१९ एप्रिल २०२६

आंबेडकरांची वेगळी खुर्ची आणि मंगुडकरांचं वेगळं पुस्तक

गजानन बुक डेपो, १९९०
मा. प. (माणिकराव पद्मण्णा) मंगुडकर हे पुण्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारं नाव होतं. काँग्रेसच्या वतीने ते दोन वेळा विधान परिषदेवरही गेले होते. त्यांचं ८ एप्रिल २०२३ रोजी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झालं. त्यांनी १९६४ साली औरंगाबादला (आता- छत्रपती संभाजीनगर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व्याख्यानमालेत 'महाराष्ट्रातील लोकशाही विचार' या सूत्राला धरून काही व्याख्यानं दिली. त्याचं पुस्तक १९६६ साली आलं. मग दुसरी खडबडीत आवृत्ती १९९० साली गजानन बुक डेपोच्या रमेश रघुवंशी यांनी काढली. त्यात दोन विभागांमध्ये रिकामं पान मिळालं तर स्वतःच्या प्रकाशनाच्या पुस्तकांच्या जाहिराती छापणं, खुद्द त्या आवृत्तीचा नि आधीच्या आवृत्तीचा तपशील कुठेच न देणं, प्रस्तावनेच्या पानांना कोणताच पानक्रमांक नसणं, मुखपृष्ठावर सूर्यवंशींच्या पसंतीला उतरलेल्या तीनच विचारवंतांची चित्रं नि नावं देणं, इत्यादी ढिसाळ प्रकार आहेत. पहिल्या आवृत्तीचा जुनाच टाइपसेट वापरून ही दुसरी आवृत्ती काढलेली आहे- फक्त मंगुडकरांची आंबेडकरांना केंद्रस्थानी ठेवणारी नवीन प्रस्तावना त्यात वाढवलेय. या आवृत्तीच्या उरल्यासुरल्या प्रती अजूनही पस्तीस वर्षांनी काही ठिकाणी मिळू शकतात. 

या पुस्तकात मंगुडकरांनी गोपाळ हरी देशमुख ('लोकहितवादी'), जोतीराव फुले, महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, मोहनदास करमचंद गांधी, भीमराव रामजी आंबेडकर, मानवेंद्रनाथ रॉय या आठ व्यक्तिमत्वांनी लोकशाहीच्या अंगाने केलेल्या मांडणीचा सखोल आढावा घेतला आहे. ब्रिटीश वसातहवादामुळे भारताचा पाश्चात्त्य आधुनिकतेशी अधिक जवळून संपर्क आला, स्वाभाविकपणे त्याचा प्रभाव भारतातल्या लोकशाही विचारावर पडला, तरीही इथल्या विचारवंतांनी स्थानिक परिस्थितीनुसार, भारतीय समाजजीवनाच्या संदर्भात या विचारांची छाननी करून काही भाग टाकून दिला तर काही भागात स्वतंत्रपणे नव्या विचारांची भर घातली, त्यामुळे 'इथल्या लोकशाही विचाराला इथल्या मातीचा खास गंध आहे', असं मंगुडकर पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत नोंदवतात. मंगुडकरांचं हे विश्लेषण साठ वर्षांहून अधिक जुनं असलं, तरी साचेबद्धपणा टाळून त्या-त्या काळच्या ऐतिहासिक घडामोडींच्या संदर्भात या व्यक्तिमत्वांचा साकल्यपूर्ण विचार करण्याची त्यांची पद्धत असल्यामुळे पुस्तक काही बाबतीत आजही प्रस्तुत ठरणारं आहे. 

राज्यसंस्थेची कल्पना, समाजव्यवस्थेच्या पातळीवरील लोकशाही धारणा, लोकशाही व्यवस्थेशी संबंधित आर्थिक दृष्टिकोन, स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या प्रशासकीय रचना, अशा अंगाने मंगुडकरांनी उत्कृष्ट विवेचन केलंय. त्या-त्या व्यक्तिमत्वांच्या ऐतिहासिक योगदानाची दखल घेताना काही मर्यादाही त्यांनी नोंदवल्या आहेत. हे सर्व मुळातून वाचण्यासारखं आहे.

मा. प. मंगुडकर (१९२९-२०२३)
पण पुस्तकाचं मूळ व्याख्यानांमध्ये असल्यामुळे वेळेची मर्यादा मोठीच पडली असणार किंवा स्वतंत्रपणे काही मर्यादा दिसतात, असंही म्हणता येईल.  उदाहरणार्थ, मंगुडकर स्वतः विठ्ठल रामजी शिंदे यांचे अग्रगण्य अभ्यासक राहिलेले असूनसुद्धा या भाषणांमध्ये शिंद्यांचा उल्लेखही नाही. लोकशाहीपासून धर्मापर्यंत आणि सामाजिक नीतिव्यवहारापर्यंत कित्येक आस्थाविषयांना शिंद्यांनी विद्वत्तेच्या अंगाने आणि प्रत्यक्ष कृतीच्या अंगाने स्पर्श केला. मंगुडकरांनी साठच्या दशकारंभी संपादित केलेल्या 'शिंदे लेखसंग्रह' या अतिशय सुंदर पुस्तकामध्ये शिंद्यांच्या या मांडणीची लक्षणीय झलक मिळते. तसंच या व्याख्यानांमध्ये विनोबा भावेही नाहीत. वास्तविक ही भाषणं दिली तेव्हा भूदान आंदोलनाच्या घडामोडी होत होत्या, सर्वोदय वगैरे गोष्टींची चर्चा होती. पण मंगुडकर त्यांच्याविषयी बोलत नाहीत.  महाराष्ट्रात होऊन गेलेल्या सर्वच विचारवंतांची दखल घेणं, हा या व्याख्यानमालेचा उद्देश नव्हता, हे खरं; पण 'लोकशाही विचार' हे सूत्र असेल तर शिंदे नि विनोबा यांना बाजूला ठेवणं फारसं रास्त वाटत नाही. याउलट, आगरकरांचा इथला उल्लेख ओझरता आणि लोकशाही विचाराबाबत फार वेगळं काही नोंदवणारा नाही. या व्यतिरिक्त, मंगुडकर मानवेंद्रनाथ रॉय यांच्या मूलगामी मानवतावादाबाबत पुरेशी चिकित्सक भूमिका न मांडता बरंचसं स्पष्टीकरणच देतात. यात उल्लेख न आलेल्या विनायक दामोदर सावरकर यांचा हिंदुत्ववादाचा विचार 'लोकशाही'मध्ये येतो का, हा वादाचा विषय असला तरी तो विचार कमी-अधिक फरकाने भारतात सध्या सरकारी पातळीवर प्रबळ आहे, त्याची चिकित्साही या पुस्तकात नाही.

शिवाय, या व्यक्तिमत्वांनी अर्थव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, इतर काही सामाजिक व्यवस्था यांबाबतीत मांडलेल्या भूमिकांची चर्चा मंगुडकरांनी केलेली असली तरी फुल्यांचा सार्वजनिक सत्य धर्म, रानड्यांनी संतपरंपरेतून मांडलेला नवभागवत धर्म, टिळकांनी 'गीतारहस्या'त उचलून धरलेली 'लोकसंग्रहा'ची संकल्पना, आंबेडकरांनी केलेली बौद्ध धम्माची मांडणी- इत्यादींचाही फारसा उहापोह या भाषणांमध्ये नाही. या मंडळींनी आपापल्या लोकशाही विचाराला आधार म्हणूनच धार्मिकतेच्या या अंगांशी झटापट केली होती. त्यातून त्यांच्या विचारव्यूहांच्या चौकटी निश्चित झाल्याचंही दिसतं. या आधुनिक विचारांमधून उद्भवलेल्या, पण परस्परांहून कमी-अधिक निराळ्या धर्मविचारांचा मुद्दा मंगुडकरांनी इथे हाताळला नाही. मानवेंद्रनाथ रॉय आणि आगरकर सोडले तर इतर सर्वच मंडळींनी धर्मविचाराबाबतही काही ना काही वेगळ्या वाटा धुंडाळण्याचे प्रयत्न केले. गोपाळ कृष्ण गोखल्यांनीही राजकारणाच्या अध्यात्मिकीकरणाची (संकुचित धार्मिकीकरणाची नव्हे) भूमिका कशी मांडली आणि त्यात सामाजिक नीतीच्या अंगाने अध्यात्मिकता कशी अभिप्रेत होती, अशा धर्तीचं विवेचन मंगुडकरांनी केलं आहे, पण त्या-त्या व्यक्तींच्या राजकीय-आर्थिक विचारांइतका या अध्यात्मिकतेशी आणि धार्मिकतेशी संबंधित विचारांवर भर दिलेला नाही. आपल्या वातावरणात सध्या राजकारणाचं चमत्कारिक धार्मिकीकरण झालेलं आहे, पण त्यात गोखल्यांना अपेक्षित अध्यात्मिकीकरण किंवा आंबेडकरांना अपेक्षित सामाजिक नीती यांचा काहीच संबंध नाही, त्यामुळे या संदर्भातील चर्चेचा अभाव विशेष जाणवतो.

या पुस्तकातील सर्वांत सविस्तर चर्चा आंबेडकरांच्या लोकशाही विचाराची आहे. तसंच, दुसऱ्या आवृत्तीची सर्व प्रस्तावना आंबेडकरांबद्दलच आहे. आपली नोंद मुख्यत्वे त्यातल्या एका मुद्द्यापुरती आहे. या मुद्द्यासंबंधी मंगुडकरांचं निरीक्षण बरंच दीर्घ पल्ल्याची झेप घेणारं ठरलं. आंबेडकरांच्या ‘विवेचनाचा तात्त्विक पाया’ सांगताना मंगुडकरांनी आंबेडकरांवर विशेष प्रभाव राहिलेले, कोलंबिया विद्यापीठातील त्यांचे शिक्षक जॉन ड्युई यांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले :
जॉन ड्युईचं तत्त्वज्ञान फलप्रामाण्यवादावर उभारलं आहे. किंवा ड्युईच्या शब्दांत सांगायचं झालं तर ते साधनवादावर (Instrumentalism) उभारलं आहे. एकोणिसाव्या शतकातील उपयुक्ततावाद वा अनुभवप्रामाण्यवाद यांच्यापेक्षा हे तत्त्वज्ञान काही मूलभूत प्रश्नांबाबत वेगळं आहे. डॉ. आंबेडकरांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, ऐतिहासिक प्रश्नांची जी चिकित्सा केली आहे, त्या चिकित्सा पद्धतीचा तात्त्विक पाया ‘साधनवाद’ आहे असं दिसून येईल. हा एकाच विचाराचा पाया त्यांच्या सर्व तत्त्वचर्चेतून धावताना आढळेल. [...] या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणारे व या दृष्टिकोनातून विविध भारतीय प्रश्नांची उत्तरं शोधणारे एक नामवंत भारतीय विचारवंत म्हणून जगाच्या इतिहासात त्यांचा उल्लेख करावा लागेल.
मंगुडकरांनी आंबेडकरांच्या फलप्रामाण्यवादावर (Pragmatism) भर देणारं विधान केलं, त्या दरम्यानच आंबेडकरी चळवळीच्या अभ्यासक एलिनॉर झेलियट यांनी फलप्रामाण्यवादाच्या तात्त्विक बाजूसह आंबेडकरांच्या विचारव्यवहाराची उकल करायचा प्रयत्न केला (‘डॉ. आंबेडकरांच्या फलप्रामाण्यवादी तत्त्वज्ञानासंदर्भात प्राचार्य मंगुडकरांसोबत झालेली चर्चा मला अत्यंत उपयोगी पडली’, अशी तळटीपही त्यांनी जोडली- Eleanor Zelliot, From Untouchable to Dalit : Essays on the Ambedkar Movement, Manohar Publishers, 2005 : page 148). झेलियट लिहितात : “आंबेडकरांच्या अमेरिकेतील अनुभवामुळे बहुधा त्यांच्यात लोकशाहीविषयीचा अढळ विश्वास निर्माण झाला आणि त्यांना फलप्रामाण्यवादी, बहुआयामी दृष्टिकोन राखण्याची प्रेरणा मिळाली” (Zelliot, page 314) “आंबेडकरांच्या पद्धती थेटपणे भारतीय परिस्थितींशी संबंधित होत्या. त्या पद्धतींमागची विचारसरणी आशावादी, फलप्रामाण्यवादी अमेरिकी लोकशाहीविचाराशी घनिष्ठ जवळीक राखणारी होती. या अमेरिकी लोकशाही विचारामध्ये समतेचा, उर्ध्वगामी गतिशीलतेमध्ये अडथळे न राखण्याचा, माणसांना उसंत मिळावी यासाठी यंत्रांचा वापर करण्याचा, आणि प्रत्येक व्यक्तीचा आदर राखणाऱ्या मनोवृत्तीचा उपदेश केला जात असे (पण नेहमीच त्यानुसार आचरण केलं जात होतं असं मात्र नाही)” (Zelliot, page 83).

मॅथ्यू लेदर्ले यांनी आधुनिक महाराष्ट्रातील तात्त्विक प्रवाहांविषयी केलेल्या विस्तृत संशोधनाचं पुस्तक १९७६ साली प्रकाशित झालं, त्यातही (मंगुडकरांचा संदर्भ देत) आंबेडकरांच्या विचारव्यूहातील ‘फलप्रामाण्यवादा’चं विश्लेषण आहे (Mathew Lederle, Philosophical Trends in Modern Maharashtra, Popular Prakashan 1976 : page 175). भविष्यातील परिणाम वर्तमानातील प्रयोगांच्या आधारे निर्धारित करत असताना कोणते मूल्यनिवाडे आणि अनुमानं कशा तऱ्हेने कार्य करतात, याचा मुख्यत्वे विचार करून त्यानुसार सिद्धान्त आणि संकल्पना मांडण्याचा प्रयत्न फलप्रामाण्यवाद, प्रयोगवाद किंवा साधनवाद म्हणून ओळखला जात असल्याचं लेदर्ले नमूद करतात (Lederle, page 175).

ड्युई यांनी पहिल्यांदा १९१६ साली प्रकाशित झालेल्या ‘डेमॉक्रसी अँड एज्युकेशन’ या पुस्तकात लिहिलं आहे की, “विचार म्हणजे आपल्या अनुभवातील बुद्धिगम्य घटकाची मांडणी असते. त्यामुळे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून कृती करणं शक्य होतं. […] आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी अधिक व्यापकपणे आणि अधिक सूक्ष्मपणे निरखायच्या आणि त्यातून फक्त भविष्यात होऊ घातलेल्या घडामोडींकडे निर्देश करणारे घटक तेवढे निवडायचे, इतकंच ज्ञानी माणसाला करता येऊ शकतं” (John Dewey, Democracy and Education : An Introduction to the Philosophy of Education, The Macmillan Company, 1955 (1916) : page 171). भवतालातील घडामोडींमधून भविष्यावर परिणाम करणारे घटक निवडायचे ते कशासाठी तर त्यावर विचारपूर्वक कृती करण्यासाठी. अन्यथा “नित्यक्रमाच्या आणि लहरी वर्तनातून होणाऱ्या कृती या विचारी कृतीच्या विरोधात जाणाऱ्या असतात”. “या नित्यक्रमानुसार आणि लहरीपणे वागत असताना वर्तमान कृतीतून उद्भवणाऱ्या भविष्यातील परिणामांची जबाबदारी घेतली जात नाही,” असं ते म्हणतात. तर, या भविष्यातील फळाचा विचार करून वर्तमानात कृती करण्याच्या दृष्टिकोनात जबाबदारी स्वीकारणंही अभिप्रेत आहे. शिवाय, “कणभर अनुभव हा मणभर सिद्धान्तांहून कधीही चांगला, कारण कोणत्याही सिद्धान्ताची मौलिक आणि पडताळण्याजोगी अर्थवत्ता अनुभवातूनच सिद्ध होत असते,” असंही ड्युईंनी लिहिलं. (Dewey, page 169). “अनुभवापासून फारकत घेतलेला सिद्धान्त म्हणजे केवळ शाब्दिक सूत्र ठरेल; असा सिद्धान्त म्हणजे विचारांना किंवा अस्सल सिद्धांकनाला अनावश्यक व अशक्य करून टाकण्यासाठीच्या घोषवाक्यांचा संच होऊन जाईल.”

आंबेडकरांचं निधन झाल्यावर आठच वर्षांनी मंगुडकरांनी ही व्याख्यानं दिली. पण त्यांनी आंबेडकरांचं लेखन मुळातून वाचलं होतं आणि त्यांचा राजकीय-सामाजिक व्यवहार जवळून पाहिला होता. त्यांनी या विषयावर बरंच लेखन केलं. ते काही काळ महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधनं समितीचे सदस्यही होते. त्यांनी आंबेडकरांसंदर्भात नोंदवलेल्या फलप्रामाण्यवादाच्या मुद्द्यावर मराठीत पुढे काही धड चर्चा झाल्याचं दिसत नाही. आंबेडकरांच्या लोकशाही विचाराच्या अंगानेही याचा मागोवा घेतला गेलेला नाही. इंग्रजीत या संदर्भात झालेल्या चर्चेत हळूहळू मंगुडकरांचं नाव बाजूला पडलं. 

आंबेडकरांनी १९४२ साली शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन (शेकाफे) या राजकीय पक्षाची स्थापना केली (त्याआधी १९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती). 'शेकाफे'च्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की : "या पक्षाचं धोरण साम्यवाद किंवा समाजवाद, गांधीवाद, किंवा इतर कोणत्याही वादासारख्या श्रद्धेय मताशी किंवा विचारसरणीशी बांधील नाही. लोकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठीची कोणतीही योजना स्वीकारण्याची पक्षाची तयारी असेल. त्या योजनेचा उगम कोणताही असला तरी चालेल, पण ती पक्षाच्या तत्त्वांशी सुसंगत असायला हवी. पक्षाची जीवनदृष्टी निखळपणे विवेकी व आधुनिक, अनुभववादी असेल, अकादमिक नसेल." याचा दाखला देत गेल ऑमवेट यांनी आंबेडकरांच्या विचारव्यवहारातील फलप्रामाण्यवादावरचा भर या निमित्ताने "नव्याने" दिसल्याचं म्हटलं आहे (Gail Omvedt, Ambedkar : Towards and Enlightened India, 2004, e-book : page 124). पण त्या आंबेडकरांच्या विचारांमधला एक आधीपासूनचा धागा म्हणून याचा विचार करत नाहीत. 

दुसरीकडे, या फलप्रामाण्यवादी भूमिकेमुळे आंबेडकरांना मार्क्सवादी कल्पितादर्श (युटोपिया) विचारात घेता आला नाही, असं मत आनंद तेलतुंबडे यांनी व्यक्त केलं आहे (Anand Teltumbde, "Ambedkar's Socialism : Some Reflections:, Seminar, January 2018). तसंच कोणत्याही 'वादा'ला, किंबहुना स्वतःच्याच 'कल्पनां'नाही बांधील नसणारी ही भूमिका असल्याचं त्यांनी आंबेडकरचरित्रात म्हटलं आहे (Anand Teltumbde, Iconoclast : A Reflective Biography of Dr Babasaheb Ambedkar, Penguin, 2024, e-book : page 67). पण या मांडणीत फलप्रामाण्यवादाचा अर्थसंकोच केला जातो. फळावर लक्ष ठेवून सोयीसोयीने कितीही भूमिका बदलत जावं, असं हे तत्त्वज्ञान नाही, हे ड्युई यांच्या वर उद्धृत केलेल्या विधानांवरून स्पष्ट होतं, त्यापेक्षा अधिक आंबेडकरांच्या विचारव्यवहारावरून स्पष्ट होतं. त्यांनी भूमिका बदलल्या किंवा त्यांच्या व्यवहारात अंतर्विरोध होते, हे खरं आहे; पण ते काहीच तत्त्वं किंवा कल्पना टिकाऊ मानत नव्हते, असा याचा अर्थ नाही. 'व्यक्तिविकास', 'स्वातंत्र्य-समता-सहभाव', इत्यादी मुद्दे ते टिकाऊ कसोट्यांसारखे वापरत होते, हे त्यांनी अगदी सुरुवातीच्या काळात, १९२० साली 'मूकनायक'मध्ये 'स्वराज्य' आणि 'सुराज्य' या मुद्द्याबाबत लिहिलेल्या अग्रलेखांमध्येही दिसतं (डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक, महाराष्ट्र शासन, २००८ : पानं ३५०-३५१, ३५९-३६०, ३६७) आणि अगदी शेवटाकडे बुद्धविचारासंदर्भात केलेल्या मांडणीमध्येही दिसतं (Buddha and His Dhamma, Siddharth College Publication, 1957 : page 129). यातील सहभावाच्या संकल्पनेला त्यांनी बुद्धविचारातील मैत्री या संकल्पनेशी जोडून मांडणी केली. व्यक्ती-व्यक्तीमधील सहभाव हा सामाजिक लोकशाहीचा पाया असतो, अशा दिशेने त्यांचा तत्त्वविचार जातो. यावर टीका करायला हरकत नाही, पण त्यांनी काही कल्पना पायाभूत मानल्या होत्या. त्यामुळे एका अर्थी ते मंगुडकर म्हणतायंत तसे पूर्णपणे फलप्रामाण्यवादीही नव्हते. 

ख्रिस्तॉफ जॅफ्रलो यांनी आंबेडकरांच्या राजकीय दृष्टिकोनाबाबत मुख्यत्वे व्यावहारिक तडजोडीच्या अंगाने 'प्रॅग्मॅटिक' हा शब्दप्रयोग केला. यात संधिसाधूपणा अपेक्षित नसून सर्वोत्तम हित साधणारा पर्याय निवडण्याची व्यूहरचना अपेक्षित आहे, असं ते म्हणतात. पण तरी मंगुडकरांनी नोंदवलंय त्या अंगाने या तत्त्वज्ञानाचा मूलाधार शोधण्याचा प्रयत्न जॅफ्रलोंनी केलेला नाही (2005 : page 99). 

HarperCollins, 2023
त्यानंतर, अलीकडे २०२३ साली टेक्सास विद्यापीठातील प्राध्यापक स्कॉट आर. स्ट्राउड यांनी आंबेडकर आणि ड्युईंचा फलप्रामाण्यवाद यांचा बराच सर्वांगीण आढावा घेणारं पुस्तक प्रकाशित केलं. आंबेडकरांचं 'जागतिक तत्त्वज्ञ' म्हणून स्थान निश्चित करण्याला अशा मांडणीचा उपयोग होईल, असं स्ट्राउड प्रस्तावनेत म्हणतात (Scott R. Stroud, The Evolution of Pragmatism in India, HarperCollins, 2023: page 19). ही जागतिक होण्याची चमत्कारिक स्पर्धा इथे लावून काय उपयोग आहे आणि त्यातून आंबेडकरांसारख्या विचारवंताबाबतीत आपली समजूत खरोखर वाढेल का, हा प्रश्न थोडा शांतपणे लक्षात घ्यायला हवा. सध्या तो मुद्दा बाजूला ठेवून पुढे जाऊ.

"फलप्रामाण्यवादी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणारे व या दृष्टिकोनातून विविध भारतीय प्रश्नांची उत्तरं शोधणारे एक नामवंत भारतीय विचारवंत म्हणून जगाच्या इतिहासात आंबेडकरांचा उल्लेख करावा लागेल", असं मंगुडकर १९६४ साली म्हणाले होते. स्ट्राऊड यांनी असा स्पष्ट उल्लेख करत लिहिलेलं अख्खं पुस्तक आता प्रकाशित झालंय. इतकंच नव्हे तर या वर्षीपासून 'सोसायटी फॉर द अ‍ॅडव्हान्समेन्ट ऑफ अमेरिकन फिलॉसॉफी' या संस्थेच्या वतीने 'भीमराव आंबेडकर प्राइझ इन ग्लोबल प्रॅग्मॅटिझम' असा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा परवाच्या आंबेडकरजयंतीच्या निमित्ताने करण्यात आली. "अमेरिकी विचारवंत आणि जगातील पुरेसा अभ्यास न झालेल्या परंपरा व चळवळी यांच्यातील अन्योन्यसंबंधांचा शोध घेणाऱ्या अभ्यासकां"चा गौरव करणं, हा या पुरस्काररामागचा उद्देश असल्याचं सदर संस्थेच्या वेबसाइटवर नोंदवलं आहे. स्ट्राउड कुटुंबाने दिलेल्या निधीवर हा पुरस्कार सुरू करण्यात आला.

स्ट्राउड यांनी कष्टपूर्वक पुस्तक लिहिलेलं आहे. आंबेडकर १९१३ ते १९१६ या काळात कोलंबिया विद्यापीठात असताना त्यांनी केलेल्या अभ्यासक्रमांचा सखोल शोध घेऊन, ड्युईंकडून आंबेडकरांपर्यंत काय आलं, त्यातलं आंबेडकरांनी काय स्वीकारलं नि काय नाकारलं, इत्यादीचा बरेचदा रोचक ठरेल असा आढावा स्ट्राउड यांनी घेतला आहे. त्यासाठी आंबेडकरांचा भारतातला काही ठिकाणी टिकून असलेला पुस्तकसंग्रहसुद्धा स्ट्राउड यांनी अभ्यासला. या पुस्तकावर स्वतंत्र नोंद करायची इच्छा असल्यामुळे इथे त्याबद्दल अधिक बोलायला नको. पण या पुस्तकात काही निष्कर्ष अतिशयोक्ती करणारे आहेत, असं वाटतं. आंबेडकर-ड्युई संबंधांचा सखोल आढावा म्हणजे 'भारतातल्या फलप्रामाण्यवादाच्या उत्क्रांती'विषयीची मांडणी नाही, हे नजरेआड करून पुस्तकाचं शीर्षक अतिशयोक्ती करतं, तसंच आंबेडकरांच्या बुद्धविचाराविषयीच्या मांडणीला 'नवयान प्रॅग्मॅटिझम' म्हणण्यापर्यंत गोष्टी ताणणंही अतिशयोक्त वाटतं. फलप्रामाण्यवाद हे त्यांच्या विचारातल्या अनेक सूत्रांमधलं एक सूत्र आहे, एकमेव नव्हे, असं स्ट्राउड प्रस्तावनेत म्हणतात. पण शेवटी सगळं मिळून आंबेडकरांचा विचारव्यवहार या एकाच सूत्रापुरता गुंफत जाणं बरं वाटत नाही. अकादमिक अवकाशात संकल्पनांची उत्पादनं करताना संस्थात्मक कारणं जास्त कारणीभूत असल्याची शंका सतत येते. शिवाय, 'अमेरिकी' तत्त्वज्ञानाशी सांगड घालण्याचा 'जागतिक'पणाशी संबंध जोडणं, तर अगदीच गैर वाटतं. आता वर उल्लेख आलेल्या पुरस्कारामुळे हे अधिक ठसत जाणार. तरीही, स्ट्राउड यांचं पुस्तक वाचण्यासारखं आहे. आंबेडकर आधुनिकता आणि परंपरा, तसंच सामाजिक लोकशाही या संकल्पनांशी कोणती झटापट करू पाहत होते, याचा काही अंदाज येण्यासाठी उपयोगी ठरेल अशी चर्चा या पुस्तकात आहे.

मंगुडकरांचं पुस्तकही अशाच कारणांसाठी वाचण्यासारखं आहे. मराठीत अकादमिक अभ्यासकांपासून पत्रकारांपर्यंत सर्वच पातळ्यांवर संकल्पनांबाबतचं, विचारांबाबतचं ऐतिहासिक आकलन मंदावत गेलेलं दिसतं. त्या-त्या वेळच्या घडामोडींवर त्या-त्या वेळचं तात्पुरतं बोललं की संपलं. एखाद्या अभ्यास परिषदेपुरता निबंध, आजच्या टीव्हीवरच्या किंवा फेसबुकवरच्या चर्चेपुरते संदर्भ, एवढंच. या पार्श्वभूमीवर मंगुडकरांनी मांडलेलं महाराष्ट्रातल्या लोकशाही विचाराचं ऐतिहासिक आकलन महत्त्वाचं वाटतं. त्यांच्या काही मर्यादा वरती नोंदवल्याच. इतरही नोंदवता येतील. उदाहरणार्थ, आंबेडकरांनी भारतीय संविधानासंबंधी 'स्टेट्स अँड मायनॉरिटीज्' या शीर्षकाखाली एक आराखडा १९४५ साली सादर केला, त्यात राज्यसंस्थानिष्ठ समाजवादी (स्टेट सोशॅलिझम) धोरणांचं समर्थन केलं होतं. त्या संदर्भात मंगुडकर म्हणतात, "डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील हा अल्पसा काळ सोडला तर त्यांना साम्यवादातील विचाराबद्दल आयुष्यभर कधीही आकर्षण वाटलं नाही” (पान ५९). आकर्षणाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी, आंबेडकरांच्या विचार-व्यवहारात मार्क्सविचारातली काही तत्त्वं (काही उद्योगांवरील राज्यसंस्थेची मालकी, इत्यादी) आधीपासून मौजूद होती, हे त्यांनी १९३६ साली स्थापन केलेल्या 'स्वतंत्र मजूर पक्षा'च्या धोरणापासून ते अगदी 'शेकाफे'च्या जाहीरनाम्यापर्यंत आणि 'बुद्ध अँड हिज् धम्म'पर्यंतही दिसतं. फेबियन समाजवादाकडेही त्यांचा कल वेळोवेळी दिसून आला. पण साम्यवादी हुकूमशाही, त्यातील व्यक्तीच्या अवहेलनेची गंभीर शक्यता, इत्यादींबद्दल आंबेडकर सातत्याने नाराजी व्यक्त करत आले. 

यातल्या मंगुडकरांच्या मांडणीला आणि आंबेडकरांच्या भूमिकांना तत्कालीन ऐतिहासिक घडामोडींची पार्श्वभूमीही होती. मंगुडकर इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रिडमशी संलग्न होते. शीतयुद्धाच्या काळात एकीकडे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील भांडवलदार राष्ट्रं आणि सोव्हिएत रशियाची छावणी यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ही संस्था होती. काँग्रेस फॉर कल्चरल फ्रिडम या अमेरिकी निधीवर चालणाऱ्या संस्थेची भारतातली ही बहीण. मंगुडकरांच्या भूमिकेवरच हेत्वारोप करण्यासाठी हे नोंदवलेलं नाही. पण त्यांच्या मांडणीत मार्क्सवाद आणि साम्यवाद याबद्दल आलेली भूमिका त्यांच्या इतर मांडणीइतकी ऐतिहासिक आकलन टिकवणारी वाटत नाही, त्याची एक पार्श्वभूमी म्हणून तरी हे तथ्य लक्षात घेता येतं. तसंच, आंबेडकर विशेषकरून रशियातल्या कम्युनिस्ट / साम्यवादी राज्यसंस्थेच्या व्यवहाराकडेही लक्ष ठेवून होते. सोव्हिएत संघाविषयी आस्था बाळगणारा आंद्रे जिदसारखा फ्रेंच लेखक रशियात जाऊन आल्यावर काय लिहितोय, हेही ते वाचत होते. आस्था पूर्ण न गमावताही जिदच्या चिकित्सक दृष्टीला तिथे कोणत्या उणिवा दिसल्या, व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप कसा दिसला, हे आंबेडकरांनी पत्रकार ह. वि. देसाई यांना १९४०च्या दरम्यान दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

या मुलाखतीत रशियाच्या तत्कालीन राज्यकर्त्यांच्या (म्हणजे जोसेफ स्टॅलिनच्या) संदर्भात आंबेडकर म्हणाले : 
They may be devils. But they have got good ideas! [ते सैतान असतीलही, पण त्यांच्याकडे काही चांगल्या कल्पना आहेत!]. पण ठराविक चाकोरीतून समाजाला विशिष्ट तत्त्वज्ञानाने वळण लावण्याची कल्पना मला पसंत नाही. नेहमी समाज experimental stageमधे (प्रयोगावस्था) असला पाहिजे. नव्या कल्पनांना, विचारांना आणि प्रयोगांना त्यात वाव असला पाहिजे. एका लेखणीच्या फटकाऱ्यानं आदर्श असा समाज कुणालाही निर्माण करता येणार नाही. प्रयोगावस्थेतूनच आदर्श जग हळूहळू निर्माण होत असतं. [...] माणसाच्या मनाचा विकास होण्याला स्वातंत्र्य पाहिजे. एका ठराविक ठशानं माझ्या खुर्च्या कुणी तयार केल्या तर त्या मला आवडणार नाहीत. माझ्या खुर्च्या थोड्या वेगळ्या असलेल्या मला आवडतील! 
(ह. वि. देसाई, मोठ्यांच्या मुलाखती, शेठ हिरजी मोहनजी, १९४० : पानं २६-२७)

वरच्या अवतरणात एकाच वेळी समाज प्रयोगावस्थेत राखण्याचं 'फलप्रामाण्यवादी' तत्त्वही आलेलं आहे, पण साम्यवादी तत्त्वांबाबतची आस्थाही सूचित झालेली आहे. याच मुलाखतीत सोव्हिएत रशियामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याचा अभाव असल्याबद्दलही आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली. साम्यवादी व्यवहाराबद्दल नाराजी, पण काही तत्त्वांविषयी आस्था, असा हा भाग होता. त्याच्याशी संबंधित इतर अनेक अवतरणं देता येतील. पण मराठीत आंबेडकर-मार्क्स यावर बरीच चर्चा झालेली आहे, त्यामुळे त्यावरही अधिक बोलण्याची गरज नाही. तरीही, फलप्रामाण्यवादाच्या अंगाने आंबेडकरांच्या या संदर्भातल्या भूमिकेची अधिक सविस्तर नि सखोल दखल घेणं आवश्यक आहे. मंगुडकरांनी या संदर्भात ठळकपणे मुद्दा मांडलेला असून मराठीत याबाबत पुरेशी चर्चा झाली नाही, आणि आता 'जागतिक' पातळीवर (बहुधा मराठी अवकाशातले विचारांचे नि व्यवहारांचे संदर्भ नजरेआड करून) यावर चर्चा होईल, असा हा दुहेरी गुंता आहे. जोतीराव फुले यांच्या जन्मदिवसाचं द्विशताब्दी वर्ष ११ एप्रिलला सुरू झालं, शिवाय आंबेडकरांची एकशेपस्तिसावी जयंती १४ एप्रिलला साजरी झाली आणि मंगुडकरांचा स्मृतिदिन ८ एप्रिलला झाला. म्हणून या पुस्तकाची मिणमिणती आठवण ठेवणारी ही नोंद.

(डॉ. आंबेडकरांच्या 'रानडे, गांधी आणि जीना' या इंग्रजी भाषणाचं विवरणात्मक टिपांसह केलेलं मराठी भाषांतर साधना प्रकाशनाकडून अलीकडे प्रकाशित झालं. त्यातल्या एका टिपेचा काही भाग या नोंदीसाठी वापरला आहे).

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६). मुंबईतल्या घरामध्ये खुर्चीत निवांत, १९४६ साली.
छायाचित्र : मार्गारेट बर्क-व्हाइट / लाइफ मॅगेझिन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा