Friday 20 February 2015

'सनातन प्रभात'च्या अवघड परीक्षेत 'लोकसत्ता' पास!

तुम्ही 'सनातन प्रभात' हा पेपर वाचता का? वाचत नसाल, तर तुम्हाला त्यांची परीक्षा कशी असते ते कळणार नाही. म्हणजे तुम्ही फक्त कागदपत्रांवर हिंदू धर्माचे असून ह्या परीक्षेत पास होऊ शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला काहीएक तडफदार भूमिका असावी लागेल. नायतर नापास होऊन ठेवाल पेपर बाजूला. 

उदाहरणार्थ, या देशातील हिंदुत्त्ववादी संघटना फारसं काही यश मिळवू शकलेल्या नाहीत याचे कारण काय? असा प्रश्न तरी तुम्हाला पडलेला आहे का? नसेल किंवा असेल. पण त्याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का? त्याचं उत्तर आहे : ''बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना साधनेचे बळ नसल्यामुळे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत, म्हणजे गेल्या ६७ वर्षांत राष्ट्र आणि धर्म अधोगतीच्या परम सीमेला जाईपर्यंत काही करू शकल्या नाहीत. या उदाहरणावरून साधना करणे किती आवश्यक आहे, हे राष्ट्र आणि धर्म प्रेमींच्या लक्षात येईल.'' हे उत्तर 'सनातन प्रभात'च्या गुरूंचं आहे. तुम्ही हा पेपर वाचला नाहीत, तर असे अनेक प्रश्न तुम्हाला ऑप्शनला टाकावे लागतील. फारसे ऑप्शन नाहीत बरं का पण ह्या परीक्षेत. अनेकदा भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्त्ववादी ओळख असलेल्या पक्ष-संघटनांनाही या परीक्षेत ताशेरे खावे लागतात. बहुतेक बातम्यांमध्येच कंसात संपादकांची टिप्पणी दिलेली असते ती वाचकांना देशातील दुरवस्थेची जाणीव व्हावी म्हणून. आणि अखेरीस हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी वाचकांमध्ये काही जाणीवजागृती व्हावी, या अपेक्षेनं हे कामकाज सुरू असतं.

अशा अवघड परीक्षेत 'लोकसत्ता' हा पेपर मात्र पास झाल्याचं नुकतंच सामान्य वाचकांच्या लक्षात आलं असेल. नसेल आलं तर.. त्याचं असं झालं-

कोल्हापुरातील डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारीला हल्ला झाला. अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, इत्यादी घटनाक्रम ताजा आणि चालू वर्तमानातला आहे. (नोंद प्रसिद्ध केल्यानंतर अर्धा तासानंतरची माहिती: पानसरे यांचं मुंबईतल्या रुग्णालयात निधन झालं.) याच विषयी राज्यातील जनतेला मार्गदर्शन करणारा अग्रलेख लोकसत्तेच्या १७ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झाला. 'खबरदार, विचार कराल तर..' अशा शीर्षकाच्या या लेखात तसे अनेक विचारप्रवर्तक मुद्दे मांडलेले आहेत. उदाहरणार्थ, पहिलंच वाक्य घ्या- 'आजचा महाराष्ट्र हा विचारांना घाबरू लागला आहे, हे गेले काही वर्षे दिसत होतेच'. आणि अग्रलेखासोबत जो सारांश छापतात, तो असा आहे : 'कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ल्यासारखी घटना जेव्हा घडते तेव्हा अहिंसेवर विश्वास असणाऱ्यांनी विचारांचे डावे-उजवेपण सोडून एकत्र यावयास हवे. परंतु तेवढी वैचारिक सचोटी आजच्या महाराष्ट्रात नाही. हत्या कोणाचीही होवो, हल्ला कोणावरही होवो, विचारी जनांनी एकत्र येऊन अशा घटनांचा निषेध करून त्यामागे असणाऱ्या शक्तींना उघडे पाडणे आवश्यक आहे..'

अग्रलेखाच्या सुरुवातीचं वाक्य खरं असेलच, तर ते ह्या सोप्प्या सारांशाला जास्त लागू होतं, एवढंच फार तर आपण सुमार वाचक म्हणू शकतो. अभिव्यक्तीतल्या हिंसेपासून कुठकुठल्या अहिंसेपर्यंत आणि डावेपणापासून ते उजवेपणापर्यंत- हे सगळंच एकदम सोपं आहे, असं एकूण यावरून वाटतं. पण आपल्याला काही हे विषय एवढे सोपे वाटत नाहीत. त्यामुळं ह्या अवघड विषयांबद्दल जास्त बोलणं आपल्या कुवतीला धरून होणार नाही. म्हणून अशी कुवत राखून असलेल्या 'सनातन प्रभात'कडं परत एकदा वळू.


'दैनिक सनातन प्रभात'ने लोकसत्तेच्या अग्रलेखातील मोठी अवतरणं प्रसिद्ध केली आहेत. पुरोगाम्यांना या अग्रलेखातून सणसणीत चपराक लगावल्याचा उल्लेखही केलाय. १) अभिव्यक्तीतील हिंसा प्रत्यक्ष मारेकर्‍यांच्या कृत्याशी जवळीक सांगणारी!, २) बुद्धीजिवींचा उतावीळपणा! ३) पुरोगाम्यांच्यात वैचारिक प्रगल्भतेचा अभाव! ४) पुरोगामी म्हणवून घेणार्‍यांचा दांभिकपणा! - असे मस्त बुलेट पॉइंट करून त्यांनी लोकसत्तेच्या अग्रलेखातला मजकूर आपल्या पेपरात प्रसिद्ध केला आहे.

पुरोगामी दांभिक असतील, त्यांच्यात वैचारिक प्रगल्भतेचा अभाव असेल, पण हे सगळं ब्याऐंशी वर्षांच्या म्हाताऱ्यावर हल्ला झाल्यावर अशा पद्धतीनं दुसऱ्या दिवशी आठवायचं, म्हणजे या अग्रलेखातलाच शब्द वापरायचा तर, 'निवडक नैतिकते'चं काम झालं. अशा हल्ल्यांमागं आर्थिक हितसंबंध असू शकतात, त्याकडं लक्ष न देता पुरोगामित्व-प्रतिगामित्वाच्या कालबाह्य आणि निष्फळ चर्चात आपण रमतो, असंही या लेखात म्हटलंय. आर्थिक हितसंबंध असू शकत असतील, तर त्याचा तपशील कोण सांगणार? आणि पुरोगामित्व-प्रतिगामित्वाच्या चर्चा कालबाह्य झाल्यात, म्हणजे आपण कोणत्या काळात जगतोय? ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडं नाहीत. ही कुठल्या इयत्तेची परीक्षा चाललेय तेच कळेनासं व्हावं अशी परिस्थिती आहे.

खरं तर, या पूर्वी गेल्या वर्षी अर्थसंकल्पाच्या बातमीत पंतप्रधानांना विठ्ठलाच्या रूपात दाखवणारं कार्टून काढल्याबद्दल सनातन प्रभातनं लोकसत्तेचा निषेध केलेला आहे. पण या वेळी मात्र त्यांना 'लोकसत्ते'चं मत पुन्हा आवाज वाढवून सांगावंसं वाटलं, याचं कारण काय असेल? त्यांच्या काटेकोर परीक्षेत लोकसत्तेचा एक अग्रलेख पास होणं हीही काही कमी महत्त्वाची गोष्ट नाही. एवढं कळायला काय आपण पुरोगामी किंवा बुद्धिजिवी किंवा हिंदुत्त्ववादी असायला हवं असं नाही.

बरं, शेवटचा प्रश्न- तुम्ही 'लोकसत्ता' हा पेपर वाचता का? मग वर्तमानपत्राचे काम नेमके काय असते, सांगा पाहू. लोकसत्तेचेच एक माजी संपादक (प्लस विचारवंत, इत्यादी) सांगतात त्या प्रमाणे - समाजाला विचार करायला भाग पाडायचं काम वर्तमानपत्रे करत असतात. पुढं ते असंही म्हणतात की, 'आज सगळीकडे मनोरंजन आणि मनोरंजन आहे. आज अभिजात पत्रकारिता म्हटलं जातं, ते पाळलं जात नाही. याचं कारण आज अस्तित्वाची लढाई चालू आहे. ती ज्या वेळी चालू असते त्या वेळी नैतिकतेचे प्रश्न त्रास देत नाहीत. अगोदर कोडगे व्हा! पण उद्या सर्व समाज पुन्हा अभिजात पत्रकारितेकडे वळेल, याची मला खात्री वाटते. त्याशिवाय वर्तमानपत्राचं अस्तित्वच नाही.' या संपादकांच्या कथित अभ्यासपूर्ण व्याख्यानावरूनही प्रश्नाचं उत्तर मिळालं नसेल, तर मग अवघड आहे राव परीक्षा.

आणि शेवटचं, प्रश्न नसलेलं उत्तर आहे- कोडगे व्हा!

1 comment:

  1. तुम्ही फारच मनावर घेता बुवा.... जसा सूर्य कलेल, तसे तर सूर्याचे नाव सांगणारे फुल ही वळते. मग ही तर पोटभरू लेखकु ची टोळी. आपली लेखणी मालक किंवा "मालकाचे मालक" यांच्या म्हणण्याप्रमाणे चालविली नाही तर काय होते, ते त्यांना माहित आहे. गेल्या ७-८ महिन्यात असे किती पत्रकार, संपादक काढून टाकण्यात आले याची आपणास माहिती नसावी ही कमालच आहे. हं, आता मधून-मधून तटस्थ असल्याचा देखावा करावा लागतो, तोच गोड मानून घ्या.

    ReplyDelete