![]() |
| आवरण : अकिला शेषशायी / नवयान पब्लिशिंग |
रामचंद्र सिंग यांचं 'थर्टीन इअर्स: अ नक्सलाइट'स् प्रिझन डायरी' या नावाचं पुस्तक नवयान पब्लिशिंगने २०१८ साली प्रकाशित केलं. मूळ हिंदी मजकूर १९८४च्या दरम्यान एका नियतकालिकात लेखमाला स्वरूपात प्रकाशित झाला. नंतर १९९१ साली 'समकालीन दस्तावेज' या नियतकालिकाचा पूर्ण विशेषांक या मजकुराला वाहिलेला होता. तो अंक वाचनात आल्यावर लखनौ विद्यापीठातील इंग्रजीच्या प्राध्यापिका मधू सिंग यांनी लेखकाची परवानगी घेऊन त्याचं इंग्रजी भाषांतर केलं.
रामचंद्र सिंग उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यात बंगारमाऊ या गावी लहानपणीच डाव्या राजकारणाच्या संपर्कात आले. १९६०च्या आसपासच्या या काळात एकसंध 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष' (भाकप) सक्रिय होता. त्या दशकाच्या उत्तरार्धात भाकप फुटला आणि '(मार्क्सवादी) भारतीय कम्युनिस्ट पक्ष' (माकप) हा नवीन पक्ष सुरू झाला. हे सर्व संसदीय मार्गावरचे प्रयत्न पुरेसे नाहीत, असं वाटून 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष- मार्क्सवादी-लेनिनवादी'ची स्थापना १९६९च्या दरम्यान झाली. सुरुवातीला हा नक्षलवादी विचारांचा मुख्य पक्ष होता, त्यातूनही अनेक गट-तट होत गेले. रामचंद्र सिंग यांनी जिल्हा पातळीवरचा कार्यकर्ता म्हणून, काही प्रमाणात नेता म्हणून हा प्रवास अनुभवला आणि ते अधिक डाव्या प्रवाहाच्या जवळ जात राहिले. नक्षलवादी पक्षाच्या स्थापनेवेळचे नेते चारू मुजुमदार यांनी 'वर्गशत्रूंच्या व्यक्तिगत निर्मूलना'ला प्राधान्य दिलं. अशाच एका जमीनदाराला मारण्याच्या मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल रामचंद्र सिंग यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्या शिक्षेचा भाग म्हणून त्यांना १९७० ते १९८३ अशी तेरा वर्षं उत्तर प्रदेशातल्या पाचेक तुरुंगांत घालवावी लागली. त्या दरम्यानचे अनुभव आणि एकंदर तुरुंगजीवनाविषयी, नक्षलवादी राजकारणाविषयी, स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी नोंदवलेली निरीक्षणं या पुस्तकात येतात. साध्या-सरळ भाषेत, कोणताही पवित्रा न घेता लिहिलेलं हे कथन आहे. त्यातला हा साधेपणा इंग्रजी भाषांतरातही टिकलेला जाणवतो.
मानवी जगण्याविषयी विशिष्ट ठाशीव तत्त्वज्ञानाची दृष्टी स्वीकारलेल्या रामचंद्र यांचं पुस्तक या दृष्टीपलीकडच्याही काही गोष्टी पाहताना दिसतं. सुट्या-सुट्या व्यक्तींचा जीव घेऊन समाजात बदल घडेल, या समजुतीबद्दल त्यांना सुरुवातीपासूनच शंका वाटत होती. पण पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानुसार आपण कृती करायला हवी, म्हणून ते या मोहिमेत सहभागी झाले. संबंधित जमीनदाराची हत्या झाली, पण शेवटी गावातल्या लोकांनीच या नक्षलवादी कार्यकर्त्यांना पकडून दिलं, त्यामुळे व्यापक समाजापासून तुटून अशा कृती करणं परिणामकारक ठरत नसल्याचं रामचंद्र यांचं मत पक्कं होत गेलं. त्याबद्दलचं आत्मचिंतन या पुस्तकात येतं. नक्षलवाद म्हणजे काय, याबद्दल इतर कोणी कैदी प्रश्न विचारायचं, तेव्हा सुरुवातीला त्यांना आपण मूर्ख समजायचो, पण नंतर आपणच मूर्ख असल्याचं वाटू लागलं, अशी कबुली ते देतात. आपण 'राजकीय' कृती खरंच करत होतो का, या गुंतागुंतीच्या प्रश्नाला ते सामोरे जातात, आणि त्यातून गोंधळायला व्हायचं, असंही नोंदवतात (पानं ३३-३४).
इतर व्यक्तींच्या जगण्याकडे बघतानासुद्धा रामचंद्र यांनी असे सहजसोपी उत्तरं नसणारे प्रश्न स्वतःला पडू दिल्याचं जाणवतं. "प्रत्येक कैदी वरकरणी गुन्हेगार असला तरी, प्रत्येकाच्या तुरुंगातील जगण्यामागे कोणती ना कोणती आणखी दुःखद कहाणी होती", असं लिहून रामचंद्र सिंग जसवंत नावाच्या एका कैद्याचा अनुभव सांगतात. जसवंत लक्ष्मी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो, पण त्याचं कुटुंब वरचढ सामाजिक स्थान राखून असल्यामुळे या नात्याला ते विरोध करतात. हे प्रेम पुढे जाऊ नये म्हणून जसवंतचे कुटुंबीय त्याला मध्य प्रदेशात एका कामासाठी पाठवून देतात. तिथे तो एका दरोड्याच्या घटनेत गुंततो. पोलीस त्याला पकडतात. पण एकदा तो पोलिसांच्या ताब्यातून पळून परत उत्तर प्रदेशातल्या गावी जातो. काही काळ तो पोलिसांना हुलकावणी देतो, लक्ष्मीला भेटायचा प्रयत्न करतो. पण तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न ठरवलं जातं. याच दरम्यान पोलिसांना जसवंतचा ठावठिकाणा लागतो आणि ते त्याला पकडतात. सर्व गावासमोरून त्याची धिंड काढली जाते, तेव्हा लक्ष्मी लग्न ठरलेलं असतानाही जाहीरपणे त्याच्यासाठी रडते. या नाट्यमय प्रसंगाची आठवण जसवंतसोबत कायम राहते. आता तुरुंगातून सुटल्यावर काय करणार, असं रामचंद्र विचारतात, तेव्हा तो "दरोडे टाकणार", असं उत्तर देतो (पानं २९-३०).
जसवंतच्या गुन्हेगारीला जबाबदार कोण- तो एकटाच की, वेगाने श्रीमंत होण्याची हाव, इच्छाआकांक्षा कोणत्याही मार्गाने पू्र्ण करण्याला उद्युक्त करणारी संस्कृती, भांडवलशाही, वर्गीय उतरंड, तसंच केवळ सामाजिक स्थानातील भेदामुळे लग्नात खोडा घालणारी जातीय सरंजामी मानसिकता? असा प्रश्न रामचंद्र त्यांच्या विचारसरणीच्या दृष्टिकोनातून नोंदवतात (पान ३०). पुढच्या पानावर कैदी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या ठरलेल्या भेटींवेळी काय घडायचं, याचं वर्णन येतं. कैदी मुलासमोर मूकपणे बसलेले वृद्ध वडील, त्यांच्या डोळ्यांमधले अश्रू. रांगती मुलं घट्ट कुशीत धरून कैदी नवऱ्यांच्या पायाशी डोकं आपटून घेणाऱ्या, धाय मोकलून रडणाऱ्या स्त्रिया. हे सर्व पाहून रामचंद्र लिहितात, "या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा? अशा गोष्टी का होतात?" (पान ३१).
तुरुंगात चळवळीविषयीचं आत्मचिंतनही होत राहिलं. 'व्यक्तिगत निर्मूलना'च्या धोरणाची चिकित्सा झाली. "वरिष्ठ कॉम्रेडांनाही आमच्या चळवळीच्या विचारसरणीय दिशेविषयी बरीचशी अस्पष्टता असल्याचं आता आमच्या लक्षात आलं," अशीही कबुली रामचंद्र देतात (पान ५७). पण असं काही मत मांडलं तर संबंधित व्यक्ती भ्याड आणि विश्वासघातकी असल्याचा आरोप काही ज्येष्ठ सहकारी करत (पान ५८). तरीही, काही जण या धोरणाला विरोध करत राहिले, त्यावर वादचर्चा तुरुंगात होत राहिल्या, तशा बाहेरही होत होत्या. काही वेळा चोर, दरोडेखोर एखाद्या माणसाविरोधातला सूड उगवण्याकरता चळवळीत येत. 'वर्गशत्रूचं निर्मूलन' करण्याच्या नावाखाली व्यक्तिगत सूड उगवले जात, ही क्रांतिकारक तत्त्वांची थट्टाच होती, असं रामचंद्र स्पष्टपणे नोंदवतात (पान ६०).
शिवाय, 'क्रांतिकारक' असल्याचा पवित्रा घेऊन मानवी भावभावनांचा अव्हेर करणाऱ्या मतांबद्दलही रामचंद्र नाराजी व्यक्त करतात. न्यायालयात सुनावणीवेळी आलेल्या पित्याने त्यांच्या कपाळावर मारुतीच्या नावाने टिळा लावला, लोकांना प्रसाद वाटून मुलगा सुटावा म्हणून देवाची प्रार्थना केली. तेव्हा, साम्यवादी क्रांतिकारकाने असा टिळा लावून घेता कामा नये, अशी टीका चळवळीतील एका सह-आरोपीने रामचंद्र यांच्यावर केली. "ही प्रतिक्रिया ऐकून मला खूप वाईट वाटलं. अशा भावनिक क्षणी ईश्वरावरची किंवा प्रथांवरची श्रद्धा किंवा अश्रद्धा अजिबातच महत्त्वाची नसते. माझ्या पित्याच्या इच्छेचा मान राखणं आणि तो मुलाविषयी दाखवत असलेलं प्रेम कृतज्ञतेने स्वीकारणं, हे मला जास्त महत्त्वाचं वाटलं. मग त्या प्रेमाची अभिव्यक्ती कशीही असो," असं रामचंद्र लिहितात (पानं ४८-४९). इथे त्यांच्यावर टीका करणारा चळवळीतला सहकारी कालांतराने तुरुंगात एक छोटं देऊळ बांधतो आणि 'बाबा' म्हणून ओळखला जाऊ लागतो (पान १४२).
तसंच, तुरुंगात येण्याआधी रामचंद्र यांचं मुन्नी / रामदुलारी नावाच्या एका मुलीवर प्रेम होतं. कार्यकर्ता म्हणून त्या मुलीच्या कुटुंबाला रामचंद्र यांनी काही सहाय्य केलं होतं, त्या दरम्यान त्यांची भेट झाली. पुढे तुरुंगातही ती मुलगी त्यांना भेटायला यायची. "एका मुलीबद्दल इतकं चिंतातुर होणं हे काही अस्सल क्रांतिकारकाचं लक्षण नाही", असं त्यांना काही जण चिडवतात (पान ६८). पण "अंधारलेल्या, अवघड काळात प्रेमामुळेच मला जगण्याचं सौंदर्य आणि साधेपणा जाणवला, आणि माझ्या उद्दिष्टापासून विचलित न होता मी पूर्ण बांधिलकीनिशी त्या वाटेवरून चालत राहिलो," अशी रामचंद्र यांची धारणा होती. तरीही, मुन्नीच्या बाबतीत काही वेळा त्यांचा 'राजकीय' दृष्टिकोन वरचढ ठरल्याचं दिसतं. "तिची अभिरुची सुधारण्याचा मी प्रयत्न केला आणि तिला वाचण्यासाठीही प्रवृत्त केलं. लवकरच तिने मॅक्सिम गॉर्कीची 'मदर' ही कादंबरी वाचली. त्यातल्या पावेलचं पात्र तिला खूप आवडलं," असं ते नोंदवतात. पावेल हे डाव्या क्रांतिकारकाचं पात्र आहे. पण मुन्नी काही या राजकीय तत्त्वज्ञानाच्या अवकाशात खऱ्या अर्थाने रुळत नाही. काळ सरत जातो. तेव्हा एकदा ती तुरुंगात रामचंद्र यांना भेटायला येते, तेव्हा ते तिला बाहेर सुरू असलेल्या निवडणुकांविषयी विचारतात. ती काही बोलत नाही, कदाचित तिला निवडणुकांचं विश्लेषण करता येत नसेल म्हणून ती गप्प असेल, असं रामचंद्र यांना वाटतं. तरीही ते आणखी काही विचारतात, तेव्हा ती ताडकन म्हणते, "मी काय राजकारणासाठी जगते का?" हे ऐकल्यावर "माझ्यावर तर आकाशच कोसळलं. माझं संपूर्ण जीवन सर्वोच्च अर्थाने राजकारणासाठी वाहिलेलं होतं, तर इथे माझी आयुष्याची जोडीदारीण राजकारणालाच झिडकारत होती", अशी खंत ते व्यक्त करतात (पान १२५). काही काळ मुन्नी रामचंद्र यांच्या कुटुंबियांसोबत सून असल्याप्रमाणे राहतेसुद्धा, पण कालांतराने ती रामचंद्र यांच्यापासून दुरावते. त्यांच्या प्रेमाचा शोकांत होतो. ते तुरुंगात असतानाच ती दुसऱ्या एका विवाहित माणसाची 'रखेल' म्हणून राहू लागते. पण मुन्नीसमोर तरी भविष्यासंबंधीचे कोणते पर्याय होते, ती शेवटी दिल्लीला नाव बदलून का राहू लागली, एक मूल जन्माला घालून कशी जगू पाहत होती, या निराळ्या शोकांतिकेचं ओझरतंच सूचन या कथनात होतं.
या सर्व सूत्रांसोबतच तुरुंगात होणाऱ्या भीषण अत्याचारांचंही वर्णन रामचंद्र यांनी केलं आहे (पान ९१). शिवाय, १९७५-७७ची दोन वर्षं देशात आणीबाणी होती, तेव्हा तुरुंगात आलेल्या राजकीय कैद्यांसंबंधीचे काही अनुभव आहेत. व्यक्तिगत पातळीवर तुरुंगातील खडतर जगण्याला सामोरं जाताना आपण काही वेळा मार्क्सविचारातील भौतिकवादी दृष्टिकोनापासून दूर जात अध्यात्मिकता आणि ईश्वरी श्रद्धेकडेही वळल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे (पान १३७). पण तरी ते अध्यात्मिकतेमध्ये रमले नाहीत, मार्क्सवादी विचाराच्या वाटेवरच पुढेही चालत राहिले. एकंदर व्यवस्थेविषयीचं त्यांचं आकलनही मार्क्सवादी दृष्टीतून आलेलं आहे. पण त्यासोबत इतरही काही गोष्टी पाहणारी दृष्टी त्यांनी राखल्यामुळे हे पुस्तक दखलपात्र वाटलं.
![]() |
| रामचंद्र सिंग (आभार : नवयान पब्लिशिंग) |
पुस्तक प्रकाशित व्हायच्या बेतात असताना मानधनाचे पैसे पाठवण्याकरता प्रकाशकाने 'पॅन' क्रमांकाची चौकशी केली, तर रामचंद्र यांच्याकडे पॅन कार्डच नसल्याचं त्याला कळलं. मग त्याच्या आग्रहावरून रामचंद्र यांनी पॅन कार्ड काढून घेतलं. पण मग त्यांचं निधन झालं. इंग्रजी पुस्तक त्यांना पाहायला मिळालं नाही. प्रकाशकाला त्यांचा धडसा फोटोही मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या पॅनकार्डवरचा फोटोच प्रकाशनाच्या वेबसाइटवर देण्यात आला.
भारतातल्या कम्युनिस्ट चळवळीला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शंभर वर्षं झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही गेल्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात शंभर वर्षं पूर्ण झाली. आत्ता देशात संघ परिवाराशी संलग्न भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य आहे, स्वाभाविकपणे उजव्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रभाव आणि दबाव अनेक संस्थांवर, तसंच एकंदर सार्वजनिक अवकाशावर आहे. कम्युनिस्ट पक्षांची मोजक्या राज्यांमध्ये असणारी सत्ताही गेल्या पंधराएक वर्षांमध्ये ढासळत गेली. संसदीय राजकारणाची निंदा करत सशस्त्र मार्गानेच राज्यसंस्था उलथवू पाहणाऱ्या माओवादी / नक्षलवादी राजकारणाचीही गेल्या वर्षा-दोन वर्षांत निर्णायक माघार झाली. काही नेत्यांचे मृत्यू, काही नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी पत्करलेली शरणागती, यामुळे सध्या ही चळवळ किमान सशस्त्र पातळीवर तरी बळ गमावून बसलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतातल्या डाव्या विचारप्रवाहासंबंधीचा दस्तावेज म्हणून हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. कारण- त्यात सरधोपट निष्कर्ष नाहीत, आपल्या राजकारणातल्या उणिवा शोधण्याची इच्छा आहे, केवळ तात्त्विक कलह उभा करण्याऐवजी जगण्यातल्या छोट्या-मोठ्या अनुबंधांची दखल घेऊन काही बोलायचा प्रयत्न आहे.
अलीकडे ओडिशात जितू मुंडा या ६५ वर्षांच्या आदिवासी माणसाने स्वतःच्या मृत बहिणीचा सांगाडा बँकेत दाखवायला नेला, ती बातमी गाजली. बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या बचत खात्यावर जमा असणारे १९,३०० रुपये काढण्यासाठी जितू यांनी बँकेत खेटे घातले, पण बहिणीच्या मृत्यूचा दाखला मिळाल्याशिवाय पैसे देता येणार नाहीत, असं बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. इतरही शासकीय संस्थांकडून व प्रतिनिधींकडून असा दाखला मिळवण्याचे जितू यांचे प्रयत्न फोल ठरले. तेव्हा शेवटी तडकून त्यांनी बहीण मेल्याचा पुरावा म्हणून तिचा सांगाडा बँकेत नेला. लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी असणारी व्यवस्थाच या योजना लोकांना नाकारण्यासाठी कार्यरत कशी होते, याचा हा एक दाखला होता (या संदर्भात अन्न अधिकार अभियान आणि रिथिंक आधार अभियान यांनी प्रसिद्ध केलेला तथ्यशोधन अहवाल पाहता येईल). अशी एकंदर परिस्थिती कुठे ना कुठे कायम राहते, तोवर रामचंद्र सिंग यांना पडलेले 'राजकीय' प्रश्न गैरलागू नसल्याची आठवणसुद्धा हे पुस्तक करून देतं. त्या प्रश्नांबद्दलचं आपलं उत्तर त्यांच्याशी जुळणारं आहे की नाही, हा वेगळा मुद्दा.
*
या पुस्तकाची कागदी बांधणीतली आवृत्ती २०२२ साली प्रकाशित झाली, ती मी पाहिलेली नाही. पुठ्ठा बांधणीमधली पहिली प्रतच पाहिली आहे- त्याच्या निर्मितीबद्दल थोडं बोलणं गरजेचं वाटतं. या आवृत्तीच्या आवरणावर दगडी भिंतीची आठवण करून देणारा खरखरीत स्पर्श असणारा पोत वापरला आहे. त्यात येणारं फुलांचं चित्र मात्र गुळगुळीत पोताचं आहे. त्यामुळे पुस्तक हातात घेतल्यावर सतत वाचकाला कथनातल्या खरखरीत अनुभवांच्या अवकाशाची आठवण होत राहावी, आणि तरीही त्यात रामचंद्र यांच्या दृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या काही ताजेपणाचाही अनुभव यावा, असं या पुस्तकाचं सुंदर आवरण आहे.
![]() |
| अकिला शेषशायी / नवयान पब्लिशिंग |


