भाषा ही पायदळ आणि नौदलाचं पाठबळ असलेली बोलीच असते, असं एक अवतरण भाषाविज्ञानातल्या मंडळींमध्ये प्रसिद्ध असल्याचं आपल्याला कळलं. कुठून कळलं? दोन ठिकाणांहून. एक, जळगाव इथं साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टनं अलीकडंच आयोजित केलेल्या चर्चासत्रात चिन्मय धारूरकर यानं सादर केलेल्या 'बोलीभाषेचे राजकारण' या निबंधावरून आणि दुसरं, मिलिंद मालशे यांनी लिहिलेल्या 'आधुनिक भाषाविज्ञान: सिद्धान्त आणि उपयोजन' या पुस्तकावरून. (हे अवतरण मॅक्स वाइनराइख यांचं आहे- हेही पुस्तकातून).
यातला पहिला दस्तावेज निबंध स्वरूपातला व आपल्यासारख्या वाचकांसाठीही असलेला आहे. आणि दुसरा दस्तावेज पाठ्यपुस्तक स्वरूपाचा, जास्तकरून भाषाविज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठीचा आहे, पण तरी त्यातूनही काही ना काही आपल्यासारख्या वाचकांना सापडेल असं आहेच. पुढील नोंद वाचण्यासाठी सोईचं व्हावं एवढ्याचसाठी हे नोंदवलं. दोन्हींचे हेतू वेगवेगळे आहेत, त्यामुळं अजून काही तुलना करणं बरोबर होणार नाही.
यातला पहिला दस्तावेज निबंध स्वरूपातला व आपल्यासारख्या वाचकांसाठीही असलेला आहे. आणि दुसरा दस्तावेज पाठ्यपुस्तक स्वरूपाचा, जास्तकरून भाषाविज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठीचा आहे, पण तरी त्यातूनही काही ना काही आपल्यासारख्या वाचकांना सापडेल असं आहेच. पुढील नोंद वाचण्यासाठी सोईचं व्हावं एवढ्याचसाठी हे नोंदवलं. दोन्हींचे हेतू वेगवेगळे आहेत, त्यामुळं अजून काही तुलना करणं बरोबर होणार नाही.
आपल्यापुरती पत्रकारितेची मर्यादा स्पष्ट व्हावी असा रेघेचा अधूनमधून बारकासा प्रयत्न असतो. तर मग ह्या मर्यादेत आजच्या मराठी भाषा दिनाला आपण अशी काय नोंद करू शकतो? कारण आपण रेघेचे सगळे बिंदू ज्या मराठी भाषेत नोंदवत आलोय तिच्याबद्दल आणि एकूणच भाषा ह्या गोष्टीबद्दल आपल्याला तशी फारशी माहिती नाहीच. आपल्याला तीच भाषा तेवढी येते आणि आपण तिला वापरतो एवढंच. आपण तिचा अभ्यास असा वेगळा करत नाही. म्हणजे जेवण बनवणं, सेक्स करणं या गोष्टींमध्ये चव, आनंद हे जसं आपोआप आपण शोधत जातो, तसाच आपला भाषेचा आपोआप वापर आहे. त्यात काही चव नि आनंद असेलच, तर तो आपोआप आहे. बेसिक इन्स्टिंक्टच (एक । दोन) म्हणतात काही लोक. त्यामागचा अभ्यास काही आपण करतो असं नाही. तो वेगळा प्रवाह आहे. त्या प्रवाहातल्या मंडळींना स्वतंत्रपणं रेघेवर कधी आणता येईल माहीत नाही, पण रेघेवर त्यांचं काही म्हणणं आणून सोडावं, एवढ्यापुरती ही आजची नोंद.
तर, सुरुवात पायदल-नौदलापासून झालेली. ख्रिस्तोफर कोलंबस या इटालियन नाविकानं अमेरिका खंडाचा 'शोध' लावला असं शाळेत कितवीत तरी शिकवतात. आणि मग कितवीत तरी कुसुमाग्रजांची 'कोलंबसाचे गर्वगीत' ही कविताही शाळेत शिकवायचे. आताही शिकवत असतील. कोलंबसानंतर युरोपातून अमेरिकेत दळणवळणाची सुरुवात झाली, हाही तपशील त्यात येत असेल. विकिपीडिया म्हणतो की, युरोपीय साम्राज्यांमधल्या वाढत्या साम्राज्यवादी वृत्तीमुळं आणि आर्थिक स्पर्धेमुळं कोलंबसाला आपल्या समुद्री सफरी करता येतील असं सुपीक वातावरण मिळालं नि अखेरीस स्पेनच्या राजेशाहीनं त्याला मदत केली. यातून पुढं स्पेनच्या साम्राज्यानं दक्षिण अमेरिकेचं काय काय केलं याची ओझरती नोंद या पूर्वी रेघेवर झालेली आहे. कोलंबसाचं स्वतःचं मत काय होतं नि त्याच्या मनात काय चाललं होतं, हे आपल्या वाचनात आलेलं नाही. पण त्याला महत्त्वाकांक्षी आणि समुद्राला आव्हान देणारा वगैरे म्हणून रंगवलं जाणं सहज शक्य आहे. आणि कुसुमाग्रजांच्या कोलंबसाच्या गर्वगीतात तेच आहे. या कवितेची शेवटची तीन कडवी अशी आहेत :
कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती
मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"
गर्वानं उभारलेली ही शिडं कोणाला कुठं घेऊन जात असतात, याबद्दल फारशी शंका कवितेत नाही. तिचा हेतूच वेगळा आहे. आणि कुसुमाग्रजांची जयंती हा मराठी भाषा दिवस म्हणून दर वर्षी साजरा केला जातो. त्या निमित्तानं मराठी भाषेची अभिमान गीतंही गायली जातात.
या सगळ्यात आपल्याला नोंदीच्या सुरुवातीचं वाक्य आठवून ठेवायचंय फक्त. आणि त्या वाक्याच्या निमित्तानं धारूरकर व मालशे यांचं थोडं थोडं म्हणणंही नोंदवून ठेवू.
कासरगोड इथं केरळ केंद्रीय विद्यापीठात भाषाविज्ञान विभागात सहायक प्राध्यापक असलेल्या धारूरकरांच्या निबंधात म्हटलंय :
मुळात एखाद्या भाषेच्या एका प्रकाराला 'भाषा' म्हणायचं आणि दुसऱ्या प्रकाराला 'बोली' म्हणायचं यातच मोठं राजकारण दडलेलं असतं. ज्या एका विशिष्ट बोलीमागे सत्ता मोठ्या प्रमाणात एकवटलेली असते तिला 'भाषा', 'प्रमाण भाषा' किंवा ढोबळ भाषेत 'शुद्ध भाषा' असं म्हटलं जातं. केवळ ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक अंगांनी ही विशिष्ट बोली पुढारलेली ठरली म्हणून तिला प्राधान्य मिळालं असं असतं. कोणतेही भाषावैज्ञानिक, रूपनिष्ठ अथवा आकारिक असे निकष त्या विशिष्ट बोलीत अंगभूतपणे उपस्थित असल्याने आपण तिला प्रमाण अगर शुद्ध मानत नसतो. उदा. पुणे मराठी (त्यातही सदाशिव पेठी त्यातही एका विशिष्ट जाती आणि वर्गाची बोली) आपण शुद्ध मानतो ती कोणत्याही अंगभूत निकषांमुळे नाही तर पुणं हे ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मराठी समाजासाठी महत्त्वाचं केंद्र राहिलेलं आहे. पुण्यातल्या भाषेतले अंगभूत गुणच असे आहेत की ती शुद्ध ठरावी असा युक्तिवाद तार्किक ठरत नाही. जर तसं पुढारलेपण हे पूर्वापारपणे नंदूरबार किंवा बुलढाण्यासारख्या ठिकाणी असतं तर तिथली बोली आपल्याला शुद्ध वाटली असती. तशीच परिस्थिती ही मैसूर येथील कन्नड शुद्ध मानली जाण्यामगे आहे, त्याच कारणामुळे कृष्णा जिल्ह्याची तेलुगू शुद्ध मानली जाते किंवा तशाच पार्श्वभूमीमुळे कोट्टयम मल्याळम ही शुद्ध ठरते. इथे कुठेही अंगभूतता हा निकष नसून ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या पुढारलेलं असणं एवढंच यामागे असतं.
असं सगळं केल्यानंतर आपण मग जी 'प्रमाण' मराठी वापरतो तिच्याबद्दलही तक्रारी केल्या जातातच. त्यामागंही काही मूल्यं काम करत असतील काय, याचा विचार करायला हवा. तर, मग त्याबद्दल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पवई इथं इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या मालशे यांच्या पुस्तकात म्हटलंय :
भाषा व सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती यांचा संबंध फक्त भाषेच्या शब्दसंग्रहामध्येच आढळून येतो, असे नव्हे. भाषेच्या ध्वनिव्यवस्थेवरही सामाजिक परिस्थितीचा ठसा उमटतो, असा पुरावा न्यू इंग्लंडच्या किनारपट्टीजवळ असणाऱ्या मार्थझ् व्हिनयार्ड (Martha's Vineyard) या बेटाचे भाषिक संशोधन करणाऱ्या लबव् या अभ्यासकाला मिळाला आहे. उन्हाळ्यामध्ये सुट्टी घालविण्यासाठी येथे बाहेरून वाढत्या प्रमाणावर लोक येत असतात. त्यामुळे अनेक सामाजिक स्थित्यंतरे या बेटावर घडून आलेली आहेत. त्यांचा तेथील स्थानिक लोकांच्या भाषेवर (इंग्रजीवर) खोलवर परिणाम झालेला दिसून येतो: ''house'', ''mouth'', ''loud'' यांसारख्या शब्दांमध्ये मध्यस्थानी जो संयुक्त स्वर आहे त्याचे दोन प्रकारचे उच्चार या बेटावर आढळतात; त्यांपैकी ''अऊ'' (उदा. हऊस) हा कमी ''प्रतिष्ठित'' व ''जुनाट''; तर ''आऊ'' (उदा. हाऊस) हा अधिक ''प्रतिष्ठित'' उच्चार मानला जात असे. परंतु लबवला असे दिसले की बेटाबाहेरच्या लोकांचे आर्थिक व सांस्कृतिक आक्रमण थांबविण्यासाठी जुन्या स्थानिक मूल्यांशी एकनिष्ठ राहण्याची गरज लोकांना अत्यंत तीव्रतेने वाटू लागली आहे. असे एकनिष्ठ राहण्याचा एक मार्ग म्हणजे ''जुनाट'' वाटणारे उच्चार पुन्हा रुजविणे, सामाजिक आक्रमण करणाऱ्या ''उपऱ्या'' लोकांपेक्षा आपली सामाजिक-सांस्कृतिक परंपरा भिन्न आहे; त्यांच्या भाषेपेक्षा आपली भाषा भिन्न आहे; अशा भावनेमुळे हे भाषिक वर्णपरिवर्तन झालेले आहे.(आधुनिक भाषाविज्ञान:सिद्धांत आणि उपयोजन, पान १३८-१३९, मौज प्रकाशन.)
सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीने भाषेवर घडवून आणलेल्या परिणामाची अशी अनेक उदाहरणे देता येतील. याच्या उलट प्रक्रियाही घडत असते. विशिष्ट प्रकारच्या वापरामुळे काही सामाजिक दृष्टिकोन व मूल्ये निर्माणही होऊ शकतात.
असं जर असेल, तर मग भाषेचं अभिमान गीत रचण्या-गाण्याऐवजी अपराध गीत का रचू व गाऊ नये?
अपराध गीत नाही रचलं, तर मग 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मुंबई टाइम्स' ह्या पुरवणीत आज आलेल्या खालच्या फिचरसारखं व्हायचं.-
शुद्ध नि प्रमाण भाषेबद्दल बोलताना नोंदीच्या सुरुवातीला आलेल्या दोन अभ्यासक मंडळींच्या मतांमध्ये आणि फिचरमधल्या मतांमध्ये एवढी तफावत कशी काय? भाषा वापरतोय म्हणून भाषेबद्दल सगळंच आपण बोलायला हवं असं नाही. पण, टीव्हीबोली, प्रमाण भाषा, नाईलाज, व्याकरणाचे नियम, दूषित, अर्थकारण- असे अनेक शब्द या फिचरमधील कलावंत मंडळींनी सहज वापरलेत. त्यातही त्यांची व्यक्तिगत मतं असतील तशीच धडपणे फिचरमधे आली असतील असंही नाही. पण एकूण फिचरच ज्या पद्धतीनं मांडणी करतंय, तो मुख्य मुद्दा (मराठीचा!) आहे. असं का झालं? आणि मुंबई-पुण्यात मुख्य बाजारपेठ असलेल्या महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रात मराठी भाषा दिवसाचं जितकं कौतुक होतं, त्याच्या तुलनेत विदर्भात मुख्य बाजारपेठ असलेला (आणि मुंबई-पुण्याची आवृत्ती नसलेल्या, त्यामुळं स्थानिक ठरणाऱ्या) देशोन्नती या वर्तमानपत्रात मात्र असं कौतुक का दिसत नाही? या प्रश्नांची उत्तरं कोणी मराठी भाषेचं अपराधगीत रचलं तर त्यात द्यायला लागतील. कवीचं काम तेवढं तरी असतंच ना. अगदी जोरदार आवेश आणायचाच झाला, तर-
अन्त में कहूँगा-
स़िर्फ, इतना कहूँगा-
'हाँ, हाँ, मैं कवि हूँ';
कवि- याने भाषा में
भदेस हूँ
- धूमिल