मुखपृष्ठ : राजू बाविस्कर । अक्षरलेखन : तेजस मोडक |
एक मुलगा असतो. उत्तर महाराष्ट्रात कुठेतरी तो राहत असल्याचं कळतं. कधी वडिलांच्या बदलीमुळे त्याच भागातल्या दुसऱ्या गावी त्याला जावं लागतं. कधी आजीकडे किंवा मावशीकडे अशा फेऱ्या असतात. अशात तो शाळेत जातो, मित्रांसोबत विहिरीवर जातो, काकासोबत घोरपड पकडतो, शेराच्या झाडाचा चिक डोळ्यात गेल्यावर घाबरतो, मोहोळ पकडण्याचं जवळपास व्यसन करून करून थकतो. कायमच सरड्यांना टिपण्याच्या मागे असतो. यामुळेच असं नाही, पण या सगळ्या घडामोडींमधे तो नापास होऊन जातो.
तर, हा मुलगा किंचित मोठा झालाय आणि स्वतःच्या शालेय वयातल्या काही आठवणी सांगतोय, अशा धाटणीचा हा कथासंग्रह आहे. पुस्तकाचं नाव: 'पिवळा पिवळा पाचोळा' (पपायरस प्रकाशन, पहिली आवृत्ती: ऑगस्ट २०२१). या कथा सांगणारा मुलगा सध्या काय करत असेल, याचा फारसा काही अंदाज त्यावरून येणार नाही. पण अनिल साबळे या लेखकाने दोनेक दशकांपूर्वी उत्तर महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये राहिलेल्या एका मुलाचे हे काही अनुभव लिहून ठेवलेत- एवढं आपण अंदाजाने पाहू शकतो. हे अनुभव बरेचदा करुण वाटतात. कधी मरू घातलेली घोरपड, कधी नवऱ्याने लोखंडी साखळीने मारलं त्या खुणेतच कुंकू भरणारी नि मूल नसल्यामुळे दुःखी झालेली म्हातारी बाई, ट्रक खाली येऊन मेलेला मछ्या, रानात एकट्या घरात राहणारे नि चोरांच्या हल्ल्यात सगळं गमवावं लागलेले म्हातारा-म्हातारी- अशांचे अनुभव वाचताना करुण वाटतं. असं का वाटतं? म्हणजे ही नोंद लिहिणाऱ्याला तसं का वाटलं, या प्रश्नाचं ठोस उत्तर शोधता आलेलं नाही.
साबळ्यांची भाषा अतिशय साधी आहे, वाक्यं छोटी आहेत, रोजच्या बोलण्यात कोणीतरी आठवणी सांगत असावं, स्वतः 'साहित्यिक' नसलेलं कोणीतरी हे सगळं बघितलंय नि आपल्याला सांगतंय- अशा स्वरूपाचं हे लेखन वाटतं. कारुण्य असलं तरी त्या कारुण्याशी संबंधित विशेषणं त्यात फारशी वापरलेली नाहीत. जवळपास प्रत्येक कथेच्या शेवटी एखादं ठरवल्यासारखं वाटणारं अलंकारिक वाक्य मात्र येतं- उदाहरणार्थ, 'माझ्या दोन्ही तळहातांच्या ओंजळीत दीड रुपयांची तीन नाणी घोरपडीच्या शेपटीसारखी वळवळत होती' (घोरपड), किंवा भिलहाटीतला मछ्या अपघातात मेल्यानंतर 'सगळे अंधारे रस्ते जणू मलाच विळखा घालत होते' असं निवेदकाला वाटतं (मछ्या), 'मछ्याचे ते शब्द माझ्या काळजात गलोलीच्या खड्यासारखे घुसून बसले' (हिरव्यागार चिकाळ शेरावर), 'त्याला फसवल्याचा डंख माझ्या मनात मधमाशीच्या काट्यासारखा सलत होता' (मोहोळ), 'आणि विष घालून मारलेल्या कुत्र्यांच्या हाडांचे सापळे तर भुतासारखे अंगावर दात विचकून येत होते' (एक घर एकटं). प्रत्येक कथेच्या शेवटी असं किंचित सरधोपट वाटणारं अलंकारिक वाक्य वाचलं, की थोडीशी शाळकरी निरागसता आठवत असावी. आणि ही निरागसता त्या-त्या कथेत कोणत्या कारुण्याला सामोरं जाते, त्याचं वर्णन बाकीच्या पानांमधे साध्या-छोट्या वाक्यांमधून येतं. या बाकीच्या वाक्यांमधे मात्र अलंकारिकपणा जवळपास नाहीच.
साबळ्यांच्या या गोष्टींमधून भेटणारा निसर्ग एकदम सलगीतला आहे. घोरपडीचं मटण खाण्यासाठीची खटपट करणारा मुलगा स्वतः या निसर्गात राहत असल्यामुळे तो कधी निसर्गाशी क्रूरपणे वागतो, कधी निसर्गातला कोणतातरी घटक- उदाहरणार्थ, मधमाशी- त्याला फटकावतो. अशी त्यांची अगदी जनरल जगण्यात होते तशी देवाणघेवाण यात आहे. शेराच्या झाडाचा चिक डोळ्यात गेला तर काय होतं, सात सरडे मारले तर काय मिळतं, गळ टाकून मासे पकडण्याचं कौशल्य काय आहे, अशा तपशिलांच्या भोवतीचा अवकाश साबळे सविस्तरपणे सांगत राहतात. निसर्गाविषयीचा काहीच रोमॅन्टिक भाव त्यात नाहीये. घराची भिंत असते, तसा हा घराशेजारचा निसर्ग नेहमीच्या साध्या-छोट्या वाक्यांमधून येतो. या निसर्गाचे अचंबित व्हावं इतके सूक्ष्म तपशील निवेदक आपल्याला सांगतो. त्याने सगळं हे रोजच अनुभवलेलं असल्यामुळे ते वेळोवेळी वेगवेगळ्या कथेतून तपशिलात समोर येतं. किंबहुना बऱ्याच कथांचा बराचसा अवकाश हा निवेदकाच्या निसर्गाशी असलेल्या देवाणघेवाणीच्या नात्यानेच भरलेला आहे. याच निसर्गात बाकीची माणसं म्हणजे पात्रं येतात, आणि बाभळी, मोहोळ, शेराचं झाड, सरडे, घोरपड, हेही तितक्याच ठळकपणे येतात. पुस्तकाची अर्पणपत्रिका अशी आहे पाहा: "तिंगावमधल्या जिवलग मित्रांना : ज्यांच्यामुळेच मला शाळेच्या दगडी भिंती ओलांडून दूर दूरच्या रानात हिंडता आलं..." त्या रानात हिंडण्याचा किती फायदा झाला, हे इथे या कथांमधल्या निसर्गाच्या सूक्ष्म-सुंदर वर्णनांवरून लक्षात येतं. त्या वेळी असं हिंडल्यामुळे बहुधा लेखकाला निसर्गाशी इतकी सलगी असलेला निवेदक उभा करता आला असावा.
आठवणी नोंदवल्यासारख्या या कथा असल्या तरी त्यात 'स्मरणरंजन' नाही. या सगळ्या निसर्गापासून, त्यातल्या पात्रांपासून निवेदक वयाने दूर गेला असला तरी प्रत्यक्षात फारसा दूर गेलेला नसावा, असं कथा वाचताना वाटतं. त्यामुळे काहीतरी लांबचं स्मरण आणि त्यातून रंजन, असं तर जाणवत नाही. आता वर्तमानात तो निवेदक भौतिक अर्थाने या सगळ्या अवकाशापासून लांब आहे, असं सुचवणाऱ्या खुणा या कथांमध्ये दिसल्या नाहीत. किंबहुना निवेदकाच्या वर्तमानाचा काहीच उल्लेख त्यात नाही. भौतिक अवकाश तर अर्थात बदलतच असतो, शिवाय माणसाचं वयही वाढत असतं. त्यामुळे हा वय वाढत पुढे आलेला कोणीतरी माणूस बोलतोय, एवढं ओघाने कळतं. आणि घडून गेलेल्या काळातलं काहीतरी कथेतून सांगितलेलं असल्यामुळे ते स्वाभाविक अंतर कथांच्या आशयात आणि निवेदकात आहे. पण निवेदक मात्र खुद्द आत्ताच आहे, कदाचित आपल्याला असाच भेटलाय आणि बोलता-बोलता बोलत गेलाय, असं कथांचं स्वरूप असल्यामुळे आपणही वर्तमानात आपल्या समोर असणाऱ्या माणसाच्या मनात साचलेलं काहीतरी ऐकल्यासारखं वाटतं. थोडक्यात 'आपण आता त्यात नाही, पण ते सुंदर होतं' असा स्मरणरंजनाचा नकारात्मक अर्थ असेल, तर तो या कथांमध्ये जाणवला नाही. थोडं साचेबद्ध उदाहरण द्यायचं तर- 'गाव सोडून शहरात आल्यावर गावाचे अनुभव' हा एक स्मरणरंजनाचा दाखला असू शकतो. तसं या गोष्टींमधे नाही. अशा पद्धतीचं अंतर निवेदकाने राखलेलं नाही.
पुस्तकातल्या कथांमधली भाषा बोलाचालीतली, पण प्रमाण मानली जाणारी मराठी आहे, कथा ज्या प्रदेशात घडतात तिथली खानदेशी किंवा आसपासची बोली यात जवळपास नाहीच. लेखकाने बहुधा जाणीवपूर्वक संवादही प्रमाण मराठीत लिहिण्याचा निर्णय घेतला असावा. त्यावर आक्षेप घेण्यासारखं काही नाही. इतर सूक्ष्म तपशील इतक्या खुबीने नोंदवणाऱ्या लेखकाला त्या प्रदेशातली भाषाही सहजपणे येत असेलच, पण गोष्ट सांगण्यासाठी त्याने भाषेची ही निवड केलेली आहे. तसेही फारसे संवाद या कथांमध्ये नाहीत. काही उद्गार किंवा छोटी संभाषणं आली, तरी ती परिच्छेदातच सहजपणे, ओघामध्ये नोंदवलेली आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे समोर बसून निवेदक आठवणी सांगतोय, त्यात तो खास पुन्हा स्थानिक बोलीचा वापर न करता बोलतोय, असं मानता येतं. पण तरी, क्वचित एखाद्या कथेत एखादंच पात्र- 'रडतो काहाला? आपण तुह्या डोळ्यात शेरडाचं दूध टाकू. त्यानं अख्खी घाण निघून जाईल' (हिरव्यागार चिकाळ शेरावर) असं बोलतं, तरीही त्याचीच समवयीन, त्याच्याच आसपासची इतर पात्रं मात्र त्या अवकाशातल्या या रूढ बोलीचा वापर करताना दिसत नाहीत, त्यांचे उद्गार समोर आले तर ते प्रमाण मराठीत (पुस्तकी असं नाही, बोलण्यात येणारीच मराठी) येतात. हे खूप खटकणारं आहे असं नाही. तरीही, कदाचित असे सर्वच उद्गार त्या प्रदेशातल्या बोलीत चालले असते, किंवा मग बहुतेक ठिकाणी ठेवलेत तसे कथनाच्या ओघातल्या भाषेत ठेवता आले असते, असं वाटलं.
चित्र- अजित अभंग, कथा- 'एक घर एकटं' |
भाऊ पाध्यांचं 'वासूनाका' हे पुस्तक आता कादंबरी म्हणून ओळखलं जातं. पण मुळात त्यातल्या (किमान काही) कथा १९६०च्या दशकारंभी वेगवेगळ्या अंकांमधे प्रकाशित झालेल्या होत्या. त्या पुस्तकात छापतानाही पुढे-मागे आहेत. पहिल्या- 'इष्क' या- कथेत मामू नावाचं पात्र वेडं होतं, पण पुस्तकात त्यानंतर येणाऱ्या कथांमध्ये ते पात्र 'नॉर्मल' आहे. म्हणजे एका अर्थी, हा कथांचा संग्रह होता, पण पुस्तक रूपात ते लेखन कादंबरी म्हणून ओळखलं गेलं. त्या पुस्तकाबद्दल बोलून-बोलून अशी ओळख पक्की होत असावी. असंच एक उदाहरण साबळ्यांच्या पुस्तकातही आहे. एका कथेतला, नेहमीच्या जगण्याच्या पातळीवर तल्लख असणारा 'मछ्या' अपघातात मरण पावतो ('मी मात्र रोज शाळेत येताजाता पोलीस स्टेशनच्या छतावर पडलेली मछ्याची सायकल आणि त्याचं पिवळंधम्मक दप्तर लांबूनच पहात असायचो,' असं निवेदक म्हणतो), पण पुस्तकात त्यानंतर येणाऱ्या कथेत मछ्याचा प्रत्यक्ष वावर आहे. एकंदरितही पुस्तकातली पात्रं, पार्श्वभूमी, इतर अवकाश, त्यांचा परिणाम यात एकसंधपणा जाणवला. पुस्तकातल्या कथांच्या पूर्वप्रसिद्धीचा तपशील दिलेला नसल्यामुळे वेगळं ताडून पाहता आलं नाही. सध्या तरी या पुस्तकाची ओळख 'कथासंग्रह' अशी नोंदवलेली दिसते. त्यावर बोललं जात राहिलं, तर कदाचित ही ओळखही बदलेल का, याबद्दल भाकित करण्याइतकी उमेद आपल्याकडच्या वातावरणात वाटत नाही. पण साबळ्यांचं हे पुस्तक वाचल्यावर वाचक म्हणून थोडं नोंदवावंसं वाटलं, तेवढा प्रयत्न केला. तुम्हाला पुस्तक विकत घ्यावं वाटलं तर, पुढच्या लिंकवरून मागवता येतं: पपायरस प्रकाशन.
चित्र- अजित अभंग, कथा- 'मछ्या' |
No comments:
Post a Comment