फ्रान्झ काफ्का (१८८३ - १९२४) हा जर्मन भाषेत लिहिणारा आणि आयुष्याचा बहुतांश काळ प्रागमध्येच राहिलेला लेखक. तो आयुष्याच्या अगदी शेवटच्या वर्षात बर्लिनला स्थलांतरित झाला. त्याआधी एका ठिकाणी फिरायला गेलं असताना त्याची डोरा डायमन्ट (१८९८ - १९५२) या मूळच्या पोलंडमधल्या, पण घरगुती कटकटींमुळे घर सोडून बर्लिनला निघून आलेल्या तरुणीशी ओळख झाली. मग त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. शेवटच्या वर्षात ते सोबतच राहत होते आणि काफ्का फुफ्फुसाच्या विकारामुळे चाळीसाव्या वर्षी मरण पावला तेव्हा डोरा त्याच्या जवळ होती, असं साधारण थोडक्यात. काफ्काविषयी माहिती असेल वा नसेल किंवा त्याचं लेखन वाचलं असेल वा नसेल, तरी डोराने सांगितलेली एक गोष्ट वाचायला बरी वाटू शकते. ही गोष्ट इंटरनेटवर इंग्रजीत अधूनमधून पसरत असते, त्या गोष्टीचं सूत्र धरून काही इतर पुस्तकंही लिहिली गेलेली आहेत. कदाचित काहींच्या नजरेस ही गोष्ट आधीच पडली असेल.
काफ्काच्या साहित्यातील आशयसूत्रांना धरून इंग्रजीत 'काफ्काएस्क' (Kafkaesque) असं विशेषण रुजू झालं. आपण मराठीत त्याचं भाषांतर 'काफ्कीय' असं करू. एकंदर मानवी जगण्यातल्या असंगत, असंबद्ध, भयंकराची सूचना देणाऱ्या स्थितीसाठी हे विशेषण साधारणपणे वापरलं जातं. शिवाय, आधुनिक व्यवस्थांमध्ये व्यक्तीची स्थितीही 'काफ्कीय' होत असते. कुठे-कशासाठी काय करायला लावतायंत याचा पत्ता लागत नाही, पण जगत राहायचं तर पर्याय उरत नाही, मग स्वतःलाच पिचवून घ्यायची सवय लागून जाते, तरीही व्यक्तीच्या हातात काही उरतं की नाही? उरतं!- अशी ती स्थिती. या जटिल स्थितीची जाणीव कोणाला अगदीच जहाल वाटू शकते. तसाच काहीसा गडद, जहाल अर्थ त्या 'काफ्कीय'ला असल्याचं दिसतं. सोयीसाठी शेवटी आपण असे शब्द वापरतोच, ते ठीक आहे. पण एका व्यक्तीच्या अभिव्यक्तीला एकाच विशेषणात डांबणंही फारसं बरं नाही. त्यामुळे डोराच्या काफ्काविषयीच्या आठवणीतून समोर येणारा अर्थ काफ्काची, पर्यायाने 'काफ्कीय'ची काहीशी मवाळ बाजू दाखवणारा, मार्दव असणारा, ममत्वाशी जुळणारा आहे, त्यालाही जागा द्यायला हरकत नाही (अशी बाजू अर्थातच त्याच्या इतरही लेखनातून शोधता येते. आत्ता फक्त ही एकच गोष्ट).
या गोष्टीचा मूळ स्त्रोत म्हणजे डोराची बर्लिनमधली आठवण. ही आठवण डोराने काफ्काच्या फ्रेंच चरित्रकार व भाषांतरकार मार्था रॉबर्ट यांना पहिल्यांदा सांगितली. डोरा डायमन्टचं एक चरित्र कॅथी डायमन्ट (आडनाव एकसारखं असलं तरी प्रत्यक्ष नातं नाही) यांनी इंग्रजीत लिहिलं, त्यात ती आठवण सविस्तरपणे आलेय. इथे त्या आठवणीचंच भाषांतर केलंय. डोराचा जन्मदिवस ४ मार्चला होऊन गेला, हे निमित्त मानायचं तर मानता येईल. किंवा, काफ्काच्या आठवणीला निमित्ताची गरज नाही, हे पूर्वी एका नोंदीत लिहिलेलं ते पटलं तर ते मानता येईल. पुढील उतारा कॅथी यांच्या 'काफ्काज् लास्ट लव्ह : द मिस्ट्री ऑफ डोरा डायमन्ट' (बेसिक बुक्स, २००३) या पुस्तकातून (पानं ६६-६७) परवानगीने भाषांतरित केला आहे.
‘दुसऱ्या दिवशी तो पत्र घेऊन लगबगीने बागेत गेला. ती मुलगी त्याची वाट पाहत होती. तिला वाचता येत नसल्यामुळे फ्रान्झनेच तिला पत्र वाचून दाखवलं. पत्रात लिहिल्यानुसार, त्या मुलीच्या बाहुलीला कायम एकाच कुटुंबासोबत राहून कंटाळा आला होता, तिला वेगळं वातावरण अनुभवायचं होतं. थोडक्यात, या लहान मुलीपासूनही जरा लांब जायचं होतं. तिच्यावर बाहुलीचं प्रेम होतंच, पण आत्ता तरी लांब जाण्यावाचून दुसरा काही पर्याय बाहुलीपाशी उरला नव्हता. तरी, रोज आपण एक पत्र पाठवू, असं आश्वासन बाहुलीने दिलं. फ्रान्झने खरोखरच बाहुलीच्या नवनवीन साहसांविषयी माहिती देणारं एक पत्र रोज त्या मुलीला दिलं. बाहुल्यांच्या जगण्याचा ताल गतिमान असतो, त्यामुळे या बाहुलीची साहसंही वेगाने पुढे जात होती. काही दिवसांनी ती बागेतली मुलगी स्वतःचं वास्तवातलं खेळणं हरवल्याचं विसरूनही गेली आणि त्या बदल्यात तिच्या समोर उभ्या राहिलेल्या कल्पित कथेचाच विचार करू लागली.
‘फ्रान्झ प्रत्येक वाक्य तपशिलाकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन लिहीत असे. त्यात नर्मविनोदाची अचूक पेरणी केलेली असायची, त्यामुळे गोष्टीतलं वातावरण अगदी विश्वसनीय झालं. ती बाहुली मोठी झाली, शाळेत गेली, तिच्या इतर अनेक लोकांशी ओळखी झाल्या. या बागेतल्या मुलीवर आपलं प्रेम कायम असल्याची खात्रीही ती बाहुली पत्रातून देत राहिली. पण जगण्यातली गुंतागुंत, इतर जबाबदाऱ्या, इतर आवडीच्या गोष्टी, याचेही सूचक उल्लेख बाहुलीच्या पत्रांमध्ये होते. त्यामुळे सध्या तरी अशा परिस्थितीत त्या मुलीसोबत राहणं शक्य नसल्याचं बाहुलीने नमूद केलं. ती मुलगी यावर विचार करायला लागली आणि शेवटी बाहुलीपासूनचा दुरावा अपरिहार्य असल्याचं मान्य करायला तयार झाली. किमान तीन आठवडे हा खेळ सुरू होता. हे संपवण्याच्या विचारानेही फ्रान्झला प्रचंड यातना झाल्या. शेवटही अगदी योग्य टप्प्यावर येऊन होणं गरजेचं होतं. बाहुली बेपत्ता झाल्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली होती, त्या जागी स्वस्थता येईल, असा पत्रांचा शेवट करावा लागणार होता. यावर त्याने खूप खल केला आणि शेवटी बाहुलीचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. मग त्यान बाहुलीचा नियोजित वर, त्यांची एन्गेजमेन्ट, गावाकडे जाऊन लग्नाची तयारी करणं, त्या तरुण जोडप्याचं घर, अशा सगळ्याचं अगदी सविस्तर वर्णन पत्रांमधून केलं. “आता आपण एकमेकांना भेटू शकणार नाही, हे तुला समजून घ्यावं लागेल,” असं फ्रान्झने लिहिलेल्या पत्रातली बाहुली त्या मुलीला म्हणाली. फ्रान्झने कलेच्या माध्यमातून त्या मुलीचा पेच सोडवला. या जगात स्वस्थता आणण्यासाठी त्याला सर्वांत धडपणे करता येण्याजोगी गोष्ट तीच होती.’
काफ्का आणि बाहुलीची ही गोष्ट डोराने अनेक वर्षांनी मित्रमैत्रिणींना आणि काफ्काच्या चरित्रकारांना वारंवार सांगितली. पहिल्यांचा १९५२ साली फ्रेंचमध्ये प्रकाशित झालेली ही गोष्ट १९८४ सालापर्यंत इंग्रजीत भाषांतरित झाली नव्हती. स्टेग्लिट्झमधल्या बागेतली ती लहान मुलगी कोण होती, याचा शोध घेण्यासाठी अलीकडे नेदरलँड्स आणि अमेरिका इथल्या काही काफ्काविषयक अभ्यासकांनी बर्लिनला दोनदा दौरे काढले. ती मुलगी अजूनही हयात असली तरी खूपच वृद्ध झालेली असेल. कदाचित तिच्या बाहुलीने तिला पाठवलेली पत्रं तिने जपून ठेवली असतील, अशी आशा या अभ्यासकांना वाटत होती. या संदर्भात बर्लिनमधील वृत्तपत्रांमध्ये अनेक लेख आले असले तरी या शोधमोहिमेतून काही निष्पन्न झालेलं नाही.'
![]() |
बेसिक बुक्स, २००३ |
या पुस्तकाचं (किंचित संक्षिप्त) मराठी भाषांतर 'प्रफुल्लता प्रकाशना'तर्फे येईल. त्यांनी घेतलेल्या परवानगीच्या आधारे वरती उतारा दिला आहे. नोंदीच्या सुरुवातीला दिलेला डोराचा फोटोही याच पुस्तकातून घेतला असून काफ्काचा फोटो विकिमीडिया कॉमन्सवरचा आहे. कॅथी यांनी डोराची आठवण उद्धृत करताना पुढील संदर्भ दिला आहे: अँथनी रुडॉल्फ, 'काफ्का अँड द डॉल', ज्यूइश क्रॉनिकल लिटररी सप्लिमेन्ट, १५ जून १९८४.
![]() |
पेंग्वीन / वायकिंग, २०२१ |
Fantastic !khaas abhinandan !! Door raahoon changale kaam karat aahaat
ReplyDelete!