Tuesday, 11 March 2014

भाषेच्या कुंपणापलीकडची मोहफुलं

- समीक्षा अनिकेत आमटे
अनुवाद - विलास मनोहर

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात हेमलकसा या गावी लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून गेली चाळीसेक वर्षं आरोग्यसेवा, शिक्षण, इत्यादी कामं  सुरू आहेत. आदिवासी भागातल्या या कामाला तशी प्रसिद्धीही मिळालेली आहे. पण प्रसिद्धीचं वलय हे लांबून दिसतं ते, त्याशिवाय त्या वलयातला कमी-अधिक तपशीलही जवळून पाहायला हवा. असा एक तपशील या नोंदीत वाचकांना मिळू शकेल, अशी आशा. हा लेख मुळात 'द हिंदू'मधे ३ एप्रिल २०१३ रोजी प्रकाशित झाला होता. त्याचा मराठी अनुवाद 'रेघे'साठी उपलब्ध करून दिल्याबद्दल समीक्षा आमटे यांचे आभार. हा अनुवादही 'मित्रांगण' या त्रैमासिकात छापून  येणार आहे, असं कळलं. त्यापूर्वी 'रेघे'च्या वाचकांपर्यंत तो पोचतो आहे.

लोकबिरादरी प्रकल्पातल्या इतर कामांसोबत तिथल्या आश्रम शाळेत समीक्षा आमटे शिकवतात. आदिवासी विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासक्रम स्वीकारताना भाषेचं कुंपण किती नि कसं अडचणीचं ठरतं आणि त्यावर काही उपाय आहे का, या विचारातून त्या काही करू पाहतायंत, त्यासंबंधी हा लेख --
***

आमच्या अंगणवाडीत मुलांना जेव्हा 'सफरचंद' दाखवलं व विचारलं, 'हे काय आहे?' तेव्हा वर्गात शांतता होती. सर्व जण त्या फळाकडे काहीतरी नवीन वस्तू पाहिल्यासारखं करत होते. कोणीही सफरचंद पूर्वी कधी पाहिलं नव्हतं. नंतर जेव्हा मोहफूल त्यांना दाखवलं नि विचारलं की, हे काय आहे, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा पूर्वीचा गंभीरपणा क्षणात गायब होऊन प्रत्येक जणच बोलू लागला, 'हे गोड असतं', 'ह्याचा वास छान असतो', 'हे आम्ही वेचून साठवतो', 'आई ह्याचे छान लाडू करते', 'बाबा ह्याची दारू करतो'. बाप रे! हे ऐकून इतकं छान वाटलं! हे झालं कारण प्रत्येकाला मोहफूल माहिती होतं. त्यांनी त्याचा आस्वाद घेतलेला होता. ते केव्हा येतं, कुठं येतं, कधी येतं, त्याचा उपयोग काय, हे सगळं त्यांना माहिती होतं. त्यामुळं मोहाच्या फुलामुळे वर्गात एकदम उत्साह आला. मोहाची फुलं त्यांच्या जीवनाचा भाग आहेत. त्या फुलांशी या मुलांचं नातं आहे. त्यावरून त्यांना चव, आकार, काळ शिकवता येतो.

लोकबिरादरी शाळा - १
अंगणवाडीतली मुलं माडिया जमातीची आहेत. माडिया ही द्रविडी संस्कृतीचा भाग असलेली गोंड आदिवासी जमात आहे. हे माडिया जमातीचे लोक अबुजमाडच्या पहाडातून महाराष्ट्र, मध्य प्रदेश राज्यांच्या सीमाभागावरच्या मैदानी परिसरात स्थायिक झाले. अर्थात, काही लोक आजही अबुजमाड भागातच वस्ती करून आहेत. पूर्वी शिकार, कुंदमुळं नि जंगलातील इतर वस्तू गोळा करून त्यावर उपजीविका करणारे माडिया आता काही प्रमाणात जुन्या पद्धतींनी शेती करून लहान लहान गावांमधे राहातायंत. इथले हे मूळचे लोक, मुख्यत्त्वे मौखिक आणि एकभाषिक संस्कृती जपणारे आणि बाहेरच्या संस्कृतींशी किमान संबंध आलेले.

लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून या भागात १९७६ साली पहिली शाळा सुरू करण्यात आली. शाळेची संकल्पना तोपर्यंत इथं अस्तित्त्वातच नव्हती. हा भाग महाराष्ट्र राज्याचा भाग असल्यामुळे शिक्षणाचं माध्यम मराठीच ठेवण्यात आलं. पण त्यांची स्वतःची भाषा मात्र द्रविडी मूळ असलेली. आपल्या देशात भाषावार प्रांतरचना झाली तेव्हा ही जमात दोन राज्यांमधे वाटली गेली. इंद्रावती नदीमुळे अर्धी जमात मध्यप्रदेशात, तर अर्धी जमात महाराष्ट्रात विभागली गेली. आता मध्यप्रदेशाचा तो भाग छत्तीसगढ राज्यात आहे. जे महाराष्ट्रात आहेत, त्यांना मराठीतून शिक्षण. छत्तीसगढमधे आहेत त्यांना हिंदीतून शिक्षण. भाषेच्या आधारावर राज्यनिर्मिती करताना आपल्या या भावाबहिणींची भाषा कोणती आहे हे विचारात घेणंही कोणाला गरजेचं वाटलं नाही, त्यामुळे द्रविडी मातृभाषा असलेल्या या मंडळींना मराठी नि हिंदी या आर्य भाषक राज्यांचा भाग बनणं भाग पाडण्यात आलं. 

मुलं शाळेत जायला लागली नि त्यांना पूर्ण अज्ञात असलेल्या राज्यभाषेत सगळे विषय शिकणं भाग पडलं तेव्हा प्रश्नांचा पहाड उभा राहिला. त्यांना नुसती नवीन भाषा आणि लिपीच शिकायची नसते तर राज्य अभ्यासक्रमातली क्रमिक पुस्तकंही त्यांच्यासाठी अज्ञात जगातलीच वाटावीत अशी असतात. ही पुस्तकं ज्या मराठी भाषक मुलांना डोळ्यांसमोर ठेवून बनवलेली असतात त्यांच्याकडे वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत (पहिल्या तुकडीपर्यंत) किमान एक हजार शब्दांचा संग्रह वातावरणातूनच जमा झालेला असतो. उलट माडिया मुलांना मराठीचा एकही शब्द माहीत नसतो. आणि त्यांना फक्त मराठीसारखी परकी भाषाच शिकावी लागते असं नव्हे तर त्याच भाषेत गणित, पर्यावरण शास्त्र, सामाजिक शास्त्रं नि बाकीचे सगळे विषयही शिकावे लागतात. पाच वर्षांच्या मुलावर याचा मोठा ताण पडणं साहजिक आहे.

ही आदिवासी मुलं इतर मुलांच्या बरोबरीनं पुढं यावीत, या धोरणाखाली नि त्यातल्या दिवास्वप्नाखाली नवीन शाळा सुरू केल्या जातायंत आणि त्यांना प्रचंड निधीही उपलब्ध करून दिला जातोय. पण परकी भाषा, नवीन परिसर, कधीही ऐकण्यात न आलेले कसलेतरी संदर्भ यांनी भांबावलेली माडिया मुलं क्रमिक अभ्यासक्रमातही मागे पडल्यानं शिक्षणातला रसही गमावून बसतात. मग अनेक मुलं शाळेपासून दूर पळत राहतात आणि त्यांचे पालक घरातलं एक खाणारं तोंड कमी भरावं यासाठी मुलांना शाळेत पाठवण्याचा प्रयत्न करत असतात. 

लोकबिरादरी शाळा - २

शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर भाषा हा महत्त्वाचा मुद्दा असतो, कारण ते फक्त संवादाचं माध्यम नसतं तर पूर्ण संस्कृती नि त्यातून आलेल्या मूल्यांशी सांधणारा तो एक दुवा असतो. भाषा तटस्थ नसते. ती ज्या संस्कृतीचा भाग आहे त्या संस्कृतीचे गुणं नि संदर्भ तिच्यासोबत येतातच. मुलांना 'ज्ञात' असलेल्या घटकांशी तिचं अतिशय जवळचं नातं असतं आणि या नात्यातूनच शिक्षणात रस निर्माण होण्याच्या शक्यता वाढत असतात. सुरुवातीची काही वर्षं मातृभाषेतून शिक्षण होणं केव्हाही चांगलं, असं मानलं जातं. कारण लहान मूल जे पाहतं त्याच्याशी त्याचं मातृभाषेतल्या शब्दांनी आणि उच्चारांनी नातं असतं. मुलांनी जर एखादी गोष्ट कधी पाहिली नसेल, तिच्याबद्दल त्यांना माहिती नसेल, तिच्यासंबंधीचा अनुभवही त्यांना नसेल, तर तिला काय म्हणायचं हे सुचवणारा शब्द ते शिकतील कसे?

शिवाय, आजकाल असाही समज रूढ झालाय की, उच्चवर्गीयांच्या भाषेत शिकलं की जास्त ज्ञान प्राप्त होतं. त्यामुळे मग इतर भाषा, बोलीभाषा खालच्या दर्जाच्या ठरवल्या जातात नि सामाजिक उतरंडीत वरच्या पायरीवर जाण्यासाठी उच्च वर्गीयांचं, उच्च जातीयांचं अनुकरण करण्याची वृत्ती वाढते. हा समज तोडण्याचा प्रयत्न म्हणून लोक बिरादरीतल्या आश्रम शाळेने अंगणवाडीतल्या मुलांचं शिक्षणाचं माध्यम मराठीऐवजी त्यांच्या रोजच्या वापरातली माडिया करण्याचं ठरवलं. मोफत आणि सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क कायदा, २००९-नुसार बहुभाषक शिक्षण कार्यक्रम राबवला जाईल.

त्यातून क्रमाक्रमानं पहिलीतल्या मुलांना त्यांच्या मातृभाषेतून कमी आणि राज्यभाषेतून अधिक अभ्यासक्रम शिकवला जातो. हा अभ्यासक्रमही स्थानिक कालमानानुसार तयार करण्यात आलाय. शाळेच्या पहिल्या वर्षात त्यांना देवनागरी लिपीची ओळख करून दिली जाते, पण मराठी भाषा शिकण्याचा ताण त्यांना दिला जाणार नाही. त्यांच्या परिसरातील वस्तूंची, पदार्थांनी नावं  त्यांच्या बोलीभाषेतून देवनागरी लिपीत शिकवली जातात. त्यांच्या संस्कृतीतल्या गोष्टी, चालीरिती, सण, कालमान यांचा विचार करून हा अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमाशी निगडित पुस्तकंही शाळेनं तयार केली आहेत. शिवाय शाळेत नव्यानं आलेल्या मुलांची भीती कमी व्हावी यासाठी या टप्प्यावर त्यांना त्यांच्या समाजातील शिक्षक असावेत, याच्याकडेही काटेकोरपणे लक्ष दिलं जातं.  

शिक्षण मोफत आणि सक्तीचं करताना केवळ कायदा असणं पुरेसं नसून कायद्याच्या अंमलबजावणी आड येणारी अनेक कुंपणं तोडणंही आवश्यक आहे. माडिया मुलांच्या शिक्षण प्रवासात भाषेचं कुंपण आड येऊ नये यासाठीचा हा प्रयत्न. 
***

रेघेची टीप (२९ मे २०१४) - या लेखात उल्लेख आलेल्या उपक्रमामध्ये लेखात उल्लेख न आलेल्या किशोर वड्डे यांचा मोलाचा वाटा आहे.
तुम्हाला दिसतंय का काही तिथं, पलीकडं? (लोकबिरादरी शाळा - ३) (फोटो - रेघ)

No comments:

Post a Comment

डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ट अथवा नेट बँकिंगद्वारे रेघेची 'ऐच्छिक वर्गणी' भरायची असल्यास इथे क्लिक करावं.