Wednesday, 6 December 2023

पहिलं आंबेडकरचरित्र गुजरातीत; आता इंग्रजीतही उपलब्ध होणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त / स्मृतिदिनानिमित्त ही बातमीपुरती नोंद आहे. मराठीत याबद्दल कुठे नोंद झाल्याचं आपल्या मर्यादित वाचनात अजून आलेलं नाही म्हणून. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक चरित्रं अनेक भाषांमध्ये लिहिली गेल्याचं दिसतं. त्यांच्याविषयी अधिक तपशीलवार आणि चिकित्सक असंही लेखन अलीकडच्या काळात दिसतं. पण पहिल्या चरित्राचं काहीएक महत्त्व मानलं जातं. आत्तापर्यंत तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी लिहिलेलं 'डॉ. आंबेडकर' हे चरित्र पहिलं मानलं जात होतं. या पुस्तकाचं प्रकाशन पहिल्यांदा १९४६ साली कराचीमधून झालं होतं. मूळचे राजापुरातील खरावते या गावचे असणारे खरावतेकर त्या वेळी कराचीत राहत होते. त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी, १९४३ साली हे पुस्तक लिहिलं, पण दुसऱ्या महायुद्धादरम्यान कागदाची टंचाई निर्माण झाली आणि पुस्तक प्रकाशित होण्याचं लांबलं. शेवटी १९४६ साली पुस्तक बाहेर आलं. त्यात काही मजकूरही कमी करावा लागला, असं खरावतेकरांनी प्रस्तावनेत नोंदवलं आहे. "व्यंकट शबा. ठाकूर, रविकिरण छापखाना, असायलम रोड, रणछोड लाईन्स, कराची-१" असा २१ मार्च १९४६ रोजी प्रकाशित झालेल्या या आवृत्तीवरचा प्रकाशकाचा पत्ता होता. रमाकांत यादव यांनी २०१० साली त्याची नवीन आवृत्ती काढली. त्यानंतर या सुमारे साठेक पानी अल्पचरित्राच्या आवृत्त्या लोकवाङ्मय गृह, ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन, आणि इतरही काही प्रकाशकांनी काढलेल्या दिसतात.

याशिवाय, रामचंद्र बनौधा यांनी हिंदीत लिहिलेलं 'डॉ. आंबेडकर का जीवनसंघर्ष' (१९४७), चांगदेवराव भवानराव खैरमोडे यांच्या मराठी बहुखंडी आंबेडकरचरित्रातला पहिला खंड (१९५२), धनंजय कीर यांनी मुळात इंग्रजीतून लिहिलेलं मोठं चरित्र (१९५४) आदींचे उल्लेख क्वचित 'आद्यचरित्र' म्हणून होत आल्याचं दिसतं. ही पुस्तकं आंबेडकरांच्या हयातीत प्रकाशित झालेली होती. पण या यादीत उल्लेख न होणारं आणि खऱ्या अर्थाने 'पहिलं' ठरेल असं एक आंबेडकरचरित्र गुजरातीत प्रकाशित झालं होतं, अशी माहिती अभ्यासक-संशोधक विजय सुरवाडे यांच्याकडून मिळाली. डॉ. आंबेडकरांच्या जीवन-कार्याविषयी कागदपत्रं, पुस्तकं, छायाचित्रं यांचा प्रचंड संग्रह सुरवाडे अनेक वर्षं कष्टपूर्वक गोळा करत आले आहेत आणि अनेकांना तो मोकळेपणाने उपलब्धही करून देत आले आहेत.

विजय सुरवाडे

गुजरातीमधील हे अल्पचरित्र यू. एम. सोलंकी यांनी लिहिलं होतं आणि ते १९४० साली- म्हणजे वर उल्लेख आलेल्या चरित्रांच्याही आधी- प्रकाशित झालं होतं. या अल्पचरित्राचं नाव 'जीवनचरित्र: डॉ. बी. आर. आंबेडकर एस्क्वायर' असं होतं. सुरवाडे यांनी फोनवरून दिलेली अधिकची माहिती अशी:

"अहमदाबादचे डॉ. पी. जी. ज्योतीकर यांची नि माझी चाळीस-पंचेचाळीस वर्षांची ओळख होती. पण आमची प्रत्यक्ष भेट १९८०-८२दरम्यान झाली. त्या काळी मी ऑडिटच्या कामासाठी अहमदाबादला जात होतो. आधी आमची पत्रव्यवहारातून ओळख होती. ज्योतीकर यांचे मोठे भाऊ शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे पदाधिकारी होते [डॉ. आंबेडकरांनी १९४२ साली शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन हा पक्ष स्थापन केला होता. हा पक्ष बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असा नवीन पक्ष स्थापन केला जाईल, अशी घोषणा त्यांनी सप्टेंबर १९५६मध्ये केली, पण हा निर्णय अंमलात यायच्या आधी, ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचं निधन झालं]. तर, अशी आमची ओळख होती आणि भेट झाल्यावर त्यांच्या घरी मला इतर कागदपत्रं बघायला मिळआली. खुद्द बाबासाहेब कधी त्यांच्या घरी जाण्याची वेळी आली नसली, तरी भय्यासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, अशी इतर अनेक नेतेमंडळी त्यांच्या घरी गेली होती, हे मला कळलं. तिथली कागदपत्रं बघत असताना मला यू. एम. सोलंकी यांनी लिहिलेलं आंबेडकरांचं अल्पचरित्र दिसलं. त्यानंतरच्या काळात मी त्याची फोटोकॉपी करून घेतली. अलीकडे कोरोनामुळे डॉ. ज्योतीकरांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा मुलगा अमित ज्योतीकर यांना मी या चरित्राची दुसरी आवृत्ती काढण्याविषयी सुचवलं. पण दरम्यान त्यांच्या घरातली पुस्तकाची मूळ प्रत गहाळ झाली होती. मग त्यांना माझ्याकडची फोटोकॉपी दुसऱ्या आवृत्तीच्या तयारीसाठी उपयोगी पडली. (सध्या उपलब्ध माहितीनुसार) हे आंबेडकरांचं पहिलं चरित्र असल्यामुळे त्याचं वेगळं महत्त्व आहे, तर ते इतर भाषेतल्या लोकांपर्यंत पोचावं म्हणून त्याचं इंग्रजी भाषांतरही नवीन आवृत्तीत छापावं, असं मी त्यांना सुचवलं; आणि त्यांनी ही सूचना अंमलात आणली. आता बाबासाहेबांच्या या पहिल्या चरित्राची गुजरातीमधील नवीन आवृत्ती आणि त्यातच सोबत इंग्रजी भाषांतर- असं लोकांसमोर येणार आहे."

१९४० साली प्रकाशित झालेल्या पहिल्या आंबेडकरचरित्राचं मुखपृष्ठ
विजय सुरवाडे यांच्या संग्रहातून

१९४० साली प्रकाशित झालेल्या पहिल्या आंबेडकरचरित्राचं मलपृष्ठ
विजय सुरवाडे यांच्या संग्रहातून

सुरवाडे यांच्याकडील फोटोकॉपी केलेल्या प्रतीच्या आवरणाचे फोटो वरती चिकटवले आहेत. त्यात पुस्तकाचं नाव- 'जीवन चरित्र : डॉ. बी. आर. आंबेडकर, एस्क्वाइअर', लेखकाचं नाव व पत्ता- 'यू. एम. सोलंकी, अहमदाबाद ', प्रकाशकाचं नाव व पत्ता- 'महागुजरात दलित नवयुवक मंडळ, दर्यापूर, अहमदाबाद', त्या आवृत्तीच्या '१०००' प्रती छापल्याचा तपशील, प्रकाशन वर्ष- '१९४०', इत्यादी मजकूर दिसतो. शिवाय पुस्तकाची किंमत नोंदवताना 'मूल्य - अमूल्य' असं छापल्याचं दिसतं.

या अल्पचरित्राची गुजराती संहितेसह इंग्रजी भाषांतर असलेली आवृत्ती १५ डिसेंबरला अहमदाबादला प्रकाशित होणार असल्याचंही कळलं. त्याचं मुखपृष्ठ असं:

नवीन आवृत्तीचं मुखपृष्ठ

सध्या प्रकाशकांकडून सुरवाडे यांच्यापर्यंत आलेल्या या नवीन आवृत्तीच्या मुखपृष्ठावर 'भाषांतकार-संपादक-संकलक' यांचं नाव दिसतंय, पण मूळ लेखक यू. एम. सोलंकी यांचं नाव दिसत नाही. प्रकाशनकार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर पुस्तकाच्या तपशिलासोबत सोलंकी यांचं नाव आहे, पुस्तकाच्या छापील प्रतीवर ते येईल, अशी आशा. सोलंकी यांच्याविषयी अधिक माहिती सदर नोंद लिहिणाऱ्याला शोधूनही सापडू शकली नाही. पण मूळ चरित्र साधारण साठ पानी होतं, असं एका गुजराती लेखातून कळलं. आता हे डॉ. आंबेडकरांचं (सध्याच्या माहितीनुसार) पहिलं चरित्र इंग्रजीत येतंय, त्यानंतर कदाचित या पुस्तकातल्या आशयाविषयी नि मूळ लेखकाविषयी अधिक माहिती इतर भाषकांसह मराठी वाचकांपर्यंतही येईल, आणि आद्य आंबेडकरचरित्रांच्या यादीत या पुस्तकाची नोंद होईल.

No comments:

Post a Comment