Wednesday, 8 August 2012

त्यापेक्षा फाशी दिली असतीत तर बरं झालं असतं - सोनी सोरी

सोनी सोरी
सध्या रायपूरमधल्या तुरुंगात असलेल्या सोनी सोरी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना उद्देशून लिहिलेलं हे पत्र, २८ जुलै २०१२चं. मूळ हिंदी पत्राचं इंग्रजी भाषांतर 'क्रॅक्टिव्हिस्ट' ह्या ब्लॉगवर सापडलं. शिवाय मूळ पत्राचे स्कॅन केलेले फोटोही तिथे होते. हे इंग्रजी भाषांतर वाचून नंतर हिंदी पत्र वाचलं आणि त्यानंतर मराठी भाषांतर 'रेघे'वर प्रसिद्ध केलं आहे. यासाठी 'क्रॅक्टिव्हिस्ट'च्या चालक कामयानी बाली-महाबळ यांची परवानगी घेतली आहे.
***





न्यायाधीश साहेब,

छत्तीसगढ सरकार आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या अत्याचारांना तोंड देत असलेल्या एका महिलेकडून सादर नमस्कार. आज मी जिवंत आहे ते तुमच्या निर्णयामुळं. तुम्ही योग्य वेळी आदेश दिलात त्यामुळे मला परत वैद्यकीय उपचार मिळाले. नवी दिल्लीत 'एम्स'मध्ये उपचार घेत असताना मला खूप बरं वाटत होतं. पण साहेब, मला त्याची किंमत आता द्यावी लागतेय. मला इकडे खूप त्रास दिला जातोय आणि अत्याचार केले जातायंत. माझ्यावर दया करावी अशी विनंती मी आपल्याला करते. न्यायाधीश साहेब, मी मानसिकदृष्ट्या खूप त्रास सहन करतेय.

१. मला नग्न करून जमिनीवर बसवलं जातं.
२. मला सारखा भुकेचा सामना करावा लागतो.
३. माझी विचित्र पद्धतीनं तपासणी होते, त्यात माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला हात लावला जातो.
४. मी देशद्रोही आणि नक्षलवादी असल्याचं म्हणत माझ्यावर अत्याचार केले जातायंत.

माझे कपडे, साबण, सर्फची पावडर सर्व सामान जप्त केलं गेलंय आणि माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जातायंत.

न्यायाधीश साहेब, छत्तीसगढ सरकार आणि पोलीस प्रशासन कधीपर्यंत माझी वस्त्र उतरवत राहणार? मी पण एक भारतीय आदिवासी महिला आहे. मला पण अब्रू आहे, मला लाज वाटते. मी माझी अब्रू वाचवू शकत नाहीये. साहेब, माझ्यावर होत असलेले अत्याचार अजून कमी झालेले नाहीत. मी असा काय गुन्हा केलाय ज्यामुळे मला हे सहन करावं लागतंय?

यापेक्षा मृत्यूदंडाची शिक्षा दिली असतीत तर बरं झालं असतं. मी किती काळ ह्या लोकांचा अन्याय सहन करू. माझ्यावर होणारा अन्याय, अत्याचार ह्याबद्दल मी तुमच्यापर्यंत काहीही माहिती पोहोचवू नये असं तुरुंगातल्या कर्मचाऱ्यांनाही वाटतं. ह्या लोकांकडून केला जाणारा प्रत्येक गुन्हा सहन करतच मला मरायचंय, हेच छत्तीसगढ सरकारच्या कायद्यात बसतं. माझा खरा आवाज कोणापर्यंतही पोहोचायला नको, माझा आवाज फक्त छत्तीसगढपुरताच मर्यादित राहावा, जेणेकरून नक्षलवादाची समस्या आणखी भडकेल. मी माझ्या हक्काची मागणी केली तर त्यात चूक काय? मला वेगवेगळ्या मार्गांनी मानसिकदृष्ट्या खच्ची केलं जातंय. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देणं हा गुन्हा आहे का? मला जगण्याचा अधिकार नाही का? मी जन्म दिलेल्या मुलांवर प्रेम करण्याचा अधिकार मला नाही का? मी आज अत्यंत गंभीर अवस्थेत आहे. अशा पद्धतीच्या पिळवणुकीमुळेच नक्षलवादी समस्या उत्पन्न होते.

न्यायाधीश साहेब, माझ्यावर कृपा करा, माझा प्रश्न सोडवण्याचं आवाहन मी करते आहे. नाहीतर रायपूर केंद्रीय कारागृहाचे कर्मचारी मला मृत्यूपर्यंत नेतील. यापूर्वी चुकीची औषधं देऊन माझी त्वचा जाळण्याचेही प्रकार झालेत, ते मी सहन केले. न्यायाधीश साहेब, माझ्यावर दया करा.
शेवटी, नमस्कार.

- श्रीमती सोनी सोरी.
छत्तीसगढहून
२८- ७- २०१२
 ***
सोरी यांच्या पत्राचं पहिलं पान
सोरी यांच्या पत्राचं दुसरं पान


***

सोनी सोरी यांच्यासंबंधी 'रेघे'वर ह्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या दोन नोंदी-
- सोनी सोरी यांना वाचवा
- त्यांनी बोलायची हिंमत दाखवली, पण दांतेवाडात असलं चालत नाही 
 ***

- सोनी सोरी यांच्यासंबंधी 'तेहेलका' साप्ताहिकाने केलेलं वार्तांकन
- राहुल पंडिताने 'ओपन' साप्ताहिकात लिहिलेला लेख
- 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये नुकताच आलेला लेख
- 'इंडियन एक्सप्रेस'मधल्या लेखाला उत्तर देणारी 'काफिला'वरची पोस्ट
- 'इंडिय एक्सप्रेस' मधल्या लेखाचं खंडन करणारा 'द हूट'वरचा लेख
***

2 comments:

  1. India is my country and all Indians are my brothers and sisters.
    I love my country and I am proud of its rich and varied heritage????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????Why it is being taught in the schools?????????????

    ReplyDelete
  2. अवधूत, अरे किती महत्त्वाचं आणि चांगलं काम करतोयस...

    ReplyDelete