Friday, 20 July 2012

संस्कृती, शेती नि सुट्ट्या

- प्रा. सोपान बोराटे, भुसावळ

हल्लीच्या युवक पिढीबद्दल एक तक्रार अशी की, त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल काही वाटतच नाही. आपले सण, उत्सव हल्ली विसरले जातायेत. आपलं गाव, आपली माणसं याबद्दल त्यांना आत्मियताच वाटत नाही.
वरवर पाहता ही तक्रार खरी वाटेलही. पण हे असं का होतंय याचा विचार केला तर आपलं नेमकं कुठे चुकतंय ते लक्षात येईल.

यांत्रिकीकरणाचा एक अपरिहार्य परिणाम असा होतो की, त्यामुळे समानता निर्माण होते, विविधता नष्ट होते. परिणामतः ज्यांना यांत्रिकीकरणाचे फायदे हवे आहे, त्यांना विविधता म्हणजेच स्वतःचे खासपण, वेगळेपणा त्यांची इच्छा असो अथवा नसो सोडून द्यावेच लागते. इथे आपण हे विसरतो की, दर दहा-बाहा मैलांवर भाषा बदलते, भाषा बदलली की संस्कृती बदलते, संस्कृती बदलली की चालीरिती बदलतात. अशा बदललेल्या माणसांसाठी त्यांच्यातील माणूसपण जपून विविधता सांभाळावी लागते. पण हल्ली तसे होतंच असं नाही.

आधुनिकतेच्या नावाखाली, जागतिकीकरण, उदारीकरणाच्या नावाखाली आम्ही संगणकाच्या माध्यमातून समानता आणू पाहातोय. त्यातील एक साधे उदाहरण म्हणजे सर्वत्र (सध्या राज्यभर आणि उद्या-परवा कदाचित संपूर्ण देशात) सुट्ट्या समान असतील. सर्व शाळा एकाच दिवशी सुरू होतील, एकाच दिवशी बंद होतील. सध्या याचा परिणाम असा दिसतोय की, स्थानिक संस्कृतीचा विचार करता जेव्हा सुटी हवी तेव्ही ती नसते. परिणामी विद्यार्थी जेव्हा घरात, गावात तो सण-उत्सव साजरा करण्यासाठी, त्याची पूर्वतयारी करण्यासाठी घरात हवा तेव्हा तो शाळा-महाविद्यालयात असतो. परिणामी संस्कृतीचा संस्कार त्याच्यावर पुरेसा होत नाही.

कधी कधी सुटी हवी असे विद्यार्थ्यांना वाटते, पण नियमात नसते. मग विद्यार्थी 'कॉमन ऑफ' घेतात. परिणामी शाळा भरते पण उपयोग शून्य!

फोटोचे हक्क 'रेघे'कडेच आहेत.
मग, हे टाळण्यासाठी असं काही करता येईल का? ज्यामध्ये एक समान सूत्र असं असेल की, वर्षातून किती दिवस शैक्षणिक संस्थांचे शैक्षणिक कामकाज चालावे हे शासन ठरवेल आणि कोणत्या सुट्ट्या गरजेच्या हे स्थानिक प्रशासन (ग्राम शिक्षण समिती, तालुका शिक्षण समिती, जिल्हा शिक्षण समिती) ठरवेल आणि त्याच सुट्ट्या घेतल्या जातील. नियमानुसार असणाऱ्या पण अनावश्यक सुट्ट्या टाळल्या जातील. आणि आवश्यक असणाऱ्या पण नियमात नसणाऱ्या सुट्ट्या दिल्या जातील. अशा सुट्ट्यांचे प्रमाण जास्त असावे; मात्र वर्षाचे, प्रत्येक सत्राचे एकूण अध्यापनाचे दिवस पूर्ण भरायलाच हवेत. त्यामुळे स्थानिक गरजाधारित सुट्ट्या घेता येतील. विद्यार्थ्यांना संस्कृतीशी जोडता येईल. त्यांना त्यांची संस्कृती समजेल. तिचा आदर राखणे जमेल.

भारत हा कृषिप्रधान देश म्हणतात. पण शाळा आणि शेतीचे वेळापत्रकच असं असतं की, जेव्हा शेतीत मनुष्यबळाची गरज तेव्हा शेतकऱ्याची तरुण मुलं शाळेत, परीक्षेच्या पूर्वतयारीत व्यस्त असतात. मुलांना शेतीकामात गुंतवावे तर अभ्यास होत नाही आणि अभ्यास करत राहिले तर शेती कामाला माणसं मिळत नाहीत. (साधारण गहू, ज्वारीची सुगी आणि दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा यांचा विचार करावा.) मग माझ्या शेतीतले काम माझे नाही, माझ्यासाठी नाही. मी दुसरीकडे नोकरी शोधायची आणि घरात, शेतीत सालदार मिळवण्यासाठी धडपड चालू! परिणामी हल्ली एक भयावह चित्र खेड्यांमध्ये दिसेल - एकीकडे शासनाकडे नोकरी मागणारी, बेरोजगार भत्ता मागणारी सुशिक्षितांची फौज दिसेल आणि त्याच वेळी शेतीकामाला मजूर मिळत नाही म्हणून अगतिकपणे यांत्रिकीकरणाकडे वळणारा शेतकरी दिसेल. परिणाम? औषधीकरण, रासायनिक शेती - जिचे दुष्परिणाम सध्या आपण भोगतोय. म्हणून सेंद्रीय शेतीचा ओढा वाढतोय.

हे टाळण्यासाठी आमच्या परीक्षा, समारंभ, सत्रसमाप्ती शेतीच्या सुगीच्या हंगामाशी निगडीत करता येईल का? त्यामुळे शेतकऱ्यांना खरी मनुष्यबळाची गरज असताना शेतकऱ्यांची शिकणारी मुलं शेतीकामासाठी घरात उपलब्ध होतील, तरीही त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. हल्ली फेब्रुवारी, मार्च, एप्रिल विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा हंगाम तर, पालक-शेतकऱ्यांचा शेतीचा हंगाम. दोघंही एकमेकांना इच्छा असूनही मदत करू शकत नाहीत. आणि उन्हाळ्यात सुगीही संपते आणि अभ्यासही! मग दोघंही मोकळे!

***
प्रा. सोपान बोराटे,
मानसशास्त्र विभाग,
श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालय,
भुसावळ.

2 comments:

  1. Sheetal Bhangre wrote on Facebook-
    ही कल्पना छान आहे. फक्त व्यवस्थापनात केलेल्या बदलामुळे अनेक गोष्टी साध्य होऊ शकतील. मुलं जेव्हा काम करण्याजोगी होतात तेव्हा त्यांची शाळेतून होणारी गळतीही कमी व्हायला मदत होईल असं झालं तर.

    ReplyDelete
  2. Ashwini Kamble commented on Facebook-
    तेवढी इच्छाशक्ती आहे का हे नियम करण्याची? कल्पना आहेत, शक्य आहेत पण होत नाही तसं.. तेवढा विचार, त्याची गरज, तेवढा प्रसार व्हायला हवाय.. तो होत नाही.

    ReplyDelete