Monday, 17 January 2022

बाळ ठाकूर: निधनाच्या बातम्यांमधलं 'राष्ट्र' आणि रेखाटनांच्या रेषा

बाळ ठाकूर (१९३०-२०२२)
आभार: ठाकूर कुटुंबीय

अनेक मराठी पुस्तकांची मुखपृष्ठं केलेले आणि प्रचंड रेखाटनं केलेले बाळ ठाकूर यांचं अलीकडे भांबेड (लांजा, रत्नागिरी) इथे निधन झालं. त्यानंतर एका वृत्तवाहिनीवर एका मिनिटाची ओझरती बातमी दिसली आणि काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्याचं दिसलं. ही नोंद लिहीत असतानाच्या दिवसांमध्ये दोनेक पेपरांमध्ये तीन ते चार लेख दिसले.  

बातम्यांमधलं 'राष्ट्र':

ठाकुरांच्या निधनासंदर्भातल्या काही बातम्यांमधील एक खटकलेल्या उल्लेखानिमित्त नोंद गरजेची वाटते.

'सामना' या वृत्तपत्रात ९ जानेवारी २०२२ रोजी आलेल्या बातमीत असं म्हटलं आहे: "रहस्यरंजन, ललित, मौज, साहित्य, सत्यकथा आदी अंकासाठी त्यांनी चित्रं काढली होती तसेच लक्ष्मीबाई टिळक, बालकवी, बा. भ. बोरकर तसेच त्या काळच्या सर्व साहित्यिक यांची व्यक्तिचित्रं त्यांनी काढली होती, मात्र त्यांनी उभ्या आयुष्यात राष्ट्रविरोधी साहित्य अथवा चित्रं कधी काढली नाहीत."

'मुंबई तरुण भारत'मधे आलेल्या 'राष्ट्राभिमानी ज्येष्ठ चित्रकार' या आदरांजलीपर लेखाचा शेवट असा होतो: "त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात राष्ट्रविरोधी साहित्य अथवा चित्रनिर्मिती कधीही केली नाही. अशा या राष्ट्राभिमानी चित्रकारांस विनम्र अभिवादन."

साधारण याच बातम्यांमधून तयार झालेला, पण संकलक नि माहिती-स्त्रोत म्हणून कोणाकोणाची ठळक नावं नोंदवणारा, फॉरवर्ड होत जाणारा एक मजकूरही सापडतो, त्यातही ठाकूर यांनी 'राष्ट्रविरोधी चित्रनिर्मिती' कशी केली नाही याचा उल्लेख आहे.

फारशा प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या व्यक्ती मरण पावल्यावर येणाऱ्या बातम्या ओझरत्या असतात, बहुतेकदा दोन-तीन तपशील सर्वच माध्यमं एकसारख्या पद्धतीने सांगतात. म्हणजे एखाद्या स्त्रोताचा वापर करून सर्व ठिकाणी ते बातमीचं काम उरकलं जातं. तसं ठाकुरांच्या बाबतीतही झाल्याचं दिसतं. पण या बातम्यांमध्ये 'राष्ट्र' या शब्दाचा असा उल्लेख का झाला असावा?

'आप्तवाक्य' संवाद मंडळाने ऑगस्ट २०१२मध्ये मुंबईत बाळ ठाकूर यांची मुलाखत घेतली होती. 'माझ्या रेषेची वाक्-वळणे' अशा नावाने त्या संदर्भात प्रसिद्धीपर मजकूर पेपरात आलेला. त्या मुलाखतीचं संक्षिप्त शब्दांकन 'प्रहार' या वृत्तपत्रात २ सप्टेंबर २०१२ रोजी प्रसिद्ध झाल्याचं दिसतं, ऑनलाइन वाचायलाही मिळतं (रेषेपलीकडचे बाळ ठाकूर). त्यात एक प्रश्नोत्तर असं आहे:

प्रश्न: सत्यकथा, जाहीरनामा ते विवेकपर्यंत वेगवेगळ्या विचारसरणीच्या नियतकालिकांसाठी तुम्ही कामं केली. कधी वैचारिक संघर्षाची वेळ नाही आली?

ठाकूर: मी प्रत्येक मजकूर प्रामाणिकपणे वाचला. मात्र मानसिक संघर्ष होईल असा मजकूर कधीही माझ्यासमोर आला नाही. त्यामुळे वैचारिक संघर्ष झाला नाही. तटस्थपणे मजकूर वाचण्याचा माझा प्रयत्न असतो. मग साम्यवादी, समाजवादी की हिंदुत्वनिष्ठ नियतकालिक असो, राष्ट्रविरोधी वाङमय कधीच माझ्या हाती आलं नाही.

ठाकुरांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध होता, हा मुद्दा वाचक म्हणून आपल्याला कुठे ना कुठे वाचायला मिळतो, हे इथे नोंदवायला हवं. तसंच, 'साम्यवादी, समाजवादी की हिंदुत्वनिष्ठ नियतकालिक असो, राष्ट्रविरोधी वाङमय कधीच माझ्या हाती आलं नाही', असं ते म्हणतात त्यात राष्ट्राचा उल्लेख येतो, हेही एक परत नोंदवूया. या दोन संदर्भांमुळे आताच्या बातम्यांमधे नि समाजमाध्यमांवरच्या मजकुरांमधे ही 'राष्ट्र' शब्दाची प्रतिबिंबं उमटली असावीत. पण ठाकूर मुलाखतीत जे म्हणतायंत, त्यात विशिष्ट विचारसरणीच राष्ट्रप्रेमी आणि उर्वरित विचारसरण्या राष्ट्रविरोधी अशा द्वंद्वालाही छेद जाताना दिसतो. यात 'राष्ट्र' या संकल्पनेबद्दल बोलण्याचा मुद्दा नाही. सध्या माध्यमांमध्ये, राजकारणामध्ये, आणि एकंदर आपल्या सार्वजनिक अवकाशामध्ये ढोबळमानाने 'राष्ट्र', 'राष्ट्रप्रेम', 'राष्ट्रविरोध' हे शब्द कसे वापरले जातात, या अनुषंगाने हे पाहावं, असं वाटतं. ठाकूर संघाशी संबंधित असले तरी केवळ 'हिंदुत्वनिष्ठ' विचारसरणीला राष्ट्राशी जोडत नाहीत, तर 'साम्यवादी, समाजवादी,..' अशा विचारसरण्यांचाही उल्लेख त्या संदर्भात करतात, त्यामुळे या इतर विचारसरण्यांसंदर्भात चित्रं काढली तरी ते 'राष्ट्रविरोधी वाङ्मय' मानण्याची गरज नसल्याचं त्यांच्या विधानांमधून सूचित होतं.

कदाचित म्हणूनच उघडपणे नक्षलवादी भूमिका असणाऱ्या अनिल बर्वे यांच्या 'थँक यू मिस्टर ग्लाड' या कादंबरीचंही मुखपृष्ठ ठाकुरांनी केल्याचं दिसतं:

पॉप्युलर प्रकाशन. चौथी आवृत्ती- १९९०

इथेही पुन्हा 'नक्षलवाद' किंवा 'राष्ट्र' या संकल्पनांचा उगम काय, त्याचा इथे थेट संबंध असतोच असं नाही. प्रसारमाध्यमं, समाजमाध्यमं, यामध्ये या शब्दांचा ढोबळमानाने होणाऱ्या वापराबद्दल आपण बोलतो आहोत. म्हणजे या संकल्पनांचा सर्वसाधारण सार्वजनिक पातळीवर कोणता अर्थ जास्त वापरलेला जाणवतो, त्याबद्दल बोलतो आहोत. सध्याच्या काळात 'नक्षलवाद', 'शहरी नक्षलवादी' (अर्बन नक्षल') असे शब्दप्रयोग केंद्र सरकारकडून आणि संबंधित समर्थकांकडून 'राष्ट्रविरोधी' यादीमधे केले गेलेले दिसतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी, भाजपशी, केंद्र सरकारशी सहमती न राखणाऱ्या इतरही अनेकांना या यादीद्वारे एका कप्प्यात घातलं जाताना दिसतं. पण ठाकुरांच्या मुलाखतीत आलेली यादी तशी नाही. शिवाय, मुलाखतीचं संक्षिप्त शब्दांकनच आपल्याला वाचायला मिळालेलं आहे. कदाचित मुख्य मुलाखतीत आणखी काही सविस्तरही असेल. तरीही ठाकुरांनीच 'राष्ट्र' या शब्दाचा तो उल्लेख केलेला आहे, हे तर खरंच. पण त्यांनी इतर विचारसरण्यांना 'राष्ट्रविरोधी' यादीत सामील केलेलं नाही. तसंच त्यांनी काढलेलं बर्व्यांच्या कादंबरीचं चित्रही त्यांच्या विधानाशी सुसंगत ठरणारं उदाहरण म्हणून पाहता येतं. म्हणून तरी किमान त्यांच्या बातमीतले असे ढोबळ उल्लेख टाळणं गरजेचं वाटतं.  

साधारणतः असा अनुभव येतो की, असं काही नोंदवल्यावर कोणी म्हणतं, मग नक्षलवादी किंवा कोणी इतर त्यांच्या विरोधकांकडे असेच साच्यात पाहत नाहीत का? तर त्यावरही वेगळं बोलता येईल / बोलावं. पण शेवटी राजकारणाच्या या इथे नोंदवलेल्या विचारांच्या वाटा व्यवहारामध्ये ठराविक आदर्श स्वरूपात नसतातच. विशिष्ट सामूहिकतेचा तिथे संदर्भ येतो, ती स्थिती नुसते त्या-त्या वेळी नैतिक पवित्रे घेण्यातून समजून घेता येत नाही, असं वाटतं. सध्या मोठ्या प्रमाणात सत्ता कोणाकडे आहे आणि त्याचा आपल्या सार्वजनिक संभाषणावर, भाषावापरावर कसा प्रभाव पडतो, हे त्या-त्या संदर्भात समजून घ्यायचा प्रयत्न करायला हरकत नसावी. तर असा प्रयत्न म्हणून आपण इथे बाळ ठाकूर यांच्या निधनासंदर्भातील काही मजकुरांचा धांडोळा घेऊ पाहिला. बाळ ठाकूर संघाशी संबंधित होते म्हणून त्यांच्या निधनाच्या बातमीत राष्ट्राचा नि विचारसरणीचा इतका बटबटीत उल्लेख करायचा, ही पद्धत खटकते. त्यातून त्यांनी चित्रकार म्हणून केलेल्या कामाचंही अवमूल्यनच होतं. [चंबळच्या खोऱ्यात जाऊन तिथल्या डाकूंशी संबंधित घडामोडींबद्दल अनिल बर्व्यांनी एक वृत्तान्त लिहिला होता. त्याचं पुस्तक १९८६ साली वसंत बुक स्टॉल या प्रकाशनसंस्थेने काढलं. त्याचंही मुखपृष्ठ ठाकुरांनीच केलेलं आहे. ते त्यांच्या इतर कामाइतकं लक्षणीय वाटलं नाही. पण हा तपशील इथे नोंदवून ठेवू].

हा सार्वजनिक संभाषणांमधला भाषावापर आणि चित्रभाषेचा वापर कोणत्या पातळीवर वेगळा असतो, याचा विचार करण्यासाठीुद्धा हे उदाहरण वापरण्यासारखं आहे. बर्वे यांच्या कादंबरीत उघडपणे नक्षलवादी चळवळीतील एका कार्यकर्त्याला नायकपद दिलेलं आहे, आणि ग्लाड हा जेलर प्रस्थापित व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणारा दाखवला आहे. त्या अर्थी, बर्वे यांचा विचार निःसंदिग्ध आहे. मग या कादंबरीचं मुखपृष्ठही फक्त तोच विचार मांडतं का? तसं असेल तर संघविचाराच्या ठाकुरांनी नक्षलवादी विचारसरणीचं चित्र काढलं, असं ते असतं का? इतकं ते सोपं नसावं. त्यामुळे 'राष्ट्रविरोधी चित्रनिर्मिती' हा शब्दप्रयोगच चमत्कारिक ठरतो, केवळ सध्याच्या राजकीय वातावरणातील भयग्रस्त चित्राची खूण त्यात सापडते.

विशिष्ट नेता (मोदी) आणि विशिष्ट विचारसरणी (हिंदुत्ववाद), त्यांचा पक्ष (भाजप), त्यांची संघटना (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)- हेच 'राष्ट्र' या शब्दाचे अर्थ ठरवतील, असं हे वातावरण जाणवतं. १९७०च्या दशकात काँग्रेसच्या इंदिरा गांधी पंतप्रधान असताना नेतृत्वातील व्यक्तीपुरता हा प्रयत्न झाल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळेच काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष देव कांत बरुहा यांनी 'इंदिरा इज इंडिया अँड इंडिया इज इंदिरा' असं विधान आणीबाणीदरम्यान (जून १९७५ ते मार्च १९७७) केलं, तेव्हा राष्ट्र हे नेतृत्व करणाऱ्या एका व्यक्तीशी जोडण्याचा खटाटोप दिसला. तर, त्या आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांवर लादण्यात आलेल्या सेन्सॉरशिपविरोधात कायदेशीर लढाई लढलेले पत्रकार य. द. लोकुरकर यांच्या 'सेन्सॉरशी झुंज' या पुस्तकाचंही मुखपृष्ठ बाळ ठाकूर यांनी केलं होतं, ते असं:

य. द. लोकुरकर, १९७७

आणीबाणी संपल्यावर दोनच महिन्यांनी लोकुरकरांनी स्वतःच हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. या पुस्तकाबद्दल आपण मे २०१४मध्ये, म्हणजे सध्याचे पंतप्रधान सत्तेत आले तेव्हा नोंद केली होती. 'सेन्सॉरलेली मनं: अर्थातच, दुसरी बाजू लोकांना कशाला कळावयास हवी?' असा तिचा मथळा होता. तर, 'राष्ट्रविरोधी चित्रनिर्मिती'चा संदर्भ देणाऱ्या वरच्या मजकुरांमध्ये अशाच सेन्सॉरलेल्या मनांचं प्रतिबिंब पाहायला मिळतंय, असं म्हणता येईल.

अशोक शहाण्यांनी 'बाळ ठाकूर अन् मखर' असा एक लेख २०१३ साली 'महा-अनुभव'च्या दिवाळी अंकात लिहिला होता. ठाकुरांच्या चित्रांबद्दल लेखात विशेष काही नोंदवलं नव्हतं, पण ठाकुरांच्या कामाला सुरुवात झाली त्या दरम्यान, १९६०-७०च्या दशकातील पार्श्वभूमी काय होती याचा ओझरता आढावा देण्याचा (शहाण्यांच्या भाषेत 'मखर' उभारण्याचा) प्रयत्न त्या लेखात होता. मुंबईतील रहस्यरंजन हे नियतकालिक, अनियतकालिकांच्या घडामोडी, त्या निमित्ताने जमलेली वर्तुळं, असा तपशील त्यात आहे. शहाण्यांच्या म्हणण्याप्रमाणे: "पन्नास वर्षांपूर्वी 'रहस्यरंजन'च्या अड्ड्यावर एका संध्याकाळी बाळ ठाकूर म्हणाला होता तसं- 'मी एक चित्र काढलंय. आता माझ्या चित्राला कुणी मजकूर लिहिता का?" 

असा प्रयोग खरोखर केला गेला असता, तर ठाकुरांच्या चित्रावरून निर्माण होणारा मजकूर कोणत्या विशिष्ट विचारसरणीचा असेल, असं ठामपणे सांगता आलं असतं का? या प्रश्नाचं उत्तर आपापलं शोधून पाहता येईल.  चित्रभाषेचं सुलभीकरण करून ते उत्तर सापडणार नाही, असं वाटतं. त्यामुळेच 'राष्ट्रविरोधी चित्रनिर्मिती' करण्याचे किंवा न करण्याचे ढोबळ उल्लेखही भ्रामक वाटतात. या सगळ्यातून 'राष्ट्रा'च्या नावाखाली एकसाचीपणा समोर येतो, दुसऱ्या बाजू कळायला वाव राहत नाही. 

मुखपृष्ठं आणि रेखाटनांमधल्या रेषा:

अनेक पुस्तकांची लक्षणीय मुखपृष्ठं करणारा आणि त्याहून कितीतरी रेखाटनं करणारा चित्रकार आपल्यातून गेल्यावर बातम्या कशा आल्या, त्याच्या चित्रांबद्दल कोणती ढोबळ विधानं झाली, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा त्या मजकुराशी काय संबंध आहे, याबद्दल थोडं बोलण्याचा प्रयत्न नोंदीच्या पहिल्या भागात केला. पण बाळ ठाकुरांचं काम अर्थातच प्रचंड विस्तारलेलं होतं. त्यांच्या विस्तृत कामातील काही निवडक पुस्तकांची मुखपृष्ठं खाली चिकटवली आहेत, आणि अगदीच थोडी रेखाटनंही चिकटवली आहेत. 

विलास सारंगांनी ज्याँ-पॉल सार्त्र, आल्बेर काम्यू, फ्रान्झ काफ्का आणि सॅम्युएल बेकेट या 'अस्तित्ववादी' मानल्या जाणाऱ्या लेखकांविषयी लिहिलेल्या लेखांचं सुंदर पुस्तक 'सिसिफस आणि बेलाक्वा' या नावाने प्रास प्रकाशनाने प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचं तितकंच सुंदर आणि त्यातल्या गुंतागुंतीची (असंगतीची? की जोडलेपणाची?) दखल घेणारं, ठाकुरांनी केलेलं मुखपृष्ठ:

'प्रत्यक्षात कविता न होवो, दिवसाकाठी रोजच्या जगण्याचे उर्ध्वपातन होऊन त्याची निदान एक ओळ व्हावी, असे स्वप्न तरी काहीही लिहू पाहणाऱ्या बाळगता आले पाहिजे', असं एक मत 'देखणी' कवितासंग्रहाच्या (पॉप्युलर प्रकाशन, दुसरी आवृत्ती, २०००) प्रस्तावनेत भालचंद्र नेमाडे नोंदवतात. त्यांना अपेक्षित असलेल्या उर्ध्वपातनाचा दाखला मुखपृष्ठावर ठाकुरांनी ज्या तऱ्हेने 'देखणी' शब्द लिहिलाय, त्यातून मिळतो, असं वाटतं.

बंगाली लेखक शंकर यांच्या 'सीमाबद्ध' या कादंबरीचं मराठी भाषांतर अशोक शहाणे यांनी 'मर्यादित' असं केलं होतं. इनामदार बंधू प्रकाशनाने १९७६ साली काढलेल्या या कादंबरीच्या आवृत्तीचं समर्पक मुखपृष्ठ ठाकुरांचंच. भौतिक फुगवटा आला तरी सीमाबद्ध / मर्यादित असणं दाखवणारं कथानक, कथानकाला असणारी १९५०-६०च्या दशकातील बंगालमधल्या स्थित्यंतराची पार्श्वभूमी, आणि बंगाली लिपी- अशा सगळ्याचा निर्देश या विलक्षण मुखपृष्ठातून होतोय. फक्त शब्द नि रंग इतकंच.

कोकणातल्या आपल्या गावी परतल्यानंतर गावातल्या सामाजिक कोलाहलाकडे व्यथितपणे पाहणाऱ्या, त्यात वाट काढू पाहणाऱ्या एका इसमाची गोष्ट हमीद दलवाईंच्या 'इंधन' (मौज प्रकाशन, सातवी आवृत्ती, २०१३) कादंबरीत आहे. त्याचं ठाकुरांनी केलेलं मुखपृष्ठ:
'इंधन'मधली दोन रेखाटनं:


नामदेव ढसाळांच्या २०१० सालापर्यंत प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहांमधील स्त्रीकेंद्री कवितांचं संकलन 'चिंध्यांची देवी आणि इतर कविता' या नावाने लोकवाङ्मय गृहाने २०१२ साली प्रकाशित केलं. असाधारण उभ्या आकारात छापलेल्या या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि आतली रेखाटनं ठाकुरांची होती. 
'चिंध्यांची देवी'मधलं एक रेखाटन:


होरपळलेलं बालपण नि घर यांच्या गोष्टी सांगणाऱ्या 'हकिकत आणि जटायू' या केशव मेश्रामांच्या दोन कादंबऱ्या एका पुस्तकात (लोकवाङ्मय गृह, आठवी आवृत्ती, २०१४) छापलेल्या आहेत. त्याचं मुखपृष्ठ ठाकुरांनी केलं होतं, तसंच त्यात त्यांनी केलेली अनेक रेखाटनंही आहेत. त्यातली तीन रेखाटनं इथे चिकटवूया:



जोगते, जोगतिणी, चौंडकं यांच्या जीवनाची पार्श्वभूमी असणाऱ्या 'भंडारभोग' या राजन गवस यांच्या कादंबरीचं (मेहता पब्लिशिंग हाऊस, २०१५) मुखपृष्ठ ठाकुरांनी केलं होतं, ते असं:

चिं. त्र्यं. खानोलकरांच्या 'गणुराया आणि चानी' (मौज प्रकाशन, चौथी आवृत्ती, २०११) या दोन कादंबऱ्यांच्या एकत्रित पुस्तकाचं मुखपृष्ठ ठाकुरांनी केलं होतं. गावाकडून घरच्यांचा ताण आणि शहरात जनरलच जगण्याचा नि नोकरीचा ताण अशा द्वंद्वात अडकलेल्या गणुरायाची एक गोष्ट आहे. चानी ही गावकऱ्यांच्या कचाट्यात सापडत जाणाऱ्या मुलीची गोष्ट आहे:

त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या 'डांगोरा : एका नगरीचा' (मौज प्रकाशन, दुसरी आवृत्ती, २००४) या कादंबरीचं मुखपृष्ठं आणि आतली रेखाटनं ठाकुरांनी केली होती. एका संस्थानातील सत्ताधारी घराण्यात जन्मलेल्या पण वेगळी वाट खुणावणारा इसम या कादंबरीत आहे. संस्थानी वातावरणातील सत्तेची कटकारस्थानं, इत्यादींची पार्श्वभूमी त्याला आहे. तर, कादंबरीच्या 'अंतरंगाची एक अस्फुट अनुभवयछाया' ठाकुरांनी केलेल्या मुखपृष्ठात उतरल्याचं सरदेशमुख मनोगतात नोंदवतात. ही अनुभवछाया आतल्या रेखाटनांमध्ये अधिक गडदपणे दिसते, असं वाटलं, त्यातली ही निवडक तीन रेखाटनं:



१०
'खरंच, लोक माझ्यावर इतके काय मरतात? इतकी का मी ब्युटी आहे? मी त्यांना कोण सायराबानू, का वहिदा रेहमान का साधना वाटते कुणास ठाऊक? मला तर आश्चर्यच वाटतं बाई, आपल्या लोकांचं. तुम्ही केव्हाही पाहा, मी रस्त्यावरून चालले की लोक कसे माझ्याकडे टकटका पाहत असतात ते', असं सुरुवातीला म्हणणाऱ्या आणि अगदी शेवटी 'असा राग येतो मला अशा माणसांचा. स्वतःचा फायदा पाहतात आणि माझ्यासारख्या गरीब मुलीला मग कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. मला वाटलं, हा भडवा अगदी सरळ मनाचा आहे. त्याला कसंही खेळवलं तरी खेळू शकेल. पण आता कळलं, याने मला का जवळ केली होती. याला अनुभव पाहिजे होता, अनुभव! म्हणजे माझा एक्सपिरियन्स घेऊन हा पेंटिंग करणार होता, च्यूतमारीचा!' असं म्हणणाऱ्या वैजूची कहाणी भाऊ पाध्यांच्या 'अग्रेसर' कादंबरीत तिच्याच तोंडून ऐकायला मिळते. त्या कादंबरीच्या शब्द पब्लिकेशनने काढलेल्या २०१३ सालच्या आवृत्तीचं खतरनाक मुखपृष्ठ ठाकुरांनी केलं. यात वैजूचं व्यक्तिमत्व त्या 'अ'वर ठाण मांडूनच समोर येतं:

वर आलेली पुस्तकं वेगवेगळ्या तऱ्हेची, वेगवेगळ्या पार्श्वभूमीची आहेत. त्या पुस्तकांचा आशय आपल्याला कसा वाटतो, हा वेगळा मुद्दा. पण त्या आशयाच्या निमित्ताने बाळ ठाकूर यांनी चित्रातून अधिक काही सुचवलंय का, हे पाहत राहणंही समाधानाचं वाटू शकतं.

नोंदीत आधी उल्लेख आलेल्या 'आप्तवाक्य'च्या मुलाखतीत, 'तुमचं कुठलं काम तुम्हाला आवडलं होतं?' असा प्रश्न ठाकुरांना विचारण्यात येतो. त्यावर ते म्हणतात, 'दळवींच्या ‘चक्र’ या पहिल्या कादंबरीसाठी मी तीन ते चार चित्रं काढली होती. माझ्या कल्पनेप्रमाणे मी वेगळ्या पद्धतीने ती केली होती.' ही नोंद लिहिणाऱ्याकडे 'चक्र'ची मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने काढलेली २०१२ सालची दहावी आवृत्ती आहे, त्यातलं एक रेखाटन देऊन ही नोंद थांबवू. ठाकुरांची इतर अनेक रेखाटनं आणि मुखपृष्ठं विविध ठिकाणी पसरलेली आहेत.

1 comment:

  1. lekh aawadla...khup saari mahit nasleli mahiti milali...thank you

    ReplyDelete