डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना अलीकडे पद्मश्री सन्मान मिळाला. त्या निमित्त 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीवर त्यांची मुलाखत झाली. विंचूदंशावर उतारा ठरणाऱ्या औषधाच्या शोधासाठी डॉ. बावस्कर विशेष ख्याती पावले. त्या संदर्भातील काही घटना सांगून बावस्कर शेवटी विंचूदंशावरचा उपचार कसा शोधता आला, ते सांगतात, आणि मग म्हणतात:
ते [संशोधन] लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालं, ब्राझील, त्रिनिनाद, मॅक्सिको, पेरू, ज्या ज्या ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये हे वापरणं सुरू झालं... जगामध्ये वाहवा सुरू झाली. कोणी कॉन्ग्रॅच्युलेशन इंडियामधून पाठवलं नाही, आणि जेव्हा अनिल अवचटने उतारा लिहिला- विंचवाचा उतारा, तेव्हा डॉक्टर लोक म्हणले, याने संशोधन केलं हो... म्हणजे दिवाळी अंक महत्त्वाचा आहे, इंटरनॅशनल जर्नल नाही. धिस हॅपन्ड..
(माझा कट्टा- चौतिसाव्या मिनिटादरम्यान, २९ जानेवारी, २०२२)
अनिल अवचट यांचा वरती उल्लेख आलेला 'विंचवाचा उतारा' हा लेख 'कार्यरत' (मौज प्रकाशन) या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे.
'अनिल अवचटांच्या लेखनाबद्दल तुमचं मत...' अशा प्रश्नाला उत्तर देताना लेखक-कवी भालचंद्र नेमाडे यांनीही एकदा दिवाळी अंकांचा उल्लेख केला होता, तो असा:
म्हणजे हे लिहिलेलं असतं काहीतरी फिरत्या टोळ्यांच्याबद्दल किंवा माकडवाल्यांच्याबद्दल वगैरे आणि तुमच्यासमोर वाचकवर्ग असतो तो मौजेच्या दिवाळी अंकांचा सुस्त. काहीतरी करमणूक म्हणून वाचणारा, याच्यात काही सुसूत्रता दिसत नाही मला! तसे हे सगळे लोक चांगलेच लिहितात आणि तेही आवश्यक असतं. लिटरेचर म्हणजे हे सगळंच असतं शेवटी. पण आपल्या दृष्टीने ते महत्त्वाचं नाही. हे सब्-लिटरेचर असंच मी समजतो. म्हणजे साहित्याच्या आजूबाजूला काही पोषक अशी द्रव्यं असतात, त्यासारखं हे असतं. तेही चालू राहावं लागतं. [...] कविता, कादंबरी किंवा नाटक लिहिताना त्यात पूर्णपणे गुरफटून घ्यावं लागतं. तसं पत्रकारितेचं नाही. त्यातला हिशेबी तटस्थपणा, हा आजचा विषय, हा कुठे द्यायचा, ती माहिती कशी जमा करायची, त्याचे तपशील कोणत्या वेळी कोण कुठे आलं, कोण मंत्री आला, त्यानं यानं काय केलं, कोणतं कमिशन नेमलं या सगळ्या गोष्टी पत्रकारितेत महत्त्वाच्या असतात, [...] तेच तेच म्हणत राहणं याला पत्रकारितेत मूल्य असेल पण साहित्याच्या जवळपासही येत नाही. / आत्मचरित्राचंही असंच आहे. कुठे जन्मलो नि कुठे गेलो, नि कुठल्या याच्यात काय केलं, कोण भेटलं न ते कोणी कसं उत्तर दिलं, मग मी पहिली कथा कशी पाठवली... आता याच्यात साहित्याचा काही संबंध नसतो. तुमचं काय घडलं तो इतिहास तुम्ही मांडता. तोही खरा की खोटा याची खात्री नाही. त्याला साहित्याचं मूल्य नाही. / मग त्या त्या वेळी लिहिताना- रिपोर्ताज करताना असं म्हणता येईल की अवचट अतिशय चांगलं लिहितो. पण पुस्तक म्हणून विचार करताना, आपण जेव्हा शुद्ध फॉर्मच्या तुलनेत विचार करतो, त्यात हे कुठे बसत नाही. त्यामुळे ते काही शेवटी गंभीरपणे घेण्यासारखं नाही.
(निवडक मुलाखती, भालचंद्र नेमाडे, लोकवाङ्मय गृह, तिसरी आवृत्ती- २०१७ पानं १७८-१७९, मूळ प्रसिद्धी: प्रगत दिवाळी १९९८)
ही मुलाखतही मुळात एका दिवाळी अंकातच आली. पण त्या अंकाचं नाव 'प्रगत' असल्यामुळे बहुधा त्यांचा वाचक सुस्त नसेल. पण ते सोडून त्यातला दिवाळी अंकांचा उल्लेख घेऊन आपण पुढे जाऊ.
अनिल अवचटांचं नाव न घेता, पण त्यांच्या लेखनावर गो. पु. देशपांड्यांनी इंग्रजीतून केलेली टीका अशी होती:
"मराठी साहित्यात एक नवीन वाङ्मयप्रकार अस्तित्वात आला आहे. त्यात आदिवासी, देवदासी, तंबाखू कामगार, भटक्या जाती आणि तत्सम समूहांबाबत वरकरणी सामाजिक-राजकीय वाटणारं पण मुळात साहित्यिक स्वरूपाचं लेखन असतं. हे लेखन वाचनीय असतं. पण साहित्यामध्ये इतकं न-राजकीय, आणि त्यामुळे राजकीयतेविरोधी ठरणारं काहीच नसेल. भयंकर सामाजिक तणाव, दडपशाही आणि शेतकरी, कनिष्ठ जातीय व भटके या समुदायांमधील वाढत्या दारिद्र्याचं चित्रमय तपशिलांद्वारे वर्णन करणाऱ्या उत्तम साहित्यिक लेखांची मालिकाच दिसून येते. या लेखकांची मराठीची जाण उत्तम असते. सर्वसामान्य वाचक मात्र दुर्दैवाने या पुस्तकांकडे समकालीन सामाजिक तणावांवरील आणि विषम समाजावरील टीका, म्हणजे राजकीय दस्तावेज म्हणून पाहतो. हे नमूद करणं आवश्यक आहे, कारण आज महाराष्ट्रात साहित्य आणि राजकीय तत्त्वज्ञान यांच्यातील भेद पुसला गेला आहे, त्यात राजकीय तत्त्वज्ञानाचाच तोटा होतो. अशा प्रकारच्या पुस्तकांचा साहित्यिक बाजारपेठेत आलेला पूर पाहता, अतिशय पद्धतशीर पद्धतीने पसरवण्यात येणाऱ्या या गोंधळात मार्क्सवाद्यांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. अशा लेखनकृतींचं साहित्य म्हणून महत्व कमी लेखण्याचा इथे संबंध नाही. तर, त्यातील राजकीय तत्त्वज्ञानाचा आव तेवढा मोडून काढायला हवा. "
(G. P. Deshpande, 'Marx and Ambedkar : Some Unacademic Reflections', Economic and Political Weekly, 31 October 1987. रावसाहेब कसब्यांच्या 'मार्क्स आणि आंबेडकर' या पुस्तकाचं स्वागतशील परीक्षण करणारा हा लेख होता.)
०००
मौज प्रकाशन, २००१ । मुखपृष्ठ- सुभाष अवचट |
अनिल अवचटांचं जानेवारी महिन्याच्या अखेरीला निधन झालं. त्यांनी विपुल लेखन केलं. त्यात पत्रकारी लेखनापासून 'आत्मपर' लेखन, काही लहान मुलांच्या गोष्टी लिहिल्या, इतरही काही विषयांवर कुतूहलापोटी जाणून घेतलेलं परत लिहिलंही. शिवाय, या लेखनासोबतच एकंदर सार्वजनिक वावरातून त्यांची काहीएक प्रतिमा निर्माण झाल्याचं दिसतं.
अनिल अवचटांच्या लेखनासंदर्भात तीन वेगवेगळे संदर्भ वरच्या विधानांमधून समोर येतात, आता एक चौथा संदर्भ म्हणून खुद्द अवचट स्वतःच्या लेखनाबद्दल काय म्हणतात ते नोंदवू, म्हणजे पुढे जाता येईल. तर, अगदी अलीकडे, म्हणजे बऱ्यापैकी लेखनाचा प्रवास करून झाल्यानंतर अवचटांनी असं लिहिलेलं होतं:
"आधीचं माझं लिखाण कमालीचं कोरडं होतं. भावनांना मी आसपास फिरकू देत नसे. कारण मला दाखवायचं होतं दाहक वास्तव. मी कॅमेऱ्यामागचा माणूस. त्याने दृश्यात कडमडायचं नसतं. जे लिहितो त्या परिस्थितीवर फोकस. मग त्यात माझं म्हणजे लिहिणाऱ्याचं स्वातंत्र्य काय? तर मी काय दाखवायचं ते ठरवू शकतो. ते कसं, कुठल्या क्रमाने दाखवायचं ती रचना ठरवू शकतो. फक्त जे काही 'वाटायचं' ते वाचकाला वाटलं पाहिजे. आपणच गळा काढून चालणार नाही. परिस्थिती जितकी भीषण, तितका लेखक अलिप्त, तितकं लिखाण कोरडं हवं. म्हणजे आपल्याला हवा तो परिणाम वाचकांवर होण्याची शक्यता.
याउलट मोर, स्वतःविषयी, आप्त वगैरे लिखाणात मी माझ्या मनातलं वास्तव न्याहाळतोय. जसं बाहेर एक वास्तव आहे तसं आतही आहे. तिथे माझं जगणं, विविध प्रसंगांना झालेल्या माझ्या भावनिक प्रतिक्रिया याही एका वास्तवाचाच भाग आहेत. आधीच्या लिखाणात मी दाखवणारा होतो, आता जे दाखवायचं आहे त्यातही मी आहे. आधीच्या लेखनातली अलिप्तता आता तितकी महत्त्वाची नाही"
(अनिल अवचट, 'जडणघडण', माझ्या लिखाणाची गोष्ट, समकालीन प्रकाशन, जानेवारी २०२०- पान ३१)
इथे आपण पत्रकार अवचट आणि 'ललित' अवचट असे दोन भाग करू शकतो, असं वाटतं. तसे भाग केल्यामुळे त्यांच्या लेखनाविषयी बोलताना अस्ताव्यस्तपणा आणि टोकांवरचा अवाजवीपणा टाळता येईल बहुधा.
अवचट ज्याला 'आधीचं.. कोरडं.. भावनांना आसपास फिरकू न देता केलेलं..' लेखन म्हणतायंत, ते साधारणतः १९६०चं दशक अगदी संपताना सुरू झालेलं आणि मुख्यत्वे १९७०-८०च्या दशकामधे झालेलं आहे. 'माणसं', 'प्रश्न आणि प्रश्न', 'कोंडमारा' या पुस्तकांमध्ये यातले लेख संकलित झालेले आहेत. त्या आधीही, 'पूर्णिया', 'छेद', 'वेध' अशी पुस्तकं आली होती. 'रिपोर्टिंगचे दिवस' हे पुस्तक २०१२ साली आलं असलं, तरी त्यातले लेख याच काळातले आहेत. यातले - खासकरून 'माणसं', 'प्रश्न आणि प्रश्न' या पुस्तकांमधले- लेख 'मौज', 'दीपावली', 'साप्ताहिक सकाळ' अशा दिवाळी अंकांमधून आलेले आहेत. तर, 'कोंडमारा', 'रिपोर्टिंगचे दिवस, यांसारख्या पुस्तकातले लेख 'मनोहर', 'साधना' अशा नियतकालिकांमधले आहेत. हमालांची परिस्थिती, विडी कामगारांच्या अडचणी, भटक्या विमुक्त समूहांच्या समस्या, तेंदूच्या पानांच्या उद्योगातले पेच, कचऱ्याची समस्या, दलित पँथरमधली फूट, दलितांवरील अत्याचारांच्या एक कॉलमी बातम्यांच्या त्या-त्या ठिकाणी जाऊन सखोल वेध घेणारे लेख- असे वेगवेगळे विषय या -पुस्तकांमधे आलेले आहेत. एखाद्या विषयावर लिहिताना त्याच्या शक्य तितक्या बाजू जाणून घेत, त्या-त्या लोकांना भेटून, त्या-त्या ठिकाणी जाऊन माणसांचं म्हणणं आणि आसपासचं वातावरण टिपण्याचा प्रयत्न या लेखांमधून दिसतो. या लेखनातून एक जगण्याची स्थिती आपल्या समोर उभी राहते.
हे सर्व खरोखरच फक्त 'सुस्त' वाचकांसाठी आहे, असं म्हणता येईल का? किंवा, प्रश्न थोडा अधिक नीट करायचा तर- या लेखनाचा परिणाम फक्त अशा सुस्त मानल्या जाणाऱ्या वाचकांपुरताच राहिला का? तर, तसं दिसत नाही.
उदाहरणार्थ, 'अँग्री पँथरची झुंज' हा अवचटांचा लेख साप्ताहिक मनोहरच्या १५ सप्टेंबर १९७४ रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. ('रिपोर्टिंगचे दिवस'मधे समाविष्ट). दलित पँथर फुटीच्या उंबरठ्यावर होती, तेव्हा त्यातल्या नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वि. पवार, आदी नेतेमंडळींना भेटून, बोलून लिहिलेला हा लेख. या लेखाच्या निमित्ताने २०१२ साली अवचटांनी नोंदवलेला एक तपशील असा: "या सगळ्या आंदोलनात शहीद झालेला एक तरुण म्हणजे भागवत जाधव. दंगलीनंतर निघालेल्या प्रचंड मोर्चात माझ्या शेजारूनच तो चाललेला. बाजूच्या इमारतीवरून सिमेंटचा कोबा असलेला दगड आला तो थेट त्या भागवतच्या डोक्यावर. तो पडला. रक्तबंबाळ. त्या कोब्याची वाळू होऊन पसरून गेली. पोलिसांनी लाठ्या मारून आम्हाला तिथून दूर केले. पोलिसाची काठी किती लागते हे त्या दिवशी मी अनुभवले. भागवतला त्यांनी उचलून नेले. नंतर कळले, तो गेलाच. पुढे त्या दंगलींनंतर नेमलेल्या भस्मे कमिशनपुढे माझी साक्ष झाली. कमिशन रिपोर्टात या साक्षीचा अनेकदा उल्लेख आहे." १९७४च्या सुरुवातीला झालेल्या वरळी दंगलींचा हा संदर्भ आहे.
तर, हे सुस्त वाचकांसाठी केलेलं लिखाण आहे, असं म्हणता येईल? इथे केवळ एक दाखला दिला. विशिष्ट पद्धतीच्या पत्रकारी कामाचं दस्तावेज म्हणून असलेलं महत्त्व, त्याचे संबंधित विषयावरचे परिणाम, अशा काही बाजू यातून स्पष्ट होतील असं वाटतं. शिवाय, खुद्द दलित पँथरच्या नेतेमंडळींमधल्याही अनेकांनी अवचटांच्या या संदर्भातल्या कामाचा उल्लेख केलेला आहे. एका अर्थी, दलित पँथरच्या घडामोडींना समांतरपणे अवचटांनी केलेलं पत्रकारी लेखन महत्त्वाचं होतं. अर्जुन डांगळे यांनी अवचट गेल्यावर 'साधना साप्ताहिका'त (२२ फेब्रुवारी २०२२) लिहिलेल्या लेखातही यासंबंधीची दखल घेतल्याचं दिसतं. डांगळे लिहितात, "पत्रकाराच्या नात्याने एका व्यापक सामाजिक वर्तुळात तो निष्ठेने आपली लेखणी चालवीत राहिला. त्याने जे लेख लिहिले, जी पत्रकारिता केली, त्यामुळे उपेक्षितांच्या लढ्याला, आंदोलनाला नैतिक बळ मिळालेच; पण त्याने मांडलेल्या भीषण समाजवास्तवामुळे मध्यम वर्गातील प्रवृत्तीलादेखील पाझर फुटलेले आहेत." ही वाचक म्हणून अवचटांच्या लेखनावरची एक प्रतिक्रिया म्हणूनही गृहित धरता येईल असं वाटतं. भटक्या विमुक्त समूहांवर त्यांनी लिहिलेला लेख (अनिकेत- 'माणसं!' पुस्तकात समाविष्ट) वाचून लक्ष्मण माने त्यांना म्हणाले, "मी त्या जातीत जन्मलो, पण आमच्यात इतक्या जाती आहेत हे मलाही माहीत नव्हतं." अशी आठवण अवचटांनी 'माझ्या लिखाणाची गोष्ट'मधे (पान ५४) नोंदवली आहे. 'उपरा' हे मान्यांचं पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीच्या या घडामोडी आहेत. तर, इथेही एक वाचक-प्रतिक्रिया म्हणून ही पाहता येईल. किंवा, २७ मे १९७२ रोजी 'साधना'मध्ये प्रकाशित झालेल्या 'बावड्याचा बहिष्कार' या लेखावर अवचटांना मे. पुं. रेगे यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती, "जी घटना बातमीरूपात वाचत होतो ती तुझ्या लेखामुळे प्रत्यक्ष पाहता आली" (रिपोर्टिंगचे दिवस, समकालीन प्रकाशन- पान ११).
राजकीय कार्यकर्ता म्हणून डांगळे किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून माने किंवा तत्त्वज्ञानाचे शिक्षक-लेखक म्हणून रेगे यांची कामं वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. त्याबद्दल काही कमी-जास्त वेगळं नोंदवणं शक्य आहे. आणि त्यांनी अवचटांची प्रशंसा केली, एवढंच प्रमाणपत्र घ्यावं, म्हणून त्यांची विधानं इथे नोंदवलेली नाहीत. किंवा या मंडळींची मतं पटली किंवा नाही पटली, तरी इथल्या संदर्भात 'सुस्त वाचक' किंवा 'न-राजकीय वाचक' अशी विशेषणं त्यांना लागू करता येणं अवघड आहे. शिवाय, 'माणसं!' पुस्तकात आलेल्या हमालांवरच्या लेखाच्या एक हजार प्रती काढून विविध हमालांच्या समूहांमध्ये वाचन केल्यावर आलेला अनुभव अवचटांनी 'माझ्या लिखाणाची गोष्ट' या पुस्तकात नोंदवला आहे. त्यानुसार "धान्याच्या गुदामातला एक हमाल म्हणाला, 'हे मिरची गुदामातले हमाल- यांची गुदामं आमच्या शेजारी. आम्ही युनियन मीटिंगला बरोबर बसतो, पण यांचे एवढे हाल आहेत हे आम्हाला कळलं नाही." (पान ५०). अशा आणखीही प्रतिक्रिया आल्याचं अवचटांनी नोंदवलं आहेच. पण त्याशिवाय, आपल्याला भेटलेल्या लोकांपैकी कोणी अवचटांच्या पत्रकारी लेखनावर कोणती प्रतिक्रिया दिली, याचा धांडोळा ही नोंद लिहिणाऱ्याने स्वतःपुरता घेतला, तरी यातले अनेक लोक रूढार्थाने 'मौजे'ची मानली जाणारी पुस्तकं वाचणारे होतेच असं नाही. एका माणसाच्या अशा आकडेवारीला फारसा ठोसपणा येणार नाही म्हणून या परिच्छेदात तीन वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. त्यांच्या लेखनावरच्या प्रतिक्रिया नि परिणाम सुस्त किंवा न-राजकीय (!) अवकाशातच उमटले का, यासाठीची उदाहरणं शोधायचा हा प्रयत्न होता. या उदाहरणांमध्ये अर्थातच भर घालता येईल. नोव्हेंबर १९७७मध्ये त्यांनी त्या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेल्या पु. भा. भावे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवर आधारीत त्यांचा लेख २० नोव्हेंबर १९७७ रोजी 'मनोहर' साप्ताहिकात प्रकाशित झाला ('रिपोर्टिंगचे दिवस'मध्ये समाविष्ट). या मुलाखतीत भाव्यांनी जात, वंश, धर्म इत्यादींपासून नथुराम गोडसे इत्यादी विविध मुद्द्यांवर मांडलेली मतं वादग्रस्त ठरली. त्याचे पडसाद साहित्य संमेलनाच्या मंडपात उमटले नि संमेलन उधळलं गेलं. या लेखनावरच्या इथल्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आणि लेखनाचे परिणाम पाहिल्यावर आपलं काय मत होतं ते आता वाचकांनी ठरवावं.
असाच दाखला म्हणून नोंदीच्या सुरुवातीला आलेल्या डॉ. बावस्करांच्या विधानांकडेही पाहता येईल, पण त्यांची ही विधानं आणखीही काही सूचित करतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं काम त्याच्या क्षेत्रात जगातल्या इतर देशांमध्ये नावाजलं गेलं, तरी आपली प्रसारमाध्यमं ते सहजपणे खुद्द इथल्या वाचकांपर्यंत पोचवू शकली नाहीत (नंतर त्या व्यक्तीचं वेगवेगळ्या स्वरूपाचं सार्वजनिक व्यक्तिमत्व झालं, त्यानंतर मुख्यप्रवाही प्रसारमाध्यमांनीही प्रकाशात कॅमेरे लावले, ते झालं). पण पत्रकार म्हणून अनिल अवचटांनी लेख लिहिल्यावर मात्र ते काम इथे- म्हणजे मराठीतल्या सुस्त, बेशिस्त, किंवा सक्रिय, शिस्तीतल्या अशा सगळ्याच वाचकांपर्यंत- काही प्रमाणात पोचण्याची शक्यता निर्माण झाली. हेच अवचटांच्या इतर पत्रकारी लेखनाला लागू होतं, असं वाटतं. हमाल, विडी कामगार, भटके विमुक्त, आदी समुदायांवरचे 'माणसं' पुस्तकात आलेले लेख अशा काही शक्यता निर्माण करतात. त्यातला आशय वेगळा आहे. पण सर्वसाधारणतः प्रसारमाध्यमांचा प्रकाश पोचत नाही, अशा ठिकाणी जाऊन कॅमेरा लावण्याचा प्रयत्न अवचट करतात आणि मे. पुं. रेगे म्हणतात तसं तो अवकाश प्रत्यक्ष वाचकासमोर येण्याची एक शक्यता त्यातून निर्माण होते. त्यामुळे बातमीच्या तात्पुरतेपणापलीकडे जाणारं, तरीही भावूकपणा न करता समोरच्या लोकांचं म्हणणं नोंदवत जाणारं लेखन अवचट करतात. तेही नेहमीच्या बोलण्याच्या शैलीत लिहितात. आपल्या काही रचनांचं कामकाज कसं चालतं, याचं एक दस्तावेजीकरण अवचटांच्या या लेखनातून झालेलं आहे.
गो. पु. देशपांड्यांच्या विधानांमधून आलेला आरोप अवचटांच्या लेखनावर इतरही ठिकाणी ऐकायला मिळाला होता. पण तो बराचसा साचेबद्ध असल्याचं वाटतं. अवचटांचं लेखन वाचल्यावर, तुम्ही समजा मार्क्सवादी असाल तर, या रचनेबद्दल काहीएक अर्थ लावू शकता की नाही? वाचकाने सुस्त न राहता असे अर्थ लावायचा प्रयत्न करायचा की नाही? त्यासाठी वाचकाला आपापलं राजकीय भान वापरता येऊ शकतं असं वाटतं. देशपांड्यांनी अवचटांचं नाव घेतलेलं नाही, पण अवचटांचं पत्रकारी लेखन ज्या स्वरूपाचं आहे, त्यावर कोणी 'राजकीय तत्त्वज्ञाना'चा शिक्का लावल्याचं ही नोंद लिहिणाऱ्याला अजून वाचायला मिळालेलं नाही. पण समजा, देशपांडे म्हणतात तसं कदाचित त्या वेळी झालं असेल असं मानलं, तरी त्यावरून लेखन करणाऱ्यावर इतके हेत्वारोप करणं फिजूल वाटतं. अवचटांनी त्यांच्या परीने पत्रकारी स्वरूपाचं लेखन केलं, त्याउपर त्यांनी त्याबद्दल 'साहित्या'चे किंवा 'तत्त्वज्ञाना'चे दावे केले नाहीत. मग आपण साहित्य किंवा तत्त्वज्ञान असे शब्द वापरून त्यांच्या लेखनावर शेरे मारून काय उपयोग! त्यापेक्षा ते लेखन जसं आहे त्या स्वरूपात त्याबद्दल काही बरं-वाईट बोलणं ठीक वाटतं. तसा प्रयत्न अवचटांच्या पत्रकारी लेखनाबद्दल वरती केला. हे झाले 'पत्रकार अवचट'.
- पण ''ललित' अवचट' अशीही एक बाजू त्यांच्या लेखनाला आहे. ती मात्र बऱ्याच ठिकाणी खटकते. त्यांनी स्वतःच्या लेखनाबद्दल लिहिलेला एक उतारा वरती दिला, त्यात त्यांनी 'मोर', इत्यादी पुस्तकांचे उल्लेख केलेत. त्याला धरून आता पुन्हा त्यांचे दोन उतारे नोंदवूया:
स्वतःच्या लेखनाविषयी अवचट म्हणतात:
"विषय दिसले तसा मी लिहीत गेलो. विषयाला सोईचा होईल तसा फॉर्म आपोआप मिळत गेला. तसा मी फार काही पक्क्या विचारांचा, तत्त्वनिष्ठ वगैरे माणूस नव्हे. एकूण काम ढिसाळ. कशात शिस्त नाही. पण काही बाबतींत मात्र मी फार हट्टी होतो. अजूनही आहे. संपादकाने मला विषय सांगितलाय आणि मी लेख लिहिलाय असं कधी झालं नाही. संपादकाने मला विषय सुचवायचा नाही. ते मी ठरवणार."
(माझ्या लिखाणाची गोष्ट, पान २६)
पण चार पानं उलटल्यावर तेच असंही लिहितात:
"राम पटवर्धन सत्यकथेचे संपादक. त्यांच्याशी भेटीगाठी, गप्पा चालू असायच्या. एकदा गप्पांच्या ओघात मी त्यांना मूर्तिजापूरला पाहिलेल्या मोराची गमतीदार हकिगत सांगत होतो. तर ते हट्ट धरून बसले की यावर तुम्ही लिहाच. पुण्याला आलो तरी पत्रांचा सपाटा. तोवर मी मोठमोठ्या सामाजिक समूहांवर लिहीत होतो. असं हलकंफुलकं कसं लिहिता येणार, असा प्रश्न मला पडला. पण इतका मोठा माणूस आग्रह धरतोय म्हटल्यावर लिहून बघावं असा विचार केला. शिवाय इथे कथा-कादंबरीसारखं माध्यमांतर नव्हतं. जे दिसलं ते लिहायचं, हेच सूत्र इथेही होतं. फक्त त्याला जोड होती जे वाटलं त्याची."
(माझ्या लिखाणाची गोष्ट- पान ३०)
म्हणजे एकीकडे, संपादकाने विषय सुचवायचा नाही, असा हट्टीपणा करणारे अवचट इथे मात्र सत्यकथा/मौज परिवारातल्या संपादकाच्या हट्टानुसार लिहिताना दिसतात. या दोन लेखनांमधला फरक त्यांनी नोंदवलाय तोच आहे- पहिल्या प्रकारच्या- पत्रकारी लेखनात अवचट कॅमेऱ्यामागचा माणूस आहेत, तर या 'हलक्याफुलक्या' लेखनात मात्र ते कॅमेऱ्यापुढे येतात. इथे अनेक वेळा तोच-तोचपणा येतो. उदाहरणार्थ, 'मोर' (मौज प्रकाशन, दुसरी आवृत्ती १९९८) या पुस्तकात संकलित झालेल्या काही लेखांची शेवटची वाक्यं पाहता येतील. ही वाक्यं जशीच्या तशी इथे नोंदवली आहेत, फक्त जाड ठसा रेघेचा:
मौज प्रकाशन, मुखपृष्ठ- सुभाष अवचट |
मूर्तिजापूरला दिसलेल्या मोरावरचा चार पानी लेख असा संपतो: "मनात म्हटलं: झोपतो कसचा? 'सौंदर्या'चा जबरदस्त अनुभव घेत होतो!" (पान ४)
अवचटांचं बालपण जिथे गेलं त्या ओतूर गावच्या नदीचा अनुभव नोंदवणारा सात पानी लेख असा संपतो: "मनात आलं: खरी नदी आता विसरायची. आता आपलं नातं या चित्रातल्या नदीशी!" (पान ५९)
पुण्यात एस.टी. स्टँडवर एक लहान बहीण-भावाची जोडी भेटते, त्यांचं निरागस बोलणं नोंदवून झाल्यावर मग त्यांच्या बोलण्यात काही जातीय उल्लेख येतात, त्यानुसार मग हा पाच पानी लेख असा संपतो: "मनात आलं: इतकं निरागस बालपण, पण केवढं मोठं ग्रहण लागलेलं!" (पान ७८)
ओतूरच्या पार्श्वभूमीवर एस.टी. प्रवासाचे अनुभव नोंदवणारा सहा-सात पानी लेख असा संपतो: "मनात आलं: चला, सुधारलं आपलं गाव! (पान ८५)
अवचटांची पत्नी डॉ. सुनंदा यांच्याकडे पेशन्ट म्हणून आलेल्या एका बाईच्या नवऱ्याचा अनुभव नोंदवणारा एक तीन पानी लेख याच पुस्तकात आहे. स्वतः अवचट घरची कामं करायचे, पत्नी सुनंदा डॉक्टरकीचा व्यवसाय करत होत्या. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात कौतुक ऐकायला मिळायचं. पण इथे पेशन्ट म्हणून आलेल्या बाईच्या नवऱ्याने त्याहून बरंच काही केलेलं असतं, असं लेखातून आपल्याला कळतं. आणि लेखाशेवटी अवचट लिहितात: "मनात आलं: मी कसला समजूतदार नवरा? ह्या माणसाचे खरं तर मी पायच धरले पाहिजेत. (पान १०८)
एका चाहत्यासंबंधीचा (हा अवचटांच्या लेखनाचा चाहता असतो, पण त्याची राजकीय-सामाजिक मतं मात्र त्यांच्याहून दुसऱ्या टोकाची असतात) अनुभव नोंदवणारा लेख असा संपतो: "स्कूटरवर बसल्यावर मनात आलं: आपण आपली पुस्तकं एकदा नव्यानं वाचायला पाहिजेत!" (पान ११९)
वीज नसतानाच्या काळातले अनुभव, तेव्हा गावी बत्ती वापरण्याचा अनुभव, वगैरे नोंदवणारा लेख असा संपतो: "मनात आलं: तेव्हा मी बत्ती पाहत होतो; आता तिच्या खालचं दिसू लागलं आहे!" (पान १३४)
त्यानंतर लगेच येणारा अंधाराविषयीचा लेख असा संपतो: "मनात आलं: या अंधाराची मजा काही औरच आहे!" (पान १३७)
हे वारंवार मनात येणारं जे काही आहे ते तरी काही नवीन आहे का? कोणी कलाकार आपापल्या माध्यमातून आयुष्यभर एखादी गच्च गाठ सोडवू पाहतो, तशी ही पुनरावृत्ती नाही. इथे अवचटांच्या लेखनात दिसतोय तो शैलीचा साचा आहे आणि तशीच साचेबद्ध काही टिप्पणी आहे. किंवा अधेमधे ढोबळ सामाजिक कणव दाखवणारी वाक्यं आहेत. मराठीत 'ललित लेखन' ही एक सुस्त कॅटेगरी दिसते. ललित म्हणजेच 'हलकंफुलकं', 'सुलभ', इत्यादी. त्यात काहीही घुसवलेलं असतं. कथा-कादंबऱ्या असं कल्पित साहित्य (फिक्शन) याच 'ललित' प्रकारचं मानलं जातं. (का? ते सोपं असतं?). शिवाय, आपल्या ओळखीतल्या माणसांवर लिहिलेले लेख, आठवणी, असं सगळंच त्यात बसवतात. तर, अवचटांचं हे अशा पद्धतीचं दिवाळी अंकांमधलं लेखन या 'ललित' प्रकारात बसवलं जातं. पुस्तकांच्या दुकानात त्या कॅटेगरीखाली ही पुस्तकं दिसतात. एकीकडे पत्रकार म्हणून आपल्या वातावरणातल्या विविध रचना पाहून, त्यांतले सूक्ष्म आडवे-उभे धागे नोंदवून लिहिणारा माणूस अशा 'ललित' लेखनात- म्हणजे स्वतः कॅमेऱ्यासमोर आल्यावर मात्र साच्यांचा वारंवार वापर करतो. असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. पण 'स्वतःविषयी' (हे त्यांच्या एका पुस्तकाचं नाव) असा विषय ठरवला तरी त्यातलं खोदकाम खूप अवघडच असतं, ललित पातळीवरचं नसतं, हे बहुधा इथे पुरेसं समजून घेतलं गेलं नसावं. त्यामुळे मग काहीएक ढोबळ सामाजिक कणव, थोडंसं हलकंफुलकं सौंदर्य, जुनं-नवं यातले सोपे भेद, अशी काही 'मनात आलेली' वरवरची मतं तेवढी वाचकांसमोर येतात. कदाचित हे लेखन सुस्त करणारं मानता येईल. कधीही जाग आली की 'सामाजिक भान' नावाची गोष्ट आधी शोधल्यासारखं ते होतं. त्याचाही पुरेसा खोलातला विचार होत नाही. अधिक खोलवरच्या अंतर्विरोधांची फिकीरही करावी लागत नाही. एका अर्थी, 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी'चं ते वैयक्तिक पातळीवरचं रूप होण्याचीही शक्यता असते. खरंतर आताच्या काळात समाजमाध्यमांवरच्या लेखनाबाबतही हा मुद्दा लावून पाहता येईल. मराठीतल्या इतक्या वर्षांत रूढ झालेल्या 'ललित लेखन' कॅटेगरीप्रमाणे समाजमाध्यमांवरच्या लेखनातही सतत आपण कॅमेऱ्यासमोर आहोत ही जाणीव 'टांगत्या तलवारी'सारखी ठरू शकते, त्यातून शैलीचे काही साचे वापरले जाण्याचा, ढोबळ नैतिकतेचं प्रदर्शन करण्याचा धोका असतो. कॅमेऱ्यामागे गेलं, तर प्रोफाइल कोलमडू शकतं. कॅमेऱ्यासमोरचा साचेबद्धपणा किंवा 'ललित'पण जास्त चालत असावं.
अनिल अवचट गेले, त्याची आठवण म्हणून नोंद करावीशी वाटली. अवचटांनी केलेली पत्रकारिता मराठीत दुर्मिळ होती, असं वाटतं. मग त्यातले लेख कोणत्याही प्रकाशनाने काढले असले किंवा दिवाळी अंकांमधे आले असले, तरी त्या पत्रकारी लेखनाचा आशयघनपणा नाकारणं बरं वाटत नाही. शिवाय, 'साहित्य' किंवा 'राजकीय तत्त्वज्ञान' यासंबंधीच्या आपल्या अपेक्षा तिथे पुऱ्या होत नसतील, तर त्यांच्या लेखनाचं तसं वर्णन करू नये. तशी काही वर्णनाची सक्ती नाही. पण अवचटांचा जो पत्रकारी लेखनातला मजकूर समोर आहे, तो निव्वळ तात्पुरतं काहीतरी नोंदवणारा नाही. अवचटांच्या त्या पत्रकारी कॅमेऱ्याने काहीएक आपल्या अवकाशातली गुंतागुंत आपल्या समोर ठेवायचं काम केलंय, असं वाटतं.
पण त्याच अवचटांनी कॅमेऱ्यासमोर आल्यावर जे लिहिलं, ते कदाचित त्या-त्या वेळी किस्सा म्हणून वाचायला ठीक असेल कदाचित, पण त्यातला तोच-तोचपणा कंटाळवाणा वाटतो. आणि त्यात स्वतःचं मत म्हणून अवचट जे मांडतात, त्यात ढोबळपणाही येतो. पण एका अर्थी, यातूनच त्यांचं सार्वजनिक व्यक्तिमत्व किंवा प्रोफाइल अधिक ठसलं असेल का? या व्यक्तिमत्वामध्ये विविध छंद जोपासणं, सामाजिक कणव राखणं, स्वतःच्या मनाला रुचेल त्याचा पाठपुरावा करणं, भौतिक सुखाची आस न ठेवणं, अशा बाजू असल्याचं दिसतं. या सगळ्याचा पटकन दिसतो तो स्तर, सोप्या नुसत्या शब्दांत पकडता येतो तो स्तर- म्हणजे 'ललित' स्तर वातावरणात अधिक रुळतो. इथे वाचकाला अधिक गुंतागुंत पाहायची इच्छा नसली तरी चालतं. याला अर्थातच मराठीतल्या 'ललित' लेखन नावाच्या कॅटेगरीचा, 'दिवाळी अंक' या कॅटेगरीचा (म्हणजे प्रत्यक्ष असं लेखन दिवाळी अंकातच आलं असेल असं नाही, पण एकंदर उत्सवी माहोलात चालेल, रुचेल, 'ललित' फराळात बसेल असं लेखन) हातभार असावा. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर आलेले अवचट मात्र गुंतागुंतीला फाटा देणारे दिसतात.
अवचटांच्या एका पुस्तकाचं नाव 'कोंडमारा' असं आहे. अवचटांनी त्यांच्या सुरुवातीच्या पत्रकारी लेखनातून बहुतेकदा असा विविध अवकाशांचा कोंडमारा नोंदवायचं काम केलं. हा कोंडमारा मुख्यप्रवाही माध्यमांमधून प्रकाशात न आलेला होता. पण या 'कोंडमाऱ्या'पासून दूर जात एक सोपा 'आझाद पंछी' (त्यांनीच 'बाह्यरंग ते अंतरंग' या मथळ्याखालच्या मुलाखतीत स्वतःविषयी हा शब्दप्रयोग केला होता: पाहा.) असं त्यांचं सार्वजनिक व्यक्तिमत्वही त्यासोबत इतक्या काळानुसार उभं राहत गेलं. त्या ललित पातळीवरच्या आझादपणापेक्षा कोंडमाऱ्यातली गुंतागुंत दाखवणारे पत्रकार अवचट जास्त महत्त्वाचं काम करून गेले, असं वाटतं.
मौज प्रकाशन, २००४ । मुखपृष्ठ- सुभाष अवचट |
लेख आवडला...
ReplyDeleteअवचटांनी खरोखरच आपल्या पत्रकारी लिखाणातून अनेक नवी जगं वाचकांसमोर आणली. शब्दांचा बडेजाव न केल्यामुळे ती जगं त्यांच्या टेक्श्चरसकट वाचकांपर्यंत पोचली. त्यांच्या मायक्रोस्कोपच्या तळाला जी माणसं होती, त्यांनाही मायक्रोस्कोपला डोळा लावायची संधी अवचटांचं हे लेखन देऊ करत होतं. ऐंशी, नव्वदच्या दशकात ओशो पासून ते वाघमारे बुवापर्यंतच्या भोंदू लोकांची वस्तुस्थिती त्यांनी सहृदयतेनं उघडी केली. शोषणमुक्तीच्या राजकीय भूमिकेशिवाय त्यांनी असं लिहिणं, लिहीत राहणं चालू ठेवलं नसावं. त्यांच्यामुळे माझ्या पिढीला न्यायाधीशाची भूमिका न घेता, पण भक्कमपणे गुन्हेगाराला गुन्हेगार आणि बळीला बळी म्हणून अधोरेखत करणाऱ्या पत्रकार अवचटांचं लिखाण खूप आधार देऊन गेलं.
ReplyDeleteत्यांच्या ललित आणि पत्रकारी पद्धतीच्या लिखाणाचे सरळच दोन भाग दिसतात- आणि त्याबाबतची निरीक्षणं पटली. धन्यवाद.
सुरेख. आभार. या लेखानं विचारात पाडलं.
ReplyDelete