![]() |
व्यंगचित्र : रॉबर्ट जे. डे The Medium is the Massage, पान ७० |
'द मीडियम इज द मेसेज', हे मार्शल मॅक्लुहानने १९६४ साली सांगितलं. हे विधान माहीत असलेल्यांच्या लेखी 'क्लिशे' झालेलं असतं, उगाळून उगाळून गुळगुळीत झालेलं असतं. एकंदरच माध्यमांचा मानवी जगण्यावर कसा प्रभाव पडत आला, त्याचं अभ्यासू उत्खनन मॅक्लुहानने 'अंडस्टँडिंग मीडिया : द एक्स्टेन्शन्स ऑफ मॅन' या पुस्तकात केलं. माध्यम हाच एक संदेश असतो, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे- थोडक्यात असं : आपण एखादी गोष्ट बोलतो, तेव्हा बोलणं / वाणी हे आपलं माध्यम असतं. तीच गोष्ट तशीच्या तशी लिहिली की लिहिणं / लिपी हे आपलं माध्यम होतं. यात संदेश वा आशय एकसारखाच आहे, फक्त माध्यम बदललं, असं वरवर भासत असलं तरी खोलात ते तसं नसतं. माध्यम कोणतं आहे त्यानुसार संदेश बदलतो, कारण ते-ते माध्यम माणसाला ढवळून काढतं, घुसळून काढतं, त्याच्या आकलनावर आणि विचारपद्धतीवर मूलगामी प्रभाव टाकतं. त्यामुळे ऐकलेली गोष्टच लिखित स्वरूपात वाचताना माणूस ती वेगळ्या तऱ्हेने समजून घेत असतो.
त्यामुळे माध्यम तटस्थ असतं, आपण ते कसं वापरतोय यावर सगळं आहे- असं उथळ सोपेपण मॅक्लुहानला मान्य नाही. माध्यम माणसाला कसं वापरतं, त्याचा भवताल कसा बदलून टाकतं, प्रमाण आणि परिमाण बदलतं, आणि पर्यायाने माणसाचं वास्तवाविषयीचं आकलनच कसं बदलतं, याकडे तो अधिक लक्ष देतो. त्याचाच दाखला नोंदीच्या सुरुवातीला चिकटवलेल्या कार्टूनमधून मिळतो. मला अमुक गोष्टीत रस नाही असं नाही, पण रसाचा ओघ भंजाळून टाकेल इतका झाला तर रस जाणवणार कसा? हे कार्टून मॅक्लुहानच्या दुसऱ्या- आकाराने छोट्या पुस्तकात आलंय.
मॅक्लुहानच्या 'अंडस्टँडिंग मीडिया'तल्या म्हणण्याचं अर्कचित्र म्हणता येईल, असं हे दुसरं पुस्तक त्याने आणि ग्राफिक डिझायनर क्विन्टिन फिओरे यांनी १९६७ साली तयार केलं. त्यांनी मूळ पुस्तकातल्या 'अभ्यासू उत्खनना'ला तिरपागडेपणाची जोड दिलेय. या तिरपागडेपणाची सुरुवात शीर्षकापासून होते. त्यात 'मेसेज'चा 'मसाज' झालेला आहे. ही आधी टाइपसेटिंगच्या पातळीवर राहिलेली चूक म्हणून मॅक्लुहानसमोर आली. पण, हेच बरं दिसतंय, जास्त लक्ष्यवेधी वाढतंय, असं म्हणून मॅक्लुहानने The Medium is the Messageचं The Medium is the Massage असं या पुस्तकावर राहू दिलं.
त्यात मूळ पुस्तकातली काही मार्मिक निरीक्षणं, काही अधिकची निरीक्षणं, मधेच एखादं कार्टून, मधेच एखाद्या बातमीचा दाखला, मधेच कोणाचं तरी अवतरण, मधेच प्रतिबिंबासारखा मजकूर- म्हणजे आरशात धरून वाचायला लागेल असं एखादं पान, मधेच उलटाच मजकूर छापलेलं पान- अशी मांडणी आहे. माध्यम खरोखरच माणसाला उलटं-पालटं करतं आणि माध्यमच संदेश असतं याचा प्रत्यक्षच दाखला द्यायचा हा प्रयत्न दिसतो.
![]() |
पेंग्विन, १९९७ [१९६७] |
हे सगळं पाहताना आपल्याला तुकारामाचा एक अभंगही आठवू शकतो. मनातलं अगदी आतलं-आतलं खरं-खुरं भाषेच्या माध्यमातून व्यक्त करता येत नाहीये याबद्दलची तळमळ व्यक्त करणारा हा अभंग असू शकेल. पण तुकारामाचे अभंगही पुनरुक्तीपुरते उरतात, किंवा रेडिओवर नि यू-ट्यूबवर कोणीतरी गायलेले ऐकण्यापुरते उरतात. म्हणजे पुन्हा फक्त माध्यम. संदेश वा आशय कुठे जातो? तरीही, मॅक्लुहानच्या मेसेजचा सांधा तुकारामाच्या एका अभंगाशी जुळल्यासारखं दिसतं, तो अभंग असा :
वाचेच्या चापल्ये बहु जालो कुशळ ।
नाही बीजमूळ हाता आले ।।
म्हणोनि पंढरिराया दुःखी होते मन।
अंतरीचे कोण जाणे माझे।।
पूज्य जालो अंगा आला अभिमान।
पुढील कारण खोळंबले।।
तुका म्हणे खूण न कळे चि निरुती।
सापडलो हाती अहंकाराचे।।
वाचा म्हणजे माध्यम, बीजमूळ म्हणजे काहीतरी सांगू पाहणारा आशय. बाकी, अंतरीचे कोण जाणे माझे हे तर रोजचंच. मग दुःखी होते मन, मग मानसिक आरोग्यावरचे पॉडकास्ट ऐकत बसा किंवा आशावादी कोटेशनं शेअर करा. पण पॉडकास्ट किंवा कोटेशनं म्हणजे पुन्हा वाचेच्या चापल्ये बहु जालो कुशळ, नाही बीजमूळ हाता आले' असंच असेल तर? आणि तरीही हल्लीचं म्हणणं काय तर, आम्ही कन्टेन्ट पुरवतो. म्हणजे बीजमूळ पुरवल्याचा दावा! हा तो अभंगातल्या शेवटच्या ओळीतला अहंकार. तुकारामाला वेळोवेळी न कळे चि निरुति किंवा पूज्य जालो अंगा आला अभिमान, पुढील कारण खोळंबले अशी जाणीव बोचत राहिली, आणि नाही बीजमूळ हाता आले हे तर पक्कंच समजून चुकलं. त्याच्याइतकं मुळापर्यंत जायची इच्छा तरी ठेवायची की नाही, हा प्रश्न ज्याच्या-त्याच्यावर सोडू. पण माध्यमांपुरतं बोलायचं तर, तुकाराम त्या काळी लोकमुखांतून व्हायरल होत गेला, शेवटी त्याचे संत तुकाराम महाराज झाले. आता आपल्याला लोकमुखंही निर्माण करता येतात. तात्पुरती तरी नक्कीच. पैसे खर्चून किंवा स्वतःचंच मुख खर्चून.
तुकाराम महाराज भक्तीमार्गाने, भाषेचं माध्यम वापरून काही बोलायचा प्रयत्न करत होते. त्या मार्गावरून शेवटी ते सदेह वैकुंठाला गेल्याची श्रद्धा आहे. हिंदू पंचांगानुसार ती तारीख फाल्गुन वद्य द्वितीया. द्वितीया म्हणजे बीज. म्हणून आजचा दिवस तुकाराम बीज. या दिवशी देहूतला नांदुरकी वृक्ष दुपारी बाराच्या दरम्यान हलतो / सळसळतो, असं म्हणतात. एखाद्या माणसाच्या स्मृतीपोटी वृक्ष सळसळतो, ही कल्पना सुंदरच आहे. पण बीजमूळ जमिनीखाली असतं. वृक्षाच्या सळसळीचा आवाज ऐकू येतो, पानांचं हलणं (पानांची हळहळ?) सहज दिसते; बीजमूळ आवाज करत नाही, सहज अगदी दिसत नाही (शोधल्यावर दिसण्याची शक्यता). त्यामुळे तुकाराम महाराजांच्या बाबतीत 'बीज' तारखेपुरतं मर्यादित राहत नाही तर झाडांच्या सळसळीखाली लपलेलं 'बीज' म्हणून त्यांच्या स्मृतींकडे पाहता येतं. तसं केलं तर मग, 'वाचेच्या चापल्ये बहु जालो कुशळ, नाही बीजमूळ हाता आले' ही तुकारामाची ओळ आणि माध्यम हाच मेसेज नि मसाज झाल्याचा मॅक्लुहानचा मुद्दा यांची सांगड जाणवते. इतकंच.

आपल्यामुळे खूप वेगळं आणि नवीन काहीतरी चांगलं वाचायला मिळतं. आजच्या लेखातला माध्यमं, त्यांचा परिणाम याबाबत एक नवीन आयाम ( Dimension) लक्षात आला, जो मला खरोखर माहीत नव्हता की माध्यमं हे सुद्धा एक संदेश आहेत. तुकारामांची गाथा बुडवल्यानंतर ती लोकांच्या ओठावर राहिली, चिरंतर टिकली आणि आज तुकाराम बीज या सर्व विषयांची एकत्र सांगड बेतोड आहे. खूप चांगलं आणि नवीन वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद.
ReplyDelete