![]() |
| थ्री-डी चित्रपट पाहणारे प्रेक्षक, २६ नोव्हेंबर १९५२ (छायाचित्र : जे. आर. आयरमन; 'लाइफ') |
अमेरिका-व्हेनेझुएला
या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात अमेरिकेच्या सैनिकांनी व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना त्यांच्या घरात घुसून पत्नीसह उचललं आणि अमेरिकेत अटकेमध्ये ठेवलं. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष अमेरिकेच्या दिशेने अंमली पदार्थांची तस्करी करत होते, असा साधारण ढोबळ आरोप अमेरिकेच्या अध्यक्षांनी केला. शिवाय, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष अवैध पद्धतीने सत्तेवर आले, इत्यादी आरोपही स्वतंत्रपणे होत आलेले आहेत. त्यावरचा उपाय म्हणून ही 'कारवाई' केल्याचा अमेरिकी अध्यक्षाचा दावा. आता एका सार्वभौम राष्ट्राच्या अध्यक्षावर अमेरिकेत न्यायालयीन कामकाज चालेल! त्यातल्या राजकारणाचा भाग किंवा तेलाच्या साठ्यांसाठी होणारं सत्ताकारण साधारणपणे आपल्याला माहीत असेल किंवा नसेल. पण या कारवाईबद्दल अमेरिकी अध्यक्ष काय म्हणाले ते बघण्यासारखं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, "मी ते अगदी एखादा टीव्हीवरचा कार्यक्रम बघावा तसं बघितलं. त्यातला वेग, हिंसा, तुम्ही बघितलं असतंत तर लक्षात आलं असतं... मी असं काही आधी कधीच बघितलेलं नाही. मला ते प्रत्यक्ष सुरू असताना त्याच वेळी बघायला मिळालं, आणि त्यातली प्रत्येक गोष्ट मी बघितली. त्यातली व्यावसायिक सफाई, नेतृत्वाची गुणवत्ता, हे सगळं चकित करणारं होतं. अमेझिंग!" एकंदर यातला वेग बघता बहुतेकांनी अशा मोहिमेचा भाग होणं टाळलं असतं, असं अमेरिकी अध्यक्ष म्हणतात. पुढे ते वृत्तवाहिनीच्या निवेदकांपैकी चार्ली या निवेदकाचा उद्देश करत म्हणतात, "पण चार्ली खूप शूर आहे, तो गेला असता तिथे. हे टीव्हीवर बघायला हवं." (फॉक्स न्यूज, ३ जानेवारी २०२६). व्हेनेझुएलातल्या या मोहिमेचं 'थेट प्रक्षेपण' अमेरिकी अध्यक्ष बघत असतानाचे फोटोही 'व्हाइट हाउस'ने प्रसिद्ध केले.
![]() |
| अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांवरील कारवाईचं 'थेट प्रक्षेपण' पाहत असताना |
चित्रपटाच्या पहिल्या भागात मुख्य खलनायक म्हणून दाखवलेलं पात्र ल्यारीमधील एका गुंड-टोळीच्या म्होरक्याचं आहे. हे पात्र एका अरबी गाण्यावर मिनिटभर विशिष्ट 'मस्तमौला' शैलीत हात-पाय हलवतं, त्यातला काही सेकंदांचा भाग प्रचंड व्हायरल झाला (मूळ गाणं बहारीनमधल्या अरबी बँडचं, त्याचं चित्रपटातलं चित्रण मात्र बलोचिस्तानातलं एखादं लोकगीत असावं अशा तऱ्हेने केलेलं. पण असले तर्क याबाबतीत निर्थकच). हा खलनायक बलोच आहे. पाकिस्तानात नैऋत्येला असणाऱ्या, स्वायत्ततेची मागणी करणाऱ्या बलोचिस्तान प्रदेशाशी त्याची काहीएक बांधिलकी आहे, पण तरी पाकिस्तानी मुख्य धारेतल्या राजकारण्यांशी साटंलोटं असल्यामुळे शेवटी त्याची कृत्यं बलोच लोकांशीही प्रतारणा करणारी ठरतात. त्याने पुरवलेल्या शस्त्रांचा वापर मुंबईतील २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात झाल्याचं चित्रपटात दाखवलं आहे. या खलनायकाच्या हाताखालील पहिल्या फळीत भारतीय गुप्तहेर घुसलेला असतो. २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचं थेट प्रक्षेपण तेव्हा वृत्तवाहिन्यांनी केलं, ती दृश्यं भारतीयांप्रमाणे पाकिस्तानातही पाहिली गेली. वर उल्लेख आलेल्या पाकिस्तानी गुंड-टोळ्यांचे धुरीण, राजकीय-गुप्तचर रचनांमधले धुरीणही ही दृश्यं पाहत असल्याचं या चित्रपटात आपण बघतो. त्यांना हे पाहून आनंद होतो. पण ते पाहून नायक असणारा भारतीय गुप्तहेर हादरतो. मग तो ही रचना कोसळवण्याचा निर्धार करतो.
![]() |
| 'धुरंधर'मधील एक दृश्य (श्रेय : चित्रपटाचे निर्माते) |
आपल्या युगामध्ये प्रत्यक्ष गोष्टीपेक्षा तिच्या प्रतिमेला पसंती दिली जाते. मूळ गोष्टीपेक्षा तिची नक्कल पसंत केली जाते, वास्तवापेक्षा प्रतिमा, असतेपणापेक्षा दाखवलेपणा.. यांना पसंती मिळते... या युगाला केवळ भ्रामकता पवित्र वाटते, आणि सत्य अपवित्र वाटतं. त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या दृष्टीमध्ये ही पावित्र्याची धारणा इतकी मिसळून जाते की सत्य विरून जातं आणि भ्रामकता वाढत जाते. यातून भ्रामकता सर्वोच्च पातळी गाठते आणि तीच पावित्र्याची सर्वोच्च पातळी मानली जाऊ लागते.
![]() |
| 'द सोसायटी ऑफ द स्पेक्टॅकल'- ब्लॅक अँड रेड यांनी प्रकाशित केलेल्या पहिल्या आवृत्तीचं पूर्ण आवरण (श्रेय : pleasures of the past times) |
देबो यांनी मार्क्सवादी दृष्टीने सूत्ररूपात मांडणी केली आहे. यातली अनेक सूत्रं आजच्या जगण्याकडे बघताना लागू होणारी वाटतात. उदाहरणार्थ, 'आपलं (आधुनिक उत्पादनसंबंध राखणाऱ्या समाजांचं) जगणं म्हणजे देखाव्यांचा प्रचंड मोठा संचय असतो. प्रत्यक्ष जगण्याने माघार घेतली असून त्याची जागा प्रतिमांनी घेतली आहे', हे या पुस्तकातलं पहिलंच सूत्र. हा प्रतिमांचा संचय म्हणजे देखावा, पण 'केवळ प्रतिमांना गोळा केलं की झाला देखावा असं नसतं, तर प्रतिमांच्या मध्यस्थीने घडणारे लोकांमधील सामाजिक संबंध म्हणजे देखावा', असं देबो म्हणतो. 'देखावा स्वतःला विशाल दुर्दम्य वास्तव म्हणून सादर करतो. तो एकच संदेश देत असतो : "दिसतंय ते चांगलं आहे; चांगलं आहे ते दिसतं." काय दिसायला हवं यावर देखाव्याची मक्तेदारी असते आणि त्यातून निष्क्रिय स्वीकार लादला जातो, त्यावर काही प्रतिक्रिया द्यायला वाव नसतो.'
देखावा म्हणजे आपल्या आर्थिक-राजकीय रचनेने निर्माण केलेला वास्तवाचा भास. पण शेवटी हा भास भास न उरता वास्तवाचा भागच होऊन जातो, आणि तो वास्तवाचं विभाजन करत करत वास्तव इतकं विखंडित करतो की आपण निव्वळ निष्क्रिय होत या विखंडित वास्तवाचे, निरनिराळ्या बुडबुड्यांमध्ये जगणारे ग्राहक तेवढे होऊन बसतो- असं साधारण देबोच्या सोबतीने म्हणता येईल. आपण 'वास्तव वास्तव' म्हणतो तोही मुळात एक भासच असतो, असंही थेट अध्यात्मिक कोणी म्हणू शकेल. तो वेगळाच मुद्दा झाला. पण इथला मुद्दा साधारण आपण सर्वांनी किमान वास्तव म्हणून स्वीकारलेल्या गोष्टींचं आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक देखाव्यात रूपांतर कसं होतं, याबद्दलचा आहे. आपल्या परिसरातलं एक उदाहरण पाहू.
कुलभूषण जाधव
मार्च २०१६मध्ये कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील बलुचिस्तान भागात अटक करण्यात आल्याची बातमी आली. जाधव हे भारतीय नौदलाचे अधिकारी असून भारतीय गुप्तचर यंत्रणेसाठी हेर म्हणून ते काम करत होते, बलुचिस्तानातील बंडखोरीला पाठबळ पुरवणं, चीनच्या 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह' या दीर्घ पल्ल्याच्या मार्ग उभारणीला खीळ घालण्याचा प्रयत्न करणं (हा मार्ग चीनच्या झिनजिआँग प्रांतापासून इराणमधील ग्वादार बंदरापर्यंत जातो. वाटेत पाकव्याप्त काश्मीर लागतं) यासाठी ते प्रयत्नशील होते, असा आरोप पाकिस्तानी सरकारने केला. तर, जाधव पूर्वी भारतीय नौदलात असले तरी त्यांनी २००२-०३दरम्यानच त्यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेतली असून ते इराणमध्ये व्यावसायिक कारणाने राहत असताना तिथून पाकिस्तानने त्यांचं अपहरण केलं, असा भारत सरकारचा यावरचा खुलासा होता. जाधव यांची व्यावसायिक कंपनी इराणमधील ग्वादार इथे कार्यरत असल्याचं सांगितलं जातं; तिचा व्यवहार फारसा नाही. बाकी, बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या इराणलगतच्या सीमेवरचा प्रदेश आहे आणि ग्वादार बंदराच्या बांधकामात भारताचाही अधिकृत सहभाग आहे, हे भूराजकीय तथ्यही इथे लक्षात घेण्याजोगं.
एप्रिल २०१७मध्ये पाकिस्तानातील न्यायालयाने जाधव यांना देहदंडाची शिक्षा सुनावली, पण काहीच दिवसांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात हे प्रकरण गेलं आणि तिथे जाधव यांच्या देहदंडाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. जाधव यांच्या या न्यायालयातील बचावासाठी भारत सरकारने वकील पुरवले. पाकिस्तानी न्यायव्यवस्थेने या संदर्भात पुनर्विचार करावा, असं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सुचवलं. तसंच, जाधव यांच्याशी संपर्क साधण्याची मुभा भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर जाधव पाकिस्तानी तुरुंगात आहेत. त्यांच्या प्रकरणाचं पुढे काय होईल, याबद्दलचे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत. दोन्ही देशांच्या सरकारांना यासंबंधीचं सत्य माहीत असतं, दोन्ही बाजूंकडे अशा काही व्यक्ती हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगत असतात, त्यामुळे कदाचित अशा एखाद्या पाकिस्तानी व्यक्तीची देवाणघेवाण करून जाधव यांची सुटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं या विषयावर लक्ष ठेवणाऱ्या पत्रकारांनी नोंदवलं होतं. आपल्याला या संदर्भात सार्वजनिक स्तरावर उपलब्ध असणारी माहिती, निरनिराळे कल असणाऱ्या पत्रकारांची वार्तांकनं पाहिली तर साधारण यासंबंधीचा अंदाज बांधता येतो. तो आपला आत्ताचा विषय नाही, पण कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात एकाच वेळी धाडस, शौर्य, सरकारी पातळीवर वाजवी-अवाजवी जोखीम, भय, गोपनीयता आणि व्यक्तीच्या पातळीवरची शोकांतिका दिसते. या घटनाक्रमाला कल्पिताची जोड देऊन खरोखर काही कथानक रचायचं तर त्यात 'धुरंदर'मध्ये दिसते तशी प्रचंड हिंसक हाणामारी दाखवता येणार नाही, बाळबोध संवाद दाखवता येणार नाहीत, केवळ शारीरिक बळाच्या आधारावर सगळ्याची उलथापालथ करू शकणारा नायक उभा करता येणार नाही. पण आपण देखाव्यांच्या काळात जगतो आहोत, तिथे अनेक व्यक्तींच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या शोकांतिकांना थारा नाही. कुलभूषण जाधव यांच्या अटकेला येत्या मार्चमध्ये दहा वर्षं होतील. त्याच महिन्यात 'धुरंधर'चा पुढचा भाग प्रदर्शित होणार आहे.
नोम चॉम्स्की
दरम्यान, अमेरिकेत जेफ्री एपस्टीन या व्यक्तीशी संबंधित कागदपत्रं काही दिवसांपूर्वी तिथल्या प्रशासनाने सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून दिली. हा गडगंज श्रीमंत असणारा मनुष्य एकीकडे आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होता, आणि दुसरीकडे लैंगिक सुखोपभोगासाठी अल्पवयीन मुलींची तस्करीही करत होता. अमेरिकेच्या दक्षिणेला असणाऱ्या कॅरेबियन समुद्रात त्याने स्वतःचं एक बेट विकत घेतलं. तिथल्या आलिशान महालात यासंबंधी पार्ट्या होत असत. या संदर्भात २००५-०६च्या दरम्यान तपास सुरू झाला, त्यानंतर २००८मध्ये एपस्टीनने स्थानिक न्यायालयीन व्यवस्थेशी साटंलोटं केलं आणि किरकोळ गुन्ह्यांची कबुली दिली. तेव्हा त्याला १८ महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा झाली, आणि १३ महिन्यांची शिक्षा भोगल्यावर तो सुटला. त्यानंतरच्या काळात तो पुन्हा उजळ माथ्याने वावरू लागला, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे मालक बिल गेट्स इत्यादींपर्यंत अनेकांशी त्याचा संपर्क होता, संबंध होते. राजकीय, सामाजिक, अकादमिक, सांस्कृतिक अवकाशातल्या अनेक व्यक्तींची नावं यातून समोर आली. पण यातली प्रत्येक व्यक्ती एपस्टीनने केलेल्या गुन्ह्यांशी संबंधित होती, असा याचा अर्थ नाही. पण एकंदर अमेरिकी समाजातल्या अनेक ख्यातनाम व्यक्तींशी त्याची जवळीक होती. एपस्टीनच्या कृत्यांमधील काही पीडित मुली पुढे टिकल्या, त्यांचे अनुभव बाहेर आले, 'मिआमी हेराल्ड' या वृत्तपत्राच्या काही पत्रकारांनी चिकाटीने या प्रकरणाचा माग घेतला (Perversion of Justice) आणि २०१८ साली या वृत्तपत्रात त्यासंबंधी सखोल वार्तांकन प्रकाशित होऊ लागलं. दरम्यान, अमेरिकेतील केंद्रीय तपास संस्थांनी हे प्रकरण हातात घेतलं, जुलै २०१९मध्ये एपस्टीनला अटक होऊन खटला उभा राहिला, पण त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात तो त्याच्या कोठडीत मृतावस्थेत आला. त्याने कोठडीतल्या पांघरुणांचा वापर करून स्वतःला गळफास लावून घेतल्याचं तपाससंस्थांनी सांगितलं. यासंबंधीही अनेक खरी-खोटी माहिती आणि व्हिडिओ इत्यादी उपलब्ध आहेतच. आपण इथे त्यातल्या एकाच छोट्या बाजूला धरून ही नोंद संपवणार आहोत.
एपस्टीनला २००८ साली शिक्षा झाली त्यानंतरच्या काळात त्याचा अमेरिकेतील ज्येष्ठ भाषावैज्ञानिक आणि राजकीय-सांस्कृतिक व्यवहारांसंबंधीचे सखोल भाष्यकार नोम चॉम्स्की यांच्याशी संपर्क आला. चॉम्स्की व त्यांची पत्नी व्हॅलेरिया यांच्यासोबत एपस्टीनचा ई-मेलद्वारे झालेला पत्रव्यवहार आणि त्यांची काही छायाचित्रं या प्रकरणात समोर आली. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाशी चॉम्स्की दाम्पत्याचा संबंध असल्याचं यातून सूचितही झालेलं नाही. चॉम्स्की यांना पहिल्या पत्नीपासून झालेल्या अपत्यांचा आणि चॉम्स्की यांचा मालमत्तेसंदर्भात काही वाद सुरू होता, त्या काळात एपस्टीनकडून त्यांनी आर्थिक मुद्द्यांवर बराच संवाद साधल्याचं या कागदपत्रांवरून दिसतं. त्यापलीकडे जात चॉम्स्की दाम्पत्य एपस्टीनला भेटत असे, वाढदिवस सोबत साजरा करणं, जेवण्यासाठी भेटणं, इत्यादी स्वरूपाचे संवादही यात दिसतात.
चॉम्स्की यांनी अनेक जगडव्याळ सत्तारचनांवर मर्मग्राही टीका करणारं लेखन केलं आणि आता तेच या सत्तारचनेचा गैरवापर करणाऱ्या एका गुन्हेगाराशी इतकी घसट कशी काय करू शकतात, याचं नैतिक मोजमाप कसं करायचं, याबद्दल इंटरनेटवर वेगवेगळी मंडळी बोलत आहेत. रेघेवर आपण आपल्या चौकटीपुरतंच याची दखल घेणार आहोत. जगात बऱ्याच भयंकर गोष्टी सुरू असतात, आपला त्यातल्या काहींशीच संबंध येतो, इतर काही जण स्वतःच अशा भयंकर गोष्टी करत असतील तरी त्या माणसांशीही आपला संबंध येण्याची शक्यता असते किंवा नसते. चॉम्स्की हे सार्वजनिक ख्याती मिळालेलं व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचा असा संबंध-संपर्क आणखीच विस्तारलेला होता. त्यात ते काय निवडी करायचे किंवा व्यक्तीशः ते किती नैतिक होते, याचं मोजमाप करण्यासाठीची माहिती माझ्याकडे नाही आणि ते करण्याची इथे गरजही नाही, असं वाटतं (स्वतंत्रपणे त्याचा शोध घेण्यासाठी 'डिकोडिंग चॉम्स्की : सायन्स अँड रिव्होल्यूशनरी पॉलिटिक्स' हे ख्रिस नाइट यांनी लिहिलेलं पुस्तक उपलब्ध आहे. तसंच, अलीकडच्या प्रकरणासंदर्भातही नाइट यांनी 'द चॉम्स्की / एपिस्टीन पझल' हा लेख लिहिला आहेच. चॉम्स्की ज्या व्यवस्थेवर टीका करत आले त्या व्यवस्थेमध्ये थेट गुंतलेल्या माणसांशी त्यांचे जवळचे संबंध आले, अशा माणसांची त्यांनी वेळप्रसंगी प्रशंसाही केली, काही बाबतीत स्वतः चॉम्स्की यांच्या कामाशी संबंधित निधीपुरवठाही या व्यवस्थेतून येणारा होता, इत्यादी गोष्टी इथे सापडतील. पण तरी, चॉम्स्कींचं लेखन स्वतंत्रपणे वाचण्यासाठी उरतंच). त्यांनी केलेलं लेखन प्रत्येक वेळी पटणारं नसेल तरीही त्यातून आपल्याला आपल्या सध्याच्या सत्तारचनांबद्दल संवाद साधल्याचं समाधान मिळतं. अशाच स्वरूपाचा त्यांचा 'व्हॉट मेक्स मेनस्ट्रीम मीडिया मेनस्ट्रीम?' हा लेख तेरा वर्षांपूर्वी संबंधित प्रकाशकांची परवानगी घेऊन मराठीत केला होता- 'मुख्यप्रवाही माध्यमं असतात तशी का असतात?'
पण तरी एपस्टीन प्रकरणात चॉम्स्की यांची प्रतिमा डागाळली हे खरं आहे. नोम चॉम्स्की यांना जून २०२३मध्ये पक्षाघाताचा झटका आल्यामुळे तेव्हापासून ते सार्वजनिक अवकाशामध्ये बोलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांच्या पत्नी व्हॅलेरिया यांनी या संदर्भात खुलासा करणारं निवेदन ८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलं. एपस्टीनच्या गुन्हेगारी बाजूची आपल्याला काहीही माहिती नव्हती, त्याचा चॉम्स्कींशी झालेला परिचय वैज्ञानिक उपक्रमांना अर्थसहाय्य करणारा आणि आर्थिक सल्लागार म्हणून होता. तसंच, चॉम्स्कींना रस असलेल्या राजकीय-सामाजिक विषयांशी निगडीत व्यक्तींच्या गाठीभेटी घडवून देण्यासाठीही त्याने पुढाकार घेतला, त्यामुळेही त्याच्यासोबतचा चॉम्स्कींचा संपर्क वाढला, अशा स्वरूपाची स्पष्टीकरणं व्हॅलेरिया यांनी दिली आहेत. चॉम्स्की सध्या ९७ वर्षांचे आहेत आणि चालण्या-बोलण्याच्या स्थितीमध्ये नाहीत. पण हे प्रकरण आत्ताइतकं प्रकाशात येण्याआधीच चॉम्स्की यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते, तेव्हाची त्यांची उत्तरंही फारशी समाधानकारक नव्हती. तसंच, एपस्टीनची दुसरी बाजू माहीत नसण्याचा खुलासा कमकुवत आहे.
नोव्हेंबर २०१८पासून 'मिआमी हेराल्ड' या वृत्तपत्रात एपस्टीनने केलेल्या अल्पवयीन मुलींच्या तस्करीसंबंधी वार्तांकन यायला लागलं त्यानंतर फेब्रुवारी २०१९मध्ये एपस्टीनने चॉम्स्कींना पाठवलेली मेल वाचायला मिळते. त्यात एपस्टीन विचारतो :
माझ्या विरोधात वर्तमानपत्रांमधून येणाऱ्या कुजक्या वार्तांकनाचं काय करावं, याबद्दल तुमचा सल्ला मिळाला तर बरं होईल. हे आता हाताबाहेर जातं आहे. मी कोणाकडून संपादकीय लेख लिहून घेऊ का? माझ्या बचावासाठी. की, याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करू. झुंडी धोकादायक असतात, हे लक्षात घेऊन काही करायला हवं!
यावर पाठवलेल्या उत्तरात चॉम्स्की म्हणतात :
तुझ्याविरोधात वर्तमानपत्रांमध्ये आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या गोष्टी भयंकर आहेत. यावर बोलणं वेदनादायक आहे, पण मला वाटतं, या गोष्टींकडे दुर्लक्ष करणंच उत्तम. मला याचा बराच अनुभव आलेला आहे, पण अर्थात त्याची व्याप्ती इतकी प्रचंड नव्हती. विशिष्ट विषयावर टिप्पणीसाठी विचारणा झाल्याशिवाय मी याकडे लक्षही देत नाही. [...] थेट प्रश्न विचारल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये, खासकरून सध्याच्या वातावरणात तर नकोच. माझ्या अंदाजाप्रमाणे हे विरून जाईल, पण तोवर काहीएक छळ सहन करावा लागेल.
२०१८ साली एपस्टीनच्या गुन्हेगारी बाजूसंबंधी झालेलं वार्तांकन बरंच स्पष्ट होतं. त्यावरून सर्वसामान्य वाचकही किमान अंदाज बांधू शकतो, पण चॉम्स्की मात्र या सर्व वार्तांकनाने सावध झाले नाहीत. उलट, एपस्टीनने त्यावर काय करावं, याचा सल्ला ते देत होते. थेट प्रश्न विचारला तरच उत्तर द्यावं, असं सुचवत होते. पण एपस्टीन यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने चॉम्स्की यांना मे २०२३मध्ये ई-मेलद्वारे प्रश्न विचारले, तेव्हा चॉम्स्कींनी दिलेलं उत्तर असं होतं :
तुमचा, किंवा खरंतर कोणाचाच या गोष्टींशी काडीचाही संबंध नाही, हे माझं यावरचं पहिलं उत्तर आहे. दुसरं, मी त्याला ओळखत होतो आणि आम्ही काही वेळा भेटलो होतो.
या उर्मट उत्तराचं काय करायचं?
हार्वर्ड कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून चालवल्या जाणाऱ्या 'द हार्वर्ड क्रिमसन' या वृ्त्तपत्रानेही मे २०२३मध्ये या संदर्भात चॉम्स्कींची प्रतिक्रिया विचारली. चॉम्स्की दीर्घ काळ मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेशी संलग्न होते आणि त्या संस्थेला एपस्टीनने भरघोस देणगी दिली होती, तसंच हार्वर्ड कॉलेजलाही त्याने बरीच देणगी दिली. या संदर्भात चॉम्स्की म्हणाले, "आधुनिक जगातल्या काही अत्यंत वाईट कृत्यं केलेल्या गुन्हेगारांच्या देणग्यांवर उभारलेल्या प्रयोगशाळांमध्ये आणि सुविधाकेंद्रांमध्ये होणाऱ्या बैठकांना मी अनेकदा उपस्थित राहिलो आहे. अशा काही गुन्हेगारांच्या सन्मानार्थ इमारतींना त्यांची नावं देण्यात आली आहेत आणि इतर मार्गांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनंही उधळण्यात आली आहेत. देणग्या स्वीकारण्यापेक्षा हे अर्थातच जास्त गंभीर आहे."
एपस्टीनशी संबंध ठेवल्याचा खेद वाटतो का, या प्रश्नावर चॉम्स्कींनी लिहिलं, "मी सर्व प्रकारच्या लोकांना भेटलो आहे. यात युद्ध गुन्हेगारही होते. यातल्या कोणालाही भेटल्याचा मला खेद वाटत नाही." तसंच, एखादा गुन्हेगार शिक्षा भोगून समाजात परत सामावला जात असेल तर 'मुक्त समाजांमध्ये ही सर्वसामान्य बाब असते,' असंही समर्थन या संदर्भात चॉम्स्कींनी दिलं. इथपर्यंत ठीक आहे. पण अशा गुन्हेगाराला पुरेशी शिक्षा झालेली नाही, किंबहुना त्याचा गुन्हा पुरेसा प्रकाशात आलेला नाही, असं कोणी सांगत असेल (मिआमी हेराल्डच्या २०१८चं वार्तांकन); आणि अशा वेळी तो गुन्हेगार स्वतःची प्रतिमा वधारण्यासाठी, म्हणजे देबो म्हणतायंत तसा 'देखावा' निर्माण करण्यासाठी सल्ला विचारत असेल, तर चॉम्स्कींसारख्या व्यक्तीने काय करायला हवं? हा यातला प्रश्न आहे.
अमेरिकेने व्हिएतनामविरोधात पुकारलेल्या युद्धावेळी चॉम्स्कींनी 'बुद्धिजीवींची जबाबदारी' सांगणारा लेख लिहिला होता (द न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स, २३ फेब्रुवारी १९६७). त्यात त्यांनी लिहिलं होतं की :
शासनव्यवस्थांचा खोटेपणा उघडकीस आणणं, विविध कृतींमागच्या कारणांचं आणि हेतूंचं, अनेकदा त्यामागच्या छुप्या उद्देशांचं विश्लेषण करणं, यासाठीची उसंत बुद्धीजीवींना लाभलेली असते. किमान पाश्चात्त्य जगात तरी राजकीय स्वातंत्र्यामुळे, माहितीच्या उपलब्धतेमुळे आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्यामुळे बुद्धिजीवींकडे ही ताकद असते. वर्तमान इतिहासातील घडामोडी आपल्यासमोर विपर्यास करून, गैरचित्रणाच्या माध्यमातून, विचारसरणी आणि वर्गीय हितसंबंधांच्या आधारे सादर केल्या जातात. या पडद्यामागे लपलेलं सत्य शोधण्यासाठीचा फावला वेळ, सोयीसुविधा आणि प्रशिक्षण पाश्चात्त्य लोकशाहीमध्ये काही विशेषाधिकारी अल्पसंख्यांना मिळतं. बुद्धिजीवींना असे अनन्यसाधारण विशेषाधिकारी उपभोगायला मिळत असल्यामुळे [...] 'लोकांच्या जबाबदारी'पेक्षा बुद्धिजीवींची जबाबदारी आणखी सखोल स्वरूपाची असते.
'पडद्यामागे लपलेलं सत्य' शोधणं ही बुद्धिजीवींची जबाबदारी असल्याचं सांगतायंत. पण सत्य झाकणारा पडदा कसा तयार करूया, याबद्दल बुद्धिजीवींचेच सल्ले घेतले जातात, तेव्हा बुद्धिजीवींनी काय करायचं, याबद्दलही काही बोलणं गरजेचं आहे. शिवाय, बुद्धिजीवी असणं, हाच एक देखावा असेल तर आपण काय करायचं, हा एक प्रश्न आहे. आपल्या भोवतीचा बुडबुडा फोडता येतोय का ते पाहायचं नि समोरचा पडदा थोडा बाजूला सारता येतोय का तेही पाहायचं, असं बहुधा यावर म्हणता येईल. पण आता मार्च महिन्यात 'धुरंधर' येईल, तोवर हे सगळं ओसरेल. दरम्यान पडद्यावर इतर प्रतिमा उमटत आहेतच.
![]() |
| नोम चॉम्स्की Requiem for the American Dream या माहितीपटातून कापलेलं दृश्य (लिंक) |





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा