या नोंदीचं शीर्षक वाचून तुम्हाला जे काही वाटलंय, त्याबद्दल आपली नोंद आहे.
मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. त्या निमित्तानं ही नोंद होतेय असंच नाही. या नोंदीचं निमित्त इंग्रजी लेखक सलमान रश्दी यांनी पुरवलंय. परवाच्या दिवशी नेमाडे यांना ज्ञानपीठ मिळाल्याची घोषणा झाली, त्याच दिवशी रश्दी यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून पुढचे शब्द पोस्ट केले.
या शब्दांमध्ये 'भालचंद्र नेमाडे' हे शब्द आलेले नसले, तरी रश्दी यांनी त्यासोबत जोडलेल्या लिंकमध्ये ते शब्द उलगडतात. लिंक आहे नेमाड्यांना पुरस्कार मिळाल्यासंंबंधी 'टाइम्स ऑफ इंडिया'त आलेल्या बातमीची. त्यात मग नेमाड्यांनी बातमीदाराला आपली काही मतंही सांगितली. ती नव्यानं आल्यासारखी बातमीत आलीत. उदाहरणार्थ, व्ही. एस. नायपॉल आणि सलमान रश्दी यांच्यासारखे लेखक पाश्चिमात्त्यांना सुखावण्यासाठी लिहितात आणि त्यांच्या लेखनाला काही फारसं साहित्यिक मूल्यही नाही, इत्यादी.
ग्रम्पी (grumpy), या शब्दाचा अर्थ बहुधा चिडखोर, चिडका, रडीचा डाव खेळणारा, असा होऊ शकतो.
ओल्ड (old), म्हणजे म्हातारा.
बास्टर्ड (bastard), म्हणजे- शब्दकोशानुसार, अनौरस, दासीपुत्र, खालच्या दर्जाचा, हलक्या प्रतीचा.
आपल्या लेखनाला साहित्यिक मूल्य नाही, असं कोणी म्हटल्यामुळं रश्दींनी एवढं चिडून जायचं काय कारण होतं? नेमाड्यांच्या 'टीकास्वयंवर'ची प्रत त्यांनी चाळली, किंवा सगळं वाचायचं नाही म्हटलं तरी फक्त शेवटची सूची बघून, त्यात आपलं नाव कुठं आलंय ते पाहून, तेवढं जरी वाचलं असतं, तरी त्यांचा एवढा तळतळाट झाला नसता. 'टीकास्वयंवर'मधल्या 'भारतीयांचे इंग्रजी लेखन' या १९८२ सालच्या लेखात (पान ७६-७७) येणारा उतारा पाहा :
अलीकडे गेल्या दहाएक वर्षांत भारतीय इंग्रजी लेखकांच्या साहित्याबरोबर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, वेस्ट इंडीज व काही आफ्रिकी देशांतले साहित्य जोडून कॉमनवेल्थ लिटरेचर असा आणखी एक प्रकार मान्यता पावू घातला आहे. खरे तर वरील ज्या देशांतील लेखकांची मातृभाषा इंग्रजी आहे, त्यांचे साहित्य मराठी-बंगाली-कन्नड-हौसा-स्वाहिली ह्या भाषांमधल्या साहित्याबरोबर अभ्यासले गेले पाहिजे. आफ्रिकेतल्या इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखकांना तर बाहेरच्या जगात प्रसिद्धी मिळाली, पण स्वतःच्या देशांत कोणी ओळखत नाही. कारण तिथल्या देशी भाषांमध्ये हे लोक लिहीत नाहीत. हा विनोद वसाहतवादी वाङ्मयीन धोरणांमुळे होतो. असाच विनोद मुल्क राज आनंद पंजाबीत लिहीत नाहीत, पण इंग्रजी लेखकांची सर्टिफिकिटे आपल्या पुस्तकांवर छापून 'नॅशनल' किंवा 'इंटरनॅशनल' लेखक होऊ पाहतात तेव्हा होतो. खरे तर पंजाबी लेखक होऊन दाखवणे अधिक कठीण, महत्त्वाचे आणि मानाचे आहे, हे त्यांस कळले नाही. मुळे नसलेली आंतरराष्ट्रीयता अशा लेखकांनी आपल्याकडे सुरू केली. ह्या उलट, जी. व्ही. देसानी (ऑल अबाऊट एच. हॅटर) आणि सलमान रश्दी हे भारताबाहेर राहणारे दोनच लेखक रुडयार्ड किपलिंगनंतर भारतीय स्थितीवर उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती करू शकले. कारण ह्या दोघाही श्रेष्ठ लेखकांनी इंग्रजी भाषेचेच केंद्र मानून लेखन केले. युरेशिअन संस्कृतीचा नेमका छेद घेऊन त्याला योग्य अशी विरूपित शैलीही भारतीयत्वाचा परीघ स्पर्शून त्यांनी निर्माण केली. भारतीयत्वाचे केंद्र त्यांनी मानले नाही.
हे कळल्यावर तरी रश्दींना 'बास्टर्ड' शब्द वापरावासा वाटणार नाही, कदाचित. अभ्यासक मंडळी त्या त्या शब्दाचे सांस्कृतिक संदर्भ तपासतात. मग हा शब्द इंग्लंडमध्ये वापरणं आणि ब्रिटिश नागरिकानं भारतीय नागरिकाला उद्देशून वापरणं यात काही फरक असतो, तो सांगता येतो. आपल्याला जनरल वाचक म्हणूनही तो कळतोच. पण कळून काय होतं? दुसरीकडं, नेमाड्यांनी रश्दींच्या लिखाणाबद्दल १९८२ साली थोडा सकारात्मक सूर लावला असताना आता ते रश्दींनी फटकारत का असतील? विकिपीडिया सांगतो त्यानुसार, रश्दींची 'मिडनाइट्स चिल्ड्रन' ही गाजलेली कादंबरी १९८१ साली प्रकाशित झाली आणि मुस्लीम समाजाच्या भावना दुखवण्यासंदर्भात वादग्रस्त ठरलेली 'द सटॅनिक व्हर्सेस' १९८८ साली प्रकाशित झाली. नेमाड्यांचं रश्दींबद्दलचं बदललेलं मत कदाचित त्या वादापासून सुरू झालं असेल. कारण रश्दी (खरं तर कुठलाही लेखक) कुठला 'समाज' त्यांचा मानतात, हेही या वादाच्या निमित्तानं तपासण्यासारखं असेल! हा फार वेगळा विषय होईल आणि तो आपल्या समजेबाहेरचा आहे, पण समाजाचा संदर्भ नोंदीत पुढं जाण्यासाठी गरजेचा आहे. का, ते पाहा.
नेमाड्यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्यापासून त्याबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांसोबतच त्यांच्यावर टीका करणाराही बऱ्यापैकी मजकूर कुठं ना कुठं प्रसिद्ध झालेला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांबद्दलची त्यांची पूर्वीची मतं (राष्ट्रीय पारितोषिकं ही कंपूशाहीतून निर्माण होणाऱ्या दोनचार मूर्ख माणसांच्या मर्जीवर ठरत असतात) आणि आता मधला एवढा काळ गेल्यानंतरच्या घडामोडी यांच्यातला विरोधाभासही दिसतो. पण त्या विरोधाभासासकटही नेमाड्यांबद्दलचा जिव्हाळा मोठ्या प्रमाणावर वाचकांमध्ये शाबूत आहे, असंही वातावरण राहतं. याचं कारण काय असेल? नेमाडे या विरोधाभासाच्या तपशिलाबद्दल स्पष्ट बोलत नसले, तरी कदाचित नेमाडे विरोधाभासाकडं स्वतःच बोट दाखवतात, हे असेल. म्हणजे परिवर्तनाचा वाटसरू या पाक्षिकाच्या २०१३ सालच्या दिवाळी अंकात (पान २५) आलेल्या मुलाखतीत ते म्हणतात:
मी वृत्तीनं चक्रधरांच्या जास्त जवळचा आहे. म्हणजे मी 'एक्स्ट्रिमिस्ट'च आहे- विचारामध्ये. तरी असं म्हणा, मला ते 'मॉडरेट' असं काही आवडत नाही. पण त्याचबरोबर मी समूहाची कदर करायला अग्रक्रम देतो. निर्विघ्न जगण्यासाठी हा एक कायमचा कॉम्प्रोमाईज मी केलेला आहे आणि तो पाळलाच पाहिजे असं ठरवून टाकलं आहे. आपला समाज कुठल्या मार्गाने चालतो आहे, ते टाळून तुम्ही काही करू शकत नाही हे मला पटलं आहे. ह्या द्वंद्वामुळे मी नेहमी मागे पडतो ते मला चालतं, पण त्यामुळे सुखानं जगणं होतं.
खुद्द या वाक्यांमध्येही विरोधाभास आहे. पण या वाक्यांमध्ये ज्या सुखाच्या जगण्याचा उल्लेख केलाय, त्यासाठी काही गोष्टी दडपणं आवश्यक असेल. अन्यथा, 'टीकास्वयंवर' वाचण्याची गरज न पडणारे रश्दी त्याच पुस्तकाच्या लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर, आणि त्यासंबंधीची बातमी इंग्रजी पेपरांमध्ये आल्यावर त्या लेखकाची मतं कशाला वाचतील? हे नेमाड्यांना माहीत नसेल असं नाही. माहीत असेल म्हणूनच त्यांनी ह्या द्वंद्वातून मागे पडण्याचा उल्लेख करूनही खरं तर पुढं जाण्याचाच मार्ग शोधलेला असेल. (संस्कृती, समाज या गोष्टींचाही मार्ग हाच असत असेल, अशी शंका यावी अशी परिस्थिती सतत.)
अशा परिस्थितीत ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल भालचंद्र नेमाडे यांचं मनापासून आणि द्वंद्वात्मक अभिनंदन करून थांबू.
भालचंद्र नेमाडे (छायाचित्र: संतोष हिर्लेकर, पीटीआय) |
या पूर्वी 'रेघे'वर:
"he may not be too vocal about the nature of paradox but he points out the paradox itself" bravo!! completely agree with you.
ReplyDelete