Sunday, 30 October 2011

माझी भाषा

 - भूषण राजगुरू


(भाषेबद्दल बरीच चर्चा, भाषणं, लेख असं काय काय झडत, पडत असतं. भाषेच्या प्रवासाचे जे अनेक भाग असतील त्यातील एक भाग असलेल्या एकाला थोडंसं लिहायला सांगितलं. त्याने लिहून दिलं, ते इथे प्रसिद्ध होतंय. खालचे सगळे शब्द काळजीपूर्वक वाचले तर त्या प्रवासाचे काही स्वाभाविक कंगोरे कळू शकतील, असं वाटतं. आपल्या विनंतीवरून मजकूर लिहून दिल्याबद्दल भूषणचे आभार. ही मूळ नोंद ऑक्टोबर २००९मध्ये केली होती. तेव्हा रेघेचा पत्ता दुसरा होता, हा पत्ता वर्षभराने सुरू झाला, त्यामुळे आत ही नोंद इथे पुन्हा आणून ठेवतो आहे - रेघ)

मी मूळचा सोलापूरचा. ग्रामीण भागातून आल्यानं भाषेचा न्यूनगंड होताच. काही जर कुठं बोलायचं असेल तर सुरुवातीपासून पुणेरी स्टाईलने बोलायचं असं ठरलं होतं. पण चुकून थोडीतरी का होईना सोलापुरी भाषा बोलण्यात येतंच होती. 'सोलापुरी भाषा' पुण्यातील लोकांसाठी गावंढळ समजली जाते, त्यामुळे मी जरा जपून आणि थोडक्यात बोलत असे. मी कितीही सुधारणा करून बोललं तर पुढच्यांना ते लगेच लक्षात येत असे, आणि ते लगेच म्हणायचे, ''तुम्ही सोलापूरचे का?'' त्यामुळे या पुणेरी भाषेमुळे मला अधिकच न्यूनगंड निर्माण झाला. त्यामुळे सगळ्यांशी बोलताना विचार करून बोलायला सुरुवात केली. खरं सांगायचं तर, या नाटकी बोलण्याचा मला तरी कंटाळा येतो. त्यामुळे मी माझ्या जवळच्या मित्रांशी बोलताना मात्र माझ्याच भाषेत बोलायचो/बोलतो. ते मला जास्त आवडतं. त्यामुळे मनमोकळ्या गप्पा होत असत. मात्र, तो परिस्थितीचा एक भाग झाला. पण जी सत्य परिस्थिती आहे, ती स्विकारणं जास्त योग्य ठरेल. त्यापासून पळवाटा काढण्यात काही तथ्य नाही. म्हणून मी परिस्थिती स्वीकारून चांगल्याप्रकारे इतर मुले-मुली कशी बोलतात ते पाहून बोलण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यांत मला मित्रांकडून चांगल्या प्रतिक्रियासुद्धा मिळू लागल्या. त्यामुळे सकारात्मक विचार करण्यास सुरुवात केली.

मी जेव्हा २००७मध्ये पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात प्रवेश घेतला, त्यावेळी सगळ्यांशी जपून वागत असे, कारण 'बोलण्यात काहीतरी चूक होईल का?' ही भीती मनात होती. पण हळूहळू ती भीती निघून गेली, कारण आपल्यासारखेच सगळेजण आहेत, त्याच भाषेत बोलतात, फक्त कमी-जास्त प्रमाणात त्यांची भाषा चांगली किंवा वाईट असते, हे लक्षात आलं. एखादी गोष्ट येत असूनही वर्गात न बोलण्याची सवय मात्र अद्यापही गेलेली नाही. कारण बोलण्यात काही चुकेल का? असा प्रश्न पडतो. यामुळे माझंच नुकसान आहे, हेसुद्धा लक्षात येतं, त्यामुळे पुण्यात आल्यानंतर प्रथम मराठी भाषा सुधारण्याचा प्रयत्न केला आणि तो थोड्याफार प्रमाणात यशस्वीही झाला. म्हणून आता पुढचं पाऊल असेल ते, इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.


- भूषण राजगुरू (ई- मेलसाठी पत्ता: rajguru.bhushan20@gmail.com)

Friday, 23 September 2011

माणूस नामका धरम्

- प्रकाश जाधव

रात धुंड्या दीस धुंड्या
पर कोन आयताच गवशा नय
पीर धुंड्या दरगा धुंड्या
पर होनी को किसने टाल्या नय
जुम्मेसे बैठ्या मह्यनेसे बैठ्या
पर हज का पानी आठ्या नय
खुद को धुंड्या माळरान धुंड्या
कोन पाक नजर गवशा नय
दीस भाय धुंड्या रात बेगम धुंड्या
पर माणूस नामका धरम गवशा नय

(`दस्तखत`मधून)

***

नोव्हेंबर १९५१ जन्म (मूळ गाव कोतवली, ता. खेड, जि. रत्नागिरी) नंतर मग मुंबईत शालेय शिक्षण. वणवण भटकंती, अफाट दारिद्र्य, मुंबईच्या जमिनीवरच्या नि पाताळातल्या वास्तवाशी परिचय. वर्तमानपत्रं टाकण्यापासून कित्येक काम केली, एअर इंडियात लोडर म्हणून नोकरी. दादर पुलाखाली ही गाजलेली कविता. १९७८ साली दलित साहित्य संसदेतर्फे दस्तखत हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध. झक, मुर्दाबाद नावाचं शहर या कादंबऱ्या, असाही एक हिंदुस्तान नावाचं नाटक, काही कथा असं अजून काहीनाकाही लिहिलेलं. हिंदीतही कविता लिहिलेल्या. शिवाय चंद्रकान्त पाटील आदींनी काही मराठी कविता हिंदीत अनुवादित केलेल्या. साम्यवादी विचारांशी बांधिलकी. २००१ साली ब्रेनहॅमरेजच्या ऑपरेशननंतर स्मृती हरवली. २९ जुलै २०११ला निधन.

(वर दिलेला मजकूर 'प्रतिशब्द प्रकाशन' (मुंबई) व  ना. धों. महानोर नि चंद्रकान्त पाटील यांनी संपादित केलेल्या 'पुन्हा एकदा कविता' यांच्या मदतीने आहे.)

***
ही भाषा कोण्या एका धर्माची नाही, पंथाची नाही. सगळी नैतिक, अध्यात्मिक बंधने झुगारून तथाकथित लोकांच्या मर्यादित जगापलीकडे जगत असलेल्या एका असंतुष्ट समूहाची ती भाषा आहे. दस्तखतमधील कविता या समूहाचे प्रतिनिधित्व करतात. – अर्जुन डांगळे (दस्तखतची प्रस्तावना)

Monday, 19 September 2011

त्यांनी बोलायची हिंमत दाखवली, पण दांतेवाडात असलं चालत नाही

इकडे आड तिकडे विहीर अशा माओवादी नि सरकारी गोंधळात सापडलेल्या दोघांच्या गोष्टीची ही सुरुवात इथे भाषांतरिक करून दिल्येय. पूर्ण वाचण्यासाठी गोष्टीचं --
-- मूळ- They dared to speak up. But that’s not done in Dantewada   (Tehelka)


ही एका आदिवासी महिलेची ही गोष्ट आहे. नाव सोनी सोरी, वय ३५. सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षिका. तुम्ही हे वाचताय तेव्हा ती छत्तीसगढमधल्या जंगलांमध्ये लपलेली आहे. ती लपलेय कारण बहुधा तिला जरा जास्त माहिती आहे. ११ सप्टेंबरला जेव्हा सोरी या प्रतिनिधीशी बोलल्या तेव्हा त्यांनी नुसतीच आपली जागा बदलली होती. त्या संध्याकाळी तिथल्या पहाडी प्रदेशात लपल्या होत्या, त्यांनी बुटांची टाप ऐकली. त्या पळाल्या. पोलिसांनी गोळ्या झाडल्या. त्या वाचल्या.

आता ही गोष्ट आहे एका आदिवासी पुरुषाची. नाव लिंगाराम कोडोपी, वय २५. छत्तीसगढमधला एक जीप चालक. पूर्वी त्याला माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पक्षपद देण्याची लालूच दाखवली होती. त्याने नकार दिला. तेव्हापासून त्याला धमक्या येतायेत. एकदा त्याला दांतेवाडा पोलीस स्थानकातील संडासात ४० दिवस डांबून ठेवण्यात आलेलं, भयंकर मार देऊन, नंतर त्याला विशेष पोलीस अधिकारी (स्पेशल पोलीस ऑफिसर- एसपीओ) म्हणून दाखल होण्यासाठी दर महिना १२ हजार रुपये देऊ करण्यात आले. त्याने नकार दिला. तेव्हापासून तो पोलिसांच्या निशाण्यावर आहे. २००९च्या सप्टेंबरमध्ये कोडोपीनेही तेच केलं जे छत्तीसगढच्या दुर्दैवी प्रदेशामधल्या अनेकांना करायला लागलंय- तो पळाला.

दिल्लीमध्ये कोडोपी एका एनजीओच्या तळघरात राहतो नि त्याने नोएडात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलाय. 'मला एवढं माहितेय की मी जर परत गेलो तर मला अटक होईल', असं कोडोपीने 'तेहेलका'ला गेल्या वर्षी सांगितलं होतं. 'पण मी भिऊ कशाला? मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचंय. नक्षलवादी नि पोलीस दोघेही मला धमकावतात कारण की मी त्यांना घाबरत नाही हे त्यांना माहितेय.'

चालू वर्षी एप्रिलमध्ये तीन दिवसांच्या पोलीस कारवाईत ३०० घरं भुईसपाट झाली तेव्हा कोडोपी दांतेवाडाला परतला. त्याने मोरपल्ली, ताडमेटला आणि तिम्मापुरम इथल्या जळून गेलेल्या घरांना भेटी दिल्या, 'कोब्रा' आणि 'कोया' कमांडोंच्या हल्ल्याने झालेली पडझड त्याने बघितली. बलात्कारित बायकांची भेट घेतली आणि पोलिसांच्या अत्याचाराची त्यांनी सांगितलेली कहाणी व्हिडियो रेकॉर्ड केली. स्वतःच्याच लोकांच्या कहाण्या जमवण्याचे काम त्याने सुरू केलं.

कोडोपीला १० सप्टेंबरला अटक करण्यात आली. दांतेवाडाचे पोलीस अधीक्षक अंकित गर्ग यांनी या बातमीला दुजोरा दिला: शासनाविरोधात युद्ध छेडणे, राष्ट्रद्रोह, गुन्हेगारी कट रचणे या आरोपावरून छत्तीसगढ सार्वजनिक सुरक्षा कायदा, बेकायदेशीर कृत्ये (रोखण्यासाठी) कायदा आणि कलम १२१, १२४ ए व १२० बी यांच्याखाली त्याला अटक करण्यात आली.

गेल्या स्वातंत्र्यदिनाला, माओवाद्यांनी जेव्हा कोडोपीच्या गावामध्ये काळा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने त्यांच्यासमोर तो फाडून टाकला. जेव्हा त्यांनी त्याची आत्या सोनी सोरीला आपल्या आश्रम शाळेवरून भारतीय ध्वज काढायची आज्ञा केली, तेव्हा तिने नकार दिला. 'खूप लोक यासाठी मेलेत', तिने बंडखोरांना सांगितलं.

...म्हणून ही गोष्ट महत्त्वाची आहे; आदिवासींसाठी बोलत असल्याचा दावा करणाऱ्या अनेक आवाजांच्या गदारोळात हा एक वेगळा, अधिक स्पष्ट आणि थेट सूर ऐकू येतोय.

आत्ता जूनमध्ये 'तेहेलका'ला माहिती मिळाली की, अटक होण्याच्या काही महिने आधी, लिंगाराम कोडोपी वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि बस्तर विभाग आयुक्त के. श्रीनिवासुलू यांना भेटला होता. 'पोलीस नि माओवादी दोघेही माझ्या लोकांना मारतायेत. हे थांबायला पायजे', असं कोडोपी त्यांना म्हणाला होता.

Tuesday, 13 September 2011

रघू दंडवते : निखळ मराठी गद्यशैलीचा लेखक

- चंद्रकान्त पाटील

(रघू दंडवते गेले त्याला आजच्या १३ सप्टेंबरला दोन वर्षं पूर्ण होतायंत. त्यांची आठवण काढण्यासाठी चंद्रकान्त पाटील यांचा हा लेख येथे प्रसिद्ध होत आहे. दंडवते गेले त्यानंतर 'सकाळ'मध्ये हा लेख मूळ प्रसिद्ध झाला होता, तो या ब्लॉगवर पोस्ट करायची परवानगी पाटील यांनी दिली, त्यांचे आभार मानून हा लेख इथे)

रघू दंडवते
रघू दंडवते नावाचा एक विलक्षण माणूस रविवारी रात्री नगरसारख्या शांत ठिकाणी कालवश झाला. फार थोड्या लोकांना रघू माहीत असेल; आजच्या पिढीला तर त्याची माहिती अशक्‍यच आहे. आजच्या पिढीला इतिहासाचे आणि त्यातही वाङ्‌मयेतिहासाचे जास्तच ओझे वाटते. रघू साहित्यातला एक अफलातून माणूस होता; पण लघुनियतकालिकांतल्या काही लोकांपुरतीच त्याची ओळख होती. एका प्रखर विद्रोही चळवळीत राहूनही आपल्या असण्याची फारशी जाणीव होऊ द्यायची नाही, हे रघूचं वेगळेपण होतं.

नगरच्या प्रख्यात अशा रावबहाद्दूर दंडवते यांच्या घराण्यात जन्मलेला रघू काय शिकला होता, मुंबईत कधी आला, काय नोकरी करीत होता, आयुष्यभर अविवाहित का राहिला, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं आमच्यापैकी कुणालाही माहीत नाहीत; फक्त त्याचा लहान भाऊ आणि नाटककार वृंदावन दंडवते आणि त्याचा दीर्घकालीन अभिन्न मित्र अशोक शहाणे यांनाच ते माहीत असायची शक्‍यता आहे.

लघुनियतकालिकांच्या चळवळीतल्या आघाडीच्या शिलेदारांत रघूचं स्थान होतं. अगदी आरंभापासून रघू अशोकसोबत होता. अशोकनं 'अथर्व', 'असो'पासून 'रहस्यरंजन', 'अभिरुची' आणि 'मुंबई दिनांक'पर्यंत बरीच मुशाफिरी केली, बरीच लघुनियतकालिकं काढली, बऱ्याच नियतकालिकांना प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष मदत केली, आणि त्या सगळ्या ठिकाणी अशोकसोबत रघू होताच; अगदी अपरिहार्यपणे होता.

थोडेच; पण मार्मिक बोलणे
१९६० च्या पूर्वार्धात मुंबईत काही समविचारी लोकांचा एक मोठाच गट तयार झाला होता. त्यांना जोडणारा दुवा अर्थात अशोकच होता. अरुण कोलटकर, रघू दंडवते, भाऊ पाध्ये, अशोक शहाणे, वृंदावन, भालचंद्र नेमाडे, शरद मंत्री, मनोहर ओक, माधव वाटवे, नंदकिशोर मित्तल, यांच्यापासून ते अगदी राजा ढाले, वसंत दत्तात्रेय गुर्जर, सतीश काळसेकर, अरुण खोपकर अशा त्या काळच्या तरुणतुर्कांपर्यंत मोठाच समुदाय फोर्टातल्या एका हॉटेलात जमत असे. प्रस्थापित साहित्याबद्दलचा असंतोष, संस्कृतीतल्या नाटक, चित्रपट, चित्रकला, संगीतासारख्या सगळ्या कलांबद्दल सखोल आस्था, समाजातला दांभिकपणा आणि दाखवेगिरीबद्दल चीड, साहित्याच्या स्वायत्ततेला विरोध आणि सामाजिक बांधिलकीबद्दल प्रत्यक्ष जगण्यातूनच आलेली खोलवरची आस्था, निश्‍चित राजकीय भूमिका, अपरिहार्यतेतून आलेली प्रायोगिकता, काहीतरी नवे, वेगळे करण्याची तीव्र इच्छा, आणि प्रत्यक्ष जगण्याला सार्वभौम मानण्याची आणि जगणं शब्दात, कलेत, रंगात उतरवण्यासाठीची अस्वस्थता आणि हे सर्व करत असताना कलात्मकता ढळू न देण्याचा आटोकाट प्रयत्न - अशा अनेक गोष्टींनी हे लोक एकत्र आलेले होते. ज्या ज्या वेळी मी मुंबईला त्या हॉटेलात जात असे त्या त्या वेळी अगदी शांतपणे ऐकून घेणाऱ्यात अरुण कोलटकर आणि रघू दंडवते असायचे. त्यातही अरुणपेक्षा रघू वेगळा वाटायचा - मधेच एखाद्या मार्मिक वाक्‍याने तो सगळ्यांना विचार करायला भाग पाडायचा.


विलक्षण कवित्वाचा साक्षात्कार
साहित्याची विलक्षण जाण आणि नेमकेपणानं सार काढण्याची रघूची सवय मला मोलाची वाटायची. त्याच्यासोबत गप्पा मारताना आपले मुद्दे समोरचा माणूस चोरून घेईल, या भीतीपोटी साहित्यावर गनिमी पद्धतीनं बोलायची त्याला सवय नव्हती. आपल्याहून वयानं लहान असणाऱ्यांकडे चेष्टेखोरपणे बघायची त्याची वृत्ती नव्हती. उलट कुणाकडूनही काही नव्यानं माहीत झालं तर त्याला त्या माणसाबद्दल आदरच वाटायचा. रघूमधे खरं तर एक कुतूहलानं पछाडलेलं लहान पोर दडलेलं असायचं. एक निरागसता असायची. रघूनं फार कमी कविता लिहिल्या, पण ज्या काही कविता लिहिल्या, त्या अभूतपूर्व होत्या. खूपच कमी कविता लिहिल्यामुळे त्याला कवी म्हणायची सगळ्यांना पंचाईत वाटायची! लघुनियतकालिकांच्या कवितेत काय, मराठीच्या मध्यवर्ती प्रवाहातही रघूनं लिहिलेल्या कविता अनन्य आहेत. अगदी आरंभीच्या काळातल्या त्याच्या कवितांमधून येणारे विषय, त्यांची अत्यंत सरळ, साधी वाटणारी भाषा, रचना आणि कवितेचा एकूण रूपबंध भिडतो; पण फार महत्त्वाचा वाटत नाही. पुन्हा पुन्हा वाचल्यावरच कळतं की, कवितांचा सरळ-साधेपणा आणि बालसुलक्ष भीती वा कुतूहल फसवं आहे. त्यात विस्कटलेल्या सद्यकालीन समाजातली सामान्य माणसाची घुसमट आहे, दुःखं आहेत, भयग्रस्तता आहे. एकदा या गोष्टी उकलू लागल्या की रघूच्या विलक्षण कवित्वाचा साक्षात्कार होतो. अगदी नंतरच्या त्याच्या राजेंद्रसिंह बेदी ('एक चादर मैलीसी' या महत्त्वाच्या कादंबरीचे लेखक) यांच्यावरील दोन कवितांमध्येही ही कवित्वशक्ती जाणवते. रघूच्या आयुष्याच्या वाढत्या सांजवेळी अशोकनं प्रकाशित केलेला रघूचा 'वाढवेळ' हा छोटेखानी कवितासंग्रह वाचल्यावर कुणालाही रघूच्या विलक्षण कवित्वाची सहज कल्पना येईल.


 हिंदी सिनेमावर टवटवीत लेखन
रघूची भाषेची जाण, मराठीपणाची अस्सलता अपवादात्मक आहे. त्यानं लिहिलेली 'मावशी' ही गोष्ट भाषेच्या अंगानं आणि आशयाच्या अंगानंही उत्कृष्ट मराठी गद्याचा नमुनाच आहे. 'मावशी'मुळेच मी कायमच रघूच्या 'कादंबरी लिही' म्हणून मागे लागत असे. 'वसेचि ना' ही एक वेगळ्याच प्रकारची कादंबरी लिहून झाल्यावर रघू म्हणाला, 'तुला आता इतका पश्‍चात्ताप होईल, की तू आता कुणालाही कादंबरी लिही असं म्हणणारच नाहीस!' रघूच्या उत्कृष्ट भाषेचं आणखी एक उदाहरण म्हणजे राम मनोहर लोहिया यांच्या दिल्लीवरील हिंदी लेखाचा रघूनं केलेला अप्रतिम अनुवाद आहे. 'अभिरुची'च्या दुसऱ्या पर्वात अशोक शहाणे जेव्हा 'अभिरुची'चं संपादन करू लागला तेव्हा रघूनं हिंदी सिनेमांवर 'जंगोरा' नावानं एक सदर चालवलं होतं ते आजही वाचताना टवटवीत, नवीन वाटतं.

'आता कविताही लिहा की।'
एरवी शांत बसणारा रघू मधूनच मार्मिक बोलायचा हे वर आलंच आहे. त्याला विनोदाचं चांगलंच अंग होतं, आणि त्याचा विनोद 'अस्वली' होता, म्हणजे गुदगुल्या करून मारणारा होता. त्याचं एक उदाहरण मला अरुण खोपकरनं सांगितलं ते असं- आजन्म समाजवादाचा वसा घेतलेले एक थोर कवी अधिकारवाणीनं रघूला म्हणाले, ''तू 'मावशी' नावाची एक फार चांगली गोष्ट लिहिल्याचं मला दोघा-तिघांनी सांगितलं. तर आता नीट योजनाबद्ध कथा लिहून एक संग्रह करायचं बघ. अरे, आपण सातत्यानं लिहिलं पाहिजे. सातत्य ठेवल्यामुळेच माझा चौथा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे बघ.'' इतका वेळ शांतपणे ऐकून घेणारा रघू चेहऱ्यावर निरागसता आणून म्हणाला, ''अरे वा! छान! चार कवितासंग्रह प्रकाशित झाले हे उत्तम. पण आता एखादी कविता लिहायचं मनावर घ्या की!'' नंतर रघू निमूटपणे निघून गेला, पण ते समाजवादी कवी मात्र फारच घायाळ झाले!

सत्तरच्या दशकात जेव्हा मी अशोक - रघूला भेटायला आणि मुक्कामाला त्यांच्या घरी कांदिवलीला गेलो होतो, तेव्हाचं ते घर अजूनही माझ्या मनात तसंच 'वसलेलं' आहे. अशोक आणि रघू त्या वेळी अत्यंत साधेपणानं राहत होते. साधेपणा किती, तर त्यांच्या घरात तेव्हा सगळीच्या सगळी भांडी मातीची होती, अगदी तव्यापासून झाऱ्या - चमच्यापर्यंत आणि एका खोलीत सगळ्या भिंतींना लावून मराठी, इंग्रजी, बंगाली, हिंदी, उर्दू पुस्तकांच्या थप्प्या रचलेल्या होत्या. पुस्तकांचा ठोक व्यापार करणाऱ्याचं दुकानच वाटायचं त्यांचं घर! आणि घरातले सगळेच्या सगळे कपडे खादीचे होते. गांधी, 'स्मॉल इज ब्यूटिफुल' आणि स्वातंत्र्यपूर्व काळातल्या व स्वातंत्र्यानंतरच्या दोन दशकांपर्यंतच्या समाजवादावर रघूची अपार श्रद्धा होती. नंतरच्या काळात ही श्रद्धा कोलमडली; पण रघूची खादी आणि विडी अखेरपर्यंत सुटली नाही.

अविचल नैतिक बाणा, जगण्यातून हद्दपार केलेली तंत्रज्ञानप्रणीत आधुनिकता, साधेपणा, खास मराठी वळणाच्या भाषेची अंगभूत लकब, अशा अनेक वैशिष्ट्यांसह रघू जगला. साहित्यात रघूनं भव्यदिव्य असं किंवा पुढच्या पिढीला आदर्शवत वाटेल, असं काही केलं नाही. पण साहित्यिक संस्कृतीत रघूसारखी जाण असलेली माणसं जे काही थोडंथोडकं करून ठेवतात, त्यानंच साहित्यिक संस्कृतीचा पोत बळकट व्हायला, हळूहळू का असेना, मोलाची मदत होत असते! पोत म्हटल्यावर एकेका धाग्याची ओळख अशक्‍यच आहे. म्हणूनच रघूच्या निधनाची बातमी देताना रघूची ओळख मधू दंडवते यांचा भाऊ अशीच असणार - माझ्यासारख्यांना कितीही वाईट वाटलं तरी!
***

Wednesday, 16 March 2011

दोन कविता

- चंद्रशेखर खैरनार

पावलांचा गोलाकार...

चिंब नाद

पावलांची साद

लगबग भगव्याची

टप-टप सरी

ओढ माऊलीची

दूर माळरानावर

विसावला गजर

पताक्यांचे निशाण

निळ्या शुभ्र ढगांची राखण

वाळलेल्या रंगीबेरंगी कपड्यांचा थवा

झोका घेतो मनसोक्त

पूर्वेस सकाळ पहारी

हळूच डोकावी ज्ञानतेजू

ताल मृदुंगाचा गजर

आकाशभरी अंत:करण

चिखल मातीत

अनंत पावलांचा मळा फुले

विठू नाचे त्यासंगे मनसोक्त

सगळा त्राण विसावला

माउली गजरात

माय-बाप मुक्त

जगण्यातल्या आगीतून

फुगडीच्या गरगरीत

हातांची गुंफण

गर- गर, फर-फर

पावलांचा गोलाकार.

माउली भेटे मातीत


जीनं बदमाश

अर्ध पोटभर खावं 

घोटभर प्यावं

उताणं पडावं

रस्त्याच्या कडेला

वाटलं तर फिरावं 

इकडं- तिकडं

जीनं बदमाश

असल्याचं म्हणत

थंडीत, पावसात हुडहुडावं

उष्म्यानं तंगड्या

ताणून मरावं

पालिकेच्या गाडीतनं

हिंदळत जावं

अन मुक्काम,

शवागारात बेवारस

Sunday, 20 February 2011

गुरुदेव रवींद्रनाथ, ‘ऋग्वेदी’ आणि पंडितजी

- प्रसन्नकुमार अकलूजकर

पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर दैनिक 'सकाळ'मध्ये मी एक लेख लिहिला. या लेखाचा मथळा थोडा वेगळा होता. तो गुरुदेवांच्या ‘गीतांजली’तून घेतला असल्यामुळे काहींना तो अपरिचित वाटला असण्याची शक्यता आहे. लेख वाचून होताच अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यात एक प्रतिक्रिया डॉ. अनिल अवचटांची होती. त्यांना लेख आवडला पण ऋग्वेदी आणि त्यांचे अभंग गीतांजली हे पुस्तक याबद्दल त्यांनी आवर्जून विचारणा केली. लेख वाचणाऱ्या बहुतेकांनी या संदर्भात विचारणा केल्यामुळे हे छोटेसे टिपण आपणापर्यंत पोहोचवतो आहे. त्यात माझे भाष्य किंवा कोणतीही टीका-टिप्पणी नाही.

रवींद्रनाथ टागोर
गुरुदेवांचे मूळ बंगाली काव्य (देवनागरीत), त्याचा ऋग्वेदी यांनी केलेला भावानुवाद व अतिशय समर्पक असे मराठीतील विवेचन पुढे देत आहे. शिवाय मूळ बंगाली गीताशी साधर्म्य सांगणारा तुकाराम महाराजांचा अभंग व त्याचेही ऋग्वेदी यांनी केलेले रसाळ निरुपण सोबत दिले आहे. जाणकार वाचकांना ते आवडेल असे वाटते. असो.

गुरुदेवांचे गीतांजली हे काव्य जगविख्यात आहे. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाल्यामुळे देशा-परदेशांतील विद्वानांच्या ते परिचयाचे झाले. मात्र ‘नेटिव्हां’च्या भाषेत त्याचा भावानुवाद होणे अगत्याचे होते. ते काम ऋग्वेदी यांनी केले. हा मूळ अभंग व त्याचे मराठीतील विवरण सोबत दिले आहे.
माझ्या लेखाला मी जे शीर्षक दिले होते ते असेः ‘गान दिये हे तोमाय खुंजि बाहिर मने’.
रानडे इन्स्टिट्यूटमधील माझे विद्यार्थी श्री. निरुपम बॅनर्जी यांनी मला गुरुदेवांची या शीर्षकाची मूळ बंगाली कविता उपलब्ध करून दिली. ती अशीः

१) गान दिये जो तोमाय खुंजि
बाहीर मोने
चिरो दिवश मोर जीबोते।
निये गेछे गान आमारे
घॉरे घॉरे दारे दारे
गान दिये हाथ बुलिये बेडाई
एइ भुबोने।

२) कॉतो शेखा शेई शोखालो
कॉतो गोपोन पाथ दॅखालो
चिनिये दिलो कॉतो तारा
हृद गॉगने।

३) बिचित्रो शुख-दुखेर देशे
रहश्यो लोक घुरिथे शेशे
शोन्धा बिले बेलाई निये एलो
कोन भवाने।

(९ श्रावण १३१७ बंगाली नियतकालिकानुसार)

आता ऋग्वेदींनी केलेला तेवढाच अप्रतिम, सहजसुंदर प्रासादिक भावानुवाद पाहा-

गानाच्या योगानें आलो मी चालत।
तुजला शोधीत जन्मोजन्मीं।।

हिंडलो मी गान गात घरोघरीं।
द्वाराहुनी द्वारीं बहुकाल।।

गानरुपी हाते स्पर्शिलें भुवन।
केलें संशोधन गानद्वारें।।

ज्ञान आजवरी मज जें लाभलें।
पथ जे देखिले गूढ ऐसे।।

हृदय-गगनी तारे जे उदेले।
प्रगट झाले गाने सर्व।।

सुखदुःख याचें रहस्य जाणिलें।
गानें आकळीले गूढ त्यांचें।।

झाली संध्यावेळ प्रवास संपला।
कवण्या दाराला आलों गात।।

तुझिया कंझीची रम्य पुष्पमाला।
माझ्या हृदयाला स्पर्शेना का।।

गुरुदेव रवींद्रनाथांनी ‘गीतांजली’मध्ये प्रमुख्याने मृत्युविषयक 
भीमसेन जोशी
चिंतन करणारे आणि ईश्वराचा शोध घेणारे काव्य रचिले आहे. पंडित भीमसेन जोशी गेल्यानंतर दैनिक 'सकाळ'ने माझ्याकडे लेखाबाबत विचारणा केली. त्यातही निरंजन आगाशे व चंद्रशेखर पटवर्धन (दोघेही मित्र) यांनी आग्रह केला. पंडितजींची प्रकृती गंभीर होती, केव्हातरी त्यांच्या निधनाचे दुःखद वृत्त येणार याचीही कल्पना होती.
पंडितजींबद्दल लिहिताना, तेही ललित शैलीने लिहिताना सहजपणे ऋग्वेदींचे पुस्तक हाती आले. हे पुस्तक 1928-29 साली प्रकाशित झाले आहे. ऋग्वेदी यांच्या ठायी विद्वत्त्व आणि कवित्व दोन्हीही वसले होते. त्यामुळे गुरुदेव रवींद्रनाथांच्या या तत्त्वचिंतनात्मक काव्याचा भावानुवाद त्यांनी वरीलप्रमाणे केल्याचे दिसते. पंडितजींविषयी लिहिताना त्याचाच आधार घ्यावा असे वाटले आणि ‘भाष्यकाराते वाट पुसत’ मी या काव्यापाशी येऊन ठेपलो.

ऋग्वेदी यांनी या काव्याचा भावार्थ आणि त्याचबरोबर रहस्यही सांगितले आहे. भावार्थ सांगताना ऋग्वेदी म्हणतात-
‘‘माझे अनेक जन्म झाले. या जन्मामध्ये केवळ तुझें गीत गात आणि तुला शोधीत मी हिंडत आहे. अनेक गृहांमध्ये आणि द्वारांत मी प्रवेश करीत आलो, त्यावेळी मी गात-गातच हिंडलो आहे. गानाच्या योगाने विश्वाशी माझा स्पर्श घडला. माझे अंतर्बाह्य शोधन त्यायोगे झाले. मला ज्ञानप्राप्ती होऊन, जगाचे गूढ कळून यायला हे गानच कारण झाले आहे. हृदयाकाशात तेजःपुंज ताऱ्यांचा प्रकाश पडण्याला किंवा सुखदःखाचे रहस्य समजण्याला या गानाचा उपयोग झाला. याप्रमाणे गीत गात गात माझा प्रवास चालू असून तो बंद पडण्याचा समय आला आहे. संध्याकाल झाला. अहा! मी फिरत फिरत आणि गीत गात कोणत्या (राजमंदिराच्या) द्वाराशी येऊन पोहोचलो बरे! प्रभो! तू प्रेमलिंगन देऊन माझा स्वीकार करशील काय?

रहस्य! सर्व धर्मांचे अनुयायी ईशस्तवन गीताच्या द्वारे करतात. परमेश्वराच्या विश्वरचनेत गीत, ताल व सुस्वर यांची नियमबद्धता सर्वत्र दृष्टीस पडते. ही जाणण्यास या विश्वाचे रहस्य जाणले पाहिजे. अत्यंत प्राचीन काळी मनुष्यप्राण्याने प्रथमतः ईशस्तवन केले ते वेदांतील गीतांनी. त्यानंतर अनेक धर्मसंस्थापक व साधुसंत ईश्वराचा शोध करीत हिंडले. त्यांनीदेखील गीताच्या मदतीने ईश्वरीप्रेमाचे आकलन करण्याचा प्रयत्न केला. याचे कारण संतांनीच निवेदले आहे ते असे-

गायनाचे रंगी। शक्ति अद्भुत हे अंगी।
हे तो देणे तुमचे देवा। घ्यावी अखंडित सेवा।
अंगी प्रेमाचे भरते। नाही उतार चढते।
तुका म्हणे वाणी। परम अमृताची खाणी।।’’

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आधार घेऊन ऋग्वेदी यांनी अप्रतिम विवेचन केले आहे. त्यातील काही महत्त्वाचा भाग पुढे देत आहे. संगीत वा गीत (किंवा गीतगायन) म्हणजे ईश्वरप्राप्तीचेच साधन आहे. गायनाशी एकरुप होणे म्हणजे साध्य आणि साधन यांचे एकजीवित्व होय. ऋग्वेदी म्हणतात-
‘‘दुसऱ्या दृष्टीने पाहिले तरी आमचे जीवित म्हणजेच एक गीत आहे. ते सुसंगीत झाल्यास हे जीवन सुखावह होऊन अंतकाली कलेवर टाकताना ईशस्मरण होईल आणि जीवाचा उद्धार होईल. या गानातील स्वर बेताल व बेसून झाल्यास सुखाच्याऐवजी दुःख भोगणे प्राप्त होईल. ही स्थिती सर्वस्वी सुधारणे, सुख तेवढे प्राप्त करवून घेणे आणि दुःखाचा प्रसंग पूर्ण टाळणे जरी सर्वस्वी आपल्या हाती नाही तथापि या गीताचे (म्हणजे जीविताचे) महत्त्व जाणून शक्य तितक्या तालसुरात ते गाइल्यास आनंदाचा अंश विशेषे करून प्राप्त होईल.’’

गुरुदेव रवींद्रनाथ, ऋग्वेदी आणि पंडितजी या मथळ्याचा अन्वयार्थ आता आमच्या वाचकांच्या ध्यानी आला असेल. हे वाचून ऋग्वेदी यांनी भावानुवाद केलेले अभंग गीतांजली हे पुस्तक शोधून वाचण्याची उर्मी एखाद्याला जरी झाली तरी या टिपणाचे सार्थक झाले!

ता.. १) ऋग्वेदी’ म्हणजे वामन मंगेश दुभाषी होय. आपल्या लाडक्या पुलंचे ते आजोबा होत. त्यांचे सुरेख व्यक्तिचित्र पुलप्रेमींना ’गणगोत’मध्ये वाचावयास मिळेल. काहींनी ते यापूर्वीच वाचलेही असेल.
२) ‘अभंग गीतांजली’ या ऋग्वेदींच्या पुस्तकाला काका कालेलकर यांची अत्यंत मर्मग्राही प्रस्तावना आहे. जाणकारांनी तीही वाचावी असे सुचवावेसे वाटते.
३) ऋग्वेदी यांचे संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती आणि बंगाली या भाषांवर उत्तम प्रभुत्व होते. संतवाङ्मयाचे त्यांचे वाचन व पाठांतर दांडगे होते.
४) गोपाळ गणेश आगरकर आणि महादेव गोविंद रानडे हे त्यांचे आदर्श होते.
५) त्यांचे वक्तृत्व उत्तम होते व त्यांना छान विनोदबुद्धीही होती. (संदर्भः ’गणगोत’मधील भाईकाकांचा म्हणजे आपल्या पुलंचा ’ऋग्वेदी’ हा लेख.)
***
(फोटो-- इंटरनेटवरून इकडूनतिकडून घेतले आहेत.)