Friday, 12 April 2013

आदिवासी : आदिवाणी

लोगो : http://adivaani.org/
आदिवाणी ही एक प्रकाशनसंस्था आहे. गेल्या वर्षीच सुरू झालेली. आत्ताशी त्यांची तीन पुस्तकं प्रकाशित झाल्येत. त्यातलं पहिलं पुस्तक संथाली भाषेतच होतं. पुढची दोन इंग्रजी. या प्रकाशनसंस्थेच्या संस्थापकांपैकी रूबी हेम्ब्रोम आणि जॉय तुडू ही दोन मंडळी मूळची संथाल आदिवासीच असल्यामुळे त्यांनी पहिलं पुस्तक त्या भाषेतून काढलं, पण एकूण 'आदिवाणी' हा भारतभरच्या आदिवासी संस्कृतीच्या वारशाचं दस्तावेजीकरण करणारा, त्या भाषांमधल्या मौखिक साहित्याला व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम ठरावा असं त्यांना वाटतं. या दोघांना मदत करणारी तिसरी व्यक्ती मॅक्सिकन आहे, लुई गोमेझ.

आपण 'रेघे'वर ही नोंद करतोय त्याची तीन कारणं आहेत. १) साहित्य, संस्कृती याबद्दलच्या चर्चा काही वर्तुळं स्वतःपुरती आपल्या विहिरीमधे राहून करत राहतात किंवा एकदम मुख्य प्रवाह असतो, तो त्याच्या विहिरीत बुडबुडत राहतो. याला फारसा पर्याय नसला तरी यापैकी कुठल्याच प्रवाहांमधे नसलेला अप्रकाशित प्रवाहही असतो, तर तो किमान प्रकाशात आला तर बरं, असं वाटतं. आदिवासी साहित्याचा असाच प्रवाह आहे, असं काही लोक सांगतात. आणि बाहेरून कोणी त्याबद्दल सांगण्यापेक्षा आदिवासी मंडळीच तसं म्हणत असतील तर ते ऐकून घेतलं पाहिजे, म्हणून आपण आपल्या विहिरीत ही नोंद करतोय. २) नक्षलवादाबद्दल जी सर्वसाधारण ढोबळ निरीक्षणं, लेख, बातम्या येतात, त्यात मूळ वादाच्या थिअरीशीही फारसं संबंधित नसलेलं आणि ह्या वादाचं प्रॅक्टिकल जिथे चाललंय तिथल्या लोकांशीही फारसं संबंधित नसलेलं असं काहीतरी आपल्या आजूबाजूला माध्यमांमधून सुरू असतं. यातही आपण काही बोलण्यापेक्षा आदिवासी मंडळीच बोलली तर बरं असं वाटत असल्यामुळे ही नोंद 'रेघे'वर करूया. हे बोलणं प्रत्येक वेळी कुठल्यातरी वादाबद्दलच असेल असं नाही, पण किमान लोकांना स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी जागा तरी देणं आवश्यक आहे. 'आदिवाणी'चं दुसरं पुस्तक ज्यांचं आहे ते ग्लाडसन डुंगडुंग झारखंडमधले मानवाधिकार कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी नक्षलवादी समस्येच्या सरकारी आणि माओवादी अशा दोन बाजूंना सोडून आपली आदिवासी बाजू आत्तापर्यंत धोका पत्करून मांडलेली आहे. 'आदिवाणी'ने काढलेल्या त्यांच्या पुस्तकाचं नाव 'व्हूज कंट्री इज इट एनीवे' असं आहे. ३) 'आदिवाणी' हा काही एक निश्चित हेतू घेऊन पर्यायी प्रवाह म्हणून सुरू असलेला प्रयत्न आहे, हेही सध्या बरं दिसतंय. आणि त्यासाठी काही निधी जमवण्याची त्यांची मोहीम सुरू आहे. नुकतीच सुरुवात असल्यामुळे या प्रकल्पाचं पुढे काय होईल याचा अंदाज बांधता येत नाही. त्यांच्या तीन प्रकाशित पुस्तकातील एका पुस्तकाबद्दल वेगळी नोंद 'रेघे'वर करण्याची उमेद आपण बाळगून आहोत. पुस्तक हातात आल्यावर खरं. तूर्तास, 'आदिवाणी'ची ओळख ते त्यांच्या वेबसाइटवर अशी करून देतात :

व्हूज कंट्री इज इट एनीवे
भारतामध्ये साडेआठ कोटीहून अधिक आदिवासी लोक राहतात. ही संख्या आकर्षक दिसते आणि अनेक आदिवासी मंडळींनाही त्यामुळे हुरूप वाटू शकेल. पण त्यांच्याबद्दल तशी आपल्याला काय माहिती आहे? इंटरनेटवर किंवा एखाद्या पुस्तकात आदिवासी जीवनशैलीचं साचेबद्ध अद्भुतरम्य वर्णन केलेलं सापडेल. आम्ही खरंच असे आहोत का, आमच्याबद्दल लिहिलं जातं ते खरोखरच तसं आहे का, याचं आम्हाला राहून राहून आश्चर्य वाटतं.

आदिवासींची एक वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक-राजकीय व सांस्कृतिक ओळख आहे आणि त्यातून त्यांना स्वयंपूर्ण समुदाय म्हणून टिकता आलंय. आदिवासी संगीत, गाणी, नृत्य हे फक्त सरकारी किंवा अन्य नागरी कार्यक्रमांच्या सुरुवातीला किंवा शेवटाला दाखवायची गोष्ट एवढ्यापुरतंच मर्यादित राहतं.

आदिवासी संघर्ष आणि संस्कृतीबद्दल आत्तापर्यंत नेहमी बाहेरच्या म्हणजे मुख्य प्रवाहातल्या इतिहासकारांनीच लिहिलं. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्यामधे आदिवासी नेत्यांनी दिलेलं योगदान बहुतेकसं दुर्लक्षितच राहिलं.

आदिवासी आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला अभिमानाने धरून आहेत, पण त्यांच्या या संपन्न वारशाचं कोणतंही दस्तावेजीकरण उपलब्ध नाही.

सध्याच्या आधुनिकीकरणाच्या आणि औद्योगिकरणाच्या काळात भारतामध्ये लोककलेला बाधा पोहोचण्याची शक्यता लक्षात घेता पारंपरिक मौखिक कथनशैली ही एक मृतप्राय संस्कृती आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

'आदिवाणी' हे या परिस्थितीला दिलेलं उत्तर आहे.

आमच्याबद्दल इतरांनी लिहिलं ते समाधानकारक आहे का? आदिवासी संस्कृती, इतिहास, लोककथा, साहित्य याबद्दल विश्वसनीय माहिती हवी असेल तेव्हा आम्ही काय वाचावं?

आम्ही आदिवासींसाठी आणि आदिवासींनी लिहिलेल्या साहित्याचा दस्तावेज करू इच्छितो. कथनाच्या मौखिक रूपांचं दस्तावेजीकरण करू इच्छितो. आदिवासी  लेखक, कवी, संशोधक किंवा या उपक्रमाबद्दल आत्मीयता वाटणाऱ्या सर्वांचा सहभाग 'आदिवाणी'मधे व्हावा अशी इच्छा.

'आदिवाणी'ची आत्तापर्यंतची तीन पुस्तकं ही किंमतीच्या अंगानेही परवडण्याजोगी आणि त्यांच्या हेतूला धरून आहेत. कुठल्याही व्यक्तीचं किंवा संस्थेचं भविष्यात काय होईल हे आपण सांगू शकत नसलो तरी आत्ता जे दिसतंय त्यावरून 'आदिवाणी'चा प्रयत्न दखल घेण्याजोगा वाटतोय. यात कोणाबद्दल खोटी कणव दाखवणं चुकीचंच ठरणार. वरच्या ओळखीत म्हटलंय तसं केवळ 'अद्भुतरम्य' पातळीवरची कणव बाजूला ठेवून किमान सर्वांना व्यासपीठं उपलब्ध असणं तरी आवश्यक आहे, या अंगाने या नोंदीकडे पाहावं. यासंबंधी खरंतर महाराष्ट्रातूनसुद्धा 'ढोल' हे नियतकालिक निघतं त्याचीही नोंद आपण 'रेघे'वर करायला हवेय. पाहू.

जाता जाता शहाद्याचे ज्येष्ठ कवी वाहरू सोनवणे यांची 'स्टेज' ही कविता देऊया :

आम्ही स्टेजवर गेलोच नाही
आणि आम्हाला बोलावलंही नाही.
बोटाच्या इशाऱ्यांनी-
आमची पायरी आम्हाला दाखवून दिली.
आम्ही तिथेच बसलो;
आम्हाला शाबासकी मिळाली.
आणि ‘ते’ स्टेजवर उभे राहून
आमचे दुःख आम्हालाच सांगत राहिले.
‘आमचे दुःख आमचेच राहिले
कधीच त्यांचे झाले नाही...’
आमची शंका आम्ही कुजबुजलो.
ते कान टवकारत ऐकत राहिले
नि सुस्कारा सोडला
आणि आमचेच कान धरून
आम्हालाच दम भरला-
‘माफी मागा; नाही तर..!’

No comments:

Post a Comment

डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ट अथवा नेट बँकिंगद्वारे रेघेची 'ऐच्छिक वर्गणी' भरायची असल्यास इथे क्लिक करावं.