ठाण्यात लकी कंपाउंड परिसरात वर्षभरापूर्वी तीनेक महिन्यांत बांधलेली एक सात मजली इमारत आत्ताच्या चार एप्रिलला कोसळली आणि चौऱ्याहत्तर लोकांचा त्यात मृत्यू झाला. इमारत पडून उडालेला धुरळा आता खाली बसत आलाय. दरम्यानच्या काळात, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यापूर्वी तिथल्या रहिवाशांच्या निवाऱ्याची पर्यायी व्यवस्था व्हायला हवी, अशा पद्धतीच्या मागण्या करत राजकीय पक्षांनी 'ठाणे बंद' पाळला. त्याला प्रतिसाद मिळाला. ते सगळं साहजिकच आहे. ह्या घटनेला वीस दिवस झाल्यानंतर आपण एका कादंबरीविषयी 'रेघे'वर नोंद करणार आहोत. कादंबरी आहे भाऊ पाध्ये यांची 'वैतागवाडी'. ही नोंद का, तर कोसळणाऱ्या इमारतींसंदर्भात राजकीय नेते आणि पत्रकार जितकं बोलले तितकं बोलण्याची संधी सामान्य समजल्या जाणाऱ्या आणि इमारतींसोबत कोसळलेल्या माणसांना मिळाली नाही आणि ती मिळण्याची शक्यता नाही. हेही तसं साहजिकच. पण अशा माणसांना ज्यांच्या कादंबऱ्यांमधून बोलता आलं त्या भाऊंची आठवण इथे ठेवणं आवश्यक.
पाचवी आवृत्ती : २००७. शाल्मली प्रकाशन. मुखपृष्ठ : सुधीर पटवर्धन |
'वैतागवाडी' ज्याच्या डोक्याची झालेय त्याचं नाव आहे श्रीकांत सोहोनी. गरोदर बायको असलेला श्रीकांत मुंबईत घर शोधतोय. आणि त्याची ह्या शोधासाठीची रोजची हतबल हालचाल म्हणजे भाऊंनी मांडलेली 'वैतागवाडी'. भाऊंच्या कादंबऱ्या ह्या शहरी जगण्याविषयी (आणि पर्यायाने एकूणच जगण्याविषयी) काय सांगू पाहतात, हे स्पष्टपणे सांगणं अवघड आहे. पण त्यांचं सांगणं वाचताना आपल्याला जाणवलं तर आपल्यासकट तयार होत असलेल्या 'लोक' नावाच्या गोष्टीचा काहीएक अंदाज कदाचित येऊ शकतो. आणि हेच लोक कोसळणाऱ्या इमारतींमध्ये राहत असतात किंवा शेजारी चाळीस मजली टॉवर उभा राहिलेल्या तीन मजली चाळीतल्या झिजलेल्या लाकडी जिन्यांवर रोज चढ-उतार करत असतात. त्यातले काही चाळीत राहत-राहतही श्रीमंत होत जातात आणि पार्किंगला जागा नाही म्हणून फोर-व्हिलर घ्यायचं टाळत राहायची वेळ त्यांच्यावर येते. काही लोक टू-व्हिलरसुद्धा घेऊ शकत नाहीत. काहींना असला काही विचार करायलाच वेळ नसतो; ते नुसतेच राहत असतात. 'वैतागवाडी'च्या मुखपृष्ठावर सुधीर पटवर्धनांच्या चित्रात दिसतोय तो माणूस म्हणजेच आपण म्हणतोय तो नुसता 'राहणारा' माणूस.
असाच अनेक लोकांपैकी एक असलेला श्रीकांत सोहोनी घर शोधतोय. त्याची गोष्ट सांगताना भाऊंची 'वैतागवाडी' अशी सुरू होते :
माझा पाठीवरचा संसार घेऊन मी अखेर धरमपाड्याला येऊन ठाकलो होतो. मुंबईच्या उपनगरामध्ये धरमपाडा या नावाची वस्ती आहे हे पुष्कळांना ठाऊकसुद्धा नसेल. कांदिवली स्टेशनच्या पूर्वेला कान्हेरी लेणी डोळ्यांसमोर ठेवून पाऊण तासाचा खडकाळ आणि धुळीने भरलेला रस्ता तुडवीत चालून गेल्यावर ही वस्ती लागते. या वस्तीविषयी तसे विशेष सांगण्यासारखे असे काही नाही. काही जुन्या, म्हणजे टिळक-आगरकर जेव्हा हयात होते त्या काळातल्या, बैठ्या किंवा दुमजली चाळी - बहुधा मारवाड्यांनीच बांधलेल्या. त्यांच्या माफक भाड्यामुळे किराणा मालाचे गुजराथी व्यापारी, प्राथमिक शाळेतले मास्तर, कुठे एखादा सिंधी, एखादा हातभट्टीचा धंदा करणारा किरिस्तांव, एक वाट चुकलेला सधन परंतु कंजुष सारस्वत ब्राह्मण आणि अधूनमधून दाढी वाढवणारा देशभक्त काँग्रेसवाला, यांची त्या चाळीतून वस्ती. त्यांच्यामध्येच मी जाऊन पडलो होतो.
धरमपाड्याला काळू भिकाच्या चाळीमधल्या ज्या दहा-बाय-दहाच्या सिंगल रूममध्ये मी माझे बस्तान बसवले होते, ती खोलीही माझ्या मालकीची नव्हती. आमच्या ऑफीसमधल्या कर्पे नावाच्या शिपायाच्या मालकीची होती. त्याने दोन वर्षांकरता आपले बिऱ्हाड गावी हलवले होते आणि तोपर्यंत माझ्याकडून पाचशे रूपये अनामत घेऊन ती खोली माझ्या हवाली केली होती. घरटंचाईच्या आजच्या काळात यापेक्षा अधिक सोयीस्कर सौदा मला करता आला असता का? मला तर उभ्या हयातीत, 'एक दिवस माझ्या हक्काची खोली घेता येईल' अशी आशाच वाटेनाशी झाली आहे. जागा म्हणजे पैसा हे आजच्या जगाचे समीकरण आहे. या धरमपाड्याला टिनपाट जागेसाठी कर्पे शिपुरड्याच्या बोडक्यावर पाचशे रूपये मारायचे म्हणजे अंजलीचे दागिने आणि लग्नातील प्रेझेंट्सही मला बाजारात काढावी लागली. तिथे हजार दीड हजार... दोन हजार आकड्यांपुढे माझा काय पाड लागणार?इथे धरमपाड्याला काही तसे वाईट नव्हते. जसजसे दिवस जातात, तसतसा माणूस सरावतो भोवतालच्या वातावरणाला.
तर हे असं होतं. दिवस जात जातात, तसा माणूस सरावतो वातावरणाला. याला काही पर्याय आहे का? माहीत नाही. अशीच आपल्या कोसळू शकणाऱ्या इमारतींना सरावलेली माणसं शहरात राहतायंत. त्यांच्या पर्यायी निवासाची व्यवस्था करायची तर पर्यायी शहरंच उभारावी लागतील. आणि ती पुन्हा कुठे उभी करणार? एकूण प्रश्नाचं मूळ शोधायचं असतं, तर खरं म्हणजे वर्तमानपत्रांनी किंवा टीव्ही चॅनलांनी या माणसांशी बोलून काही शहरी विकासाचं चित्र उभं करायला हवं होतं. चर्चांमधून ते झालं असेल, पण समूहमन जोखण्याच्या पातळीवर ते झालेलं दिसत नाही.
मी रोज वर्तमानपत्र घेतो. वाचत मात्र नाही. रोजच्याप्रमाणे मथळ्यावरून नजर फिरवीत फिरवीत सगळी 'नवसत्ता' पालथी घातली. काही नाही! जगात प्रचंड घडामोडी झाल्या होत्या; या देशात जनहिताची प्रचंड कामे सरकारने हाती घेतली होती. बातम्या. जागेविषयी कोणीच काही केले नव्हते. वर्तमानपत्र हाताच पडताच एक वेडी आशा काळीज उसवून बाहेर येते. वाटते, 'आज घरबांधणी खात्याच्या मंत्र्याने घोषणा केली की सरकार खास नाडलेल्या लोकांकरिताच घरबांधणीची विस्तृत योजना हाती घेणार आहे. त्यानुसार अशा नागरिकांची माफक भाड्यात राहण्याची सोय होईल!' असे वृत्त छापून आले असेल. परंतु, तसे कसचे घडते? आणि मग, ती आशा ठार होते हे रोजचेच! 'नवसत्ता' हातून गळून पडला.
हे श्रीकांत सोहोनीच्या मनात येतं, तसंच सगळं गळून गेलेलं आहे. खोटा भावनिक उमाळा दाखवण्यात अर्थ नाही, पण माध्यमांमधून तो मोठ्या प्रमाणावर दिसत आलाय. त्याऐवजी आपण म्हटलं तसं समूहमन जोखण्याचा काही प्रयत्न होतोय का? तसं केलं तर 'हतबल' ह्या विशेषणाला जुळणारं काही तरी हाताशी लागू शकतं. श्रीकांत सोहोनीच्या डोक्यासारखंच.
मला काही परिचित चेहरे स्टेशनवर दिसतात. मला काही संभाषण छेडण्याची इच्छा नाही. उगीच ते हटकून 'कुठे राहतोस?' विचारतील. पत्ता आपल्या डायरीतही लिहून घेतील. आणि थोड्याच दिवसांनी माझा बदललेला असेल. परत 'मला खोली नाही- शोधात आहे' वगैरे सांगण्यातही काही अर्थ नाही. त्यांना माझ्याविषयी इतकी काही आस्था आहे, असे मी मानत नाही. आयुष्यात स्थिर न झालेल्या माणसाला त्यांच्या हिशेबात फारशी किंमत नाही.
भाऊंनी खरं म्हणजे हे सगळं इतकं पक्कं पकडून ठेवलंय ह्या फक्त १५७ पानांच्या कादंबरीत की, ते वाचून कायतरी तरी वाचकांच्या, पत्रकारांच्या मनात व्हायला हरकत नव्हती. पत्रकार मंडळी मग कदाचित अधिकाधिक लोकांच्या बाजू तपासत काही चित्र उभं करू शकली असती. आपण हे खूप वेळा का बोलतोय, तर तेच आपल्या हातात आहे म्हणून.
श्रीकांत सोहोनीही असंच आपल्याला हातात आहे म्हणून अनेक लोकांशी आपल्या जागेच्या गरजेविषयी बोलून ठेवत असतो. राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या आपल्या मित्रासारख्या व्यक्तीपासून, ऑफिसातल्या लोकांपासून ते अगदी लोकल ट्रेनमध्ये भेटलेल्या अनोळखी इसमापर्यंत सगळ्यांना. सगळ्यांना सांगत जातो, जागा बदलत जातो आणि तेवढंच. सरकारी वसाहती, सरकारी योजना, नातेवाईकांच्या भावना अशा सगळ्या गोष्टींमधून फिरून फिरूनही श्रीकांत सोहोनीला स्वतःचं हक्काचं छप्पर काही मिळतच नाही. एकदा श्रीकांत सोहोनीला एक असामी भेटते. आणि त्यातूनच भाऊ कादंबरीच्या शेवटाकडे येतात :
मला एक असामी भेटले. वय ४६ एक. व्यवसायाने पत्रकार. त्यांचे नाव नामदेव फौजदार. त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या अभ्यासूवृत्तीने माझ्यावर छाप टाकली होती. त्यांनी मुंबईतील घराच्या प्रश्नाचा खास अभ्यास केला होता.
तो म्हणाला, 'मुंबईमध्ये पाच लाखापेक्षा अधिक किंमतीच्या घरांचा एफ.एस.आय. किती शिल्लक आहे, तुम्हाला कल्पना आहे? फाइव्ह परसेंट!'
तो सारखा एफ.एस.आय. हा शब्द वापरायचा. पाच परसेंट म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे फार मोठे प्रमाण असावे. त्याने याच्यावर एक योजना आखली होती. आपण धान्याचे जसे रेशन करतो त्याप्रमाणे जागेचे रेशन करणारी, पण आपल्या मंत्र्यांच्या मालकीचेच दोन दोन फ्लॅट्स रिकामे आहेत. त्यांच्या इंटरेस्टला ते स्वतःच कसा हात लावतील. मुंबईतील सगळ्या एक्झीक्युटिव्हजनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर फ्लॅट्स अडकवून ठेवले आहेत. कुठच्याही बिल्डिंगचा जेव्हा प्लॅन पास होतो त्या वेळी त्या एक्झीक्युटिव्हसाठी एक फ्लॅट काढून ठेवावा लागतो. तुमच्या 'ब्ल्यू बर्ड' इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर एक असाच रिकामा फ्लॅट आहे पहा. आगाशे नावाचा एक एक्झिक्युटिव्ह आहे. निपुत्रिक आहे. तुम्ही म्हणाल, निपुत्रिक माणसाला हवी कशाला जागा? पण या मंडळींना त्यांच्या नातेवाईकांचे भलं करायचं असतं. त्याने आपल्या तीन वर्षांच्या भाच्याच्या नावाने तो फ्लॅट केलाय. आता हा भाचा वयात कधी येणार आणि त्या फ्लॅटचा वापर कधी करणार! हे असं आहे.
तो मला सांगू लागला - 'लोक या प्रश्नावर कसे गप्प बसले आहेत हे मला कळत नाही. रिकाम्या फ्लॅट्सच्या प्रश्नाला कुणीतरी वाचा फोडली पाहिजे. अहो, या फ्लॅटचे दरवाजे फोडून त्यात घुसलं पाहिजे. आपण मध्यमवर्गीय माणसं फारच शेळपट आहोत. नुस्ते बोलतो. कृती कोणीही करत नाही.'
काल जप्तीचे प्रकरण, आज फौजदारांची भेट. काल मी जप्ती थंडपणे पाह्यली. काल मी पेटलो नव्हतो. पण असा थंडपणा मी सहन किती करावा? जप्ती आलेला माणूस जितका असुरक्षित आहे तितकाच मीही असुरक्षित आहे.. आपण पांढरपेशे लोक गांडू आहोत. आपण कधीच पेटत नाही.. नुसता पुढचा मागचा विचार करत बसतो. कम व्हॉट मे, आपण कृती केली पाहिजे!
मी आज निर्धार केला होता. माझ्या रक्तातील पांढरपेशा रक्ताचा मी आज निचरा करून टाकायचं ठरवलं. कम व्हॉट मे - आज कृती करायची. अॅक्शन. घर फोडून आत घुसायचं. पोलीस पकडतील. कम व्हॉट मे, विचार करायचा नाही. कृती करायची.
या मॉडर्न फ्लॅट्सचं घर तोडायचं म्हणजे सोपं काम नाही. त्यांच्या दाराला लॅच-की असते. ती कशी तोडणार? कुणातरी माहितगाराकडून माहिती काढावी.
मी एका बिल्डिंग काँट्रॅक्टरला भेटलो. मी गेले कित्येक दिवस डोकं थंड ठेवून याच कामात आहे, घर कसे तोडायचे याची संपूर्ण माहिती मिळाली. बिल्डिंग काँट्रॅक्टर म्हणाले, 'छिन्नी नि हातोडा पुरेल. पण आवाज मोठा होईल.'
'ठीक. आवाज मोठा झाला तर लोक पोलिसांना बोलावतील एव्हढंच ना! कम व्हॉट मे.'
ते एक्झीक्युटीव्ह ऑफिसर आगाशे - त्यांच्या तीन वर्षाच्या भाच्याच्या ब्ल्यू-बर्ड इमारतीतील सातव्या माळ्यावरील फ्लॅट. त्या फ्लॅटसमोर मी सर्व सामुग्रीसह उभा. शेजारच्या फ्लॅटचं दार बंद होतं. फक्त जा-ये होती.
मी सज्ज झालो. मन घट्ट बनवलं. लिफ्टपासून तीन पावले दूर व फ्लॅटपासून पाच फूट अंतरावर उभा. फ्लॅटच्या दरवाजाकडे एकटक पाहत होतो. फ्लॅट तोडायचा.
फ्लॅट तोडायचा! कम व्हॉट मे.
डोक्यामध्ये भणभण.
पावले जागच्या जागी गोठून गेली होती. जणू आता तिथून माझे सारेच शरीर वर वर गोठत जाणार होते.
माझ्या कपाळाच्या डाव्या बाजूची शीर तोंडात बसल्याप्रमाणे थडाथडा उडत होती. मस्तक नरम झाले होते.
छिन्नी-हातोडा हातातून गळून जाईल काय असे वाटत होते. तो सावरून कसाबसा धरला होता.लिफ्टमधून एक मोलकरणीसारखी बाई आली आणि माझ्याकडे खरखरीत दृष्टिक्षेप टाकून शेजारच्या फ्लॅटमध्ये शिरली. मला घाम फुटला. तिला दिसायला नको होते.
तिने फ्लॅटमध्ये शिरून लोकांना माझ्याबद्दल जागं केलं तर पळून जाऊ या!
मुळीच नाही. कम व्हॉट मे - मला फ्लॅट तोडायचाच आहे.. फ्लॅट तोडायचाच आहे!
'कम व्हॉट मे. विचार करायचा नाही. कृती करायची' हा श्रीकांत सोहोनीचा निष्कर्ष कोसळणाऱ्या लोकांनी काढला तर एकूण अवघडच होऊन बसेल. तसं व्हायला नको असेल तर भाऊंच्या १९६५ साली पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या 'वैतागवाडी' ह्या कादंबरीतलं म्हणणं समजून घ्यावं लागेल. पण तेवढा वेळ कोण देईल?
***
हा कसला भुलभुलैय्या?
दुसरी आवृत्ती : १९८७. डिंपल पब्लिकेशन. मुखपृष्ठ : वसंत सरवटे |
No comments:
Post a Comment