Monday, 3 March 2014

नरेंद्र मोदी व राहुल गांधी : फलक तक चल साथ मेरे

नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार आहेत; तर राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, असं म्हणतात लोक. आणि लोक ज्या रस्त्यांवरून चालतात तिथं बाजूबाजूंना उभे असतात फलक. या दोन व्यक्तींसंबंधीचे / नेत्यांसंबंधीचे दोन फलक या नोंदीत आहेत. निवडणुकांसंबंधीं चर्चा सुरू झाल्यात नि आता निवडणुकाही सुरू होतील, हीच या नोंदीची निमित्तं म्हणा.

'रेघे'वर यापूर्वी एडवर्ड बर्नेस याच्या 'प्रॉपगॅन्डा' या पुस्तकासंबंधी एक नोंद केली होती. त्या नोंदीत या पुस्तकातले आपल्याला आकलन झालेले काही मुद्दे सारांश रूपानं लिहिले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रचारयंत्रणा राबवून समूहमनाचा वापर आपल्या सोईसाठी कसा करायचा, याचं मार्गदर्शन करू पाहणारं बर्नेसचं पुस्तक. त्यातलीच काही वाक्यं आणि हे दोन फलक यांच्यात काही साम्य रस्त्यावरून चालताना जाणवलं. म्हणून भारत देशातील पंतप्रधान पदाच्या दोन दावेदारांची प्रसिद्धी करणाऱ्या दोन फलकांचे फोटो इथं चिकटवतो आहोत.

---

अमरावती जिल्ह्यातील घाटलाडकी गावातला हा फलक

''साच्यांचा वापर करून किंवा नवीन साचे निर्माण करून प्रॉपगॅन्डिस्ट एखाद्या समूह भावनेला वळण देऊ शकतो. जुन्या साच्यापासून समुहाला दूर करू पाहणं जवळपास अशक्य असतं, पण नवीन साचा मात्र त्याठिकाणी बसू शकतो'' - असं वाक्य बर्नेसच्या वर उल्लेख केलेल्या पुस्तकात आहे. या फलकात असाच काही शिवाजी महाराजांच्या सध्याच्या काळातल्या राजकीय प्रतिमेचा साचा सोईसाठी वापरलाय वाटतं. नि त्या साच्यात शिवजयंतीच्या निमित्तानं आणखी मोदींना बसवलंय बहुतेक, म्हणून मग शिवाजी राजांनंतर 'राजे पुन्हा आले' ते मोदीच असतील. किंवा फलकावरचे सगळेच राजे असतील. आणि 'भारत जागे.. तो विश्व जगेगा...' हे नक्की काय आहे कळायला मार्ग नाही.

---

दुसरे हे राहुल गांधी -

अमरावती शहरात राजकमल चौकाजवळच्या पुलावरच्या फलकाचा हा फोटो. (फोटो - रेघ)

बर्नेसच्या पुस्तकात त्यानं एक उदाहरण देताना असंही म्हटलंय की, समजा ''मुलांविषयीचं एखादं धोरण प्रचारमोहिमेचा भाग असेल तर एखाद्या बालकाला कडेवर घेऊन त्याच्या गालावर ओठ टेकवणं, हे भावनिक प्रचाराचं साधन ठरू शकेल, पण प्रत्येक वेळी तसं करणं योग्य नसणारच. म्हणजे हॉकी स्टिकच्या निर्मात्याने आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीमधे हिवाळी झाडांच्या पार्श्वभूमीवरती एका चर्चचा फोटो घेतला तर त्याचा तसा उपयोग नसतो. चर्च आपल्या धार्मिक भावनांना हात घालतं हे खरं असलं तरी हॉकी स्टिक विकण्यासाठी त्याचा उपयोग नाही.'' या वाक्यात ज्या विचित्र प्रॉपगॅन्ड्याचा उल्लेख केलाय, तसंच कायतरी राहुल यांची जाहिरात करताना वेळोवेळी होत आलंय की काय! कारण, फोटोत उजवीकडच्या फलकावर राहुल यांच्या नेतृत्वाचं गुणगान करताना 'फक्त सल्ले देण्याचं काम नाही, तर उत्तम परिणाम' असं विचित्र मराठीतलं भयानक वाक्य त्यांच्या फोटोसह आहे. तर डावीकडे 'अमुल'च्या जाहिरातीच्या फलकामधे 'टाइम्स नाऊ'  या इंग्रजी वृत्तवाहिनीला राहुलनी दिलेल्या मुलाखतीवरून त्यांची टिंगल उडवलेय, 'नाजवाब इन्टर्व्ह्यू' म्हणून.

---

''नेता प्रॉपगॅन्डा निर्माण करतो की प्रॉपगॅन्डा नेत्याला निर्माण करतो, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. कुणीही नसलेल्या माणसाला एखादा चांगला माध्यम एजन्ट थोर व्यक्ती बनवू शकतो'' - हेही बर्नेसच्याच पुस्तकात म्हटलंय.
***

एवढे असे फलक सतत दिसल्यावर आपल्यासारख्या माणसाला 'टशन'सारख्या कुठल्यातरी हिंदी पिक्चरमधलं पुढचं गाणं आठवलं तर काय करणार ओ. 'फलक तक चल साथ मेरे', असे शब्द असलेल्या या गाण्यात झिरो फिगर फेम करीना कपूर, खिलाडी चित्रपट मालिका फेम अक्षय कुमार व पद्मश्री सैफ अली खान ही मंडळी दिसतात. 'फलक' या शब्दाचा मराठी अर्थ, आकाश / आभाळ, असा होतो, अशी माहिती मिळाली. गाणं आठवलं म्हणजे 'फलक' या शब्दामुळे हे तर झालंच, शिवाय ही नेते मंडळीही अशाच कुठल्यातरी आकाशी पोकळीकडे दिशा दाखवत असतील काय, असंही वाटलं. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे सगळ्या भारतात हिंदी पिक्चर पाह्यले जातात. त्यामुळे त्यातलं गाणं वरच्या रूक्ष फलकांपेक्षा वेगळ्याच कुठल्यातरी फलकाकडे नेतंय तर पाहायला आपलं काय जातं!


1 comment:

  1. मुद्दा उत्तम पण, विस्तृत विवेचन चालल असत.छायाचित्र उत्तमच.आणि गाणही..! बाकी राजे आले काय नी गेले काय..

    ReplyDelete