Monday, 24 December 2012

र. धों. कर्व्यांच्या म्हणण्यासंबंधीची नोंद

एका मुलीवर बलात्कार झाला तिला न्याय मिळावा अशा घोषणा देत समाज आंदोलन करतो आणि तेवीस वर्षांच्या त्या तरुणीची ओळख लपवायला लागते कारण तिला परत समाज स्वीकारेल याची शाश्वती नसते. असा समाज.

हा सगळा गदारोळ एकीकडे सुरू राहील थोडा वेळ. पण दरम्यान, तुम्हाला थोडा वेळ असेल तर 'समाजस्वास्थ'कार र. धों. कर्व्यांचं म्हणणं वाचून पाहूया का? आपली नोंद या सगळ्या गदारोळाचा एकूण आवाका दाखवणारी नाही, तर त्यातला एखादा कण फक्त या नोंदीत सापडू शकेल. उर्वरित मुद्दा खूप मोठा आहे, पण आपण आपल्या आवाक्यात आहे तेवढं इथे नोंदवून ठेवतो आहोत.


र. धों. कर्व्यांच्या एकूण खूप मोठ्या कामातले - लिखाणातले दोन परिच्छेद खाली देतो-

कामविषयक स्वातंत्र्याच्या मर्यादा
प्रत्येकाला कामशांतीचा हक्क आहे हे एकदा कबूल केले, की प्रत्येकाला आपल्या शक्तीप्रमाणे ती करण्याचे स्वातंत्र्य पाहिजे, हे ओघानेच आले. मात्र कामशांती ही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असल्यामुळे त्याकरता त्या व्यक्तीची संमती असली पाहिजे, कारण इतरांना त्रास होता नये हा नीतीचा नियम समाजात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मान्य केलाच पाहिजे. मात्र दोन व्यक्तींची संमती असेल, तर मग दुसऱ्या कोणालाही मधे पडण्याचा हक्क नाही; कारण मग तो त्या दोन व्यक्तींचा खाजगी प्रश्न झाला, आणि तो वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मर्यादेत येतो. दुसऱ्याला त्रास होऊ नये इतकी काळजी घेतली म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर निष्कारण निर्बंध घालता नये, हे मूलभूत तत्त्व समंजस लोकांना मान्य होईल, असे मी धरून चालतो.
आता यात कोणी असा प्रश्न काढील, की विवाहित स्त्रीपुरुषांवर परस्परांव्यतिरिक्त कोणाशीही संबंध न ठेवण्याचा निर्बंध असतो. या निर्बंधाचा अर्थ काय, याचा विचार केल्यास असे दिसते, की विवाहाने त्यांचा परस्परांवर किंवा निदान परस्परांच्या शरीराच्या काही विशिष्ट भागांवर, मालकी हक्क उत्पन्न होतो, पुष्कळ समाजांत हा मालकी हक्क फक्त स्त्रियांवरच उत्पन्न होतो, आणि पुरुषांना हा निर्बंध लागू असतो तेथेदेखील सत्ता पुरुषांच्या हाती असल्यामुळे ते तो धाब्यावर बसवतात. म्हणजे वस्तुतः यात नैतिक तत्त्व नसून ही केवळ अरेरावी आहे. कित्येक समाजांत तर पुरुषांना राजरोज अनेक बायका करण्याची परवानगीच असते; पण ती जेथे नसते तेथेदेखील पुरुषांचे एकपत्नीत्व केवळ नावालाच असते, हे सर्वांना माहीत आहे. एका माणसाचा दुसऱ्यावर मालकी हक्क असणे हा गुलामगिरीचा अवशेष आहे, रानटीपणाचा अवशेष आहे आणि समंजस लोकांनी तो कबूल करता नये. समान हक्कांसाठी भांडणाऱ्या काही स्त्रिया हा निर्बंध स्त्रियांप्रमाणे पुरुषांनाही कडकपणे लागू करावा, अशी मागणी करतात. पण हा अडाणीपणा आहे, समंजसपणा नव्हे. पण कामविषयक बाबतीत स्वातंत्र्य असावे असे म्हणण्याची पुरुषांचीदेखील छाती होत नाही; तेव्हा आजपर्यंत गुलामगिरीत वाढलेल्या बायकांना तो धीर कसा व्हावा? पारंपरिक स्त्रियांच्या या बावळटपणाला समंजस लोकांनी उत्तेजन देता नये. पण पुरुषांची या बाबतीत वृत्ती अशी असते, की त्यांना स्वतःला स्वातंत्र्य असावे असे वाटते, दुसऱ्याची बायको शक्य तर आपणांस मिळावी यात त्यांना वावगे दिसत नाही; पण आपली बायको मात्र प्रतिव्रता राहिली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. असे पुरुष या अडाणी स्त्रियांना नेहमी पाठिंबा देतात, कारण एकपत्नीव्रताचा निर्बंध आपल्यावर खरोखर लादणे अशक्य आहे, आणि कायद्याने तो लादला तरी आपल्याला आपली सोय लावता येईल, अशी त्यांची खात्री असते. अशी खात्री असण्याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रियांचा व्यभिचार जसा कित्येक प्रसंगी समजण्याचा संभव असतो, तसा पुरुषांचे बाबतीत नसतो. शिवाय स्त्रिया अजून पुरुषांप्रमाणेच स्वतःच्या पायांवर उभ्या राहू लागल्या नाहीत, हे दुसरे एक कारण आहे. हल्लीचे सामाजिक निर्बंध समंजसपणावर आधारलेले नसून केवळ अरेरावीने अमलात आणलेले आहेत.

कर्व्यांच्या ज्या लिखाणातून हे दोन परिच्छेद दिले आहेत, ते लिखाण जुलै १९४२मध्ये प्रसिद्ध झालं होतं. र. धों. कर्वे नग्नतेबद्दल खुलेपणाने बोलले, स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या नैसर्गिक सहज आकर्षणाबद्दल खुलेपणाने बोलले, स्त्री-पुरुष देहांबद्दल स्पष्टपणे बोलले, संततीनियमनाबद्दल बोलले.
र. धों. कर्वे तेव्हाही लोकप्रिय नव्हते, आणि आता तर फार काही बोलूया नको.
***

रघुनाथ धोंडो कर्वे (१८८२-१९५३)
कर्व्यांच्या एकूण कामाशी संबंधित आठ खंड अनंत देशमुख यांनी खूप कष्टाने तयार केले आणि ते पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशितही केले आहेत. यात काही कर्व्यांच्या स्वतःच्या लिखाणाचे खंड आहेत, तर एक त्यांच्याविषयी देशमुखांनी लिहिलेलं चरित्रात्मक पुस्तक, 'समाजस्वास्थ्या'तल्या इतर लेखकांच्या निवडक लेखांचं पुस्तक, इत्यादी भाग आहेत. हे 'फ्लिपकार्ट'वर पाहाता येईल.

आपण वरती जे दोन परिच्छेद नोंदवले, ते या प्रकल्पातल्या ''समाजस्वास्थ्य'मधील निवडक लेख' या खंडात आहेत. (पान क्रमांक : ३४८-३४९) या खंडाची झलक 'बुकगंगा'वर पाहाता येईल.

सध्या सुरू असलेल्या घटनांच्या सगळ्या बाजू काही आपण नोंदवू शकत नाही, पण र. धों. कर्व्यांचं म्हणणं आत्ता सुरू असलेल्या घडामोडींच्या काही बाजूंसंबंधी आठवणारं असू शकतं, म्हणून 'रेघे'वर ही नोंद.
***

4 comments:

 1. या संदर्भात एक शंका आली- या प्रकल्पात 'समाजस्वास्थ'च्या काही अंकांची मुखपृष्ठं छापण्यात आली आहेत, त्यातल्या काहींवर स्त्री नग्नदेहांची चित्रं आहेत, पण असे काही पुरुष नग्नदेहांची चित्रं असलेले अंकही होते का? म्हणजे असायला हवेत. देशमुखांशी फोनवर संपर्क साधला, तेव्हा ते म्हणाले की, 'अंक मिळवणं - पाहाणं खूप अवघड होतं, त्यातले काही मिळवून त्यातलीही काही निवडकच मुखपृष्ठ खंडात छापली, पण तरी पुरुषांचीही नग्नचित्रं असलेली मुखपृष्ठ होती का, या दृष्टीने वेगळी तपासणी करायला हवी.' देशमुख यांचे अतिशय आभार.

  ReplyDelete
 2. (टायमिंग आणि आशय मस्त). रेघ वाढतेय हे (स्वतःपुरतं तरी नक्कीच) आनंददायी आहे. पण इतक्या हे विरोधाभासात 'आवडलं' असं म्हणवत नाही.
  'मुझसे शादी करोगी' या गाण्यात 'कभी तो किसिकी दुल्हनिया बनोगी' अशी ओळ येते.(गीतकार : समीर). मला या ओळीचा खूप राग येतो. पण अजून गीतकाराचा राग आलेला नाही. त्यातही लोक इतक्या चवीनं याचा आनंद घेतात की पुढचे मुद्देच बाद ठरतात.
  आपल्याकड रेव्ह पार्ट्या होतात, बलात्कार होतात, विवाह पूर्व आणि बाह्य संबंध असतात, त्यासाठी पुन्हा खुन, आत्महत्या होतात, हे इथल्या माध्यमांचे सामान्य विषय असतात, (सामाजिक स्वातंत्र्य व्यक्तिगत पातळीवर राजरोसपणे जगणाऱ्या समाजात र.धो.कर्वे म्हणजे शिवाजी महाराजांना पुन्हा बोलावाल्यागत आहे. जिथे सगळे छत्रपती होऊ घातलेत.)  ReplyDelete
 3. कर्व्यांबद्दल लिहिलंस..फार बरं वाटलं.

  ReplyDelete
 4. स्त्रीपुरूष समानतेच्या मुळाशी हा मुलभूत असा मुद्दा आहे. सत्तर वर्षांपूर्वी कर्व्यांनी याबद्दल एवढा स्पष्ट विचार केला आणि तो स्वतःपुरता न ठेवता जाहीरपणे मांडला म्हणजे कर्वे काळाच्या कितीतरी पुढे होते. ते तेव्हा लोकप्रिय झाले असते तरच नवल होतं. आणि आज स्त्रियांना शिक्षणासाठी, नोकरीसाठी घराबाहेर पडूनही बरीच वर्ष होतील तरी आपण मात्र काळाच्या बरोबरच नाही तर मागेच जातोय हे सांगणारी हनी सिंग ची नोंद चांगली टाकली आहेस. कर्व्यांचं आणखीही काही टाकावंस.

  ReplyDelete

डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ट अथवा नेट बँकिंगद्वारे रेघेची 'ऐच्छिक वर्गणी' भरायची असल्यास इथे क्लिक करावं.