Monday, 22 July 2024

राम-रुकुनची पुस्तकी कहाणी

जगरनॉट, जानेवारी २०२४ । आवरण रचना: भावी मेहता

इतिहासकार रामचंद्र गुहा यांचं 'द कुकिंग ऑफ बुक्स: अ लिटररी मेम्वार' (जगरनॉट, जानेवारी २०२४) हे  पुस्तक अलीकडे बाजारात आलं. सुमारे चाळीस वर्षं गुहांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या लेखनावरून संपादकीय नजर आणि हात फिरवलेले रुकुन अडवाणी (आणि त्यांच्यासोबत झालेले गुहांचे संवाद-वाद) या पुस्तकात केंद्रस्थानी आहेत.

रामचंद्र गुहा हे त्यांच्या गांधीचरित्रासह इतर पुस्तकांमुळे, विविध प्रसारमाध्यमांमधे येणाऱ्या मुलाखतींमुळे, स्तंभलेखनामुळे चांगल्यापैकी प्रसिद्ध आहेत. त्या तुलनेत रुकुन अडवाणी अजिबातच प्रसिद्ध नाहीत.  दीर्घ काळ 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस'च्या दिल्लीतील भारतीय शाखेत काम केलेल्या रुकुन यांनी कालांतराने, पत्नी लेखिका-संपादिका अनुराधा रॉय यांच्यासोबत 'परमनन्ट ब्लॅक' ही स्वतःची प्रकाशनसंस्था सुरू केली. त्यांनी त्यांचा बाडबिस्तारा उत्तराखंडमधील रानीखेत इथे हलवला आणि तिथूनच 'परमनन्ट ब्लॅक'चं संपादकीय काम आजही चालतं.

गुहांनीच म्हटल्याप्रमाणे, त्यांचा स्वतःचा स्वभाव माणसांची संगत हवीशी वाटणारा, बहिर्मुख, प्रवासाची आवड असणारा; तर, रुकुन  यांचा स्वभाव मात्र एकांतप्रिय, अंतर्मुख, माणसांपेक्षा कुत्र्यांची संगत हवीशी वाटणारा, किंबहुना काही वेळा माणूसघाणा मानला जाईल असा. पण तरीही लेखक-संपादक म्हणून त्यांचं एकमेकांशी सूत जुळलं. हे मुख्यत्वे पुस्तकांच्या निर्मितीशी संबंधित सूत होतं, पण त्या पलीकडेही काहीएक माणसा-माणसांतल्या संवादाशी संबंधित सुंदर सूत्र यात सापडतं.

राम आणि रुकुन हे दोघेही सेन्ट स्टिव्हन्स (/स्टिफन्स) कॉलेज या दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या प्रसिद्ध महाविद्यालयात साधारण एकाच वेळी शिकले. गुहा यांना रुकुन दोन वर्षांनी सिनिअर होते. गुहा तेव्हा क्रिकेट खेळण्यात अधिक गुंतायचे, तर रुकुन पहिल्यापासून पुस्तकं, पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत, इत्यादीत अधिक रमायचे. या तथाकथित वलय लाभलेल्या कॉलेजमधलं वातावरण, तिथे दोघांनी घालवलेला काळ, दोघांचे बहुतांशाने वेगवेगळे नि क्वचित सामायिक मित्र, परस्परांहून पूर्णपणे विरोधी आवडीनिवडी यांचा आढावा 'द कुकिंग ऑफ बुक्स'च्या सुरुवातीच्या पानांमध्ये वाचायला मिळतो. घरातही इंग्रजी बोलणाऱ्या कुटुंबातली ही मंडळी असल्यामुळे तो सगळा प्रभाव या पानांमध्ये दिसतो. रुकुन यांचे वडील राम अडवाणी यांचं लखनौमधील पुस्तकांचं दुकान ख्यातनाम होतं; त्यामुळे रुकुन यांना लहानपणापासूनच आसपास पुस्तकं लाभल्याचंही कळतं. शिवाय, 'सेन्ट स्टिव्हन्स', 'डून स्कूल' (गुहांची शाळा), त्यानंतर मग 'केम्ब्रिज' (रुकुन यांचं विद्यापीठ), या संस्थांचे आणि मग या संस्थांमधून शिकून भारतीय राजकीय-प्रशासकीय व्यवस्थेत, किंवा भारतीय इंग्रजी बुद्धिजीवी व्यवस्थांमध्ये सत्तास्थानी पोचलेल्यांचेही उल्लेख येतात. गुहा यांनी अहंकाराने हे उल्लेख केलेले नसले तरी साचेबद्ध वलय अधोरेखित होतील अशी विधानं येऊन जातात. एखाद्या संस्थेत अधिक संसाधनं किंवा अधिक स्त्रोतसंपन्नता लाभल्यामुळे काही गोष्टी सुरळीत झाल्या असतील, तर त्याबद्दल बोलू नये असं नाही, पण अधिमान्यतेचे शिक्के म्हणून त्यांचा उल्लेख कंटाळवाणा वाटतो. उदाहरणार्थ, रुकुन सोडता 'मी काम केलेल्या इतर कोणत्याही संपादकाने केम्ब्रिजमधून पीएच.डी. केलेली नाही,' असं गुहा एका ठिकाणी प्रशस्तीपर सुरात लिहितात (पान १७५). अशा उल्लेखांनी संबंधित व्यक्तीच्या अंगभूत क्षमतेविषयी फारसं काही हाती लागत नाही. गुहांनीच यासंबंधीचा एक इशारा प्रस्तावनेत दिलाय: 'वाचक वेगवेगळ्या रितीने या पुस्तकाचा अर्थ लावतील बहुधा- कोणाला हे मैत्रीचं संस्मरण वाटेल, कोणाला एका गतकालीन जगाविषयीचं शोकगीत वाटेल, कोणाला भारतातील प्रकाशनव्यवहाराचा पक्षपाती वृत्तान्त वाटेल, तर कोणाला हा अभिजन पुरुषी विशेषाधिकाराचा आत्ममग्न उत्सव वाटेल' (xx). खरंतर हे सगळंच या पुस्तकात आहे. त्यामुळे ओझरता का असेना या पुस्तकात आलेला 'आत्ममग्न उत्सव' जरा बाजूला करत दोन व्यक्तींच्या प्रवासातले काही उल्लेख म्हणून त्याकडे बघितलं तर बरं जातं.

केम्ब्रिज विद्यापीठातून इंग्रजीत पीएच.डी. करून रुकुन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या भारतातील शाखेत संपादक म्हणून रुजू झाले. इथून पुढे गुहांनी स्वतःच्या लेखनप्रवासाबद्दल आणि त्यांच्या या प्रवासावर रुकुन यांच्या संपादकीय कौशल्याचा कसा प्रभाव पडला याबद्दल प्रांजळपणे आणि नम्रपणाने लिहिलंय. पहिल्यांदा गुहांच्या पीएच.डी. प्रबंधाचं पुस्तक होतानाचे काही अनुभव आहेत. हिमालयातील वनअधिकारविषयक आंदोलनांचा हा अभ्यास होता. त्याचं हस्तलिखित गुहांनी रुकुन यांच्याकडे पाठवलं. ते काही सुधारणांसह ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडून छापायची तयारी रुकुन यांनी दाखवली. या वेळी त्यांनी गुहांना पाठवलेल्या पत्रात नमूद केलं की: 'भारतीय इतिहासकार केवळ इतर भारतीय इतिहासकारांना उद्देशून बोलत असल्यासारखं वाटतं. बहुतेक ते आर्थिक बाजूवर जास्त लक्ष केंद्रित करतात म्हणून असेल, किंवा त्यांच्या स्त्रोतसामग्रीतून अधिक व्यापक स्तरावर रुची वाटण्यासारखं काही निघत नसेल, किंवा ते मुळातच वाङ्मयीन व साहित्यिक घटितांबाबत साशंक असतील.... तुझ्याकडे जमलेल्या सामग्रीतून माणसांच्या प्रत्यक्ष जगण्याविषयी तू आत्ता लिहिलंयस त्याहून बहुधा अधिक काही निघू शकेल.' (५८) (चाळीस वर्षांपूर्वीची ही टिप्पणी, किंबहुना शेरा आहे, हे लक्षात ठेवू. रुकुन यांना 'भारतीय इतिहासकार' म्हणायचं असेल तेव्हा ते 'इंग्रजीत लिहिणारे भारतीय इतिहासकार' इतकंच असल्याचंही आपण समजून घेऊ!). हे म्हणणं गुहांना पटलं, आणि त्यानुसार 'द अनक्वाएट वूड्स: कमर्शिअल फॉरेस्ट्री अँड सोशल कॉन्फ्लिक्ट इन द इंडियन हिमालय' या त्यांच्या पहिल्या पुस्तकाने आकार घेतला.

नंतर, मूळचे अमेरिकी ख्रिस्ती मिशनरी असणारे, पण भारतात आल्यावर आधी गांधी, मग आदिवासी अवकाश यांच्याशी जवळीक होत पूर्णच बदलून गेलेले अभ्यासक वेरिअर एल्विन यांच्या गुहालिखित चरित्राबद्दलचे अनुभव आहेत. इथेही एल्विन यांचा अभ्यास करताना गुहांनी त्या माणसाचा बाह्य, सामाजिक चेहराच जास्त पाहायला सुरुवात केली, पण रुकुन यांच्या सांगण्यावरून ते मानवी नातेसंबंधांकडे नि वैयक्तिक भावभावनांकडेही अधिक निरखून पाहायला लागले (पान ९७). शिवाय, इथे रुकुन यांनी आणखीही दोन परस्परविरोधी भासणारे, पण मुळात टोकाच्या भूमिकांपासून सावध करणारे दोन इशारे दिले: 'भारतीय अमेरिकी मानवशास्त्रज्ञ हे एल्विनचं नावही ऐकलेलं नसताना अमेरिकी मानवशास्त्रज्ञ झालेले आहेत, त्यामुळे त्यांना रस वाटावा म्हणून तू तुझ्या कथनात तडजोड करू नकोस'- अभ्यासाची शिस्त सोडू नको, पण अकादमिक अभ्यासकीय शब्दजाळ्यात अडकू नको, असा त्याचा अर्थ गुहांनी लावला; आणि/पण  'परदेशी प्रकाशकांमध्ये तुला जास्त रस असल्यामुळे तू सार्वत्रिक वाचकवर्गावर जास्त लक्ष ठेवून लिहिण्याची शक्यता आहे. तुझं पुस्तक विकलं जाऊन काहीएक आर्थिक मिळकत व्हावी, हे मी समजू शकतो. पण शेवटी, लांब पल्ल्याचा विचार करता भारतीय लोक नि इथले स्थानिक समाजवैज्ञानिकच तुझे मुख्य वाचक असणार आहेत-...' (९८).

एल्विन यांच्या संदर्भात नातेसंबंध नि भावभावना यांचा शोध घेत असताना गुहांनी लिहिलेल्या मजकुरावर रुकुन पुढील टिप्पणी करतात: 'एल्विन मुलगा म्हणून, भाऊ म्हणून, मित्र म्हणून, पिता म्हणून व पती म्हणून कसा होता याविषयी हे पुस्तक बोलतंय, पण लेखक आणि वादविवादपटु या रूपातला एल्विन कुठेय?' (९९). मग पुन्हा मजकुरात आणखी काही भर पडते. एल्विन यांच्या आयुष्यासोबतच आदिवासी अवकाशाची सद्यस्थिती काय याबद्दलच्या परिशिष्टाची भर पडते, रूढ अभ्यासात दखलपात्र न ठरणारे काही किस्से नि लक्षणीय प्रसंग यांनाही जागा दिली जाते. 'राम, भावनिकदृष्ट्या अत्यंत मूल्यवान असणाऱ्या मार्मिक गोष्टी कंसांमध्ये किंवा तळटिपांमध्ये सरकावून देण्याची वैतागवाणी अकादमिक वृत्ती तुझ्यातही आहे. का?? चरित्र म्हणजे प्रबंधापेक्षा कादंबरीसारखं असायला हवं', असाही एक शेरा रुकुन मारतात (१०१). यातून मग 'सॅव्हेजिंग द सिव्हिलाइज्ड: वेरिअर एल्विन, हिज् ट्रायबल्स, अँड इंडिया' हे पुस्तक तयार झालं. त्याला चिकित्सक वाचकांकडून आणि बाजारातही चांगलं यश मिळालं. 'या पुस्तकाचं लेखन, पुनर्लेखन, प्रकाशन, प्रशंसा, इत्यादी सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे', असं गुहा रुकुन यांना कळवतात.

राम गुहा आणि रुकुन अडवाणी या व्यक्तिमत्वांच्या भिन्न स्वभावांच्या खुणा, त्यातून एखाद्या विषयाकडे बघण्याची भिन्न पातळ्यांवरची दृष्टी, असं काही ना काही या अनुभवांमधून जाणवतं. एल्विनच्या सामाजिक रूपाकडे अधिक लक्ष जाणारे राम आणि सामाजिक रूपासोबत एल्विनचं स्व-रूप काय होतं याचा अंदाज बांधण्याकडे जास्त कल असणारे रुकुन. संभाव्य बाजारपेठेकडेही आवर्जून लक्ष ठेवणारे लेखक-अभ्यासक राम आणि स्वतः प्रकाशक असूनही, बाजारपेठेची अपरिहार्यता माहीत असूनही (काही बाबतीत तरी) पानसंख्या वाढली-तर-वाढू-दे असं म्हणणारे रुकुन. चरित्राकडे समाजशास्त्रीय प्रबंधाच्या अंगाने बघणारे अभ्यासक राम आणि चरित्र म्हणजे कादंबरीच्या जवळ जाणारा (बहुधा- माणूस, व्यक्ती, समाज यांच्या आंतरसंबंधांपुरता) प्रकार असल्याची टिप्पणी करणारे संपादक रुकुन- अशा रितीने हे भिन्नत्व दिसतं. 

याशिवाय, गुहांचं क्रिकेटविषयक वृत्तपत्रीय स्तंभलेखन, त्यातून उभी राहिलेली पुस्तकं याबद्दल रुकुन यांच्याशी झालेला संवादही पुढे येतो. क्रिकेटसारख्या विषयावर लिहिल्यामुळे अकादमिक अभ्यासक म्हणून आपल्या क्षमतेवर शंका घेतली जात असल्याचं गुहांना एका अभ्यासकाने मारलेल्या शेऱ्यामुळे जाणवलं, ते त्यांना लागलं. त्यावर रुकुन यांनी गुहांना पुढील शब्दांत धीर दिला: 'ही च्युत्या मंडळी भेद नि कॅटेगऱ्या धूसर करणं आवश्यक असल्याबद्दल बोलतात, पण कोणी अकादमिक लेखन आणि नीरस नसलेलं लोकप्रिय लेखन यांच्यातला भेद धूसर केला तर मात्र अतिशय अस्वस्थ होतात' (१५७). स्वतः औपचारिक अकादमिक उच्चशिक्षण घेतलेल्या, आणि आधी 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस'च्या माध्यमातून, नंतर 'परमनन्ट ब्लॅक' या स्वतःच्या प्रकाशनसंस्थेकडून बहुतांशाने अकादमिक शिस्तीमधली पुस्तकं संपादित व प्रकाशित करणाऱ्या माणसाचं हे मत आहे! रुकुन यांची बहुतांश मतं अशा उपहासात्मक, व्यंग्यात्मक शेऱ्यांच्या रूपात या पुस्तकात आली आहेत. काही वेळा (उदाहरणार्थ, भारत देशातली परिस्थिती, इत्यादींबाबत) ही मतं टोकाच्या निराशेकडेही जातात; याउलट, राम गुहा यांच्या विधानांमध्ये असा उपहास नाही, शेरेही नाहीत आणि काहीएक आशा टिकवून ठेवणारी वृत्ती आहे. पण तरी, रुकुन यांनी मित्र-संपादक म्हणून सुचवलेली काही वाक्यं गुहांच्या लेखनात जशीच्यातशी उतरल्याचाही एक दाखला या पुस्तकात दिलेला आहे.

फेब्रुवारी २०१३मध्ये गुहांनी नरेंद्र मोदींवर एक वृत्तपत्रीय लेख लेख लिहिला. त्या वेळी मोदींनी पंतप्रधान होण्याची इच्छा जाहीररित्या व्यक्त केली होती, त्या निमित्ताने गुहांनी मोदींच्या एकंदर राजकीय व्यक्तिमत्वाची चिकित्सा, इंदिरा गांधी-संजय गांधी यांच्याशी असलेलं त्यांच्या साधर्म्याची चर्चा या लेखात केली आणि लेख वृत्तपत्राकडे पाठवण्याआधी रुकुन यांना वाचायला पाठवला. रुकुन यांनी यावर केलेली टिप्पणी अशी: 'मोदींच्या इतर कोणत्याही कृतीपेक्षा त्यांच्या आवाजात एकाधिकारशाही वृत्तीची  झाक दिसते. ... समाजवैज्ञानिक आवाजाच्या परिणामांचं पुरेसं विश्लेषण करत नाहीत, (कदाचित चित्रपट-अभ्यासक त्यांच्या शब्दबंबाळ लेखनात असं करत असतील?), पण मोदींचं सार्वजनिक बोलणं पंधरा मिनिटं ऐकलं तरी आपल्याला कळतं की, हा माणूस त्याच्या वाटेत येणाऱ्या कोणालाही बाजूला हटवून पुढे जाईल' (१९२). ही वाक्यं गुहांनी त्यांच्या लेखात (श्रेयनिर्देश न करता) जवळपास तंतोतंत वापरली, आणि त्याची कबुलीही त्यांनी रुकुन यांच्याकडे लगेच दिली, आता या पुस्तकात ती अधिक जाहीरपणे दिली आहे.

'सबाल्टर्न स्टडीज्' [याचं भाषांतर 'निम्नस्तरीय अभ्यासपंथ' असं करता येऊ शकेल] या एकेकाळी गाजलेल्या अभ्यासपंथाची पुस्तकमालिका 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, इंडिया'कडून प्रकाशित झाली तेव्हा त्यातील सुरुवातीच्या पुस्तकांवर रुकुन यांचा संपादकीय हात फिरला होता. तळपातळीवरून इतिहासाचा अर्थ लावू पाहणारा, महाकथनांऐवजी सर्वसामान्य जगण्यांच्या कथनांना अग्रक्रम देऊ पाहणारा हा अभ्यासपंथ नंतर केवळ संहिताकेंद्री विश्लेषणांमध्ये अडकून पडल्याची खंत गुहांनी व्यक्त केली, त्या संदर्भातील दोघांचा संवादही मजेशीर आहे. या संदर्भात रुकुन यांनी एक व्यंग्यात्मक पुस्तिका काढली होती. ही पुुस्तिका 'स्वल्प-अल्पविरामांचा वापर न करता वसाहतोत्तर चिकित्सक-सैद्धान्तिक मार्क्सवादी-स्त्रीवादी निम्नस्तरीयअभ्यासपंथीय दृष्टीने बंडखोर शेतकऱ्यांचा  इतिहास [...] लिहिण्याच्या कलेवर प्रभुत्व मिळवून मोठी मिळकत करण्याची इच्छा असलेल्या [...] भारतातील होतकरू इतिहासकारांना करिअर मार्गदर्शन करेल,' अशी उपहासात्मक टिप्पणी या पुस्तिकेच्या मागच्या पानावर होती. या निबंधातल्या मूल्यनिवाड्याशी पूर्पणे सहमत होणं आपल्याला शक्य नसल्याचं गुहा नोंदवतात. या पुस्तिकेतल्या व्यंग्यात्मक निबंधात विनोद जास्तच आत्ममग्न होते आणि अवयवांचे नि काही शारीरिक कृतींचे उल्लेख नकोसं व्हावं इतक्या असभ्यपणे आले होते, असं त्यांचं म्हणणं पडलं (११५-१२२). 

रामचंद्र गुहा व रुकुन अडवाणी
रानीखेत इथे, २०१९ (छायाचित्र: अनुराधा रॉय)
एकमेकांच्या निरीक्षणांविषयी, विचारांविषयी मोकळेपणाने व्यक्त केलेली मतभिन्नता, हेच या पुस्तकातलं सुंदर सूत्र वाटलं. आपण सारखं खरं बोलत नाही, हे कबूल; पण काहीएक बाहेरच्या कामांविषयीचं मत असेल तरी सतत एकमेकांविषयी  औपचारिक गोड बोलणं, आनंद-यश यांचा बडेजाव माजवणं, हे आजूबाजूला दिसत राहतं. अशा वेळी चांगल्यापैकी मुख्यप्रवाही प्रसिद्धी मिळालेला एक इतिहासकार नम्रतेने स्वतःच्या लेखनातल्या उणिवांविषयी बोलतो, त्या उणिवांवर उपाय करण्यासाठी त्याला मुख्यप्रवाही प्रसिद्धीपासून कोसो दूर राहणाऱ्या माणसाची कशी मदत झाली याविषयी बोलतो, दोघेही एकमेकांच्या उणिवा दाखवतात, क्वचित भांडतातही, हे जरा वाचून बरं वाटतं. गुहांनी त्यांच्या लेखनप्रवासातलं प्रमुख श्रेय रुकुन यांना दिलंय, पण म्हणून मतभिन्नता नोंदवण्याचं टाळलेलं नाही. रुकुन यांनी तर संपादक म्हणून सुरुवातीपासून मतभिन्नतेची आघाडीच उघडल्यासारखं होतं. संपादकाचं काम वास्तविक अशा संवादाचं असतं. त्यात चौफेर वाचन, चौकसपणा, सहानुभूती, भाषेची समज (म्हणजे समोरचा भाषा कशासाठी वापरू पाहतोय याची सहानुभूतीतून आलेली समज इथे अपेक्षित आहे; आपल्यालाच वाटतं तो भाषावापर भारी, असा गर्व नाही) वगैरे गोष्टी लागतातच; पण मजकूर दुसऱ्याचा आहे, आपण त्यात काही सुकरता आणू पाहतोय, असा नम्रभावसुद्धा हवा. रुकुन यांनीच गुहांना लिहिलेल्या पत्रातलं वाक्य वापरायचं तर: 
अधिकारवाणीने बोलत असल्यासारखं भासवण्याची गरज, हा एक अकादमिक आजार आहे; त्याऐवजी ढोबळमानाने ठाम विधान करण्याची सूक्ष्म इच्छा राखावी (१०१).
संपादकाचं काम अशा सूक्ष्म स्तरावर चाललं तर अधिक योग्य राहत असावं. त्यामुळेच बहुधा या पुस्तकाच्या निमित्ताने अलीकडे झालेल्या मुलाखतींसाठी राम गुहा यांच्यासोबत हजर राहायची निमंत्रणं मिळूनसुद्धा रुकुन या कार्यक्रमांसाठी बाहेर पडलेले नसावेत.

1 comment:

  1. Extremely insightful. Interestingly, it catches the unintended conceit that comes as a trace in the writings of upper middle class, English-medium educated authors.

    ReplyDelete