Friday, 1 July 2016

'इथे सत्याचा शोध संपतो': पण सुरू कुठं होतो?

पुणे: भिडे पुलावरून नारायण पेठेकडं येताना उजव्या बाजूला (फोटो: रेघ)

वरचं छायाचित्र २१ जून २०१६ रोजीचं आहे. त्या छायाचित्रातल्या बोर्डावरचं वाक्य वाचून तुम्हाला काय वाटलं? खुद्द सत्याचाच शोध जिथं संपलाय तिथं वाटण्यासारखं नक्की काही उरलंय का? आणि हा शोध सुरू कुठं झाला होता? पुणे शहरातल्या भिडे पुलाच्या एका बाजूला हा बोर्ड आहे, मधे काळी नदी वाहते, पुलाच्या त्या बाजूला डेक्कन बस-स्टँड आहे, त्याला लागून जंगली महाराज रोड, नंतर त्याला समांतर पलीकडं आहे तो फर्ग्युसन कॉलेज रोड, त्या रोडवरच 'टाइम्स ऑफ इंडिया' असं लिहिलेली एक इमारत आहे, तिथंच ऑफीस असलेल्या 'महाराष्ट्र टाइम्स' या मराठी वर्तमानपत्राची ही जाहिरात आहे. मग सत्याचा शोध तिथं संपतो की या बोर्डाजवळ?

'सत्य' हा शब्द पाहूनच थोडंसं गडबडायला झालं. या शब्दाचं वजन तर एवढं आहे की अख्ख्या देशाच्या बोधवाक्यातही तो आलेला आहे- 'सत्यमेव जयते': सत्याचाच विजय होतो. पण तरीही शब्दाचा अर्थ कळल्यासारखं वाटत नाही. तत्त्वज्ञानाचे अभ्यासक यावर जास्त बोलू शकतात, पण आपण असं कसं बोलणार. त्यामुळं स्वतःतच हा शब्द सापडतो का, असं म्हणून आपण रेघेच्या आतच 'सत्य' या शब्दाचा शोध देऊन पाहिलं. तर, स्वतःहून आपण हा शब्द वापरलेला सापडला नाहीच, हे साहजिक आहे. पण काही भाषांतरित नोंदींमधे हा शब्द होता, त्यातले काही दाखले असे:

'द हूट रीडर: संक्षिप्त प्रस्तावना' अशी एक भाषांतरित नोंद होती. 'द हूट'च्या संपादिका सेवंती नाइनन यांचा तो लेख होता. त्यातली दोन वेगवेगळी वाक्यं अशी:
माध्यमं जे दिसतं ते सत्य म्हणून त्याचं वार्तांकन करतात. अशा वेळी बातमीच्या स्त्रोतातला कमकुवतपणा आणि बातमीदाराची विचारसरणी यांतून बातमीतलं सत्य व्यक्तिसापेक्ष बनतं.

सत्याला आकार देण्याची माध्यमांची ताकद पाहायची असेल तर एकाच बातमीची नोंद वेगवेगळी माध्यमं कशी घेतात याची तपासणी करण्यासारखा उत्तम मार्ग नाही.
नंतर वसंत गुर्जरांच्या 'गांधी मला भेटला' या कवितेच्या न्यायालयीन खटल्यासंदर्भात एक नोंद होती, त्यात त्या कवितेतलं एक कडवं टाकलेलं, त्यात सत्याचा उल्लेख होता:

    गांधी मला
    वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या १० x १२च्या खोलीत
    ६ x २ १/२च्या बाजल्यावर
    भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला
    तेव्हा तो म्हणाला-
    सत्यापासून सौंदर्य वेगळे असू शकत नाही
    सत्य हेच सौंदर्य आहे. त्या सत्याच्या द्वारा मी सौंदर्य पहातो
    सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात
    असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते
    सत्य हे वज्राहुनही कठोर आणि कुसुमाहूनही कोमल आहे

नंतर मग आणखी अलीकडंच काही महिन्यांपूर्वी 'ख़बर वहीं जगजानी हैं' अशी नोंद केलेली, त्यात अनिकेत जावरे यांच्या पुस्तकातला काही भाग अवतरणांमधे टाकलेला, त्यातले सत्याविषयीचे उल्लेख असे होते:
अर्थातच वृत्तपत्रे आपण सत्यान्वेषी आहोत असे गर्वाने सांगणार; पण एका पी. साइनाथच्या 'व्हॉक्स पॉप्युली'मुळे सर्व वृत्तपत्रव्यवहार सत्यान्वेषी ठरत नाही. वृत्तपत्रातली भाषा हा वेगळा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे तिच्या मध्यमतेविषयी इथे फक्त इशारा करतो.

'सत्य', 'वास्तव', 'प्रत्यक्ष' या शब्दांचे त्यांच्या अर्थांशी असलेले संबंध बदलले आहेत.
अर्थ बदललेत, असं म्हणतायंत हे इंग्रजी भाषेचे शिक्षक. पण मग देशाच्या बोधवाक्यात ज्याचा विजय होतोअसं म्हटलंय ते नक्की काय असतं? आणि त्या बोर्डाजवळ ज्याचा शोध संपलाय ते नक्की काय आहे? पुन्हा तोच गोंधळ होतोय, हा शब्दच एवढा जड आहे नि त्याचा अर्थच नीट माहीत नसल्यामुळं शोध काय घ्यायचा हा प्रश्न आपल्याला पडला. म्हणून मग किमान विशेषनामांचा शोध घेऊन म्हणून याच नोंदीत वरती उल्लेख आलेली दोन विशेषनामं पुन्हा रेघेवरच शोधली- 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'पी. साइनाथ', तर मग 'सेन्सॉरलेली मनं : अर्थातच, दुसरी बाजू लोकांना कशाला कळावयास हवी?' या नोंदीतलं एक अवतरण समोर आलं. हे अवतरण पी. साइनाथ यांच्या 'मास मीडिया: मासेस ऑफ मनी' या लेखातलं (द हिंदू, ३० नोव्हेंबर २००९) होतं:
'लोकमत' या आघाडीच्या मराठी दैनिकात १० ऑक्टोबर २००९ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचं शीर्षक पुढीलप्रमाणे होतं: 'तरुण तडफदार नेतृत्व : अशोकराव चव्हाण'. त्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांचा मतदान दिवस सुरू होण्यापूर्वी ७२ तास आधी छापून आलेला हा मजकूर. हा मजकूर त्या दैनिकाच्या 'विशेष प्रतिनिधी'नं लिहिल्याचा उल्लेख होता, म्हणजे ती बातमी होती, असा अर्थ. केवळ काही महिन्यांच्या कारकिर्दीत मोठं यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळणारा हा लेख होता. त्याच दिवशी हाच लेख, त्यातला प्रत्येक शब्द जसाच्या तसा, 'महाराष्ट्र टाइम्स' या दुसऱ्या एका आघाडीच्या मराठी दैनिकातही छापून आला. फक्त दोन वेगवेगळी मनं पण विचार एकच, असं काही हे आहे काय?
सत्यावर दावा सांगण्याएवढी रेघेची पोच नसल्यामुळं आपण त्या शब्दाच्या अर्थाविषयी स्वतःच्या बळावर काही बोलू शकलो नाही. आपण फक्त समोर दिसलेल्या बोर्डाचा फोटो काढला आणि असलेले दुसऱ्यांचे शब्द परत चिकटवले. यातून आपल्याला तीन मुद्दे परत थोडे लक्षात आले:
  • नाइनन यांनी म्हटल्याप्रमाणे 'सत्याला आकार देण्याची माध्यमांची ताकद पाहायची असेल तर एकाच बातमीची नोंद वेगवेगळी माध्यमं कशी घेतात याची तपासणी करण्यासारखा उत्तम मार्ग नाही'. मग निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून एकच लेख 'लोकमत' व 'महाराष्ट्र टाइम्स' या दोन वर्तमानपत्रांमध्ये जसाच्या तसा 'विशेष प्रतिनिधी'च्या नावानं कसा छापून आला, ते आपल्याला पी. साइनाथ यांनी सांगितलं. म्हणजे सत्याला कसा आकार देता येतो, ते आपल्याला कळलं.
  • गुर्जरांना भेटलेले गांधी म्हणतात तसं, सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येतं. त्यामुळं पहिला मुद्दा ही सुंदर तडजोड असेल, तर त्या सौंदर्याचा एक भाग म्हणजे नोंदीच्या सुरुवातीला चिकटवलेला बोर्डावरचा मजकूर.
  • जावरे म्हणतात तसं, 'सत्य', 'वास्तव', 'प्रत्यक्ष' या शब्दांचे त्यांच्या अर्थांशी असलेले संबंध बदलले आहेत. त्यामुळं मग आग्रह कशाचा धरायचा असा अनुत्तरित प्रश्न लटकत राहाणार.
मोरंग एक्सप्रेस: मुख्य ऑफीसबाहेरची भिंत दिमापूर (फोटो: रेघ)
तत्त्वज्ञानाशी संबंधित लोक या प्रश्नावर कदाचित काही बोलू शकतील. आपण माध्यमं-जाहिरात-बोर्ड इतपत पातळीवरून बोलू. समोर दिसतंय ते तसंच्या तसं पाहणं/ पाहण्याचा प्रयत्न हा एक अर्थ 'सत्य' या शब्दाशी जोडलेला असावा, असं जनरल माहितीवरून कळतं. त्यामुळं एखाद्या वर्तमानपत्राला त्याच्याशी जवळीक सांगावीशी वाटणं आश्चर्याचं नाही. उदाहरण म्हणून नागालँडमध्ये दिमापुरात मुख्य ऑफीस असलेल्या 'द मोरंग एक्सप्रेस' या वर्तमानपत्राची (मास्टहेडखाली नोंदवली जाणारी) टॅगलाइन पाहता येईल: 'द पॉवर ऑफ ट्रुथ'. 'सत्य' या शब्दाला इंग्रजीत 'ट्रुथ' असं या नोंदीपुरतं मानायला हरकत नसावी. म्हणजे इथंही या वर्तमानपत्रानं सत्याशी संबंध सांगितलाय, पण इथला अर्थ प्रवाही आहे तसा. या वर्तमानपत्राच्या मुख्य ऑफीसबाहेर जो बोर्ड लावलाय त्यात म्हटलंय की 'सत्तेसमोर सत्य बोला'. शिवाय 'मोरंग एक्सप्रेस'चे तरुण संपादक अंकुम लोंगचारी वर्तमानपत्राची ओळख करून देताना लिहितात: "'गुणात्मक आणि शोधक' स्वरूपाचं '(योग्य) पद्धतीवर आधारलेलं वार्तांकन' उपयोगात आणून वस्तुस्थितीशी सुसंगत विश्लेषण करणं, व त्यासोबत 'सत्या'चं वार्तांकन करणं, हा आमचा गाभा आहे." म्हणजे त्यांनी सत्याचा साधारण एक 'दिसतं ते जसंच्या तसं' असा अर्थ घेतलेला असावा. शिवाय मुळात सत्तेला सत्य सांगण्याचा हा त्यांचा 'प्रयत्न' असल्याचं त्यांनी ओळखीमध्ये पुढं म्हटलेलं आहे. म्हणजे एक प्रक्रिया म्हणून 'सत्य' हा शब्द वापरलेला दिसतो. त्यामुळं शोध सतत सुरू राहण्याची शक्यता तरी असते. २००५ साली सुरू झालेलं हे वर्तमानपत्र मुख्यत्त्वे नागालँडमधील वाचक डोळ्यासमोर ठेवून काम करणारं आहे. तर या वर्तमानपत्रातून आपल्याला कळणारं 'सत्य' अनेकदा 'राष्ट्रीय' प्रसारमाध्यमांमधून लादल्या जाणाऱ्या 'सत्या'पेक्षा वेगळं असतं. त्याच्याही बाजू तपासणं, हा पुन्हा मुद्दा आहेच. पण तरी भारत देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर मुख्य कचेरी असलेलं एक मराठी वर्तमानपत्र स्वतःच्या 'इथे सत्याचा शोध संपतो' असा दावा करतं, तेव्हा त्याच देशाच्या पूर्वेकडं टोकाला मुख्य कचेरी असलेलं एक वर्तमानपत्र तुलनेनं प्रवाही अर्थानं 'सत्य' हा शब्द वापरू पाहतंय, याची आठवण आली म्हणून नोंद केली. (शिवाय नागा मंडळींना भारताच्या 'सत्यमेव जयते'विषयी शंका वाटते, हेही ओझरतं कारण या नोंदीला आहे. पण त्या मुद्द्याची गुंतागुंत प्रचंड आहे नि ती या नोंदीत थोडक्यात गुंतवणं बरोबर वाटलं नाही. तरीही, तिथल्या लोकांशी बोलून जाणवलेलं 'सत्य' या नोंदीच्या शेवटी फिक्या अक्षरात शेवटी नुसतं ओझरवल्याशिवाय राहावलं नाही.)

Thursday, 16 June 2016

कोलटकरांची एक सोप्पी 'परंपरा', थोडेसे नेमाडे व सफाईकाम

एक

अरुण कोलटकरांची 'परंपरा' ही कविता (पान ५३-७४) 'अरुण कोलटकरच्या चार कविता' (प्रास प्रकाशन) या पुस्तकात आहे. ही कविता 'सोपी' असली असती तर गोष्ट वेगळी, पण ती 'सोप्पी' आहे, असं वाचक म्हणून बनलेलं मत फक्त आपण इथं नोंदवतो आहोत. ती सोप्पी का वाटते, तर-

या कवितेची सुरुवात आहे: 

प्रास प्रकाशन, मे २००६ । मुखपृष्ठ- वृंदावन दंडवते
परंपरा
आई आहे आपली
सर्वांचीच

कबूलाय
तिच्या पोटातच आपण वाढलो
मानतो मी

पण बाहेर आलो
की नाळ तोडावीच लागते
की नाही?

जन्मभर ती
कमरेला गुंडाळून
हिंडायला तर येत नाही?

परंपरा
आई आहे आपली
सर्वांचीच

तिचंच दूध आपण प्यालो
आनंदानं
आणि बिनतक्रार

त्यात डीडीटीचं
आणि डायॉक्सिनचं प्रमाण
कमीजास्ती असलं

तरी गोड मानून घेतलं आपण
जन्मभर ते दूध
पुरणार नाही

असं वाटलवंतं कुणाला?
(पान ५५-५६)

आई हे परंपरेचं रूपक म्हणून वापरलंय. पण परंपरेचं प्रकरण इतकं सोपं वाटत नाही. आईची जन्मतारीख नि मरणाची तारीख कागदोपत्री कळू शकते. आई नावाची कायतरी शरीर असलेली गोष्ट दिसते, तसे आपण परंपरेतून बाहेर येतो, असं वाटत नाही. आई हे रूपक परंपरेसाठी अगदीच तोकडं आहे. म्हणून पुढं जाऊन तर कोलटकरांना कवितेत परंपरेच्या 'डेथ सर्टिफिकेट'चीही गोष्ट करणं सोपं झालेलं आहे:

पण परंपरेच्या बाबतीत
ती मेली
की नुसतीच कोमात आहे

आणि कोमात असेल
तर ती कोमातच राहणार अशी
कायमची

की त्यातनं बाहेर पडायची
शक्यता आहे
हे मोठ्यामोठ्या तज्ज्ञांनाही

सांगता येत नाही
तिला डेथ सर्टिफिकेट द्यायलाही चट्कन
तयार होत नाही कुणी
(पान ६५)
परंपरा कधी सुरू होते नि कधी संपते याचं सर्टिफिकेट सोडा, पण त्याची निश्चित तारीख तरी सांगता येते का?

दोन

चार जून २०१६ रोजीच्या 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'च्या अंकात 'सरकारसाठी मैलासफाई' (स्कॅव्हेंजिंग फॉर द स्टेट) असा एक लेख आलेला आहे. अनघा इंगोले यांनी लिहिलेल्या या लेखासाठीच्या संशोधनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील (बार्टी) संशोधकांचा सहभाग राहिल्याचं तिथं नोंदवलेलं आहे. पुणे महानगरपालिकेतील (नाला सफाई व शौचालय सफाई करणाऱ्या) १०९१ कामगारांचं सर्वेक्षण आणि प्रत्येक कामगाराची वैयक्तिक मुलाखत घेऊन हा अभ्यास करण्यात आल्याचं म्हटलंय.

परंपरागतरित्या हाती सफाईकामामध्ये गुंतलेल्या कुटुंबांमधूनच आपण आल्याचं या सर्वेक्षणामधील बहुतांश कामगारांनी सांगितलं, असं लेखात नोंदवलंय:
"वारसाहक्कासारखी ही एक संस्थात्मक व्यवस्थाच आहे, आणि चतुर्थ श्रेणीतील कामगार त्याचा वापर करू शकतात. एखादा कर्मचारी निवृत्त झाला वा त्याला इजा होऊन तो काम करू शकणार नसेल तर आपल्या जागी आपलं पाल्य किंवा जवळच्या नातेवाईकाची नियुक्ती करवून घेणं या व्यवस्थेद्वारे शक्य होतं. दुसरी व्यक्ती शिक्षित असेल तर तिला मुकादम, शिपाई किंवा कारकून अशा एखाद्या वरच्या पदावर नियुक्त करण्याची तरतूद असली, तरी वास्तवामध्ये या कामगारांच्या बहुतेक मुलांना त्यांच्या पालकांचंच काम पुढं सुरू ठेवावं लागतं." 
शिवाय, 'महानगरपालिकेसोबत काम करणारे बहुतांश शौचालय सफाई कामगार व नाला सफाई कामगार हे अनुसूचीत जातींमधील- विशेषतः वाल्मिकी, मेहतर व भंगी जातींमधील आहेत. हाती सफाईकामासाठी याच जातीतील लोकांना रोजगार देण्याचं सरकारनंही सुरू ठेवलेलं आहे', हेही या सफाईकामाच्या परंपरेसंदर्भात वाचता येईल. (जाड ठसे ही रेघेची भर).

परंपरा म्हणजे काय? तिची डेथ कधी होते? तिची डेथ झालेला असा एक काळाचा ठिपका सांगता येतो का? वरच्या लेखात वाल्मिकी जातीतल्या राजेश संतू या ३६ वर्षीय सफाई कामगाराचं एक उदाहरण दिलंय, त्यांना त्यांच्या भागातल्या 'सुलभ शौचालय'वर देखरेखीचं काम मिळालं. या कामासोबत त्याच शौचालयाच्या वरती राहायला जागाही मिळाली. यातून त्यांचं जगणं सुकर झालं की कसं? त्यांच्या घरात येणारा वास आणि या कामामुळं त्यांनी गमावलेलं सार्वजनिक जीवन, यांचं काय करायचं? शौचालय आणि राजेश यांचं घर यांच्यातला फरक रात्रीच्या वेळी कोणा दारुड्यांना ओळखता येत नाही, मग संतूंच्या घरात मधेच कोणीतरी लडबडत येतं, याचं काय करायचं? आणि जातिव्यवस्था हा एक आपल्याकडच्या परंपरेचा भाग आहे, असं मानलं; तर त्यातल्या विशिष्ट जातींनाच या सफाईकामात का गुंतावं लागतंय, हा मुद्दा निव्वळ परंपरेला आईचं रूपक जोडून समजेल का?

शिवाय जातिव्यवस्था हा एकच भाग झाला. अख्ख्या परंपरेचा एक भाग. पण परंपरेसोबत भाषाही आली, आपल्या जन्मापूर्वीपासून अनेकानेकांच्या सोबतीनं नांदलेली. त्यातच कोलटकरांनी कविता लिहिली. जातिव्यवस्थेचं तरी थोडं स्पष्टपणे सांगता येईल, पण भाषाव्यवस्थेच्या बाबतीत आईचं रूपक कितीसं पुरं पडेल? कोलटकरांनी लिहिलेली ही 'परंपरा' कविता नक्की कुठल्या काळात लिहिली माहीत नाही, पण त्यांच्याच आसपास लिहू लागलेले भालचंद्र नेमाडे 'परंपरा' या गोष्टीबद्दल जे बोलतात, त्याचा संदर्भ या कवितेसोबत आपल्याला नोंदवायला हवा. नेमाडे अनेकदा 'परंपरा' या गोष्टीचं वेगळं सोप्पं रूप उभं करतात:
"व्यक्ती जन्मते तेव्हा ज्ञान घेऊन जन्मत नाही, ती फक्त शारीरिक जन्म घेते. पण ज्ञान अनेक पिढ्यांचं संकलित झालेलं संचित असतं. चोरी करू नये, कुणाचा खिसा कापू नये, या स्वरूपाचंही ज्ञान त्यात असतं. या परंपरेला नाकारण्यात अर्थ नसतो, त्यात फार प्रश्न विचारू नयेत, कारण त्यामागचे हेतू आपल्याला माहीत नसतात, ते वर्षानुवर्षांच्या ज्ञानातून चालत आलेले असतात. टी. एस. इलियटचंही एक उदाहरण या संदर्भात देता येईल. त्या काळात इंग्लंडमधे कंडोम वापरण्याचं शिक्षण मुलांना द्यावं किंवा नाही यावर वाद सुरू होता. त्यासंबंधी इलियटला विचारलं, तर तो म्हणाला, ‘असं शिक्षण अजिबात देऊ नये. कारण मुलांना हे कळलं पाहिजे की, आपली बायको सोडून दुसरीकडे जाणं बरोबर नाही. आपल्या परंपरेतच ते आहे. कंडोम वापरण्याचं शिक्षण देऊन गुप्तरोग काही कमी होणार नाही, फक्त कंडोमनिर्मितीचे कारखाने मात्र चालतील.’ असा इलियटसारखा मोठा कवीसुद्धा परंपरा मानणाराच होता." 
(२०१३ साली युनिक फीचर्सनं आयोजित केलेल्या तिसऱ्या ई-संमेलनातल्या भाषणातून).

कोलटकरांची कविता आहे. नेमाड्यांचं भाषण आहे. यात फरक पडतोच. शिवाय नेमाडे परंपरेबद्दल अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी काही बरं-वाईट बोललेले आहेत (वरच्या भाषणात एका ठिकाणी, 'परंपरा आणि आधुनिकता दोन्ही एकाच वेळी पुढे जात असतात' असं आलंय). पण हे अर्थातच बरचंसं सोपेकरण आहे. कोलटकरांची कविता नुसतीच सोप्पी आहे, नेमाड्यांच्या कादंबरीबाहेरच्या गद्य मांडणीत परंपरेबद्दल जे येतं त्यात तर भीषण विरोधाभाससुद्धा आहेत. 'परंपरेला नाकारण्यात अर्थ नसतो, त्यात फार प्रश्न विचारू नयेत, कारण त्यामागचे हेतू आपल्याला माहीत नसतात, ते वर्षानुवर्षांच्या ज्ञानातून चालत आलेले असतात'- हे तर आणखीच भयंकर. राजेश संतूंच्या घरात जाऊन हे वाक्य बोलल्यावर कसं वाटेल? तर या दोन लेखकांना इथंच थांबवून आपण नोंदीच्या तिसऱ्या भागात जाऊ.

तीन

'जनुकं' हे परंपरेचं एक रूपक म्हणून वापरता येईल का? आपल्या स्वभावावर, रोजच्या वागण्यावर, आपल्या असण्यावर जनुकांचं मोठंच 'नियंत्रण' असतं, असं विज्ञानातले लोक सांगतात. शिवाय ही जनुकं फक्त आईकडून नव्हे तर बापाकडूनही येतात. खरंतर त्याच्याही आधीपासून कुणाकुणाकडून. त्यातही आई-बापात झोपलेली काही जनुकं आपल्या शरीरात जागी असू शकतात; किंवा त्यांच्यात जागी असलेली काही जनुकं आपल्यात झोपून जाऊ शकतात. दोन्हीकडून नक्की किती किती जनुकं आपल्यात आली याचा पत्ता नाही. सरमिसळ कितीतरी. त्यातही जाणीवपूर्वक हीच जनुकं पुढं टाकू नि थोडीशी राखून ठेवू, असा काही मामला (अजून तरी सरसकट) नाही. त्यात मग आई-बापांच्या दोन्ही बाजूंचा 'कूळवृत्तान्त' शोधलात तरी कळून कळून असं काय कळणार आहे? शिवाय 'आई' असं आपण ज्या व्यक्तीला म्हणतो ते शेवटी एक शरीर असतं. कोणाला समजा आपली आई-वडील यांची ओळखच नसेल, लहानपणीच काही घटनांमुळं एखादी व्यक्ती अनाथ झाली असेल, आणि नंतर तिला कोणी दत्तक घेतलं असेल, तर ती शारीरिक जन्मदात्यांपेक्षा वेगळ्याच कोणाला तरी 'आई' म्हणेल. असा हा शब्दाचा म्हणजे परंपरेचा गुंता खोलवर जाईल. परंपरेची गुंतागुंत ही अशी जनुकांसारखी असते असं वाटतं. त्यामुळं तिचं डेथ सर्टिफिकेट ही  गोष्ट बोलायला सोपी आहे, पण प्रत्यक्षात आपल्या स्वतःच्या डेथपर्यंत लांबणारा हा मुद्दा आहे असं वाटतं.

रिचर्ड डॉकिन्स यांच्या 'द सेल्फिश जीन' (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, २००९) या पुस्तकात 'मीम्स' अशी एक संकल्पना वापरलेय (पान १८९-२०१). हे एक प्रकारचे सांस्कृतिक घटक मानलेत डॉकिन्सनी. ते शरीरात नसतील, पण इकडून तिकडून भाषेतून वगैरे ते असे पाझरत जातात. या पुस्तकापलीकडं या विषयाचा फारसा अदमास रेघेला नाही. पण 'मीम्स'चा मुद्दा जादा ताणणं विज्ञानाच्या काटेकोरपणात बसणारं नाही, असं काही लोक म्हणतात असं थोडंसं वाचनात येतं. पण 'कविकल्पना' म्हणून हे इंटरेस्टिंग वाटतं. 'मीम्स'ला मराठीत काय म्हणायचं? 'मनुकं' कसं वाटतं? म्हणजे बाहेरून खायची गोष्ट आणि मनाशी संबंधित असलेली, असे अर्थ त्यात येऊ शकतील.

म्हणजे मराठी भाषा ही एक परंपरा किंवा परंपरेचा भाग म्हणून आपल्यापर्यंत आली, असं मानलं; तर त्यातच एक भाग म्हणून कोलटकरांनी लिहिलेल्या कविता आपल्यापर्यंत आल्या. (किंवा नेमाड्यांचं वरचं भाषणपण. आणि इतरही अनेक देशी-परदेशी संदर्भ). त्यात मग गेल्या वर्षी आपण 'दरवर्षीचा आठ जून, किम व कोलटकर' अशी नोंद केलेली. (आणि नेमाड्यांबद्दलही काही नोंदी आपण केलेल्या आहेत). व्हिएतनाम युद्धादरम्यान झालेली नापाम बॉम्बफेक, त्यात जीव घेऊन धावणारी किम- यांच्याबद्दलची 'महामार्गावरील नग्निका' अशी कविता कोलटकरांनी केलेली. तिच्याबद्दलची गेल्या वर्षीची नोंद होती. ती कविता, तिची मांडणी चांगली वाटली म्हणून ती नोंद होती. म्हणजे ती मनुकं रुचलेली, टिकाऊ वाटलेली. आता ही 'परंपरा' सांगणारी कविता, म्हणजे त्यातली मनुकंही खाल्ली गेली, पण ती रुचली नाहीत, म्हणून नोंद केली. परंपरेच्या बऱ्या-वाईट नोंदी अशा जमतील त्या कुवतीनुसार दोन्ही बाजूंनी किंवा त्यापेक्षाही जास्त बाजूंनी करत राहण्यापलीकडं काय करणार. हेही एक सफाईकामच स्वतःपुरतं.
००० 

सुधारक ओलवे यांनी काढलेलं छायाचित्र / मुंबई
प्रसिद्ध छायाचित्रकार सुधारक ओलवे यांचं 'न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात - सफाई कामगारांची सांगितली न गेलेली कथा' अशा शीर्षकाचं एक पुस्तक पूर्वीच प्रकाशित झालेलं आहे. वरचं छायाचित्र त्यातलंच आहे. या पुस्तकातली छायाचित्रं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेतली आहेत, पण कथा तीच.

Saturday, 11 June 2016

फ्रान्झ काफ्का, सदानंद रेगे आणि म्यूट मूड

जर्मन भाषेत लिहून गेलेल्या फ्रान्झ काफ्काचा मृत्यू झाला ३ जून १९२४ला आणि मराठी भाषेत लिहून गेलेल्या सदानंद रेग्यांचा जन्म झाला २१ जून १९२३ला. म्हणजे काफ्काचा मृत्यू आणि रेग्यांचा जन्म यात एखाद् वर्ष असं होतं जेव्हा दोघंही या जगात होते, पण तरीही ते एकमेकांना भेटले असण्याची काहीच शक्यता नाही. आणि त्यांच्या भेटीचा काही पुरावाही उपलब्ध नाही. ते कोणत्या तारखेला भेटले अशी काही नोंद कुठे नाही. त्यांच्या भेटीची एकमेव नोंद म्हणजे सदानंद रेग्यांची एक कविता : फ्रान्झ काफ्का

म्हटलं
आज गादीला जरा
ऊन खाऊ दे.
गच्चीवर टाकली न टाकली तो
पसाभर ढेकूण
जीव घेऊन
सैरावैरा ढुंगणाला पाय
लावून धूम पळत सुटलेले.
तरी तीनचार पायाखाली आलेच.
त्यांच्या कुळथीच्या रंगाचे
रक्ताळ धूमकेतू
जमिनीवर गोंदणासारखे
उतरत्या सूर्याला साक्षी
ठेवून मी स्वत:शीच पुटपुटलो,
देवा, त्यांच्या आत्म्यांना शांती दे
त्यातला चुकून एखादा असायचा फ्रान्झ काफ्का!

ही कविता रेग्यांच्या हयातीत प्रकाशित झालेल्या त्यांच्या कवितासंग्रहांमधून आलेली नाही. ती नंतर साहित्य अकादमीनं प्रकाशित केलेल्या (आणि वसंत आबाजी डहाक्यांनी संपादित केलेल्या) 'निवडक सदानंद रेगे' या पुस्तकात पान क्रमांक ५९वर आहे. (मुळात ती 'अभिरुची' नियतकालिकाच्या मे-जून १९८३च्या अंकात प्रसिद्ध झालेली).

या पुस्तकाचं मुखपृष्ठ असं आहे:

साहित्य अकादमी, १९९६

मुखपृष्ठावरच्या चित्राचा तपशील पुस्तकात कुठं नोंदवलेला नसला, तरी पॉल क्ली यांचं 'अ यंग लेडीज् अॅडव्हेन्चर' या शीर्षकाचं हे चित्र असल्याचं आपल्याला शोधता येतं. हे चित्र १९२२ सालचं आहे. म्हणजे काफ्का वारला त्या आधी तीनेक वर्षांमधलं. आणि हा पॉल क्ली वारला २९ जून १९४० रोजी. म्हणजे जूनमधे नोंद करण्याला हे तीन टेकू मिळाले आपल्याला. या चित्राचे मूळ रंग कदाचित वरच्या मुखपृष्ठात बदलले गेले असतील. आपण मूळ चित्र फक्त कम्प्युटरच्या पडद्यावरच पाहिलेलं असल्यामुळं, त्याबद्दल बोलणं शक्य नाही. शिवाय, त्याचे विविध अर्थ आधीच कोणीकोणी तज्ज्ञांनी लावलेले असतात. आपण आपल्या मर्यादेत बोलू. चित्रात दिसणारी बाई- ती व्यक्ती कोणत्या मूडमधे आहे, असं वाटतं? थोडी हसतेय काय? तिच्या आजूबाजूला हे कोण चित्रविचित्र आकार करून आहे? पक्ष्यांसारखंही वाटतं मधेच, मधेच तो लाल बाण. हा मूड एवढा म्यूट का वाटतोय? तिच्या मनातली भीती हसण्यातून लपतेय का, पण बाहेरच्या आकारांमधून ती दिसतेय का? असे अर्थ कदाचित चित्र झटकल्यावर पसाभर ढेकणांसारखे निघू शकतात. काफ्काच्या मजकुरातूनपण असं होतं.

१९१२ साली काफ्काच्या डायरीतल्या या दोन नोंदी पाहा:
२६ मार्च: मी आधी जे लिहिलंय त्याबद्दल अवाजवी अंदाज बांधत बसत नाही, कारण त्यामुळं पुढं होणार असलेलं लिखाण अप्राप्य होऊन बसतं.

१ एप्रिल: या आठवड्यात पहिल्यांदाच लिहिण्यात पूर्ण अपयशी ठरलो. का? गेल्या आठवड्यातसुद्धा मी विविध मूडचा सामना केला, पण त्यांचा प्रभाव माझ्या लिखाणापासून दूर ठेवला. त्याबद्दल लिहायची मात्र मला भीती वाटते.
पुढं १९१३च्या २ मे रोजी आणखी:
पुन्हा डायरी लिहायची तीव्र निकड भासतेय. माझ्या विचारांमधलं अस्थैर्य, एफ., ऑफिसमधला उद्ध्वस्थपणा, लिहिणं शारीरिकदृष्ट्याच अशक्य बनल्याची अवस्था आणि (तरीही) आतून वाटणारी त्याची गरज.
आणखी पुढं १९१४च्या ३० नोव्हेंबरातपण तसंच:
लिहिणं आता मला शक्य नाही. अंतिम सीमारेषा येऊन ठेपलेय. [...] पुन्हा गारठलोय, संवेदनारहित झालोय, अतूट शांततेसाठीचं माझं कमजोर प्रेम सोडून काहीच उरलेलं नाही.
(द डायरीज ऑफ फ्रान्झ काफ्का. संपादक- मॅक्स ब्रॉड, इंडियालॉग पब्लिकेशन्स, ऑगस्ट २००३. जर्मनमधून इंग्रजीत भाषांतर कोणी केलं, ते या प्रतीत दिलेलं नाही.)

स्वतःच्या लिखाणाबद्दल भीती वाटणं, लिखाण अशक्य होणं आणि तरीही लिहिणं, या प्रक्रियेदरम्यान जे बोललं गेलं ते म्यूट असावं, चित्रातून दिसतंय तशासारखं. रेग्यांच्या कवितेत थोडा बाहेरबाहेरचा काफ्का आल्यासारखा वाटतो. पण बाहेरून आपण आत जाऊ शकतो. २०१२ साली आपण रेघेवर काफ्काची रस्त्याकडची खिडकी नोंदवलेली. २०१५ सालच्या जूनमधे म्यूट मान्सूनसोबत नोंद केलेली. आणि आता ह्या वर्षी जूनमधे म्यूट मूड.

Sunday, 1 May 2016

रेघेचे दोन आर्थिक संसार

एक

मराठवाडा साहित्य परिषद. पहिली आवृत्ती: १९७७
'मराठी भाषेचा आर्थिक संसार' ही अशोक केळकरांची एक सुंदर पुस्तिका आहे. 'पुस्तिका सुंदर आहे' आणि 'अनुष्का शेट्टी सुंदर आहे' या वाक्यांमधे फरक असतो, तो आपल्याला आपसूक समजून येतो. आपण जे पहिलं वाक्य लिहिलंय त्यात 'सुंदर पुस्तिका' याचा अर्थ तुम्ही कसा घेतलात? पुस्तिकेतला आशय, केळकरांचे विचार, मांडणीची पद्धत अशा काही गोष्टींशीच तो सुंदरपणा जोडलात ना? म्हणजे स्पष्ट-अस्पष्टपणे तसा तो आपसूक जोडला गेला असेल. आपणही त्याच अर्थानं ते लिहिलं. पण 'अनुष्का शेट्टी सुंदर आहे' या वाक्यातलं सुंदरपण तिच्या दिसण्याशी संबंधित आहे. तेही पुस्तिकेतल्या आशयाएवढं सुंदर वाटणं शक्य आहेच. पण तिचा स्वभाव किंवा वागणं असा बाकीचा आशय, ही नोंद लिहिणाऱ्याच्या प्रत्यक्ष अनुभवात असणं शक्य नाही, हा अंदाजही आपल्याला आपसूक येतो. किंवा काहींना अनुष्का शेट्टी हे नाव माहीत नसेल तरी ती कोणीतरी स्त्री असेल आणि ही नोंद लिहिणारा पुरुष असेल, त्यामुळं मग आपसूक तो तिला का सुंदर म्हणत असेल, याचा काही अस्पष्ट अंदाज बांधला जातो. तर, 'सुंदर' हा शब्द बाहेरच्या नुसत्या दिसण्याशी किंवा आतल्या मजकुराशी/त्याच्या अर्थाशी असा दोन्ही अंगांनी जोडता येतो. पण 'पुस्तिका देखणी आहे', असं म्हटलं असतं तर कदाचित असं झालं नसतं. देखणेपणा तसा दिसण्याशीच संबंधित राहतो. 'सुंदर' या शब्दाचा अर्थ मात्र तसा व्यापक आहे. हे शब्द आणि अर्थाचं जे आपसूक रसायन आपल्या डोक्यात तयार होतं, त्याबद्दलच केळकरांची ही ९४ पानांची भारी पुस्तिका आहे. इथं 'भारी' म्हणजे काय तेही आपसूक आपल्याला कळून जातं.

आपण भाषाविज्ञानाचे विद्यार्थी नसलो, विद्यापीठीय परिभाषेशी आपली फारशी ओळख नसली, व्याकरणाचीही फारशी माहिती नसली, तरीही ही पुस्तिका आपल्याशी संवाद साधणारी आहे. ही नोंद लिहिणाऱ्याशी ती म्हणूनच संवाद साधू शकली. सार्वजनिक व्याख्यानांची ही पुस्तिका असल्यामुळंही कदाचित ही व्यापकता आली असेल, किंवा केळकरांच्या लिहिण्यात थोडं असं व्यापकपण सुटंही होतं असेल, ते आपल्याला त्यांच्या 'रुजुवात' या पुस्तकातूनही जाणवतं. औरंगाबादला डॉ. ना.गो. नांदापूरकर स्मारक व्याख्यानमालेत १-२-३ मार्च १९७६ या दिवसांमध्ये केळकरांनी ही तीन व्याख्यानं दिलेली. पुस्तिकेत छापलेल्या प्रकाशनाच्या तपशिलावरून कळतं की, १९७७ साली या पुस्तिकेची पहिली आवृत्ती छापण्यात आली, ती अर्थातच एक हजार प्रतींची होती. आणि ही नोंद लिहिणाऱ्यानं १ मे २०१२ रोजी एका दुकानात पाच कप्प्यांच्या एका कपाटात खालून दुसऱ्या कप्प्यात एक गठ्ठा पाहिला. सहज पाहिलं तेव्हा तो गठ्ठा या पुस्तिकेचा असल्याचं दिसलं. दहाएक प्रतींचा गठ्ठा होता असेल, त्यातली एक विकत घेतली, तेव्हा ती पंचवीस रुपयांना मिळाली. आजही १ मे आहे, हा निव्वळ योगायोग समजूया.

या पुस्तिकेत केळकरांनी भाषेला पहिल्यापासूनच सरळ चिन्हव्यापार म्हणून पाहिलेलं आहे आणि वाचकांनाही त्याच अंगानं तिच्या काही अंगांचा उलगडा करून दाखवलेला आहे. भाषा ही एका व्यापक चिन्हव्यापाराचा एक अवयव फक्त आहे, आणि आता २०१६ साली या चिन्हव्यापाराचं स्वरूप कितीतरी जास्त व्यापक झाल्यासारखं आहे, त्यामुळं ही पुस्तिका वाचणं अजूनच सुंदर वाटतं.

यात सुरुवातीलाच एका ठिकाणी केळकर म्हणतात:
[...] चिन्हव्यापाराचे स्वरूप समजायचे तर तो ज्याच्याशी संबद्ध आहे तो अर्थव्यापार आपल्याला समजावून घ्यायला हवा. अर्थव्यापार हा एकंदर जीवनव्यापारावरच आधारलेला आहे. जीवनव्यापार समजावून घ्यायचा तर विश्वाचे दोन भाग पाडावे लागतात. एक जीव, दुसरा म्हणजे उरलेले विश्व. त्यातल्या त्यात त्या जिवाला स्थलकाल दृष्टीने जवळ ठरणारा त्याचा परिसर. तो जीव आणि त्याचा परिसर ह्यांमध्ये सदोदित घडामोड, क्रिया-प्रतिक्रिया चालू असते. ही घडामोड म्हणजेच त्या जिवाचे जगणे. जीव आणि त्याचा परिसर ह्या दोहांमध्ये जी आपण सीमारेषा ओढली त्या सीमारेषेच्या बाहेरच्या अंगाला आपण उभे राहिलो तर आपण म्हणून की, जिवाची अखंड घालमेल, चळवळ चालू आहे, आपण त्याचे आचरण पाहतो आहोत. आचरण आणि अनुभव ह्या जीवनव्यापाराच्या दोन बाजू आहेत. जीवनव्यापार समजावून घेणे म्हणजे परिसर, अनुभव, आणि आचरण ह्यांमध्ये जी जी घटिते घडत असतात त्यांच्यामध्ये संगती, कार्यकारणभावाची साखळी शोधणे. परिसर आणि अनुभव, अनुभव आणि आचरण, आचरण आणि परिसर असे दुवे जुळत जातात आणि जीव जगतो. मानव व इतर वरच्या श्रेणीमधले जे जीव आहेत त्यांच्या बाबतीत केवळ हे दुवे जुळत नाहीत तर हे दुवे शोधले जातात. जसजसे हे दुवे सापडत जातील आणि बांधले जातील तसतसा जीवनात अर्थ भरत जातो. चिन्हव्यापाराचा हा आदिम आधार आहे. (पान ४-५)
रेघेची सुरुवात आपण बिरबल-बादशहाच्या गोष्टीनं केलेली, त्यातून थोडंसं अडखळत आता आपण जे काही दुवे जोडत असतो ते केळकरांच्या या परिच्छेदाशी खूप जुळलेले वाटले. माणसाला वरच्या श्रेणीत बसवण्याचा त्यातला भाग थोडा बाजूला ठेवला, तर बाकीचे सगळे शब्द आता आपण इथं रेघेवर नोंदवतोय, याचं कारणही काही दुवे जुळवणं एवढंच आहे. ही नोंद लिहिणाऱ्यासाठी हे कारण वैयक्तिक असेल. तुम्हाला वाचक म्हणूनही ते बरं वाटत असेल, तर ते या भाषेमुळं शक्य होतंय, त्यामुळं तिच्या मर्यादांसकट आपल्याला ती सुंदर वाटायला लावतेय, हा रेघेचा पहिला आर्थिक संसार आहे.

हे दुवे का जोडायचे, किंवा का जोडावेसे वाटतात, याची कारणं शोधत राहणं- हा या संसारातला एक नेहमीचा भाग आहेच. यातलं एक कारण केळकरांच्या पुस्तिकेत सापडलं, ते असं:
प्राचीन चीनमधील विचारवंत, समाज आणि संस्कृती यांचा समीक्षक कुंग फु-त्स (ज्याला साहेब कन्फ्यूशिअस म्हणतो) ह्याला त्याच्या एका शिष्याने विचारले की, वेई प्रांतातील राज्याच्या कारभाराची सूत्रे जर गुरुजींच्या हाती आली तर ते प्रथम कोणते पाऊल उचलतील? गुरुजी म्हणाले: "पी येह चंग मिंग हु." (म्हणजे बहिणाबाई चौधरींच्या भाषेत सांगायचे तर कशाले काय म्हनवा आनी कशाले काय म्हनू नहीं ह्याबद्दल शिस्त आणणे). (पान ६६)
केळकर जी शिस्त म्हणतायंत, ती शुद्ध-अशुद्ध, पुस्तकी व्याकरण, प्रमाण-अप्रमाण भाषा अशा अर्थानं नाही, हे तर झालंच. शिवाय, ही शिस्त सत्ताधाऱ्यांनी प्रजेला लावणं, हा मुद्दा बाजूला ठेवू. आपलं आपल्याला या दुव्यांमधल्या सुसंगतीचं काही वाटतं का, हा आपल्यापुरता नोंदवण्यासारखा मुद्दा आहे. कुठल्याही चिन्हाला काही संदर्भ असतात, त्या संदर्भांना सोडून चिन्ह वापरलं तर ती बेशिस्त होते, नि संवादच कोलमडतो असं साधारण केळकरांचं म्हणणं आहे. हे संदर्भ म्हणजे साचा नसतो, प्रवाही-बदलतं असं हे प्रकरण असतं. पण आता चिन्हांचा वावर प्रचंड वाढलेल्या काळात हे संदर्भ शोधायचे कसे, दुवे जोडायचे कसे, असं आपल्याला वाटू शकतं. फेसबुकवरचं 'लाइक' बटन, त्यात अलीकडं त्यांनी घातलेली आणखी काही भावनांची भर हे याचं अगदीच लहानसं उदाहरण आहे. 'राष्ट्र', 'राजकारण', 'विचारवंत', 'पत्रकारिता', 'इव्हेंट', 'मार्केटिंग', 'यश', 'पुरस्कार', 'बंडखोरी'- अशा बहुधा असंख्य चिन्हांच्या बाबतीत असा अस्पष्ट दुव्यांचा व्यापार सुरू असतो. प्रसारमाध्यमं तर यावरच उभी असतात. तर,  हा व्यापार चालवणारे कोण असतात? आपल्याला कितीही वाटत असलं, तरी त्यावर आपला अधिकार किती असतो आणि काही ठराविक लोकांच्या व्यापारी गणितांचा अधिकार किती असतो? हे प्रश्न आपल्याला तपासावेसे वाटतात. यात काही वेळा आपले-आपण काही बिंदू टिपतो, तर काही वेळा इतरांचे (पटलेले/न पटलेले/रोचक वाटलेले) असे बिंदू टिपतो, या अर्थी या नोंदी म्हणजे टिपणं आहेत. इथं २०१०पासून नोंदवली गेलेली रेघेची सुरुवात व्यक्तिगत पातळीवर २००८च्या शेवटाकडं झालेली होती,  त्यामुळं तेव्हापासूनची सात-आठ वर्षं धरली, तर आपण अशा या काही नोंदी किंवा टिपणं इथं करत आलोय.

दोन
पैशाची भक्ती आता एखादा धर्म म्हणवण्याएवढ्या थराला पोचलेली आहे, हे त्याच्या लक्षात आलं नि काळ पुढं जात गेला तसं अधिकच प्रकर्षानं हे त्याला जाणवत गेलं. किंवा बहुधा आपल्याकडे सोपवण्यात आलेला हाच एकमेव खरा धर्म आहे- खराखुरा जाणवणारा धर्म. देवाच्या जागी आता पैसा आहे. सत् आणि असत् यांना आता काही अर्थ राहिलेला नाही. अर्थ फक्त अपयश नि यश यातच आहे. म्हणूनच बहुधा 'चला झाली राव कायतरी भरपाई'सारखे गहन महत्त्वाचे शब्दप्रयोग वापरात आले असतील.
- जॉर्ज ऑर्वेल ('किप द अॅस्पिडिस्ट्रा फ्लाइंग'मधून भाषांतरित).
गॉर्डन कॉमस्टॉक या मुख्य पात्राच्या संबंधीचे विचार. 

२६ जानेवारी २०१६ रोजी रेघेच्या पानावरच्या उजव्या समासात निधी भरायचा एका पर्याय वाचकांसमोर ठेवला होता. निधीसंकलनासाठी मंच उपलब्ध करून देणाऱ्या एका संकेतस्थळाद्वारे ही सोय केली. त्यात पंधरा हजार रुपये असं लक्ष्य ठेवलेलं होतं आणि निधीसंकलनासाठीचा कालावधी सरळ डिसेंबर २०१६पर्यंतचा देऊन ठेवला होता. पर्यायाची तपासणी करण्यासाठी पहिले शंभर रुपये आपणच त्यात भरून पाहिले, आणि त्यानंतरचा निधी वर्षभरात जमा झाला तर झाला, असं मनात धरलं होतं. यात फारशी अपेक्षा ठेवलेली नव्हती, त्यामुळं अनपेक्षितपणे तीन महिन्यांच्याही आत हा सगळा निधी भरला गेला, हे थोडं आश्चर्यकारक वाटलं. तर १० एप्रिललाच हा निधी पूर्ण जमा झाला. साधारण अठरा वाचकांनी या निधीत विविध रकमांचा सहभाग नोंदवल्याचं दिसतं. एकूण १५,००० रुपयांपैकी १,५०० रुपये संबंधित संकेतस्थळाच्या कामाचं शुल्क (१० टक्के) म्हणून वजा, २१० रुपये सेवा कर (१४ टक्के) वजा, ७.५० रुपये स्वच्छ भारत कर (०.५ टक्के) वजा, असं गणित होऊन रेघेच्या बँक खात्यात १३,२८२.५० रुपये इतकी रक्कम जमा झाली. याशिवाय काही वाचकांनी सुटी रक्कम जमा केलेली (यातली काही रक्कम जानेवारीपूर्वीची आहे), ती एकूण मिळून बरोब्बर सात हजार आहे. म्हणजे सगळं मिळून साधारण चार महिन्यांमधे सुमारे वीस हजार रुपये इतका निधी रेघेच्या नावावर जमा झाला.

हे आपण कशाला केलं?

ब्लॉग म्हणजे मूळचे शब्द वेब-लॉग, म्हणजे महाजालावरची वही ही. तर लिहिणारा वहीत लिहू शकतो, वर्तमानपत्रात, साप्ताहिका-मासिकांमधे, खास दिवाळी अंकांमधे, असं कुठं जमेल तिथं लिहू शकतो. रेघेवर आपण लिहितो त्याला पत्रकारी भाषेत 'स्फुट' म्हणता येईल. त्यासाठीचा सोपा शब्द आहे 'फुटकळ'. अशा काही नोंदी आपण करतो. आणि आपल्याला हे करायला मजा येते, आनंद वाटतो. मराठीतल्या ज्या छापील माध्यमांशी संपर्क आला त्यात हा आनंद रेघ लिहिणाऱ्याला वाटलेला नाही. लिहिण्याचा म्हणून आनंद असतो त्याला तसा कोणी हे हात लावू शकत नाहीत, पण लिहिल्यानंतर ते छापून येणं नि त्यासंबंधीचा मराठीतला व्यवहार भीषण खालावलेला आहे, असं आपलं मत आहे. यासाठीची काही उदाहरण रेघेवरच्या काही नोंदींमधेही कुठं ना कुठं आहेत. त्यावर फार इथं आत्ता बोलावं वाटत नाहीये. आणि हे वैयक्तिक मत आहे, असं म्हणून तुम्ही सोडूनही देऊ शकता.

'ब्लॉगर' हीसुद्धा 'गुगल' या कंपनीची सेवा आहे. त्यांच्या मनात आलं तर ते काही सेकंदात हा आपला पत्ता कापू शकतात, हे आहेच. त्यावर उपाय करण्याएवढी तांत्रिक ताकद रेघेकडं आत्ता नाही. शिवाय यात आर्थिक ताकदही महत्त्वाची ठरत असेल थोडी तरी. आणि ताकदीपेक्षाही या बाबतीत वेगळा काही पत्ता उभारण्याची गरज आणि आकांक्षा आपल्यात नाही. तसंही आपला पत्ता गुगलवाले कापतील असं नाही. पण शेवटी आपण त्यांची मोफत सेवा वापरून हे लिहितोय, एवढं तर आहेच. तरी, ब्लॉगलेखनात अधिक मोकळीक आहे. इथं शब्दांसोबत इतर चिन्हांचा वापरही अधिक नीटपणे करता येतो. म्हणजे लेखकाच्या लिहिण्याची साधनं वाढतात, हे सुंदर वाटतं. कुठले शब्द वापरावेत, यासंबंधी संपादकीय कमजोरीचा अडथळा नाही. मुख्य प्रवाहातल्या छापील माध्यमांसारखी तथाकथित प्रतिष्ठा अजून इथं नसल्यामुळं कोणाच्या फार काही अपेक्षा नसतात, उणिवाही वाचक उघडपणे बोलू शकतात, प्रतिक्रिया म्हणून नोंदवू शकतात, त्यामुळं अधिक खुलेपणा आहे. वर्तमानपत्रांसारखं माध्यम लाखो लोकांपर्यंत पोचतं, मराठी मासिकं-साप्ताहिकंही पाचशेपासून पाच हजारांच्या आसपास वाचकांपर्यंत पोच असलेली दिसतात, तेवढी पोच मराठीत तरी ब्लॉग या माध्यमाची अजून नाही, हे खरं. पण हा मुद्दा लिहिण्याच्या आनंदाएवढा महत्त्वाचा वाटत नाही. अगदीच महत्त्वाचा नाही असं नाही. पण ब्लॉगमधे शब्दांसोबतच इतर चिन्हव्यवहारही लेखकाच्या आर्थिक संसारात आणता येतो, ही सुंदर गोष्ट या बऱ्याच गोष्टींना पुरून उरणारी आहे.

मराठीत, कविता हा सर्वोच्च वाङ्मयप्रकार आहे, कथा हा क्षुद्र वाङ्यमप्रकार आहे, कविता म्हणजे सगळ्यापेक्षा सर्वोच्च अशी काही थोर गोष्ट आहे, लेखकाची (दिखाऊ) नैतिकता असते, (जाहिराती नि कविता एकत्र लिहूनही) कवी मंडळी बाजारपेठेच्याविरोधात असतातच, साठोत्तरी-नवदोत्तरी अशा कवींच्या पिढ्या असतात- अशा कित्येक गोष्टी बोलल्या जातात. यातून हाताला काय लागतं, माहीत नाही. समाजातल्या इतर सर्वांची एक वयानं ठरलेली पिढी असते, त्यातही काही श्रेणी लावून लेखक-कवींची वेगळी पिढी लावणं सोईचं जात असावं. पण हे सगळं कंटाळवाणं वाटतं. साहित्यापुरतं बोलायचं तर, छापील माध्यमांमधून ही कंटाळवाणी परंपराही आपसूक जास्त प्रमाणात साचलेली असते, तो अडथळाही ब्लॉगलेखनात नाही. नैतिकता, बाजारपेठविरोध, वाङ्यमप्रकाराचा सर्वोच्चपणा या गोष्टी इतक्या सोप्या वाटत नाहीत, एवढंच बोलून हे सोडून देऊ. पण यापासून दूर असण्याची मोकळीक ब्लॉगलेखनात मिळते, हेही सुंदर वाटतं.

पण समजा एखाद्याला कादंबरी लिहिण्याचीही आवड नि सवय असेल, तर त्यानं ब्लॉगही लिहावा का? कादंबरीतून वास्तव-अवास्तव अधिक गुंतागुंतीसह, अधिक व्याप वाढवून मांडता येत असेल, तर ब्लॉगसारख्या गोष्टीत वेळ का घालवावा? या प्रश्नांचं ठोस उत्तर माहीत नाही. पण हे लेखन कादंबरीलेखनाला पूरक ठरणारं लेखन असतं, असं छोटंसं मत नोंदवू. ही मतं शेवटी वैयक्तिकच राहतात आणि खरं तर ज्याचा त्याचा लिहिण्याचा कल असतो, एवढंच उत्तरही पुरेल. या वहीतली एकेक नोंद आपण सोईसाठी सुटी लिहितो आणि सुटी एकेक नोंद वाचतो, पण एकत्र मिळून या सगळ्या नोंदींची रचना नक्की काय करू पाहते? त्यातून काही सर्जनशील समाधान लेखकाला मिळतं का? वाचकालाही तसं वाटतं का? हे प्रश्न महत्त्वाचे वाटतात. लेखकाला यात सर्जनशील आनंद मिळतोय, एवढं उत्तर ठामपणे देता येईल. एकाच नोंदीपुरतं बघितलं तर वेगळं वाटेल, पण एकूण मिळून पाहिलं तर ही वही म्हणजे एखाद्या कादंबरीकाराला पुरवणी-टिपणांसारखी वापरता येऊ शकते. वाचकांना काय वाटतं, ते वाचकच सांगू शकतील.

पुस्तक रूपात छापलं तर गोष्ट वेगळी, पण बाकी छापील माध्यमांमधून केलेलं असं स्फुट/फुटकळ लिखाण सुटं-सुटं असतं. ते एकत्र कात्रणांसारखं ठेवलं तर कदाचित एकसंधता जाणवू शकते. इथं मात्र आपसूकच ते एकसंधपणे या वहीत नोंदवलं जातं, हाही या रचनेचा चांगला भाग वाटतो. म्हणजे इथं या नोंदी-टिपण-निबंध वजा लेखनालाही एकसंध रचनेसारखं असण्याची सोय आहे. चुकाही समजायला बरं जातं, बरं-वाईट एकत्र राहतं.

तर, म्हणून आपण रेघ चालवतो आणि ती चालवण्यासाठीचं आपलं कारण पहिल्या आर्थिक संसाराचंच आहे, पण त्यासोबत दुसरा आर्थिक संसारही थोडासा जोडून ठेवलेला आहे. पैसा ही गोष्ट सगळ्यांना लागते, सगळ्यांकडे तो कमी-अधिक असतो, आणि ऑर्वेलच्या कादंबरीत नोंदवलं गेलंय ते आता मोठ्या प्रमाणात जाणवतंही. त्यासंबंधीचा रेघ लिहिणाऱ्याचा मार्ग सुटा वेगळा एक आहेच, ही नोंद वाचणाऱ्यांप्रमाणे त्याचंही त्याबाबतीतलं काहीएक गणित आहेच, त्यात रेघेचा हा निधी खूप मोठा आधार वगैरे नाही, त्याचं दुसरं गणित व्यवस्थित सुरू आहे, पण तरीही हा इथला निधीचा प्रयोग आपण करत राहणारोत. त्यात यश-अपयश असं काहीच होणार नाहीये. आणि ही धार्मिक रुढी म्हणूनही समासात नोंदवली जाणार नाहीये. उलट त्यातली धार्मिकता कमी करता आली इथल्यापुरती तरी बरं. चार महिन्यांत वीस हजार, म्हणजे महिन्याला पाच हजार अशी या निधीतली सरासरी भर आहे. नियमितपणे आपण हा पर्याय समासात ठेवून दिला, तर कायम या वेगानं रक्कम जमा होणार नाही, हे तर आहेच. दुसरं म्हणजे, कित्येक लोकांचं महिन्याचं उत्पन्न पाच हजारांपर्यंतही नसतं आणि काही लोकांचा दिवसाचा किंवा एक वेळच्या जेवणाचा खर्चही एवढा किंवा यापेक्षा जास्त असतो, आणि अशी माणसं एकमेकांपासून एखाद्या किलोमीटर अंतराच्या अवकाशातही नांदत असतात, हे या धर्माचं खतरनाक रूप कोणालाही पाहायला मिळू शकतं. त्यामुळं आपण यात काही यश-अपयश शोधू शकतही नाही. पण इथल्या लेखनाला पूरक गोष्ट म्हणून या निधीचं काही उभं करायचा प्रयत्न तरी आपण करत राहू. तिथेच वाचकांना त्यांच्या इच्छेनुसार-मतानुसार क्रेडिट-डेबिट कार्ड-ऑनलाइन बँकिंग अशा मार्गांनी रेघेच्या निधीत भर टाकता येईल. 'पे-यू-मनी' या संकेतस्थळाच्या माध्यमातून आता ही कायमस्वरूपी वर्गणीची पिशवी समासात अडकवलेली राहील. त्यासाठी आपण आधीही आवाहन असं वेगळं काही केलं नव्हतं, आणि आताही तसं आवाहन म्हणून काही नाही. (मोबाइलवर रेघ वाचणाऱ्यांना उजवीकडचा समास दिसत नाही).

उपसंहार

पहाटे लवकर संडासला जायला लागलं, तर कुठं जायचं लांब, म्हणून रोज रात्री न जेवता झोपणारा एक इसम रेघेच्या ओळखीचा आहे. त्याच्याकडं जेवण्यापुरते पैसे तर असतातच, पण घर नसल्यामुळं आणि वयामुळं काही तडजोडी कराव्या लागतात. संडास-झोप इत्यादी बाबतीतल्या या तडजोडी आहेत. नोकरीचं वय आता ओसरलं असलं तरी त्याचा त्याचा म्हणून पैशांचा काही हिशेब असतो, तो आधीच्या आर्थिक बचतीद्वारे बरोबर साधला जातो. ही नोंद लिहीत असताना हा इसम शब्दशः एक मिनिटाच्या (पायी लागणारा वेळ) अंतरावर बसलेला आहे. 

दुसरीकडं रेघेच्या ओळखीची दोन वर्षांची एक मुलगी गेल्या काही काळात, 'टटटटटट, तततततत, त्ती... (हत्ती), दलाप (जिराफ), त्त्या (आत्त्या), एपीबदेतूयू... (हॅपी बर्थ डे टू यू)', वगैरे शब्द तिच्या तिच्या व्याकरणानं बोलू लागतेय. दोन-तीन आठवड्यांच्या अंतरात ती जुनं व्याकरण कोलमडवून, नवं व्याकरण उभं करू शकते. तिचा चिन्हांचा अर्थव्यापार प्रचंड धगधगता आहे. ही नोंद लिहीत असताना ही मुलगी बारा तासांच्या (बसनं लागणारा वेळ) अंतरावर आहे.

वरच्या दोन परिच्छेदांमधे नोंदवलेली वाक्यं म्हणजे काही महान माहिती नाही, बातमी नाही, मराठीत ज्याला वैचारिक लेखन म्हणतात ते नाही, फेसबुक-व्हॉट्सअॅपवरची संवेदनशील पोस्टही नाही. या वाक्यांचा काहीच व्यावहारिक, आर्थिक उपयोग नाही. आपल्या आजूबाजूच्या असंख्य तीव्र संदर्भांमधले हे दोन संदर्भ आहेत, एवढंच खरं आहे. जमलंच तर ते जोडण्यासाठीचा तिसरा संदर्भ म्हणून रेघ मारायचा प्रयत्न आपण करत असतो.
०००

लहानपणी मी आत्मसात केलेली जीवनदृष्टी पूर्णपणे सोडून देण्याची क्षमता माझ्यात नाही, आणि तशी इच्छाही मला होत नाही. मी जिवंत असेन तोपर्यंत लेखनशैलीबद्दल, या भूमीबद्दल माझ्या तीव्र भावना कायम राहू देत; (विविध) घन वस्तू व निरुपयोगी माहितीच्या रद्दीतून मला आनंद मिळवता येत राहू दे. माझं हे अंग लपवण्यात काहीच अर्थ नाही. माझ्यात मुरलेल्या आवडीनिवडी आणि सध्याच्या युगानं आपल्या सर्वांवरच लादलेल्या मूलतः सार्वजनिक स्वरूपाच्या- अव्यक्तिगत क्रिया यांच्यात संगती शोधणं हे (माझं) काम आहे.
- जॉर्ज ऑर्वेल ('व्हाय आय राइट' या निबंधातून भाषांतरित)


निरुपयोगी वस्तूंमधली संगती । पेंग्वीन, २००९ । १३५० रुपये
मुखपृष्ठ छायाचित्र: जॉन हिंड । रचना: जिम स्टॉडर्ट

Thursday, 14 April 2016

आंबेडकर आणि दोषाचं एकक

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ या पुस्तकातील एका उताऱ्याचा संदर्भ देऊन त्यात आंबेडकरांनी ‘दोषाचं एकक’ ही संकल्पना कशी मांडलेय, हे अनिकेत जावऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ('फुको आणि आंबेडकर', काळे पांढरे अस्फुट लेख, हर्मिस प्रकाशन, २०११: एक जुनी नोंद). जावरे लिहितात:
आता आपण आंबेडकरांच्या 'हू वेअर द शूद्राज्'मधल्या एका सुंदर आणि फुकोसदृश क्षणाकडे वळू या. ते एका विचित्र कल्पनेबद्दल लिहितात. कदाचित त्या काळच्या न्यायविचारात आणि कायदाव्यवस्थेत ती रूढही असेल. या कल्पनेत आपल्याला आंबेडकरांच्या न्यायाच्या जाणिवेची तीक्ष्णता दिसते. ते सामाजिक न्यायाबद्दल लिहिताना अचानक 'दोषाचे एकक' (unit of guilt)बद्दल लिहितात. या शब्दसमूहाचा अर्थ काय? दोष मोजता येतो काय? दोषाचा जर एकक असेल, असे एककीकरण करता येत असेल, व्यक्तिकरण करता येत असेल तर दोष विभाज्य असला पाहिजे. दोषाची विभागणी कशी करायची?

या प्रश्नांना आंबेडकरांकडे उत्तर आहे. त्यांचे म्हणणे संक्षेपात असे आहे: अशा घटनेचा विचार करा की एक शूद्र, ब्राह्मणी किंवा इतर सामाजिक संकेत पाळत नाही. किंवा अधिक सोप्या शब्दात सांगायचे झाले तर असे: कल्पना करा, तुम्ही शाळेत शिक्षक/ शिक्षिका आहात. वर्गात गेल्यावर तुमच्या असे लक्षात येते की कुणी तरी विद्यार्थ्याने फळ्यावर काही तरी अश्लील लिहिलेले आहे. तुम्ही मुलांकडे वळून म्हणता 'कोणी लिहिलंय हे?' तुम्हाला या कृतीला जबाबदार असणारी व्यक्ती हवी आहे. पण मुले काही सांगत नाहीत. बराच प्रयत्न केल्यानंतर तुमचा हमखास उपाय काय असणार? तुम्ही म्हणता की ज्याने हे लिहिलेय त्याने कबूल केले नाही तर सर्व वर्गाला शिक्षा करीन. आता तुमचे दोषाचे एकक म्हणजे संपूर्ण वर्ग! एक व्यक्ती पायात चप्पल तशीच ठेवून मंदिरात आत जाते आणि पाहा! एक वस्ती जाळली जाते, एखादे कुटुंब नष्ट करण्यात येते.
यानंतर जावऱ्यांनी 'हू वेअर द शूद्राज्'मधल्या एका उताऱ्याचं भाषांतर दिलंय. काही विशिष्ट शूद्र राजांशी झालेल्या संघर्षात ब्राह्मण समूहाचं प्रत्युत्तर संपूर्ण शूद्र समूहाला दिलेलं होतं, परिणामी ब्राह्मणांनी अनेक (धर्मशास्त्रीय) क्लृप्त्या लढवून शूद्र हा वर्ण ‘खाली’ ढकलला- असं आंबेडकरांचं म्हणणं. त्यासंबंधी जावऱ्यांनी ‘शूद्र पूर्वी कोण होते?’मधला जो परिच्छेद दिलाय, त्यातला काही भाग असा:
“... हा संघर्ष प्राचीन भूतकाळात झाला, जेव्हा जीवन हे कृती आणि विचाराने आदिवासी होते, आणि नियम असा होता की जमातीतल्या एका व्यक्तीने जे केले ते संपूर्ण जमातीने केले असे समजायचे. सर्व प्राचीन समाजांमध्ये जमात किंवा समाज हेच एकक होते, व्यक्ती हे नव्हे, परिणामतः एका व्यक्तीचा दोष हा पूर्ण समाजाचा दोष होता, आणि पूर्ण समाजाचा दोष हा त्या समाजातील प्रत्येक आणि एकूणएक व्यक्तींचा दोष होता. हे सत्य जर ध्यानात ठेवले तर असे म्हणणे साहजिकच आहे की ब्राह्मणांनी त्यांचा द्वेष फक्त काही राजांपुरता मर्यादित ठेवला नाही, तर पूर्ण शूद्र समाजापर्यंत वाढवला आणि उपनयनाचा प्रतिरोध सर्व शूद्रांना लागू केला”. (आंबेडकरांच्या या मूळ इंग्रजी उताऱ्याचं भाषांतर जावऱ्यांचं. 'आदिवासी'ऐवजी 'जमातीय' असा शब्द कदाचित अधिक रास्त झाला असता. 'आदिवासी' शब्द इथे अप्रस्तुत वाटतो).
जावरे पुढं म्हणतात:
आंबेडकरांच्या वर्णनात हे स्पष्ट आहे. न्यायाचे, न्यायव्यवस्थेतले एकक व्यक्ती हेच आहे, किंवा व्यक्तींचे गट असेच आहे. परंतु समाजात वापरले जाणारे न्यायाचे एकक म्हणजे संपूर्ण जात हे आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने सामाजिक संकेत मोडले तर संपूर्ण जातीला शिक्षा होते. [...] न्यायव्यवस्थेत-कोर्ट-कचेऱ्यात- न्यायाचे एकक व्यक्ती हेच आहे, आणि बराच काळ तसेच राहिले आहे. परंतु आपल्या समाजात व्यक्ती हे एकक नक्कीच नाही.
मोठ्या सामाजिक-राजकीय घडामोडी तर सुरूच असतात, आपण इथं या नोंदीपुरतं रोजच्या जगण्याच्या पातळीवरच बोलू शकतो. त्यातही आपण आपल्या आसपासाकडे बघण्यासाठी कोणतं एकक वापरतो? माणूस सोडून बाकीच्या जीवांसाठी तर असं एकेकट्याचं एकक क्वचितच वापरलं जातं. पाळीव प्राणी असेल घरात, तर त्याला काही नाव देऊन त्याला 'स्वतंत्र' एकक मिळतं, किंवा गोठ्यातल्या गाईला ती संधी मिळेल; पण बाकी कबुतरानं आपल्या खिडकीत शी केली, तर ती एका विशिष्ट कबुतरानं अशी केलेली नसते, सगळ्या कबुतरांना त्याचा साहजिकपणे दोष जातो. किंवा मुंग्या, डास वगैरे मंडळींचं एककही त्यांचा अख्खा वंश एवढंच असतं आपल्या लेखी. बाकीच्या जीवांचं खूपच झेपण्यापलीकडचं होईल, पण माणसांपुरतं तरी एकक व्यक्तीचं असावं, असं जमेल का, असा आंबेडकरांच्या मांडणीतला अर्थ आपल्याला कळतो.

व्यक्ती आणि समाज यांच्यातल्या द्वंद्वाचा उल्लेख त्यांच्या लिखाणात कुठंकुठं सापडतो आणि त्यातून हा दोषाच्या एककाचा मुद्दा कसा आणखी खोलात शोधता येईल, हे अभ्यासकांचं काम आहे. आपण इथं पत्रकारी नोंदी करतो, तर आंबेडकरांनी त्यांच्या 'बहिष्कृत भारत' या वर्तमानपत्रामध्ये १५ जुलै १९२७ रोजी एका लेखात मांडलेलं मत नोंदवू, ते असं:
समाजाच्या अस्तित्वासाठी समाजबंधने जरी आवश्यक असली तरी व्यक्तीच्या परिपोषाला अशी बंधने बाधक होतात. जोपर्यंत समाजाचे मत आणि व्यक्तीचे मत यांत एकतानता असते, तोपर्यंत लढा उत्पन्न होत नाही. परंतु जेव्हा समाजाच्या मतांत आणि व्यक्तीच्या मनांत भिन्नता दिसून येते तेव्हा ओढाताण सुरू होते, आणि व्यक्तीला जरूर ते स्वातंत्र्य जर प्राप्त झाले नाही तर त्याचे नैतिक परिणाम उभयतांवर सारखेच अनिष्ट होतात. त्यातल्यात्यात सामाजिक बंधनाने व्यक्तीचा कोंडमारा झाला म्हणजे ज्या गोष्टी मनापासून कराव्याशा वाटतात, परंतु त्या समाज उघडपणे करू देत नाही, त्याच गोष्टी मनुष्य छपवून करावयास लागतो. अशा प्रकारची सवय माणसास एकदा जडली म्हणजे तो सहजच दांभिक वृत्तीचा, दुहेरी वर्तनाचा, असत्य बोलणारा, अप्रामाणिक मनुष्य बनतो.
('व्यक्तीला जरूर ते स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही तर त्याचे नैतिक परिणाम व्यक्ती व समाज यांच्यावर सारखेच अनिष्ट होतात', डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता: १९२० ते १९२८, डॉ. आंबेडकर लेखन व भाषणे खंड १९, महाराष्ट्र शासन, २००५: पान १९९).

म्हणजे, त्या वाऱ्यावर उडणाऱ्या म्हातारीप्रमाणे व्यक्ती समाजापासून तुटलेल्या अवस्थेत असावी, असं आंबेडकरांचं म्हणणं दिसत नाही. पण तरी व्यक्तीची तिची तिची ओळख फक्त जन्मजात पारंपरिक ओळखीवर आधारलेल्या एककाची राहू नये, असं त्यांचं म्हणणं दिसतंय. जातीचं तर झालंच, पण बाकी अनेक ओळखींच्या बाबतीत हे लागू होऊ शकतं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्याच घडामोडींशी हे जोडून पाहता येतंच. अगदीच प्रत्येक वेळी आपल्याला व्यक्तीच्या एककानं वागणं-पाहणं शक्य नाही. म्हणजे बोलताना 'लोक' असा शब्द न वापरता कोण कुठं बोलू शकतं? कधीतरी ते होतंच. आपलं व्यक्ती असणं ठसवताना आपण असं बाकीचे 'लोक' म्हणतो तो भाग वेगळा. सामाजिक अभ्यासासांठीही तसं सामूहिक एकक आवश्यक राहतंच. पण सर्वसाधारणपणे दोष वगैरे देताना तरी हे एकक असं सरसकट वापरू नये, असं आंबेडकरांच्या चष्म्यातून आपल्याला दिसतं. बाहेर देशाच्या न्यायव्यवस्थेसमोर किमान कागदावर तरी व्यक्तीचं एकक असल्याचं वरच्या उताऱ्यांमधून आपल्याला कळतं, पण आपल्या मनातल्या न्यायव्यवस्थेसमोर तसं होतं का? हा प्रश्न आज आंबेडकरांच्या १२५व्या जयंती निमित्तानं नोंदवून ठेवू.

डॉ. बाबासाहेब आंंबेडकर
[१४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६]

टीप: 'हू वेअर द शूद्राज्'मधला आंबेडकरांचा मूळ परिच्छेद असा:
“We have no direct evidence, but there would be nothing unnatural in supposing that in these conflicts with the Brahmins, the whole Shudra community, not merely a few Shudra kings, was involved. This conflict, it must be remembered, has taken place in the ancient past when life was tribal in thought and in action, and when the rule was that what was done by one individual belonging to the tribe was deemed to be done by the whole tribe. In all ancient societies the unit was the tribe or the community and not the individual, with the result that the guilt of the individual was the guilt of the community and the guilt of the community was the guilt of every individual belonging to it. If this fact is borne in mind, then it would be quite natural to say that the Brahmins did not confine their hatred to the offending kings, but extended it to the whole of the Shudra community and applied the ban against Upanayana to all the Shudras.

Tuesday, 5 April 2016

दबा धरून बसलेली वर्तमानाची झाडं

'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'च्या ५ डिसेंबर २०१५ रोजीच्या अंकात 'रायटिंग द प्रेझेन्ट' हा लता मणी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात एका ठिकाणी मणी यांनी म्हटलेलं की:
आपण जिची तीव्र इच्छा धरलेय ती गोष्ट आधीच अस्तित्त्वात आहे, किंवा अस्तित्त्वात नसेल तरी काही काळानं ती अस्तित्त्वात येईल, अशी बतावणी करणं ही सत्तेची लबाडी असते. भविष्याची एक विशिष्ट संकल्पना वर्चस्व गाजवते; आणि तिच्या आगमनासाठीची रंगभूमी एवढंच वर्तमानाचं स्थान उरतं. या दृष्टीत भूतकाळ अवशेषांनी भरलेला असतो, वर्तमान बिनमहत्त्वाचं असतं आणि भविष्य ही एकच गोष्ट महत्त्वाची असते. पण, आपल्याला कितीही नको असलं तरी आपण वर्तमानात जगत असतो. वर्तमानातच भूतकाळ जगला जातो, त्याची पुनरावृत्तीही होते, त्याची कल्पना आणि पुनर्कल्पना केली जाते, त्यावर टीका केली जाते आणि त्याला स्वीकारलंही जातं. आणि या वर्तमानावरच भविष्याला लादलं जातं. त्यामुळं वर्तमानाकडं लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं.
'थिअरी' या गोष्टीविषयी काही बोलावं, त्याच्या कक्षा रुंदावाव्यात, असा हेतू मणी यांनी लेखात नोंदवलाय. त्या स्वतः विद्यापीठीय क्षेत्रातल्या आहेत. इंग्रजीतला 'theory' हा शब्द 'theoria' या शब्दातून आलाय नि त्याचा अर्थ 'निरीक्षणाची कृती' असा आहे, असंही त्यांनी लेखात म्हटलंय. या निरीक्षणाचं वर्तमानाचं भान जागं ठेवण्यासाठी कला इत्यादी गोष्टींचा काही हातभार लागू शकतो का, असा एक धागा त्यांच्या लेखात दिसतो. इतरही काही धागे आहेत आणि त्यावर काही मतभेदही होऊ शकतील. आपल्याला त्यातल्या एकाच धाग्याला जोडून नोंद करायची आहे.

मणी यांनी या त्यांच्या शोधाचा भाग म्हणून दोन 'चलत्-चित्र-कविता' निकोलास ग्रान्डी यांच्यासोबत तयार केलेल्या आहेत. या प्रयोगांची माहिती त्यांनी वरच्या लेखात दिलेय. ग्रान्डी कॅमेऱ्यासोबत काही करू पाहणारे, तर मणी शब्दांसोबत काही करू पाहणाऱ्या. शब्दांची आणि प्रतिमांची एवढी गर्दी उडालेल्या आजच्या जगात या दोघांमधलं नातं तपासावं, त्यात काही प्रयोग करावेत, अशी त्यांची इच्छा त्यांनी नोंदवलेय. आणि त्यातून 'नॉक्टर्न-१' व 'नॉक्टर्न-२' या चलत्-चित्र-कविता तयार झाल्या. ('नॉक्टर्न'ला थेट मराठी प्रतिशब्द/पर्यायी शब्द माहीत असल्यास कळवा. थोडंसं 'रात्रसंगीत' असं काही त्यात येऊ शकेल कदाचित). यातली पहिली कविता खाली पाहता येईल.




या सुमारे पाच मिनिटांच्या चलत्-चित्र-कवितेत रात्रीच्या वेळी शहराच्या परिसरातील काही झाडं-झुडपं अंधुक-स्पष्ट दिसतात, काही किड्यांचे, पक्ष्यांचे किंवा काही माणसांच्या कुजबुजीचे आवाज ऐकू येतात, काही संगीताचे आवाज कानावर पडतात. आणि 'every tree a forest' हे शब्द एकसलग नाही, तर कधी एक शब्द, कधी दोन, कधी एकत्र ओळ असे दिसतात. आपल्या आसपास अस्तित्त्वाची अनेक चिन्हं जागी असतात. सुंदरपणाची किंवा रूढी म्हणून खपवली जाणारी, किंवा आता 'नव-उदारमतवादी' जगात मागास वा बिनमहत्त्वाची ठरणारी, अशी अनेक चिन्हं आसपास वावरत असतात. त्यांना समजून घेणं म्हणजे सूक्ष्म पातळीवरच्या सांस्कृतिक बदलांना समजून घेणं ठरेल, असं साधारण मणी यांचं मत दिसतं. हे सगळं आता आपण जरा बाजूला ठेवू. आणि मणी यांच्या ओळीबद्दल बोलू.

'प्रत्येक झाड (असतं) एक वन', असं मणी यांच्या ओळीचं भाषांतर करता येईल. आणि ती इंग्रजीत वाचतानाच आपल्याला मनोहर ओकांच्या 'झाड' कवितेची सुरुवात आठवू शकेल:
झाड
हे झाड नसतं
एक जंगल
(मनोहर ओकच्या ऐंशी कविता, लोकवाङ्मय गृह)

ओकांच्या कवितेतली मधली ओळ बाजूला काढली तर 'झाड (असतं) एक जंगल' असं होऊ शकेल, पण ते सांगताना झाडाला एक 'नसतेपण' त्यांनी जोडलंय. मणी यांनी तसं न करता झाडाचं वन असणं अधोरेखित करू पाहिलंय. पण तरी या दोन अर्थांमधे काहीतरी समांतर सापडल्यासारखं वाटतंच. आणि मग सदानंद रेग्यांच्या कवितेत-
झाडे आहेत उभी
दबा धरून कैदी श्वासासारखी...
(गंधर्व, पॉप्युलर प्रकाशन)

पण याचा आणि वर्तमानाचा काय संबंध? मणी यांच्या लेखाशी काय संबंध? या प्रश्नांच्या उत्तराचा अंदाज बांधण्यासाठी एखादं उदाहरण घेता येईल. मणी यांनी त्यांच्या लेखात एक रस्ता रुंदीकरणाचं उदाहरण दिलंय, ते जसंच्या तसं न घेता आपण तसंच थोडं जवळपास जाणारं नोंदवू-

म्हणजे समजा की, एखाद्या चौकात रस्त्याच्या कडेला फुटपाथवर मोठंच्या मोठं खोड दिसतंय. आपण त्या चौकातून गाडीनं-गाडीतून तर अनेकदा गेलोय, क्वचित चालतही गेलोय, बहुधा तिथं मोठं झाड असल्याचं आपल्याला कळलं असेल किंवा नसेल, आणि अचानक एखाद्या दिवशी सावली खूप कमी दिसली, तर मग कदाचित आपल्याला लक्षात येईल की, फांद्यांची काही काटछाट झालेय. किंवा कदाचित कधीतरी अख्खं झाडही रस्ता रुंदीकरणासाठी हटवावं लागू शकेल. त्यासाठी मग कायद्याचा अडसर. आता समजा की, ते चिंचेचं झाड आहे. दोनशे वर्षं जुनं. म्हणजे हा चौक चौक होण्याआधीपासूनच ते तिथं असणार, तर तरीसुद्धा आपल्याला ते लक्षात आलं नव्हतं, असं होऊ शकतं की नाही? किंवा आपण रोज एखाद्या विद्यापीठात जाताय, तिथं मुख्य इमारतीचं बांधकाम सुरू असलेलं आपल्याला दिसतं, पण समोरच कठड्याजवळ असंच शेकडो वर्षं वय असलेलं एक चिंचेचं झाड खलास होत असलेलं कदाचित दुर्लक्षित होऊ शकतं. चिंचेचं झाड तरी खूप मोठं. पण इतर असे अनेक तपशील वर्तमानात वावरत असतात, पण ते वर्तमानात जाणवतात असं नाही, आपण जाणवून घेतोच असं नाही. मणींना यात अनेक गोष्टी अपेक्षित आहेतसं दिसतं- 'विकास' म्हणजे काय, याचं उत्तर अनेकदा असं भविष्याला वर्तमानावर लादून काढलेलं असतं. देशानं 'महासत्ता' होणं, किंवा अमुक एक आत्मघातकी दहशतवादी कृत्य केल्यावर स्वर्गात जाण्याची शाश्वती, किंवा आपण अमुकएक जीवनशैली स्वीकारणं, यासंबंधीचे अनेक निर्णय असे होत असण्याची शक्यता आहे. किंवा अनेकदा एखाद्या जुन्या संकेतावरची टीका बदलत बदलत टिंगलीसारखी होत जाते आणि भविष्याला वर्तमानावर लादते. भविष्याचा अंदाज घेणं, हे वेगळं; असा अंदाज अजिबात न घेता काही करणं अवघड आहे, पण भविष्याविषयी काही ठोस साचा ठरवून त्यासंबंधीच्या वर्तमानातल्या कामकाजाचं समर्थन करणं, हे थोडं गोंधळाचं ठरतं, असं या लेखातून वाटतं. आणि याच्या दुसऱ्या टोकाला म्हणून पूर्ण भूतकाळाकडं तोंड वळवण्याचाही भाग होतो. त्याचाही एक साचा ठरवून तो वर्तमानावर लादला जातो. तर या पूर्ण भासवल्या जाणाऱ्या काळांचं प्रवाहीपण वर्तमानात थोडंसं जाणवू शकतं.

हे थोडं अस्पष्ट वाटतं. पण ते एकदम सूत्रासारखं ठोस होणंही अवघड आहे. काळांची विभागणी अगदी काटेकोर कप्प्यांमधे करता येणार नाही. (ही विभागणी मणी यांना कशी अपेक्षित आहे, असा प्रश्न आपण त्यांना ई-मेलद्वारे पाठवून ठेवलेला आहे). पण वर्तमानकाळाच्या निरीक्षणाचा मुद्दा बऱ्यापैकी स्पष्ट वाटतो. विशेषकरून रेघेवर वर्तमानपत्रांबद्दल आपण बोलतो तर ते खरंच किती वर्तमानाला धरून असतं, हे तपासण्यासारखं आहे. मणी यांनी वरच्या लेखात एका ठिकाणी म्हटलंय की, गूढ, अनपेक्षितता, स्पष्टता व गुंतागुंत या सगळ्यांना एकाच वेळी सामावून घेऊ शकणाऱ्या शब्द या अपारदर्शक माध्यमात त्यांना रस वाटतो. आणि सध्याच्या युगात जागतिक स्वरूपाचा, घर्षणविरहित संवाद व्हावा यासाठी भाषेला शब्दशः/कोशबद्ध करण्याचा प्रयत्न होतोय, असंही त्यांना वाटतं. त्यामुळे मग या प्रक्रियेत, शब्दाचे त्यांना वाटणारे गुण गळून जातात, असं त्यांना वाटतं. ते गुण अधिकाधिक शोधावेत म्हणून त्यांनी ग्रान्डी यांच्यासोबत हा चलत्-चित्र-कवितांचा घाट घातलेला असावा. 

मराठीत उत्तम कोळगावकर यांची एक कविता आहे:
माती उकरून मुळापर्यंत जाल तर
हाती काहीच येणार नाही

मुळापर्यंत पोचण्याचा रस्ता
फुलातून जातो.

तसं पाहायला गेलं तर माती उकरल्यावरही हाताला काहीतरी लागेलच, मुळं लागतीलच, पण मुळांचा अर्थ त्यात सापडणार नाही, तो कदाचित फुलाकडं बघून सापडेल, असं. मणी यांच्या म्हणण्याचं थिअरीत काय करता येतं, हा आपल्या मर्यादेतला विषय नाहीये. शिवाय वरच्या चलत्-चित्र-कवितांबद्दलही आपल्याला खूप समाधान वाटलं नाही. पण इंटरेस्टिंग वाटलं. आणि हा लेख वाचल्या वाचल्या काही मराठी कवितांच्या भूतकाळात वाचलेल्या ओळी वर्तमानात डोक्यात आल्या, त्या वर्तमानातच परत चाळल्या, आणि ही नोंद करता येईल कधीतरी पुढं, असं वाटलं. लेख डिसेंबरातला आणि नोंद एप्रिलात. ओळी आलेल्या मराठी कविता तर आणखीच जुन्या. दरम्यान, लेख वाचल्यानंतरच्या काही दिवसांमध्ये खरोखरच दोन चिंचेची झाडं दिसली, त्यामुळं मग ही नोंद झाली. होतेय ही नोंद. तुम्ही वाचताय. तुम्हाला बाकीची कामंही असतील, त्यात या नोंदीसाठी वेळ काढावा का वाटतोय?

मौज प्रकाशन, २००१. (मुखपृष्ठ: सुभाष अवचट)

Tuesday, 8 March 2016

जाहिरातींचा महिला दिन व एक बातमी

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन असल्याचं आपल्याला सांगण्यात आलंय. त्या निमित्त छापील माध्यमांमधल्या गेल्या काही दिवसांमधल्या काही जाहिराती पाहू:

लोकसत्ता: १६ फेब्रुवारी २०१५

उभा पेपर आडवा केल्यावर जाहिराती उभ्या दिसतायंत. तशी इथं जी वरच्या बाजूला दिसतेय, ती मुळातली शेवटच्या पानावरची जाहिरात आहे, तिथं आपलं लक्ष जास्त गेलं. दोन्ही चेहरे मॉडिफाय केलेले असतीलच, पण खालचा फारच कृत्रिम वाटतोय. वरचं हसणं जास्त लक्षवेधक वाटलं, आपल्याला तरी. शिवाय, वरच्या चेहऱ्याच्या शेजारी लिहिलेल्या 'वहिनी अगदी बरोबर समजली' या ओळीही कमी माहितीमुळं आपल्याला चटकन समजल्या नाहीत, पण त्या ओळींमुळं लक्ष तिकडं पटकन गेलं. नंतर जाहिरातीतल्या चेहऱ्यावरून इंटरनेटवर शोध घेतल्यावर कळलं की, 'अँड टीव्ही'वरच्या 'भाभी जी घर पर है' मालिकेत वरील चेहऱ्याची मालक अभिनेत्री शिल्पा शिंदे काम करते. आणि त्यात त्यांच्या अंगुरी या पात्राचा काही खास संवाद आहे: 'भाभी जी सही पकडे है' असा. त्यामुळं त्यांच्या चेहऱ्यासोबत ही ओळ टाकून ठेवलेली आहे. जाहिरात कोंड्यावरच्या औषधाची. लक्षवेधक.

देशोन्नती, अकोला, ७ मार्च/पान तीन
'टोर्क' या एकाच कंपनीची ही दोन्ही उत्पादनं आहेत. याच कंपनीनं काढलेल्या पुरुषांच्या त्वचेसाठीच्या उत्पादनाची जाहिरातपण येते (शेजारी पाहा). 'अब लडकों की निकल पडी' या हिंदी ओळीचं मराठी जाहिरातीत 'आता मुलांचीही चालू लागली' असं करून टाकलेलं आहे. तशा पूर्वीपासून या कंपनीच्या जाहिराती विविध वर्तमानपत्रांमधून येतायंत. बाहेर छापील स्वरूपात या जाहिराती इतक्या वेळा दिसत असूनही आपण इथं त्या का चिकटवतोय? या प्रश्नाचं थोडंसं उत्तर वॉल्टर बेंजामिन देऊ पाहतात. रेघेवर आधी एका नोंदीत येऊन गेलेले वॉल्टर बेंजामिन (/बेंन्यामिन) एका ठिकाणी म्हणतात:
ही जागा भाड्याने देणे आहे
टीकेचा (criticism) ऱ्हास झाल्याचा शोक करणं हे मूर्खांचं काम आहे. कारण आता ते दिवस गेले. टीका हा योग्य अंतर राखण्याशी संबंधित मुद्दा होता. दृष्टिकोन व पूर्वचिकित्सा यांना किंमत होती नि काहीएक भूमिका घेणं शक्य होतं त्या काळात हा मुद्दा लागू होता. आता गोष्टी मानवी समाजाच्या खूपच निकट येऊन राहिलेल्या आहेत. 'नितळ', 'निरागस' दृष्टी हे एक झूठ आहे, किंवा ती अकार्यक्षम भाबडी अभिव्यक्ती आहे असं म्हटलं तरी चालेल. सध्या सर्व गोष्टींच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाणारी सर्वाधिक सच्ची व्यापारी दृष्टी म्हणजे जाहिरात. चिंतनाचा अवकाश ती नष्ट करून टाकते. चित्रपटाच्या पडद्यावर एखादी गाडी अवाढव्य आकार धारण करून आपल्या अंगावर येते, तसा हा प्रकार असतो. [...] जाहिरातीला टीकेपेक्षा वरचष्मा प्राप्त होण्याचं कारण काय? याचं उत्तर लाल रंगाच्या फिरत्या निऑनी चिन्हांमधे नसून डांबरी रस्त्यावर त्या चिन्हांना परावर्तित करणाऱ्या प्रकाशझोतात आहे.
हा वेचा बेंजामिनच्या मूळ वेच्याचा थोडा भाग आहे. मूळ वेचाही छोटासाच आहे आणि तो 'वन-वे स्ट्रीट' या मजकुरातील अनेक वेच्यांपैकी एक आहे. आपण या छोटेखानी भाषांतरासाठी लिआँ वायझेल्टिअर यांनी केलेलं इंग्रजी भाषांतर वापरलं: वॉल्टर बेंजामिन, रिफ्लेक्शन्स, शॉकेन बुक्स, २००७.

मालिकेतलं 'अंगुरी' हे पात्र

बेंजामिनांंचं सगळं काही जसंच्या तसं मान्य व्हायला हवंच असं नाही, पण सुमारे शंभर वर्षांपूर्वी त्यांनी नोंदवलेलं ते आता आपल्याला अधिक मोठ्या प्रमाणात दिसतं, हा एक भाग. जाहिरात या गोष्टीचं वाढतं महत्त्व त्यांनी नोंदवलंय. शिवाय आपल्या बदलत्या आसपासाशी जाहिरातींचा संबंध जास्त 'सच्चा' असेल, असंही त्यांच्या वेच्यातून वाचकाला भासतं. पण त्यातलं सच-झूठ समजून घेण्यासाठी, आपल्याला विचाराचा साधा अवकाश-उसंत मिळत नाही, चिन्हानं आपण एवढे गारद होतो की त्यामागचा अर्थ उलगडणं अवघड होतं, असंही त्यातून वाटतंय. हे उलगडून पाहण्यापुरत्या आपण आणखी काही जाहिराती पाहू. महिला दिनाचं निमित्त साधून 'केसरी टूर्स'नं खास महिलांसाठी काही पॅकेज काढलंय, त्याच्या दोन वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधल्या या जाहिराती पाहा (डावीकडचं छायाचित्र मूळ जाहिरातीतला थोडाच भाग दाखवणारं आहे):

लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, ७ मार्च/पान सोळा, इथं अर्धीच.
तरुण भारत, अक्षरयात्रा पुरवणी, ६ मार्च/पान आठ

किंवा 'लोकसत्ता' या वर्तमानपत्राची स्वतःचीच ही जाहिरात पाहा:

लोकसत्ता, ३० जानेवारी

बेंजामिनांच्या वेच्यात टीकेचा ऱ्हास झाल्याचं म्हटलंय, त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. आपल्याला बातमी या गोष्टीसंबंधी बोलावं वाटतं. 'ऱ्हास' हा शब्द खूपच निकाल लावल्यासारखा आहे आणि आपल्याला तो आत्ता इथं वापरावा वाटत नाहीये. पण जाहिरातींच्या संदर्भात बातमीबद्दल थोडंसं काही आपण बोलू.  एखाद्या वर्तमानपत्राचं पहिलंच पान पूर्ण जाहिरातीनं भरल्याची तक्रार काही वेळा कानावर येते. पण ते तसं नवं नाही. सदर नोंद लिहिणाऱ्याला काही कारणामुळं १९१२ सालचे 'केसरी' या वर्तमानपत्राचे सगळे अंक पाहायला लागले होते. त्यात पहिलं अख्खं पान अनेक छोट्या-मोठ्या जाहिरातींनी भरलेलं असायचं. किर्लोस्करांची यंत्रं, सोलापूरच्या चादरी अशा काय काय जाहिराती त्यात होत्या, असं अंंधुक आठवतंय. वृत्तपत्रांचा आणि जाहिरातींचा असा बराच पूर्वीपासूनचा संबंध असल्याचं श्री. व्यं. केतकरांचा ज्ञानकोशसुद्धा सांगतो. ज्ञानकोशातल्या 'जाहिरात' या नोंदीत जाहिरात-विद्येची लक्षणं सांगताना म्हटलंय:
जाहिरात चित्ताकर्षक असली पाहिजे. हे जाहिरातीचे आद्य लक्षण होय. जाहिरात जर चित्ताकर्षक नसेल तर लोकांचे लक्ष तिकडे वेधणार नाही; व त्यामुळे जाहिरात देणाऱ्याचा माल फार खपणार नाही. हल्ली तर जिकडे तिकडे जाहिरातींना पीक आल्यामुळे, लोक जाहिराती वाचण्याचा कंटाळा करतात. अशा वेळी त्यांचे लक्ष्य त्यांची इच्छा नसताही ज्यामुळे वेधले जाईल अशा चित्ताकर्षक तऱ्हेची जाहिरात असली पाहिजे. हल्लीच्या व्यापारी चढाओढीच्या युगात ज्याची जाहिरात अधिक भपकेदार त्याच्या वस्तूचा खप अधिक अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे जाहिरात देणाऱ्या व्यापाऱ्याने आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या जाहिरातीपेक्षा आपली जाहिरात कशी भपकेदार होईल, कोणत्या स्थळी, अगर कोठे दिली असता ती लोकांच्या चटकन नजरेत भरेल या सर्वांचा काळजीपूर्वक विचार करून जाहिरात दिली पाहिजे. नवीन नवीन साधनांच्या व सुधारणांच्या वाढीबरोबर जाहिरातीचे क्षेत्र व्यापक झालें आहे. नवीन नवीन जाहिरातीची साधने अस्तित्वात आली आहेत. 
ज्ञानकोशातली वाक्यंही तशी आता काही नवीन वाटणारी नाहीत. पण तरी एक संदर्भ म्हणून वाचायची इतकंच. आणि केतकरांनी ज्ञानकोश मंडळाची स्थापना ४ मार्च १९१७ रोजी केलेली, म्हणजे आता त्या घटनेचं शताब्दी वर्ष सुरू झालंय, हेही निमित्त म्हणता येईल. तर मुख्य मुद्दा: माध्यमांची वाढ ही मुख्यत्वे जाहिरातीच्या साधनांची वाढ म्हणूनच होते की काय, अशी शंका येते. जाहिरात पुन्हा वेगवेगळ्या पातळ्यांवरची. वर्तमानपत्रं-वृत्तवाहिन्या-बातम्या, ही तर एकच पातळी. शिवाय खुद्द 'तुम्हीच जाहिरात आहात!' असंही आपल्याला सांगितलं जाण्याची वेळ आलेली आहे. आपण स्वतः कधी जाहिरात असतो आणि कधी जाहिरातदार असतो, हाही मुद्दा संदिग्ध असावा. जाहिरातीविषयी खूपच नकारात्मक वाटतंय हे बहुतेक, पण तसं काही नाही. फक्त जाहिरात ज्या उत्पादनाची असते त्याचा उपयोग कायतरी वेगळा असतो आणि त्याकडं लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी दिला जाणारा संदेश कायतरी वेगळाच असतो, त्यामुळं प्रकरण संदिग्ध होतं, असं मात्र वाटतं. वरचीच 'भाभी जी सही पकडे है'ची जाहिरात पाहिली की तसं वाटत नाही का? संदिग्धता सुंदर वाटते काही वेळा, हा भाग वेगळा. आणि 'माझी आई कशावरही चर्चा करू शकते' इथपासून 'या टूर फक्त महिलांसाठीच'पर्यंतच्या जाहिरातींमधून काय वाटतं? स्वतःवर प्रेम करा, स्टार बना, टूरला जा, असं खास स्त्रियांनाच सांगणं जाहिरातदारांना परवडतंय, आवश्यक वाटतंय. आजचे पेपर पाहिले तर बँका, विमा कंपन्या यांच्याही स्त्रीकेंद्री जाहिराती सापडतात. किंवा यापेक्षा कित्येक वेगवेगळ्या जाहिराती पेपर-टीव्ही यांच्यातून आपण पाहत असतोच. तर एकीकडं स्त्रियांच्या ग्राहकपणाचा अवकाश वाढतोय, असं वाटतं ना थोडंसं तरी? इतर सुंदर संदिग्ध अंगुरी रूपंही त्यासोबत आहेतच.

हा झाला एक आजच्या दिवसाच्या निमित्ताचा भाग, आपसूक जुळून आला म्हणून. शिवाय बातमीच्या अवकाशाचं काय, हाही एक आपल्या नोंदीचा भाग आहे. त्याचं काय करायचं? 'महाराष्ट्र टाइम्स'सारखी वर्तमानपत्रं रविवारच्या पुरवणीवरही मास्टहेडखाली स्पष्टच लिहितात की, हे सगळं 'अॅडव्हर्टोरियल, एन्टर्टेन्मेंट, प्रमोशनल फिचर' आहे.

कुठल्याही रविवारची पुरवणी

आपण तीन वर्षांपूर्वीही एका नोंदीत याचा उल्लेख करून ठेवला होता, पण तेव्हा फोटो टाकायचा राहिलेला. अशी पुरवणीविषयी स्पष्ट ओळ टाकणंही बरंच, खरं म्हणजे. पण हाही थोडा संदिग्ध संवाद वाटतो, कारण फक्त पुरवणीच्या वरच्या बाजूला असं लिहिल्यामुळं आत आलेल्या प्रत्येक मजकुरासंबंधी वाचकाला अंदाज बांधत बसावा लागणार: अमुक एक जाहिरातवजा लेख आहे की नाही- म्हणजे ही जागा भाड्यावर दिलेली आहे की कसं, अमुक एक बहुधा संपादकीय निकषानं आलेला लेख आहे की नाही- म्हणजे ही जागा संपादकीय रहिवाश्यांचीच आहे की कसं, इत्यादी. कदाचित प्रत्येक मजकुरानुसार असा काही टॅग जोडता आला, तर ते अधिक निखळ होईल, असं वाटतं. म्हणजे जाहिरातीइतकं(इतपत तरी) निखळ होईल.

बरं, मगाशी वर आपण स्वतःच जाहिरात झाल्यासंबंधी काही नोंदवलंय. रेघेनं नोंदवलं तर ते टीका केल्यासारखं वाटतंय का? मग टीका सोडून द्या, जाहिरात पाहूया सरळ:

टाइम्स ऑफ इंडिया, दिल्ली आवृत्ती, ७ मार्च/ पान बावीस

'व्यक्ती हे जाहिरातीचं नवं माध्यम आहे. 'द इकॉनॉमिक टाइम्स'चा वाचक बोलत असेल तेव्हा त्याचे श्रोते निरनिराळ्या प्रकारचे असणार याची खात्री बाळगा. 'द इकॉनॉमिक टाइम्स'चा वाचक वेगवेगळ्या गोष्टींमधे रस असलेला नि विविध वर्तुुळांमधे उठबस असलेला असतो. आणि यातल्या प्रत्येक वर्तुुळात 'ईटी'च्या वाचकाचं मत अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळं तुम्ही आमच्या वाचकांपर्यंत पोचलात, याचा अर्थ तुमची पोच कित्येक पटींनी वाढलेली आहे. आणि यासाठी जास्तीची किंमतही द्यावी लागत नाही. आता, गुंतवणूक करण्याजोगं जाहिरातीचं माध्यम (तुमच्यासमोर) आहे'- असा या जाहिरातीचा आशय आहे. .

'रेघे'वर २०१३च्या मार्चमधे नोम चोम्स्कींचा 'मुख्य प्रवाहातली माध्यमं असतात तशी का असतात?' हा लेख आपण नोंदवलेला. त्या लेखात चोम्स्की म्हणतात:
या सगळ्या (मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांच्या) व्यवस्थेकडे पाहिल्यानंतर बातमी कशी असावी अशी तुमची अपेक्षा आहे? ते तर अगदीच साहजिक आहे. समजा, 'न्यूयॉर्क टाइम्स' घेतला, तर ती एक कंपनी आहे आणि ती एक उत्पादन विकते. त्यांचं उत्पादन असतो तो ‘वाचक-प्रेक्षकवर्ग’. तुम्ही वर्तमानपत्र विकत घेता त्यातून मालक कंपन्यांना पैसा मिळत नाही. वर्तमानपत्र तर ते इंटरनेटवर मोफतही उपलब्ध करून देऊ शकतील. उलट, तुम्ही वर्तमानपत्र विकत घेता तेव्हा ते त्यांच्या खिशातलाच पैसा खर्च करत असतात. पण 'वाचक-प्रेक्षकवर्ग' हे उत्पादन असतं. संपन्न लोक - म्हणजे वर्तमानपत्रांमधून लिहितात तेच लोक म्हणा ना, समाजातील उच्च वर्गातील निर्णयक्षम लोक, हे ‘उत्पादन’ असतात. मालक कंपनीला हे उत्पादन बाजारात विकायचं असतं आणि हा बाजार म्हणजे 'जाहिरातदार' (हा पुन्हा वेगळाच धंदा आहे). दूरचित्रवाणी असो की वर्तमानपत्र, किंवा दुसरं काहीही, ते वाचक-प्रेक्षकवर्गच विकत असतात. आपला प्रेक्षकवर्ग कंपन्या एकमेकांना विकत असतात. उच्चभ्रू माध्यमांचा हाच मोठा व्यवसाय आहे.
चोम्स्की टीकाकार आहेत, असं म्हणता येईल ना? त्यांचा लेख मराठी भाषांतरात सुमारे ४,१०० शब्दांचा होता. त्यापेक्षा वरच्या जाहिरातीतून खुद्द एका प्रसारमाध्यम कंपनीनंच हे आजचं एक वास्तव सांगितलंय, ते जास्त सुंदर वाटतं का? म्हणजे 'माझी आई कशावरही चर्चा करू शकते' ही ओळ आपल्यासाठी नाहीच, ती 'केसरी टूर्स'साठी किंवा अशाच कोणासाठी तरी असेल.

आणि ऱ्हासबिस शब्द खूप मोठे होतात. पण काही बातम्या निऑनी अंधारात झाकोळल्या जातात, ही आपली इथली नेहमीची 'टीका' आहे. ते सोडून द्या. आपण एक आजच्या निमित्तानं बातमी वाचू जाताजाता.

गेल्या काही दिवसांमधे फारशी लक्षवेधक न ठरलेली ही बातमी सोनी सोरी यांच्याबद्दलची आहे. 'त्यापेक्षा फाशी दिली असतीत तर बरं झालं असतं', असं बोलायची वेळ सोरी यांच्यावर येऊन गेली होती. त्याबद्दल रेघेवर पूर्वी काही ना काही येऊन गेलेलं आहे. छत्तीसगढमधे जगदलपुरात काही घडामोडी ठरवून घडवल्या जात असल्याची ओझरती नोंद आपण घेऊ शकलो, ती मालिनी सुब्रमण्यम यांच्या मजकुरातून. त्यांना तिथलं घर सोडायला लागलं, आणखी वकिलांच्या एका चमूलाही घर सोडायला लागलं, आणि त्या दरम्यान तिकडंच २० फेब्रुवारीला सोरी यांच्या चेहऱ्यावर ज्वलनशील रसायन फेकण्यात आल्याच्या बातम्या आल्या. नंतर स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते, पण मग त्यांना उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आलं.

हल्ल्यानंतर सोनी सोरी (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

मूळच्या प्राथमिक शिक्षिका असलेल्या सोरी यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप करून पोलिसांनी २०११ साली त्यांना अटक केली होती. त्यांच्यावर पोलिसांकडून भीषण अत्याचार झाल्याचं प्रकरण त्यानंतर गाजलं. नंतर दोन वर्षांनी सोरी यांच्यावरचे बहुतेक आरोप न्यायालयात फोलही ठरले. पुढं २०१४ साली आम आदमी पार्टीच्या बस्तर मतदारसंघातील उमेदवार म्हणून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यात त्यांचा साहजिकपणे पराभव झाला; त्यांना १६,९०३ मतं पडली. जिंकलेले उमेदवार होते भाजपचे दिनेश कश्यप; त्यांना मिळाली ३,८५,८२९ मतं. मतांच्या राजकारणात सोरी हरल्या. काल (७ मार्च) त्यांना रुग्णालयातून सोडल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. तिथून मग व्रण असलेल्या चेहऱ्यानं त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेल्या. 'माझा हा चेहरा म्हणजे बस्तरमधल्या लढ्याचा चेहरा आहे, दोन्हींची अवस्था सारखीच आहे', असं त्या म्हणाल्या. हा खाली दिसतोय तो सोरींचा फोटो दोन वर्षांपूर्वीचा आहे- निवडणूक प्रचारावेळी दांतेवाड्यातल्या पत्रकारपरिषदेत काढलेला.

 मार्च २०१४: निवडणूक प्रचारादरम्यान/ दांतेवाडा (फोटो: रेघ)