०३ एप्रिल २०१७

पोटासाठी पॉप्युलर : उद्धव शेळके

१. अभिरुची

स्पीकिंग टायगर, २०१७
उद्धव शेळके यांच्या 'धग' या कादंबरीचं 'कौतिक ऑन एम्बर्स' हे शांता गोखले यांनी केलेलं इंग्रजी भाषांतर 'स्पीकिंग टायगर' या दिल्लीतील प्रकाशनसंस्थेनं जानेवारी २०१७मध्ये प्रकाशित केलं. ('मॅकमिलन' या प्रकाशनसंस्थेनं शांता गोखले यांनीच केलेलं याच कादंबरीचं भाषांतर 'एम्बर्स' या नावानं २००० साली काढलं होतं: एक - २०००च्या आवृत्तीचा दुवा । दोन- या 'मॅकमिलन'वाल्या आवृत्तीचा संदर्भ असलेला एक इंग्रजी लेख).

'स्पीकिंग टायगर'नं ही आवृत्ती काढल्याचं साधारण जानेवारी महिन्याच्या अखेरीला आपल्या पाहण्यात आलं. त्याच वेळी त्यांच्या संकेतस्थळावर लेखकाविषयी म्हणजे उद्धव शेळके यांच्याविषयी चरित्रात्मक माहिती देणारी इंग्रजी टीपही वाचनात आली. ही टीप आपण वाचली तेव्हा खालीलप्रमाणे होती:
Uddhav J. Shelke (1931–1992) was born in Hinganghat in the Vidarbha district of Maharashtra. After his school education, he joined the Amravati daily, Hindustan, as associate editor. Then he moved to Tapovan, Dr Shivajirao Patwardhan’s colony for people affected with leprosy where he worked as proof-reader, compositor and finally manager of the printing press. He won himself a place in the Marathi literary canon with his first novel, Dhag. His prodigious output of long and short fiction thereafter pandered exclusively to popular taste. However, it allowed him to live as a professional writer.
[उद्धव ज. शेळके (१९३१-१९९२) यांचा जन्म महाराष्ट्रातल्या विदर्भ जिल्ह्यातील हिंगणघाट इथं झाला. शालेय शिक्षणानंतर ते अमरावतीतील दैनिक हिंदुस्थानमध्ये सहायक संपादक म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते 'तपोवन' या संस्थेत काम करू लागले. कुष्ठरोग्यांसाठी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी सुरू केलेल्या या संस्थेत शेळक्यांंनी मुद्रितशोधक, जुळारी आणि अखेरीस छापखान्याचा व्यवस्थापक म्हणून काम केलं. 'धग' या पहिल्या कादंबरीद्वारे त्यांनी मराठी साहित्यप्रवाहात स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यानंतर त्यांनी प्रचंड प्रमाणात लिहिलेलं दीर्घ व लघु साहित्य पूर्णपणे लोकसुलभ रुचीला चुचकारणारं होतं. परंतु, अशा लेखनामुळं त्यांना व्यावसायिक लेखक म्हणून जगता आलं.]
'अमेझॉन'वर या इंग्रजी भाषांतराच्या 'किंडल' आवृत्तीची काही पानं वाचकांना चाळता येतात, त्यावरून ही ओळख पुस्तकातही असल्याचं कळलं. दरम्यान, शेळके यांची ही सहा वाक्यांतली ओळख काही बाबतीत खटकल्यामुळं आपण प्रकाशनाच्या संकेतस्थळावर 'संपर्क' विभागात एक पत्र टाकून ठेवलं. या पत्राचा आशय मराठीत असा:
"'स्पीकिंग टायगर'नं उद्धव शेळके यांच्या 'धग' या कादंबरीचं इंग्रजी भाषांतर पुनःप्रकाशित करणं, ही प्रशंसनीय गोष्ट आहे. आता ही कादंबरी अधिक काही वाचकांपर्यंत पोचेल, अशी आशा. पण आपल्या प्रकाशनाच्या संकेतस्थळावर दिलेली शेळके यांची ओळख दोन बाबतींत खटकली. शेळक्यांनी प्रचंड प्रमाणात लेखन केलं आणि त्यांना उदरनिर्वाहासाठी खूप लिहावं लागलं, हे खरंच. पण सहा वाक्यांच्या ओळखीत (दोन वाक्यं खर्च करून) विशेष उल्लेख करण्याएवढी ही बाब महत्त्वाची आहे का? शिवाय, 'धग'च्या आधी त्यांनी 'शिळान अधिक आठ कथा' हा संग्रह काढला होता, आणि 'धग'नंतरही त्यांनी काही चांगली पुस्तकं लिहिली. पण हे सगळं लेखन 'केवळ लोकसुलभ रूचीला चुचकारणारं' होतं, असं वर्णन सुलभीकरणाचा प्रकार वाटतो. शेळक्यांच्या जगण्यातलं कारुण्य किंवा मराठी व इंग्रजी साहित्यसंस्कृतींमधली प्रचंड आर्थिक दरी, यातलं काहीच अशा वर्णनांमधून स्पष्ट होत नाही. शेळक्यांनी उदरनिर्वाहासाठी त्यांना शक्य असेल ते लिहिलं ही सर्वसामान्य वाचक म्हणून मला चांगलीच गोष्ट वाटते. शिवाय 'लोकसुलभ अभिरुचीला चुचकारण्या'ला तुच्छ लेखण्याचं कारण काय? खरं तर, खपाऊ रहस्यकथांपासून ते 'अभिरुचीसंपन्नां'ना रुचणाऱ्या 'धग'सारख्या कादंबरीपर्यंत अतिशय वैविध्यपूर्ण साहित्यलेखन शेळक्यांनी केलं, ही त्यांचं लेखकी प्रावीण्य दाखवणारी गोष्ट आहे. त्यामुळं शेळक्यांचं संकेतस्थळावरचं वर्णन दुःखद वाटलं. हे असलं तरी आता शेळक्यांची संवेदनशीलता मराठीसोबतच इतर काही वाचकांपर्यंत पोचेल, हे मला चांगलंच वाटतं."
वरच्या मुद्द्यासोबतच आणखीही एक मुद्दा आपण प्रकाशकांना कळवला होता. विदर्भ या प्रदेशाचा उल्लेख सदर इंग्रजी आवृत्तीत 'डिस्ट्रिक्ट'/'जिल्हा' असा केलेला आहे. ही एक तथ्यासंबंधीची चूक वाटली. तीही त्यांना कळवून ठेवली. या संदर्भात दहा-एक दिवसांच्या काळामधे आपण वेगवेगळ्या टप्प्यांमधे मेलद्वारे संपर्क साधला. त्यातल्या एका व्यक्तीचा तत्काळ प्रतिसाद आला. ही शेवटची मेल पाठवली त्याच दिवशी आपण प्रकाशनाची वेबसाइट तपासली, तेव्हा त्यातली आपल्याला आक्षेपार्ह वाटलेली दोन वाक्यं काढून टाकलेली होती आणि विदर्भाचा उल्लेख 'डिस्ट्रीक्ट'वरून 'रीजन' असा बदलला होता. उद्धव शेळके यांची लेखक म्हणून असलेली ही ओळख मूळ छापील इंग्रजी पुस्तकात मात्र तशीच राहील. योग्य वाटल्यास प्रकाशकांना कदाचित पुढच्या आवृत्तीत हा बदल करता येईल.

रेघेला प्रतिसाद दिलेल्या व्यक्तीसोबतचा हा संवाद अगदी थोडक्यात होता, त्यामुळं  रेघेवर यासंबंधी नोंद करताना तो प्रतिसाद त्यांच्या परवानगीविना नोंदवणं योग्य वाटलं नाही. या व्यक्तीला आपण तशी विचारणा केली, पण अगदी थोडक्यातल्या मेलवरच्या संवादावरून मूळ मुद्दा स्पष्ट होणार नाही, त्या मुद्द्यावर निराळी चर्चा गरजेची आहे, असं त्या व्यक्तीनं कळवलं. ते योग्यही होतं आणि त्यांच्या म्हणण्याचा आदर ठेवत आपण त्यांचा प्रतिसाद इथं नको नोंदवूया. पण त्यांच्या प्रतिसादातलं मूळ सूत्र आपल्या नोंदीला पुढं नेण्यासाठी गरजेचं असल्यानं तेवढी एक-दोन वाक्यं आपण इथं नोंदवून पुढं जाऊ. विदर्भाचा 'डिस्ट्रिक्ट' हा उल्लेख 'परिसर' अशा अर्थानं असल्याचं संबंधित व्यक्तीनं कळवलं. पण त्याहीपेक्षा 'पॉप्युलर' रूचीसंबंधीचा आक्षेप अधिक गंभीर स्वरूपाचा असल्याचं या व्यक्तीनं म्हटलं. त्यांचं म्हणणं असं होतं: "धग ही कोणत्याही- अगदी आंतरराष्ट्रीय- निकषांनुसारही उत्तम कादंबरी ठरेल आणि शेळके यांचं दुसरं लेखन या कादंबरीच्या पातळीला पोचू शकलं नाही, या मताशी बहुतांश लोक सहमत होतील. एका मराठी प्रकाशकांनी सांगितल्यानुसार, शेळक्यांना त्यांची पुस्तकं विकली जावीत याची चिंता लागलेली असायची, त्याचा परिणाम त्यांच्या कथनावर आणि शैलीवर झाला होता. अन्यथा, 'धग'मध्ये शेळक्यांनी गाठलेली कथनाची उंची टिकवण्याची क्षमता त्यांच्यात होती." 'पॅण्डरिंग' हा शब्द मात्र लोकसुलभ रूचीबद्दल हीनतादर्शक आहे, असं या व्यक्तीनं मान्य केलं. पण त्यामागचा हेतू अशी तुच्छता दर्शवण्याचा नव्हता, असंही या व्यक्तीनं सांगितलं. (पॅण्डर: एखाद्याची हीन अभिरुची, दोष, वासना, इ. जोपासणे, पोसणे. स्त्रोत: नवनीत ॲडव्हान्स्ड डिक्शनरी).

या संदर्भात आक्षेप किंवा मत कळवलं तेव्हाही आपल्याला प्रकाशकांच्या किंवा संबंधित व्यक्तींच्या हेतूंबद्दल शंका वाटलेली नव्हती. मुळातच 'धग'चं इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेतलं भाषांतर कोणी प्रकाशित केलं, तर वाचक म्हणून आपल्याला आनंदच वाटेल. त्या आनंदासकटच आपण आपल्याला खटकलेले दोन मुद्दे कळवले. त्यातल्या ज्या व्यक्तीनं प्रतिसाद दिला तिनंही या आनंदाची दखल घेऊनच आक्षेपांचीही दखल घेतली. त्यामुळं आपणही व्यक्ती किंवा संस्थांवर दोषारोप करण्यापेक्षा आपल्या आक्षेपांबद्दल थोडं तपशिलात नोंदवूया.

आपण या प्रकाशकांना कळवलेल्या मतामध्ये आणखी एक मुद्दा हवा होता. पण तो रेघेच्याही माहितीत नसल्यानं आपण त्यांना तसं काही आधी कळवू शकलो नाही. 'धग' ही उद्धव शेळक्यांची पहिली कादंबरी नाही. 'नांदतं घर' अशी त्यांची कादंबरी १९५६ साली प्रकाशित झाली होती (श्याम प्रकाशन, अमरावती). (विषय कादंबरीचा आहे म्हणून, नायतर 'आसरा' व 'शिळान' असे त्यांचे दोन कथासंग्रहही अमरावतीच्या श्याम प्रकाशनानं अनुक्रमे १९५७ आणि १९५८ या वर्षांमध्ये प्रकाशित केले होते). 'धग' ही कादंबरी १९६० साली मुंबईच्या पॉप्युुलर प्रकाशनानं काढली. तर ही तथ्यासंबंधीची माहिती आपल्यालाही नव्हती, हे कबूल करूया. पण आता या नोंदीच्या निमित्तानं केेलेल्या शोधात या काही गोष्टी सापडल्या.

२. पैशासाठी लेखन

पॉप्युलर प्रकाशन, २००७
मुखपृष्ठ: उत्तम क्षीरसागर
तर, आता आपण मुख्य मुद्द्याकडं येऊ. शेळक्यांनी पैशासाठी खूप लिहिलं, हे खुद्द शेळक्यांनाही मान्य होतं आणि त्यांनी उघडपणे ते वेळोवेळी मान्य केलं होतं. 'उद्धव शेळके यांच्या कादंबऱ्यांतील स्त्रीचित्रण' या विषयावर पीएच.डी. केलेले केशव फाले यांनी १४ जानेवारी १९९१ रोजी शेळक्यांची प्रत्यक्ष मुलाखत (पीडीएफ) घेतली होती, त्यात तीन प्रश्नांना उत्तर देताना शेळके जे बोलले ते आपण जरा सलग वाचू:

'तपोवन' या अमरावतीमधल्या संस्थेत 'सुभाष मुद्रणालया'चे व्यवस्थापक म्हणून शेळके काही काळ काम करत होते, हे काम सोडण्यासंबंधीच्या प्रश्नावर ते म्हणतात:
"साधारणतः १९५७ ते १९६६-६७पर्यंत मी तेथे होतो. या काळात माझ्या बऱ्याच कथा-कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यावेळी माझ्या मनात वाङ्मयीन मासिक काढण्याची इच्छा उत्पन्न झाली. मी तपोवनमध्ये नोकरीचा राजीनामा दिला. आणि एका मित्राला भागीदार घेऊन 'वैशिष्ट्य' नावाचं मासिक काढलं. तीन-चार अंक निघाले, पण नंतर प्रतिसाद नसल्यामुळे ते बंद पडलं. त्यामुळे कर्ज झालं. हे कर्ज फेडण्यास भागीदारानं नकार दिला. मी घरातील वस्तू, दागिने विकून कर्ज फेडलं. आणि मुंबईला गेलो."
मुंबईला कशासाठी? असं मुलाखतकार विचारतात. त्यावर शेळके म्हणतात:
"भाग्य आजमावण्यासाठी का म्हणाना! तिथे लेखन करून चार पैसे अधिकचे मिळवता येतील असं वाटलं होतं. पण मुंबईत काही होऊ शकलं नाही. त्यामुळं माझे एक मित्र पुरुषोत्तम धाक्रस हे मला 'सोबत'कार श्री. ग. वा. बेहरे यांच्याकडे पुण्याला घेऊन गेले. तिथं बेहरे यांनी १०० रुपये महिना देऊ केला. आणि 'लाईट' लिहिण्याचा सल्ला दिला. मला पैशाची सक्त गरज होती. तो सल्ला मी मान्य केला. आणि रम्यकथा प्रकाशनाचे श्री. वासुदेव मेहेंदळे यांच्याशी झालेल्या कराराप्रमाणे मी दरमहा तीन कादंबरिका लिहू लागलो. त्याचे मला दरमहा ९०० रुपये त्या वेळी मिळायचे."
'हे 'हलके'-फुलके लिखाण आपण केव्हा बंद केले?'- मुलाखतकार. त्यावर शेळके:
"हे लिखाण मी दीडेक वर्ष केलं असेल. मी पूर्णतः लेखनावर जगणारा लेखक. बिकट आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पुण्याला गेल्यावर मी हलकंफुलकं लेखन केलं. त्यातून मला भरपूर पैसा मिळाला. आर्थिक सोडवणुकीसाठी मनाविरुद्ध करावी लागणारी ती एक तडजोड होती. या लिखाणाचा मलाही कंटाळा आला होता आणि जवळचे मित्रही बाहेर पडण्यास सुचवीत होते. दरम्यान मला पैसाही मिळाला होता."
फाले यांच्या पीएच.डी. प्रबंधाचं पुस्तक स्वरूप प्रकाशनानं काढलेलं आहे (डिसेंबर २००८). पुस्तकातल्या प्रकरणांमध्ये संदर्भ म्हणून दिलेली परिशिष्टं खुद्द पुस्तकात छापलेली मात्र नाहीत. त्यामुळं या संदर्भात आणखी शोध घ्यावा लागला, मग फाले यांचा प्रबंध 'शोधगंगा' या संकेतस्थळावर सापडला. त्यापेक्षाही परिशिष्टातली मुलाखत सापडली, हे आपल्या नोंदीसाठी चांगलं झालं. लहानशीच मुलाखत आहे, त्यातही चरित्रात्मक स्वरूपाचे प्रश्नच थोडक्यात आलेले आहेत. आपण शेळक्यांच्या चरित्रात्मक बाबीवरून नोंद सुरू केली असल्यानं ही मुलाखत त्यासाठी मर्यादित प्रमाणात उपयोगी वाटली.

३. शाब्दिक इज्जतीची होळी

उद्धवपर्व, २००२ (नभ प्रकाशन) आभार: संजय खडसे
शेळक्यांनी पैसे मिळवण्यासाठी, मनाविरुद्ध तडजोड म्हणून, कंटाळा येईल इतकं लेखन केलं, हे आता आपल्याला कळतं. यासाठी इतरही अनेक संदर्भ सापडतात. आधी उल्लेख आलेल्या मुलाखतीपेक्षा अधिक तपशिलातली शेळक्यांची मुलाखत संजय खडसे यांनी घेतली होती. 'नागपूर पत्रिका' या दैनिकात छापून आलेली ही मुलाखत (बहुधा या मुलाखतीतला काही भाग) नंतर 'उद्धवपर्व' या २००२ सालच्या एका विशेषांकात पुन्हा प्रकाशित झालेली दिसते. या अंकात दोन-तीन राजकीय नेत्यांचे शुभेच्छापर संदेश, शेळक्यांशी असलेल्या वैयक्तिक ओळखीसंबंधीचे काही लेख, त्यांच्या साहित्यावरचे काही लेख, दोन मुलाखती, त्यांच्या प्रकाशित पुस्तकांची सूची, 'धग'वरच्या काही कविता, असा मजकूर काहीसा विस्कळीतपणे एकत्र केलेला आहे. यातल्या मुलाखती आणि सूची मात्र संदर्भासाठी उपयोगी वाटल्या.

शेळके यांनी 'तपोवन'मधील नोकरी सोडून सुरू केलेलं मासिक बंद पडल्याचा उल्लेख आधी आला आहेच. या संदर्भात, खडसे यांना दिलेल्या मुलाखतीत शेळके म्हणतात:
"अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, असे अनुभव माझ्यासारख्या काहीशा अविचारी माणसाला नेहमीच येतात. मी थोड्याशाने हुरळतोय, कोणी म्हटले मासिक काढाल, पैसे देतो. मासिकावर पोट भरू शकेन याचा काही एक विचार न करता तपोवनातील नोकरी सोडून दिली. मग मला देव दिसायला लागले. संसार काय असतो कळायला लागलं. मी वैतागलो. मुलाबाळांची आणि स्वतःची परवा न करता [...] तोवर मिळालेल्या शाब्दिक इज्जतीची होळी करून केवळ १५० रुपयांच्या भरवशावर मुंबईची वाट धरली. तिकडे माझे प्रकाशक  व चाहते होते म्हणून आशा होती. बायको मुलांना डोळ्यात पाणी आणून निरोप दिला. त्यांना सांगितलं, मुंबईहून पैसे घेऊन येतो. खरं तर मनोमन ठरवलं होतं, जगण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली तर जगायचं नाही तर तिकडंच पांढरं करायचं. घरी शोधाशोध सुरू होती. प्रकाशकांकडे पत्रं येत. ती मला मिळत. मी उत्तर देत नसे. आई रात्रंदिवस रडत असे. मुलं पप्पा पप्पा करीत. मला पत्रातून सारं कळे, परंतु मी स्वतःला निष्ठूर केलं होतं. असे प्रसंग आयुष्यात कितीदा तरी आलेत. माझ्या तडकाफडकी वागण्यामुळं हे सर्व ओढवलं. अर्थात त्यांचा मोबदला मला पुरेपूर मोजावा लागला. मात्र अनुभवही आला. अनुभव पुढील लिखाणाच्या कामी आला. सतत सात वर्षं तिकडची माणसं, समाज, बोली, त्यांचे स्वभाव, आयुष्यातील वळणं, उतार-चढाव, सारं डोळसपणे पाहता आलं. माझी दृष्टी व्यापक झाली [...] पूर्वी दहा माणसांसमोर माझे पाय लटलट कापायचे. आता दहा हजार माणसांना सामोरं जातो. मी अनुभवाचे एवढे टक्के टोणपे खाल्ले नसते तर मला हा सभाधीटपणा आला नसता. जगाशी दोन-दोन हात करायची उमेद झाली नसती. अनुभव संकुचित राहिले असते. माझं इंग्रजी वाढलं नसतं. मी सारं आयुष्य ग्रामीण ग्रामीण करत राहिलो असतो आणि ते संपल्यावर आग्रहावर जगू लागलो असतो. मात्र सांज भागवण्यासाठी दहा रुपये मागण्याची पाळी आली नाही. तेव्हा मी मुलांना टेरिकॉटचे कपडे दिले नसतील, बूट दिले नसतील, परंतु त्यांना ठिगळाची वस्त्रं घालून चपलांशिवाय अनवाणी हिंडावं लागलं नाही. केवळ लेखनातून मिळालेलं सामर्थ्य हे मी माझं स्वाभिमानपद समजतो".
'शाब्दिक इज्जतीची होळी' हे शेळक्यांचं म्हणणं भारी आहे. त्यावर आपण काही निराळं बोलायला हवंय असं वाटत नाही. आयुष्यात जे घडलं त्याची जबाबदारी शेळके स्वीकारतायंत, आणि लेखनाच्या आधारे आपण उदरनिर्वाह केला, हे त्यांना अभिमानाचं वाटतंय, हा मुद्दा मात्र यातून आपल्यासारख्या वाचकांना लक्षात येतो. शेळक्यांचं चरित्र आणखी शोधायचा प्रयत्न करू पाह्यला, तर मग साहित्य अकादमीनं 'मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर' या मालिकेत प्रकाशित केलेलं व आनंद पाटील यांनी लिहिलेलं शेळक्यांचं ९४ पानांचं चरित्र आपल्याला मिळतं.

४. मर्यादित चरित्रसाधनं

साहित्य अकादमी, २००२
या चरित्रातला शेळक्यांबद्दलचा वैयक्तिक भाग अतिशय लहान (१४ पानांचा) आहे, आणि त्यातला बराचसा ऐवज आधी उल्लेख झालेली मुलाखत, दुसरा एक विशेषांक, शेळक्यांच्या डायरीतल्या काही नोंदी, एका पीएच.डी. प्रबंधाचं काम, एका एम.फिल.साठीचं काम, अशा मर्यादित साधनांमधून घेतलेला आहे. शेळक्यांबद्दलची चरित्रसाधनं मर्यादित असल्याची जाणीव या चरित्राचे लेखक आनंद पाटील यांना असल्याचं दिसतं. पण ही मर्यादा मान्य करूनही खूप ताणलेले निष्कर्ष काढण्यात पाटील मागं राहिलेले नाहीत. शिवाय एखादी वस्तुस्थितीच विचित्र पद्धतीनं लिहून तिचं विकृतीकरण करणं, असा प्रकार काही ठिकाणी दिसला. उदाहरणार्थ हे वाक्य पाहा: ब्राह्मण मुलीशी लग्न केलेले विख्यात लघुकथा लेखक शंकर पाटील यांनी त्यांना (उद्धव शेळक्यांना) महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळात नोकरी मिळवून दिली, आणि नंतर शेळके यांना ब्राह्मण मुलीशी लग्न करणं साध्य झालं. (मूळ इंग्रजी वाक्य: [...] Shankar Patil, famous short story writer who had married a Brahmin girl, got him employed in the textbook bureau of Government of Maharashtra, and Shelke succeeded in marrying a Brahmin girl: पान ५). पुढं हे पाटील लिहितात: चाळिशीत विधुरावस्थेतल्या त्यांनी (शेळक्यांनी) जाणीवपूर्वक ब्राह्मण मुलीवर प्रेम केलं, असं नंतर त्यांनी त्यांच्या एका मुलाखतकाराला सांगितलं (इंग्रजी वाक्य: A widower in his forties he fell in love deliberately with a young Brahmin girl, as he told later to the interviewer: पान ७). शेळक्यांच्याच एका मुलाखतीतल्या उल्लेखावरून पाटलांनी हे लिहिलेलं आहे. ही मुलाखत म्हणजे आपल्या नोंदीत आधी उल्लेख आलेली, संजय खडसे यांनी घेतलेली. पण यात घोटाळा वाटतो. शेळके यांचं पहिलं लग्न घरच्या परिस्थितीमुळं, आई थकत होती म्हणून सून आणावी, अशा हेतूनं झालेलं होतं. ती पत्नी 'तोलामोलाची नव्हती', असं शेळक्यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. पण दुर्दैवानं ती पत्नी वारली, त्यानंतर अनेक वर्षांनी शेळक्यांनी दुसरं लग्न केलं, हे आंतरजातीय लग्न होतं. खडसे यांना दिलेल्या मुलाखतीत शेळके म्हणतात: "पुण्यात असताना मी दुसरं लग्न केलं. हा आंतरजातीय प्रेमविवाह आहे. तोही जाणत्या वयात जाणूनबुजून केलेला. त्यामुळे त्याविषयी बोलण्यासारखं काही नाही." पहिलं लग्न परिस्थितीच्या रेट्यानं झालं, तर दुसरं लग्न जाणतेपणानं झालेलं होतं, असा शेळक्यांच्या बोलण्यातला अर्थ जाणवला. आनंद पाटलांनी या अर्थाचा अनर्थ करून त्याला आणखी निरनिराळे संदर्भ जोडून वाक्यं लिहिल्येत. शेळक्यांची साहित्यिक कारकीर्द आणि आंतरजातीय लग्न यांच्यात संबंध दिसत असल्याचं काहीतरी पाटील पुढं म्हणताना दिसतात. पण शंकर पाटलांबद्दलचा वैयक्तिक उल्लेख बिनसंदर्भानं देऊन काय साध्य होतं ते कळलं नाही. असे वैयक्तिक उल्लेख सखोल चरित्रात तपशीलवार मांडणीनं संदर्भासहित देणं, ही वेगळी गोष्ट आहे. पण इतक्या ओझरत्या पद्धतीनं आणि मर्यादित साधनांमधे असे उल्लेख चुकीचे वाटले. शिवाय, पाटलांनी ज्या पद्धतीनं हे सगळं लिहिलंय, ते शेळक्यांपेक्षा संबंधित स्त्रीसाठी मानहानीकारक आहे. संबंधित व्यक्ती जिवंत असताना  तिला याबद्दल विचारून लेखन करता आलं असतं. शेळक्यांच्या मुलाखतीवरच एकतर्फी भर ठेवून, त्यातही चुकीचे अर्थ काढून अशी वर्णनं करणं गैर वाटतं.

लेखकाची चरित्रसाधनं मर्यादित असतील, त्याच्या बाजूनं फार काही बोललं गेलं नसेल, तर त्याच्याबद्दल किती विचित्र उल्लेख होऊ शकतात, याचा हा वाईट दाखला आहे. नोंदीच्या सुरुवातीला आलेला उल्लेखही चरित्राशी संबंधित असला तरी त्यात मुख्यत्वे शेळक्यांच्या साहित्याबद्दल काही नकारात्मक मुद्दा नोंदवलेला आहे. पाटलांनी मात्र वैयक्तिक शेरा मारलाय. [ही नोंद केल्यानंतर काही महिन्यांनी साहित्य अकादमीलाही या चरित्रपुस्तिकेतली ही बाब कळवली. पोच मिळाली. पण पुढे काही झालं का, ते कळलं नाही]. तरीही या चरित्रपुस्तिकेत काही थोडीशी उपयोगी माहितीही सापडते. शेळक्यांच्या काही कादंबऱ्यांची व कथांची- म्हणजे त्यातल्या कथानकांची तोंडओळख यात करून दिलेली आहे. शिवाय, शेळक्यांच्या लेखनाची पाटलांना जाणवलेली वैशिष्ट्यंही काही वेळा उपयोगी ठरू शकतील. उदाहरणार्थ, शेळक्यांनी विविध पार्श्वभूमीवरच्या पात्रांच्या कथा लिहिल्या. विविध जाती-धर्मांसोबतच ग्रामीण व शहरी अशा अनेक पार्श्वभूमी त्यांच्या कथानकांमध्ये दिसतात. शेळक्यांनी मुलाखतीत ग्रामीण-शहरी या मुद्द्यावर व्यक्त केलेलं मत या म्हणण्याशी जुळणारं आहे.

५. लेखनकला नि लेखनकामाठी

पॉप्युलर प्रकाशन, १९९०
मुखपृष्ठ: बाळ ठाकूर
उद्धव शेळके यांनी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांमध्ये तीन कादंबऱ्या चरित्रात्मक स्वरूपाच्या होत्या. 'साहेब' (प्र.के. अत्रे), 'मनःपूत' (पु.भा. भावे) आणि 'खंजिरीचे बोल' (तुकडोजी महाराज) या त्या कादंबऱ्या. उदाहरणादाखल यातली 'मनःपूत' कादंबरी पाहू. पॉप्युलर प्रकाशनानं १९९० साली ही कादंबरी प्रकाशित केली. त्याआधी उद्धव शेळक्यांना हार्ट-अटॅक येऊन गेलेला होता. शारीरिक आघाताचा साहजिकपणे मनावरही परिणाम झाला, असं त्यांनी या कादंबरीला लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हटलं आहे ('मृत्यूला मी चुकवलं खरं, पण नंतर राहिलेल्या आयुष्याच्या सापळ्याशी दोन हात करणं मला जड जाऊ लागलं. जीवनावरची मानसिक पकड सुटली. नैराश्यानं वाचन-लेखनावरची वासना नाहीशी झाली. [...] शरीराशिवाय मन सुखी राहात नाही व याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेत होतो'). अशा वेळी त्यांना पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी मदत केली. जास्तीच्या उपचारांसाठी भटकळ शेळक्यांना अमरावतीहून मुंबईला घेऊन गेले. मग तिथं जरा शेळक्यांना मनाला आराम वाटला. तिकडेच पु.भा. भावे स्मृती समितीच्या वार्षिक बैठकीला ते एकदा गेले होते. मग त्यातून तिकडं त्यांनी भाव्यांवर कादंबरी लिहायाची इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार मग ही 'मनःपूत' कादंबरी लिहिली गेली. भावे हे सुरुवातीच्या काळातले शेळक्यांचे लेखनातले आदर्श होते, असं प्रस्तावनेत त्यांनी लिहिलंय. तर आता या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही कादंबरी एका पातळीवर सपक पद्धतीनं भाव्यांच्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाबद्दलचा आलेख नोंदवते. हिंदुत्वाचा दुराभिमान, स्त्रीशिक्षणाबद्दल अनादर, वांशिक श्रेष्ठत्व, इत्यादी विविध मतं भाव्यांनी हिरीरीनं मांडलेली होती. शिवाय, मराठीत नवकथाकार म्हणून ज्यांची नावं घेतली जात होती त्यातले हे एक! भाव्यांच्या भीषण मतांच्या तपशिलासाठी पाहा: पु.भा.भावे यांची अनिल अवचटांनी घेतलेली मुलाखत (रिपोर्टिंगचे दिवस, समकालीन प्रकाशन, पान १३६-१४७). शेळक्यांच्या कादंबरीत ही मतंही आलेली आहेत, पण या मतांमागचं मन (जसंकसं असेल तसं) कादंबरीत आलेलं नाही. भाव्यांनी 'प्रथमपुरुषी एकवचनी' या नावानं स्वतःचं आत्मचरित्रही लिहिलेलं आहे, ते रेघेच्या वाचनात आलेलं नाही. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सार्वजनिक पातळीवर जितपत बोललं जातं, तितपतच या कादंबरीत आहे. त्याच्या विविध बाजूही फारशा आलेल्या नाहीत. खाजगी आयुष्यातला काही तपशील या सगळ्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाला जोडत जातो, पण त्या खालचे थर या कादंबरीत नाहीत. शिवाय, मुख्य पात्र बाकीच्या पात्रांपेक्षा काही पायऱ्या वरती उचलून ठेवलेलं असल्यानंही आपोआप एक वरवरचेपणा आलेला आहे. एका अर्थी, मनानं जर्जर झालेल्या शेळक्यांसारख्या चांगल्या लेखकाची ही खचलेली कादंबरी आहे, असं वाटलं. पण ही प्रतिष्ठित पॉप्युलर प्रकाशनानं काढलेली होती. कव्हरवरचं चित्रही साधारण त्यांच्या प्रकाशनाला साजेसं. फॉन्ट वगैरे नीट. कादंबरीतलं लेखन-छपाई हे नेटकं आहे, पण शेळक्यांची लेखक म्हणून असलेली कौशल्यं इथं वाचक म्हणून आपल्याला जाणवली नाहीत.

भगवानदास हिरजी प्रकाशन, ऑगस्ट १९७९
मुखपृष्ठ: ल. म. कडू
त्या तुलनेत १९७९ साली प्रकाशित झालेली शेळक्यांची 'महापाप' ही कादंबरी फारच रोचक आहे. शेळक्यांनी जे लिखाण पैशासाठी केलं त्यात ही कादंबरीही कदाचित गणली जाईल. यासंबंधी एक आधार पाहा: 'धग' आणि 'महामार्ग' या शेळक्यांच्या कादंबऱ्या वाचलेल्या आणि आवडलेल्या एका व्यक्तीला आपण या कादंबरीचं मुखपृष्ठ दाखवलं, तर त्या व्यक्तीला ते बटबटीत वाटलं. हे चित्र पाहून 'अंधा कानून' या हिंदी पिक्चरमधला रजनीकांत आठवला, असं ही व्यक्ती म्हणाली. मग आपल्यालाही 'अंधा कानून'मधलं आठवलं आणि या व्यक्तीचं म्हणणं पटलं. 'अंधा कानून'मधे अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि रजनीकांत अशी मंडळी आहेत. काही सनसनाटी सूड वगैरे टाइपचं कथानक आहे, असं अंधुक आठवतंय. तर आता ही कादंबरीही सनसनाटी आहे का? होय, आहे. पण तरीही ती 'मनःपूत'पेक्षा चांगल्या बांधणीची आहे, असं आपलं वाचक म्हणून मत पडलं. या कादंबरीत साधारण साठाव्या पानावरच एक खून पडतो, त्याच्या चार-पाच पानं आधी एका स्त्रीच्या देहाचं वर्णन येतं. नंतरही असा मसाला त्यात आहे. पण 'अंधा कानून'इतकं हे सनसनाटी नाहीये. कूळकायद्याच्या पार्श्वभूमीवर एक देशमुख खानदान आणि कुळं यांच्यातल्या संघर्षावरून कादंबरी सुरू होते. पात्रंही काहीशी एकसाची आहेत. त्यामुळं म्हटलं तर वाचायला 'सुलभ' ठरेल अशी ही कादंबरी. तरीही लेखक म्हणून शेळक्यांची काही वैशिष्ट्यं यात जाणवतात. वातावरणनिर्मिती (एका गावातला चौक-तिथलं वातावरण, तिथून सुरू करत मग पात्रांची ओळख), सनसनाटीपणा असला तरी कथानकात आवश्यक सुसंगती ठेवण्याचं भान, ग्रामीण-शहरी तपशिलांमधे आवश्यक ती सफाई, अतिशय प्रवाहीपणे गोष्ट सांगण्याचं कौशल्य- हे सगळं शेळक्यांचं कसब या कादंबरीत आहे.

आधी उल्लेख आलेल्या विशेषांकात अशोक राणा यांनी घेतलेली शेळक्यांची मुलाखतही आहे. यात शेळक्यांना त्यांची स्वतःची कोणती कादंबरी सरस वाटते, असं मुलाखतकारानं विचारलंय. त्यावर शेळके म्हणतात:
"तसं पाहिलं तर कोणत्याही लेखकाला आपली कोणतीही कादंबरी सारखीच, व माझी प्रत्येक कादंबरी आपापल्या परीनं सरस आहेच, पण त्यातल्यात्यात प्रकृतीवैशिष्ट्य, विविधता व नाविन्य तसंच शैली या दृष्टीनं 'अगतिका', 'साहेब', 'लेडिज हॉस्टेल', 'डाळिंबाचे दाणे' या कादंबऱ्या माझे मास्टरपीस आहेत."
'धग'चा उल्लेख यात नसल्याबद्दल मुलाखतकार साहजिकपणे आश्चर्य व्यक्त करतात. तर शेळके म्हणतात:
"धग ही एकमेव कादंबरी श्रेष्ठ नाही. सर्व लोक म्हणतात श्री. शेळके यांची 'धग' ही सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे. खरं तर असं म्हणणाऱ्यांनी माझ्या इतर कादंबऱ्या वाचलेल्याच नसतात. 'धग'पेक्षाही मी सरस लेखन इतर कादंबऱ्यात केलं आहे"
मुलाखत नक्की कोणत्या साली घेतली याचा उल्लेख या अंकात केलेला नाही. पण एकूण मिळून शेळक्यांना फक्त 'धग'चं कौतुक होणं पटत नसल्याचं यात दिसतं. पण आपण वाचक म्हणून आपलं मत तर नोंदवू शकतोच. त्यानुसार आता नोंदीचा शेवट करूया.

शेळक्यांनी वर म्हटलेल्या त्यांच्या इतर बऱ्याचशा कादंबऱ्या रेघेच्या वाचनात आलेल्या नाहीत. त्या बाजारात वा लायब्रऱ्यांमधेही सहजी उपलब्ध होत नाहीत. तरीही 'धग' सोडून 'बाईविना बुवा', 'महामार्ग' या कादंबऱ्या आणि 'शिळान अधिक आठ कथा' हा कथासंग्रह यांना धरून आपल्याला शेळक्यांची लेखकीय कौशल्यं नोंदवता येतील असं वाटतं (तीनही पुस्तकांचे प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन). ही पुस्तकंही रेघेकडे उपलब्ध होती, पण नोंद लिहिताना आपण इथं दुसरीच दोन पुस्तकं मिळवून वापरली. शेळक्यांनी कादंबऱ्या, कथा, लहान मुलांच्या गोष्टी, श्रुतिका, नाटकं, दोन चित्रपट, दोन दूरचित्रवाणी मालिका- असं खरोखरंच प्रचंड लिहिलेलं आहे. त्यांच्या प्रकाशित पुस्तकांची संख्या ११९ किंवा कदाचित अधिक आहे. हे सगळं वाचणं आपल्यासाठी तरी अशक्यच आहे. यातली चाळीसेक पुस्तकं म्हणजे शेळक्यांनी पैशासाठी केलेली भाषांतरं होती. ही भाषांतरं बरीचशी शृंगारकथांची किंवा थरारकथांची होती.

'लेखनकला' आणि 'लेखनकामाठी' असे दोन शब्द मराठीत वापरात आहेत. सर्जनशील प्रेरणेनं केलं गेलेलं लेखन, एवढ्यापुरताच या नोंदीतल्या कलेचा संदर्भ आहे. कामाठी या शब्दाला जातीय संदर्भही असला तरी इथं तो कसबी शारीरिक श्रमांशी संबंधित वापरलेला आहे, एवढ्यापुरतं पाहावं. तर, शेळक्यांनी लेखनकला आणि लेखनकामाठी अशा दोन्ही अर्थांनी लेखन केलेलं दिसतं. आपण त्यांच्या सर्वच कादंबऱ्या वाचलेल्या नसल्या तरी एवढं लक्षात येतं की, त्यांच्या जगण्यात स्थैर्य होतं तेव्हा ते सर्जनशील प्रेरणेनं लिहू पाहात होते. म्हणजे तपोवनमधल्या नोकरीच्या काळात त्यांनी केलेलं लेखन केवळ खपण्याच्या हेतूपेक्षा नवीन काही शोधण्याच्या हेतूनं होतं, असं आनंद पाटील म्हणतात. 'डाळिंबाचे दाणे' या तमाशाजीवनावरच्या कादंबरीसाठी ते स्वतः अनेक ठिकाणी फिरले. कुष्ठरोग्यासंबंधी त्यांना जे अनुभव पाहाता आले, तेही त्यांच्या लेखनात उतरले. 'धग'मधला कौतिकचा नवरा शेवटी कुष्ठरोगी होऊन मिशनऱ्यांसोबत जातो. शिवाय 'अगतिका' कादंबरीतही या अनुभवाचे पडसाद उमटले, असं फाले यांच्या पुस्तकात म्हटलंय. इतर दोन मुलाखतींमधून आपण खुद्द शेळक्यांचं त्यांच्या लेखनाबद्दलचं म्हणणं ओझरतं तरी समजून घेतलं.

रामदास भटकळ यांनी १८ डिसेंबर २००२ साली शेळक्यांवर लिहिलेला एक छोटासा लेख आधी उल्लेख झालेल्या विशेषांकातही वाचायला मिळतो. त्यात शेवटी भटकळ म्हणतात:
"[...] आम्ही शेळक्यांच्या लिहिण्याच्या गतीने पुस्तक काढू शकलो नाही. आमची अडचण व्यावसायिक होती. तर शेळक्यांची व्यावहारिक. त्यांनी अमरावतीची नोकरी सोडली होती आणि फक्त लेखनावर ते उपजीविका करणार होते. दरमहा काही तरी छापलं जाऊन त्याचे पैसे मिळणं आवश्यक होतं. त्यांचा माझा स्नेहाचा धागा बळकट असल्यामुळे आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ शकलो. मधल्या काळात त्यांनी जबरदस्तीने जे लिहावं लागलं ते इतरत्र प्रसिद्धीस दिलं. पुढं पुन्हा आत्मविश्वासानं त्यांनी 'खंजिरीचे बोल' (तुकडोची महाराजांवरील कादंबरी), 'मनःपूत' (पु.भा. भावे यांच्या जीवनावरील कादंबरी) या चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या. तेव्हा ते पुन्हा पॉप्युलरकडे आले. त्यांची शेवटची कादंबरी 'महामार्ग'. त्यांच्यातील थोर कादंबरीकाराची खूण पटवत होती. इतक्यात ते गेले."
उद्धव शेळके यांची पत्नी प्रेरणा शेळके यांनी रेघेशी बोलताना (मार्च २०१७) रामदास भटकळ यांचं कौतुक केलं. भटकळांनी मानधनाच्या बाबतीत चोखपणा ठेवला, त्याचा फायदा आपल्याला झाल्याचं त्या म्हणाल्या. शिवाय 'नॅशनल बुक ट्रस्ट'नं विविध भारतीय भाषांमधे 'धग'चं भाषांतर केलं, त्याचंही मानधन अडचणीच्या काळात उपयोगी पडलं. 'हे जे सगळं आहे (म्हणजे शेळक्यांनी अमरावतीत घेतलेली जमीन, त्यावर उभं केलेलं घर, मग बाकी काही मालमत्ता) ते 'धग'मुळंच आहे', असं त्या म्हणाल्या. म्हणजे त्या-त्या वेळी उदरनिर्वाहासाठी शेळक्यांनी 'पॉप्युलर' रूचीला भावणारं लिखाण केलं असलं तरी त्यांना दीर्घकाळ टिकणारा आर्थिक आधारही 'धग'नं दिला, असं यावरून दिसतं.

तर, असे हे उद्धव शेळके ३ एप्रिल १९९२ रोजी वारले. म्हणजे आज त्यांचा पंचविसावा स्मृतिदिन आहे. शेळक्यांची मुख्य स्मृती वाचकांना 'धग'मुळं राहील बहुधा. त्यांचं उर्वरित बहुतांश लिखाण तात्कालिक निकडीतून झालेलं असेलही. पण त्यातलं काही ना काही मोजकं निवडक लिखाण 'धग'च्या जवळपास येणारं तरी असेल, असं वाटतं. म्हणजे 'धग'शिवायही इतर काही कथा, काही मोजक्या कादंबऱ्या अजूनही शेळक्यांची आठवण ठेवण्यासाठी आधाराच्या असतील असं वाटतं. यांचं प्रमाण त्यांच्या एकूण लेखनाच्या तुलनेत अर्थातच कमी असणार. पण जे काही निवडक असेल, ते पुन्हा बाजारात आलं तर बरं होईल. 'धग' आणि बहुधा 'बाईविना बुवा' या कादंबऱ्यांचं स्थान 'लेखनकले'च्या अंगानं मान्य होत असेल, असं वाटतं. बाकी, जगण्यासाठी शेळक्यांनी 'लेखनकामाठी'ही केली, हे कमी महत्त्वाचं आहे, असं आपल्याला वाटत नाही. आपण त्यांचं जे काही साहित्य वाचू त्यावर मत बनवण्याचा अधिकार वाचक म्हणून आपल्याला आहेच, त्यात लेखकाच्या चरित्राची- किंवा लेखकाचं स्वतःच्या साहित्याबद्दलचं म्हणणं काय आहे याची- काही गरज आपल्याला नाही. पण लेखकाच्या चरित्राबद्दल बोलताना मात्र केवळ आपली मतं त्यावर लादणंही बरोबर वाटत नाही. तसं तर लेखनकलेतही काही वेळा कामाठी गरजेची ठरते नि लेखनकामाठीतही काही ना काही कला तर असतंच असेल.

उद्धव शेळके
(८ ऑक्टोबर १९३० - ३ एप्रिल १९९२)

१७ मार्च २०१७

शकु नी. कनयाळकर यांचा 'थोडाबहुत काफ्का'

'शकु नी. कनयाळकर' या पूर्ण नावातलं पहिलं नाव 'शकु' आहे, त्यामुळं हे सगळं नाव एखाद्या स्त्रीचं आहे, असं आपल्याला मानायला लागेल. आणि मग या नावाच्या व्यक्तीनं एखादं पुस्तक लिहिलं असेल, तर तिला 'लेखिका' असं संबोधून नोंद करावी लागेल. तर या लेखिकेनं 'थोडाबहुत काफ्का' असं एक पुस्तक लिहिलेलं आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात हे पुस्तक अचानक एका दुकानात समोर आलं. चुकून दुकानाच्या आवराआवरीत दुकानवाल्यांकडून ते बाहेर दिसणाऱ्या गठ्ठात राहून गेलेलं. नायतर तसं हे पुस्तक आता सारखं कुठं दिसण्यातलं राहिलं नाहीये. या पुस्तकाच्या लेखिकेच्या नावापुरताच विचित्रपणा संपत नाही, पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पुस्तकाचं किंवा लेखिकेचं नाव दिलेलं नाही, हा विचित्रपणाचा आणखी एक भाग. अख्ख्या आवरणाचं छायाचित्र असं आहे:

नवी क्षितिजे प्रकाशन, १९९३

पुस्तकाच्या कण्यावर बहुतेकदा दिलं जातं त्याप्रमाणे पुस्तकाचं नाव, लेखिकेचं नाव आणि प्रकाशकाचं नाव मात्र लिहिलंय. बाकी मुखपृष्ठावर फक्त काफ्काचा चेहरा आणि मागच्या बाजूला हे जर्मन भाषेत लिहिलेले शब्द असल्याचं आपल्याला ताडता येतं. ते जर्मन शब्द म्हणजे 'अ हंगर आर्टिस्ट' या काफ्काच्या गोष्टीचं जर्मन नाव असेल, हेही प्राथमिक दिसण्यातून कळू शकतं.

'शकु. नी कनयाळकर' हे नाव मात्र मराठी वाटूनही खरंखुरं वाटत नाही. म्हणून त्यासंबंधी शोधाशोध केली. तर, 'ग्रंथालय-डॉट-ऑर्ग' या संकेतस्थळावरच्या यादीत हे पुस्तक होतं. वाईच्या लोकमान्य टिळक ग्रंथालयात याची प्रत असल्याचं या संकेतस्थळावरच्या नोंदीत लिहिलंय. शिवाय, 'ऐसी अक्षरे' या संकेतस्थळावरच्या एका चर्चेमधे 'धनुष' या आयडीनं या लेखिकेचा नि पुस्तकाचाही उल्लेख केल्याचं दिसलं. काफ्काच्या 'द ट्रायल' कादंबरीचं मराठी भाषांतर म्हणून 'थोडाबहुत काफ्का' या पुस्तकाचा सदर चर्चेत उल्लेख झालेला दिसतो.

काफ्काच्या 'द ट्रायल' या कादंबरीचं मराठी भाषांतर 'थोडाबहुत काफ्का' या पुस्तकाचा एक भाग म्हणून येतं. आणि आहे ते भाषांतरही पूर्णच्यापूर्ण नाहीये. काही ठिकाणी काही वाक्यं गाळलेली आहेत. रेघेकडं उपलब्ध असलेल्या 'ट्रायल'च्या इंग्रजी आवृत्तीसोबत (पेंग्वीन बुक्स, मॉडर्न क्लासिक्स मालिका, २०००) आपण हे मराठी भाषांतर ताडून पाहिलं. मराठी भाषांतरासोबत त्यात काही भाग गाळण्यात आल्याचा उल्लेख नसला, तरी अधेमधे बराच भाग या भाषांतरात गाळलेला आहे. थोड्या अंदाजासाठी उदाहरणादाखल खाली रोमन लिपीत इंग्रजी परिच्छेद आणि त्यासोबत मराठी भाषांतरातला मजकूर असं तुलनेसाठी दिलं आहे. इंग्रजीतली गाळली गेलेली वाक्यं अधोरेखित केली आहेत.

'के.' या पात्राला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नाश्ता खायच्याऐवजी निराळ्याच लोकांना सामोरं जावं लागतं. त्याच्या खोलीत आलेले हे वॉर्डर त्याला अटक झाल्याचं सांगतात, अशी सुरुवात. दारावर ठकठक झाल्यावर एक माणूस आत येतो. तो 'के.'च्या ओळखीचा नसतो. यासंबंधी इंग्रजी आवृत्तीतला मजकूर असा:
"Instantly there was a knock at the door and a man he had never before seen in the house came in. He was slim but solidly built, he wore a close-fitting black suit which was provided, in the manner of travelling outfits, with various pleats, pockets, buckles, buttons and a belt, and which consequently seemed eminently practical, though one could not be quite sure what its purpose was. 'Who are you? asked K'". 
या मजकुराचं मराठीत येताना असं झालं आहे:
"तत्क्षणी दरवाजावर ठकठक झालं आणि एक माणूस आत आला. त्याला के.नं यापूर्वी कधी पाहिलेलं नव्हतं. त्यानं काळा सूट घातला होता. झटकन बिछान्यावरून उठून बसत के.नं विचारलं, "कोण तू?"" (पान ११३)

नंतर, के.चा नाइटगाउन वगैरे हे वॉर्डर लोक तपासतात. आता त्याला दुसरे कपडे वापरावे लागतील, त्याचे मूळचे कपडे आपण ताब्यात घेऊ, मग खटला वगैरे जिंकला गेला तर हे सामान के.ला परत मिळेल, असं ही मंडळी के.ला सांगतात. या संदर्भातला मजकूर येताना इंग्रजीत एका वॉर्डराच्या पोटाचाही उल्लेख येतो:
"[...] the belly of the second warder- they could of course only be warders- bumped into him again and again in quite a friendly fashion, but when he looked up he saw that this fat body was out of keeping with the dry bony face, its prominent nose bent to one side, which was exchanging glances with the other warder over his head."  
हे वर्णन मराठी मजकुरात आलेलं नाही.

सकाळपासून आपल्यासोबत घडत असलेल्या घडामोडींचा अंदाज के.ला येत नसतो. मग त्याला वाटतं की, आज त्याचा तिसावा वाढदिवस म्हणून बँकेतल्या मित्रमंडळींनी आपली चेष्टा चालवली असावी. यासंबंधीचा इंग्रजीतला मजकूर असा:
"K. saw a very slight danger that people might say later he could not take a joke but, even though it had not been usual foe him to learn from experience, he now recalled certain incidents, not important in themselves, when, unlike his friends, he had deliberately set out to behave rashly without the slightest regard for possible consequences and had suffered as a result. This was not to happen again, not this time anyway; if this is just a bit of make-believe, he would go along with it." 
याला समांतर असलेला मराठी भाषांतरातला मजकूर असा:
"यात एक धोका के.ला जाणवला: त्याचे मित्र कदाचित म्हणतील की त्याला थट्टामस्करी कळतच नाही. अनुभवानं शिकण्याची सवय त्याला नव्हती. पण इतःपर ते घडू देता कामा नये. निदान या वेळी तरी." (पान ११४).

अशी अर्थातच आणखीही अनेक उदाहरणं पाहता येतील. यातल्या पहिल्या नि दुसऱ्या उदाहरणांमधे वर्णनं गाळली गेली आहेत. त्यासंबंधी आत्ता आपण काही नोंदवूया नको. पण यातला खासकरून पहिल्या उदाहरणातला तपशील कादंबरीच्या एका धाग्यासाठी महत्त्वाचा आहे, तो असा: "which consequently seemed eminently practical, though one could not be quite sure what its purpose was." प्रॅक्टिकल असेलही पण त्याचं पर्पज काय ते कळेना, हे काफ्काच्या गोष्टीसाठी आधाराचं सूत्र आहे. त्यानंतर तिसऱ्या उदाहरणात आलेला 'if this is just a bit of make-believe, he would go along with it' हा उल्लेखही असाच कादंबरीचा महत्त्वाचा धागा आहे असं वाटलं. हे सोंग असेल तरी त्यात सहभागी व्हायचं के.नं ठरवलं, हे खास काफ्काच्या जगातलं म्हणणं आहे. असे काही महत्त्वाचे धागेच काढल्यानं मराठीत ही कादंबरी उसवलेली गेलेय, असं वाटलं.

'थोडाबहुत काफ्का' हे पुस्तक एकूण २५९ पानांचं (छायाचित्रांची वगैरे सोळाएक पानं वेगळी जास्तीची) आहे. 'नवी क्षितिजे प्रकाशना'नं १९९३ साली काढलेलं पुस्तक २०० रुपयांना आहे. साधारण तेवीस वर्षांपूर्वीच्या हिशेबानं पाहिलं तर पानांच्या तुलनेत किंमत जास्त वाटू शकेल. पुस्तकाचा साधारण नकाशा असा: दोन पानांवर पसरलेला एकोणिसाव्या शतकातल्या प्रागचा नकाशा, त्यानंतर दोन पानांवर पसरलेला काफ्काच्या वंशावळीचा तक्ता, त्यानंतर फ्रान्झ काफ्काची, त्याच्या घरच्यांची, त्याच्या इतर काही जवळच्या व्यक्तींची, आणि त्याच्या जवळच्या रस्त्यांची व ठिकाणांची छायाचित्रं- असा भाग पुस्तकाच्या सुरुवातीला आहे. त्यानंतर 'जडणघडणीची वर्षं' (पान १ ते ४२), 'निमित्तमात्र फेलिस' (पान ४३-१११) आणि 'द ट्रायल' (पान ११२-२३५) हे पुस्तकाचे तीन मुख्य भाग येतात.

हा मजकूर वाचनीय पद्धतीनं लिहिलेला आहे. काफ्काचं चरित्र, त्याचं फेलिससोबतचं नातं, आणि साहजिकपणे त्या नात्यातून नि काफ्काच्या मनस्थितीतून 'ट्रायल'चं लेखन झालं, इत्यादी तपशील एकमेकांना जोडून या पुस्तकात दिला आहे. कादंबरीचा मजकूर असलेला भाग झाल्यावर परिशिष्टं आहेत, ती अशी: एक- 'बिफोर द लॉ' : काही टिपणं, दोन- चरित्रपट, तीन- कथा-कादंबऱ्यांची मूळ जर्मन शीर्षकं, चार- प्रकाशित साहित्य.

यातलं 'बिफोर द लॉ: काही टिपणं' हे पहिलं परिशिष्ट विश्वास पाटील यांनी लिहिलेलं आहे. हे विश्वास पाटील म्हणजे 'नवी क्षितिजे' नावाचं त्रैमासिक चालवलेले, नित्शे, मार्क्स, फ्रॉइड इत्यादींवर पुस्तकं लिहिलेले. साधारण इतरांच्या लेखनातील उल्लेखांवरून कळतं त्यानुसार बरंच वाचलेले आणि बरीच पुस्तकं राखून असलेले हे गृहस्थ होते. त्यांची नित्शे व मार्क्स यांच्यावरची पुस्तकं रेघेला तितकीशी भावली नाहीत. त्यामधेही क्वचित काही निरीक्षणं व मतं रोचक होती, पण संदर्भांचा अभाव वाटला. त्यामुळं एखाद्या निरीक्षणाबद्दल, आशयाबद्दल शंका पडली, तर शोधायला काहीच मार्ग दिसत नाही. पण हा आपला विषय नाही, आणि आपण काही यात खोदकामही केलेलं नाही, त्यामुळं हे आपल्या मर्यादेवर सोडून पुढं जाऊ.

'थोडाबहुत काफ्का' हे लक्ष वेधून घेणारं पुस्तक वाटलं. चरित्राच्या भागात लिहिलेला मजकूर वाचनीय वाटला. काफ्काशी प्राथमिक ओळख करून देणारं हे पुस्तक आहे. 'द ट्रायल'च्या भाषांतराबद्दल काय वाटलं ते आधी लिहिलं आहेच. पुस्तकाच्या नावातंच 'थोडंबहुत' असणं नोंदवलेलं असल्यानं हे संक्षिप्त भाषांतर केलेलं असावं. पण तशी नोंद पुस्तकात स्पष्टपणे केलेली नाही. शिवाय, हे संक्षिप्त असलं तरी खूप जास्त संक्षिप्तही नाहीये, त्यामुळं पूर्णच भाषांतर असावं, असं वाटण्याची शक्यता वाढते. मधेमधे काही भाग कमी करण्यात आलेले आहे, त्यासंबंधीची तीन उदाहरणं आपण नोंदवली आहेत. बाकी, चरित्रातील लेखनासंबंधीचे संदर्भ दिलेले नाहीत, पण त्याचीही सूचना करणाऱ्या (तुकारामांच्या अभंगातल्या) ओळी पुस्तकाच्या सुरुवातीला नोंदवलेल्या आहेत:
फोडिलें भांडार धन्याचा हा माल।
मी तंव हमाल भारवाही।।

प्रत्येक मालाचा मूळ भांडारातील तपशील देणं शक्य नसलं, तरी साधारण कुठकुठली भांडारं धुंडाळली ते नोंदवलं तर बाकीच्या हमालांना काही आधार मिळतो, शिवाय आपल्या भारवाहीपणात काही कमी-जास्त राहिलं असेल तर ते पुढच्या हमालांना तपासता येतं, असं वाटलं.

याबाबतीत एक मुद्दा नोंदवायला हवा. केवळ व्यावसायिक हिशेबानं निघणारी काही पुस्तकं भाषांतराच्या वेळीच संक्षिप्त करण्यासंबंधीची सूचना प्रकाशकच भाषांतरकाराला करण्याची शक्यता असते, असं एक रेघेला लक्षात आलेलं आहे. काही वेळा ही मंडळी संक्षिप्तपणाचा उल्लेख करतात, काही वेळा करत नाहीत. काही वेळा संपादक व्यक्ती स्वतःच्या मनानुसार काही बदल करते, तेव्हा अशा काही उल्लेखांची जबाबदारी आपल्यावर असते हे संपादकीय भान ती व्यक्ती ठेवतही नाही. काही वेळा उल्लेख करणार असल्याचं आधी म्हणतात, नंतर तसा उल्लेख केलेला नसतो. इत्यादी अनेक मुद्दे बाजाराचे म्हणून असतात. हेही काही बरोबर नाहीच, पण 'थोडाबहुत काफ्का' हे तसं व्यावसायिक हेतूला प्राधान्य देणारं पुस्तक दिसत नाही. त्यामुळं खरंतर त्यातले उल्लेख अधिक मोकळेपणानं करणं जास्त शक्य असायला हवं, असं वाटतं.

दरम्यान, या शकु. नी कनयाळकर या बाईंचा म्हणजे हे टोपणनाव कोणी घेतलं याचा शोध घ्यावा, असंही वाटलं. आपण नोंदवलेल्या शंका त्यांना विचारता आल्या असत्या. म्हणून काही शोधाशोध नेटवर करू पाहिली. 'नवी क्षितिजे' व 'विश्वास पाटील' ही नावं शोध घेण्यासाठी सोईची होती. विश्वास पाटील वारल्यावर त्यांच्याबद्दल 'लोकसत्ता' या वर्तमानपत्रात आलेला एक लेख या शोधात सापडला. 'विश्वास पाटील: ज्येष्ठ अभ्यासक, अभिजात वाचक' अशा शीर्षकाचा हा लेख होता. हा लेख लिहिलेले हरिश्चंद्र थोरात यांच्याकडं यासंबंधी माहिती असेल, असं वाटलं. म्हणून मग त्यांचा ई-मेल पत्ता मिळवून त्यांना या 'थोडाबहुत काफ्का'बद्दल विचारणा केली. तर, यासंबंधीची माहिती प्रदीप कर्णिक यांना असू शकेल, असं त्यांनी सुचवलं आणि कर्णिक यांचा संपर्क दिला. कर्णिक यांना ई-मेलद्वारे विचारणा केली, तर जया दडकर यांनी हे पुस्तक लिहिल्याचं कर्णिक म्हणाले. दडकरांची काही पुस्तकं मौज प्रकाशनानं काढलेली आहेत, त्यामुळं त्यांच्या ऑफिसात फोन केला, एक वाचक असल्याचं सांगितलं, आणि दडकरांचा नंबर मागितला. नंबर मिळाला. दडकर यांच्या एका कामाचा उपयोग आपण 'श्री. दा. पानवलकर' यांच्यासंबंधीच्या कात्रणवहीसाठी मोठ्या प्रमाणात केला होता. पण तेव्हा परवानगीसाठी त्या भांडाराच्या प्रकाशकांची फोनवरून परवानगी घेतली होती. तेव्हा दडकरांचा संपर्क मिळाला नव्हता. तो वेगळा विषय झाला. आता  रेघेनं दडकर यांना फोन करून 'थोडाबहुत काफ्का'संबंधी विचारलं. तर हे पुस्तक आपणच 'शकु. नी कनयाळकर' या टोपणनावानं लिहिल्याचं दडकरांनीही सांगितलं. पुस्तकात 'द ट्रायल' कादंबरीचं संक्षिप्त भाषांतर देण्याबद्दल त्यांना विचारलं तर ते म्हणाले, 'ते प्रचंड मोठं होत होतं. आधीच मराठीत वाचक कमी.. त्यात असलेले कमी वाचतात'. विविध कारणांमुळं फोनवर याहून जास्त बोलणं होऊ शकलं नाही. 'शकु नी. कनयाळकर' या नावाचे संदर्भ काय, हेही आपण विचारलं. पण सहजच हे टोपणनाव घेतलं, एवढंच दडकर म्हणाले. या शोधामधे संबंधित व्यक्तींनी रेघेशी परिचय नसतानाही मदत केल्याबद्दल आभार. हे गेल्या वर्षी जूनमधे घडलं होतं, पण विविध कारणांमुळं नोंद थोडी उशिरा होते आहे.

शेवटी दोनच मुद्दे: एक, या पुस्तकाची नवीन आवृत्ती कोणाला काढावी वाटली, तर चांगलं होईल. फक्त त्यात सुरुवातीला 'द ट्रायल'चं भाषांतर संक्षिप्त स्वरूपात असल्याचं नोंदवता येईल. योग्य वाटलं तर. दोन, 'निवडक काफ्का' असं एक लहानसं पुस्तक (संपादन-अनुवाद- नीती बडवे) साहित्य अकादमीनं काढलेलं आहे. त्यात काफ्काचे काही वेचे, गोष्टी, 'वडिलांना पत्र' इत्यादी मजकूर आणि त्याची काही चरित्रात्मक माहिती आहे. शिवाय, त्र्यं.वि. सरदेशमुखांनी 'काफ्काशी संवाद' (पद्मगंधा प्रकाशन) असं गुस्ताव यानुशच्या बारक्याशा पुस्तकाचं भाषांतर केलं आहे. शिवाय, काफ्काच्या कादंबऱ्यांची किंवा त्यावर आधारीत नाट्यरूपांतरंही असल्याचं दिसतं. पण 'थोडाबहुत काफ्का'इतकं तपशिलातलं काफ्काविषयीचं पुस्तक मराठीत बहुधा नाहीये. असेल तर रेघेच्या मर्यादित माहितीमधे ते दिसलेलं नाही.

०६ मार्च २०१७

लालसू नोगोटी यांची मुलाखत

अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गडचिरोली जिल्हापरिषदेत सदस्य म्हणून निवडून गेलेल्यांमध्ये सैनू गोटा व लालसू नोगोटी या खास उमेदवारांचाही समावेश आहे. यांचं वैशिष्ट्य काय, तर हे थेट ग्रामसभांनीच उभे केलेले उमेदवार होते. म्हणजे त्यांना कोणत्याही पक्षानं उमेदवारी दिलेली नव्हती, किंवा तसे ते सुटे अपक्ष उमेदवार म्हणूनही उभे नव्हते. ते ग्रामसभांचे प्रतिनिधी म्हणून (अपक्ष) निवडणूक लढत होते. यातील नोगोटी यांचा आरेवाडा-नेलगुंडा मतदारसंघातून विजय झाला, तर गोटा यांनी गट्टा-पुरसलगोंदी या मतदारसंघातून विजय मिळवला. राष्ट्र-राज्य अशा विविध पातळ्यांवर चाललेल्या घडामोडी व चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही घटना लक्षणीय आहे. खासकरून गडचिरोलीतल्या प्रस्तावित खाणप्रकल्पांना होणाऱ्या विरोधातून ग्रामसभांनी उमेदवार उभे करण्यासाठी पुढाकार घेतलेला असला, तरी या सर्व घटनांमागं आणखीही काही अर्थ असतातच. या पार्श्वभूमीवर लालसू नोगोटी यांच्याशी रेघेनं फोनवरून संवाद साधला. (प्रभू राजगडकर यांनी संपर्कासाठी मदत केली). चार मार्च २०१७ रोजी नोगोटी यांची रेघेनं फोनवरून घेतलेली मुलाखत पुढं दिली आहे. यात अर्थातच आणखी विविध प्रश्न व उत्तरं यायला हवीत, अनेक मुद्द्यांवर आणखी चर्चा व्हायला हवी. स्थानिकांचं आणखी म्हणणं मोठ्या प्रमाणात नोंदवलं जायला हवं. सध्या, प्राथमिक पार्श्वभूमीसाठी ‘गडचिरोली वार्ता’ या संकेतस्थळावरचा ‘मूठभर तांदूळ आणि २० रुपये मागून ‘ते’ जिंकले जिल्हापरिषदेची निवडणूक!’ हा वार्तालेख वाचता येईल. आपण यापूर्वी आपल्या मर्यादेमधे प्रत्यक्ष दिसलेल्या गोष्टींच्या काही नोंदी रेघेवर केलेल्या आहेत, त्यातली 'भारतीय प्रजासत्ताकाची बस व ‘पेसा’' (२६ जानेवारी २०१६) ही नोंद या संदर्भात सवडीनुसार वाचता येईल. आणि ९ ऑगस्ट २०१५ रोजी केलेली 'आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस । एक प्रसिद्धी-पत्रक' ही नोंदही चाळता येईल. याशिवायही काही आसपासच्या नोंदी आहेत, त्या सगळ्या नोंदींच्या पार्श्वभूमीवर आता नोगोटी यांची मुलाखत नोंदवूया. 
 *
लालसू नोगोटी
लालसू नोगोटी यांनी दहावीपर्यंत हेमलकशामधील लोकबिरादरी प्रकल्पाच्या शाळेत शिक्षण घेतलं, त्यानंतर बारावीपर्यंत वरोऱ्यातील आनंदवन इथं ते शिकले. नंतर, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी मराठी विषयामधे बी.ए. केलं. पुढं आय.एल.एस. लॉ कॉलेजात कायद्याची पदवी घेतली. दरम्यान, टिळक महाराष्ट्र विद्यापिठातून पत्रकारितेचं पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षणही घेतलं. शिवाय, त्यांनी समाजशास्त्रातही एम.ए. केलेलं आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठानं फिलिपाइन्स इथं २०११ साली घेतलेला मानवाधिकारासंबंधीचा एक आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम त्यांनी केलेला आहे. आणि अलीकडेच संयुक्त राष्ट्रांतर्फे आदिवासी तरुणांकरिता दिल्या जाणाऱ्या अभ्यासवृत्तीसाठी त्यांची निवड झाली असून जून-जुलै २०१७मध्ये ते यासाठी जीनिव्हालाही जाणार आहेत. छत्तीस वर्षांचे नोगोटी भामरागडमधील जुव्वी या त्यांच्या मूळ गावी राहतात.
 *
प्रश्न: ‘लोकशाही’ या शब्दाबद्दल तुम्हाला काय वाटतं?
नोगोटी: लोकांनी, लोकांसाठी, लोकांच्या वतीनं वगैरे व्याख्या लोकशाहीसाठी दिल्या जातात. सर्व मोठमोठे पक्ष, त्यांचे उमेदवार हे सतत लोकांसोबत नसतात. लोकांच्या समस्या त्यांच्यासोबत समजून घेण्याचं काम हे नेते करत नाहीत. हे नेते काय निर्णय घेतात, काय काम करतात, हे लोकांना माहिती नसतं, प्रत्यक्ष त्याचं काम लोकांना माहीत नसतं. पण आपला प्रतिनिधी- ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतचा प्रतिनिधी- काय काम करतोय, हे माहीत असलं पाहिजे. नाहीतर नेते तिकडे काहीतरी निर्णय घेतात, आमच्याविरोधातले कायदेही करतात, पण ते इथल्या लोकांना माहिती देऊन केलेलं नसतं. मोठ्या पक्षांचे उमेदवार हे लोकांचे प्रतिनिधी असण्यापेक्षा पक्षांचेच प्रतिनिधी उरतात. निवडून आल्यावरही नेत्यांवर लोकांचं नियंत्रण असायला हवं. आमच्यावर आता ग्रामसभांचं असं नियंत्रण असेल. ग्रामसभांसोबतच्या संवादातूनच आम्ही निर्णय घेऊ.

प्रश्न: ‘विकास’ या शब्दाविषयी तुम्हाला काय वाटतं?
नोगोटी: विकास म्हणजे रस्ते आले पाहिजेत, घरात टीव्ही आला पाहिजे, असं नाही. मी माडिया आहे, माडियात मला व्यवस्थित बोलता येतं, मी तुमच्याशी बोलतोय ही माझ्यासाठी फॉरेन लँग्वेज आहे. माझे विचार मी माडिया भाषेत व्यवस्थित सांगून शकेन, तरीही मी भामरागडच्या चौकात मराठीत बोललो, तर मी विकसित झालो असं लोक म्हणतील. इंग्रजीत बोललो तर विकसित झालं असं बोलतील. म्हणजे माडिया विसरलो की विकास झाला, असं लोक म्हणतील. पण विकास म्हणजे काय? विकास म्हणजे आपल्या आजूबाजूच्या नैसर्गिक संसाधनांमधून समृद्धता आली पाहिजे. संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टींमधून ही समृद्धता आली पाहिजे. प्रॉपर्टी म्हणजे पैसा, अशी आमची संकल्पना नाही. घरासमोर दोन ताडीचे झाड पाहिजे, बैल-बकरी पाहिजे, अशी इथल्या लोकांची प्रॉपर्टीची संकल्पना आहे. रस्ता आली की माणूस विकसित होतो असं नाहीये. विकासाची संकल्पना त्याही पुढं जाऊन पाहिली पाहिजे. विचाराचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. स्वतःचं मत काय, आत्ताची आपली गरज काय, हे सगळं व्यक्त करता आलं पाहिजे. आमच्या इथं ‘गोटूल’ (विविध सामूहिक चर्चा-कार्यक्रमांसाठी नेमलेली एक खुली जागा) असतं, तर सरकार काय करतं, विकासाच्या नावाखाली या गोटुलला चार भिंती न् स्लॅब टाकून बंदीस्त करून टाकतं, खुर्चीत बसून बोला, वगैरे सांगतात. पण गोटूल हे एक ‘डेमोक्रॅटिक कम्युनिकेशन सेंटर’ आहे असं मी म्हणतो. तिथं अनौपचारिकपणे लोक बोलतात. ही अनौपचारिकता घालवण्याला विकास म्हणता येणार नाही.

प्रश्न: ‘संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टींमधून समृद्धता आली पाहिजे’, असं तुम्ही म्हणालात. बाहेरची संस्कृती व आपली संस्कृती यांच्यातला संघर्ष आणि उतरंड, हा मुद्दा आपण बोललो. अशा वेळी आपल्याच संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टींसोबत येणाऱ्या वाईट वाटणाऱ्या गोष्टींशी कशा प्रकारे वाटाघाटी कराव्यात, असं तुम्हाला वाटतं?
नोगोटी: काही उदाहरणं सांगतो. आमच्याकडं हुंडापद्धती नाही. मुलगी जन्मली की तिच्यामुळं आपले संबंध वाढतात, अशा विचारानं लोक आनंदी होतात. पण त्याच वेळी मासिक पाळीच्या वेळी बायकांनी घराबाहेर निराळ्या जागेत राहायची पद्धत आमच्याकडे आहे. यातून काही समस्या निर्माण होतात. दोनच दिवसांपूर्वी झालेली एक घटना सांगतो. नेलगुंडा गावातल्या शाळेमधे एक शिक्षिका मासिक पाळीच्या वेळीही शाळेत येते, यावर काही गावकऱ्यांनी आक्षेप घेतला. ही बाई मासिक पाळीच्या वेळीही शाळेत येत असल्यानं गावात रोगराई पसरते, असं काही लोक बोलत होते. दरम्यान, निवडणुकीतला आमचा विजय लोक स्वतःहून साजरा करत होते, पक्षांचे उमेदवार निवडून आल्यावर पैसे खर्च करून, फटाके फोडून उत्सव केला जातो. इथं आमच्या विजयावर लोक स्वतःहून गावागावांमधून आनंद व्यक्त करत होते, ढोल वाजवत होते, गोटूलमधे नाचत होते. अशा वातावरणात मी नेलगुंडामधे गेलो तेव्हा तिथल्या लोकांशी शाळेतल्या शिक्षिकेच्या मुद्द्यावर बोललो. त्यावर गावातल्या पुजारी व्यक्तीनं यासंबंधी तक्रार केल्याचं या लोकांनी सांगितलं. पण आता यासंबंधी आपल्याला आडमुठं राहून चालणार नाही, मासिकपाळीसाठी सुट्टीची तरतूद नसते, त्यामुळं त्या शिक्षिकेला शाळेत यावंच लागेल, तिला येऊ द्यायला हवं, असं मी त्यांना समजावलं. त्यांनाही ते पटलं. अशा पद्धतीनं हा मुद्दा सुटला. असे इतरही अनेक लहान-मोठे मुद्दे आदिवासी समाजांतर्गत सोडवले जायला हवेत. यावरही आम्ही विचार करतो आहोतच. बदलत्या युगामधे काही गोष्टी बदलायला हव्यातच. फक्त सगळं कोलॅप्स न करता काय करता येईल, असा विचार मी करत असतो.

प्रश्न: सीजी-नेट-स्वरा या मोबाइल रेडियोचा प्रयोग करणाऱ्या संकेतस्थळाशी तुम्ही जोडलेले होतात, त्या संदर्भाला धरून एकूण प्रसारमाध्यमांच्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं?
नोगोटी: लॉ करत असताना मी पत्रकारितेचा डिप्लोमा, नंतर बीजे (बॅचलर ऑफ जर्नलिझम), एमजे (मास्टर ऑफ जर्नलिझम) हेही अभ्यासक्रम केले. त्यामागं माझे हेतू हेच होते. आदिवासी किंवा एकूणच ग्रामीण समाज हा शहरी समाजापेक्षा संख्येनं मोठा आहे. पण गावातल्या लोकांबद्दल खूप कमी लिहिलं जातं. अजिबात नाही असं नाही. पण खूपच कमी माहिती दिली जाते. त्यातही आदिवासी भाषा, संस्कृती याबद्दल शहरी अँगलनी लिहिलेलं असतं. ज्या व्यक्तीची समस्या आहे, प्रश्न आहेत, ती व्यक्ती स्वतः कधीच बोलताना दिसत नाही, ती व्यक्ती लिहीत नाही, ती बोलतच नाही. टीव्ही वगैरेमुळं पीडीत व्यक्तीचं म्हणणं थोडंथोडं येतं. पण भामरागडबद्दल किंवा जुव्वीमध्ये घडलेल्या घटनेबद्दल लिहिणारा गडचिरोलीत किंवा दुसऱ्या शहरात बसलेला असतो. त्याला स्थानिक माहिती नसते. नक्षलवादींनी इतक्यांना मारलं आणि पोलिसांनी इतक्यांना मारलं, एवढेच आकडे तो पत्रकार लिहितो. पण या पाठीमागं खूप अर्थ असतात. ते कधीच बोलले जात नाहीत.

प्रश्न: हे हिंसेच्या आकडेवारीमागचे अर्थ काय असतात, असं तुम्हाला वाटतं?
नोगोटी: पोलीस लोक काय करतात, नक्षलवाद्यांना जेवण देता म्हणून बेकायदेशीर अटक करतात, मारतात, अत्याचार करतात. खाणप्रकल्पांना विरोध केला तरी नक्षलसमर्थक म्हणून शिक्का मारतात. इथली परिस्थिती वेगळी असते. बाहेरून येणारे तरुण पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) किंवा दुसरे अधिकारी यांना आदिवासी संस्कृतीची, इथल्या गरजांची माहिती नसते. आम्ही पंडुमसाठी (एक प्रकारचा उत्सव) जंगलात जेवण बनवत असलो, तरी नक्षलवाद्यांसाठी जेवण बनवत असल्याचा आरोप करून ते ताब्यात घेतात. शिवाय, इथं परिस्थिती वेगळी असते. इथं राहणाऱ्या व्यक्तीसमोर काही पर्याय नसतो. इकडंही बंदूक आहे आणि तिकडंही बंदूक असते.

प्रश्न: आता जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणार आहात?
नोगोटी: पेसा कायदा, वनाधिकार कायदा यातून ग्रामसभांना त्यांच्या नैसर्गिक संसाधनांवरचा मालकीहक्क दिलेला आहे. हा संपूर्ण एरिया- भामरागड, एटापल्ली, कोरची, धानोरा, हा बराचसा अनटच्ड आहे. इथं खनिजं आहेत, जंगल आहे. लोकांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. जंगलाशिवाय हा समाज जिवंत राहू शकणार नाही. यांची संपूर्ण संस्कृती निसर्गपूजक आहे. दगड, नदी, नाले, अशा अनेक गोष्टी, जिथं पाणी आहे, अशा गोष्टींना हे लोक पूजतात. या स्त्रोतांमधून आपण जिवंत आहोत. यामुळंच आपण जिवंत आहोत. त्यामुळं हे त्यांना पूजतात. अशा परिस्थितीत सरकार विकासाच्या नावाखाली जंगल, पहाडी इथं खाणप्रकल्प मंजूर करतं. पंचवीसहून जास्त प्रकल्प या ठिकाणी प्रस्तावित आहेत. ग्रामसभांच्या माध्यमातून लोक याला विरोध करत आहेत. आता न्यायालयात याचिका टाकण्याचाही आमचा विचार आहे. या शिवाय, इथल्या शाळांमधले शिक्षक चाळीस हजार रुपये पगार घेतात पण शाळेत येत नाहीत. आरोग्यसेवेचाही प्रश्न आहे. याचसोबत धानाची विक्री ग्रामसभांच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. या प्रश्नांबद्दल आम्ही जिल्हापरिषदेच्या सभागृहात आवाज उठवू.
 *

लालसू नोगोटी
(दोन्ही फोटो पुरवल्याबद्दल नोगोटी यांचे आभार. पहिला फोटो रेघेवर सोईसाठी थोडा कापला आहे).

२७ फेब्रुवारी २०१७

सत्याचं सातत्य की सत्तेचं सातत्य?

'महाराष्ट्र स्टडीज् ग्रुप' या आंतरविद्याशाखीय अभ्यास-गटानं ६-८ जानेवारी २०१७ या काळात 'महाराष्ट्राविषयीची सतरावी आंतरराष्ट्रीय परिषद' नवी दिल्लीत 'शिकागो युनिव्हर्सिटी सेंटर'च्या सोबतीनं घेतली. 'भाषा आणि सत्ता' असं या वर्षीचं त्यांचं विषयसूत्र होतं. रेघेवरच्या नोंदींच्या संदर्भातून आपल्याला या परिषदेमधे एका सत्रात निबंध वाचायला सांगितलं होतं. तिथं संक्षिप्त सादर केलेला तो हा निबंध इथं पूर्ण दिला आहे. रेघेवरच्या आधीच्याच काही नोंदींमधला तपशील उचलून त्याला एकमेकांत ओवायला नवीन दोरा शोधता येईल का, असा प्रयत्न करू पाहिला. त्यामुळं तपशिलांची पुनरावृत्ती सापडू शकेल.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात रेघेवर नोंद केली होती. महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्राच्या जाहिरातीतली 'इथे सत्याचा शोध संपतो' ही ओळ त्या नोंदीला निमित्त देणारी ठरली होती. आता, या वर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीला औरंगाबाद शहरातही रस्त्यात दुसरी एक सत्याची जाहिरात होती. दिव्य मराठी या वर्तमानपत्राची जाहिरात करणाऱ्या  औरंगाबादेतल्या बोर्डावर लिहिलेलं: 'आमच्यावरही दबाव असतो, पण फक्त सत्याचाच'. या बोर्डाचा फोटो काढता आला नाही, पण तपशिलांचं सातत्य किती आहे हे यातून परत दिसलं. आता निबंध:

सत्याचं सातत्य की सत्तेचं सातत्य?
वर्तमानपत्रांच्या स्वतःबद्दलच्या जाहिरातींविषयी

निबंधाच्या शीर्षकातला पहिला शब्दच ‘सत्य’ हा आहे. पण एक सर्वसामान्य लेखक म्हणून निबंध लिहायचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवलेला असल्यामुळं ‘सत्य’ या शब्दाचे तत्त्वज्ञानातले अर्थ शोधणं हे काम मी अंगावर घेतलेलं नाही. अर्थातच हे फक्त ‘सत्य’ या शब्दापुरतंच लागू करायला हवं, असंही नाही. या निबंधातल्या जवळपास सगळ्याच शब्दांबद्दल हे म्हणता येईल. त्यामुळं निबंधातली भाषा ‘सर्वसामान्य’ लोकांची वाटली, तर त्याचं कारण निबंधलेखकाचा ‘सर्वसामान्यपणा’ हे आहे.

आर.के.लक्ष्मण
द व्हेरी बेस्ट ऑफ द कॉमन मॅन
पेंग्वीन बुक्स इंडिया, मे २०१२
पण ‘सर्वसामान्य’ म्हणजे कोण? प्रत्येक शब्दाचा अर्थ खोदत बसणं माझ्या कामाचा भाग नाही, तरी या शब्दावर थोडं अडखळायला झालंच. त्याच्या अर्थाचा शोध घ्यायसाठीचा माझा संदर्भ मात्र एका व्यंग्यचित्रकाराचा आहे. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ या वर्तमानपत्रात पाचेक दशकं ‘यू सेड इट’ या शीर्षकाचा व्यंग्यचित्र-स्तंभ चालवलेले आर.के. लक्ष्मण, त्यांच्या प्रसिद्ध ‘कॉमन मॅन’ या पात्राबद्दल एकदा म्हणाले होते: ‘तो भारतातल्या किंवा बहुधा अख्ख्या जगातल्या लाखो मूक (लोकांचं) प्रतिनिधित्व करतो, असं मी म्हणेन. पुढं चाललेल्या काळाचा तो मूक साक्षीदार आहे’[१].

हे कॉमन/सर्वसामान्य मुके साक्षीदार वर्तमानपत्रांचे, वृत्तवाहिन्यांचे, किंवा अधिक सर्वांगीणपणे बोलायचं तर प्रसारमाध्यमांचे ग्राहक असतात. मुकेपणाच्याही संवादांसारख्या पातळ्या कराव्या लागतील. स्वतःच स्वतःशी बोलणं, ही संवादाची एक पातळी. असा संवाद नसणं ही मुकेपणाची एक पातळी. शिवाय, मित्रमैत्रीण, नवराबायको, इतर नातेवाईक इत्यादींचे परस्परां¬मधले संवाद, अशा काही पातळ्या. आणि असे संवाद नसणाऱ्या मुकेपणाच्या पातळ्या. पण हे या निबंधातल्या मुकेपणात येणार नाही. आपण इथं बोलू पाहतोय तो मुकेपणा सार्वजनिक पातळीवरचा आणि बहुतेकदा सार्वजनिक सत्ताश्रेणीशी संबंधित असावा, असं निरीक्षणावरून वाटतं. 

सत्याची जाहिरात

‘सत्यमेव जयते’ हे भारत देशाचं बोधवाक्यच आहे. म्हणजे ‘सत्याचाच विजय होतो’ असा अर्थ भारत या राष्ट्राच्या सरकारनं अधिकृत केला आहे, असं किमान आता राजधानी दिल्लीत चाललेल्या परिषदेत तरी आपण म्हणून ठेवू. भारत राष्ट्राचं बोधचिन्ह असलेल्या अशोकस्तंभाखाली देवनागरी लिपीत हे वाक्य लिहिलेलं असतं. काही वेळा सरकारी पातळीवरच्या वापरातच अशोकस्तंभाखाली ‘सत्यमेव जयते’ हे शब्द लिहिलेले दिसत नाहीत, पण या वाक्याशिवाय बोधचिन्ह अपुरं आहे, असं केंद्र सरकारनं खास सूचना काढूनही बजावलेलं आहे (जाड ठसा सरकारचा[२]). बोधचिन्हाचा असा अपुरा उपयोग कायद्याचा भंग करणारा आहे, हेही या सूचनापत्रात म्हटलेलं आहे. तर, एकूण मिळून सत्याचाच विजय होतो, हा बोध सातत्यानं होत राहणं सरकारला गरजेचं वाटतं, असं आपल्याला म्हणता येईल.

सरकार (म्हणजे राज्यसंस्था) आणि सत्य यांचा संबंध असतो, या मांडण्या विचारवंतांनी केल्या असतीलच[३]. पण आपण आधीपासून सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं भारत देशाचा नागरिक असणाऱ्या अशा सर्वसामान्य माणसाला नागरिकत्वासोबत ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्यही सातत्यानं दिसत राहतं. अगदी रोजच्या पैशाच्या नोटेवरही बोधचिन्ह या वाक्यासहित असतं, त्यामुळं सत्याचाच विजय होतो याचा विसर पडू नये, अशी सरकारी भूमिका आपल्याला कळते. सत्याचा विजय होण्याची शक्यता जास्त असते, किंवा सत्य विजयी व्हावं, अशा प्रकारचं हे नम्र वाक्य नाही. उलट या बोधवाक्यातला ‘च’ निखालस दावा करणारा आहे. म्हणजे कायम, नेहमी, सतत, सत्याचाच विजय होतो. सरकारी सूचनापत्रात ‘ट्रुथ अलोन ट्रायम्फ’ असं या वाक्याचं इंग्रजी भाषांतर दिलेलं आहे. म्हणजे फक्त सत्याचाच विजय होतो, असं हे ठासून सांगितलेलं आहे.

भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक आहे. आणि या राष्ट्रात प्रातिनिधिक लोकशाही मानली जाते. त्यामुळं वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिक मतं देतात, जास्त मतं मिळवणारे उमेदवार विजयी होतात, अशा विजयी उमेदवारांची जास्त संख्या असलेला पक्ष सत्ता स्थापन करतो, किंवा स्वतःच्याच बळावर एखाद्या पक्षाला ही संख्या जमवता आली नाही, तर मग आघाडी वा युती करून सत्ता स्थापन केली जाते- असं एक प्राथमिक पातळीवर नोंदवू. तर, या पार्श्वभूमीवर आपण ‘सत्याचाच विजय होतो’ हे वाक्य वाचत असतो. सत्याच्या विजयाची ग्वाही देणारं हे वाक्य सरकारी नियमांनुसार अधिकृत ठरतं, तसंच त्या वाक्यानं विजयी पक्षाचं सरकार सत्य असण्याची ग्वाही नागरिकांना मिळते. विजयातून सरकार बनतं आणि विजय तर सत्याचाच होतो, त्यामुळं विजयी झालंय ते सत्यच असावं, अशी समजूत टिकवण्यासाठी हे गरजेचं असेल.

रेघ, १ जुलै २०१६ची नोंद
या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वर्तमानपत्राची पुण्यातल्या एका रस्त्यावरची ही जाहिरात पाहता येईल: धडधडीतपणे ‘इथे सत्याचा शोध संपतो’, असं ही जाहिरात सांगते. रोजच्यारोज पैशाच्या नोटेवर दिसणारा ‘सत्य’ हा शब्द इथं एका मोठ्या फलकावरून आपल्या डोळ्यांवर येऊन आदळतो. इतक्या ठळकपणे आदळल्यावर तरी आपल्याला या शब्दाचा काहीतरी अर्थ गृहीत धरावा लागेल. आधी म्हटल्याप्रमाणे अगदी तत्त्वज्ञानाच्या अंगानं हा लेखक याचा अर्थ शोधू शकत नाही, पण सर्वसामान्यपणे सत्य या शब्दाचा अर्थ कसा घेतला जातो? अगदी साध्याशा माणसाला विचारलं तर तो कदाचित म्हणेल, ‘अगदी खरं असतं ते सत्य’. शिवाय ‘दिसतंय ते जसंच्या तसं’, असाही एक अर्थ या शब्दाला जोडलेला दिसतो. आपण इतक्याच पातळीवरून हा शब्द वापरू. तर महाराष्ट्र टाइम्सच्या या जाहिरातीत सत्याचा शोध संपल्याचा दावा आहे. यात पुन्हा गुंतागुंतीची चर्चा करता येईल: सत्याचा शोध इथे संपला म्हणजे कुठं? त्या फलकाजवळ, की महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाजवळ? अशी प्रश्नांची लगड लावता येईल. पण साधारण एवढं तर आपल्याला सांगता येतं की, ही महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राबद्दल काही दावा करणारी जाहिरात आहे. पण दाव्यापेक्षा वस्तुस्थिती पाहणं जास्त बरं राहील. या वस्तुस्थितीचा एक भाग म्हणून पी. साइनाथ यांनी ३० नोव्हेंबर २००९ रोजी लिहिलेल्या ‘मास मीडिया: मासेस ऑफ मनी’[४] या लेखातील पुढचा परिच्छेद पाहा:
"'लोकमत' या आघाडीच्या मराठी दैनिकात १० ऑक्टोबर २००९ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचं शीर्षक पुढीलप्रमाणे होतं: 'तरुण तडफदार नेतृत्व : अशोकराव चव्हाण'. त्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांचा मतदान दिवस सुरू होण्यापूर्वी ७२ तास आधी छापून आलेला हा मजकूर. हा मजकूर त्या दैनिकाच्या 'विशेष प्रतिनिधी'नं लिहिल्याचा उल्लेख होता, म्हणजे ती बातमी होती, असा अर्थ. केवळ काही महिन्यांच्या कारकिर्दीत मोठं यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळणारा हा लेख होता. त्याच दिवशी हाच लेख, त्यातला प्रत्येक शब्द जसाच्या तसा, 'महाराष्ट्र टाइम्स' या दुसऱ्या एका आघाडीच्या मराठी दैनिकातही छापून आला. दोन वेगवेगळी मनं असली तरी विचार एकच, असं काही हे आहे काय?"
साइनाथ यांनी पुराव्यासहित या वस्तुस्थितीकडं २००९ साली लक्ष वेधलं होतं. ‘पेड न्यूज’ची प्रकरणं उघडपणे गाजली तेव्हाची ही गोष्ट आहे. व्यक्तिगत पत्रकाराच्या पातळीवर आर्थिक देवाण-घेवाण होऊन पक्षपाती बातम्या वा लेख छापून येण्यापुरता हा प्रकार मर्यादित नव्हता, तर मालक-संस्थांच्या पातळीवरून ही देवाणघेवाण झाली होती. संस्थात्मक पातळीवरून ‘रेट कार्ड’ वा ‘पॅकेज’ अशा स्वरूपात हे व्यवहार झाले[५]. तर अशा व्यवहारांमध्ये संस्था म्हणून सामील होणारं वर्तमानपत्र २०१६ साली स्वतःच्यापाशी सत्याचा शोध संपल्याचा दावा जाहिरातीतून करताना दिसतं. याच वर्तमानपत्राला २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांवेळी खालील जाहिरात करावीशी वाटली होती:

पुणे आवृत्ती, १४ मे २०१४, पान क्रमांक पाच

‘आमचं निवडणूक वार्तांकन देशांच्या नागरिकांच्याप्रति पक्षपाती आहे’, असा हा दावा आहे. या दाव्याशी संबंधित वस्तुस्थिती आपण २००९च्या निवडणुकांसंदर्भात पाहिलीच. शिवाय, याच वर्तमानपत्रात पुरवण्यांच्या ‘मास्टहेड’खाली ‘अॅडव्हर्टोरियल, एन्टरटेन्मेन्ट प्रमोशनल फिचर’ असं इंग्रजीत लिहिलेलं दिसतं. अजून मुख्य प्रतीवर ही ओळ दिसत नाही, पण रविवार पुरवणीसह इतर बहुतांश पुरवण्यांवर दिसते.

आपण सत्याच्या जाहिरातीसंदर्भात बोलत होतो. ते आता इथं जास्त लख्खपणे जाणवतं. पुरवणीतला मजकूर ‘जाहिरात, मनोरंजन, प्रमोशन’ अशा प्रकारचा आहे, असं मान्य केलं, तर सत्य-असत्याची संदिग्धता आणखी वाढते. कारण, पुरवणीतल्या प्रत्येक मजकुरासंबंधी वाचकाला अंदाज बांधत बसावा लागणार: अमुक एक जाहिरातवजा लेख आहे की नाही- म्हणजे ही जागा पैसे देऊन विकत घेतलेली आहे की कसं, अमुक एक बहुधा संपादकीय निकषानं आलेला लेख आहे की नाही- म्हणजे ही जागा संपादकीय अधिकारची आहे की कसं, इत्यादी. कदाचित प्रत्येक मजकुरानुसार असा काही टॅग जोडता आला, तर ते अधिक निखळ होईल, असं वाटतं. त्या-त्या मजकुराची सत्यता जाहीर केल्यासारखं होईल. पण संदिग्ध सत्य वर्तमानपत्रांना जास्त सोयीचं असावं.

आपण एक लहानसा दाखला म्हणून फक्त इथं महाराष्ट्र टाइम्सचा उल्लेख केला. विविध पातळीवर वर्तमानपत्रांना हे लागू होतं. ‘पेड-न्यूज’च्या परिच्छेदात उल्लेख आलेला ‘लोकमत’ही अशा प्रकारचे दावे करण्यात कमी नसतोच. उदाहरणार्थ, जुलै २०१४मध्ये या वर्तमानपत्रानं ‘पुण्याचा ऱ्हास आता बास’ अशी एक मोहीम राबवली. ही मोहीम ‘सामान्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी...’ होती, आणि त्यातून ‘विविध प्रश्नांचं गांभीर्य जाणून सामान्यांच्या भावनांना वाट करून दिली...’, असा दावा लोकमतनं केला[६]. सामान्यांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व केल्याचा दावा करून प्रत्यक्षात सामान्यांमधून आपले ‘ग्राहक’ वाढवणं, एवढाच यामागचा हेतू दिसतो. कारण ‘वाचकांच्या पाठबळावर लोकमत पुण्यात नं. १’ अशी बातमी देताना त्यात या मोहिमांचा उल्लेख आवर्जून केलेला दिसतो[७]. म्हणजे या मोहिमांमुळं आपला वाचकवर्ग वाढल्याचा दावा यात होता. हा दावा कशासाठी? लोकमतच्या वाचकवर्ग वाढल्याचा दावा ‘सकाळ’ या पुण्यातल्या बहुधा सर्वाधिक प्रस्थापित वर्तमानपत्राच्या संदर्भातला होता. सकाळपेक्षा आपण पुढं गेलो आहोत, असा दावा कुठल्यातरी संस्थेच्या आकडेवारीनुसार लोकमतनं केला. मग लोकमतचा दावा पोकळ असल्याचं सकाळनं अधिक अधिकृत संस्थेच्या आकडेवारीनं आणि वृत्तपत्रविक्रेत्यांच्या अवतरणांमधून प्रसिद्ध केलं. असा हा मुद्दा काही दिवस चालला. या मुद्द्यामागची रचना उलगडायचा प्रयत्न नोम चोम्स्की यांनी त्यांच्या ‘मुख्यप्रवाही माध्यमं असतात तशी का असतात?’[८] या निबंधात केलेला आहे. त्यात ते म्हणतात:
"(मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांचं) उत्पादन असतं ‘वाचक-प्रेक्षकवर्ग’. तुम्ही वर्तमानपत्र विकत घेता त्यातून मालक कंपन्यांना पैसा मिळत नाही. वर्तमानपत्र तर ते इंटरनेटवर मोफतही उपलब्ध करून देऊ शकतील. उलट, तुम्ही वर्तमानपत्र विकत घेता तेव्हा ते त्यांच्या खिशातलाच पैसा खर्च करत असतात. पण 'वाचक-प्रेक्षकवर्ग' हे त्यांचं उत्पादन असतं. संपन्न लोक - म्हणजे वर्तमानपत्रांमधून लिहितात तेच लोक म्हणा ना, समाजातील उच्च वर्गातील निर्णयक्षम लोक, हे ‘उत्पादन’ असतात. मालक कंपनीला हे उत्पादन बाजारात विकायचं असतं आणि हा बाजार म्हणजे 'जाहिरातदार' (हा पुन्हा वेगळाच धंदा आहे). दूरचित्रवाणी असो की वर्तमानपत्र, किंवा दुसरं काहीही, ते वाचक-प्रेक्षकवर्गच विकत असतात. आपला प्रेक्षकवर्ग कंपन्या एकमेकांना विकत असतात. उच्चभ्रू माध्यमांचा हाच मोठा व्यवसाय आहे."
त्यामुळं स्वतःच्या इथं सत्याचा शोध संपल्याचा दावा करणं, किंवा आपण सामान्यांच्या आवाजाला बळ देतोय, असा दावा करणं- हे सगळं मुळात वाचकांना उद्देशून नाही. याचं मूळ ‘जाहिरातदारांना आकर्षित करणारी जाहिरात’ असं आहे. याबद्दल  आपण चोम्स्कींचं म्हणणं दिलं ते तसं विचारवंतांचंच बोलणं झालं. पण एका सर्वसामान्य वाचकानंही ‘फेसबुक’वर लिहिलेलं याबद्दलचं म्हणणं रोचक ठरेल[९]. सकाळच्या संपादकांना उद्देशून हा वाचक म्हणतो:
"सकाळ आणि लोकमत पैकी नंबर एक कोण आणी कोण लोकांना फसवतय ह्या वैयक्तिक भांडणात वाचकांचा काय दोष! तुमची भांडणं ही नक्कीच तुमच्या पेपरची 'हेडलाईन' होऊ शकत नाही! परवा सावित्री नदीच्या पुलावर एवढी मोठी दुर्घटना झाली पण 'सकाळ' मध्ये डोळ्यासमोर 'हेडलाईन' मात्र तुमच्या आणि लोकमतच्या भांडणाची बातमी! तुमचे वाद त्या घटनेपेक्षाही मोठे झाले का?"
ही पोस्ट ६ ऑगस्ट २०१६ रोजी लिहिलेली आहे, आणि या वाचकानं सकाळच्या ज्या हेडलाइनचा उल्लेख केलाय, ती (४ ऑगस्ट २०१६ रोजीची) अशी होती[१०]: 'लोकमत'ची फेकमफाक... पुण्यात 'सकाळ'च नंबर वन : बनावट दावे बनले पुणेकरांसाठी विनोदाचा विषय. स्वतःचा वाचकवर्ग जास्त आहे याची जाहिरात करण्याच्या नादात बातम्या दुर्लक्षिल्या जातात, अशी एका वाचकाचीच तक्रार आपण पाहिली. त्यांच्या तक्रारीतली सावित्री नदीवरचा पूल कोसळल्याची बातमीही त्या दिवशी ‘सकाळ’च्या पहिल्या पानावर होती, पण तिचा मथळा दुमडीच्या आसपास येत होता. सगळ्यात वरची मुख्य बातमी सकाळ-लोकमत भांडणाची होती. पण मुळात बातमीही जाहिरात असू शकते, हे ‘पेड-न्यूज’पासून ‘म.टा.’च्या मास्ट-हेडखालील ओळीपर्यंत विविध पातळ्यांवर आपल्याला दिसतं. त्यामुळं कोणता मजकूर बातमी आहे आणि कोणता मजकूर जाहिरात आहे, याची सत्यासत्यता पडताळणं ही जबाबदारी वाचकांवरच पडलेली आहे.

भारतातील सर्वाधिक सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर महाराष्ट्राचा आहे. शिवाय या राज्यातील ७७ टक्के जनता साक्षर आहे, आणि त्यातील ७१ टक्के जनता वर्तमानपत्र वाचत नाही. या पार्श्वभूमीवर या वाचकवर्गाला आपल्याकडं आकर्षित करणं हे विविध वर्तमानपत्राचं ध्येय असणं साहजिक आहे. देशातला प्रचंड मोठा माध्यमसमूह असलेल्या दैनिक भास्कर कॉर्पोरेशनचे सुधीर अगरवाल एप्रिल २०११मध्ये म्हणाले होते[११]: 'गुजरात व राजस्थानपेक्षा महाराष्ट्राची उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता जास्त आहे, त्यामुळं भविष्यात महाराष्ट्र ही आमची सर्वांत मोठी बाजारपेठ असू शकते'. अगरवाल ज्या बाजारपेठेबद्दल बोलतायंत, ती जाहिरातींची बाजारपेठ आहे. महाराष्ट्रातील ही बाजारपेठ ८०० कोटी रुपयांची असून, ती वर्षाला १५ टक्क्यांनी वाढते आहे[१२]. ऑगस्ट २०११पासूनच महाराष्ट्रात दिव्य भास्कर समूहाचं ‘दैनिक दिव्य मराठी’ सुरू झालं. हा निबंध लिहिला जात असताना या वर्तमानपत्राची टॅगलाइन आहे: ‘महाराष्ट्राचे एकमेव निःपक्ष आणि स्वतंत्र वृत्तपत्र’! 

सत्तेची जाहिरात

या मुद्द्याचं शीर्षक ‘लोकसत्ते’ची जाहिरात, असंही चाललं असतं. कारण, आता आपण लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या दोन-तीन जाहिरातींबद्दल बोलणार आहोत. आधी जाहिराती पाहू:

-

आपलं वर्तमानपत्र ‘जाणत्या जनांसाठी’ आहे, आमचे वाचक वादात कधीही हरत नाहीत, ते कशावरही चर्चा करू शकतात, असे संदेश देणाऱ्या या जाहिराती आहेत. हे संदेश म्हणजेही अर्थातच दावे आहेत. या दाव्यांच्या मर्यादा नोंदवण्यासाठी आपण काही दाखले तपासू.

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भातील वार्तांकन करण्याकरिता लोकसत्तेचे संपादक सप्टेंबर २०१६मध्ये खास अमेरिकेला गेले होते. यासंबंधीची त्यांची वार्तापत्र ‘यूएस ओपन’ या शीर्षकाखाली पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली. यातल्या ‘‘यूएस ओपन’ का?’१३ या आरंभीच्या वार्तापत्रात पहिल्या दोन परिच्छेदांमधे हे संपादक लिहितात:
"एखादा देश चांगला की वाईट ओळखायचा कसा? यासाठी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी एक सोपा मार्ग सांगितलाय. त्या देशात यावं, राहावं, असं किती जणांना वाटतं आणि तो देश सोडून जावा, अशी किती जणांची इच्छा असते, यावर त्या देशाचं लहान-मोठेपण जोखता येतं, असं ब्लेअर म्हणाले होते. अमेरिका ही मोठी का ठरते, हे त्यामुळे लक्षात येईल आणि त्या देशाच्या सर्वोच्च पदासाठीच्या निवडणुका महत्त्वाच्या का ठरतात, ते समजून घेता येईल. जगाच्या कानाकोपऱ्यांतून नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी अमेरिकेत येत असतात. किंबहुना ज्याला कोणाला आपलं नशीब अजमावून पाहायचं असतं, आपण किती मोठे होऊ शकतो हे जोखायचं असतं त्याला अमेरिकेशिवाय पर्याय नसतो. भारतातल्या अशा प्रयत्नार्थीना जशी मुंबई खुणावत असते, तशी जगातल्या धडपडणाऱ्यांना अमेरिका साद घालत असते.
[…] अमेरिका मोठी होते कारण ती ‘अमेरिकी’ होते म्हणून. हे अमेरिकी असणं म्हणजे एकमेकांच्या विचारस्वातंत्र्याचा आदर करणं, समोरच्या व्यक्तीचा आदर करून त्यालाही स्वत:इतकंच आचारस्वातंत्र्य मिळायला हवं म्हणून आग्रही असणं, समोरची व्यक्ती आपल्या वर्णाची, जातीची, धर्माची, इतकंच काय देशाचीही नसली तरी आपल्याला जे अधिकार आहेत ते त्या व्यक्तीलाही आहेत, हे मनोमन मान्य करून ही भावना प्रत्यक्षात आणणं म्हणजे अमेरिका."
मोठे देश, मोठी शहरं, तिथं येणारे लोकांचे लोंढे, याबद्दलची गुंतागुंत ‘जाणतेपणा’नं नोंदवण्याऐवजी, हे सगळं ‘आपलं नशीब आजमावण्यासाठी, आपण किती मोठे होऊ शकतो हे जोखण्यासाठी’ सुरू असतं, अशी खास टाळ्याखाऊ वाक्य संपादकांनी लिहिलेली आहेत. मुंबईचा उल्लेख तर त्यांनी केलाच आहे. सरधोपट हिंदी-मराठी चित्रपटांमधे मुंबईचं वर्णन ‘स्वप्नांचं शहर’ असं करून प्रेक्षकांना भुलवलं जातं, तसाच प्रकार अमेरिकेच्या बाबतीत संपादकांनी केलेला आहे. संपादकांचा उथळपणा हा आपल्या निबंधाचा विषय नाही, पण संपादकांच्या या लेखाबद्दलचं एका वाचकाचं पत्र[१४] अतिशय जाणतेपणा दाखवणारं आहे, ते असं:
‘यूएस ओपन का?’ हा लेख वाचला. निश्चितच अमेरिकेत होणारी निवडणूक जागतिकदृष्ट्या महत्त्वाची आहे त्याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही. मात्र या लेखात अमेरिकेच्या मोठेपणाचे स्पष्टीकरण देताना ‘अमेरिकी’ असणे म्हणजे एकमेकांच्या विचारस्वातंत्र्याचा, आचारस्वातंत्र्याचा आदर करणे; इतर जाती-धर्मांच्या तसेच परदेशी व्यक्तींना समान अधिकार असतात असे म्हटले आहे. परंतु अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीच्या (एनएसए) कंत्राटदाराकडे नोकरी करणाऱ्या एडवर्ड स्नोडेन याने जून २०१३मध्ये ‘गार्डियन’ या वृत्तपत्रात अमेरिकेने विविध देशांतील लोकांच्या संगणक व फोनवरील चोरलेली माहिती उघड केली होती. या गौप्यस्फोटामुळे अमेरिकेचे माहितीचोरीचे व टेहळणीचे खरे स्वरूप जगासमोर उघडे झाले होते. ज्या एडवर्ड स्नोडेनला इतर देश जागल्या म्हणून संबोधतात त्याच एडवर्ड स्नोडेनला अमेरिकी काँग्रेसच्या गुप्तचर समितीपुढे सादर करण्यात आलेल्या अहवालात गुन्हेगार ठरवण्यात आले आहे. या प्रकरणात इतर देशांच्या आचारस्वातंत्र्याचा आदर कुठे दिसतो आहे?  तसेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान अमेरिकेतील मुस्लिमांना हाकलून लावण्याची केलेली भाषा यामध्ये कुठे दिसते धर्मनिरपेक्षता? यामधून कुठे दिसते आहे अमेरिकेचे मोठेपण? हे ‘यूएस’चे ‘ओपन’पण आहे की ‘नागडे’पण?
हे पत्र लिहिणारा वाचक अहमदनगरमधल्या नेवासा इथला रहिवासी आहे (असं पत्राखाली नोंदवलेलं होतं). त्याच्या पत्रामध्ये जागतिक सत्तारचनेचं जे भान दिसतं, त्याची चुणूकही संपादकांच्या लेखात दिसत नाही. पण संपादकांनी खास अमेरिकेला जाणं, त्यांचा लेख पहिल्या पानावर खास पद्धतीनं छापून येणं, यातून फक्त वैचारिक प्रभुत्व स्थापित होतं. त्या तुलनेत अधिक सजग असलेल्या वाचकाचं पत्र मात्र ‘लोकमानस’ या वाचकपत्रांच्या संचामध्ये आतल्या सहाव्या-आठव्या पानावर येऊन जातं. हे वर्तमानपत्र ‘जाणत्या जनांसाठी’ आहे, हा जाहिरातीतला दावा या वाचकपत्रातून खरा ठरतो. फक्त हे वृत्तपत्र ‘अजाण संपादकांनी चालवलेलं’ आहे हा लेखातून स्पष्ट होणारा भाग जाहिरातीत कधीच येणार नाही. कारण जाहिरातीच्या केंद्रस्थानी वाद व चर्चा जिंकण्याचा उल्लेख आहे, त्यातून वैचारिक सत्तेचे संकेत दिलेले आहेत.

ही वैचारिक सत्ता संपादकाच्या माध्यमातून राबवली जाते म्हणून फक्त त्यांच्या लेखाचा दाखला दिला. या वैचारिक सत्तेचं आणखी एक उदाहरण म्हणून लोकसत्तेचीच ही जाहिरात पाहा:

लोकसत्ता, पुणे, २९ सप्टेंबर २०१६

यात पुन्हा लोकसत्तेचे संपादक ‘स्वच्छ, स्पष्ट, साक्षेपी दिशादर्शन’ करणार असल्याचं म्हटलंय. हे दिशादर्शन आजूबाजूच्या सत्तारचनेला पूरक असणार, याचा दाखला अमेरिकेसंबंधीच्या वरच्या लेखातून मिळाला आहेच. शिवाय संपादकांनी विविध लेखांमधून तो दिलेला आहे. एकदा एका अग्रलेखात मुख्यमंत्र्यांना काहीएक सल्ला देताना या संपादकांनी लिहिलं होतं: ‘गणित, विज्ञान अशा महत्त्वाच्या विषयात भोपळा मिळवणारा शारीरिक शिक्षण वा हस्तकला अशा विषयातील यश मिरवतो तसे हे भारतमाता की जय प्रकरण आहे […] मुख्य विषयात बरे गुण मिळवण्याची त्यांची क्षमता असताना उगाच शा. शि. आणि हस्तकला अशा विषयांवरच लक्ष केंद्रित करण्याचा करंटेपणा त्यांनी करू नये’[१५]. अग्रलेखाचा मूळ विषय तर सोडूनच द्या, पण शाळेतल्या विषयांचा तुलनेसाठी वापर करताना हे संपादक आपोआप एका उतरंडीचं समर्थन करतायंत. हे पुन्हा वैचारिकता, सर्जनशीलता, याबद्दलचं अजाणपण दाखवणारंच आहे. अशी कितीतरी उदाहरणं या संपादकांची आणि इतरही संपादकांची दाखवता येतील. दुसरीकडे, ‘समाजनौकेचं नीतीसुकाणू’ धरण्याचं काम ‘एकेकाळी मराठीतल्या तेजस्वी संपादकांनीही’ केलेलं होतं, असा लोकसत्तेच्या या संपादकांचा गैरसमज त्यांनी एका लेखात[१६] नोंदवला होता. संपादक नीतीसुकाणू धरणारे असतात, दिशादर्शन करणारे असतात, हेही आपोआप वैचारिक सत्ता केवळ शाब्दिक वर्णनांच्या बळावर टिकवून ठेवायचे प्रयत्न वाटतात. याच संपादकांनी मदर तेरेसा यांच्यावर टीका करणारा एक अग्रलेख १७ मार्च २०१६ रोजी ‘असंताचे संत’ या शीर्षकाखाली लिहिला. आणि नंतर दोनेक दिवसांत हा अग्रलेख ‘वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून’ मागंही घेतला. विविध दबावांमुळं ही गोष्ट घडू शकते, हे तात्पुरतं समजून घेतलं. तरी अग्रलेख मागं घेण्यासारख्या कृतीचं इतर कोणतंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं नाही, हे जास्त गंभीर वाटतं. वाचकांना सत्यापेक्षा संदिग्धतेच्या जवळ नेणारा हा भाग वाटतो.

या संपादकांनी केलेला ‘तेजस्वी संपादकां’चा उल्लेख वरती आला आहे. हे संपादक कोण तर: ‘मराठवाड्यात अनंतराव भालेराव, सोलापुरात रंगा वैदय, इकडे गोविंदराव तळवलकर, प्रभाकर पाध्ये, विदर्भात माडखोलकर वगैरे’[१७]. या सर्व ब्राह्मण जातीमधील व्यक्ती आहेत.

याच लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीला पंचवीस वर्षं पूर्ण झाल्याबद्दल २८ ऑगस्ट २०१६ रोजी खास पुरवणी काढण्यात आली होती. त्यात गेल्या पंचवीस वर्षांमधले दहा निवडक लेख देण्यात आले होते. या दहाही लेखांचे लेखक ब्राह्मण जातीतील व्यक्ती होत्या, आणि यातले आठ लेख ज्या व्यक्तींवर होते त्या व्यक्ती ब्राह्मण. पण या वेळी प्रस्तावना म्हणून दिलेल्या मजकुरात पुढील म्हणणं मांडलं होतं:
"‘लोकसत्ता’च्या रविवारीय ‘लोकरंग’ पुरवणीचा जन्म होऊन आता पाव शतक होत आले. वृत्तपत्रीय पुरवणीचे कलात्मक रूप-स्वरूप, त्यातील समकालीन घटना-घडामोडींचा सर्वांगाने परामर्श घेणारे त्या-त्या क्षेत्रातील मान्यवरांचे आशयसंपन्न लेख, विचारप्रवृत्त करणारी वैविध्यपूर्ण सदरे, समाजाच्या सर्वच घटकांना काही ना काही पुरवणीत मिळाले पाहिजे, हा विचार केंद्रस्थानी ठेवून केलेली अंकाची मांडणी याची सुरुवात नव्वदच्या दशकात वृत्तपत्रीय जगतात ‘लोकरंग’ पुरवणीपासून झाली असे म्हटले तर वावगे ठरू नये."
‘समाजाच्या सर्वच घटकांना काही ना काही पुरवणीत मिळाले पाहिजे’, पण हे काही ना काही देणारे केवळ एकाच जातीतले असून भागेल का?

एक जानेवारी २०१६ रोजी लोकसत्तेनं पहिल्या पानावर मुख्य बातमी म्हणून ‘लोकसत्ता: विचार श्रीमंतीचे वाचनमौजी वर्ष!’ या मथळ्याचा मजकूर प्रसिद्ध केला होता. यात २०१६ सालात विविध सदरांमध्ये कोणकोणते लेखक-लेखिका लिहिणार आहेत, याची माहिती दिली होती. यात एकूण एकतीस नावं होती आणि त्यातील बावीस ब्राह्मण होती. हा मुद्दा केवळ ब्राह्मणव्यक्तींसाठी लिहिलेला नाही. विचारश्रीमंती, त्याची सत्तारचना याच्याशी जातरचना कशी जोडलेली दिसते, यासाठी ही जातीय विभागणी केली आहे. यातले सगळे लेखक 'ब्राह्मणी' (विशिष्ट जातीय वर्चस्वाच्या) हेतूनंच लिहितात असा याचा अर्थ नव्हे. यात आणखी खोलातही शोध घेता येईल. म्हणजे राजकीय विषयांवर अनेक वेळा मध्यम जातीय व्यक्तींचं लेखन इथं येतं, पण सांस्कृतिक विषयांवर लिहिताना ब्राह्मण व्यक्तींचा पगडा दिसतो.

जोतिबा फुले यांनी ‘गुलामगिरी’ या पुस्तकात पुढील मत नोंदवलं होतं: ‘एकंदर सर्व मऱ्हाटी वर्तमानपत्रांचे कर्ते भट असल्यामुळे त्यांच्याने आपल्या जातीच्या लोकांविरुद्ध लिहिण्यास हातच उचलवत नाही. [...] बरे, आपले दयाळू सरकारही त्या सर्व मतलबी वर्तमानपत्रांच्या म्हणण्यास खरे मानून त्या लिहिण्यात एकंदर सर्व शूद्रांचे व अतिशूद्रांचे मत आले आहे म्हणोन समजते’[१८]. (फुल्यांनी ‘सार्वजनिक सत्य धर्म’, ‘सत्यशोधक’ असे शब्दप्रयोग केले, त्यात काहीएक प्रक्रिया दिसते. सत्याचा शोध संपल्याचा म्हणजे पर्यायानं शोधाची प्रक्रियाच संपल्याचा दावा करणाऱ्या वर्तमानपत्रांच्या संदर्भातही हे म्हणणं लक्षात घेता येईल). फुल्यांच्या म्हणण्यातली तीव्रता आता अर्थातच कमी दिसेल, पण तरी लोकसत्तेच्या जाहिरातींमधला आशय वाचताना हे म्हणणं लक्षात घ्यावं लागतं. त्यातला वादात कधीही न हरण्याचा, कशावरही चर्चा करण्याचा मुद्दा आणि संपादकांना अपेक्षित असलेले ‘समाजनौकेचं नीतिसुकाणू’ हे दुवे विशिष्ट वर्चस्वाशी जोडलेले तर नाहीत ना? अशी शंका नोंदवून ठेवू.

लेखकांच्या जाती नोंदवून त्यांच्या लेखनाबद्दलचा पूर्ण अंदाज येणार नाही, हे खरंच. पण एकूण मिळून विशिष्ट समाजघटकाला प्राधान्य मिळाल्यानं वर्तमानपत्रातल्या अभिव्यक्तीचा समतोल कोलमडून पडतो, असा हा मुद्दा आहे. त्या दृष्टीनं लोकसत्तेची जाहिरात ही सांस्कृतिक/वैचारिक प्रभुत्वाशी जोडून पाहावी लागते.

या निबंधात काही विशिष्ट संदर्भात आपण सांस्कृतिक/वैचारिक सत्ता आणि लोकसत्ता यांच्यातले संबंध उलगडू पाहिले. असं इतरही काही माध्यमांच्या बाबतीत इतर काही जातींच्या संदर्भातून तपासता येईल. अगदी थोडक्यात उदाहरण म्हणून, मुख्यत्वे विदर्भात आणि काही प्रमाणात मराठवाडा व खानदेशात मोठ्या प्रमाणात वितरण असलेल्या ‘देशोन्नती’ या वर्तमानपत्रानं अलीकडच्या मराठा मूक मोर्चांबाबत केलेलं वार्तांकन पाहता येईल. या वार्तांकनात वापरली गेलेली विशेषणं, छायाचित्रांची मांडणी, संपादकीय मजकूर, अशा अंगांनी हा अभ्यास करता येईल. या वर्तमानपत्राचे संपादक शेतकरी चळवळीशी संबंधित असल्याचा संदर्भ इथं महत्त्वाचा ठरलेला दिसतो. किंवा या वर्तमानपत्राच्या वाचकवर्गाच्या संदर्भातही हे तपासता येईल. त्यातल्या विविध पातळ्या वार्तांकनात आल्या का, हे तपासता येईल. पण सध्या आपण हा मुद्दा इथंच थांबून निबंधाच्या शेवटाकडं जाऊ. 

सत्य आणि सत्ता : स्वीकार आणि संदिग्धता

अशोक केळकर यांनी ‘भाषा : शक्ती : सत्ता’ या त्यांच्या निबंधात ‘रहस्यस्वीकार’ (मिस्टिफिकेशन) आणि ‘रहस्योद्घाटन’ (डिमिस्टिफिकेशन) असा भेद सत्ताकारणाच्या संदर्भात नोंदवलेला आहे[१९]. (‘उद्घाटन’ या शब्दाचा इथला अर्थ ‘उघड करणे, विवरण करणे’ असा आहे, हे सदर निबंधलेखकाला अंदाजानं कळलं, पण पुन्हा शब्दकोशातून तपासून घ्यावं लागलं). केळकर लिहितात:
‘रहस्यस्वीकार सत्तेची प्रतिष्ठा वाढवतो आणि रहस्योद्घाटन सत्तेच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवते. सत्ताकारणाचे परिष्करण करताना रहस्यस्वीकार श्रद्धापरिवर्तनाला मदत करतो आणि रहस्योद्घाटन विवेकप्रवर्तनाला मदत करतो. […] जेव्हा श्रद्धाप्रवर्तनाला वास्तवातल्या काही नव्या वळणाशी सामना करावा लागतो तेव्हा रहस्यस्वीकार कायम रहावा आणि श्रद्धेला ढळ कमीत कमी पोचावा म्हणून भाष्याची किंवा इज्तिहादची मदत घ्यावी लागते. (श्रद्धाविषय अॅरिस्टॉटल असो वा पाणिनी किंवा वेद असो वा कुराण किंवा मार्क्स असो वा गांधी, त्यामुळे काही फरक पडत नाही. अधीनतेची सामनीती चालू रहावी हीच एक मुद्द्याची बाब असते). अर्थाची संदिग्धता किंवा संश्लिष्टता आणि शब्दांकनाची परोक्षता किंवा जटिलता यांचा रहस्यस्वीकार ठेवण्यासाठी उपयोग होतो. (रहस्यविषय हा आचारधर्माचे समर्थन असो किंवा सत्तायुक्त लोकनेत्यांची भूमिका असो किंवा सुप्रतिष्ठित विचारवंतांचे मत असो, त्यामुळे काही फरक पडत नाही.)’
याच परिच्छेदाच्या आधी केळकरांनी असंही म्हटलंय की, ‘रहस्यस्वीकार अविवेकी बनल्यावर आपल्याला संदेहाची मदत घ्यावी लागते. संदेहाची मुख्य दिशा रहस्योद्घाटनाची म्हणजे डिमिस्टिफिकेशनची असते. जेव्हा या रहस्योद्घाटनाची प्रेरणा अविवेकी बनते, तेव्हा आपल्याला विवेकाची मदत घ्यावी लागते. (हे रहस्योद्घाटक पत्रकारितेलाही लागू पडते)’.

तर या परिच्छेदाशी सदर निबंधलेखक बराचसा सहमत आहे. या बऱ्याचशा सहमतीतून आपल्याला पुढील आकलन मांडता येईल: ‘सत्य’ किंवा अशा एखाद्या शब्दाचा अर्थ जाणीवूर्वक संदिग्ध ठेवल्यानं त्याभोवती रहस्य निर्माण होतं, आणि ते रहस्य स्वीकारायचं की त्याचा अर्थ उलगडून पाहायचा, याची जबाबदारी त्या अर्थाचं ग्रहण करणाऱ्या व्यक्तीवर येते. अर्थ उलगडावा वाटल्यास संबंधित व्यक्तीला साधन म्हणून संदेहाचा वापर करता येईल. अन्यथा श्रद्धाभावानं रहस्याचा स्वीकार करावा लागेल.

या आकलनाला जोडून शेवटी काही मुद्दे फक्त नोंदवतो:
१. ‘सत्याचाच विजय होतो’, असं केंद्र सरकार आपल्याला बोधचिन्हातून सांगतं, राष्ट्रीय चलनाच्या नोटांवरूनही सांगतं. यात मुख्यत्वे स्वतःच्या विजयाला सत्याची जोड देऊन अधिकृतता टिकवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न दिसतो.

२. त्याचप्रमाणे, ‘सत्याचा शोध इथं संपतो’, असा खतरनाक दावा एखादं वर्तमानपत्र करतं तेव्हाही सत्यावर आपलं प्रभुत्व असल्याचा त्या वर्तमानपत्राचा दृष्टिकोन दिसतो. हा दृष्टिकोन स्वतःला ‘एकमेव निःपक्ष, स्वतंत्र’ म्हणवणाऱ्या वर्तमानपत्रांच्या जाहिरातींमध्येही दिसतो.

३. एखादं वर्तमानपत्रं स्वतःच्या ‘विचारश्रीमंती’चा उल्लेख जाहिरातीत (किंवा बातमीत) करत असेल, तर त्यातून त्या समाजातल्या विचारांच्या रचनेबद्दल तपासणी करावी लागते. या रचनेतील उतरंडीला हातभार लावण्याचं काम हे ‘विचारश्रीमंत’ वर्तमानपत्र काही पातळ्यांवर करत असू शकतं.

४. धोक्याची सूचना: हा निबंध ज्या परिषदेत सादर होतो आहे, त्या परिषदेच्या ‘महाराष्ट्र स्टडीज् ग्रुप’ या आयोजक संस्थेनं त्यांच्या संकेतस्थळावर ‘काही मराठी वर्तमानपत्रां’च्या यादीत फक्त तीन वर्तमानपत्रं व त्यांच्या संकेतस्थळांचे दुवे दिलेले आहेत: सकाळ, महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता[२०]. इथं ते रहस्याचं तेवढं लक्षात ठेवायला हवं, असं वाटतं.

५. जाहिराती आपल्यासमोर काही रहस्य ठेवतात, हे रहस्य जणू काही सत्यच आहे असा आभासही त्या निर्माण करतात. याबाबतीत जाहिरात ग्रहण करणाऱ्या व्यक्तीनं श्रद्धेनं रहस्यस्वीकाराचं धोरण ठेवायचं की रहस्योद्घाटनाचं धोरण अंगिकारायचं, हा ज्या-त्या व्यक्तीनं ठरवायचा मुद्दा आहे.

६. जाहिरातींचा वापर सत्यबित्य मांडण्यापेक्षा संदिग्धता टिकवण्यासाठी होत असावा. अशी संदिग्धता सत्यापेक्षा सत्तेच्या सातत्याला सोईची ठरेल, असं वाटतं. आणि प्रसारमाध्यमांनी दावा सत्याचा केला तरी ती विविध पातळ्यांवर सत्तेच्याच सोईनं रहस्यनिर्मिती करत असावीत, अशी शंका घ्यायला अमाप जागा आहे.

७. सर्वसामान्य माणसं मतांद्वारे आपले प्रतिनिधी निवडून देतात आणि त्यातून (भारतात) सरकार निर्माण होतं. सर्वसामान्य माणूस आपापली कामं करत असतो, त्याला रोजच्यारोज सरकार चालवण्यासाठी सहभाग नोंदवणं शक्य नसतं, यासाठी तो स्वतःकडची सत्ता आपल्या प्रतिनिधी उमेदवाराला देतो आणि मग जास्त विजयी उमेदवारांच्या संख्याबळावर प्रातिनिधिक सत्तेचं सरकार चालतं. सरकार व प्रसारमाध्यमं यांच्या रचनेत फरक असला तरी अधिकृतता प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत काही साम्य दिसतं. सर्वसामान्य माणूस रोजच्यारोज जगभर हिंडून माहिती वा बातम्या गोळा करू शकत नाही (अगदी मर्यादित प्रमाणात व्यक्तिगत पातळीवर आपल्याला प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारी माहिती वेगळी). त्यामुळं हा सर्वसामान्य माणूस स्वतःकडचे काही पैसे खर्च करून प्रसारमाध्यमांचं ग्रहण करतो, त्याच्या या ग्राहकपणातून प्रसारमाध्यमांना जाहिराती मिळवण्यासाठी आवश्यक ग्राहकांचं संख्याबळ मिळतं. या संख्याबळाचा माध्यमांना सत्ता[२१] चालवायला उपयोग होतो.
*

संदर्भ-टिपा-
१. आदिती डे, ‘क्रिएटिंग द कॉमन मॅन’, १२ जून २००४, द हिंदू, (१३ नोव्हेंबर २०१६ रोजी तपासलं)
२. पाहा: केंद्रीय गृह मंत्रालयानं ११ मार्च २०१६ रोजी प्रसिद्ध केलेलं सूचनापत्र (पीडीएफ). (१३ नोव्हेंबर २०१६ रोजी तपासलं).
३. मिशेल फुको, ‘ट्रुथ अँड पॉवर’ (‘पॉवर अँड नॉलेज’ या पुस्तकातून), समाविष्ट: द फुको रीडर, संपादक- पॉल रेबिनाउ, पेंग्वीन, १९९१. पान-७३. “आपल्यासारख्या (पाश्चात्त्य) समाजांमध्ये सत्याची ‘राजकीय अर्थव्यवस्था’ पाच महत्त्वाच्या वैशिष्ट्यांनी घडलेली दिसते. वैज्ञानिक संभाषितावर आणि त्याची निर्मिती करणाऱ्या संस्थांवर ‘सत्य’ केंद्रीत झालेलं असतं; सततच्या आर्थिक व राजकीय उत्तेजनेचा तो विषय असतो (सत्यासाठीची मागणी ही आर्थिक उत्पादनासोबत राजकीय सत्तेसाठीचीही असते); विविध रूपांमधली ती एक वस्तू असते, तिचा मोठ्या प्रमाणात प्रसार व ग्रहण होत असतं (काही मर्यादा सोडता समाजशरीरामध्ये व्यापक प्रसार असलेल्या शिक्षण वा माहितीच्या माध्यमातून ही वस्तू चलनात असते); काही मोजक्या मोठ्या राजकीय व आर्थिक यंत्रणांच्या विशेषाधिकारी नसल्या तरी प्रभुत्वशाली नियंत्रणाद्वारे त्याची निर्मिती व प्रसारण केलं जातं (विद्यापीठं, सैन्य, लेखन, माध्यमं); अखेरीस हा एक संपूर्ण राजकीय चर्चेचा व सामाजिक संघर्षाचा मुद्दा आहे (‘विचारधारां’चा संघर्ष)”.
४. पी. साइनाथ, ‘मास मीडिया: मासेस ऑफ मनी’, द हिंदू, ३० नोव्हेंबर २००९. (१३ नोव्हेंबर २०१६ रोजी तपासलं).
५. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या माहिती-तंत्रज्ञान स्थायी समितीने 'पेड न्यूज'विषयीचा अहवाल ६ मे २०१३ रोजी लोकसभेत सादर केला. पीडीएफ. (१५ नोव्हेंबर २०१६ रोजी तपासलं), या अहवालाचा किंचित मराठी गोषवारा.
६. पाहा: 'आता बास', पुणे: फेसबुकपानावरील फोटो.  (१५ नोव्हेंबर २०१६ रोजी तपासलं)
७. ‘वाचकांच्या पाठबळावर लोकमत पुण्यात नं.१’, लोकमत, ५ ऑगस्ट २०१६.  (१५ नोव्हेंबर २०१६ रोजी तपासलं)
८. नोम चोम्स्की, ‘मुख्यप्रवाही माध्यमं असतात तशी का असतात?’, मूळ प्रकाशित: झेड मॅगझिन, ऑक्टोबर १९९७. मराठी भाषांतर. इंग्रजी लेख: https://chomsky.info/199710__/
९. केदार वनजपे यांची ६ ऑगस्ट २०१६ रोजीची फेसबुक-पोस्ट. (१५ नोव्हेंबर २०१६ रोजी तपासलं).
१०. सकाळ, पुणे आवृत्ती, ४ ऑगस्ट २०१६, पहिलं पान. शिवाय, पाहा: ‘‘लोकमत’ची पुन्हा बनवेगिरी’, ई-सकाळ, ६ ऑगस्ट २०१६.
११. रोहीन धर्मकुमार, दीपक अजवानी, ‘द दैनिक भास्कर ग्रुप'स् फाइट इन महाराष्ट्र’, १६ एप्रिल २०११. (१५ नोव्हेंबर २०१६ रोजी तपासलं).
१२. उपरोक्त.
१३. गिरीश कुबेर, ‘यूएस ओपन का?’, लोकसत्ता, मुंबई, २६ सप्टेंबर २०१६, पान १.
१४. नितीन गुंड, ‘ओपन’ की ‘नागडे’पण?, लोकसत्ता, मुंबई, २८ सप्टेंबर २०१६, पान ८.
१५. ‘फडणवीस... सांभाळा!’, लोकसत्ता, मुंबई, अग्रलेख, ६ एप्रिल २०१६, पान ९.
१६. गिरीश कुबेर, ‘शतखंडित महाराष्ट्र’, लोकरंग, १ मे २०१६, पान १.
१७. उपरोक्त.
१८. जोतिबा फुले, गुलामगिरी, महात्मा फुले समग्र वाङ्मय, संपादक: धनंजय कीर, डॉ. स.गं. मालशे व डॉ. य.दि. फडके, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. पान १९१.
१९. अशोक केळकर, रुजुवात, लोकवाङ्मय गृह, सप्टेंबर २००८, पान २३९.
२०. पाहा: http://www.maharashtrastudiesgroup.org/Resources.html (१५ नोव्हेंबर २०१६ रोजी तपासलं).
२१. माध्यमांच्या सत्तेबद्दलचा हा निबंध असला तरी याच्या म्हणून काही मर्यादा आहेतच. एकतर यात फक्त वर्तमानपत्रांचा विचार केला आहे. वृत्तवाहिन्या, संकेतस्थळं, नभोवाणी वाहिन्या, विविध समाजमाध्यमं, यांचा विचार केलेला नाही. शिवाय, या निबंधात साधारणपणे एक रचना म्हणून मोजक्या वर्तमानपत्रांची, संपादकांची उदाहरणं घेतलेली आहेत. लहानसा ‘केस-स्टडी’ म्हणून त्याकडं पाहता येईल. यात इतरही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या, संपादक यांची भर टाकता येईल. 'उघडा डोळे, बघा नीट', 'चला जग जिंकूया', 'राहा एक पाऊल पुढे', 'आता जग बदलेल'- या अनुक्रमे एबीपी माझा, आयबीएन लोकमत, झी-चोवीस तास, महाराष्ट्र-वन या वृत्तवाहिन्यांच्या टॅगलाइन आहेत. या शब्दप्रयोगांमध्ये काही प्रमाणात आदेश, काही प्रमाणात स्वतःबद्दलचा (अवाजवी) दावा, स्पर्धात्मकता अशा अनेक गोष्टींचे संदर्भ अगदी उघड दिसतात, यातूनही सत्तेचं रहस्य शोधता येईल. निबंधातला सांस्कृतिक सत्तेबाबतचा जातीय उल्लेखही याच संदर्भात आहे. इतर काही रचनांबाबतीत इतर काही जातींचाही विचार करता येईल, त्यातून काही समाजघटक प्रसारमाध्यमांच्या अवकाशात पूर्णच मूक असल्याचंही हाती लागू शकतं. अशा रचनांमध्ये असताना व्यक्तिगत पातळीवर कोणी पत्रकार रहस्याकडं चिकित्सेनं पाहत असणंही शक्य असतंच. हे अर्थातच कुठल्याही रचनेत व्यक्तीला लागू होऊ शकतं. त्यामुळं यातले उल्लेख व्यक्तिगत नसून फक्त रचनेपुरतेच आहेत.