एक
![]() |
मुखपृष्ठ : दिनानाथ दलाल (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, २०११) |
'माणदेशी माणसे' हे व्यंकटेश माडगूळकर यांचं १९४९ साली पहिल्यांदा प्रकाशित झालेलं पुस्तक मराठी साहित्यात सातत्याने नावाजलं गेलेलं आहे, आणि ते अजूनही वाचलं जातं. पंच्याहत्तर वर्षांनंतरही त्याच्या नवीन आवृत्त्या निघताना दिसतात. (या नोंदीसाठी कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने २०११ साली प्रकाशित केलेली आवृत्ती वापरली आहे.)
पुस्तकाच्या शीर्षक-पानावर 'माणदेशी माणसे' या नावाखाली 'शब्दचित्रे' असं पुस्तकातल्या मजकुराचं वर्णन केलेलं आहे. पुस्तकात आलेली सर्व सोळा शब्दचित्रं म्हणजे कल्पित गोष्टी आहेत, एवढं माडगूळकरांनीच या पुस्तकावर लिहिलेल्या लेखाच्या आधारे म्हणता येतं ("माणदेशी माणसं", 'प्रवास एका लेखकाचा', मॅजेस्टिक प्रकाशन, २००७[१९९७]: पानं २६-३१). यात कधी लहानपणापासून प्रत्यक्षात पाहिलेल्या "दोन-तीन व्यक्तींचं रसायन एकत्र झालेलं आहे", कधी निव्वळ ऐकिवात असलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती घेण्यासाठी ते माणदेशातील गावात पुन्हा हिंडले, "मधमाशीने मध गोळा करावा, तसं खपत" लोकांशी बोलून तपशील गोळा केला, असं त्यांनी नोंदवलं आहे ("माझ्या लिखाणामागची कळसूत्रे", 'रानमेवा', आर्यन प्रकाशन, २०१०: पानं १९-२१). या तपशिलाची मांडणी करण्यासाठीची भाषा त्यांना जगण्यातून अवगत होती.
पुस्तकाचं निवेदन प्रथमपुरुषात आहे. काही ठिकाणी निवेदकाचं नाव 'व्यंकटेश' असल्याचं सूचित होतं, किमान एकदा निवेदक स्वतःचं गाव म्हणून 'माणदेशातल्या माडगूळ'चा (म्हणजे लेखकाच्या खऱ्याच गावाचा) उल्लेख करतो, तर काही ठिकाणी फार काही सूचित न करता 'मी' या सर्व व्यक्तींविषयी वाचकांशी बोलतो. याला केवळ पुस्तकात क्रमाने चौदावी येणारी 'माझा बाप' ही गोष्ट अपवाद आहे : इतर पंधरा व्यक्तिचित्रांशी फारसा मेळ न बसणारं हे प्रकरण वाटतं. इतर पंधरा ठिकाणी 'मी' तरुण वयातला, उच्चजातीय, कमी-अधिक मध्यमवर्गीय असलेला दिसतो; त्याच्या कथनाची विशिष्ट भाषा आणि शैली आहे. तीच भाषा नि शैली 'माझा बाप' या गोष्टीत कायम राहते. पण प्रत्यक्षात या गोष्टीतला 'मी' हा गावातल्या कष्टकरी नरसू तेल्याचा, मराठी शाळेत चौथीत शिकणारा मुलगा आहे. त्याचं कथन नि अगदी संवादही प्रमाणभाषेत यायला स्वतंत्रपणे हरकत नव्हती, पण या एकंदर पुस्तकातल्या कथनाशी त्या विशिष्ट व्यक्तिचित्रातल्या तेली जातीय, कष्टकरी कुटुंबातल्या, पोरवयीन 'मी'चा मेळ बसत नाही- त्याची दृष्टी, भाषा नि शैली सगळंच अकाली प्रौढ आणि अस्थानी वाटतं. उदाहरणार्थ, इतर ठिकाणी निवेदक आणि तो वर्णन करत असलेलं पात्र यांच्यात काहीएक अंतर सूचित केलेलं जाणवतं. निवेदक गावापासून दूर राहायला गेल्यामुळे खूप वर्षांनी भेट होणं- म्हणजे काळाचं अंतर, सामाजिक-सांस्कृतिक स्थानांमधलं अंतर, एकंदर भूसांस्कृतिक जवळीक नि जिव्हाळा असला तरी रोजमर्राच्या भाषावापरातलं अंतर, इत्यादी. ही अंतरं सूचित करणं हे एक लेखकीय कौशल्यच आहे, त्यामुळे ती उणीव नाही. इथला मुद्दा इतकाच की, या अंतरामुळे पंधरा गोष्टींमधला 'मी' केवळ निरीक्षक म्हणून काही वेळा जी अलिप्तता राखतो ती 'माझा बाप'मध्येही डोकं वर काढते नि विसंगती उघड होते. उदाहरणार्थ, नरसू तेल्याचा मुलगा रोजच्यासारखा सहजपणे घरी आलेल्या बापाचं वर्णन असं करतो : "काही वेळाने माझा बाप आला. कमरेच्या धोतराखेरीज तो उघडाच होता. उघडा राहून राहून त्याचे अंग उन्हाने करपून गेले होते. पण तो चांगला जवान होता. घाण्यातली लाट उचलून त्याचे दंड भारी तयार झाले होते." (पान १२८) साधारण दहाएक वर्षांचा हा मुलगा रोज बापाला बघतोय, मग आजच अचानक नव्याने पाहिल्यासारखं त्याच्या देहाचं वर्णन तो का करेल? तसा काही प्रसंगही इथे घडलेला नाही. निव्वळ घराच्या दारातून आत आलेला बाप पुस्तकाच्या वाचकांना पहिल्यांदा 'दिसत' असला तरी त्या मुलाला अगणित वेळा दिसत आलेला आहे. इतर ठिकाणी निवेदक अमूर्त वाचकांशी बोलत असल्याचं स्पष्ट होतं, तसंच आधी नमूद केलेल्या अंतरामुळे ते अंतर भरून काढण्याच्या हिशेबाने निवेदक गोष्ट सांगत जातो, त्यामुळे पात्राची ओळख सांगताना अशा तऱ्हेची वर्णनं ओघात येतात. 'माझा बाप'मधल्या कथनात नि वर्णनात मात्र निवेदक मुलाचं कथन काळाचं किंवा इतर अंतरं सुचवणारं नाही, त्यामुळे त्याच्या भाषावापराचा नि विशिष्ट शैलीचा आधार डळमळत राहतो.
आधी म्हटल्याप्रमाणे इतर गोष्टींमध्ये निवेदक 'मी' आणि वर्णनाखाली येणारी पात्रं यांच्यातलं अंतर कसं सूचित होतं ते आता पाहू. पहिलंच शब्दचित्र धर्मा रामोशी या व्यक्तीचं आहे. धर्मा "आयुष्यातले अखेरचे दिवस कसेबसे ढकलतो आहे," हे स्वतः त्याला नि गावातल्या बहुतेक लोकांना माहिती आहे. "नोकरीधंद्यापायी परगावी राहणाऱ्या आणि वर्षातील एखादा-दुसरा महिना घरी येणाऱ्या माझ्यासारख्यालासुद्धा माहीत होतं, पण ते तीव्रतेनं जाणवलं अगदी अलीकडं. धर्माला अगदी जवळून न्याहाळलं अगदी कालपरवा", असं निवेदक 'मी म्हणतो (पान ४). इथे निवेदक पात्रं राहतायंत त्या गावापासून आता दूर अंतरावर असल्याचं कळतं, तसंच संबंधित पात्रापासूनचं त्याचं शारीर स्वरूपाचं अंतरही कळतं. 'झेल्या' या शब्दचित्रात तीन महिन्यांचा बदली शिक्षक म्हणून गावात आलेला 'मी' निवेदक आहे, तर 'रामा मैलकुली'मध्ये रस्त्यावरच्या अंतरांच्या दगडावर आकडे टाकायला आलेला कर्मचारी म्हणून गावात आलेला 'मी' निवेदन करतो. 'नामा मास्तर'मध्येही नोकरीधंद्यापायी शहरात राहणारा 'मी' निवेदक आहे. मांग जातीतला नामा आणि 'मी' शाळेतले वर्गमित्र, पण "मध्यंतरी बरीच वर्षं आमची गाठ पडली नव्हती. माझ्यात आणि नामात आता अंतर निर्माण झालं होतं. पण नामा अद्यापही माझ्या मनात घर करून राहिला होता," असं निवेदक म्हणतो (पान ३६).
'रामा मैलकुली' हे व्हरल (होलार) जातीमधलं पात्र आहे. कातड्याच्या पारंपरिक पेशात पोट भरणं बिकट झाल्यामुळे रामा रस्त्याची निगराणी राखण्याचं सरकारी काम स्वीकारतो. किरकोळ पगारावर उपजीविका भागवायचा प्रयत्न करतो. तो निवेदक 'मी'ला 'अंमलदार' असं संबोधतो, पण 'मी'नेही पोटापाण्यापुरतं रस्त्यावरच्या अंतरांच्या दगडांवर आकडे नि नाव घालायचं काम स्वीकारलेलं असतं. रस्ता दाखवायला रामा सोबत जातो तेव्हा 'मी'च्या हातातल्या पिशवीचं ओझं स्वतःकडे घेण्याबाबत विचारणा करतो. पण 'काय शिवन्यासारकं न्हाई नव्हं?' असंही रामा विचारतो. त्यात जेवणाचा डबा असेल तर तेवढा काढून घ्यावा, मग बाकीचं ओझं- म्हणजे रंगाचा डबा- आपल्याला घेता येईल, असं रामा सांगतो. यावर 'मी' जेवणाच्या डब्यासह पिशवी रामाने घ्यायला हरकत नसल्याचं सांगतो. "शिवाशीव पाळत नाही मी!" असंही 'मी' स्पष्ट करतो (पान २३). जातीय पातळीवरची ही अंतरं लेखकाने स्वाभाविकपणे दाखवली आहेत. उदाहरणार्थ, कालांतराने शाळामास्तर झालेला शाळेतला मित्र नामा हा मूळचा मांग आहे, त्यामुळे तो 'मी'सोबत चहा प्यायला हॉटेलात जातो तेव्हाचं वर्णन असं आहे : "चहा तयार झाला. काळपट फडक्यातून एका मोठ्या किटलीत गाळला गेला. एक कानतुटका कप भरून धोंडीआप्पानं मला दिला. हॉटेलाच्या बाहेरच्या बाजूला लोंबणाऱ्या शिंक्यातून नामानं अस्पृश्यासाठी ठेवलेली कपबशी काढून घेतली. धोंडीआप्पानं त्यात चहा ओतला. आणि निखाऱ्यालगत किटली ठेवून दिली." (पान ३४)
साहित्यात अशा निवेदकांनी (आणि अर्थातच पात्रांनी) गुणी, नैतिक आणि सामाजिक संकेत पाळणारं, किंवा राजकीय हुशारी जपणारं असायलाच हवं, असं अर्थातच नाही. वरचा परिच्छेद देण्याचं कारण इतकंच की, हा निवेदक जाणिवेच्या पातळीवर काही सामाजिक पूर्वग्रह सोडून वागताना दिसतो. शाळेत असताना लावणी म्हटल्याबद्दल नामाला शिक्षक निरगुडाच्या छडीने फोडून काढतात, तेव्हा शाळा सुटल्यावर त्याची समजूत काढत ओढ्यापाशी जाणारा 'मी' नामाच्या पाठीवरच्या वळांवरून हात फिरवतो नि नामाचा हात धरून त्याला घरापर्यंत सोडून येतो. इतर गोष्टींप्रमाणे इथेही निवेदक 'मी' स्वतःपेक्षा भिन्न जातीय अवकाशाच्या राहणीमानाचं, घराचं सहज वर्णन येतं, भाषिक लकबीही तंतोतंतपणे पकडलेल्या दिसतात. त्याने रेखाटलेल्या या 'शब्दचित्रां'मधली एखादा अपवाद वगळता सर्व मंडळी निम्नस्तरीय जातसमूहांमधली आहेत.
थोडक्यात- लेखकाचा अनुभव, तसंच पात्रनिर्मितीसाठी लागणारा अधिकचा तपशील गोळा करण्यासाठी त्याने घेतलेले कष्ट, यातील जाणिवेची पातळी विचारात घेतली तर तो काही पूर्वग्रह ओलांडून जातो. त्यामुळे माणदेशी गावाकडचं बहुजातीय-बहुधार्मिक जगणं, घरांची भिन्न रचना, भिन्न पोशाख, भिन्न बोलीभाषा, यांचा वापर करून अस्सल शब्दचित्रं लेखक 'मी' या निवेदकाच्या माध्यमातून उभारतो. लेखकाने जाणिवेने काही पूर्वग्रह ओलांडले, तरी निवेदक त्याहून वेगळा असू शकतो. शिवाय, निवेदकाव्यतिरिक्त एकंदर त्या संहितेतून लेखक आणखी काही शोधू पाहतोय का, अशा दृष्टीने 'माणदेशी माणसे'कडे पाहताना आपल्याला जाणिवेव्यतिरिक्त नेणिवेचा विचार करावा लागतो.
बौद्ध व हिंदू परंपरांमधील काही दर्शनं आणि आधुनिक मनोविज्ञान, तसंच मार्क्सविचार यांचा आधार घेत शरद् पाटील यांनी माणसाच्या कलात्मक अभिव्यक्तीविषयी काही अभिनव मांडणी केली (परंपरांविषयीचे शब्द त्यांनीच वापरलेले आहेत). ते अनेक निर्णायक विधानं करतात, पण ती प्रत्येक वेळी रास्त असतीलच असं नाही. तरीही काही बाबतीत त्यांनी नोंदवलेली मर्मदृष्टी विचारात घेण्यासारखी आहे, त्यामुळे निर्णायक विधान न करता एक उल्लेखनीय शक्यता म्हणून त्यांच्या युक्तिवादाचं सार इथे नोंदवतो (यातला काही भाग मनोविज्ञानाची प्राथमिक ओळख असलेल्यांना माहीत असेल, तरी-) : माणसाच्या मेंदूत जाणीव (conscious) आहे तशीच नेणीवही (subconscious) आहे. माणसाची कलात्मक अभिव्यक्ती जाणीव आणि नेणीव यांच्या परस्परसंबंधांमधून होत असते. 'जाणीव व नेणीव ही विरोधांची एकजूट आहे आणि त्यांच्या फलदायी संघर्षाची उपज प्रतिभा आहे' (शरद् पाटील, 'जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व', मावळाई प्रकाशन, २०१४[१९९६], पान २०८). जाणिवेत अनेकदा सनियमी प्रतिक्रियांचा (conditioned reflex) संचय होतो- बदलत्या परिस्थितीनुसार बदलणाऱ्या जगण्याच्या नियमांच्या खुणा त्यात गोळा होत जातात, व्यक्तीच्या वागण्यात त्या दिसतात. नेणिवेत अनेकदा अनियमी प्रतिक्रियांचा (unconditioned reflex) संचय होत असतो- त्यात सहजप्रेरणा, अर्थात 'इन्स्टिन्क्ट'ही आली. ती मानवेतर प्राण्यांमध्येही सामान्यपणे असल्याचं मानलं जातं. पण माणूस अनियमी प्रतिक्रियेसोबत सनियमी प्रतिक्रियेनेही घडत असतो. 'माणसाचा मेंदू ही केवळ शरीरशास्त्रीय उपज नसून माणसाच्या ऐतिहासिक विकासक्रमाचीही उपज आहे'. म्हणजे मेंदू काही केवळ जीवशास्त्रीय घडामोड नसते तर भवतालातल्या भौतिक सामाजिक-ऐतिहासिक घटनाक्रमांच्या प्रभावातूनही मेंदूच्या घडणावळीवर परिणाम होतो. भारतीय संदर्भातील भौतिक-ऐतिहासिक सामाजिक विकासक्रमात जातिव्यवस्था निर्माण झालेली असल्यामुळे इथल्या व्यक्तींच्या अनियमी प्रतिक्रियांमध्येही त्या व्यवस्थेच्या खुणा गोळा होत जातात. ('अब्राह्मणी साहित्य आणि कलांचे सौंदर्यशास्त्र', मावळाई प्रकाशन, २०१७[१९८८] पानं २१९-२२४). (या मांडणीत पाटलांनी केलेले काही शब्दप्रयोग वेगळे आहेत. मी त्यात बदल का केला, याबद्दल दुसऱ्या भागात बोलू).
![]() |
मूळ मुखपृष्ठ : दिनानाथ दलाल । शरद् पाटलांचं छायाचित्र : मराठी विश्वकोश फेरफार : रेघ |
पाटलांचा युक्तिवाद विचारात घेऊन परत माडगूळकरांच्या माणदेशी माणसांकडे वळू.
'माणदेशी माणसे'मधील 'बाबाखान दरवेशी' या शब्दचित्रात तापट स्वभावाच्या दरवेशी माणसाचं वर्णन येतं. त्याने संतापून रात्रीबेरात्री बायकोला मारल्यावर तिच्या रडण्याने गावं जागं झाल्याच्या प्रसंगानेच या कथेची सुरुवात होते. शेवटाकडे बाबाखानचा लहान मुलगा घराशेजारी बांधलेल्या त्यांच्या अस्वलाच्या तावडीत सापडतो आणि मुलगा जखमी होतो, पण वाचतो. तेव्हा 'सणाट्याने' घरी दाखल झाल्यावर बाबाखान रागाने लाल होतो, तो मोठा दांडुका घेऊन घरातून बाहेर येतो, तेव्हा अस्वल मरतंय आता, असं तिथे उपस्थित असलेल्या निवेदक 'मी'च्या मनात येतं. पण बाबाखान अस्वलाला काठीने खुणावून दुसऱ्या जागी नेऊन बांधतो. यावर दुसऱ्या दिवशी 'मी' बाबाखानला विचारणा करतो- "एवढ्याशा कारणावरून बायकोला ढोरासारखा तुडवतोस आणि काल ते जनावर पोटच्या पोराला जीवं मारीत होतं तर त्याला चार बोटांनी शिवलासुद्धा नाहीस?" (पान ११३). पुढे निवेदक म्हणतो : "माझ्यासारख्या माणसाकडून असले प्रश्न विचारले गेले म्हणून खरोखरीच बाबाखान अति खजील झाला होता!" (जाडा ठसा रेघेचा). या गोष्टीत 'मी' वाड्यात राहणारा असल्याचा एकच उल्लेख निवेदकाच्या ओळखीशी जोडलेला आहे. पण पुस्तकातल्या इतर कथांशी सांगड घालूनच ही कथा वाचायची तर इथेही निवेदक शाळामास्तर किंवा किरकोळ सरकारी कर्मचारी किंवा शेतजमिनीची मालकी राखणाऱ्या ब्राह्मण कुटुंबातला असेल, असं मानता येईल. याबाबत लेखक स्पष्ट खुलासा करत नाही. पण मग 'माझ्यासारख्या माणसाकडून' हा उल्लेख का झाला असेल? आपण समोरच्या माणसाला एखाद्या अपमानास्पद खाजगी बाबीविषयी काहीतरी विचारल्यावर तो माणूस खजील होईल, असं आपल्याला कोणत्या धारणेतून वाटेल? माडगूळकरांच्या 'माणदेशी माणसे'मधला निवेदक 'मी' या ठिकाणी 'माझ्यासारखा माणूस' बाबाखान दरवेश्याहून नैतिकदृष्ट्या वा सामाजिकदृष्ट्या उन्नत स्थानी असल्याचं सूचित करतो, त्यामागची नेणीव सरंजामी जातीय रचनेचा स्पष्ट निर्देश करते.
'गणा महार' हा तमाशात ढोलकी वाजवण्याचं कसब असलेला मनुष्य 'मी'ला मुंबईत बसस्टॉपपाशी भेटतो आणि त्यांचं बोलणं सुरू होतं. दोघांची गावं माणदेशातली असल्याचं कळल्यावर चांगल्या गप्पा होतात. मग ते चहा प्यायला 'एका कळकट कोंगाड्याच्या हॉटेलात' जातात. निवेदक सांगतो : "मालक गणाच्या ओळखीचा असावा. माझ्यासारखा माणूस घेऊन गणा हॉटेलात आला ही गोष्ट त्याला विशेष वाटली असावी. तो डोळे मिचकावून बोलला- 'अरे गणाजी, काय लय् गडबड?'" (पान ११८; जाड ठसा रेघेचा). याही गोष्टीत निवेदक 'मी'ची वेगळी काहीच ओळख पटेलसा तपशील नाही. तो नोकरीधंद्यामुळे मुंबईत राहतोय आणि मूळ गाव सातारकडे आहे, एवढं गणासोबतच्या त्याच्या गप्पांमधून कळतं. मग इथे पुन्हा 'माझ्यासारखा माणूस' हा उल्लेख का झाला असेल? आपण एखाद्या हॉटेलात तमासगीर माणसासोबत गेल्यावर आपलं तिथे असणं हॉटेलमालकाला विशेष वाटेल, ही धारणा कशातून आली? पोशाखामुळे प्रथमदर्शनी कोणी यात वेगळेपण शोधू शकेल, त्वचेच्या रंगावरूनही वेगळेपण सूचित होत असेल. या प्रश्नांची उत्तरं निवेदकानेच द्यायला हवीत असं अर्थातच नाही. पण लेखकही इतर कुठल्याही मार्गाने त्या प्रश्नांकडे जात नाही. गणा महार आणि ब्राह्मण 'मी', हे अंतर धूसरपणे सूचित करणारे उल्लेख कथेत आहेत, तेवढंच. कथेच्या शेवटी निवेदक म्हणतो, "तमासगिरांच्या खाजगी जीवनाविषयी मला मोठं कुतूहल. त्यासंबंधी विचारलं असताना गणानं उत्तर दिलं- 'साहेब, आमा लोकांना तुमी बघावं तमाशाच्या थेटरात, बोर्डावर उभं राहिल्यावरच. त्याचं बाकीचं काय बघू नये. मिठाई खावी पण मिठाईचा कारखाना कधी बघू नये!'" (पान १२३)
माडगूळकरांच्या लेखनात आलेल्या गणा महाराने केलेली टिप्पणी 'माणदेशी माणसे'मधल्या त्यांच्याच निवेदनालाही लागू होऊ शकते. माडगूळकर त्यांची लेखकीय क्षमता माणदेशातील माणसांच्या नि त्यांच्या जगण्याच्या बाह्य वर्णनात इतक्या कुशलपणे वापरतात, की ती-ती व्यक्ती ठळकपणे वाचकांपुढे 'सादर' होते. पण कथेतल्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तीचे इतर व्यक्तींसोबतचे आंतरसंबंध, असतीलच तर निवेदकासोबतचे त्या व्यक्तीचे संबंध अगदी अपवाद वगळता फारसे उलगडलेच जात नाही. काही बाह्य व्यवहारापुरतंच ते उरतं.
उदाहरणार्थ, मुख्य पात्र 'बाबाखान दरवेशी' आहे म्हटल्यावर त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित. मग त्याच्याकडून मार खाणाऱ्या बायकोचं वर्णन असं : "नाहीतरी बाबाखानची बायको वेडसरच होती. वेडसर म्हणण्यापेक्षा भोळीभाबडी म्हणा." (पान ११०). एकतर वेडसर म्हणावं किंवा भोळीभाबडी म्हणावं, किंवा भोळंभाबडं असण्याला हे जग वेडं मानतं असं म्हणावं. निवेदक 'मी' तितक्या गुंत्यात जात नाही, ते ठीक. पण लेखकसुद्धा या बाईच्या पात्राचं काही करत नाही. तो निवेदकाला त्याच सुरात पुढे बोलायला लावतो : "अंगावर कसंतरी गुंडाळलेलं सुडकं, बाबाखानची बायको म्हणजे खरोखरच एक ध्यान होतं. पोरांचं लेंढार मागे घेऊन ती कुठंतरी भटकत असे गावात. बाबाखानला पोरंही उदंड. तीन पोरी आणि चार पोरं. त्यातली निम्मी अधिक आईसारखी वेडीबिद्री होती. पण थोरली एक पोरगी आणि धाकटं एक पोर दिसायला चांगलं होतं. म्हशीमागून रानोमाळ चिंध्या उडवीत हिंडताना त्यांना पाहिलं की मला नेहमी वाटायचं, न्हाऊ माखू घातलं आणि एखादं धुवट चिरगूट अंगावर घातलं तर ही पोरं एखाद्या कोकणस्थ ब्राह्मणाच्या मुलांच्या तोंडात मारतील रूपानं!" (पान ११०). इथे आदल्याच पानावर बाबाखानाने बायकोला मध्यरात्री बडवलंय नि तिच्या रडण्याभेकण्याने गाव जागं झालेलं आहे, एवढं लक्षात ठेवू. निवेदक गावातल्या सर्वजातीय पूर्वग्रहांनुसार बोलतो, हे वावगं नाही; किंबहुना ते या कथनात काही वेळा जुळणारं आहे. पण लेखकाला आदल्या पानावरच्या हिंसक प्रसंगातून पुढे आल्यावर "आणि नाही तरी" असं म्हणून बाबाखानाची बायको कशी दिसायला वेडीबिद्री होती, हे निवेदकाच्या तोंडून सांगावं वाटतं, यात त्या बाईच्या पात्राविषयीची सपशेल अनास्था दिसते. वेडीबिद्री असेल तर तिचं पुढे काय करायचं, हे लेखकाने ठरवलं तर निवेदकालाही कथनात त्यावर काही करावं लागलं असतं.
नाहीतर एकीकडे निवेदक कसा वागतो पाहा : 'तांबोळ्याची खाला' या गोष्टीत जेव्हा 'सहा वर्षांनी भेटलेली' (पुन्हा एकदा काळाचं अंतर) खाला निवेदकाला 'लगीन केलंस का', असं विचारते तेव्हा तो एकदम भावूक होतो. "माझा चेहरा एकदम गोरामोरा झाला. भरत आलेल्या जखमेवरची खपली निघाली. त्या भाबड्या म्हातारीला काय सांगणार? आणि सांगून तिला ते काय समजणार? तिच्या तरुणपणी असलं काही असेल का?" हे निवेदकाच्या मनात येतं नि वाचकांना तो हे सांगून गोष्ट संपवतो. कोणत्याही कथेत उल्लेख येणाऱ्या प्रत्येक पात्राबद्दल लेखकाने सविस्तर लिहायलाच हवं, निवेदक पूर्वग्रहदूषित असू नये, अशा उद्देशाने हे लिहिलेलं नाही. पण 'तांबोळ्याची खाला'मध्ये कुंकू, हळद, बुक्का, दातवण, शेंगदाणे, फुटाणे, चुरमुरे, असे जिन्नस आठवडा बाजारात विकणारी मुस्लीम बाई हे पात्र केंद्रस्थानी आहे. अशा वेळी खुद्द गोष्टीत किंवा पुस्तकात कुठेच संदर्भ नसलेली, गोष्टीच्या कथनात काहीच भर न टाकणारी नि वाचकालाही काहीच कळू न देणारी तरुण निवेदकाच्या बहुधा प्रेमभंगाची खपली काढून लेखक गोष्टीचा शेवट करतो. पण 'बाबाखान दरवेशी'मध्ये आदल्या पानावर मार खाल्लेल्या बाईच्या अशा कित्येक खपल्या तो पाहात नाही, उचकटून जखमेची खोली मोजत नाही. (एक-दोन वाक्यांतसुद्धा ही खोली गाठणं लेखकाला शक्य होतं).
दुसरं उदाहरण- 'बन्याबापू' हे शब्दचित्र एका ब्राह्मण इनामदार व्यक्तीचं आहे. त्याचा सरंजामी थाट आता ओसरलेला आहे, पण वागणुकीत मात्र सरंजामी अवशेष टिकून आहेत. त्या संदर्भात निवेदक 'मी' म्हणतो : "व्यवहारी जगात बापूंची किंमत 'एक भंपक' माणूस म्हणून होईल. त्यांचा चांगुलपणा वजा टाकूनच लोक बोलतील, 'हं, या अशा उधळेपणानंच सारं गमावलं! आता चार जमिनी राहिल्या आहेत त्याही पुरी-बासुंदीपायी फुंकून टाकतील आणि बसतील झालं!' अशा शब्दांनीच त्यांची संभावना होईल. होईना बापडी! पण बापूंची दानत सुटणार नाही. अभिमान संपणार नाही. जवळचं सारं दुसऱ्याला वाटून टाकून निष्कांचन होऊन बापू एके दिवशी समाधानानं हसतील, असं मला नेहमी वाटतं!" (पान ५४)
'दानत', 'जवळचं सारं दुसऱ्याला वाटून टाकून समाधानानं हसणं', हे एकंदर सरंजामी व्यवस्थेविषयीचं निवेदक 'मी'चं आकलन! या गोष्टीच्या सुरुवातीलाच देशमुख-देशपांड्यांचे (ब्राह्मण) किंवा गायकवाड-धायगुड्यांचे (मराठा) अवाढव्य वाडे लहानसहान खेड्यात अवशेषरूपात कसे दिसतात, याचा उल्लेख येतो. "वेळप्रसंगी साऱ्या गावकऱ्यांनी त्याच्यात खुशाल आश्रय घ्यावा," असे हे वाडे होते असल्याचं निवेदक म्हणतो (पान ४९). सरंजामी व्यवस्थेविषयीचं आश्रयदातृत्वावर भर देणारं हे वर्णन आहे. आधी म्हटल्याप्रमाणे, निवेदकाचं आकलन काहीही असू दे, लेखकसुद्धा या गुंतागुंतीच्या सामाजिक नि व्यक्तिगत व्यवहारांबद्दल अधिक काही सुचवत नाही, शोधत नाही, आणि या संबंधांमध्ये झालेल्या बदलांविषयी आठवणीपलीकडे काही बोलत नाही. भाषा, अनुभव, तपशील, यांचं सामर्थ्य असलेल्या माडगूळकरांसारख्या लेखकाला काही ठिकाणी ही अशी नेणिवेची मर्यादा पडली असावी. त्यामुळे गोष्टींची व्याप्ती नि खोली आणखी कितीतरी विस्तारण्याच्या शक्यता खुंटल्या. शिवाय, '(जाणीव सुखावणारी) मिठाई खावी, (नेणीव दुखावणारा) मिठाईचा कारखाना बघू नये', अशा दृष्टीने 'माणदेशी माणसे'चं वाचन होण्याचा धोकाही बहुधा वाढला.
दोन
व्यंकटेश माडगूळकर (५ एप्रिल १९२७ - २८ ऑगस्ट २००१) स्मृतिदिन परवाच्या २८ ऑगस्टला होऊन गेला, आणि आज १७ सप्टेंबर रोजी शरद् पाटील (१७ सप्टेंबर १९२५ - १२ एप्रिल २०१४) यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शेवट होतो आहे, हे या नोंदीचं निमित्त.
![]() |
मुखपृष्ठ : मेहबूब शेख (मावळाई प्रकाशन, २०१७) |
पाटलांच्या इतिहासविषय मांडणीप्रमाणे कलाविषयक जाणीव-नेणिवेसंदर्भातली मांडणीही अनेक ठिकाणी अतिशयोक्तीपूर्ण, तर काही वेळा सरसकट विधानांनी ग्रासलेली आहे. एका पुस्तकाचं २००० साली परीक्षण करताना ते भारतात 'जातिव्यवस्था आसन्नमरण झालेली आहे', असं विधान करून जातात; तिथे न थांबता लेखिकेचं नाव अरुंधती असल्यामुळे 'अरुंधती' या शब्दाचा प्रााचीन स्त्रीसत्तेशी कसा संबंध आहे याबद्दल निरीक्षणं नोंदवून या विसाव्या-एकविसाव्या शतकातल्या लेखिकेच्या लेखनकृतीशी त्याची सांगड घालण्याचा धोकादायक प्रयत्न करतात ("अरुंधती रॉयची जातिविरोधी प्रेमाची शाश्वत कादंबरी", साधना साप्ताहिक, ६ मे २०००). किंवा भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू' कादंबरी आवडल्यावर पाटील तिचा त्यांच्या मतानुसार मोठेपणा सांगण्यासाठी अतार्किक कारणं नोंदवतात : "ही कादंबरी महाराष्ट्राचा मिरासदार शेतकरी 'मराठा' लिहू शकला नसता,... जसे फुले माळी या दुय्यम शेतकरी जातीतून निघाले, तसे नेमाडे लेवा या दुय्यम शेतकरी जातीतून निघाले. हे कारण पहिले. ... दुसरे कारण त्यांच्या जन्माचे. त्यांना एका नवप्रसूत अस्पृश्य मातेने एक थाना पाजून जगविले. तिने त्यांना , 'अनन्य', 'स्वलक्षण' भारतीय समाजाकडे पाहायची अब्राह्मणी दृष्टी दिली."('अब्राह्मणी साहित्याचे आणि कलांचे सौंदर्यशास्त्र, पान २४३). अशा कल्पनारम्य विधानांना ते कोणताही आधार देत नाहीत. यात सर्वांत मोठा धोका म्हणजे- लेखकव्यक्तीच्या चरित्रात्मक माहितीच्या आधारावरच निर्णायक दावे केले जातात. मग एखाद्या वेळेस चरित्रात्मक माहिती चुकली की निष्कर्षही कोलमडतात (शरद् पाटलांनी इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांच्या जातीबाबत आधी चुकीच्या माहितीआधारे विधानं केली, आणि मग जात वेगळी असल्याचं त्यांना कळलं. ते त्यांनी कबूलही केलं. पण अशा गोष्टींमुळे त्यांच्या मांडणीचं महत्त्व उणावण्याचा धोका समजून घ्यायला हवा).
अशा वेळी पाटलांचा मूळ मुद्दा लक्षात घेऊन संहितेचं वाचन करण्यावर लक्ष केंद्रित करणं हे अधिक उपयोगी ठरू शकेल असं वाटतं. या नोंदीच्या पहिल्या भागात 'माणदेशी माणसे'बाबतीत तसा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माडगूळकरांच्या चरित्रात्मक माहितीचे दाखले फारसे दिलेले नाहीत. त्यांच्या गावाकडच्या अनुभवासंदर्भात आणि 'माणदेशी माणसे'च्या लेखनाआधी त्यांनी कोणती तयारी केली यासंदर्भात त्यांच्याच लेखनातले काही उल्लेख आले तेवढेच. बाकी, खुद्द संहितेत कोणत्या संवेदना आणि जाणिवा किंवा नेणिवा प्रतिबिंबित होतात, त्याचा शोध घेणं बरं वाटतं.
पाटलांनी काही सखोल परीक्षणं लिहिली आहेत. उदाहरणार्थ, 'कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष ('अब्राह्मणी साहित्या आणि कलांचे सौंदर्यशास्त्र, पानं ३ ते ८) या निव्वळ पाच-सहा पानी लेखात ते खुद्द 'कोसला' कादंबरीविषयी काहीच बोलत नसले तरी त्यातल्या नायकाच्या परात्मतेमागची सामाजिक-ऐतिहासिक पार्श्वभूमी उत्कृष्टपणे उलगडून दाखवतात. मग एकेका वाक्यात 'कोसला' तसंच 'चांगदेव चतुष्टया'तील कादंबऱ्यांमध्ये नायकांच्या विशिष्ट स्थितीबद्दल टिप्पणी करून लेख संपतात. इथे ते लेखकाच्या चरित्राबद्दल अवाजवी दावे करायला जात नाहीत, तर कादंबरीतल्या पात्रांच्या पार्श्वभूमीचं साधार विश्लेषण करतात आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामाबद्दल बोलतात, त्यामुळे ते प्रस्तुत आणि मार्मिक ठरतं.
व्यंकटेश माडगूळकरांनी दलित जीवनावर लिहिलेल्या कथांचं 'ओझं' या नावाचं एक स्वतंत्र पुस्तकच गो. मा. पवार यांनी संपादित केलेलं आहे (मेहता पब्लिशिंग हाऊस, २०२० [१९८७]). माडगूळकरांच्या साहित्यात अस्पृश्य मानल्या गेलेल्या, तसंच भटक्या व आदिवासी समूहांमधली पात्रं कशी आली, याची चर्चा पवारांनी केली आहे. त्यातल्या काही कथांबाबतीत विश्लेषण करताना आपण 'माणदेशी माणसे'सारखेच निष्कर्ष काढू शकतो असं नाही. तिथे त्या संहितेलाही जाणीव-नेणिवेचा पाटलांना अपेक्षित तर्क लावता येईल आणि वेगळे निष्कर्ष निघाले तर ते स्वीकारता येतील, अशी तयारी ठेवायला हवी. (तसंच, गांधीहत्येनंतर झालेल्या ब्राह्मणविरोधी दंग्यांच्या पार्श्वभूमीवरचं कथानक मांडणाऱ्या 'वावटळ' या त्यांच्या कादंबरीचंही मूल्यमापन करता येईल. विषय नि लेखकव्यक्ती, यांबद्दलची आपली मतं संहितेवर लादण्याऐवजी त्या संहितेतली गुंतागुंत उकलणं, त्यात वरील तर्कानुसार समोर येतील ते निष्कर्ष पडताळणं, असं शक्य आहे). अन्यथा, कोणत्याही व्यक्तीने काय लिहिलं हे न बघताच फक्त तिच्या सामूहिक संलग्नतेबद्दलच्या अनुमानाआधारे थेट दावे करायला जाणारी तथाकथित समीक्षापद्धती रूढ होण्याचा धोका आहे. मग मराठा मिरासदार जातीतल्या व्यक्तीला अमुक लिहिता येणार नाही, दुय्यम शेतकरी जातीतला असल्यामुळे नि अस्पृश्य आईच्या एका थानाचं दूध प्यायल्यामुळे अमुक लिहिता येतं, किंवा दलितांना तमुक लिहिणं शक्य होत नाही- अशीही सरसकटीकरणं समीक्षेच्या नावाखाली होत जातात. शिवाय, सामाजिक जाणिवेच्या नावाखाली कथा-कादंबऱ्यांमधल्या पात्रांना आपल्या विचारसरणीच्या सोयीची (पुरोगामी भासणारी) वाक्यं बोलण्यापुरतं वापरलं जातं आणि कवितांमधली लय नि प्रतिमा जाऊन गद्य घोषणा उरतात.
"आत्यंतिक स्वीकारात जसे सर्वच ग्राह्य, तसे आत्यंतिक नकारात सर्वच त्याज्य. पण, आत्यंतिक नकारातून उलटा सूड (Nemesis) उद्भवतो, अस्वीकृत तत्त्वज्ञानातील नेमके कालबाह्य वा प्रतिगामीच विद्रोहींच्या बोडख्यावर बसते," असा इशारा पाटलांनीच देऊन ठेवला होता ('अब्राह्मणी साहित्य आणि कलांचे सौंदर्यशास्त्र', पान ६७).
या नोंदीच्या पहिल्या भागात पाटलांच्या दोन पुस्तकांमधल्या प्रस्तुत आणि महत्त्वाच्या वाटलेल्या भागांना एकत्र करून काही सारांश दिला आहे. त्यात 'सनियमी प्रतिक्रिया' आणि 'अनियमी प्रतिक्रिया' असे शब्दप्रयोग अनुक्रमे 'conditioned reflex' आणि 'unconditioned reflex'साठी केले. पाटलांनी त्यासाठी वापरलेले शब्द अनुक्रमे 'सोपाधिक प्रतिक्रिया / प्रतिक्षेप' आणि 'निरुपाधिक प्रतिक्रिया / प्रतिक्षेप' असे आहेत (शासकीय कोशांमध्येही साधारण हेच शब्दप्रयोग दिलेले आहेत). 'सनियमी' आणि 'अनियमी' हेसुद्धा रोजच्या वापरातले शब्द नाहीत, पण ते 'सोपाधिक' आणि 'निरुपाधिक' यांच्यापेक्षा तुलनेने सुबोध मानले जातील, अशी आशा वाटते. अशा पद्धतीच्या विश्लेषणासाठी लागणारी परिभाषा रुळवण्यासाठीचे मंच मराठीत जवळपास संपलेले आहेत. त्यावर काही चिकित्सक चर्चा / संवाद करण्यासाठीच्या जागाही दिसत नाहीत. शरद् पाटलांसारख्या विचारवंताच्या बाबतीत मतभिन्नता आणि सहमती यांच्या आधारे चर्चा झाली, तर आपला भवताल समजून घेण्यासाठी काही उपयोगी साधनं हाती लागू शकतील, असं वाटतं. "मतभेदातूनच एकूण ज्ञानाचा विकास होत असतो. मतभेदांचा संघर्ष करण्यासाठी व्यक्तिस्वातंत्र्य लागतं. व्यक्तिस्वातंत्र्य परमतसहिष्णूतेतून व परमतआकलनातून" वापरायला हवं, असं पाटलांनीच एका ठिकाणी म्हटलं आहे ('अब्राह्मणी साहित्य आणि कलांचे सौंदर्यशास्त्र', पान १३३). हे नाही केलं तर, त्यांच्या ठराविक व्यक्तिगत विधानांचं आणि वादग्रस्त मुद्द्यांचं त्यांच्याच भाषेसह पठण केलं जाईल, त्यातून व्यक्तिस्तोम होऊन आणखी एका पंथाची भर पडेल, असं वाटतं. किंवा या कशातच फार पडण्यात रस नसलेली मंडळी जमेल तितपत, परवडेल तितपत 'मिठाई' खात राहतील, त्यातल्या साखरेने छान गुंगी येईल. बाकी, 'मिठाईचे कारखाने' आपले आहेत तसे सुरू.
*
या सूत्राशी संबंधित आधीच्या दोन नोंदी:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा