Saturday, 10 May 2014

कॉम्रेड शरद् पाटील : अलविदा (राहुल सरवटे यांचा लेख)

भारतीय इतिहासासंबंधी प्रचंड उत्खनन केलेले, डाव्या विचारांच्या चळवळीचे कार्यकर्ते राहिलेले कॉम्रेड शरद् पाटील यांचं १२ एप्रिल रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. अपवाद सोडता, बहुतेक मराठी वर्तमानपत्रांनी एक कॉलम, फारतर दोन कॉलम अशा बातम्यांमधे पाटलांचं प्रकरण संपवलं. एखाद्-दोन ठिकाणी इकडून तिकडून माहिती जमवून लिहून टाकल्यासारखे अग्रलेख आले, बाकी चळवळीतल्या मंडळींचे काही लेखही आले- ते बरेचसे कंटाळवाणे हळवे सूर उगाळणारे आणि पाटलांच्या मूळ कामाचा तोकडा उल्लेख करून संपलेले. पाटलांच्या कामाबद्दल फारच कमी उल्लेख होणं, हे प्रचंड निराशाजनक आहे. इंग्रजी वर्तमानपत्रांमधे साध्या बातम्याही नाहीत, पण तिथं आशेला जागाही नव्हती. पाटील जिवंत असतानाच त्यांच्या कामाबद्दल आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकांपर्यंत ते काम तुलनेनं सुलभ पद्धतीनं पोचवण्याचं काम माध्यमांनी करायला हवं होतं. मासिकं, साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, अशी काही रचना टप्प्याटप्प्यानं असं करू शकते. पण आपल्याकडं असली काही रचना नाहीच. वृत्तवाहिन्यांबद्दल बोलायला नकोच. शरद् पाटील यांनी जे काही काम केलं, ते जसं कसं केलं असेल, त्या सगळ्या मागं त्यांचे कष्ट स्पष्ट दिसतात, शिवाय कामावरची निष्ठा नि प्रामाणिकपणा पण त्यांच्या लिखाणात आहे. (दास-शूद्रांची गुलामगिरी हा त्यांचा ग्रंथ ह्या दृष्टीनं खरोखरच झटापट करण्यासारखा आहे). तर, अशा मूल्यांसकट साधारण नव्वद वर्षं आपल्या परिसरात जगलेला माणूस आपल्यातून गेला, तर त्याची किमान बूज ठेवणं, एवढं तरी काम पत्रकारितेकडून अपेक्षित आहेच ना. अनेक माणसं जातात, त्यांची बूज आपण 'रेघे'वर प्रत्येक वेळी ठेवू शकतोच असं नाही. पण प्रयत्न करतो. पाटलांच्या बाबतीतला प्रयत्न महिनाभर केल्यानंतर निराशेतच संपणार होता, पण तेवढ्यात एक मजकूर सापडला.

हा मजकूर राहुल सरवटे यांचा आहे. राहुल हे न्यूयॉर्कमधे कोलंबिया विद्यापीठात '१८४८ ते १९२० ह्या काळातल्या मराठी वैचारिक परंपरेच्या विकासाचा जातिव्यवस्था विषयक आकलनाच्या विशेष संदर्भात अभ्यास' करतायंत. आणि दिल्लीतल्या नवयान प्रकाशनासाठी शरद् पाटलांच्या 'मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवादही करतायंत. ह्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाटलांबद्दल लिहिणं योग्य वाटलं. त्यांनी 'नवयान'च्या संकेतस्थळावर यासंबंधी इंग्रजीतून टिपण लिहिलेलं आहेच. शिवाय मराठीतून 'ऐसी अक्षरे' या संकेतस्थळावर त्यांनी काही मजकूर लिहिलेला आहे. या दोन्ही मजकुरांमधून, शिवाय 'ऐसी अक्षरे'वरच्या त्यांच्याच प्रतिक्रियांची भर टाकत एक एकसंध मजकूर राहुल यांच्या परवानगीनं आपण 'रेघे'साठी तयार केला, त्यांनी पडताळल्यानंतर तो आता रेघेवर प्रसिद्ध होतो आहे. राहुल यांचे आभार.

आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकांना पाटलांच्या म्हणण्याचा काहीएक प्राथमिक अंदाज यावा, हा रेघेवरच्या या नोंदीचा मुख्य हेतू. त्यांच्या म्हणण्याचं समर्थन, त्यावरची टीका, त्यातल्या जमेच्या बाजू आणि त्रुटी, असा मजकूरही वास्तविक कोणा-कोणाकडून उभा करायला हवा. आपल्याला रेघेवर सध्या तसं करणं शक्य नाही. शरद् पाटलांना डिबेट घडवायची आस आयुष्यभर राहिली, पण मराठीतल्या अशा डिबेटसाठीच्या जागा खंगून खंगून कधीच मरून गेल्यात. तरीही- वाचूया हा एक लेख.


शरद् पाटील : महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेचा शेवटचा आवाज
- राहुल सरवटे (rahul.sarwate@gmail.com)

डॉ. आंबेडकरोत्तर काळातील कदाचित सर्वश्रेष्ठ जाती-विरोधी विचारवंत/कार्यकर्ता, शरद् पाटील यांचे गेल्या १२ एप्रिल रोजी धुळे मुक्कामी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कार्ल मार्क्सच्या 'दास कापितल' ह्या महाग्रंथातले चुकलेले बीजगणित उलगडून दाखवणारा; बुद्ध आणि मार्क्स ह्या महा-दर्शनिकांचा समन्वय करणारा; जात निर्मूलनासाठी नवे चर्चाविश्व निर्माण करणारा, अवैतनिक जीवनदायी कार्यकर्ता-विचारवंत... शरद् पाटील हे महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर ह्याच ओळीत घेता येणारे नाव आहे. महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा प्रबोधनाचा (Enlightenment) वारसा सांगते. ह्यात अनेक ब्राह्मणी - नेमस्त, जहाल, सुधारणावादी, पुनरुज्जीवनवादी आणि अब्राह्मणी, भक्ती मार्गी, अवैदिक, बौद्ध - असे अनेक विचारवंत येतात. त्यांच्या परस्पर झगड्यातून, विमर्शातून मराठी वैचारिक परंपरा घडली. कॉम्रेड पाटील हे ह्या परंपरेला समृद्ध करणारे, तिचा पाया तात्विक दृष्टीने दृढ करणारे कदाचित शेवटचे विचारवंत. आपला आजचा परिवर्तनवाद (मार्क्सवाद/आंबेडकरवाद) प्रबोधन काळातली जाती-निर्मूलनाची भाषा साफ विसरलाय. कॉ. पाटलांचा मृत्यू ह्या अर्थाने एका काळाचा शेवट आहे.

मावळाई प्रकाशन, दुसरी आवृत्ती - २००८
फुले-आंबेडकरांच्या जातिविरोधी विचारांचा मार्क्सवादाशी समन्वय करून मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादाचे तत्त्वज्ञान शरद् पाटलांनी स्थापित केले. ह्या 'मा-फु-आ'वादाने महाराष्ट्रात सत्तरीच्या दशकात बरेच वादळ निर्माण केले. हा वाद मे. पुं. रेगे संपादित 'नवभारत' ह्या नियतकालिकातून सुरू झाला (फेब्रुवारी १९८०), आणि त्यात भारतीय इतिहास, वर्ग आणि जाती ह्यांचा ऐतिहासिक विकास आणि परस्पर संबंध, ब्राह्मणी आणि अब्राह्मणी वैचारिक परंपरा अशा अनेक विषयांवर विमर्श झाला. पाटलांचे ह्या विषयावरील लेख मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद ह्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात एकत्र सापडतात (सुगावा प्रकाशन, १९९३. आता अनुपलब्ध). भारतीय कम्युनिस्ट वर्तुळात आणि जातिविरोधी वर्तुळात ह्या सिद्धांताची बरीच चर्चा झाली.

पाटलांचे आर्ग्युमेन्ट रोचक आहे : त्यांच्या मते, भारतीय मार्क्सवाद ब्राह्मणवादी परंपरेच्या प्रभावाखाली विकसित झाला (इथे ते कॉम्रेड डांग्यावर असलेला इतिहासकार वि. का. राजवाडे आणि लोकमान्य टिळकांचा प्रभाव नोंदवतात. पाटलांच्या दृष्टीने, डांगे यांचा मार्क्सवाद हा वैदिक नेणीव आणि वर्गवादी जाणीव अश्या दोन पातळ्यांवर वावरतो आणि पर्यायाने, जाती विषयक निर्णायक भूमिका घेत नाही). पाटलांच्याच शब्दांत सांगायचे तर - "भारतीय भांडवलदार वर्ग मुख्यतः हिंदू बनिया जातींमधून विकसित झाला तर त्याचा राष्ट्रवादी बुद्धिजीवी ब्राह्मण जातींमधून. दोघांचेही हितसंबंध जातिव्यवस्था अबाधित ठेवण्यात असल्याने व्यक्तिस्वतंत्राधिष्ठित पाश्चात्त्य लोकशाही विचारसरणीचा त्यांनी अव्हेर करणे अपरिहार्य होते. त्यांच्या विरोधात शूद्र जातीय समाजसुधारकांनी ह्या विचारसरणीचा परखड पाठपुरावा करणेही अपरिहार्य होते. पण हा वैचारिक संघर्ष पाश्चात्त्य लोकशाही विचारसरणी अव्हेरणे अथवा स्वीकारणे येथपर्यंत मर्यादित राहू शकत नव्हता. उच्चजातीय विचारवंतांनी वर्णजातिव्यवस्थेचे अधिकृत तत्वज्ञान असलेला वेदान्त राष्ट्रीय चळवळीचे अधिकृत तत्वज्ञान बनवले, तर त्याच्या प्रतिवादार्थ शूद्र जातीय विचारवंतांनी वर्णजातिव्यवस्था विरोधी सांख्य, बौद्ध इत्यादी अब्राह्मणी तत्वज्ञानांचा पुरस्कार केला... टिळकांच्या जातिव्यवस्था समर्थक वेदान्ती राष्ट्रवादी परंपरेत वाढलेल्या उच्चजातीय तरुणांनी भारतीय कम्युनिस्ट चळवळीची उभारणी केली... भारतीय तत्वज्ञान, इतिहास, संस्कृती याकडे ब्राह्मणी दृष्टिकोनातून पाहणारे कम्युनिस्ट नेते व मार्क्सवादी प्राच्यविद्या पंडित मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद भारताला लावण्यात पोथिनिष्ठ राहणे अपरिहार्य होते" (पाटील, १९९३: ११-१२). 

मावळाई प्रकाशन, चौथी आवृत्ती- २०१०
पाटलांची 'ब्राह्मण-अब्राह्मण' विभागणी महात्मा फुल्यांच्या चळवळीत अनुस्यूत 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' विभागणीपेक्षा किंचित वेगळी अहे. ही विभागणी ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य विरुद्ध शूद्र अशी आहे. मुद्दा असा की, एकोणिसाव्या शतकात विकसित झालेला भारतीय राष्ट्रवाद जातिव्यवस्थाविरोधी मूलभूत भूमिका घेत नाही, जी आंबेडकरांनी 'अॅनिहिलेशन ऑफ कास्ट'मध्ये घेतली. इतिहासकार राजवाडे 'राधामाधव विलास चम्पू'च्या विख्यात प्रस्तावनेत लिहितात : "चातुर्वण्याचा इतिहास म्हणजे त्यातील स्त्रिया आणि शूद्र ह्यांचा इतिहास प्रमुख्ये करून आहे. ह्या प्रचंड ऐतिहासिक नाटकात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ही पात्रे एका बाजूला आपली आसने सदैव स्थिर करण्यात गुंतलेली दिसतात आणि ती आसने डळमळविण्याचा भगीरथ प्रयत्न करणारे शूद्र हे पात्र जिवापाड मेहनत घेताना आढळते. ह्या सगळ्यात विजयश्री कधी ब्राह्मणादींच्या गळ्यात माळ घालते व कधी शूद्रावर फिदा होते आणि शेवटी दोन्ही पक्ष हार न खाता, तिसरे पात्र जे स्त्री, त्याच्या द्वारा तडजोडीने भांडण मिटवताना दृष्टीस पडतात.. त्यातील ब्राह्मण हे पात्र सर्वांत प्रधान समजावे. बाकीची दोन्ही पात्रे ब्राह्मणाच्या अनुषंगाने वागणारी होत.." (राजवाडे, राधामाधव विलास चम्पू: १३९). ह्या अर्थाने, पाटील सांगतात की भारतीय राष्ट्रवाद व भारताचा भांडवलदारी वर्ग हे एकमेकांना पूरक भूमिका घेत होते.

ह्या ब्राह्मणी नेणिवेच्या प्रभावातून भारतीय मार्क्सवाद मुक्त करण्यासाठी त्याचा शूद्र तत्त्वज्ञानांशी समन्वय पाटील आवश्यक मानतात. ह्या समन्वयाचे त्यांचे सूत्र आहे - "मार्क्सचे ऐतिहासिक भौतिकवादाचे सूत्र आहे - शोषणशासनाधारित समाजाच्या उदयापासूनचा मानवसमाजाचा इतिहास शोषकशासक व शोषितशासित यांच्या मधील लढ्यांचा आहे; तर भारतीय इतिहासाचे फुल्यांनी दिलेले सूत्र आहे - बळीराजाच्या अंतापासूनचा भारतीय समाजाचा इतिहास आर्य द्विज आणि अनार्य शूद्र यांच्यामधील वर्णजाती लढ्यांचा आहे. ह्या दोन्ही सूत्रांचे विधायक नकारकरण आपल्याला मा-फु-आच्या सूत्राकड़े नेते : शोषणाधारित समाजाच्या उदयापासून वसाहतिक समाजापर्यंतचा भारतीय इतिहास हा वर्ण-जाती-जमाती ह्यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे तर वसाहतिक काळापासूनचा भारतीय इतिहास हा वर्ग-जाती-जमातींच्या लढ्याचा इतिहास आहे" (पाटील १९९३: १५). नकारकरण हा शब्द पाटील sublimationसाठी प्रतिशब्द म्हणून वापरतात. ह्याचा अर्थ 'नकार देणे' असा नसून, ह्या प्रवाहांना 'नव्या रुपात परिवर्तित करणे' असा आहे.

पाटलांच्या चिकित्सक चौकटीत भारतीय इतिहास हा अश्या प्रकारे ब्राह्मणी आणि अब्राह्मणी विचारधारांच्या सततच्या संघर्षाचा इतिहास आहे. पुन्हा एकदा त्यांच्याच शब्दांत - "सिंधूसंस्कृतीच्या अंतापासून भारतात अविछिन्नपणे परस्परविरोधात आणि परस्परसमन्वयात वाहत आलेल्या ब्राह्मणी आणि अब्राह्मणी प्रवाहांनी भारतीय इतिहास, तत्वज्ञान, विज्ञान, संस्कृती, साहित्य, कला, इ. सर्व क्षेत्रात जी साधक-बाधक योगदाने केलेली आहेत त्यांचे विधायक नकारकरण केवळ मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादानेच होऊ शकते" (पाटील, १९९३: १६). मा-फु-आ हे अशा प्रकारे नव्या वर्ग-वर्ण-जाती निर्मूलनाचे क्रांतिशास्त्र बनले. (पाटलांच्या खोल आणि व्यापक वाचनाचा पडताळा सतत त्यांच्या लिखाणात दिसतो. उदाहरणार्थ, पतंजलीने केलेल्या पाणिनीवरील टीकेचा संदर्भ देऊन पाटील ही ब्राह्मणी आणि अब्राह्मणी विभागणी भारतीय दर्शनशास्त्रातसुद्धा किती मूलभूत भूमिका बजावते ते दाखवतात. नाटकांचे प्रेक्षक कुठल्या भूमिकांना कसा प्रतिसाद देतात ह्यावरून, पाणिनीच्या १. ४. १. ह्या सूत्रावर भाष्य करताना पतंजली भारतीय भूगोलाची ब्राह्मणी देश (अव्रुशलको देशः) आणि अब्राह्मणी देश (अब्रह्मणाको देशः) अशी विभागणी करतो.)

सुगावा प्रकाशन, पहिली आवृत्ती- २००३
परंतु, १९९६ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व' ह्या पुस्तकात त्यांनी ह्या भूमिकेपासून एक नवीन वळण घेतले. पाटलांची समन्वयवादी दृष्टी आता अधिक व्यापक तात्त्विक पातळीवर (epistemological) भारतीय मार्क्सवादाची बौद्ध तत्वज्ञानाच्या सौत्रान्तिक पद्धतीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करताना दिसते. इ. स. पूर्व पाचव्या शतकातला बौद्ध दार्शनिक दिग्नाग ह्याने विकसित केलेल्या नेणिवेच्या सिद्धांताची पाटील मार्क्सवादाच्या परिवर्तनवादाशी सांगड घालतात. पाटलांच्या मते मार्क्सचा जो जग बदलण्याचा आग्रह आहे, त्यासाठी आधी हे जग नेणिवेच्या पातळीवर कसे पाहिले जाते हे समजून घेणे आवश्यक आहे. दिग्नागाच्या अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राने कालिदासाच्या ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचा पराभव करण्यासाठी निर्मिलेला नेणिवेचा सिद्धांत पाटील मार्क्सवादाशी जोडून एक नवीन ज्ञानशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. १९८८ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'अब्राह्मणी साहित्यांचे सौंदर्यशास्त्र' ह्या पुस्तकात ह्या नव्या सौंदर्यशास्त्राची सविस्तर चर्चा आलेली आहे (सुगावा प्रकाशन, आता अनुपलब्ध). ह्याच पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या 'उत्सव' सिनेमाचे परीक्षण वाचून त्या सिनेमाचे दिग्दर्शक गिरीश कर्नाड पाटलांना भेटायला स्वतःहून धुळ्याला आले होते. त्यांच्या सविस्तर चर्चेचा संदर्भ कर्नाडांच्या काही मुलाखतींमध्ये येतो.

पाटलांचा जन्म १९२५ साली धुळ्यात एका सत्यशोधक कुटुंबात झाला. १९४५ साली जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत असताना त्यांनी शिक्षणाला राम राम ठोकून विद्यार्थी संपात उडी घेतली आणि पुढे आयुष्यभर मार्क्सवादी चळवळीत काम केले. १९२५ साली स्थापना झालेल्या 'भारतीय कम्युनिस्ट पक्षा'ची १९६४ साली 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष' आणि 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)' अशी दोन पक्षांमध्ये विभागणी झाल्यावर पाटील मार्क्सवादी पक्षात गेले. तिथेही जातीचा अजेंडा काही पक्ष कार्यक्रमात अग्रक्रम मिळवू न शकल्याने, पाटील अखेर १९७८ साली पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली त्याला नाव दिले: 'सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष'. आपल्या नवीन मा-फु-आवादी भूमिकेतून त्यांनी पारंपरिक मार्क्सवाद्यांच्या आणि आंबेडकरवाद्यांच्या अनेक ज्ञानशास्त्रीय आणि ऐतिहासिक गृहितकांवर टीका केली. पारंपरिक मार्क्सवादी दृष्टीकोनाविरोधात, त्यांनी असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की वर्ग (class) ही संस्था वसाहतवादातून जन्माला आलेली असून, त्या आधी ती भारतीय इतिहासात एक कोटी (category) म्हणून वावरत नाही. दुसऱ्या बाजूला जातीचा ऐतिहासिक विकासक्रम उलगडून दाखवताना, पाटील सांगतात की, जात तिच्या उगमाच्या वेळी एक नवीन प्रगतिशील सामाजिक संस्था होती त्यामुळे, गौतम बुद्धाने त्याच्या हयातीत जातिव्यवस्थेला अनुकूल भूमिका घेतली होती. ह्या भूमिकेत डॉ. आंबेडकरांच्या जातीच्या उगमाविषयक संकल्पनेची टीका आहे आणि त्यामुळे पाटलांच्या ह्या भूमिकेचा दलित चळवळीत बराच प्रतिवाद झाला. पाटलांचा दलित आणि बहुजनवादी राजकारणावरचा मुख्य आक्षेप हा राहिला की, ह्या चळवळी जातिसंस्थेचा उच्छेद ह्या मूळ सूत्राशी प्रामाणिक राहिल्या नाहीत.

मावळाई प्रकाशन, पहिली आवृत्ती- २०१२
कुठल्याही अकॅडमिक ट्रेनिंगशिवाय पाटलांनी इतिहासकार, प्राच्च्यविद्या पंडित, व्याकरणकार, आणि तत्वज्ञानी अश्या अनेक भूमिकांतून भरपूर लिखाण केले. ह्याशिवाय १९४७ ते १९४९ मध्ये धुळे ट्रेड युनिअन मध्ये, १९५१ ते १९५६ शेतकरी संघर्षात आणि १९५७ पासून शेवटपर्यंत आदिवासी मुक्ती लढ्यांत ते कार्यरत होते. अंतोनिओ ग्राम्शी हा इतालिअन मार्क्सवादी ज्याला 'ऑरगॅनिक विचारवंत' म्हणतो, त्याचे पाटील प्रामाणिक प्रतिनिधी आहेत.

एक छोटासा किस्सा नोंदवून हा लेख आटोपता घेतो: 'जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती आणि तिची समाजवादी पूर्ती' (२००३) ह्या पुस्तकात कॉम्रेड पाटलांनी एक प्रसंग सांगितलाय (हा किस्सा इंग्रजी भाषांतरात मात्र नाहीये!): धुळे जिल्ह्यातल्या वाटोदा नावाच्या गावी एका व्याख्यानानंतर तिथल्या शेतकऱ्यांशी कॉम्रेड पाटील बोलत होते. त्यापैकी काही जण चीनमधील शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी भारत सरकारतर्फे नुकतेच जाऊन आले होते. तिथे त्यांना एक मराठी जाणणारा चिनी दुभाषा मदतनीस म्हणून सोबत दिला होता. त्या दुभाष्याशी ह्या मंडळींची मैत्री झाल्यावर, त्याने विचारले : 'शरद् पाटलांचे कसे काय चालले आहे?' ही मंडळी चाट झाली.

हा प्रसंग अनेक अर्थाने वैशिष्ठ्यपूर्ण आहे..

वैचारिक इतिहासाचे प्रवाह कुठून कुठे वाहत असतात? पाटील ह्या चिनी दुभाष्यापर्यंत कसे पोहोचले? आणि आपल्या मराठी मुख्य धारेतल्या लिखाणात ते का पोहोचले नाहीत? त्यांच्या मृत्यूनंतर देखील भारतीय पातळीवर त्यांच्याबद्दल अवाक्षरसुद्धा उच्चारलं गेलेलं नाही. पाटील त्यांच्या भाषणात आणि लिखाणातही सांगत की त्यांचा बऱ्याच भाषांमध्ये अभ्यास केला जातोय… त्यात भारतीय इंग्रजी का नसावी?
***

वर उल्लेख आलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकातून शरद् पाटील यांच्याबद्दलची थोडक्यात सनावळी-

१९२५ : १७ सप्टेंबर रोजी धुळे येथे सत्यशोधकी शेतकरी कुटुंबात जन्म.
१९४२ : धुळे येथेच मॅट्रिक्युलेशन.
१९४३ : बडोद्याच्या कलाभवनात पेंटिंग कोर्सला प्रवेश.
१९४४ : मुंबईत जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधे दाखल.
१९४५ : पहिल्या देशव्यापी विद्यार्थी संपात सहभागी.
१९४६ : शिक्षण सोडून जीवनदानी कार्यकर्ते. कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईतल्या मुख्यालयात चित्रकार.
१९४७ : धुळे येथे ट्रेड युनियन आघाडीवर.
१९४९ : हद्दपारी.
१९५१ : शेतकरी आघाडीवर.
१९५६ : पासून मृत्यूपर्यंत आदिवासी चळवळीत कार्यरत.
१९६४ : कम्युनिस्ट पक्ष दुभंगल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात दाखल.
१९६६ : दोन तुरुंगवास भोगून सुटल्यानंतर बडोद्यात संशोधनासाठी व संस्कृत (पाणिनी) व्याकरण शिकण्यासाठी वास्तव्य.
१९७८ : (२७ जुलै) जातिव्यवस्थेविरुद्ध लढायला मा.क.प.ने नकार दिल्याने पक्षाचा राजीनामा.
१९७८ : (१५ ऑक्टोबर) मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादी तत्त्वावर आधारलेला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन.
१९८२ : (ते १९९३) 'सत्यशोधक मार्क्सवादी' मासिकाचे संपादन.
१९८७ : दलित-आदिवासी-ग्रामीण संयुक्त महासभेतर्पे साक्री येथे आंदोलन.
***

पाटलांचं पुस्तक रूपात प्रकाशित साहित्य - 

खंड १ : भाग १ व २ : दास-शूद्रांची गुलामगिरी
खंड १ : भाग ३ : रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष
खंड २ : भाग १ : जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व
खंड २ : भाग २ : शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण - महंमदी की ब्राह्मणी?
खंत ३ : जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती
खंड ४ : प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद
इतर : अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत बुद्ध : भारतीय इतिहासातील लोकशाही स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्त्रोत पश्चिम भारतातील स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका स्त्री-शूद्रांच्या स्वराज्याचा राजा (नाट्यसंहिता) शोध, मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा की जात्यंतक समतेचा? नामांतर- औरंगाबाद आणि पुण्याचे.
***

शरद् पाटील यांचं इंटरनेटवर उपलब्ध काही लिखाण-

मराठी :

इंग्रजी :
प्रॉब्लेम ऑफ स्लेव्हरी इन एन्शन्ट इंडिया (सोशल सायन्टिस्ट, जून १९७३)
ऑन अ सर्व्हे ऑफ फेमिन कन्डिशन्स इन साक्री तालुका ऑफ महाराष्ट्र (सोशल सायन्टिस्ट, ऑगस्ट१९७३)
अर्थ मदर (सोशल सायन्टिस्ट, एप्रिल १९७४)
ए मार्क्सिस्ट एक्स्पोझिशन ऑफ इस्लाम (सोशल सायन्टिस्ट, मे १९७६)
***

3 comments:

  1. शीर्षकात.. शेवटचा आवाज..? असे का..?

    ReplyDelete
    Replies
    1. आपली प्रतिक्रिया लेखकाला फॉरवर्ड केली आहे. धन्यवाद.

      Delete
  2. हा लेख 'रेषेवरची अक्षरे' या ई-दिवाळी अंकात पुनर्प्रकाशित झाला होता. तिथे लेखाखाली पुढील प्रतिक्रिया दिसली: "I noticed you used a photo I took from Sharad Patil back in 1990 and which I pisted in Flickr. You used this picture without asking my permission. I would be grateful if you could at least credit me for it: photo taken by Rensje Teerink"

    रेघेवरच्या नोंदीत शरद् पाटलांचे दोन फोटो चिकटवले होते, ते 'नवयान' आणि 'परिवर्तनाचा वाटसरू' या स्त्रोतांचा श्रेयनिर्देश करून वापरले होते. आपल्याला हे फोटो तिथेच मिळाले. पण या दोन्ही स्त्रोतांनी मूळ छायाचित्रकाराचा उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे इथे उल्लेख केलेली प्रतिक्रिया लक्षात घेता हे फोटो रेघेवरच्या नोंदीतून काढून टाकतो आहे आणि 'रेषेवरची अक्षरे'वाल्यांनाही त्यासंबंधी सूचना केली आहे. यातला नक्की कोणता फोटो या व्यक्तीने काढला किंवा कसं, याची खातरजमा करणं आपल्याला शक्य नाही. प्रयत्न करूनही त्या व्यक्तीला संपर्क करण्याचा काही मार्ग रेघेला सापडला नाही. (फ्लिकरवर शोधाशोध करून काही अंदाज बांधता आला, पण शंका पुरती मिटावी, असं काही जमलं नाही.)

    आपल्याकडे नियतकालिकांमधून व्यावसायिकता आणि किमान औपचारिकता हे काहीच फारसं आढळत नाही. आपण इथे आपल्या पातळीवर श्रेयनिर्देश वगैरे करून ते पाळायचा प्रयत्न करतो. पण तरीही या अशा गफलती होतात. आपण संदिग्ध स्त्रोतांवर अवलंबून राहिलो, ही आपलीच चूक. तर, हे फोटो वापरल्याबद्दल संबंधित छायाचित्रकाराची रेघेच्या वतीने माफी मागून हे दोन्ही फोटो काढून टाकूया. आपल्याला छायाचित्रकारापर्यंत काही ही माफी पोचवता आली नाही, म्हणून इथे नोंदवली आहे.


    - रेघ

    ReplyDelete