्रातिकारी'ही म्हणतो.
तरीही टोळीयुद्ध काही थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत, कारण तुरुंगातून जामिनावर सुटलेला शबीर अजूनही फहीम खानच्या कुटुंबावर सूड उगवायची प्रतिज्ञा करतो. आणि स्थानिक वर्तमानपत्रं बातम्या देतात की, बारावीत असताना ज्याच्या नावाची 'सुपारी' देण्यात आली होती तो इक्बाल आता फक्त २४ वर्षांचा आहे आणि लढाई सुरूच ठेवण्याची त्यानं शपथ घेतलेय.

दरम्यान, जमिनीला हादरवणारा शांत म्हातारा माणूस धनबाद केंद्रीय रुग्णालयात आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजतोय नि चसनला इथल्या स्मारकावरची मृत खाण कामगारांची नावं फिकट होतायंत.

२७ डिसेंबर १९७५ रोजी चसनला इथं ३८० कामगार ज्यात बुडून मरण पावले तो तलाव. सुरक्षेसाठी कामगारांनी दिलेल्या हाका दुर्लक्षून व्यवस्थापकानं त्यांना खाणकाम सुरूच ठेवायला सांगितलं नि जमिनीखाली काम करणारे सगळे कामगार त्या दिवशी मृत्युमुखी पडले.

3 comments:

 1. Aniruddha G. Kulkarni commented on Facebook-
  And even the movie is quite ordinary...PARTHA CHATTERJEE says in a recent Frontline issue: “Gangs of Wasseypur” typifies the commercial cinema in which paranoia passes for intensity....

  ReplyDelete
 2. किती विषण्ण...

  ReplyDelete
 3. as usual superb...There was not a single mention about A.K.Rai in GOW...Thank you for sharing about Mr.Rai...कदाचित हिंसेचा, सूडकथेचा आणि प्रेमकथेचा प्लॉट दिग्दर्शकाला जास्त इंटरेस्टिंग वाटला असावा...पण इतका महत्त्वाचा संदर्भ (संदर्भ काय ही एका वेगळ्या चित्रपटाची कथा आहे) वगळायला नको होता....चासनला दुर्घटनेसंदर्भातही त्यात काही उल्लेख असल्याचं मला आठवत नाहीए...

  ReplyDelete

डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ट अथवा नेट बँकिंगद्वारे रेघेची 'ऐच्छिक वर्गणी' भरायची असल्यास इथे क्लिक करावं.