बाळ ठाकूर (१९३०-२०२२) आभार: ठाकूर कुटुंबीय |
ठाकुरांच्या निधनासंदर्भातल्या काही बातम्यांमधील एक खटकलेल्या उल्लेखानिमित्त नोंद गरजेची वाटते.
'सामना' या वृत्तपत्रात ९ जानेवारी २०२२ रोजी आलेल्या बातमीत असं म्हटलं आहे: "रहस्यरंजन, ललित, मौज, साहित्य, सत्यकथा आदी अंकासाठी त्यांनी चित्रं काढली होती तसेच लक्ष्मीबाई टिळक, बालकवी, बा. भ. बोरकर तसेच त्या काळच्या सर्व साहित्यिक यांची व्यक्तिचित्रं त्यांनी काढली होती, मात्र त्यांनी उभ्या आयुष्यात राष्ट्रविरोधी साहित्य अथवा चित्रं कधी काढली नाहीत."
'मुंबई तरुण भारत'मधे आलेल्या 'राष्ट्राभिमानी ज्येष्ठ चित्रकार' या आदरांजलीपर लेखाचा शेवट असा होतो: "त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात राष्ट्रविरोधी साहित्य अथवा चित्रनिर्मिती कधीही केली नाही. अशा या राष्ट्राभिमानी चित्रकारांस विनम्र अभिवादन."
साधारण याच बातम्यांमधून तयार झालेला, पण संकलक नि माहिती-स्त्रोत म्हणून कोणाकोणाची ठळक नावं नोंदवणारा, फॉरवर्ड होत जाणारा एक मजकूरही सापडतो, त्यातही ठाकूर यांनी 'राष्ट्रविरोधी चित्रनिर्मिती' कशी केली नाही याचा उल्लेख आहे.
फारशा प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या व्यक्ती मरण पावल्यावर येणाऱ्या बातम्या ओझरत्या असतात, बहुतेकदा दोन-तीन तपशील सर्वच माध्यमं एकसारख्या पद्धतीने सांगतात. म्हणजे एखाद्या स्त्रोताचा वापर करून सर्व ठिकाणी ते बातमीचं काम उरकलं जातं. तसं ठाकुरांच्या बाबतीतही झाल्याचं दिसतं. पण या बातम्यांमध्ये 'राष्ट्र' या शब्दाचा असा उल्लेख का झाला असावा?
'आप्तवाक्य' संवाद मंडळाने ऑगस्ट २०१२मध्ये मुंबईत बाळ ठाकूर यांची मुलाखत घेतली होती. 'माझ्या रेषेची वाक्-वळणे' अशा नावाने त्या संदर्भात प्रसिद्धीपर मजकूर पेपरात आलेला. त्या मुलाखतीचं संक्षिप्त शब्दांकन 'प्रहार' या वृत्तपत्रात २ सप्टेंबर २०१२ रोजी प्रसिद्ध झाल्याचं दिसतं, ऑनलाइन वाचायलाही मिळतं (रेषेपलीकडचे बाळ ठाकूर). त्यात एक प्रश्नोत्तर असं आहे:
प्रश्न: सत्यकथा, जाहीरनामा ते विवेकपर्यंत वेगवेगळ्या विचारसरणीच्या नियतकालिकांसाठी तुम्ही कामं केली. कधी वैचारिक संघर्षाची वेळ नाही आली?
ठाकूर: मी प्रत्येक मजकूर प्रामाणिकपणे वाचला. मात्र मानसिक संघर्ष होईल असा मजकूर कधीही माझ्यासमोर आला नाही. त्यामुळे वैचारिक संघर्ष झाला नाही. तटस्थपणे मजकूर वाचण्याचा माझा प्रयत्न असतो. मग साम्यवादी, समाजवादी की हिंदुत्वनिष्ठ नियतकालिक असो, राष्ट्रविरोधी वाङमय कधीच माझ्या हाती आलं नाही.
ठाकुरांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध होता, हा मुद्दा वाचक म्हणून आपल्याला कुठे ना कुठे वाचायला मिळतो, हे इथे नोंदवायला हवं. तसंच, 'साम्यवादी, समाजवादी की हिंदुत्वनिष्ठ नियतकालिक असो, राष्ट्रविरोधी वाङमय कधीच माझ्या हाती आलं नाही', असं ते म्हणतात त्यात राष्ट्राचा उल्लेख येतो, हेही एक परत नोंदवूया. या दोन संदर्भांमुळे आताच्या बातम्यांमधे नि समाजमाध्यमांवरच्या मजकुरांमधे ही 'राष्ट्र' शब्दाची प्रतिबिंबं उमटली असावीत. पण ठाकूर मुलाखतीत जे म्हणतायंत, त्यात विशिष्ट विचारसरणीच राष्ट्रप्रेमी आणि उर्वरित विचारसरण्या राष्ट्रविरोधी अशा द्वंद्वालाही छेद जाताना दिसतो. यात 'राष्ट्र' या संकल्पनेबद्दल बोलण्याचा मुद्दा नाही. सध्या माध्यमांमध्ये, राजकारणामध्ये, आणि एकंदर आपल्या सार्वजनिक अवकाशामध्ये ढोबळमानाने 'राष्ट्र', 'राष्ट्रप्रेम', 'राष्ट्रविरोध' हे शब्द कसे वापरले जातात, या अनुषंगाने हे पाहावं, असं वाटतं. ठाकूर संघाशी संबंधित असले तरी केवळ 'हिंदुत्वनिष्ठ' विचारसरणीला राष्ट्राशी जोडत नाहीत, तर 'साम्यवादी, समाजवादी,..' अशा विचारसरण्यांचाही उल्लेख त्या संदर्भात करतात, त्यामुळे या इतर विचारसरण्यांसंदर्भात चित्रं काढली तरी ते 'राष्ट्रविरोधी वाङ्मय' मानण्याची गरज नसल्याचं त्यांच्या विधानांमधून सूचित होतं.
कदाचित म्हणूनच उघडपणे नक्षलवादी भूमिका असणाऱ्या अनिल बर्वे यांच्या 'थँक यू मिस्टर ग्लाड' या कादंबरीचंही मुखपृष्ठ ठाकुरांनी केल्याचं दिसतं:
पॉप्युलर प्रकाशन. चौथी आवृत्ती- १९९० |
य. द. लोकुरकर, १९७७ |
विलास सारंगांनी ज्याँ-पॉल सार्त्र, आल्बेर काम्यू, फ्रान्झ काफ्का आणि सॅम्युएल बेकेट या 'अस्तित्ववादी' मानल्या जाणाऱ्या लेखकांविषयी लिहिलेल्या लेखांचं सुंदर पुस्तक 'सिसिफस आणि बेलाक्वा' या नावाने प्रास प्रकाशनाने प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचं तितकंच सुंदर आणि त्यातल्या गुंतागुंतीची (असंगतीची? की जोडलेपणाची?) दखल घेणारं, ठाकुरांनी केलेलं मुखपृष्ठ:
'प्रत्यक्षात कविता न होवो, दिवसाकाठी रोजच्या जगण्याचे उर्ध्वपातन होऊन त्याची निदान एक ओळ व्हावी, असे स्वप्न तरी काहीही लिहू पाहणाऱ्या बाळगता आले पाहिजे', असं एक मत 'देखणी' कवितासंग्रहाच्या (पॉप्युलर प्रकाशन, दुसरी आवृत्ती, २०००) प्रस्तावनेत भालचंद्र नेमाडे नोंदवतात. त्यांना अपेक्षित असलेल्या उर्ध्वपातनाचा दाखला मुखपृष्ठावर ठाकुरांनी ज्या तऱ्हेने 'देखणी' शब्द लिहिलाय, त्यातून मिळतो, असं वाटतं.
बंगाली लेखक शंकर यांच्या 'सीमाबद्ध' या कादंबरीचं मराठी भाषांतर अशोक शहाणे यांनी 'मर्यादित' असं केलं होतं. इनामदार बंधू प्रकाशनाने १९७६ साली काढलेल्या या कादंबरीच्या आवृत्तीचं समर्पक मुखपृष्ठ ठाकुरांचंच. भौतिक फुगवटा आला तरी सीमाबद्ध / मर्यादित असणं दाखवणारं कथानक, कथानकाला असणारी १९५०-६०च्या दशकातील बंगालमधल्या स्थित्यंतराची पार्श्वभूमी, आणि बंगाली लिपी- अशा सगळ्याचा निर्देश या विलक्षण मुखपृष्ठातून होतोय. फक्त शब्द नि रंग इतकंच.
कोकणातल्या आपल्या गावी परतल्यानंतर गावातल्या सामाजिक कोलाहलाकडे व्यथितपणे पाहणाऱ्या, त्यात वाट काढू पाहणाऱ्या एका इसमाची गोष्ट हमीद दलवाईंच्या 'इंधन' (मौज प्रकाशन, सातवी आवृत्ती, २०१३) कादंबरीत आहे. त्याचं ठाकुरांनी केलेलं मुखपृष्ठ:
नामदेव ढसाळांच्या २०१० सालापर्यंत प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहांमधील स्त्रीकेंद्री कवितांचं संकलन 'चिंध्यांची देवी आणि इतर कविता' या नावाने लोकवाङ्मय गृहाने २०१२ साली प्रकाशित केलं. असाधारण उभ्या आकारात छापलेल्या या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि आतली रेखाटनं ठाकुरांची होती.
होरपळलेलं बालपण नि घर यांच्या गोष्टी सांगणाऱ्या 'हकिकत आणि जटायू' या केशव मेश्रामांच्या दोन कादंबऱ्या एका पुस्तकात (लोकवाङ्मय गृह, आठवी आवृत्ती, २०१४) छापलेल्या आहेत. त्याचं मुखपृष्ठ ठाकुरांनी केलं होतं, तसंच त्यात त्यांनी केलेली अनेक रेखाटनंही आहेत. त्यातली तीन रेखाटनं इथे चिकटवूया:
जोगते, जोगतिणी, चौंडकं यांच्या जीवनाची पार्श्वभूमी असणाऱ्या 'भंडारभोग' या राजन गवस यांच्या कादंबरीचं (मेहता पब्लिशिंग हाऊस, २०१५) मुखपृष्ठ ठाकुरांनी केलं होतं, ते असं:
चिं. त्र्यं. खानोलकरांच्या 'गणुराया आणि चानी' (मौज प्रकाशन, चौथी आवृत्ती, २०११) या दोन कादंबऱ्यांच्या एकत्रित पुस्तकाचं मुखपृष्ठ ठाकुरांनी केलं होतं. गावाकडून घरच्यांचा ताण आणि शहरात जनरलच जगण्याचा नि नोकरीचा ताण अशा द्वंद्वात अडकलेल्या गणुरायाची एक गोष्ट आहे. चानी ही गावकऱ्यांच्या कचाट्यात सापडत जाणाऱ्या मुलीची गोष्ट आहे:
त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या 'डांगोरा : एका नगरीचा' (मौज प्रकाशन, दुसरी आवृत्ती, २००४) या कादंबरीचं मुखपृष्ठं आणि आतली रेखाटनं ठाकुरांनी केली होती. एका संस्थानातील सत्ताधारी घराण्यात जन्मलेल्या पण वेगळी वाट खुणावणारा इसम या कादंबरीत आहे. संस्थानी वातावरणातील सत्तेची कटकारस्थानं, इत्यादींची पार्श्वभूमी त्याला आहे. तर, कादंबरीच्या 'अंतरंगाची एक अस्फुट अनुभवयछाया' ठाकुरांनी केलेल्या मुखपृष्ठात उतरल्याचं सरदेशमुख मनोगतात नोंदवतात. ही अनुभवछाया आतल्या रेखाटनांमध्ये अधिक गडदपणे दिसते, असं वाटलं, त्यातली ही निवडक तीन रेखाटनं:
'खरंच, लोक माझ्यावर इतके काय मरतात? इतकी का मी ब्युटी आहे? मी त्यांना कोण सायराबानू, का वहिदा रेहमान का साधना वाटते कुणास ठाऊक? मला तर आश्चर्यच वाटतं बाई, आपल्या लोकांचं. तुम्ही केव्हाही पाहा, मी रस्त्यावरून चालले की लोक कसे माझ्याकडे टकटका पाहत असतात ते', असं सुरुवातीला म्हणणाऱ्या आणि अगदी शेवटी 'असा राग येतो मला अशा माणसांचा. स्वतःचा फायदा पाहतात आणि माझ्यासारख्या गरीब मुलीला मग कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. मला वाटलं, हा भडवा अगदी सरळ मनाचा आहे. त्याला कसंही खेळवलं तरी खेळू शकेल. पण आता कळलं, याने मला का जवळ केली होती. याला अनुभव पाहिजे होता, अनुभव! म्हणजे माझा एक्सपिरियन्स घेऊन हा पेंटिंग करणार होता, च्यूतमारीचा!' असं म्हणणाऱ्या वैजूची कहाणी भाऊ पाध्यांच्या 'अग्रेसर' कादंबरीत तिच्याच तोंडून ऐकायला मिळते. त्या कादंबरीच्या शब्द पब्लिकेशनने काढलेल्या २०१३ सालच्या आवृत्तीचं खतरनाक मुखपृष्ठ ठाकुरांनी केलं. यात वैजूचं व्यक्तिमत्व त्या 'अ'वर ठाण मांडूनच समोर येतं: