Tuesday, 30 October 2012

मध्यमवर्गियांचा पुढारी

- भाऊ पाध्ये

आपण कोसळल्याचं गेल्याच आठवड्यात बाळ ठाकरेंनी मान्य केलंय  आणि आता वर्षअखेरीपर्यंत तोंड उघडणार सल्याचं राज ठाकरे बोलून गेलेत. त्यामुळं दरम्यानच्या काळात आपण बोलू शकतो. आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज भाऊ पाध्यांची पुण्यतिथी आहे. अशी सगळी निमित्तं साधत भाऊंचा हा बाळ ठाकरेंवरचा लेख 'रेघे'वर प्रसिद्ध होतो आहे. हा लेख मूळ १९९४-९५च्या आसपास 'महानगर'मध्ये आला असावा. पण त्याचा नक्की अंदाज नाही. जी फोटोकॉपी केलेली प्रत हातात आलेय ती फक्त या लेखाची चार पानं आहे, त्यात प्रकाशनाचा उल्लेख नाही, पण साधारण अंदाज. कोणाला या लेखाच्या मूळ प्रसिद्धीचा तपशील माहीत असल्यास सांगितला तर तसा बदल इथं करून घेता येईल.
भाऊंबद्दलचा ब्लॉगही 'रेघे'वरचा एक प्रकल्प आहे, तोही वाटल्यास पाहाता येईल.
मध्यवर्गियांचा पुढारी
- भाऊ पाध्ये

प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात मला बाळ ठाकरेंचा एक निकटवर्तीय भेटला. गप्पा मारता मारता ठाकरे बंधू आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींबद्दल आदर कसा दाखवतात, हे तो साभिनय सांगू लागला. ठाकरे बंधूंची ती रीत इतकी हास्यास्पद आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या कुचेष्टा करणारी की मला कपाळावर हात मारून घ्यावासा वाटला. ठाकरे बंधूंना आता सत्ता मिळवण्याची खाज सुटली होती. सत्तेमध्ये पैसा आणि लौकिक असतो एवढंच त्यांना ठाऊक होतं.

तीस-चाळीस वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्र बनवण्याचं श्रेय घेण्यात प्रसोपा (प्रजा समाजवादी पार्टी) आणि कम्युनिस्ट पक्षात स्पर्धा सुरू झाली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यापासून बाळ ठाकरे नावाचा एक नवा नेता क्षितिजावर चमकू लागला. दैनिक 'नवशक्ति'मध्ये छापण्यात येणारी त्यांची व्यंग्यचित्रं फारच लोकप्रिय झाली. मराठी माणसाचं कल्याण करण्यासाठी त्यावेळी जो तो धडपडत होता. एक एक मराठी माणूस आपल्या कळपात ओढण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यामुळे एक ओंगळवाणी परंपराच सुरू झाली होती. ज्येष्ठ व्यक्तींबद्दल अनादर व्यक्त करण्याची. कोणीही कितीही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती असली तरी तिच्याबद्दल अनादर व्यक्त होईल असं सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरून बोललं जाऊ लागलं. याने काम केलं, त्याने काम केलं? असे प्रश्न विचारून प्रत्येकाच्या समाजसेवेची शंका घेतली जाऊ लागली. यातल्या अहमहिकेमुळे आपण किती खालच्या पातळीवर जातो याचं ज्याला त्याचा भूषण वाटू लागलं आणि कम्युनिस्ट-प्रसोपा या मराठी माणसाचं कल्याण करणाऱ्या मंडळींत 'शंकर्स विकली'च्या धर्तीवर मराठीतील 'मार्मिक'सारखं व्यंग्यचित्रं साप्ताहिक काढणाऱ्या बाळ ठाकरे यांची शिवसेनाही आली. प्रथम हे नवीन लोक कोण आहेत असं प्रत्येकाला कुतूहल होतं. पण एका दसऱ्याला त्यांनी प्रचंड सभा घेऊन आपली शक्ती सर्वांना दाखवली.

बाळ ठाकरे (Photo courtesy: BCCL)
बाळ ठाकरेंनीही सार्वजनिक सभेत बोलताना कोणत्याही आदरणीय व्यक्तीबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन बोलायला सुरुवात केली. म्हणूनच, शिवसेनेला काही शहाणे लोक संयुक्त महाराष्ट्राचं कार्टून म्हणत. याने देशासाठी काय केलं, त्याने देशासाठी काय केलं? ही ठाकरेंची भाषा. काहीही न करणाऱ्या मध्यमवर्गाला प्रिय. ही मध्यमवर्गीय प्रवृत्तीच बाळ ठाकरेंनी जोपासली. मध्यमवर्गाला नेहमी काळजी, देशावर प्रेम करण्याचा अधिकार कुणाला आहे? शिवसेनेने ठरवलं की तो इझमच्या मागे लागणाऱ्या मंडळींना नाही. आपल्याकडे ओंगळ बोलणाऱ्यांना मौलिक विचार मांडण्याचं श्रेय मिळतंच.

डाळिंब्या, दात कोरून पोट भरण्याची कला, किडकिडीत देहयष्टी या सी.के.पी. जमातीतील बाळ ठाकरे. त्यांच्या अंगावर प्रतिष्ठितपणाचा आव आणणारी शाल, त्यांच्या मनगटावर धार्मिक खूण असणारी रुद्राक्षाची माळ अशी हल्ली बाळ ठाकरेंची मूर्ती. मी 'नवशक्ति'मध्ये आलो तेव्हा त्या ऑफिसमध्ये त्यांचा संदर्भ आमच्या बोलण्यात निघत असे, बिनमहत्त्वाचा असा. खरं म्हणजे तो चांगला व्यंग्यचित्रकार होता. आमचा बाबा दळवी एक किस्सा सांगायचा. एका संपादकाला एक रेखाचित्र हवं होतं स्टॅलिनचं. तेव्हा बाळ ठाकरेने ते काढून दिलं. तो संपादक म्हणाला, 'धिस इज द पिक्चर आय वॉन्ट'. असा हा रेषांचा जादूगार मी येण्यापूर्वीच 'नवशक्ति- फ्री-प्रेस'मधून नाहीसा झाला. त्याची एक फूटपट्टी मात्र राहिली. तिच्यावर त्याची बाळ ठाकरे अशी सही (इंग्रजीतली) होती. ती तेवढी माझ्याजवळ राहिली. त्याच्याविषयी बोलणारा एक मित्र मला भेटला तो म्हणजे हरिन मेहता. तो अनेक गोष्टी सांगायचा माझ्याकडे. गुरुदत्तविषयी, व्ही. शांतारामविषयी आणि ठाकरेंच्या शिवेसेनेच्या हस्तकांविषयी. इंग्लिश भाषेतील शंकर्स विकलीच्या धर्तीवर त्याने त्याच वेळी मार्मिक नावाचं व्यंग्यचित्र साप्ताहिक काढलं होतं. पण शंकर आणि बाळ ठाकरे यांच्यात फरक होता की, शंकरने लहान मुलांसाठी लायब्ररी काढली, त्यांच्यासाठी चित्रकलेची स्पर्धा ठेवली, तर बाळ ठाकरेंनी मार्मिकमधून दाक्षिणात्य अधिकाऱ्यांची यादी द्यायला सुरुवात केली. व्यंग्यचित्रकारात असलेल्या माणुसकीचा हा ऱ्हास होता. बाळ ठाकरेंमध्ये शोधूनही माणुसकी सापडणार नाही. सत्ताबाजांचं असंच असतं. ते आपले जुने मित्र विसरतात. मित्रांची किंमत लावून त्यांना जवळ किंवा दूर ठेवतात.

१९६२ साली भारताने चीनकडून मार खाल्ला. पासष्ट साली लालबहादूर शास्त्रींमुळे भारताची अब्रू जेमतेम वाचली. त्यावेळेस भारताची इमेज उजळ करणारी आशा दिसायला हवी होती. त्याकाळामध्ये प्रत्येक भारतीयाला आपण देशासाठी बलिदान करायला हवं असं वाटत असे. पण त्यापूर्वी युद्ध संपून जात असे. फक्त त्याला एक नेत्याचा आदर्श मिळत असे.

१९६५ साली आपल्याला लालबहादूर शास्त्री मिळाले. १९७१ साली आपल्याला इंदिरा गांधी मिळाल्या. पण आपली कर्तृत्वाच्या अतृप्ततेची भावना अतृप्तच राहिली. आपले निखारे कधी बुजत नसत. बाळ ठाकरेंसारखा त्यावर फुंकर घालायला होता एवढंच.

बाळ ठाकरे हे उजवे नेते की डावे? ज्यावेळी इंदिरा गांधींनी काँग्रेसमध्ये फूट पाडली, त्यावेळी डावे आणि उजवे गट स्पष्ट झाले. मोरारजी देसाई, स. का. पाटील, संजीव रेड्डी ही उजव्या गटाची माणसं एका बाजूला आणि इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, जगजीवनराम ही डावी मंडळी दुसऱ्या बाजूला एकत्र आली. यात अशाही काही व्यक्ती होत्या की ज्यांची आयडेन्टीटी स्पष्ट झाली नाही. त्यात बाळ ठाकरे. देशभक्त म्हणून उजवे, महाराष्ट्राचे कनवाळू म्हणून डावे. त्यांना स. का. पाटलांचे चमचेही म्हणत. पण निवडणुकांमध्ये डाव्या जॉर्ज फर्नांडिसांनी स. का. पाटलांचा पराभव केल्यानंतर स. का. पाटील राहिले नाहीत. मग महाराष्ट्राला वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री लाभले. त्यावेळी शिवसेनेला वसंतसेना म्हणण्यात येऊ लागलं. बाळ ठाकरेंनी उजव्या मोरारजींना मुंबईमध्ये प्रवेशास बंदी करून डावखोरेपणा दाखवला. पाकिस्तानाकडून होणारी फरफट आणि चीनकडून मार मिळाल्याची नामुष्की यामुळे भारतीयांमध्ये श्रेष्ठ कर्तृत्वाची व्यक्ती राहिली नाही आणि काही मंडळींना प्रमोशन मिळालं, त्यापैकीच एक बाळ ठाकरे होते.

चीनकडून दणदणीत पराभव आणि पाकिस्तानकडून होणारी फरफट यामुळे भारतीय कर्तृत्व नष्ट झाल्यासारखंच होतं. चीनच्या हल्ल्यानंतर जवाहरलाल नेहरू 'ए मेरे वतन के लोगो'च्या तालावर रडले तेव्हा आपलं रडकं कॅरेक्टर स्पष्ट झालं आणि आपल्याला कर्तृत्ववान नेतृत्वाची गरज तातडीने वाटू लागली. माझी एकदा एका अमेरिकन तज्ज्ञाशी गाठ पडली. ते दिवसत अमेरिकेच्या निवडणुकांचे होते. तो अमेरिकन तज्ज्ञ म्हणाला, ''तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाही होणार. ही निवडणूक निक्सनच जिंकणार. पण तुम्ही का त्यामुळे नाराज होता? जगातल्या चार बलाढ्या राष्ट्रांपैकी तुम्ही आहात.'' पाकिस्तानचा पासष्ट साली आणि एकाहत्तर साली पराभव करूनही आपण त्यांना पुढेही मार देऊ असं म्हणण्यास आम्ही धजत नाही. तसं म्हणण्याची आमची हिंमत नाही. म्हणूनच रडकेपणाला मिसाल नाही असं म्हणावं लागतं. या आपल्या स्वभावाचा फायदा बाळ ठाकरेंनी पुरेपूर घेतला. 

'अधिकार कसा जमवतो' याकडेच त्यांचं लक्ष लागलं असावं. म्हणूनच 'कभी ये कभी वो' करत सत्ता संपादन करण्याचा जुगार बाळ ठाकरे खेळत राहिले. एकदा ते मधु दंडवतेंच्या प्रजा समाजवादी पक्षाबरोबर बसले, तर एकदा आठवले-ढसाळ यांच्याबरोबर बसले. पण त्यांना ठाऊक होतं, प्रसोपा, आठवले-ढसाळ यांच्याबरोबर युती करण्यात अर्थ नाही. कारण त्यांना इँटलेक्च्युअल म्हणून ओळखतात. त्यांनी इँटलेक्च्युअल्स कधीच जमवले नाहीत. कारण त्यांना ठाऊक होतं की, इंटलेक्च्युअल्सच्या हातून काहीच व्हायचं नाही. त्यापेक्षा हे भाजपवाले (भारतीय जनता पक्ष) आपलं डोकं वापरत नाहीत हे बाळ ठाकरेंना बरं वाटायचं. त्यांच्याशी युती करायला काहीच हरकत नाही. त्यांच्या लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढून व्ही. पी. सिंग सरकारमध्ये फूट पाडली. त्यावेळी त्यांनी बेकेट मित्र राजा हेन्सीसारखं या भाजपवाल्यांना विचारलं असेल की, 'डू यू युज यूअर हेड?' बाळ ठाकरेंनी भाजपसारखे बिनडोक आणि टची सहकारी मिळवले आणि युतीचं सरकार बनवलं. जोपर्यंत इंदिराजी होत्या तोपर्यंत त्यांच्या मुसलमानधर्जिण्या स्वभावाचे दृष्टांत घेऊन भाजपवाले शरद पवारांच्या पाठीमागे उभे राहिले. पण इंदिराजींच्या पश्चात त्यांनी शिवसेनेबरोबर युती केली आणि शरद पवारांच्या विरोधी झाले.

अखेर बाळ ठाकरेंना सत्तेच दर्शन घडलं. काँग्रेसच्या उद्दाम सत्तेला त्यांनी आव्हान देऊन काबूत आणलं. या कामी त्यांना भाजपची मदत झाली. त्यांचा मुस्लिमविरोध आणि टचीनेस हा अयोध्येपासून महाराष्ट्रापर्यंत प्रसिद्ध होता. त्याचा बाळ ठाकरेंनी चांगलाच फायदा घेतला. भाजपवाले उच्चवर्णीय. काँग्रेसला प्रथम शत्रू मानणारे. शिवसेनावाले काही वेगळे नव्हते. हे एकत्र आल्यानंतर काय मन्वंतर घडतं ते सर्वांना बघायचं होतं. मन्वंतर घडणार नव्हतंच. दोघांचं राजकारण काँग्रेसच्याच मागील पानावरून पुढे जाणार होतं. देशभक्तीचा दावा करणाऱ्या या दोघांनाही रान मोकळं झालं. आता त्यांनाही देशभक्त म्हटलं जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

अत्रे ते बाळ ठाकरे यांच्यामध्ये शिवीगाळ नेहमी चाले. पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्र्यांचे सहकारी असणारे बाळ ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे मुलाच्या बाजूने उतरले याचं मला आश्चर्य वाटलं. असो. आचार्य अत्रे कालांतराने वारले आणि या प्रकरणावर पडदा पडला.

बाळ ठाकरेंनी मग कम्युनिस्ट विरोधी टाकला आणि दाक्षिणात्य विरोध सुरू केला. दाक्षिणात्य परप्रांतीय असून ते मुंबईकर महाराष्ट्रीयांची गळचेपी करत आहेत असा प्रचार सुरू केला. फ्री-प्रेसमध्ये असं पिकलं की, बाळ ठाकरेंना एका दाक्षिणात्याने असा दम दिला होता की, त्याला नेहमी घरी जाताना संरक्षण लागत असे. दाक्षिणात्यांशी बाळचं वाकडं झालं त्याचं पुढे काय झालं ते मला ठाऊक नाही.

आपल्याविषयी जितके गैरसमज होतील तितके बाळला हवेच होते. गैरसमज हे एका सामान्य कर्तृत्वाच्या व्यंग्यचित्रकाराला राजकीय नेता होण्यासाठी आवश्यक असावेत. माझी खात्री आहे, प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला सत्तेचं आकर्षण असावं आणि आपण चार लोकांमध्ये गाजावं असं त्याला वाटत असतं. बाळला हे माहीत आहे की आपल्याला जे मिळतं ते याचमुळे. आपलं लोक ऐकतात ते त्यांना आपल्याविषयी वाटणाऱ्या आकर्षणामुळे. भाजपवाल्यांना आपला मुस्लिमविरोध का, हे समजलं नाही. मुस्लिमांना ते देशाशी देणं-घेणं लागतात हे मानतच नव्हते. म्हणूनच देशभक्ती हा हिंदूंचाच मक्ता आहे असं ते समजत. त्यामुळेच मुसलमानांना ते देशभक्तीपासून वगळतात. त्यांना ज्याप्रमाणे जनता पक्षाला दूर फेकता आलं त्याचप्रमाणे आपल्यालाही दूर करता येईल, असंही बाळ ठाकरेंना वाटतं. बाळ ठाकरे याचसाठी मुस्लिमविरोधी भूमिका घेऊन भाजपचा काटा काढायचं नाटक खेळत आहेत.
***

भाऊ पाध्ये

5 comments:

 1. absolutely loved it...e.g. "आपल्याकडे ओंगळ बोलणाऱ्यांना मौलिक विचार मांडण्याचं श्रेय मिळतंच" or "व्यंग्यचित्रकारात असलेल्या माणुसकीचा हा ऱ्हास होता. बाळ ठाकरेंमध्ये शोधूनही माणुसकी सापडणार नाही"...No wonder these people hated Bhau...only Bhau could have written this and maybe Ashok Shahane to large extent...just to add my two penny to this...I agree with Bhau when he says "तो चांगला व्यंग्यचित्रकार होता" but he is not even close to India's greats like Vasant Sarwate, R K Laxman, Abu Abraham...

  ReplyDelete
 2. Yusuf Shaikh commented on Facebook-
  हे असं फक्त भाऊच लिहू शकतो. अतिशय बारीक-सारीक गोष्टीमधून अतिशय मोठ-मोठे निष्कर्ष काढणे हे एरा-गबाळ्याचे काम नाही. आख्खा सांस्कृतिक परिवेश पचवून, समाजातील छोटे-मोठे ताण-तणाव आकलनात सामावून, वर्गीय हितसंबंध व्यक्तीवर कसे कार्यरत असतात याच व्यावहारिक ज्ञान आत्मसात करून एखाद्या घटनेचे सांगोपांग विश्लेषण फक्त भाऊच करू शकतो.
  बाळ ठाकरे यांच्याविषयी लिहिण्याचे भले-भलेसुध्धा टाळत असताना भाऊ रोख-ठोक लिहून ठाकरे यांची काय योग्यता आहे हे बाळबोध शब्दात ठाशीवपणे लिहितो.

  ReplyDelete
 3. जियो....'आपल्याकडे ओंगळ बोलणाऱ्यांना मौलिक विचार मांडण्याचं श्रेय मिळतंच....शंकर आणि बाळ ठाकरे यांच्यात फरक होता की, शंकरने लहान मुलांसाठी लायब्ररी काढली, त्यांच्यासाठी चित्रकलेची स्पर्धा ठेवली, तर बाळ ठाकरेंनी मार्मिकमधून दाक्षिणात्य अधिकाऱ्यांची यादी द्यायला सुरुवात केली. व्यंग्यचित्रकारात असलेल्या माणुसकीचा हा ऱ्हास होता. बाळ ठाकरेंमध्ये शोधूनही माणुसकी सापडणार नाही'....भाऊंनी त्या काळात सांगितलेलं आजच्या काळातही किती लागू होतंय..राज ठाकरेंच्यां बाबतीतही..(म्हणजेच दुर्देवाने आपला मूर्खपणाही सुरुच आहे) बाकी हे दोघं गप्प असल्यामुळे दरम्यानच्या काळात आपण बोलू शकतो..या वाक्यावर दे टाळी..!Hats off to this level of sarcasm.

  ReplyDelete
 4. लई भारी भाऊ.
  - कमलेश कुलकर्णी

  ReplyDelete
 5. What's unique about this piece?

  ReplyDelete

डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ट अथवा नेट बँकिंगद्वारे रेघेची 'ऐच्छिक वर्गणी' भरायची असल्यास इथे क्लिक करावं.