Tuesday, 9 April 2013

दस्तयेवस्कीचं टिपण आणि माध्यम नियंत्रित माणूस

ही नोंद आजच्या काळाला किंवा आजच्या काळातल्या माध्यम नियंत्रित माणसाला किंवा माणूस नियंत्रित माध्यमाला अर्पण करूया. हे असं अर्पण का केलंय त्याचा पत्ता नोंदीच्या शेवटच्या वाक्यात लागेल. किंवा अधूनमधूनही लागेल.

फ्योदोर दस्तयेवस्कीच्या 'नोट्स फ्रॉम अंडरग्राउन्ड' या कादंबरीतल्या पहिल्या प्रकरणाचा हा मराठी अनुवाद आहे (मूळ रशियन मजकुराच्या मिरा गिन्सबर्ग यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादावरून केलेला). त्यामुळे हे झालं दस्तयेवस्कीचं टिपण. ही कादंबरी प्रकाशित झाली त्याला पुढच्या वर्षी दीडशे वर्षं होतील.
***

बंटम क्लासिक्स आवृत्ती
मी घृणास्पद माणूस आहे... मी दुष्ट माणूस आहे. मी अनाकर्षक माणूस आहे. मला माझ्या यकृतातून वेदना जाणवतायंत. पण खरंतर मला माझ्या आजारपणाबद्दल काडीचीही माहिती नाहीये. मला नक्की कुठं दुखतंय त्याबद्दलही मला खात्रीनं काही सांगता यायचं नाही. मी औषधं आणि डॉक्टर, दोघांबद्दही आदर बाळगून असलो तरी मी सध्या उपचार घेत नाहीये, किंबहुना कधीच घेत नव्हतो. शिवाय, मी पराकोटीचा अंधश्रद्धाळू आहे, म्हणजे औषधांवर विश्वास ठेवण्याएवढा तरी नक्कीच. (अंधश्रद्धाळू नसण्याएवढं माझं शिक्षण झालेलं आहे, पण तरीही मी अंधश्रद्धाळू आहे.) नाही साहेब, मी डॉक्टरांकडे जात नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे माझा दुष्टपणा आहे. हां, आता हे बहुधा तुम्हाला समजणार नाही. मी समजू शकतो. पण, यात माझ्या दुष्टपणामुळे मी कोणाला दुखावेन याचं स्पष्टीकरण मला नीटसं देता येईलसं नाही वाटत. मी उपचार न घेतल्याने डॉक्टरांना काही उल्लू बनवल्यासारखं होतं असंही नाहीये याची मला पूर्ण कल्पना आहे. उलट दुसऱ्या कोणाहीपेक्षा याने माझाच तोटा होतोय हे दुसऱ्या कोणाहीपेक्षा मलाच जास्त माहितेय. आणि तरीही मी उपचार करून घेत नाहीये, तर त्याचं कारण माझा दुष्टपणाच आहे. माझं यकृत दुखतंय काय? दुखू देत अजून थोडा काळ.

मी गेला काही काळ असाच जगतोय- साधारण वीस वर्षं. मी पूर्वी प्रशासकीय सेवेत होतो, हल्ली नाहीये. मी एक सुमार अधिकारी होतो. मी निष्ठूरपणे वागायचो आणि त्यातून आनंद घ्यायचो. अर्थात, मी लाच घ्यायचो नाही, त्यामुळे किमान अशा वागण्यातून तरी मी आनंद घ्यायला काय हरकत! (ठिकाय, हा खूप टुकार विनोद दिसतोय, पण मी तो काढून टाकत नाहीये. मी आता ते लिहिलंय, त्याचा विचार करणं खूप गंमतीचं होतं, पण आता लक्षात येतंय की, हा दिखावेबाजीचाच बेकार प्रयत्न होता आणि त्यासाठीच मी ते तसंच ठेवतोय.)

काही माहिती मागत अर्जदार लोक माझ्या टेबलापाशी येत तेव्हा मी त्यांना दात विचकावून दाखवायचो, आणि त्यांना त्रास देण्यात यशस्वी झाल्यानंतर मी तृप्ततेने नजर फिरवायचो. मी बहुतेकदा यशस्वी व्हायचोच. त्यातले बहुतेक लोक बुजरे असायचे : अर्थातच, ते अर्जदार होते म्हणून. तरीही काही दिमाख दाखवणारेही लोक असतच, त्यातल्या एका अधिकाऱ्याचा तर मला फारच राग यायचा. तो सारखा त्याच्या तलवारीचा कटकट आवाज करत राहायचा. मी सुमारे दीड वर्षं त्या मुद्द्यावर त्याच्याशी भांडत होतो. आणि अखेरीस मी जिंकलो. त्याने कडकडाट बंद केला. अर्थात, यालाही खूप वर्षं झाली. तेव्हा मी तरुण होतो. पण सदगृहस्थांनो तुम्हाला माझ्या दुष्टपणासंबंधीचा मुख्य मुद्दा माहितेय का? त्यातला सगळ्यात भुक्कडपणाचा आणि मला कायम माहीत असलेला, अगदी मी हिंसक व्हायचो तेव्हाही माहीत असलेला भाग असा की, मी अजिबात दुष्ट नव्हतो, होय अगदी कोणाला दुखावण्याचीही सवय मला नव्हती. मी चिमण्यांनाही घाबरवायचो ते उगाचच, केवळ माझं लक्ष दुसरीकडे वळवायला. मी अगदी तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत असलो तरी मला एखादा कपभर चहा द्या, की मी एकदम शांत होऊन जायचो. खरंतर मला खूप हळवं व्हायला व्हायचं, मला गलबलून यायचं, आणि मग मी स्वतःकडे पाहूनच दातओठ चावत बसायचो नि कित्येक महिने निद्रानाशात घालवायचो. असं ते माझं व्हायचं.

मी सुमार अधिकारी होतो असं मगाशी मी म्हटलं तेही खोटंच होतं. मी दुष्टपणानेच खोटं बोललो. मी सहज आपली चेष्टा करत होतो, अर्जदारांचं सांगितलं ते आणि अधिकाऱ्याचं सांगितलं तेही. खरंतर मी कधीच कोणाशी वाईट वागू शकलो नसतो. एकमेकांना विरोधात जाणाऱ्या अनेकानेक घटकांची जाणीव मला प्रत्येक क्षणी असायची. ते विरोधी घटक माझ्या आतमधे घुसळताना मला जाणवायचे. आयुष्यभर ते माझ्या आतमधे आहेत, आणि बाहेर येण्याची याचना करतायंत हेही कळायचं, पण त्यांना मी कधी बाहेर येऊ दिलं नाही. त्यांनी मला लाज आणली, त्यांनी मला फेफरं आणलं - अखेरीस मी त्याने अगदी कंटाळून गेलो होतो. सदगृहस्थहो, कदाचित आता तुम्हाला वाटत असेल की, मी कशासाठी तरी तुमची मनधरणी करतोय. क्षमायाचना करतोय असं वाटत असेल. खरंतर, मला खात्री आहे की तुम्हाला असंच वाटत असेल. पण मग मला हेही सांगायला हवं की, तुम्हाला तसं वाटत असेल तर माझं त्याच्याशी काहीच देणंघेणं नाही.

मी कोणाला त्रासदायक होऊ शकत नाही. खरंतर मी काहीच होऊ शकत नाही : वाईट नाही की चांगला नाही. नीच माणूस होऊ शकत नाही नि प्रामाणिकही होऊ शकत नाही. नायकही होऊ शकत नाही नि किटकही होऊ शकत नाही. आणि आता मी इथे कोपऱ्यात माझे दिवस काढतोय. आणि त्यासाठी एक निरुपयोगी तत्त्वज्ञान वापरतोय की, बुद्धिमान माणूस काहीच बनू शकत नाही. होय साहेब, एकोणिसाव्या शतकातला बुद्धिमान माणूस नैतिकदृष्ट्या एक व्यक्तिमत्त्व नसलेला प्राणी आहे; आणि व्यक्तिमत्त्व असलेला, कृती करणारा माणूस हा नक्कीच मर्यादा असलेला प्राणी असणार. हे माझं चाळिसाव्या वर्षी झालेलं मत आहे. चाळीस वर्षं- हे खरंतर सगळ्यांत वयोवृद्ध असण्याचं वर्ष आहे म्हणा ना. चाळीस वर्षांपुढे जगणं म्हणजे अश्लील आहे, अनैतिक आहे! तुम्हीच सांगा बरं, प्रामाणिकपणे सांगा हां पण, चाळीस वर्षांपुढे कोण जगतं? मूर्ख आणि नीच लोक. हे मी अगदी त्या पांढऱ्या केसांच्या नि गोडगोड हसणाऱ्या म्हाताऱ्यांच्या तोंडावरही सांगायला तयार आहे. हे सांगायचा अधिकार मला आहेच, कारण मीच साठ वर्षांपुढे जगणार आहे. सत्तर, ऐंशी... थांबा थांबा मला श्वास घेऊ दे.

सदगृहस्थांनो, तुम्हाला वाटत असेल की, मी इथे तुमचं मनोरंजन करू लागलोय, तुम्हाला हसवतोय. परत तुम्ही चुकलात. तुम्हाला वाटतं तसा मी गंमत्या मनोवृत्तीचा माणूस नाहीये. काही जणांना तसं वाटतं खरं. पण ह्या सगळ्या बडबडीने तुम्हाला वैताग आला असेल (आणि मला वाटतं की तुम्ही वैतागलेले असालच), तर तुम्ही मी कोण आहे ते तुम्ही विचारायला हवं मग मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन की, मी एक महाविद्यालयीन परीक्षक होतो. मी खाणं मिळावं म्हणून काम केलं (आणि फक्त तेवढ्याच कारणाने बरं का), आणि गेल्या वर्षी माझ्या एका दूरच्या नातेवाईकाने मरण्यापूर्वी माझ्या नावावर सहा हजार रुबल ठेवले, तेव्हा मी लगेच निवृत्ती घेतली नि या माझ्या कोपऱ्यात येऊन बसलो. इथे मी पूर्वीही राहिलेलो आहे. माझी खोली खूप भयाण, भिकार आणि शहराच्या एका टोकाला आहे. एक गरीब शेतकरी घरातली बाई माझी नोकर म्हणून काम करते. म्हातारी, मूर्ख आणि मूर्खपणामुळे मुजोर झालेली आणि शिवाय एक दुर्गंध सुटलेली ही बाई.

मला असं सांगण्यात आलं होतं की, पीटर्सबर्गचं हवामान माझ्यासाठी खराब असेल, आणि माझ्या तक्रारी लक्षात घेता याचा अर्थ असा की, पीटर्सबर्गमधे राहणं खूप महागडं असेल. मला हे माहितेय, त्या सगळ्या हुशार, अनुभवी आणि मानडोलव्या कौन्सेलरांपेक्षा मला हे जास्त माहितेय. पण तरी मी पीटर्सबर्गमधे राहतो. मी पीटर्सबर्ग सोडणार नाही. मी हे शहर सोडणार नाही, कारण... पण मी सोडलं काय नि नाही सोडलं काय, त्याने काय फरक पडतो.

तरीही पुढे बोलायचं तर - एखाद्या सभ्य माणसाला कशाबद्दल बोलताना सर्वाधिक आनंद होईल?

उत्तर : स्वतःबद्दल.

बरंय, तर मग मीही स्वतःबद्दलच बोलत जाईन.
***

फ्योदोर दस्तयेवस्की
११ नोव्हेंबर १८२१ - ९ फेब्रुवारी १८८१

7 comments:

 1. I wonder if you are the first to translate 'Notes from underground' in Marathi, even if parts of them. Even if you are not first, you are not surely much more than first!

  I have not read 'Notes' in its entirety. (What have I?)

  But I read great review of it in the "New Yorker'. Read it here: http://www.newyorker.com/online/blogs/books/2012/06/dostoevsky-notes-from-underground.html

  What I like about it is the claim of the book's modernity:

  "The modern element in “Notes from Underground” is Dostoevsky’s exultation in human perversity. You can read this book as a meta-fiction about creating a voice, or as a case study, but you can’t escape reading it also as an accusation of human insufficiency rendered without the slightest trace of self-righteousness. If you begin by grieving for its hero, he upsets you with so much truth of our common nature that you wind up grieving for yourself—for your own insufficiency. “Notes” is still a modern book; it still can kick. "


  ReplyDelete
 2. Thanks Aniruddha. I don't know whether I'm the first one to try this translation, but I hope I'm not the worst one.

  I have also not been able to read any of Dostoevsky's books in there entirety. Still I keep trying.

  I don't know how people define 'modernity', but if it means trying to decode the contemporary times, then this novel is indeed modern. And I agree with the last sentence of the New Yorker review : (This novel) '..still can kick'.
  Thanks for providing the link of the review.

  ReplyDelete
 3. I believe en excerpt of this was translated by Mr Vishram Gupte approximately 10 years ago in "Maha Nagar."

  Gupte has, to his credit, the translation of "The House of the Dead".

  "Karmazov Brothers" and "Crime...." were translated by Mr Bhau Dharmadhikari in late 80s (I think). Published by Continental Prakashan.

  ReplyDelete
 4. खूप वर्षांमागे अनिरुद्ध कुलकर्णी यांनी थोर रशियन कादंबरीकार दस्त्येव्हस्कीवर लिहिलेल्या लेखांचा संग्रह पाहिला होता. तोवर दस्त्येव्हस्कीचं काहीही वाचलेलं नव्हतं. त्यामुळे थोडं चाळून "एक चांगलं पुस्तक" असं मनाशी धरून ठेवून दिलं होतं. त्यानंतर केव्हातरी दस्त्येव्हस्कीच्या "क्राईम" ची तीर्थयात्रा घडली. मग त्याचा "तळघरातला माणूस" भेटला.

  काही महिन्यांपूर्वी अगदी अचानकपणे कुलकर्णींचं हे पुस्तक हाती लागलं. आणि हे पुस्तक आपण त्यावेळी ठेवून कसं दिलं याचं आश्चर्य वाटलं. १९८३-८४ सालामधे "नवभारत" या नियतकालिकांत आलेले हे लेख. एखाद्या लेखकाकडे कसं पहावं, त्याचा कुठल्या कुठल्या अंगाने अभ्यास करावा, त्याच्या लेखनातल्या प्रेरणा, त्याची शक्तीस्थानं, हे सगळं कसं उलगडून दाखवायचं याचा, हे पुस्तक म्हणजे एक आदर्श वस्तुपाठ आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

  एकोणीसाव्या शतकातली रशियामधली परिस्थिती , दस्त्येव्हस्कीची झालेली जडणघडण, त्याच्या वडलांचा खून , झारच्या विरुद्ध प्रचार करणार्‍या गटात निव्वळ सहभाग दाखवल्याबद्द्ल मृत्यूची शिक्षा ठोठावली असताना वधस्तंभापासून क्षमा मिळवल्यामुळे परत येणं, त्याची ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्मावरची श्रद्धा, त्या श्रद्धेतून निर्माण केलेले तत्वमंथन , त्याची एपिलेप्सी, जुगारीपणा या सार्‍याचा त्याच्या साहित्यावर कसकसा प्रभाव पडला, त्याच्या कादंबरीची वैशिष्ट्ये कुठली , त्यातून त्याच्या स्वतःच्या आयुष्याचेच जीवनप्रक्षेपण कसे झाले आहे, एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं प्रतिरूप अशी दुसरी व्यक्ती अशी "छाया व्यक्ती" तो कादंबर्‍यामधे कशी योजतो , त्याच्या लिखाणातल्या स्त्री व्यक्तीरेखा आणि त्याच्या आयुष्यातल्या स्त्रियांची त्यांवर पडलेली गडद छाया , त्याच्या लिखाणातल्या " सामाजिक/राजकीय बांधिलकी"चं स्वरूप , आणि या सर्वाचा बोधस्वर म्हणजे "विश्वबंधुत्त्वाचा चिद्घोष" त्याच्या "ब्रदर्स कारमाझफ" या शेवटच्या महान कादंबरीवर कसा घडतो याचं अत्यंत सुरस, मनोरंजक आणि अतिशय शहाणं असं वर्णन या फक्त १४० पानांच्या लेखसंग्रहातून आलेलं आहे.


  शीर्षक : "दस्तयेवस्की"
  लेखक : अनिरुद्ध कुलकर्णी
  काँटिनेंटल प्रकाशन
  पहिली आवृत्ती १९८५

  ReplyDelete
  Replies
  1. विश्राम गुप्ते :
   http://www.bookganga.com/eBooks/Book/5319920134393201983.htm?Book=Melelyanchi-Gadhi
   -------------

   कुलकर्ण्यांचं पुस्तक :
   http://www.bookganga.com/eBooks/Book/5659840834327545633.htm

   Delete
 5. Thanks for the links.

  Just read the blurb description of "मेलेल्यांची गढी". It is obvious there is some inspiration by Late Aniruddha Kulkarni behind Vishram Gupte's translation work : the translation has been dedicated to the memory of Mr. Kulkarni.

  To discover two authors of my liking were connected like this, it put a smile on my face.

  ReplyDelete
 6. I found this today.. just an information.. don't know much about the quality of translation-

  http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5752909524229344757&PreviewType=books

  ReplyDelete

डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ट अथवा नेट बँकिंगद्वारे रेघेची 'ऐच्छिक वर्गणी' भरायची असल्यास इथे क्लिक करावं.