Friday, 24 August 2012

दुष्काळ, गुरं नि शेतकरी

'अल-जझीरा' या कतारमधल्या (नि एकूणच आखाती देशांमधल्या) प्रसिद्ध वाहिनीच्या इंग्रजी संकेतस्थळावर महाराष्ट्रासह पश्चिम भारतातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. एकूण ११ फोटो आणि १,३३० शब्द आणि दोन मिनिटं चाळीस सेकंदांचा एक व्हिडियो एवढ्याच सामग्रीने बनलेला हा रिपोर्ट. परदेशातील माध्यमसंस्था असूनही ज्या पद्धतीने हा रिपोर्ट तयार केलाय ते विशेष आहे आणि अर्थात दुष्काळही! या रिपोर्टमधील थोड्याशा भागाचं हे भाषांतर -


ती अकरा वर्षांची आहे आणि बोनेवाडी (जिल्हा- सातारा) इथे तिची आई, दोन बहिणी आणि एक भाऊ यांच्यासोबत राहाते. ती सहावीत आहे आणि शाळेत जाण्यासाठी तिला तीन किलोमीटर चालावं लागतं. संध्याकाळी आपल्या गाईंना चारा देण्यासाठी तिला सात किलोमीटर चालून चारा छावणीवर जावं लागतं. तिचं नाव आशा. साधारण परिस्थिती एका कुटुंबाच्या गरजा भागवू शकेल अशी ११ एकरांची जमीन असलेल्या एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेली आशा.

आणि हे आहेत दिगंबर पांडुरंग आटपाडकर, वय ७० वर्षं वरकुटे मलवडी गावात त्यांची ६० एकर जमीन आहे नि चार विहिरी आहेत. गुरांना चारा देण्यासाठी ते आणि त्यांची पत्नी १० किलोमीटर चालून या छावणीवर आलेत. आपल्या आठ प्राण्यांना जगवण्यासाठी अन्न आणि निवारा पुरवणाऱ्या या छावणीवर त्यांना यावं लागलंय.

भारतात दुष्काळाचा फटका बसलेल्या अनेकांपैकी आशा आणि आटपाडकर हे दोघं. विशेष म्हणजे जनावरांसाठीच्या या छावण्यांकडे वळावं लागलेले बहुसंख्या शेतकरी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आहेत. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा लोकसभा मतदारसंघात असलेल्या या भागात या वर्षी २१ चारा छावण्या उभारण्यात आल्यात. महाराष्ट्रातील सिंचन योजनांसाठी लाखो रुपये खर्च केल्याचा दावा त्यांनी नुकताच केला होता.



साताऱ्यातली एक चारा छावणी. फोटो- माणदेशी फौंडेशन / अल-जझीरा
प्राण्यांना फटका़
भारतात २००९नंतर पहिल्यांदाच पडलेल्या या दुष्काळाने धान्याचा तुटवडा जाणवणार नाही, कारण देशाची धान्यकोठारं तांदूळ नि गव्हानं वाहून जातायंत आणि सलग तिसऱ्या वर्षी साखरेचं उत्पादन मागणीपेक्षा जास्त झालंय. पण जनावरांच्या चाऱ्यासाठी लागणाऱ्या धान्यांच्या पिकाला मात्र या दुष्काळाचा फटका बसणार आहे. गाईगुरं आणि जमिनीचा तुकडा हीच मुख्य संपत्ती असलेल्या अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.

'चारा उपलब्ध होण्यात अडचण आल्यामुळे गुरांच्या संख्येवर परिणाम होणार आहे.. पण गरीबी रेषेखालील व्यक्तींना शासकीय वितरण व्यवस्थेमार्फत अन्नधान्य पुरवलं जाऊ शकतं, जेणेकरून त्यांना आपलं कुटुंब जगवता येईल', असं 'ऍक्शन एड' संस्थेचे अमर नायक 'अल-जझीरा'शी बोलताना म्हणाले.

कर्नाटक, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या चार राज्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे.

'आमच्या गावात पाणी नसल्यामुळे आम्ही इथे आलोय. जनावरांसाठीही नाही आणि आमच्यासाठीही पाणी नाहीये. इथे आमच्या गुरांना ऊस, मका, चारा, सुका चारा, हिरवा चारा मिळतो नि आम्हाला तांदूळ नि इतर धान्य मिळतं' - आपल्या अमूल्य गुरांचा जीव वाचवण्यासाठी घर सोडलेले आडपाडकर म्हणाले.

1 comment:

  1. Snehal Bansode wrote on Facebook-
    ''‎'अल- जझीरा' वगैरे महाराष्ट्रातील दुष्काळाची दखल घेतो म्हणजे थोरचंय..पण काही मराठी माध्यमांनीही दुष्काळाची चांगली दखल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे...''

    ReplyDelete